प्रकार

Saturday, February 18, 2006

तो


त्याला भेटण्याची संधी मिळेल न मिळेल या बद्दल मी कधीच विचार केला नव्हता. कुठे तो आणि कुठे मी. जगाच्या दोन टोकांवर. तशी त्याला नावाने ओळखत होते एवढचं. कधीतरी फोटोंमधेही पाहिलं होत. म्हणून काही त्याने माझं मन वगैरे जिंकलं नव्हतं. असेल कोणीतरी? त्यात काय मोठं? असं म्हणून खांदे उडवणे हीच काय ती माझी प्रतिक्रिया. पण आयुष्य मोठ विलक्षण असतं. कधी कोणाची कशी गाठ भेट घडून येईल हे विधात्यालाच माहित.

सर्व प्रथम त्याला भेटण्याचं ठरवल तेव्हाही थोडी फार उत्सुकता होती एवढच. पण आता त्याची माझी भेट ३-४ वेळा झाली आहे आणि प्रत्येक भेटीत त्याच्या विषयी अधिकाधिक ओढ निर्माण झाली आहे. अगदी पहिल्यांदा त्याच दर्शन झालं ना तेव्हा काळजाचा ठोका चुकला पण त्या नंतरच्या प्रत्येक भेटीतही एक वेगळीच धडधड मी अनुभवली आहे. प्रथम दर्शनी प्रेमावर यापूर्वी माझा कधीही विश्वास नव्हता पण त्याला पाहिलं आणि माझ्या विश्वासाला कधी तडे गेले ते कळलचं नाही. त्याला वेडावलेलं माझ मन पाखरु बनून त्याच्या अवती भवती घोटाळत राहिलय.

पण त्याला हे सगळं कुठे माहित्ये? आपल्याच मस्तीत, गुर्मीत वावरणारा तो, माझ्या सारख्या कपर्दिक व्यक्तीची तमा कशाला बाळगणार? प्रत्येक वेळी लांबून त्याचा आवाज ऐकला ना कि त्याच्याकडे धावत जाण्याची इच्छा होते. तासन तास टक लावून पाहिलय त्याला. प्रचंड गर्दीत त्याने मला एकदातरी पाहिलं असेल का? यावर अनेक वेळा विचार केलाय. मी मात्र त्याला लांबून, जवळून, उजवी कडून डावीकडून पाहिलय. डोळे विस्फारुन पाहिलय आणि डोळे मिटून ही पाहिलय. हात पुढे सरसावून त्याला स्पर्श करायचा प्रयत्नही केलाय. ओरडून त्याला "तू मला खूप खूप आवडतोस," असं सांगितलय आणि मनातल्या मनात त्याच्याशी संवाद ही साधलाय. त्याने ते ऐकलंय का नाही ऐकल याची मी कधी काळजी केली नाही. पण माझी खात्री आहे की त्याने ते ऐकलय.

त्याचा तो खळखळणारा आवाज, त्याची गुर्मी, रुबाब, ते निर्ढावलेपण, त्याचे अनेक रंग, त्याचं विशालपण मनात घर करुन राहिल आहे. त्याचं प्रत्येक रुप डोळ्यात, मनात आणि कॅमेरात साठवून घेतलं आहे. त्याच्या कुशीत शिरावं, त्याच्या स्पर्शाने ओलं चिंब होऊन जाव याची किती अनिवार इच्छा झाली आहे काय सांगू. त्याच्या या रुपाची अनामिक भीतीही मनात असते. वाटून जातं त्याच्या माझ्यात एक सुरक्षित अंतर असलेलच बरं, मनात कितीही आलं तरी त्याच्याकडे असं झोकून देणं तरी कसं शक्य आहे?

खरतरं माझा त्याच्यावर कुठलाच हक्क नाही. पण जेव्हा जेव्हा त्याला भेटणं झालं तेव्हा तो फक्त माझा असतो, माझा एकटीचा. त्याचं रुप माझ्यासाठी असतं, त्याचा तो रुद्र आवाज, त्याचं ते उग्र स्वरुप, त्याचे इंद्रधनुषी रंग सगळं सगळं काही माझ्यासाठीच असतं आणि त्या भेटीत माझ्या जगात फक्त आम्ही दोघेच असतो.... मी आणि माझा नायगारा.
Posted by Picasa

Wednesday, February 08, 2006

बाटलीतली जीनी


कसली बाटली हवी तुला?" त्याने तिला विचारले.

