प्रकार

Saturday, August 12, 2006

स्पर्श

छू कर मेरे मन को किया तूने क्या इशारा
बदला ये मौसम लगे प्यारा जग सारा


किशोर कुमार बाजूला हळुवार आवाजात हे गाणं म्हणतोय आणि त्या स्पर्शाने मोहरून गेलेलं माझं मन वेड्या वा-यासारख धावतंय.

माणसाला अमूल्य ठेवा म्हणून मिळालेल्या पंचेंद्रियातील एक इंद्रिय; स्पर्श. शरीराला होणारी एक वेगळीच अनुभूती. स्पर्शाचे प्रकार तरी किती? स्पर्श दुसऱ्या शरीराचा, स्पर्श पाण्याचा, वाऱ्याचा, स्पर्श आगीचा, मृदू स्पर्श, खरखरीत स्पर्श, झोंबरा स्पर्श, सुखद स्पर्श, गरम स्पर्श, थंड स्पर्श, किळसवाणा स्पर्श, गुदगुल्या, मार, .... आहेत ना अनेक?

या शारीरिक स्पर्शापेक्षा एक वेगळा स्पर्श म्हणजे मनाला आणि हृदयाला होणारा स्पर्श. मानवी संवेदनांशी निगडित. सहजपणे आपण ज्याच वर्णन "हृदयस्पर्शी", "मनाला चाटून जाणारे" असे करतो, एखाद्या गोष्टीच वाईट वाटून गेलं सांगताना "मनाला लागलं" म्हणतो या वेळी आपण कळत नकळत स्पर्शाची अनुभूती देत असतो.

माणसाला सगळ्यात पहिला स्पर्श कुठला आठवत असावा. नक्कीच आईच्या शरीराचा. तान्हे बाळ आईला स्पर्शावरून ओळखते म्हणतात. त्या स्पर्शात ओथंबलेले प्रेम मूल सर्वप्रथम अनुभवते. पण आईच काय?? ती ही त्या तान्हुल्याला स्पर्शावरून ओळखते का? मला आठवत की मी माझ्या बाळाला पहिल्यांदा पाहिले तेंव्हा मनात खूप काही झालं नाही. त्या इवल्याशा जीवाला हात लावला मात्र, आणि जी अनुभूती घेतली ती मला क्षणात "आई" करून गेली.

प्रियकराने किंवा प्रेयसीने केलेल्या सर्वप्रथम स्पर्शाचेही असेच कौतुक अनेक गाण्यांतून ऐकायला मिळते. "छू लेने दो नाजूक होठों को" म्हणत आसुसलेला प्रियकर प्रेयसीकडे अशाच स्पर्शाची मागणी करतो. हा पहिला वहीला स्पर्श जगावेगळाच असल्याचंही अनेकजण सांगतील. आशीर्वाद देतानाही डोक्यावरून हात फिरवला जातो. मिठी, अवघ्राण, चुंबन, कवटाळणे, पदस्पर्श हे सर्व शब्द स्पर्शाची महती वाढवणारे आहेत. तर आवळणे, खेचणे, ढकलणे, मारणे या स्पर्शाच्या नकारात्मक बाजू ठरतील. एकंदरीतच स्पर्शातून जवळीक साधण्याचा प्रयत्न केला जातो असं म्हणता येईल.

आता या स्पर्शांचंही एक वेगळंच गणित असतं, वेगळे नियम असतात. जसं की कचेरी मधे साहेबांनी नोकरवर्गाला केलेला सहज स्पर्श चालून जाण्यासारखा असतो पण उलट प्रक्रिया मात्र आक्षेपार्ह समजली जाते. साहेबांनी येऊन एखाद्याच्या खांद्यावर हात ठेवला तर त्यात काहीच वावगं वाटत नाही परंतु एखादा कर्मचारी हेच वर्तन साहेबांशी करू शकत नाही. हस्तांदोलन हे सभ्यपणाचे लक्षण असते तर तळव्या व्यतिरिक्त हाताचा कुठलाही दुसरा भाग हातात घेणे हे मैत्रीपासून शत्रुत्वा पर्यंत कसलेही लक्षण ठरू शकते.

एखादा स्पर्श आक्षेपार्ह ठरू शकतो. अर्थातच तो कुठे, कसा व कुणी केला यावर अवलंबून आहे. नको असलेल्या स्पर्शाचा राग, किळस किंवा घृणा वाटणे अतिशय स्वाभाविक आहे. अगदी अशा स्पर्शाची मनात भिती ही बसू शकते. तसाच दुसरा एखादा स्पर्श हवाहवासा असू शकतो. रात्री गादीचा स्पर्श, उन्हाळ्यात थंड पाण्याचा स्पर्श, मोरपिसाचा स्पर्श वगैरे.

प्रत्येक समाजाचेही स्पर्शाचे एक गणित असते. जसे, ग्रीस, इटली आणि काही अरब देशांतही पुरुषाने पुरुषाला चेहऱ्यावर चुंबन देणे हे आतथ्याचे लक्षण मानले जाते तर जगात इतर ठिकाणी ते नक्कीच आक्षेपार्ह समजले जाते. मध्यंतरी एका कार्यक्रमात भारतात एक पुरुष बाई ऐवजी दुसऱ्या पुरुषाच्या खांद्यावर हात ठेवू शकतो यावर आश्चर्य व्यक्त केल्याचे पाहिले आहे कारण पाश्चिमात्य जगात पुरुषाने पुरुषाच्या अंगचटीला जाणे स्वाभाविक नाही.

एकूणच माणसाच्या जीवनात स्पर्शाला अनन्य साधारण महत्त्व आहे. पंचेंद्रियांचे वर्गीकरण सर्वप्रथम ऍरिस्टॉटलने केले असे म्हटले जाते. या लेखाच्या निमित्ताने त्यात माझ्याकडून थोडाशी भर घालणारा हा स्पर्श महिमा.

Tuesday, July 25, 2006

मुंबईचा महापूर (एक आठवण)

गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच मी आणि माझी मुलगी मुंबईला गेलो होतो. चांगले दोन महिने राहण्याचा बेत होता. घरात भावाच्या बाळाचा जन्म झाल्याने काही कार्यक्रम होते. माझी सात वर्षांची मुलगी यापूर्वी न कळत्या वयात मुंबईला येऊन गेल्याने निदान या वर्षीतरी तिला मुंबई दाखवावी असा बेत होता. काही ठिकाणी जाण झालं, पण मुंबई शहराच्या बाजूस फारसं जाण झालं नाही. शेवटचे १०-१५ दिवस राहिले तसे मी ठरवले काही झाले तरी गेट वे ऑफ इंडिया व नेहरू तारांगणाला भेट द्यायची, काय बुद्धी झाली कुणास ठाऊक पण जायचा दिवस ठरवला तो, २६ जुलै २००५ चा.

सकाळीच उठून घराबाहेर पडायचे, टॅक्सीने सगळीकडे फिरायचे, बाहेरचे जेवायचे असा झक्कास बेत होता. दोघींनीच काय जायचं म्हणून मी माझ्या आई बाबांनाही तयार केले. बाबा यायला तयार नव्हते पण बऱ्याच आग्रहानंतर ते तयार झाले. दिवस थोडा फार ढगाळ होता(partly cloudy). आकाशात ढग होते पण पाऊस पडत नव्हता, वाराही नव्हता. घरातून निघता निघता फोन वाजला. फोनवर मावसबहीण होती. तिच घर दादर चौपाटीला लागूनच आहे. जुजबी बोलण्यानंतर तिला आमचा बेत कळवला तशी ती म्हणाली, "कशाला बाहेर पडता आज? बाहेर समुद्रावरचं आकाश अगदी भरून आलंय, एकंदरीत रंग अगदीच वेगळा दिसतोय. उद्या जा पाहिजेतर."

"काहीतरीच काय? इथे तर आकाश बऱ्यापैकी स्वच्छ आहे आणि आमची तयारी सुद्धा झाली आहे. घरातून बाहेर पडायच्याच बेतात होतो, आता बदल कशाला? असं करतो की परत येताना वेळ मिळाला तर तुझ्याकडेही चक्कर मारतो," असं सांगून मी फोन बंद केला आणि घराबाहेर पडले.

सुमारे साडे अकरा पावणे बाराच्या सुमारास आम्ही गोरेगाव ते गेट वे प्रवास करून मुंबईच्या एका टोकाला पोहोचलो. आकाश इथे जरा जास्तच ढगाळलेलं होतं पण पाऊस पडत नव्हता. माझ्या मुलीने आजी आजोबांबरोबर फोटो काढून घेतले. मनसोक्त हुंदडूनही घेतले. हळू हळू थेंब थेंब पावसाला सुरुवात झाली. अंगाला लागेल न लागेल असा पाऊस. आम्हाला छत्री उघडण्याचीही गरज वाटली नाही. साडे बाराच्या सुमारास दुसरी टॅक्सी करून आम्ही चर्चगेटला पोहोचलो. स्टेशनजवळच एका रेस्टॉरंट मधे जेवून सुमारे तासाभराने बाहेर पडलो तर पावसाची मध्यम सर आली होती. आता नेहरू तारांगण गाठायचं होत.
तारांगणाला पोहोचलो तसा तिथे काही शाळांच्या सहली आल्याने गर्दी होती म्हणून तारांगणाला नंतर येऊ आधी महालक्ष्मी जवळ असलेल्या नेहरू सायन्स सेंटरला जाऊ असं ठरवून पुन्हा टॅक्सीत बसलो आणि सायन्स सेंटरला पोहोचलो.

तो पर्यंत पावसाने जोर धरला होता. बरंच झालं आपलं पाहून होईपर्यंत पाऊस ओसरेल असा विचार करून आम्ही आत शिरलो आणि बाहेरच्या जगाशी आमचा संबंध तुटला. सुमारे चारच्या दरम्यान आम्ही बाहेर आलो. बघतो तर काय? पाऊस वेडा वाकडा कोसळत होता. विजांचा चकचकाट, कानठळ्या बसवणारा गडगडाट, झाडांना वाकविणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्याचा भर्रभर्राट भितीत भर घालत होता. नेहरू सेंटरच्या प्रवेशद्वारातून पाण्याचे लोटच्या लोट आत शिरत होते.

"पाऊस थोडा कमी झाला ना की आता सरळ घरीच जाऊया," आईने सुचवलं.वीस पंचवीस मिनिटे आम्ही थांबून वाट पाहिली पण पाऊस ओसरण्याच चिन्ह दिसत नव्हतं. आता अजून किती वेळ एका जागी थांबून राहायचे त्यापेक्षा बाहेर टॅक्सी मिळते का पाहावं म्हणून छत्र्या सावरत आम्ही बाहेर पडलो आणि त्याच क्षणी भिजून ओलेचिंब झालो. बाहेर एकही रिकामी टॅक्सी दिसत नव्हती. रस्त्यावर घोट्यापर्यंत पाणी साचलं होत. काही वेळाने एक रिकामी टॅक्सी दिसली तशी मी धावत जाऊन त्याला विचारलं, "गोरेगाव चलोगे?" माझ्याकडे मख्ख चेहऱ्याने पाहत त्याने मान वळवली आणि आपली टॅक्सी पुढे दामटली. मग दुसरा, तिसरा अशा अनेक टॅक्सीवाल्यांनी या ना त्या प्रकारे नकार दिला. शेवटी गोरेगावचा हट्ट सोडून निदान प्रभादेवीला मावस बहिणीकडे जायचं ठरवलं. तरीही सर्वांकडून नकारच. आता पुढे काय? असा विचार करत आम्ही भर पावसात कुडकुडत उभे होतो आणि तितक्यात एक टॅक्सीवाला समोर येऊन उभा राहिला.

"कहॉं जाना है?", "प्रभादेवी, चलोगे?"

"लेकिन आगे सब रस्ते बंद है। पानी भर गया है। चाहो तो टॅक्सीमें बैठ जाना, जब बारीश कम होगी तब छोड दूंगा।... वैसे भी छोटी बच्ची के साथ कहां भिगते रहोगे?"

चला बुडत्याला गाडीचा आधार असं म्हणून आम्ही टॅक्सीत बसलो. निदान जितकं होईल तितकं तरी पुढे जाऊया असा विचार करून ड्रायव्हरने टॅक्सी पुढे दामटली. थोडं फार पुढे जातो तोच पाण्याची पातळी अचानक वाढायला लागली. टॅक्सी ड्रायव्हर आता पुढे जायला नाही म्हणू लागला, "अभी पानी में तो टॅक्सी नहीं ना डाल सकता, नुकसान होगा, एलफिस्टन में मेरा सेठ रहता हैं वहां जायेंगे। टॅक्सी बंद पड गयी तो लेने के देने पडेंगे।" आमच्याकडे त्याचं ऐकण्याशिवाय काही पर्यायही नव्हता. पाऊस धो धो कोसळतच होता. कुठल्यातरी गल्ली बोळांतून रस्ता काढत त्याच्या मालकाची इमारत थोडी उंचवट्यावर होती त्या आवारात त्याने टॅक्सी स्थानापन्न केली आणि तो आत निघून गेला.

