प्रकार

Thursday, March 09, 2006

भीती

प्रसादच्या प्रासादीकवर नुकतीच एक प्रतिक्रिया टाकली होती, त्याचा धन्यवादही मला लागोलाग मिळाला. पुन्हा प्रतिक्रिया लिहिण्यापेक्षा एक छोटासा ब्लॉग लिहिणे जास्त सोयिस्कर आहे.

विषय होता भीती बद्दल. प्रसादच्या काही ओळी इथे पुन्हा लिहिते.

जिथे न्यायव्यवस्था पोचू शकत नाही तिथे कमीत कमी ही भीती उपयोगी ठरते. कोणी पहात नाही म्हणल्यावर एखादी चूक करायला कोणी कचरत नाही. साधच उदाहरण घ्यायचं तर मामा नसेल तेव्हाही सिग्नल पाळणारे थोडेच. एकंदरीत काय तर समाजव्यवस्था निरोगी ठेवायला पूर्वीच्या लोकानीं केलेली ही योजना असावी.

------
अगदी खरयं. नेहमी असच होतं. भीतीचा बडगा आणि भीतीचा पगडा नेहमीच काम करुन जातो. एवढच नाही तर अनादी काळापासून माणसाला भीती दाखवण्याची कला उत्तम जमलेली आहे. समाज, कुटुंब आणि व्यक्तीगत जीवनातही भीती उत्तम कार्यभाग साधते.चूक बरोबर करण्याच्या फंदात पडण्यापेक्षा एक उदाहरण देते.

नव्याने मी अमेरिकेला आले तेव्हा प्रत्येक स्टॉप साईनवर इमाने इतबारे गाडी थांबविणाऱ्या तसचं सिग्नलला यील्ड करणाऱ्या लोकांच मला अतिशय कौतुक वाटायच. आपल्या देशात असं होणं शक्य आहे का? अजून बरीच वर्षे तरी नाही. हा माझा आशा आणि निराशावाद दोन्ही आहे.
भीती हा यातला अविभाज्य भाग आहेच. पण इथे केवळ भीती नाही. सामाजिक बांधिलकीची जाणिव देखिल आहे. प्रत्येक वेळी पोलिसची कार उभी नसते पण तरीही घाईतला प्रत्येक मनुष्य नियम पाळतो. यात भीतीपेक्षा आपल्या 'सिस्टीम' बद्दल आदर आणि विश्वास मला दिसला.

माझं असं प्रामाणिक मत आहे की भीती फार काळ टिकत नाही. मग ती हवालदाराची असो, हुकुमशहाची असो नाहीतर घरात आई वडिलांची असो. कुठल्या न कुठल्या प्रकारे ती उलथुन टाकण्याचा प्रयत्न होतोच. टिकते ती श्रद्धा आणि विश्वास.

1 comment:

Anonymous said...

भीती फार काळ टिकत नाही. मग ती हवालदाराची असो, हुकुमशहाची असो नाहीतर घरात आई वडिलांची असो. कुठल्या न कुठल्या प्रकारे ती उलथुन टाकण्याचा प्रयत्न होतोच. टिकते ती श्रद्धा आणि विश्वास.

ekdam patal
Prachi

marathi blogs