नाही! असे दचकू नका, तशा अर्थाने नाही विचारलं त्याने.

"नीळी, उभट, प्लास्टिकच्या बूचाची बाटली चालेल मला," तिने आपली सरळ साधी आवड व्यक्त केली.
"काहीतरीच काय? अगं तू रहाणार त्या बाटलीत, ती दिसायला सुबक, मनमोहक नको का? मी आणतो माझ्या आवडीची. तुला ही नक्की आवडेल."

"बरयं आका!" जीनीने मान डोलावली.
-----

"हे काय आका? इतक्या महागाची बाटली, माझी लायकी तरी आहे का तिच्यात रहायची?"
"अग! तुझी लायकी मला ठरवू दे, तू का काळजी करतेस?" त्याने शांतपणे म्हंटले.
"काळजी नाही आका पण थोडीशी भीती वाटते. एकदा मी बाटलीत शिरले की मी माझा आकार, माझं अस्तित्व तर नाही ना गमवून बसणार?"
"हे बघ, तू आपणहून माझी गुलामी स्विकारलीस ना! मग आता आढेवेढे कसले घेतेस?" त्याने वैतागून विचारले.
जीनी हिरमुसली झाली. आपण थोडा आणखी विचार करायला हवा होता अस म्हणून हळूच बाटलीत शिरली.

-------

"खूप आवडतेस तू मला जीनी. तुझ्याशिवाय इतके दिवस कसा जगलो काय माहित. पण तू आयुष्यात आलीस आणि सगळच कसं बदलून गेलं बघ."

आज स्वारी भारीच खुशीत दिसतेय, जीनी खुदकन हसली.

"अशीच हसत रहा, फार गोड दिसतेस."

"आज क्या मुझे बोतल में उतार रहे हो?" जीनी लटक्या रागाने म्हणाली.

"अग तुला बाटलीत उतरवल्याला बरेच दिवस होऊन गेले," त्याने हसत उत्तर दिले.
-------

"आज रात्री पार्टी आहे ऑफिसची, जीनी...तुझा आवडता ड्रेस घालून तयार रहा."

"जसा हुकूम, आका!"

"नको नको, नाहीतर असं करुया मीच येताना एक नवीन ड्रेस घेऊन येतो. तुझ्या आवडीचे सगळे ड्रेस कसले झिरझिरित असतात. आमचा बॉस ना थोडा 'हा' मनुष्य आहे. तू दिवसभर बाटलीत, तुला कल्पना नाही बाहेरच्या जगाची. अगदी निष्पाप आहेस तू."

"बरयं आका!"
आपल्या आकाना आपल्यापेक्षा खचितच जास्त अक्कल आहे या बाबत जीनीचे दुमत नव्हते. पण तरी तिला उगीचच वाटून गेले, "इतकी काय वाईट आहे माझी आवड?"
-------

बाटलीतून बाहेर पडून जीनीने आळोखे पीळोखे दिले.

"हे काय किती उशीर? आज तीन दिवसांनी बाटली उघडालीत तुम्ही आका. अंग कसं आखडून गेलं आहे. कित्ती कित्ती म्हणून वाट पाहिली तुमची. पण तुमचा काही पत्ताच नाही," जीनी नाराजीने म्हणाली.

"काम होत. सारखा घराबाहेर होतो आणि नाही जमलं बघ," त्याने उत्तर दिले. "आता फुरंगटून बसू नकोस. पण रोज रोज तुला असं बाटलीतून बाहेर काढणं आताशा कठिण होतयं. मलाही विचारणारी माणसं आहेत. तुझी जादू त्यांच्या लक्षात नको यायला."