रस्त्यावर तोपर्यंत गुडघाभर पाणी साचले होते, वाहनांची वर्दळ थांबली होती. सगळीकडे शुकशुकाट होता. संध्याकाळचे साडे पाच वाजायला आले होते. मधे एक दोन वेळा ड्रायव्हर आणि त्याचा मालक येऊन चौकशी करून गेले. आम्ही मुकाटपणे टॅक्सीत बसून होतो. हात पाय आखडून गेले होते. ओल्या कपड्यात थंडी वाजत होती. टॅक्सीच्या काचा खाली करण्याचीही सोय नव्हती. करणार काय? वाट पाहत राहण्याखेरीज दुसरा पर्यायही नव्हता. साडे सहाच्या सुमारास वारा थांबला, हळू हळू विजा, गडगडाट, पाऊसही थांबला. टॅक्सी ड्रायव्हर पुन्हा एकदा चक्कर टाकून गेला, "बैठे रहो, जब भाटा आयेगा तब पानी उतर जायेगा, फिर प्रभादेवी पहुंचा दूंगा। आपको चाय पीनी हो तो बाजू में ही दुकान है।"

आता पाणी ओसरेल नंतर ओसरेल असं म्हणता म्हणता सात... आठ... नऊ वाजले. पाऊस थांबला होता. रस्त्यावरचे पाणी मात्र तसूभर घटले नव्हते. वाहनं दिसत नव्हती पण लोक रस्त्यावरून हळूहळू चालत होते. रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांच बोलणं ऐकून येत होतं.... रेल्वे, बसेस, इतर वाहतूक ठप्प होती. कुठे घरं पाण्याखाली गेली होती, शहरातली बऱ्याच ठिकाणची वीज बंद होती, कुणीतरी वाहून जाणाऱ्या जीवाला हात देऊन आलं होतं तर कुणीतरी वाहून जाणाऱ्यांकडे असहाय नजरेने पाहत हळहळून आलं होतं. एक एक गोष्ट ऐकून जीवात धडकी भरत होती. कसही करून या संकटातून सुटका कशी होईल ही एकच ओढ लागली होती. गोरेगाव गाठणं केवळ अशक्य होतं निदान प्रभादेवीला मावसबहिणीकडे जाता येईल का पाहावं म्हणून तिला फोन करायचं ठरवलं. माझ्याकडे सेल फोन नसल्याने इमारतीतील एकांकडून ताईला फोन लावला आणि झाला प्रकार सांगितला. कसही करून आणि कितीही उशीर झाला तरी तुझ्या घरी पोहोचतो असं सांगून मी तिला सहजच विचारलं की, 'समुद्राला ओहोटी लागली का? पाणी का ओसरत नाहीये?'

'ओहोटी तर कधीच लागली, दोन तास होऊन गेले असतील,' तिने सांगितलं आणि माझ्या डोक्यात प्रकाश पडला की हा प्रकार काहीतरी वेगळा आहे. ओहोटी बरोबर जर हे पाणी ओसरणार नसेल तर संपूर्ण रात्र, उद्याच्या दिवसात तरी ते उतरेल की नाही कुणास ठाऊक आणि इतक्या पाण्यातून टॅक्सी जाणे केवळ अशक्य होते. म्हणजे संपूर्ण रात्र रस्त्यावर काढायची की काय या विचाराने जीवाचा थरकाप उडाला. आपल्या बरोबर एक लहान मूल आणि दोन वयस्क माणसं आहेत आणि त्यांची जबाबदारी आपल्यावर याची प्रकर्षाने जाणीव झाली.

'असं करा तुम्ही जिथे आहात तिथपासून माझं घर फार लांब नसावं, तुम्ही चालत का येत नाही? प्रयत्न तर करून पाहा,' ताईने सुचवलं. पण हे करणं तितकंसं सोपं नव्हत. अनोळखी जागा, रात्रीची वेळ, साचलेले पाणी, परिसराची वीज गेल्याने सर्वत्र अंधार, त्यातून बाबांचा पाय वयोमानाने दुखरा, भरलेल्या पाण्यात मुलीला कडेवर उचलून घ्यावे लागणार होते. कुठे पाय घसरला, खड्डा असला, पाण्यातून शॉक लागला तर काय करायचं? सारच कठीण वाटत होतं. कुणाच्यातरी सोबतीची गरज होती.

टॅक्सीवाल्याला विचारलं तसा तो रस्ता दाखवायला तयार झाला. दोन अडीच किलोमीटर चालावं लागेल म्हणाला. आई बाबा घाबरत होते पण करणार काय म्हणून चालायचं ठरवलं. टॅक्सीवाल्याला बाबांचा हात धरण्याची विनंती केली. थोडं पुढे जातो न जातो तोच पाणी वाढू लागले. मुलीला मी कडेवर उचलून घेतले आणि आम्ही जवळ जवळ छातीभर पाण्यातून आम्ही रस्ता काढू लागलो. पंधरा वीस मिनिटे पाणी तुडवल्यावर कूर्मगतीने दादरच्या दिशेने जाणारी एक बस दिसली. 'चला बरं झालं, बस निदान आपल्याला पुढे तरी नेईल या विचाराने आम्ही धावत पळत बसच्या दिशेने जाऊ लागलो, बसही आमच्यासाठी थांबली आणि आम्ही आत जाऊन बसलो. पण कसंच काय, आमच्यासाठी थांबलेली बस काही केल्या सुरू होईना.. तिथेच ढेर झाली आणि आमची परिस्थिती आगीतून फुफाट्यात अशी झाली.

रात्रीचे दहा वाजून गेले होते. बसमध्ये १०-१२ माणसे होती. सर्वांच्या डोळ्यात काळजी दिसत होती. संपूर्ण परिसरात अजूनही वीज नव्हती. पाणी कमरेवर होतेच. बसच्या दुसऱ्या तिसऱ्या पायरीपर्यंत पोहचत होते. त्या पाण्यातूनही बरेचजण रस्ता काढत आपलं घर गाठण्याचा प्रयत्न करत होते. त्यातल्या एकाने खालनच बसमध्ये डोकावून पाहिले. पटकन आपल्या बॅगमधून बिस्किटांचा पुडा काढून माझ्या हातात कोंबला,"तुमच्या मुलीला द्या. भूक लागली असेल हो तिला," असं म्हणून तो अंधारात दिसेनासाही झाला. त्याचा चेहराही दिसला नाही. धन्यवाद मानायचे दूरच राहिले. घरातून निघाल्याला आता बारा तास उलटून गेले होते. बसमध्ये तरी कितीवेळ बसून राहणार पण जायचं म्हटलं तर इतक्या अडचणी. डोळे मिटून शांत बसून राहाण्याखेरीज दुसरा कसलाही मार्ग दिसत नव्हता.

होता होता मध्यरात्र उलटून गेली. दिवस बदलला आणि चमत्कार व्हावा तशी ४-५ तरुण पोरं बसमध्ये घुसली. त्यांच्या हातात पाण्याच्या बाटल्या आणि बिस्किटांचे पुडे होते. त्यातल्या एक दोघांकडे सेल फोनही होते, "कुणाला घरी फोन करायचे आहेत का? त्यातल्या एकाने विचारले. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी माझ्या बहिणीला फोन लावला आणि बसमध्ये आम्ही कसे अडकून पडले आहोत त्याची कल्पना दिली. आमच्यात जे बोलणं सुरू होत ते ऐकून त्यातला एक मुलगा म्हणाला, 'प्रभादेवी काही इथून फार दूर नाही. इथून १०-१५ मिनिटांच्या अंतराच्या रस्त्यावर पाणी आहे पण पुढे सैतान चौकीच्या आसपास रस्ता कोरडा आहे. तुम्हाला रस्ता माहीत नसेल तर आम्ही येतो तुमच्याबरोबर. घाबरू नका आपण सावकाश जाऊ. द्या तो फोन माझ्याकडे मी बोलतो तुमच्या ताईंशी.' फोनवरून त्याने भाऊजींना जिथे पाणी नाही तिथपर्यंत कार घेऊन या म्हणून सुचवले.

बसमधल्या बायकांची सोय या मुलांनी त्यांच्या इमारतीतील एका रिकाम्या फ्लॅटमध्ये केली. पुरुषांना काहीतरी खायला आणून देतो असं सांगून त्यातले चारजण आमच्याबरोबर यायला निघाले. बसमधून उतरून पुन्हा आम्ही छातीभर पाण्यातून हळू हळू चालू लागलो. रस्ता त्यांच्या पायाखालचा असल्याने काळोखातही ते सहज वाट काढत होते.आई बाबांच्या सोबत राहून, त्यांना व्यवस्थित सावरत, मध्येच माझ्या मुलीला माझ्या कडेवरून काढून स्वत:कडे घेऊन त्या मुलांनी आम्हाला सुखरूप ठरवलेल्या ठिकाणी पोहचवले. समोरचा रस्ता आता स्वच्छ होता आणि रस्त्याच्या कडेला भाऊजी कार पार्क करून वाट पाहत होते. त्यांना पाहून इतकं हायसं वाटलं की ते शब्दात व्यक्त करणे केवळ अशक्य.

त्या मुलांचे आभार मानून त्यांना पैसे हवे का म्हणून विचारले तर त्यांनी ठाम नकार दिला. निदान लोकांना मदत करताय म्हणून पैसे घ्या त्या पैशांनी थोडीफार मदत करा, फोनचे पैसे तरी घ्या म्हणून सांगितल्यावर त्यातला एकजण म्हणाला, 'ताई आमच्या घरची माणसं अजूनही घरी परतलेली नाहीत. माझा मोठा भाऊ अंधेरीला कामानिमित्त जातो त्याचा पत्ता नाही. ते जिथे अडकून पडले आहेत तिथे त्यांना कोणीतरी मदत करत असेलच ना. आम्ही जर तुमच्या घराजवळ असेच अडकलो असतो तर तुम्ही मदत केली असतीच ना... आणि पैसे घेतले असते का आमच्याकडून?' मी निरुत्तर झाले तसेही शब्दांनी आणि पैशांनी भरून निघण्यासारखे उपकार नव्हतेच त्यांचे.

पुढचे दोन दिवस आम्हाला ताईकडेच काढावे लागले. मुंबईतले पाणी ओसरले नव्हते आणि ओसरले तेंव्हा घरी वीज, पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते म्हणून जिथे होतो तिथेच राहायचे ठरवले. निदान ताईकडे सुखरूप पोहचलो ते काय कमी होते?

-----

Saturday, July 01, 2006

वय

माणसाचं वय आणि अक्कल या गोष्टी सम प्रमाणात असाव्यात अशी उगीचच माझी भ्रामक कल्पना आहे. वेगळ्या शब्दांत सांगायच झालं तर माणसाच जस वय वाढत तशी त्याची शैक्षणिक, बौद्धिक पात्रता वाढत जाते. त्याच्या अनुभवांच गाठोडं मोठठ होत जातं, तो अधिक शहाणा होत जातो असा सर्वसाधारण समज असतो. अस असताना माणसाला आपल वय लपवून ठेवण्याची अनिवार इच्छा का बुवा असते? तस हे न सुटणारं कोड नाही. या कोड्याच उत्तर मला माहितही आहे. पण व्यक्ती तितक्या प्रकृती या नात्याने प्रत्येक व्यक्तिकडे आपल म्हणून काय कारण असेल हे जाणून घ्यायच कुतूहल मला असतं.

उगीच खडा टाकून पहावा तसा "लोकांना आपलं वय लपवायला का आवडत?" हा प्रश्न मी याहू आन्सर्सवर टाकला. अपेक्षेपेक्षा जास्त आणि अतिशय प्रामाणिक उत्तरे मिळाली. मिळालेल्या उत्तरांवरुन काढलेला निष्कर्ष असा --

लहानांना लवकर मोठ्ठ होण्यासाठी आणि मोठ्यांना कायम लहान रहाण्यासाठी आपलं वय लपवावसं वाटत. तसेच भिन्नलिंगी व्यक्तींवर आपला प्रभाव पडावा व आपल्या वयांतील तफावत झाकून रहावी म्हणून वय लपवले जाते.

अर्थातच, मला हा निष्कर्ष मनापासून पटला. त्याच्याकडे न्यूनगंड, स्वार्थ, फसवणूक अशा अनेक नजरेने पहाता येईल किंवा "सगळेच लपवतात म्हणून मी ही लपवतो" ही सर्वमान्य पद्धत म्हणूनही. सहज म्हणून काही संकेत स्थळांवर ओळखीच्या आणि अनोळखी लोकांची व्यक्तिगत माहिती तपासली. रहाण्याच गाव, व्यवसाय, आवडी निवडी, स्वभाव सांगायला उत्सुक असणारी बहुतांश माणसे वयाच्या खात्याकडे साफ दुर्लक्ष करत होती. त्यातल्या त्यात २५ च्या दरम्यानच्या बऱ्याच माणसांनी (की इच्छूकांनी?) आपलं वय दिल्याचही लक्षात आलं पण २७-२८ वया नंतर सर्वत्र चिडिचूप होती. असं का याच उत्तर मला "न्यूनगंड" असंच वाटत. असो. प्रत्येकाकडे आपल कारण असेलच.

सहजच हा विचार डोक्यात घोळवत असताना काहि वर्षांपूर्वीचा एक किस्सा आठवला. एका वाहिनीवर एलिझाबेथ टेलरची मुलाखत चालली होती. त्यावेळी लिझ बाई पासष्टीच्या आसपास होत्या. वाहिनीचे नाव व मुलाखतकर्त्याचे नाव आता आठवत नाही.

मुलाखतकर्ता प्रश्न विचारता विचारता सहज विचारुन गेला,"तर मग तुम्हाला या वयात......"

त्याबरोबर लिझ बाई अशा उसळल्या, "या वयात म्हणजे? तुम्हाला म्हणायच आहे तरी काय?"

आता साक्षात एलिझाबेथ टेलर ती. मुलाखतकर्त्याला तरी भान नको कुणाला कसले प्रश्न विचारावे ते? क्षणभर त्याची भंबेरी उडली. त्याने कशीबशी वेळ सावरुन नेली खरी पण नंतरच्या सर्व मुलाखतीत लिझ बाईंचा मूड खराब झाल्याच कळून येत होतं.

म्हणजे लोकांना आपल वय सांगायला आवडत नाही तसं नकळत त्यावर चर्चा झालेली किंवा ते सहजच विचारलेलही आवडत नाही.

लहानांच सोडा पण मोठयांना आपण म्हातारे होत चाललो आहोत की काय या भीतीने वय लपवावस वाटत, हेच खरं. जे आकड्यांत आपल वय लपवू शकत नाहीत ते दिसण्यात आणि वागण्यात आपलं वय लपवायचा प्रयत्न करतात. एलिझाबेथ टेलरचं आठव लग्न यातलाच प्रकार होता की काय न जाणे?

हल्ली मला अमिताभच्या खारके सारख्या शरीरावर काळ्या केसांच टोपलं पहाण्याचा भारी वैताग आला आहे. आता त्याला "Grow up!!” सांगायच की आपल्या प्रेक्षकांना "Grow up!!” सांगायच हा आणखी एक वेगळा प्रश्न. पण टकलातला शॉन कॉनरी या वयातही फार देखणा दिसतो ही वस्तुस्थिती.

बायकांना वय विचारु नये, खरं उत्तर कधीच मिळणार नाही याची ग्वाही देणाऱ्या मंडळींसाठी एक किस्सा मी नेहमी राखून ठेवते.

काही वर्षांपूर्वी माझ्या कार्यालयातील एका मध्यमवयाच्या गृहस्थांना मला वय विचारण भाग पडल. आता त्यांच वय जाणून घेण्यासाठी HR ला भेट देण कठीण नव्हत पण काखेत कळसा गावाला वळसा कशाला म्हणून सरळ त्यांनाच वय विचारल. स्वारी काही उत्तर द्यायला तयार होईना. खूप टाळाटाळ केल्यावर त्यांनी एकदाच उत्तर दिले वर पुस्ती जोडली, "मी ४० वर्षांचा आहे यावर कुणाचाही विश्वास बसत नाही. बरेच लोक अजूनही त्यांच्या मुलींसाठी मला विचारतात."

यावर काय बोलणार आपण? शेवटी हेच म्हणायच, व्यक्ती तितक्या प्रकृती.

Saturday, June 24, 2006

डायव्हिंगचा क्लास

"आपल्या हायस्कूल मधे डायव्हिंग शिकवणार आहेत. तू जाशील?" मी माझ्या मुलीला सहज विचारल.

"डायव्हिंग म्हणजे ते ऑलिम्पिक्स मधे दाखवतात ते?"

"हो तेच."

"नाही. मी नाही जाणार. मला भीती वाटते. दुसरं काही नाहिये का? डायव्हिंगच का विचारलस?"

"तू जावस असं मला मनापासून वाटत म्हणून."

"पण मी सांगितलना कि मला भीती वाटते."

"कसली भीती वाटते ते सांगशील का? खोल पाण्यात पोहण्याची? पण तुला १० फूट पाण्यात पोहोता येत १६ फूट पाण्यातही येईलच."

"पोहोण्याची भीती नाही वाटत. मला पोहायला आवडत."

"मग उंचीची भीती वाटते का? विमान, सिअर्स टॉवर, CN टॉवर वर भीती नाही वाटली? CN टॉवरच्या काचेच्या जमिनीवर उभं रहायला नाही का वाटली भीती?"

"नाही. उंचीची भीती नाही वाटत ग मम्मा. त्या टॉवर्स वर आणि विमानात आपण सुरक्षित असतो ना. उंचीवरुन खाली झोकून द्यायची भीती वाटते."

"सरळ पाण्यात पडणार हे माहित असूनही? तर मग एक सांग तुझ्यासारखीच इतर लहान मुलं, कदाचित तुझ्यापेक्षा लहानही जेव्हा न घाबरता पाण्यात झेप घेतील तेव्हा आपण त्यांच्यापेक्षा कमी पडतो आहोत ही भीतीही तुला वाटेल नाही का?"

"ह्म्म्म्म!!!!"

"भीती आहे तुझ्या मनात आहे. तू ती मनातून काढून टाकलीस तर फूटबोर्डवरुन उडी मारायला अजिबात भीती वाटणार नाही, उलट मज्जाच येईल बघ. जो माणूस भीत रहातो ना तो मिळालेली संधी गमवत असतो. खरतरं भीती कमी व्हावी म्हणूनच तू डायव्हिंग शिकावस अस मला वाटत."

"तुला नाही कसली भीती वाटत का ग मम्मा?"

"वाटते ना. प्रत्येकाला कसली ना कसली भीती वाटते. बिशेषत: अज्ञाताची. तशी मलाही वाटते पण भीतीला मारतो विश्वास. तूही मला डायव्हिंग सहज जमेल असा विश्वास मनात निर्माण कर आणि बघ भीती कशी पळून जाते ती. माणसाने आपल्या एकेका भीतीला असच मारुन टाकायच असत."

"खरचं मग कशाची भीती रहाणार नाही? Not even death?"

"Not even death! आता जाऊन झोप. उद्या सकाळी मला सांग की तुला जायचय कि नाही ते. तू जायलाच हवस अशी माझी जबरदस्ती अजिबात नाही. तुझ्या मनात भीती असेल तर न गेलेल उत्तम असं मला वाटत."

-----

(दुसऱ्या दिवशीची सकाळ)

"मम्मा मी जाईन डायव्हिंग शिकायला?"

"खरचं? हे तू माझी इच्छा आहे म्हणून मला घाबरुन तर नाही ना म्हणते आहेस?"

"नाही ग मम्मा! मला नाही भीती वाटत. पण तुला वाटत की मला डायव्हींग जमेल?"

"हो! माझा तसा विश्वास आहे."

-----------

काल डायव्हिंगचा पहिला लेसन झाला. पूर्ण संध्याकाळ उंचावरुन पाण्यात झेप घ्यायला कशी मज्जा येते ह्या चिवचिवाटात कशी निघून गेली ते कळलेच नाही.

Sunday, June 18, 2006

माझे मूषकप्रेम

संपूर्ण जगात जिथे जिथे मनुष्यवस्ती आहे तिथे तिथे आढळणारा दुसरा सस्तन प्राणी म्हणजे उंदीर. माणसाच्या खालोखाल याचाच नंबर लागतो आणि तरीही, मला उंदीर आवडतो असं म्हणणारी फार कमी माणसं भेटतील. उंदीर म्हणजे नासाडी करणारा, मिळेल ती गोष्ट कुरतडून ठेवणारा, इथून तिथून धावाधाव करुन नाकी नऊ आणणारा आणि वेळप्रसंगी चावा घेण्यास मागे पुढे न पहाणारा महाउपद्व्यापी प्राणी.

कल्पना करा की, आपण अंधारात थिएटर मधे बसून छानसा सिनेमा पाहण्यात गुंग आहोत. चित्रपटात काहीतरी महत्त्वाचा प्रसंग घडतोय, जसा की नायक कसले तरी रहस्य जाणून घेण्याच्या बेतात आहे आपण आतुरतेने पुढे काय होणार त्याची वाट पहात आहोत आणि तेवढयातच आपल्या पायाशी अचानक काहीतरी हुळहुळत. "अय्य्या ईईई!!!!" किंचाळून जितक्या बायका पाय वर घेऊन भेदरट नजरेने इकडे तिकडे बघतील तेवढेच पुरुषही यात सामिल होतात असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे. तशी मी स्वत:ला उंदीर प्रेमी म्हणणार नाही आणि तरीही तीन-चार उंदीर मला फार आवडतात. अशा तीन उंदरांबद्दल सांगायला फार आवडेल.

उंदीर पहिला : गणेश वाहन

गणपती हे मराठी माणसाचे आराध्य दैवत. मग तो आस्तिक असो किंवा नास्तिक. अशा तुंदिल तनु देवाला आरुढ होण्यास एक लहानसा उंदीर पुरेसा आहे ही कल्पनाच फार मजेशीर आहे.

गणपतीच्या उंदीरा बाबत अनेक आख्यायिका आहेत. काहींच्या मते उंदीर हे बुद्धीमत्ता आणि चातुर्याचे लक्षण. त्यामुळे गणपती त्यावर आरुढ होणे क्रमप्राप्त. काहींच्या मते हा उंदीर अहंकाराचे तर कधी षडरिपूंचे लक्षण म्हणून गणेश त्यावर स्वार. अहंकारावर, दुष्ट प्रवृत्तींवर स्वार होऊन गणेश त्यांना आपल्या काबूत ठेवतो. त्यांचा गुलाम न बनता अधिपती बनतो. जे काही असेल ते. मला हा उंदीर आवडतो कारण कुठल्याही देवळात प्रत्यक्ष भगवंता समोर बसून आपल्या शरीरा एवढया आकाराचा मोदक गट्टम करण्यास ही मूर्ती सदैव तयार. याला पाहिल की आईच्या हातच्या लुसलुशीत उकडीच्या मोदकांची आठवण आवर्जून होते.

उंदीर दुसरा : संगणकाचा उंदीर

ज्या व्यक्तींनी DOS (किंवा तत्सम) संगणक प्रणालीवर काम केल आहे त्यांना या उंदीराची महती नक्कीच ठाऊक आहे. जगात असा एकच प्रकारचा उंदीर असावा जो सहज आपल्या हाती लागतो आणि मनात येईल तसा फिरवता येतो. याच्या शेपटीवरुन व संगणकाच्या पडद्यावर लिलयेने पळण्याच्या याच्या कलेने "स्टॅनफोर्ड रिसर्च इंस्टिटयूट" ने या यंत्राला "माऊस" असे नाव दिल्याचे वाचनात आले आहे. हल्ली त्याच्या शेपटीला चाट मिळाला आहे तो भाग वेगळा. अनेक प्रकारांत (मेकॅनिकल, ऑप्टिकल, लेझर इ.), अनेक आकारांत (ट्रॅकबॉल, टचपॅड, फूटमाऊस) आणि अनेक रंगांत उपलब्ध असणारा हा उंदीर आपल्या सर्वांचाच लाडका असावा.

उंदीर तिसरा : अर्थातच मिकी माऊस.

७८ वर्षांच्या या चिरतरुण उंदरावर माझ अतोनात प्रेम आहे. १८ नोव्हेम्बर १९२८ हा त्याचा जन्म दिवस. १९२८ ते ४६ सालांपर्यंत स्वत: वॉल्ट डिस्नींचा आवाज लाभण्याचे भाग्य या पठठ्याच्या नशिबात होते. इतक सालस, सद्गुणी आणि मनमिळाऊ पात्र कार्टून्सच्या जगात शोधून सापडायच नाही. अजूनही याला टीव्हीवर पहायचा योग आला तर मी पापणी न लवता मनसोक्त मजा घेते.

नुकताच आम्हाला मिकीची याची देही याची डोळा भेट घ्यायचा योग आला. त्याला मारलेली घटट मिठी जन्मभर आठवत राहिल. त्याचे ते मोठे मोठे गोलाकार कान, पाणीदार डोळे, चेहयावरचे स्मितहास्य मनात घर करुन राहिले आहे.

मनातली गोष्ट सांगायची झाली तर "लहानपण देगा देवा" अशी देवाची आळवणी न करताही त्या दिवशी लहानपण उपभोगायला मिळाले.

विशेष टीप : या तिन्ही उंदीरांसह त्यांच्या अधिपतींवर, अनुक्रमे गणेश, संगणक आणि वॉल्ट डिस्नी यांच्यावर ही माझे अतोनात प्रेम आहे.

Friday, June 16, 2006

नावात काय आहे?

काल मुलीला पार्क मधे घेऊन गेले होते, थोडया वेळाने एक अमेरिकन बाई बाजूला येऊन बसल्या. या अमेरिकनांना बोलण भारी पटकन सुरु करता येत, फार कौतुकास्पद गोष्ट आहे. अगदी साता जन्मापासूनची ओळख असल्यासारख्या गप्पा मारतील हे लोक. पण बाकावर असे पर्यंतच, एकदा का बाक सोडला की आत्ताचा जन्म ही तिथेच विसरायचा.

असो. थोडयावेळाने त्यांनी बोलण काढलं. मग बोलण्या बोलण्यात आम्हा सगळ्यांची नावं विचारुन घेतली. नंतर म्हणाल्या, "तुम्हा भारतीयांना अर्थपूर्ण नाव ठेवायची सवय असते नाही. मी मला भेटणाया प्रत्येक भारतीयाला त्याच्या नावाचा अर्थ विचारते. नाहीतर आमची नाव बघा, James, George, Nancy कसल्याही अर्थाचा पत्ता नाही. आजी, आजोबा, आत्या, काकांची नाव होती तिच फिरुन फिरुन पुन्हा लावतो."

"खरयं तुमचं," म्हणून मी हसले.

व्यक्तिशः माझ मत अस की ऐकायला गोड वाटणारी निरर्थक नावे ठेवायला हरकत नसावी पण अर्थाचा अनर्थ नको. मनात विचित्र नावांचे किस्से येऊन गेले.

किस्सा पहिला:

मला मुलगी झाली तेव्हा हॉस्पिटल मधे असताना बाजूच्या खोलीत एक गुजराथी बाई भरती झाली होती. दुसऱ्या दिवशी तिलाही मुलगी झाली. तिची सासू आनंदाने आम्हाला बातमी सांगायला आली. काही कारणास्तव तिच्या पाठोपाठ नव्याने बाप झालेला तिचा मुलगाही घुसला. बोलता बोलता कळल की त्यांना मुलीच नाव राशीवरुन ठेवायच होत आणि अक्षर आल होतं "य". तेव्हा "य" वरुन सुरु होणारी काही नाव सुचताहेत का अशी माय-लेकांनी पृच्छा केली.

माझ्या आईने त्यांना लागोलाग "यशदा" नाव सुचवलं. त्याबरोबर हे फार मराठी नाव झाल, आम्हा गुजराथ्यांत खपणार नाही असं त्या बाई म्हणाल्या.

दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा मुलगा मिठाई घेऊन आला. स्वारी खुशीत होती...म्हणाला नाव ठरवल. मला आणि माझ्या बायकोला दोघांनाही अतिशय आवडलं.

"अस का? काय नाव ठेवणार मग तुम्ही," मी उत्सुकतेने विचारलं.

"याशिका," तो उत्तरला.

"काय? अहो ते जपानी कंपनीच नाव आहे," मी किंचाळायची बाकी होते.

"तर काय झाल? ऐकायला गोड वाटत की नाही?" त्याने आम्हाला साफ थंड करुन सोडले. "तुम्ही तुमच्या मुलीच नाव काय ठेवणार?"

"अजून ठरवलं नाही. पण शिकागो ठेवावस वाटतय," मीही माझा स्वर खाली आणून थंड उत्तर दिले.