"हो तर! प्रत्येक गोष्टीची कारणं तुमच्याकडे अगदी तयार असतात," जीनी रडवेली होऊन म्हणाली.
-------

"हे काय करुन ठेवल आहेस जीनी?" त्याने तावातावाने विचारले.
"मला वाटलं की फर्निचरची जागा बदलावी, घराला कसा वेगळेपणा येतो." जीनीने हसून उत्तर दिले.
"तू जादूची कांडी फिरवून कामं करतेस ते ठिक आहे पण मला विचारल्या शिवाय नको ते उद्योग करायला कोणी सांगितलय तुला. जेवढ मी सांगतो तेवढच करत जा यापुढे," त्याने जरा रागानेच म्हंटल.
"मी आज कांडी नव्हती फिरवली आका. स्वत:हून घराची रचना बदलली. मला वाटलं तुम्हाला आवडेल." जीनीने पडक्या स्वरांत आपली बाजू मांडली.
"हे बघ तुला काय वाटत ते तुझ्याकडेच ठेव. परत असले उद्योग केलेस तर तुझ्यासकट बाटली समुद्रात भिरकावून देईन."
--------

आज जीनीचा मूड काही औरच होता. तिने आज काही म्हणून ऐकून घ्यायच नाही असं ठरवल होतं. खरतर आज बऱ्याच दिवसांनी तिला बाहेर पडायची संधी मिळाली होती.
सगळ्या सामानाची तिने उलथापालथ करुन ठेवली.
"आज मी पण बघणार आहे काय होतं ते. कंटाळून गेलेय या रोजच्या गुलामगिरीला," मनाशी पुटपुटत जीनी आपल्या बाटलीत अंतर्धान पावली.
संध्याकाळी घरी आल्यावर घराची अवस्था पाहून तो हबकून गेला. झाला प्रकार लक्षात आला तशी तो बाटली घेऊन सरळ घराबाहेर पडला आणि समुद्रावर गेला. एकदा हळूवारपणे त्याने बाटलीवरुन हात फिरवला आणि सरळ बाटली समुद्रात भिरकावून दिली.
------

ही गोष्ट माझी तुमची आहे. थोडया फेरफाराने त्यात कोणतीही नाती घाला. मित्र - मित्र, मित्र- मैत्रिण, नवरा-बायको, मालक - नोकर अगदी शिक्षक - विद्यार्थीही. यात चुकत कोणीही नसतो. मालक मालकासारखा वागतो आणि गुलाम गुलामा सारखा. गोष्टीतला "आका" कोण आणि "जीनी" कोण हे मात्र ज्याचं त्याने ठरवायचं.

Saturday, February 04, 2006

आतले आणि बाहेरचे

जगात अनेक प्रकारचे लोक आहेत. अनेक रंगांचे, धर्माचे, जातींचे, व्यवसायाचे वगैरे. यात एक फारसा उठून न दिसणारा पण सर्वत्र आढळणारा एक प्रकार आहे. "आतले आणि बाहेरचे". तसा आपल्याला हा प्रकार नवा नाहीच. मी ही काही हा जावईशोध लावलेला नाही. खरं सांगायच झालं तर शाळेत असताना एक धडा होता, अगदी याच नावाचा "आतले आणि बाहेरचे".

या आतल्या बाहेरच्यांची अनेक उदहरणे आपल्याला माहित असतीलच, जस की घरातले - घरा बाहेरचे, देशांतले - देशाबाहेरचे. मला आवडणारं उदाहरण म्हणजे ट्रेन मधले आतले आणि प्लॅटफॉर्म वरचे बाहेरचे.
या आतल्या बाहेरच्या लोकांची एक मनोवृत्ती असते. आतला पक्ष आणि बाहेरचा पक्ष. आतल्यांना बाहेरचे नको असतात आणि बाहेरचे आतल्यांचा हेवा करून पक्ष बदलण्याची वाट पहात असतात. वेगळ्या शब्दांत सांगायच झालं तर बोरिवली, कांदीवलीच्या ट्रेन मधल्या लोकांना गोरेगाव, मालाडच्या बाहेरच्या लोकांची पीडा नको असते, तर गोरेगाव, मालाडच्या लोकांना या बसून प्रवास करणाऱ्या, उलट बसून जाणाऱ्या आतल्या लोकांचा प्रचंड हेवा वाटत असतो. पण धडपडत एकदा का बाहेरचे आत घुसले की मात्र ते अचानक आतले होऊन जातात, त्यांचे पक्षांतर होते आणि मनोवृत्ती ही बदलते. या नंतर त्यांना पुढील सर्व स्थानकांवर चढणाऱ्या लोकांचा त्रास व्हायला लागतो.

पण आजच्या लेखाचा विषय तो नाही. माझ्या आतल्या बाहेरच्यांच्या संकल्पनेत मी यावेळी देशातल्या आणि देशा बाहेरच्यांना घालणार आहे. मागच्या वेळी मुंबईला जाणं झाल आणि बरेच मजेशीर अनुभव आले. त्यापैकी काही लिहून ठेवावेसे होते.