किस्सा दुसरा:

ही थोडी पूर्वीची गोष्ट. अदमासे १९८० च्या दरम्यानची. आमच्या एका ओळखीच्या कुटुंबात मुलाचा जन्म झाला. कुटूंबातील गृहस्थ क्रिकेटचे भारी शौकिन, तेव्हा मुलाचे नाव क्रिकेटपटू वरुन ठेवण्याचा त्यांचा मनोदय होता. अर्थातच सुनिल, दिलीप, कपिल ई. नावांचा विचार झाला. परंतु सदा हरणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूचे नाव नको म्हणून आपल्या मुलाचे नाव त्यांनी "व्हीव्ह रिचर्डस" ठेवले. म्हणजे "व्हिव्हरिचर्डस दाभोळकर" (आडनाव बदलले आहे). पुढे दोन-तीन वर्षांनी त्यांना कसलीशी उपरती झाली आणि शाळेत जाण्या पूर्वी मुलाचे नाव बदलून त्यांनी "रवी" केले. (पुढे "शास्त्री" लावले नाही)

किस्सा तिसराः
अबूधाबीला असताना माझ्या ऑफिसमधे एक मल्याळी ख्रिश्चन सहकारी होत्या. त्यांच पाठच नाव दोन अक्षरी त्यामुळे होणाऱ्या बाळासाठी त्यांना लांबलचक ४-५ अक्षरी नाव हवे होते. भारतीय नाव ठेवण्याकडे त्यांचा कल असल्याने आम्ही त्यांना "अपराजीता", "परिणिता" सारखी नाव सुचवली होती. (मुलगा झाल्यास वेगळी होती, अर्थातच).

मूल झाल्यावर हॉस्पिटलमधे लगेच नाव विचारतात. यांना मुलगी झाली तेव्हा यांच्या नवऱ्याने सांगून टाकले "महानिर्वाणा".

Sunday, May 07, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी (डाव माझा)

नंदन कडून टयुलिपकडे आणि तिच्याकडून माझ्यापर्यंत पोहोचलेली साखळी. टयुलिप, "तेरुओ" बद्दल जे लिहिलं आहेस ते "प्रगल्भ" नाहीतर काय आहे? फारच आवडलं, शक्य होईल तेव्हा जरुर वाचेन.

मराठी पुस्तक हा माझ्यासाठी थोडासा हळवं करुन जाणारा प्रकार आहे. लग्नापासून माझ्या घरात फारशी मराठी पुस्तकं येत नाहीत. नवरा कन्नड आणि मुलीला आपण कोण हे अजून ठरवायच असल्याने सामाईक आवडीची पुस्तकच घरी येतात. एकंदरीत मराठी साहित्याची साथ सुटल्यातच जमा आहे. मी हल्ली, काय गमावलं या पेक्षा काय जमवलं याचा विचार जास्त करते, त्यामुळे इंग्रजी पुस्तकांची साथही तितकीच आवडते.

मी अगदी पहिल्यांदा वाचायला लागले तेव्हा माझ्या पुस्तकांचा खजिना एका पत्र्याच्या छोट्याशा बॅगेत मावायचा. माझ्या माहेरी, आज त्यांची संख्या चार सहा कपाटं भरुन आहे. प्रत्येकजण आपल्या आवडीची पुस्तकं घेऊन यायचा, बाबांनी मग पुस्तकांसाठी वेगळी कपाटच बनवायला सुरुवात केली. नवीन पुस्तक घरात आणणे हा आमच्या दॄष्टीने एक सोहळा असे. सुटटी लागली की दादर पार्ला किंवा इतर बुक डेपोतून नवीन पुस्तक आणायची. घरी आणून त्यांना प्लॅस्टिकच कव्हर घालायच आणि सुवाच्य अक्षरांत त्याच्या पहिल्या पानावर नाव, तारीख, दिवस घालायचा. भेट-वस्तू म्हणून मिळाले असल्यास तेही विशेष टाकायचे आणि कपाटात त्याच्यासाठी योग्य जागा निवडायची. आमच्या घरात अजूनही आम्ही एक अलिखित नियम पाळतो, तो म्हणजे, "हे पुस्तक दुमडणार नाही, त्याची पाने अलगद उलटायची आणि हे पुस्तक कुठल्याही अयोग्य व्यक्तीच्या हातात पडणार नाहीत याची काळजी घ्यायची." घरातली पुस्तकं आज इतक्या वर्षांनंतरही सुस्थितीत आहेत हे सांगायला खूप बरं वाटत.

१. शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक - इस्तंबुल ते कैरो - निळू दामले.

गेल्या मुंबई भेटीत वाचण्याचा योग आला. "पूर्वरंगाची अपूर्वाई" की काय माहित नाही पण प्रवासवर्णने मलाही आवडतात. काही महिन्यांपूर्वी एका लेखकाने ग्रीस पासून भारतापर्यंत ऍलेक्झांडर द ग्रेट च्या मार्गावरुन पायी प्रवास केल्याच वर्णन वाचलं होत. फार सुंदर छायचित्रे आणि वर्णन होत, पण नाव विसरले बुवा.

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती - इस्तंबुल आणि तुर्कस्थान बद्दल तसं मला पहिल्यापासून आकर्षण होतच. दोन महाखंडांच्या उंबरठयावर वसलेले ऐतिहासिक शहर, इस्तंबुल. इस्लाम धर्म पाळत असले तरी लोक पाश्चिमात्य रहाणीमानाला सरावलेले. शहराचा काही भाग युरोपमधे तर काही आशिया खंडात होता, आता पूर्णच युरोपमधे. 'केमाल पाशा' सारख्या ध्येयवेडयाने या इस्लामिक राष्ट्राचा जो कायापालट केला ते एकंदरीतच नवलपूर्ण. दामल्यांचा प्रवास, त्यांच व्यक्ती, स्थळचित्रण, इजिप्त आणि तुर्कस्थान यांची राजकिय स्थिती हे नक्कीच वाचण्याजोगं. अधिक माहिती येथे मिळेल.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके

श्रीमान योगी - रणजीत देसाई
मृत्युंजय - शिवाजी सावंत
अधांतरी - जयवंत दळवी
पिंगळावेळ - जी. ए. कुलकर्णी
आकाशाशी जडले नाते - जयंत नारळीकर

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-

हृदयस्थ - अलका मांडके
झाडाझडती - विश्वास पाटील
संभाजी - विश्वास पाटील
आंधळ्याच्या गाई - मेघना पेठे
पिंगळावेळ - जी. ए. कुलकर्णी *

* पिंगळावेळ ज्या वयांत वाचल तेव्हा पूर्ण कळलं नव्हतं, आता बरचं विसरायलाही झालय म्हणून पुन्हा नाव इथे लिहिलं.

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे - प्रिय पुस्तक एक नसल्याने मला कुठल्या एकाची निवड करणं फार कठीण वाटतय. पण माझ्या संग्रही असलेल आणि इतरांनीही संग्रही ठेवाव अस संजीवनी वाडेकरांच, शोध सुखाचा.

'सुख' कुठे सापडेल? हा भाबडा प्रश्न आपल्या मनाला बरेचदा चाटून जातो. रक्ताची नाती, जुळलेली नाती आणि जुळवलेली नाती यांतून अनेक समस्या निर्माण होतात. दिवसें दिवस वाढत चाललेल्या आत्मकेंद्री वृत्तीमुळे कुटुंब व्यवस्था आणि समाज या दोहोंनाही तडे जाऊ लागले आहेत. अशा प्रत्येक नात्यातला समस्यांचा उहापोह आणि त्यातून विचारात घेतलेला, "शोध सुखाचा" नक्कीच संग्रही ठेवण्याजोगे आहे.

आता पुढच्या अनुदिनीकारांना खो देते. (सुमेधा खो छान वाटतं.)

Thursday, May 04, 2006

नवा ब्लॉग

नवा ब्लॉग टाकला आहे "विखुरलेले मोती" या नावाने. मराठी ब्लॉग वर येईलच, पण ही लिंक प्रेमाने माझ्या शब्दांची तोड फोड वाचणाऱ्या माझ्या आईसाठी.

click below:

विखुरलेले मोती

Tuesday, May 02, 2006

आठवणींचे झरोके

आज मुंबईच्या उकाडयाची खूप आठवण येतेये. या आमच्या नॉर्थ अमेरिकेला उकाडा जाणवेल तर शपथ. नाही तसं ३-४ महिने चांगलं गरम होतं पण दिमतीला एसी असल्यावर त्या बिच्चाऱ्या उकाडयाची काही किंमतच रहात नाही आणि या इथल्या उन्हाळ्याला मुंबईच्या उन्हाळ्याची तसूभर सर नाही. तसंही एप्रिल मेच्या महिन्यात इथे स्प्रिंग असतो उन्हाळा नाही. एक चांगली गोष्ट म्हणजे इथे मी छातीठोकपणे 'मला उन्हाळा आवडतो' असं म्हणू शकते. हेच वाक्य जेव्हा जेव्हा मुंबईला उच्चारलय तेव्हा तेव्हा लोकांनी विचीत्र नजरेने माझ्याकडे पाहिलय.

एप्रिलच्या महिन्यात शाळेच्या परिक्षा सुरु झाल्या की शाळेच्या आवारात एक भय्या लाल-केशरी चिनमीन बोरांची, आवळे, गाभूळलेल्या चिंचांची गाडी लावायचा. 'परीक्षांच्या दिवसांत त्या गाडीकडे ढूंकूनही बघायच नाही' अशी आईची सक्त ताकिद असायची. आशाळभूत नजरेने त्या गाडी समोरुन जाताना आमच्या बालमनावर किती अत्याचार होत असतील याची आमच्या मातोश्रींना कल्पनाही नसावी. बरं तो भय्या तरी असला दुष्ट की परीक्षा संपल्या की लागोलाग हा ही शाळेच्या आवारातून गायब. मग त्याच्या शोधात आम्ही बाजाराच्या चकरा मारायचो.

सुटट्या लागल्या की आम्ही आमचं वेळापत्रक ठरवायचो. खरं म्हणजे सकाळी सकाळी बाबांनी 'दिवस वर आला तरी गाढवा सारखे लोळत काय पडलाहेत?' या वाक्याने सुरुवात करायला नको म्हणून आम्हा मैत्रीणींचा ग्रुप भल्या पहाटे उठून आरे कॉलनीत morning walk ला जायचा. पहाटेच्या वेळेला आरे कॉलनीत असणं हे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. ती घनदाट वनराई, मंद थंड वारा, पक्षांचा मुक्त किलबिलाट, पहाटेच्या दंवाने शिंपलेल्या लालभडक पायवाटा, आसमंतात दरवळणारा ओल्या मातीचा सुगंध, गोठयांमधली लगबग, गायींच हंबरणं, गावदेवीच्या जुन्या देवळातील पहाटेची पूजा, तो अखंड घंटानाद, मुंबईत राहून हे सर्व वाटयाला यायला भाग्य लागतं. 'वेळेवर परत या,' हा आईचा सल्ला हीच काय त्यातली negative side.

परत आल्यावर थंडगार पाण्याने मनसोक्त आंघोळ करायची. आईने, "वरच्या टांकीतलं पाणी संपेल आता, पुरे झालं" अस ओरडून सांगेपर्यंत. तिच्या आग्रहाखातर पोटांत काहीतरी ढकलून आम्ही पुन्हा एकमेकांची दारं ठोठवायला मोकळे.
जेवताना हापूसचे आंबे, पायरीचा आमरस, गऱ्या गोट्याची फणसाची भाजी हे बाकीच्या दिवसांत कुठे मिळते? आई फणसाची ठेचून भाजी करते. त्यात बारीक कोलंबी किंवा करंदीही घातली तर मी पंचपक्वान्नही फटक्यात बाजूला सारिन. त्या भाजीसाठी मी आजही वेडी आहे. दुपारच्या जेवणानंतर 'इकडे तिकडे उनाडक्या करत बसण्यापेक्षा गच्चीवर घातलेल्या वाळवणाजवळ बसा' या आईच्या आज्ञेला मात्र आम्ही शिरसावंद्य मानायचो.

भर दुपारच्या कडक उन्हातही गच्चीमधे वा-याच्या सुखद झुळुक असायची. टांकीखाली सतरंजी घालून लोळत पुस्तक वाचायला खूप मज्जा यायची. काही दिवसांपूर्वी फास्टर फेणेवरचा सुरेख ब्लॉग वाचला होता. त्याच्या जोडीला गोटया, चिंगी, जयदीपची जंगलयात्रा, ओसाडवाडीचे देव, किशोर, चांदोबाचे अंकही असायचे. काही वर्षांनी या पुस्तकांची जागा चंद्रावर स्वारी, प्रेषित, यक्षाची देणगी अशा नारळीकर, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे सारख्या लेखकांनी घेतली. दुपारच्या निरव वेळी रत्नाकर मतकरींचं "खेकडा" वाचून अंगावर उभा राहिलेला शहारा अजूनही आठवतो. पुस्तकांच्या सोबतीला तोंडात चघळायला गच्चीवरच्या वाळवणातल्याच खारवलेल्या कैऱ्या, चिंचा असायच्या. मिटक्या मारत पुस्तक वाचायची मजा काही औरच असायची.

संध्याकाळ झाली की पुन्हा उनाडक्या करायला मोकळे. टीव्हीच्या भस्मासुराने आम्हाला तेव्हा गिळलं नव्हत त्यामुळे ईमारतीच्या आवारांत चोर पोलिस, डब्बा ऐसपैस सारखे खेळ रंगायचे.

"दिवे लागले...चला घरी आता," असं आईने निदान १० वेळा कंठशोष केला की मगच आम्ही आज्ञावंत मुलं आपापल्या घरी नाईलाजाने परतायचो. रात्री झोपताना "चला सुट्टीतला आणखी एक दिवस गेला. कधी जून उजाडतोय आणि ही पोरं पुन्हा शाळेत जातायत अस झालय मला," अशी आईची कुजबुज हमखास ऐकू यायची.

----

या सर्वांची इतकी प्रकर्षाने आठवण व्हायच कारण म्हणजे मुलीला पुढच्या महिन्यापासून सुट्टी पडत्ये आणि मला आत्तापासूनच टेन्शन आलय की हे दोन महिने कसे घालवायचे?
-----
सुमेधा, तुझ्या शिर्षकाचा वापर केला हं!

Thursday, April 27, 2006

बघू कसं जमतय ते

काही दिवसांपासून एक नवीन ब्लॉग लिहावा असा मनात विचार होता. मनातलं शब्दांत उतरवण्यासाठी "मनात आलं.." पुरेसा आहे पण माझ्या भन्नाट वाचनांत अनेक चित्रविचित्र गोष्टी येत असतात.... आणि त्या माझ्या भाषेत लिहून काढायची अतीव उर्मी मला काही दिवसांपासून होत आहे.

काही दिवसांपूर्वी सहजच मला भोसल्यांच्या तंजावूर शाखेबद्दल वाचायला मिळालं. सरफोजी राजांच साहित्य प्रेम, पुस्तक प्रेम, त्यांच आरोग्य शाखेबद्दलच्या अफाट कुतुहलाबद्दल वाचलं. डोक्यात खूप गोष्टी आहेत. विचारांना भाषेचे बंध नसतात. भाषेला शब्दांचे बंध नसतात. इतिहासाला काळाची तमा नसते. सरफोजी राजे, सरस्वती महाल लायब्ररी, महाबलीपुरम, सरस्वती नदी, ऍंगकोरच्या हिंदू राजांची वंशावळ, त्यांचे कलाप्रेम, चैत्रालची कलाश जमात वगैरे वगैरे. तसा एकाचा दुसऱ्याशी संबंध नाही पण हे सर्व माझ्या शब्दांत, माझ्या भाषेत निबंधरुपाने जमवून ठेवायला मला आवडेल. माझ्या भटकत्या मनातल्या आणि काळाच्या ओघात विसरुन गेलेल्या गोष्टी संकलीत करायच ठरवलं आहे.

ब्लॉगला नाव काय द्याव ते अजून ठरवायचय. "भूले बिसरे", "भूले भटके" ... डोक्यात हिंदीच का येतय कुणास ठाऊक?...बघू कसं जमतय ते.

Saturday, April 22, 2006

म्हींग्लीश

मराठीशी माझा संबंध सुटत चाललाय का अशी भीती बऱ्याच वर्षांपासून वाटायची. काही वर्ष गल्फमधे काढली. अमेरिकेला यायला तसा उशीरच झाला पण इथे राहूनही आता काही वर्षे उलटून गेलीच आहेत. विंचवाच्या पाठीवरच्या बिऱ्हाडाप्रमाणे इथून तिथून फिरण्याने मराठीपासून दूर जाऊन बराच काळ गेलाय. घरातली गोष्ट सांगायची झाली तर मी सोडून घरात कुणीच मराठी नाही त्यामुळे इथेही मराठी चालत नाही. मराठी पुस्तकं, सिनेमा, साहित्य या सर्वांचा संबंध हळूहळू सुटत चाललाय. आमची घरगुती भाषा हिंग्लीश....मुलीशी मधे मधे मराठी बोलते म्हणून "म्हींग्लीश".

कधी कधी माझे तिचे संवाद रंगतात. तिला नवीन शब्द शिकवायला, तिच्या फिरक्या घ्यायला खूप मजा येते. अर्थात ती ही काही कमी नाही. तिलाही ही शब्दमिसळ फार आवडते.

"मॉम , गिव्ह मी सोने को चादर",

"मुझे बॅक पे सोप लाव के दे ना" वगैरे.

आजकाल माझ्या डोक्यात तिला जुने हिंदी सिनेमा, जुने फोटो, जुन्या फॅशन्स दाखवायच खूळ घुसलं आहे. काही दिवसांपूर्वी तिला "चलती का नाम गाडी" दाखवला तेव्हापासून ती किशोरकुमार भक्त झाली आहे. एक आवडला म्हणून मग हाफ टिकिट, पडोसन, मि. मिसेस ५५, CID दाखवले. काही जुन्या फॅशन्स, जुने कलाकार पाहून मीही तिच्याबरोबर माझी करमणूक करुन घेतली.

अचानक तिला जुने फोटो हवे झाले, "मम्मा, शो मी तुझ्या लहानपणके फोटो ना प्लीज."

काल आम्ही दोघी अल्बम काढून बसलो होतो. माझ्या वाढदिवसांचे, जुन्या घरातले, माझ्या आई बाबांच्या तरुणपणीचे फोटो बघता बघता ती एकदम गप्प झाली, कसल्यातरी गहन विचारांत गढून गेल्यासारखी. आमच्या म्हिंग्लीश सारखी तिच्या डोक्यात विचारांची काहीतरी गल्लत होत होती बहुतेक.

काय झाल म्हणून विचारल तसं म्हणाली,

"As a child, did you find world a very boring place? "

अस का ग म्हणतेस म्हणून विचारल तर परत म्हींग्लीशच भूत स्वार. पण तरीही अतिशय गंभीरपणे तिने मला प्रश्न केला,

"तुझ्या लहानपणी वर्ल्ड में सबकुछ ब्लॅक ऍन्ड व्हाईट होत ना. कलर्स नसलेली दुनिया बोरींगच असणार ना?"

Saturday, April 15, 2006

तुझ्यासाठी हज्जारदा

"काईट रनर" म्हणून एका अफगाणी अमेरिकन लेखकाची एक चांगली कादंबरी वाचनात आली. अतिशय सरळ, साधी गोष्ट. दोन मित्रांची, वडिल-मुलाच्या प्रेमाची... खूपसं अफगाणिस्तान, थोडसं तालिबान, बरचसं वास्तव, काहिसं विस्थापित जीवन, थोडेसे न पटणारे योगायोग यात कथा गुरफटून गेली आहे. पण वाचताना बरं वाटलं, पाश्चिमात्य जगात अवचितच काहीतरी खरखुरं पौर्वात्य मिळून गेल्यासारख.

कथेतली काही वाक्य उगीचच आवडून गेली. ज्या वाक्याभोवती संपूर्ण कथा घोटाळत रहाते ते खूपच छान आहे, "For you thousand times over."

आयुष्याच्या वाटेवर आपण कितीतरी लोकांना सहज भेटत असतो. बालपणीचे सोबती, शाळा मित्र, आजूबाजूचे संबधीत, नातेवाईक. सर्वांकडून आपल्याला काही ना काही अपेक्षित असत. मी इतक करतो म्हणून दुसऱ्याने माझ्यासाठी एवढ कराव, उपकारांची परतफेड, केलेल्याची जाणिव वगैरे सारख्या वाक्यांतून आपण आपल्या आयुष्यात इतरांकडून केवळ अपेक्षांच आणि अपेक्षाभंगांच ओझं वाढवत असतो. अशी फार कमी माणसं असतात की ज्यांच्यासाठी आपण निर्व्याजपणे काहीतरी करतो. आपली नाती, मैत्री, ओळखी या किती स्वार्थी असतात नाही? एक प्रकारचा सौदा किंवा trade. फार फार तर जितकं दुसरा करतो तेवढीच आपण परतफेड करत असतो.

बहुतेकदा मैत्री ही फक्त गरजे पुरती असते. Friendship of convinience.

कुणासाठीतरी झोकून द्याव. कसलीही अपेक्षा न करता निर्व्याज प्रेम करावं. दुसऱ्याला आपल्यासाठी desirable बनवण्यापेक्षा त्याला आहे त्या स्थितीत, परिस्थितीत स्विकाराव. कुठलीही फारशी अपेक्षा न ठेवता एखाद्यासाठी आपल्याला शक्य आहे तेवढे मनापासून करत रहावे आणि म्हणावे, "तुझ्यासाठी हज्जारदा".

Tuesday, April 11, 2006

चिरनिद्रा

काल रात्री Tuesdays With Morrie वाचायला घेतले. मला वाचायला आवडतं असं कळल्यावर मेलिसाने, (माझी gym partner) मोठया प्रेमाने स्वत:ची काही पुस्तकं आणून माझ्या सुपूर्त केली होती. पुस्तकाची फक्त पहिली ४० पानं वाचली असल्याने त्याच्या बद्दल नाही बोलायचय पण त्याच्या अनुषंगाने काही पूर्वीच्या गोष्टी आठवल्या. मरणाच्या, मृत्युच्या. प्रत्येकाने त्याला वेगळ्या रुपात पाहिल्याच्या.

शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात पानिपतच्या लढाईवर एक धडा होता. त्यात दत्ताजी शिंद्यांच्या तोंडचे एक सुरेख वाक्य होते. मला ते पूर्ण आठवत नाही पण "आप मेला जग बुडाले....." असंच काहीतरी होते. अर्थ असा की आपण मेलो की जग आपल्यासाठी संपून जाते, मागे काय आणि कोण राहिलं याचा विचार व्यर्थ आहे.

दुसरं एक विचीत्र उदाहरण म्हणजे लहान मुलांच बडबड गीत Ring a Ring O Roses. लहान मुलांच्या तोंडात सहज बसणारे हे गाणे प्लेग, मृत्यु, शेवटचा श्वास याबद्दल आहे हे पटकन लक्षातही येत नाही. लहान मुलांना अशी गाणी का शिकवावी ही न कळण्याजोगी बाब आहे.

मॉरी वाचताना असेच काहीतरी विचार मनात भरकटून गेले. मरताना काहीतरी मागे सोडून जातोय याची चुटपुट लागेल का मनाला? आणि ती सर्वात जास्त कुठल्या गोष्टिची? माझ्या मुलीची? नवऱ्याची? आणखी कोणाची?...... माझ्या घराची? ऑफिसची, मित्र मैत्रिणींच्या कोंडाळ्याची, माझ्या जन्मभर नेटीने गोळा केलेल्या वस्तूंची? या गावाची? अशी काय एक गोष्ट आहे की मी ती सगळ्यात जास्त miss करेन?

पलंगावर अंग टेकल आणि प्रश्नाच उत्तर माझ्या समोर उभं राहिलं. मरणाच्या चिरनीद्रेत एकदा प्रवेश केला की जी गोष्ट सर्वात miss होईल ती या पलंगावरच्या उबदार, सुखद झोपेतून जागं होण्याची. नव्या दिवसाची नवलाई miss केल्याची. साखर झोपेतून जागं होऊन सगळ्या चेतना जागवण्याची, जागं होताना आपण कोण, आपली माणसं, आपली कामं, कर्तव्य कुठली याची जाणीव होण्याची.

दत्ताजी शिंद्यांच बरोबर आहे नाही, जिथे चेतनाच संपेल तिथे आपण कोण आणि आपल कोण?

Sunday, March 19, 2006

अस्तित्व

का कुणास ठाऊक पण मला सांगायचा आशय आधी गोष्टरुपाने सांगून नंतर explain करायला मला नेहमीच आवडत, म्हणून आधी गोष्ट, नंतर explaination.
---------

सकाळचे साडे आठ वाजले होते. मनोहरने घडयाळात पाहिलं आणि तो ताडकन उठला. अरे बाप रे! सॉलिड उशीर झाला की आज. सकाळी सकाळी मीटींग होती. चुकणार च्यायला आता.

"मनाली ए मनाली, उठवलं का नाहीस मला. काल सांगितलं होतं ना की लवकर जायचयं," मनोहरच्या त्राग्याला पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. म्हणजे मनाली ऑफिसला निघून गेली होती. भांडण तर झालं नव्हतं काल मग अशी कशी निघून गेली मला न उठवताच? पण मनोहरला यापेक्षा जास्त विचार करायला वेळ नव्हता. ताबडतोब निघणं आवश्यक होतं नाहीतर बॉसकडून चांगली हजेरी घेतली जाणार होती.

त्याने भराभर तोंड धुतलं, कपडे बदलले आणि सरळ दरवाज्याच्या दिशेने धाव ठोकली. गाडी भरधाव सोडून कसाबसा मनोहर एकदाचा ऑफिसला पोहचला. मीटींगला खात्रीने उशीर झाला होता पण जितकं पदरात पडेल तितकं घ्याव या विचारात त्याने ऑफिसमधे प्रवेश केला.

"हाय जेनी,"
जेनी म्हणजे रिसेप्शनीस्ट. हसतमुख आणि बोलभांड. आल्या गेल्याची इत्यंभूत माहिती ठेवणार. आज मात्र जेनीने मान वर करुन सुद्धा पाहिलं नाही. मनोहरला तरी थांबायला वेळ कुठे होता. तो ताड ताड कॉन्फरन्स रुमच्या दिशेने गेला आणि सरळ आत घुसला. मीटींग अर्ध्यावर आली होती. सगळेजण इतके बिझी होते की मनोहरच्या येण्याची दखलही कोणी घेतली नाही. साधं हाय, हलो पण नाही. मनोहरने मधेच आपलं तोंड खुपसलं पण काही फरक नाही, जसे काही आज त्याचे सर्व गुन्हे माफ होते. झालयं तरी काय या सर्वांना? मला वाळीत बिळीत टाकलय की काय आज? मनोहर या विचाराने स्वत:शीच हसला.

नंतरचा पूर्ण दिवस मनोहरशी कोणीच बोललं नाही. कॅन्टिनमधून नेहमी सारखा चहाही नाही. मनोहरने स्वत:हून लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येकजण मनोहर त्यांच्या जगात नसल्यासारखाच वावरत होता. दिवस जसा पुढे सरकायला लागला तसं मनोहरला गरगरायला लागलं. तोंडावर थंड पाणी तरी मारावं असं ठरवून तो वॉश रुम मधे गेला आणि आरशासमोर उभा राहिला.... समोर कुणीच नव्हतं. आरसाही मनोहरच प्रतिबिंब दाखवत नव्हता.