अनुभव पहिला:
जवळच रहाणारे एक काका एक दिवस पुढयात आले, "कसं काय वाटतं अमेरिकेत? आवडतं का?"
खरंतर हा प्रश्न प्रत्येक ओळखीचा मनुष्य या ना त्या प्रकारे विचारत असतो. हल्ली पुण्या मुंबईच्या हर एक ५ घरांमाजी एकजण ईंग्लंड अमेरिकेला आहे आणि त्या सर्वांनी या प्रश्नाला बरेचदा तोंड दिले असावे या बद्दल माझी पुरेपुर खात्री आहे. मला हा प्रश्न ऐकला की पोटात खड्डा पडतो, उत्तर कठीण नाही पण समोरचा कोणत्या उत्तराच्या अपेक्षेने हा प्रश्न विचारत असतो कुणास ठाऊक.

सहज "हो! आवडतना," म्हणून जावं तर समोरचा प्रतिक्रिया देतो,

"काय माणसं बघा, आपल्या देशा बद्दल, आपल्या माणसां बद्दल काही प्रेमच नाही. एकदा गेले की तिथलेच होऊन जातात. आता कायमचे गेलात तुम्ही, एकदा परदेशाची चटक लागलेला माणूस कधी परत आलाय का?"

बरं "नाही, मला नाही आवडत फारसं" म्हणावं तर पाठून ऐकू येतं,
"बिच्चारी, अगदी एकट एकट वाटत असणार तिला. काय तरी पैशाचा हव्यास? आपल्या माणसांना, आपल्या देशाला सोडून दूर रहायच आणि अस दु:खी व्हायच."
यातला एखादा जण असा विचार का नाही करत की माणूस हा सवयीचा गुलाम असतो. तो जिथे रहातो, खातो, व्यवसाय करतो, तिथे हळू हळू रुळत जातो. त्या जागेला, राहणीला आपलं मानू लागतो, मग तो मुंबई - पुण्यातून ईंग्लंड अमेरिकेला जाऊ दे नाहीतर कोकणा देशावरुन मुंबई पुण्यात येऊ दे.
या पुढचा अनुभव तर आणखीनच मजेशीर आहे.
अनुभव दुसरा:
आमच्या एक मावशी आहेत, एकदम स्पष्टवक्त्या म्हणजे कोणाची भीड भाड वगैरे ठेवणार नाहीत. मनात येईल ते सरळ बोलून मोकळ्या होणार. गुगली वगैरेच्या फंदात नाही पडणार, बाऊन्सर टाकून समोरच्याला चाट पाडणार. त्यांनी मला प्रश्न केला, "काय? करोडभर तर जमले असतील ना. बस झालं नाही का? वर घेऊन जायच्येत की काय?"

मी चाट. आमच्या भविष्याचा विचार बहुतेक या मावशी आमच्यापेक्षाही जास्त करत असाव्यात.
अनुभव तिसरा :

अशाच ओळखीच्या एक काकू आहेत. स्वभावाने गरीब, एक दिवस न रहावून त्यांनी ही विचारुन घेतलं,
"काय गं? तुम्ही ते हे खाता का गं?"
"हे म्हणजे काय हो काकू?" माझा साळसूद प्रश्न.
"बीफ, हॅम आणि काय काय मिळतं ना तिकडे."
"नाही काकू तसलं काही नाही खात आम्ही."
"बरं गं बाई, बघ हं पण आज नसाल खात पण उद्याचं काय? बाहेर राहून तुम्ही काय कराल त्याचा नेम नाही."
मनात चटकन विचार आला की येणाऱ्या जाणाऱ्या, भेटणाऱ्या प्रत्येकासाठी आता मी बाहेरची झाले आहे. ही माणसं सहज म्हणून असे प्रश्न विचारतात की मी इतकी दूर गेले आहे की त्यांच्यातील एक राहीलेच नाही. हे माझी ओळख विसरले आहेत की हा त्यांचा अविश्वास असावा? भारतात राहून घरापासून दूर ठिकाणी नोकरी करणारे, बक्कळ पैसा कमावणारे आणि मनात येईल ते खाणारे आणि वागणारे काही कमी असतील? पण ते सगळे आतले आहेत आणि मी मात्र बाहेरची.

marathi blogs