"अरे बाप रे! मी मेलोय की काय?" पाया खालची जमीन सरकल्याचा भास मनोहरला झाला, "पण मेलो असतो, तर सकाळी मनाली ऑफिसला नसती गेली, घरातही गडबड असती आणि इथे ऑफिसात निदान दखलतरी घेतली गेली असती. मग काय घडलं असाव," मनोहर आपल्याच विचारांत बाहेर पडला, गाडीत बसला आणि घरी निघाला. पण घरी जायची इच्छा नव्हती म्हणून मग घरा समोरच्या पार्कमधे थोडा वेळ बसून डोकं शांत कराव असं त्याने ठरवलं.

बेंचवर म्हातारे नेने काका बसले होते. नेने काका म्हणजे अगदी निरुपद्रवी प्राणी. मनोहरला बऱ्याच वर्षांत त्याच्याशी बोलल्याचं आठवत नव्हतं....निदान या नेन्यांना तरी मी दिसतोय का?

"नमस्कार काका? काय म्हणता? कसे आहात?" मनोहरने खडा टाकला.

"मी बराय रे. पण तू का असा मलूल दिसतोयस? बरं नाही का?" आज संपूर्ण दिवसांत प्रथमच मनोहरशी कोणीतरी बोललं होतं.

"म्हणजे मी तुम्हाला दिसतोय काका? मी मेलो नाहीये तर. काका, बाकीच्यांना मी अचानक दिसेनासा झालोय हो."

"हो तर मला दिसतो आहेस ना तू पण बाकीच्यांना दिसत नाहीयेस. मी आणि तू एकाच बोटीत बसलोय रे म्हणून एकमेकांना दिसतोय. नाहीतर काल पर्यंत मी तरी तुला कुठे दिसत होतो?"

"हे असं काय बोलताय? काका खरं सांगा..आपण मेलो आहोत का हो?"

"नाही रे मन्या, अगदी मेलोच आहोत असं नाही म्हणता येणार..पण मी रिटायर झालो आणि या सर्वाला सुरुवात झाली..तुझं कारण काय मला माहित नाही पण एवढं सांगतो, जग रितीने आपण अजून मेलो नाही आहोत...आपण फक्त आपलं अस्तित्व गमावलयं."
--------------

(बाप रे! काय भयंकर गोष्ट बनली आहे. मला वाटत या पेक्षा चांगली लिहिता आली असती. बघू पुढे मागे बदलेन.)

आपण ज्या ज्या वेळी राहती जागा बदलतो, शाळा कॉलेजातून बाहेर पडतो, नोकरी बदलतो, देश सोडतो त्या त्या वेळी आपण आपल अस्तित्व त्या ठिकाणातून पुसून टाकत असतो. कधी कधी माणसाची गरज संपून गेली की त्याच्या अस्तित्वाची दखल घेण्याच कारणच उरत नाही.

माणसाचं अस्तित्व किती परावलंबी आहे, नाही? नुसतं परावलंबी नाही तर तकलादू ही. दुसऱ्याने मान्य केल तर आपल अस्तित्व आहे नाहीतर नाही. लोक ओळखतात म्हणून अस्तित्व आहे, आरसा दाखवतो म्हणून अस्तित्व आहे. माणूस प्रत्येक ठिकाणी आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवू पहात असतो. अगदी लहान मूल रडते ते ही आपण असल्याचा दाखला देत असते. एखादा गुणी कलावंत केवळ लोकांनी दखल घेतली नाही म्हणून काळाच्या पडद्याआड जातो. शौर्याने युद्ध लढलेल्या अनेक सैनिकांचं केवळ नोंद नसल्याने अस्तित्व पुसलं जातं. आपल्या वागण्यातून, कामातून, जगण्यातून आपण आपलं अस्तित्व जगवत असतो.

Wednesday, March 15, 2006

ग्रहण

काल आमचं नव्याने सुरु झालेल मंदिर बंद होतं. एक दोघांनी मला संध्याकाळी घरातून बाहेर वगैरे न पडण्याचा सल्ला देखील दिला होता, माझ्या मुलीची मैत्रीण ही खेळायला आली नाही कारण काय तर काल चंद्रग्रहण होतं. ते ही कसलं तर, penumbral lunar eclipse ,ज्यात चंद्रात फारसा फरक पडलेला दिसत नाही.

मला मजा फक्त या कारणासाठी वाटते की ज्या अमेरिकेने चंद्रावर आपला झेंडा रोवला त्याच अमेरिकेत रहाणारे सुशिक्षीत, सुसंस्कृत भारतीय राहू केतू गरीब बिच्चाऱ्या चंद्राला गिळायला टपले आहेत या भ्रामक कल्पनेवर अजूनही विश्वास ठेवतात.

माझ्या मुलीने प्रश्न विचारुन जीव हैराण केला होता, चंद्र ग्रहण म्हणजे काय? किती प्रकारचं असतं? किती वेळ असतं? आपले इंडियन्स त्याला घाबरतात का? आपण आता जर बाहेर गेलो तर आपल्याला काहीतरी होईल का? तू सांगतेस की काही होणार नाही मग आंटी (मैत्रीणीची आई) का घराबाहेर पडायचं नाही म्हणाली?

तिला सांगितलं चल बाहेर लॉनवर जाऊन ग्रहण बघू, तुझ्या कॅमेराने फोटो ही काढ आणि तिथून स्टोर्स मधे जाऊया आणि बघूया आपल्याला काही होतयं का ते? मला वाटत तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळाली.
पण माझ्या प्रश्नाच उत्तर? हे ग्रहण कोणावरचं? चंद्रावरच की आपण स्वत:ला जखडून ठेवलेल्या भ्रामक रुढी कल्पनांवरचं? आणि ते सुटणार कधी?

Tuesday, March 14, 2006

सल


आज कित्येक वर्षांनी मला ती दिसली. सिद्धिविनायकाच्या बस स्टॉपवर आपल्याच विचारांत उभी होती. माझी टॅक्सी भुरकन निघून सुद्धा गेली तिच्या समोरुन, पण तिला पाहिलं आणि कितीतरी आठवणी दाटून आल्या, मनात आणि डोळ्यातही. मागेही एकदा अशीच दिसली होती. त्यामानाने आज बरी वाटली पण तिची कृश मूर्ती, विस्कटलेले केस, अंगावरचे साधे कपडे पाहून तिच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नसावा असं दिसत होतं. नकळत एक अपराधी भावना मनात येऊन गेली.

तिला मधुमीता म्हणू की माहताब. मला वाटत सुरुवात मधुमीतानेच करावी. मधुमीता दत्त. इंजीनिअरींगच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला भेटली. आमच्या मराठी मुला मुलींचा ग्रुप जमून येत होता, ओळख सुरु होती आणि जवळच एका बाकावर बसून एक उंच, नाजूक, निमगोरी, केसांची घट्ट वेणी घातलेली, शेलाटी मुलगी चेहऱ्यावर स्मितहास्य आणून आमच्याकडे पहात होती. थोडयाच वेळात कोणीतरी तिला आमच्यात बोलावल आणि तिची चौकशी सुरु केली.

"मॉधुमिता दत्त. मी अंधेरीला रहाते."

"बंगाली वाटत? हे बघ, आपल्याला मॉधु बिधु जमणार नाही. आम्ही तुला मीता म्हणू. चालेल?" कोणीतरी सुचवलं आणि ती आमची "मीता" झाली ती कायमचीच.

मीताच्या चेहऱ्यावर नेहमी शांत, विचारी भाव असायचे. तिच बोलणं वागणं सुसंस्कृत होत. तिला कधी मोठ मोठयाने बोलताना, खदखदून हसताना पाहिल्याच आठवत नाही. तरीही ती स्मार्ट होती. अभ्यासात, बोलण्यात, वागण्यात तिची सफाई सर्वांनाच आवडून जायची. एक होतं मात्र, ती आमच्यात असूनही आमच्यात नसायची. कॉलेजमधे आम्ही एकत्रच असायचो पण एकदा कॉलेजच्या बाहेर पडलो की मीता कधीच आम्हाला जॉईन व्हायची नाही. ती आमच्यापैकी कोणाच्या कधी घरी आली नाही, सिनेमाला नाही, पिकनीकला नाही. स्वत:च्या घरीही कधी तिने आम्हाला बोलावलं नाही. काही काम असेल तरच ती मला घरी फोन करायची. मीही २-४ वेळाच तिच्या घरी फोन केला होता. तिच्या आईशीही बोलले होते. तिची आई माफक चौकशी करायची. थोडंफार बोलणं व्हायच.

मीता घरात सर्वांत मोठी होती. तिच्यामागे अकरावीत एक भाऊ होता आणि शाळेत जाणारी धाकटी बहिण. मीताचे वडिल बॅंकेत ऑफिसर होते, आई घरातच असायची. अंधेरी इस्टला त्यांचं दोन बेडरुमच घर होतं. मीताचे वडिल कडक शिस्तिचे होते. शिकत्या मुलांनी फॅशन, सिनेमा, पिकनिक्समधे वेळ घातला की त्यांच अभ्यासावरचं लक्ष उडतं या मताचे होते. आई मात्र मृदुभाषी होती. मीता सारखीच. बस! या व्यतिरिक्त आम्हाला मीताची फारशी माहिती नव्हती आणि त्याची गरजही नव्हती.

बघता बघता तीन वर्ष निघून गेली. आमच्यात आणि मीता मधे घट्ट नातं तयार झालं होतं पण फक्त कॉलेजमधे. शेवटच्या वर्षाला नुकतीच सुरुवात झाली होती. लेक्चरला मीता माझ्या शेजारी बसली होती. लेक्चर चालू असताना मधेच मी मीताला काहीतरी गुणगुणताना ऐकल. मी तिच्याकडे पाहिल तर ती आपल्याच नादात पेपरवर बंगालीत काहीतरी खरडत होती.

"ए मीता, काय लिहित्येस?" मी तिला उत्सुकतेने विचारलं.

"काही नाही..असचं आपलं काहीतरी," असं म्हणून ती गोडशी हसली.

"ए तू प्रेमा बीमात तर नाही ना पडलीस? बॉयफ्रेंड तर नाहीना गाठलास?" मला तिची फिरकी घ्यायची लहर आली. त्यावरही मीताने मला फक्त एक गोडंस स्मितहास्य फेकलं. मीताला बॉयफ्रेंड असायला माझी काहीच हरकत नव्हती. या वयांत नाही तर मग केव्हा असणार? पण मीताचा बॉयफ्रेंड कोण असेल? बंगाली कि बिन-बंगाली, हॅंडसम, मीता सारखा उंच, देखणा? आणि तो काय करत असेल म्हणजे नोकरी की कोणी बिझनेस मन? अनेक प्रश्नांनी मनात गर्दी केली.

"ए मीता कॅन्टीन मधे चल ना. सांग ना मला सगळ. कुठे भेटला? काय करतो? कुठे रहातो?" मी प्रश्नांच्या फैरी झाडल्या.

"किती प्रश्न विचारतेस? त्या पेक्षा असं कर तू स्वत:च त्याला भेट. तो आज येणार आहे कॉलेज सुटल्यावर मला घेऊन जायला. तू भेटणार?" मीताने विचारल.

"भेटणार म्हणजे काय? भेटणारच," मी म्हटल आणि मीता गोडशी लाजली.

संध्याकाळी मी आणि मीता कॉलेजच्या गेट जवळ उभे होतो. काळोख व्हायला आला होता. थोडयावेळाने मीता म्हणाली, "तो बघ, येतोय समोरुन, ओळख कोण?"

मी समोरच्या गर्दीतून येणारे चेहरे न्याहाळू लागले. माझ्या कल्पनेतला उंच, देखणा तरुण कुठेच दिसत नव्हता. जो तरुण समोर येऊन उभा राहिला तो मीतापेक्षा अंमळ बुटका होता. त्याचे दात पुढे आलेले होते, नाकावर एक बऱ्यापैकी मस होता. त्याचे कपडे यथातथा होते. शर्ट बाहेर आलेला, ढगळ पॅन्ट, कुठल्याही अंगाने तो मीताच्या बरोबरीचा नव्हता. त्याला पाहून मी आ वासला नाही हेच काय त्यातल्या त्यात बरं म्हणायच.

"मीट रियाझ, रियाझ शेख," हा दुसरा शॉक इतका जबरदस्त होता की मी हाय हॅलो झाल्यावर तिथून काढता पाय घेतला.

घरी परतताना मी विचार केला की दिसण्यावर का जाव? आणि धर्मावरुन माणसाची परीक्षा करणाऱ्यातील मी नव्हे. पण एकंदरीत रंग चांगले नव्हते. मीताच्या घरी हे नक्कीच चालण्यासारख नव्हतं. हा प्रकार काय आहे याचा आपण शहानिशा करायचाच अस ठरवूनच मी त्या दिवशी झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या एकाही लेक्चरला मीता हजर नव्हती. दुपारी प्रॅक्टीकलला ती आली पण आपल्याच विचारांत हरवलेली होती.

"मीता, मला बोलायचय तुझ्याशी, आपण नंतर कॅन्टीन मधे भेटू."
ठरवल्याप्रमाणे मीता कॅन्टीन मधे आली. मी तिला रियाझ बद्दल छेडलं. कुठे भेटला, काय करतो, हे घरी चालणार आहे का? अनेक प्रश्न विचारले.

मीता नेहमी सारखीच शांत दिसली पण तिच्या शांतपणात एक प्रकारची बेफिकिरी होती.

"बस स्टॉपवर भेटला. अंधेरीला पार्ट टाइम जॉब करतो. बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे. गोवंडीला त्याच्या मोठया भावाबरोबर रहातो. बाकीच कुटुंब उत्तर प्रदेशात असतं. फार चांगला मुलगा आहे. माझी खात्री आहे की ग्रॅज्युएट झाल्यावर त्याला चांगली नोकरी लागेल आणि मलाही, मग दोघे मिळून आमच चांगलं चालेल."

"आणि घरच्यांच काय? तुझ्या डॅडना चालेल का?"

"हं," मीताचा चेहरा क्षणभर पालटला. "नाही चालणार. मला माहित्ये पण धोका पत्करायला मी तयार आहे आणि पुढे मागे सर्व एकत्र होतात."

वाटलं हिला गदागदा हलवाव आणि म्हणाव, जागी हो. कसलं स्वप्न बघत्येस? फ्लॅट मधे वाढलेली तुझ्यासारखी मुलगी गोवंडीच्या चाळीत रहाणार आहे का? काय माहिती आहे त्याच्या कुटुंबाची, माणसांची की तू खुशाल पुढच्या आयुष्याची चित्रं रंगवत्येस. मीतासारखी मुलगी असला वेडेपणा करु शकते यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण मी गप्प राहिले. फक्त एवढचं म्हंटल की, "घाई करु नकोस. शेवटचं वर्ष आहे, अभ्यासात लक्ष ठेव."
त्यानंतर मीता पार बदलून गेली, कधी लेक्चरनां दांडी, कधी प्रॅक्टीकल्सना. हजर असली तरी आपल्याच नादात. संध्याकाळ होण्याची वाट पहात. रोज संध्याकाळी रियाझ तिला घ्यायला यायचा. एव्हाना ही गोष्ट ग्रुप मध्ये सर्वांच्या लक्षात आली होती, माझा ग्रुपच नाही तर प्रोफेसर, लेक्चरर यांनाही कुणकुण लागली होती. कधी कधी मीताचा प्रचंड संताप यायचा. माणसाने इतक वेड व्हाव की चांगल्या वाईटाचा विचारच सोडून द्यावा, अनेकदा तिच्या वागण्याच आश्चर्यही वाटायच.

असच एकदा रागाच्या भरात मी तिला म्हंटल, "मीता, काय लावल आहेस हे तू? अक्कल गहाण टाकली आहेस का? मला वाटतय की एक दिवस सरळ तुझ्या मा ला फोन करावा आणि सांगाव तुझ्या बद्दल. त्या दोघांना कल्पनाही नसेल की तू कॉलेजचा वेळ कसा घालवतेस याची."

"नको नको असलं काहीतरी नको करुस. माझं घरातून बाहेर पडणं बंद होऊन जाईल. काय आनंद आहे तुला त्यात. माझ खूप प्रेम आहे रियाझवर पण देईन अभ्यासावरही लक्ष," मीताने मनधरणी केली.

त्यादिवसा नंतर ती आमच्या पासून दूर दूर राहू लागली. वर्गात लांब बसायची, कॅन्टीनमधे भेटणं नाही, दिलखुलास बोलणं नाही आणि आठवडया दोन आठवडयात पुन्हा ये रे माझ्या मागल्या. मीताची गैरहजेरी वाढतच चालली होती. त्यातच सेमिस्टर परीक्षा आल्या...मीताची गैरहजेरी इतकी जास्त झाली होती की तिला परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात आली.
आपल्याला नसत्या भानगडीत पडायचं काही कारण नाही अशी ग्रुपमधे प्रत्येकाची भावना होती. राहून राहून मला आश्चर्य वाटत होतं की आता काय होणार? किती दिवस घरच्यांपासून ही गोष्ट लपून रहाणार?
परीक्षा संपल्या, शेवटचं सेमिस्टर सुरु झालं, मीताचा काही पत्ता नव्हता. तिच्या घरी फोन करुन उगीच आपल्याला नको त्या चौकशीला समोर जायला नको म्हणून कधी फोनही केला नाही...आणि मग एके दिवशी अवचितच मीता आणि रियाझ कॉलेजमधे भेटायला आले.

अंगावर साडी, गळ्यात एक काळा पोत आणि तोंडभर हसू घेऊन मीता उभी होती, "आम्ही निका केला..दोन दिवसांपूर्वी. तुम्हा सगळ्यांना भेटून सांगावसं वाटलं."

"पण घरी कधी सांगितलस?"

"घरी कुठे सांगितलय? पळून जाऊन केलं. मा ला चिठ्ठी ठेवली होती, त्यांना नक्कीच कळलं असणार. आज जाऊ घरी असं रियाझ म्हणतोय पण डॅड घरात घेणार नाहीत हे मला माहित्ये."

"अगं पण मीता...."

"मीता नाही माहताब. निका पढण्यापूर्वी धर्म बदलला." मीता म्हणाली.

मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. मीताचं इतक्या दिवसांपासूनच वागण पाहिलं तर हे सर्व अपेक्षितच होतं. यापुढे तिला फार काही विचारण्यात अर्थ आहे असही मला वाटत नव्हतं. फक्त "कॉलेजच काय करणार?" एवढं मात्र विचारुन घेतल. पण त्यावरही अजून काही ठरवलेलं नाही असं बेफिकिर उत्तर मीताने दिलं.

त्यानंतर कित्येक महिने, वर्षे मीताची भेट झाली नाही. मी माझ्या आयुष्यात व्यस्त झाले होत. लग्न, नोकरी, घर यासगळ्यात मीताची आठवणही काढायलाही वेळ नव्हता आणि मग एक दिवस अचानक माझी तिची भेट अंधेरी स्टेशनवर झाली. जुना पंजाबी ड्रेस, विस्कटलेले केस, खांद्यावर शबनम आणि कडेवर एक दिड वर्षांच बाळ.

"कित्ती बदलली आहेस तू मीता. ओळखलच नाही बघ तुला. कशी आहेस? काय करतेस? आणि हे बाळ कोण? मुलगा की मुलगी? कुठे निघाली आहेस? आणि रियाझ काय म्हणतो?" मी एका दमात सगळे प्रश्न विचारुन घेतले.

मीताने नेहमीसारख स्मितहास्य केलं पण त्यात एक प्रकारचा विशाद होता. मला कससच वाटून गेल.

"ही सारा. सव्वा वर्षांची आहे. रियाझ दुबईला असतो. तिथे नोकरी करतो."

"बरं झालं ना. तू का नाही गेलीस? की जाणार आहेस लवकरच?"

"नाही गं. तलाक देऊन गेला. आपलं जमतं नाही, तू आणि मी भिन्न परिस्थितीतून आलो आहोत असं म्हणायला लागला. मी तयार होते गं जमवून घ्यायला. सारा फक्त चार महिन्यांची होती. तेव्हापासून मा कडे असतो आम्ही दोघी. डॅड बोलतही नाहीत कधी बोललेच तर म्हणतात, तुझ्यामुळे आमची लाज गेली. धाकटया बहिणीच्या लग्नात अडथळे येतील. सगळीकडे छी थू झाली. आता आणि हे आणखी एक लोढणं गळ्यात बांधून घेतलं आहेस," मीताच्या डोळ्यात पाणी तरळत होतं.

समोरच्या प्लॅटफॉर्मवरुन ट्रेन धडधडत गेली की मीताच्या गोष्टीने पायाखालची जमीन थरथरली ते नाही सांगता यायचं.

"तू काही करतेस का मीता? म्हणजे नोकरी वगैरे?"

"हो. हल्लीच एके ठिकाणी असेंब्लरचा जॉब लागला आहे."

"असेंब्लर?"

"मी कुठे ग्रॅज्युएशन केलं? जी मिळाली ती नोकरी धरलीये गं. जगणं नकोस झालयं. मा कडे फार दिवस नाही राहू शकत. पायावर उभ रहायच म्हंटल तर कुठुन तरी सुरुवात करायला हवीच ना," मीता मंद हसत म्हणाली.

माझी ट्रेन येत होती, "मीता मला निघायला हवं, मीटींग आहे ऑफिसात महत्वाची, चुकवून चालणार नाही." घाई घाईत पर्स मधे हात घातला आणि पाचशेची एक नोट साराच्या हातात कोंबली आणि ट्रेनमधे घुसले.

"तुझा नंबर दे ना गं," मीता खालून ओरडली. गडबडीत लक्षातच आलं नव्हतं माझ्या आणि आता इतक्या गर्दीतून देणं अशक्यच होतं. त्यानंतर पुन्हा मीताची भेट झालीच नाही. दिसली ती आज. सिद्धिविनायकाच्या बस स्टॉपपाशी.

पण मनाला एक गोष्ट जरुर सलते. एक फोन कॉल मीताच्या इच्छेविरुद्ध मी तिच्या मा ला करायला हवा होता का? आपल्याला काय घेणं देणं? नसतं लफडं आपल्या मागे नको म्हणून मी नामानिराळे राहून तिच्या अधोगतीला जबाबदार आहे का? मैत्रीण तर तशीही गमावणारच होते, पण अचूक निर्णय घ्यायला मी कचरले होते हा सल अजूनही मनात कायम आहे.

Thursday, March 09, 2006

भीती

प्रसादच्या प्रासादीकवर नुकतीच एक प्रतिक्रिया टाकली होती, त्याचा धन्यवादही मला लागोलाग मिळाला. पुन्हा प्रतिक्रिया लिहिण्यापेक्षा एक छोटासा ब्लॉग लिहिणे जास्त सोयिस्कर आहे.

विषय होता भीती बद्दल. प्रसादच्या काही ओळी इथे पुन्हा लिहिते.

जिथे न्यायव्यवस्था पोचू शकत नाही तिथे कमीत कमी ही भीती उपयोगी ठरते. कोणी पहात नाही म्हणल्यावर एखादी चूक करायला कोणी कचरत नाही. साधच उदाहरण घ्यायचं तर मामा नसेल तेव्हाही सिग्नल पाळणारे थोडेच. एकंदरीत काय तर समाजव्यवस्था निरोगी ठेवायला पूर्वीच्या लोकानीं केलेली ही योजना असावी.

------
अगदी खरयं. नेहमी असच होतं. भीतीचा बडगा आणि भीतीचा पगडा नेहमीच काम करुन जातो. एवढच नाही तर अनादी काळापासून माणसाला भीती दाखवण्याची कला उत्तम जमलेली आहे. समाज, कुटुंब आणि व्यक्तीगत जीवनातही भीती उत्तम कार्यभाग साधते.चूक बरोबर करण्याच्या फंदात पडण्यापेक्षा एक उदाहरण देते.

नव्याने मी अमेरिकेला आले तेव्हा प्रत्येक स्टॉप साईनवर इमाने इतबारे गाडी थांबविणाऱ्या तसचं सिग्नलला यील्ड करणाऱ्या लोकांच मला अतिशय कौतुक वाटायच. आपल्या देशात असं होणं शक्य आहे का? अजून बरीच वर्षे तरी नाही. हा माझा आशा आणि निराशावाद दोन्ही आहे.
भीती हा यातला अविभाज्य भाग आहेच. पण इथे केवळ भीती नाही. सामाजिक बांधिलकीची जाणिव देखिल आहे. प्रत्येक वेळी पोलिसची कार उभी नसते पण तरीही घाईतला प्रत्येक मनुष्य नियम पाळतो. यात भीतीपेक्षा आपल्या 'सिस्टीम' बद्दल आदर आणि विश्वास मला दिसला.

माझं असं प्रामाणिक मत आहे की भीती फार काळ टिकत नाही. मग ती हवालदाराची असो, हुकुमशहाची असो नाहीतर घरात आई वडिलांची असो. कुठल्या न कुठल्या प्रकारे ती उलथुन टाकण्याचा प्रयत्न होतोच. टिकते ती श्रद्धा आणि विश्वास.

Saturday, February 18, 2006

तो


त्याला भेटण्याची संधी मिळेल न मिळेल या बद्दल मी कधीच विचार केला नव्हता. कुठे तो आणि कुठे मी. जगाच्या दोन टोकांवर. तशी त्याला नावाने ओळखत होते एवढचं. कधीतरी फोटोंमधेही पाहिलं होत. म्हणून काही त्याने माझं मन वगैरे जिंकलं नव्हतं. असेल कोणीतरी? त्यात काय मोठं? असं म्हणून खांदे उडवणे हीच काय ती माझी प्रतिक्रिया. पण आयुष्य मोठ विलक्षण असतं. कधी कोणाची कशी गाठ भेट घडून येईल हे विधात्यालाच माहित.

सर्व प्रथम त्याला भेटण्याचं ठरवल तेव्हाही थोडी फार उत्सुकता होती एवढच. पण आता त्याची माझी भेट ३-४ वेळा झाली आहे आणि प्रत्येक भेटीत त्याच्या विषयी अधिकाधिक ओढ निर्माण झाली आहे. अगदी पहिल्यांदा त्याच दर्शन झालं ना तेव्हा काळजाचा ठोका चुकला पण त्या नंतरच्या प्रत्येक भेटीतही एक वेगळीच धडधड मी अनुभवली आहे. प्रथम दर्शनी प्रेमावर यापूर्वी माझा कधीही विश्वास नव्हता पण त्याला पाहिलं आणि माझ्या विश्वासाला कधी तडे गेले ते कळलचं नाही. त्याला वेडावलेलं माझ मन पाखरु बनून त्याच्या अवती भवती घोटाळत राहिलय.

पण त्याला हे सगळं कुठे माहित्ये? आपल्याच मस्तीत, गुर्मीत वावरणारा तो, माझ्या सारख्या कपर्दिक व्यक्तीची तमा कशाला बाळगणार? प्रत्येक वेळी लांबून त्याचा आवाज ऐकला ना कि त्याच्याकडे धावत जाण्याची इच्छा होते. तासन तास टक लावून पाहिलय त्याला. प्रचंड गर्दीत त्याने मला एकदातरी पाहिलं असेल का? यावर अनेक वेळा विचार केलाय. मी मात्र त्याला लांबून, जवळून, उजवी कडून डावीकडून पाहिलय. डोळे विस्फारुन पाहिलय आणि डोळे मिटून ही पाहिलय. हात पुढे सरसावून त्याला स्पर्श करायचा प्रयत्नही केलाय. ओरडून त्याला "तू मला खूप खूप आवडतोस," असं सांगितलय आणि मनातल्या मनात त्याच्याशी संवाद ही साधलाय. त्याने ते ऐकलंय का नाही ऐकल याची मी कधी काळजी केली नाही. पण माझी खात्री आहे की त्याने ते ऐकलय.

त्याचा तो खळखळणारा आवाज, त्याची गुर्मी, रुबाब, ते निर्ढावलेपण, त्याचे अनेक रंग, त्याचं विशालपण मनात घर करुन राहिल आहे. त्याचं प्रत्येक रुप डोळ्यात, मनात आणि कॅमेरात साठवून घेतलं आहे. त्याच्या कुशीत शिरावं, त्याच्या स्पर्शाने ओलं चिंब होऊन जाव याची किती अनिवार इच्छा झाली आहे काय सांगू. त्याच्या या रुपाची अनामिक भीतीही मनात असते. वाटून जातं त्याच्या माझ्यात एक सुरक्षित अंतर असलेलच बरं, मनात कितीही आलं तरी त्याच्याकडे असं झोकून देणं तरी कसं शक्य आहे?

खरतरं माझा त्याच्यावर कुठलाच हक्क नाही. पण जेव्हा जेव्हा त्याला भेटणं झालं तेव्हा तो फक्त माझा असतो, माझा एकटीचा. त्याचं रुप माझ्यासाठी असतं, त्याचा तो रुद्र आवाज, त्याचं ते उग्र स्वरुप, त्याचे इंद्रधनुषी रंग सगळं सगळं काही माझ्यासाठीच असतं आणि त्या भेटीत माझ्या जगात फक्त आम्ही दोघेच असतो.... मी आणि माझा नायगारा.




Posted by Picasa

Wednesday, February 08, 2006

बाटलीतली जीनी


कसली बाटली हवी तुला?" त्याने तिला विचारले.

नाही! असे दचकू नका, तशा अर्थाने नाही विचारलं त्याने.

"नीळी, उभट, प्लास्टिकच्या बूचाची बाटली चालेल मला," तिने आपली सरळ साधी आवड व्यक्त केली.
"काहीतरीच काय? अगं तू रहाणार त्या बाटलीत, ती दिसायला सुबक, मनमोहक नको का? मी आणतो माझ्या आवडीची. तुला ही नक्की आवडेल."

"बरयं आका!" जीनीने मान डोलावली.
-----

"हे काय आका? इतक्या महागाची बाटली, माझी लायकी तरी आहे का तिच्यात रहायची?"
"अग! तुझी लायकी मला ठरवू दे, तू का काळजी करतेस?" त्याने शांतपणे म्हंटले.
"काळजी नाही आका पण थोडीशी भीती वाटते. एकदा मी बाटलीत शिरले की मी माझा आकार, माझं अस्तित्व तर नाही ना गमवून बसणार?"
"हे बघ, तू आपणहून माझी गुलामी स्विकारलीस ना! मग आता आढेवेढे कसले घेतेस?" त्याने वैतागून विचारले.
जीनी हिरमुसली झाली. आपण थोडा आणखी विचार करायला हवा होता अस म्हणून हळूच बाटलीत शिरली.

-------

"खूप आवडतेस तू मला जीनी. तुझ्याशिवाय इतके दिवस कसा जगलो काय माहित. पण तू आयुष्यात आलीस आणि सगळच कसं बदलून गेलं बघ."

आज स्वारी भारीच खुशीत दिसतेय, जीनी खुदकन हसली.

"अशीच हसत रहा, फार गोड दिसतेस."

"आज क्या मुझे बोतल में उतार रहे हो?" जीनी लटक्या रागाने म्हणाली.

"अग तुला बाटलीत उतरवल्याला बरेच दिवस होऊन गेले," त्याने हसत उत्तर दिले.
-------

"आज रात्री पार्टी आहे ऑफिसची, जीनी...तुझा आवडता ड्रेस घालून तयार रहा."

"जसा हुकूम, आका!"

"नको नको, नाहीतर असं करुया मीच येताना एक नवीन ड्रेस घेऊन येतो. तुझ्या आवडीचे सगळे ड्रेस कसले झिरझिरित असतात. आमचा बॉस ना थोडा 'हा' मनुष्य आहे. तू दिवसभर बाटलीत, तुला कल्पना नाही बाहेरच्या जगाची. अगदी निष्पाप आहेस तू."

"बरयं आका!"
आपल्या आकाना आपल्यापेक्षा खचितच जास्त अक्कल आहे या बाबत जीनीचे दुमत नव्हते. पण तरी तिला उगीचच वाटून गेले, "इतकी काय वाईट आहे माझी आवड?"
-------

बाटलीतून बाहेर पडून जीनीने आळोखे पीळोखे दिले.

"हे काय किती उशीर? आज तीन दिवसांनी बाटली उघडालीत तुम्ही आका. अंग कसं आखडून गेलं आहे. कित्ती कित्ती म्हणून वाट पाहिली तुमची. पण तुमचा काही पत्ताच नाही," जीनी नाराजीने म्हणाली.

"काम होत. सारखा घराबाहेर होतो आणि नाही जमलं बघ," त्याने उत्तर दिले. "आता फुरंगटून बसू नकोस. पण रोज रोज तुला असं बाटलीतून बाहेर काढणं आताशा कठिण होतयं. मलाही विचारणारी माणसं आहेत. तुझी जादू त्यांच्या लक्षात नको यायला."

"हो तर! प्रत्येक गोष्टीची कारणं तुमच्याकडे अगदी तयार असतात," जीनी रडवेली होऊन म्हणाली.
-------

"हे काय करुन ठेवल आहेस जीनी?" त्याने तावातावाने विचारले.
"मला वाटलं की फर्निचरची जागा बदलावी, घराला कसा वेगळेपणा येतो." जीनीने हसून उत्तर दिले.
"तू जादूची कांडी फिरवून कामं करतेस ते ठिक आहे पण मला विचारल्या शिवाय नको ते उद्योग करायला कोणी सांगितलय तुला. जेवढ मी सांगतो तेवढच करत जा यापुढे," त्याने जरा रागानेच म्हंटल.
"मी आज कांडी नव्हती फिरवली आका. स्वत:हून घराची रचना बदलली. मला वाटलं तुम्हाला आवडेल." जीनीने पडक्या स्वरांत आपली बाजू मांडली.
"हे बघ तुला काय वाटत ते तुझ्याकडेच ठेव. परत असले उद्योग केलेस तर तुझ्यासकट बाटली समुद्रात भिरकावून देईन."
--------

आज जीनीचा मूड काही औरच होता. तिने आज काही म्हणून ऐकून घ्यायच नाही असं ठरवल होतं. खरतर आज बऱ्याच दिवसांनी तिला बाहेर पडायची संधी मिळाली होती.
सगळ्या सामानाची तिने उलथापालथ करुन ठेवली.
"आज मी पण बघणार आहे काय होतं ते. कंटाळून गेलेय या रोजच्या गुलामगिरीला," मनाशी पुटपुटत जीनी आपल्या बाटलीत अंतर्धान पावली.
संध्याकाळी घरी आल्यावर घराची अवस्था पाहून तो हबकून गेला. झाला प्रकार लक्षात आला तशी तो बाटली घेऊन सरळ घराबाहेर पडला आणि समुद्रावर गेला. एकदा हळूवारपणे त्याने बाटलीवरुन हात फिरवला आणि सरळ बाटली समुद्रात भिरकावून दिली.
------

ही गोष्ट माझी तुमची आहे. थोडया फेरफाराने त्यात कोणतीही नाती घाला. मित्र - मित्र, मित्र- मैत्रिण, नवरा-बायको, मालक - नोकर अगदी शिक्षक - विद्यार्थीही. यात चुकत कोणीही नसतो. मालक मालकासारखा वागतो आणि गुलाम गुलामा सारखा. गोष्टीतला "आका" कोण आणि "जीनी" कोण हे मात्र ज्याचं त्याने ठरवायचं.

Saturday, February 04, 2006

आतले आणि बाहेरचे

जगात अनेक प्रकारचे लोक आहेत. अनेक रंगांचे, धर्माचे, जातींचे, व्यवसायाचे वगैरे. यात एक फारसा उठून न दिसणारा पण सर्वत्र आढळणारा एक प्रकार आहे. "आतले आणि बाहेरचे". तसा आपल्याला हा प्रकार नवा नाहीच. मी ही काही हा जावईशोध लावलेला नाही. खरं सांगायच झालं तर शाळेत असताना एक धडा होता, अगदी याच नावाचा "आतले आणि बाहेरचे".

या आतल्या बाहेरच्यांची अनेक उदहरणे आपल्याला माहित असतीलच, जस की घरातले - घरा बाहेरचे, देशांतले - देशाबाहेरचे. मला आवडणारं उदाहरण म्हणजे ट्रेन मधले आतले आणि प्लॅटफॉर्म वरचे बाहेरचे.
या आतल्या बाहेरच्या लोकांची एक मनोवृत्ती असते. आतला पक्ष आणि बाहेरचा पक्ष. आतल्यांना बाहेरचे नको असतात आणि बाहेरचे आतल्यांचा हेवा करून पक्ष बदलण्याची वाट पहात असतात. वेगळ्या शब्दांत सांगायच झालं तर बोरिवली, कांदीवलीच्या ट्रेन मधल्या लोकांना गोरेगाव, मालाडच्या बाहेरच्या लोकांची पीडा नको असते, तर गोरेगाव, मालाडच्या लोकांना या बसून प्रवास करणाऱ्या, उलट बसून जाणाऱ्या आतल्या लोकांचा प्रचंड हेवा वाटत असतो. पण धडपडत एकदा का बाहेरचे आत घुसले की मात्र ते अचानक आतले होऊन जातात, त्यांचे पक्षांतर होते आणि मनोवृत्ती ही बदलते. या नंतर त्यांना पुढील सर्व स्थानकांवर चढणाऱ्या लोकांचा त्रास व्हायला लागतो.

पण आजच्या लेखाचा विषय तो नाही. माझ्या आतल्या बाहेरच्यांच्या संकल्पनेत मी यावेळी देशातल्या आणि देशा बाहेरच्यांना घालणार आहे. मागच्या वेळी मुंबईला जाणं झाल आणि बरेच मजेशीर अनुभव आले. त्यापैकी काही लिहून ठेवावेसे होते.

अनुभव पहिला:
जवळच रहाणारे एक काका एक दिवस पुढयात आले, "कसं काय वाटतं अमेरिकेत? आवडतं का?"
खरंतर हा प्रश्न प्रत्येक ओळखीचा मनुष्य या ना त्या प्रकारे विचारत असतो. हल्ली पुण्या मुंबईच्या हर एक ५ घरांमाजी एकजण ईंग्लंड अमेरिकेला आहे आणि त्या सर्वांनी या प्रश्नाला बरेचदा तोंड दिले असावे या बद्दल माझी पुरेपुर खात्री आहे. मला हा प्रश्न ऐकला की पोटात खड्डा पडतो, उत्तर कठीण नाही पण समोरचा कोणत्या उत्तराच्या अपेक्षेने हा प्रश्न विचारत असतो कुणास ठाऊक.

सहज "हो! आवडतना," म्हणून जावं तर समोरचा प्रतिक्रिया देतो,

"काय माणसं बघा, आपल्या देशा बद्दल, आपल्या माणसां बद्दल काही प्रेमच नाही. एकदा गेले की तिथलेच होऊन जातात. आता कायमचे गेलात तुम्ही, एकदा परदेशाची चटक लागलेला माणूस कधी परत आलाय का?"

बरं "नाही, मला नाही आवडत फारसं" म्हणावं तर पाठून ऐकू येतं,
"बिच्चारी, अगदी एकट एकट वाटत असणार तिला. काय तरी पैशाचा हव्यास? आपल्या माणसांना, आपल्या देशाला सोडून दूर रहायच आणि अस दु:खी व्हायच."
यातला एखादा जण असा विचार का नाही करत की माणूस हा सवयीचा गुलाम असतो. तो जिथे रहातो, खातो, व्यवसाय करतो, तिथे हळू हळू रुळत जातो. त्या जागेला, राहणीला आपलं मानू लागतो, मग तो मुंबई - पुण्यातून ईंग्लंड अमेरिकेला जाऊ दे नाहीतर कोकणा देशावरुन मुंबई पुण्यात येऊ दे.
या पुढचा अनुभव तर आणखीनच मजेशीर आहे.
अनुभव दुसरा:
आमच्या एक मावशी आहेत, एकदम स्पष्टवक्त्या म्हणजे कोणाची भीड भाड वगैरे ठेवणार नाहीत. मनात येईल ते सरळ बोलून मोकळ्या होणार. गुगली वगैरेच्या फंदात नाही पडणार, बाऊन्सर टाकून समोरच्याला चाट पाडणार. त्यांनी मला प्रश्न केला, "काय? करोडभर तर जमले असतील ना. बस झालं नाही का? वर घेऊन जायच्येत की काय?"

मी चाट. आमच्या भविष्याचा विचार बहुतेक या मावशी आमच्यापेक्षाही जास्त करत असाव्यात.
अनुभव तिसरा :

अशाच ओळखीच्या एक काकू आहेत. स्वभावाने गरीब, एक दिवस न रहावून त्यांनी ही विचारुन घेतलं,
"काय गं? तुम्ही ते हे खाता का गं?"
"हे म्हणजे काय हो काकू?" माझा साळसूद प्रश्न.
"बीफ, हॅम आणि काय काय मिळतं ना तिकडे."
"नाही काकू तसलं काही नाही खात आम्ही."
"बरं गं बाई, बघ हं पण आज नसाल खात पण उद्याचं काय? बाहेर राहून तुम्ही काय कराल त्याचा नेम नाही."
मनात चटकन विचार आला की येणाऱ्या जाणाऱ्या, भेटणाऱ्या प्रत्येकासाठी आता मी बाहेरची झाले आहे. ही माणसं सहज म्हणून असे प्रश्न विचारतात की मी इतकी दूर गेले आहे की त्यांच्यातील एक राहीलेच नाही. हे माझी ओळख विसरले आहेत की हा त्यांचा अविश्वास असावा? भारतात राहून घरापासून दूर ठिकाणी नोकरी करणारे, बक्कळ पैसा कमावणारे आणि मनात येईल ते खाणारे आणि वागणारे काही कमी असतील? पण ते सगळे आतले आहेत आणि मी मात्र बाहेरची.

marathi blogs