प्रकार

Showing posts with label स्फुट. Show all posts
Showing posts with label स्फुट. Show all posts

Monday, December 24, 2012

आठच्या आत घरात...


"मुलींनी रात्री आठनंतर घराबाहेर पडू नये."

"
बरोबर आहे. ही सावधगिरीची सूचना आहे. मुंबई किंवा शिकागो-न्यूयॉर्कच्या वाईट भागांत पुरुषांनीही रात्री बेरात्री एकटे दुकटे फिरू नये. जर कायदा रक्षण करू शकत नसेल तर आपण सुरक्षेचे सर्व उपाय अवलंबवायला हवेत."

“हो पण एखाद्या कुप्रसिद्ध एरियात न जाणे आणि राजरोस सर्वत्रच आठनंतर बाहेर न पडण्याची सक्ती येणे यांत काहीतरी फरक आहे ना.”

“असला तरी सावधगिरी बाळगण्यात काही चूक आहे का?”

"
खरंय पण मला कॉल सेंटरमध्ये नाइट ड्यूटी असते."

"
मग दुसरा जॉब बघ."

"
पण माझी मैत्रिण डॉक्टर आहे. तिलाही नाइट शिफ्ट्स असतात."

"
हॉस्पिटलने त्यांची रात्री राहण्याची सोय करावी. ते शक्य नसल्यास तिनेही हा जॉब करू नये. सुरक्षितता नाही ना तिथे."

"
पण माझी तिसरी मैत्रिण पत्रकार आहे. तिलाही रात्री बेरात्री न्यूज कवर कराव्या लागतात."

"
मला वाटतं या परिस्थितीत तिने या जॉबला तिलांजली द्यावी किंवा रात्रीबेरात्री ज्या न्यूज कवर कराव्या लागतात त्यांची जबाबदारी घेऊ नये."

“म्हणजे?”

“पाककृती, फ्याशन, मुलांचे संगोपन, मुलाखती, अनाथाश्रम-वृद्धाश्रमांना भेटी असे विषय तिला कवर करता येतीलच की.”

"
पण माझ्या आणखीही मैत्रिणी आहेत. काही आयटीत आहेत. त्याही रात्री बेरात्री प्रोजेक्ट्ची डेडलाईन पूर्ण करतात, एक सिरिअल्समध्ये कामं करते. तिचीही शूटींग्ज दिवसात उशीरा असतात आणि एक तर आयपीएस आहे."

"
हो हो पण मी म्हणालो ना आधी की या परिस्थितीत रात्री आठनंतर घराबाहेर पडणे योग्य नाही. मध्यंतरी महिला कॉन्स्टेबल्स सोबत काय झाले होते ते विसरलीस का? स्त्रिया या देशात सुरक्षित नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा काळजी घेतलेली बरी एवढेच मला म्हणायचे आहे."

"
म्हणजे रात्री आठनंतर लांडगे रस्त्यांवर फिरतात असे समजायचे?"

"
दुर्दैवाने तशी परिस्थिती निर्माण झालीये खरी."

"
पण मग आता रात्री आठनंतर बायका दिसत नाही म्हटल्यावर लांडगे संध्याकाळी सहालाच सावज शोधायला बाहेर पडले तर? जंगली श्वापदे नाही का... त्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले की रानाबाहेर पडून इतरांवर हल्ले करत... तसेच."

"
हम्म! माहित नाही बुवा. मध्ययुगीन पडदापद्धती कशी वाटते? नाही सुरक्षिततेसाठी अशा पर्यायांचाही विचार करून ठेवू सध्या."
“असे असेल तर स्त्रीभ्रूणहत्येचा मार्गच काय वाईट आहे? सशा आणि लांडग्यांच्या दुनियेत बायांनी जन्मच तरी का घ्यावा?”

Monday, May 07, 2012

सत्यमेव जयते... वेगळे काय?


काल आमीर खानचा सत्यमेव जयते मुद्दाम वेळ काढून पाहिला. सादरीकरण, संचलन, सुसूत्रता, पार्श्वसंगीत या सर्वच बाबतील कार्यक्रम उजवा होता. कार्यक्रम वस्तुस्थितीला धरून होता, ऑफ-ट्रॅक झाला नाही. आमीरचा संयत चेहरा, त्याचे ते विचारात पडणे, हलकेच डोळे टिपणे वगैरे अनेकांना अभिनय वाटेल असे बेगडी नसल्याने कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला. मध्यमवर्गाला लक्ष्य करून हा कार्यक्रम बनवला आहे हे सतत जाणवत राहिले. रविवारी सकाळी लोकांना जेव्हा महाभारत, रामायण वगैरेंसारख्या मालिका कुटुंबासहित एकत्र पाहण्याची सवय आहे त्या कार्यक्रमांमध्ये हा कार्यक्रम थोडा तापदायक वाटू शकेल किंवा संपूर्ण कुटुंबाने आनंद घेण्याजोगा नसल्याने कालांतराने पाहाणे कमी होईल का असे प्रश्नही पडले. या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. तूर्तास, एक चांगला कार्यक्रम प्रस्तृत केल्याबद्दल या चमूचे अभिनंदन करावेसे वाटते.

यापुढे विचार करायचा झाल्यास या कार्यक्रमात वेगळेपणा तो काय? रजनी या प्रसिद्ध मालिकेतून लोकांचे प्रश्न सोडवल्यावर प्रिया तेंडूलकर यांचा टॉक-शो एकेकाळी प्रसिद्ध झाला होता. समाजातील नानाविध प्रश्नांवर बोट ठेवणारा हा कार्यक्रम पिडितांच्या मुलाखती, बोलावलेले मान्यवर आणि त्यांनी मांडलेले विचार, लोकांनी विचारलेले प्रश्न वगैरे प्रकारांतून प्रसिद्ध झाला होता. लोक आवडीने हा कार्यक्रम पाहात पण म्हणून त्याने समाजावर फार मोठा परिणाम झाला असे म्हणता येत नाही. यानंतर टिव्हीवर असे अनेक कार्यक्रम येऊन गेले असावे. २४ तास बातम्यांच्या वाहिन्यांवर अशा प्रकारची "स्टींग ऑपरेशन्स" अनेकदा दाखवली जातात. परंतु कार्यक्रमांचे सादरीकरण अतिशय बटबटीत असते असा अनुभव आहे. प्रेक्षकांना हळहळ वाटण्यापेक्षा डोकेदुखी होईल किंवा प्रसंगाचे गांभीर्य समजण्यापेक्षा हसू येईल अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर आमीरचा कार्यक्रम वेगळा असला तरी नवा नक्कीच नाही.

मग या कार्यक्रमात नवीन ते काय? नवीन एवढेच की या पूर्वी सर्व सुपरस्टार्सनी ढमाढम पैसे घेऊन गेम-शो सादर केले आहेत. त्याऐवजी आमीरने एका वेगळ्या धर्तीच्या कार्यक्रमातून लहान पडद्यावर आगमन केले आणि एक नवी गोष्ट अशी झाली की प्रश्नांबरोबर प्रश्नांवर उपाय शोधण्याची किंवा ते तडीस नेण्याची आशा आमीरने दाखवली. परंतु ही आशा कितपत खरी हे अद्याप कळत नाही. राजस्थान सरकार खरेच का एसएमएस पाठवल्याने स्त्रीभृणहत्येच्या केसेस फास्टट्रॅक कोर्टात नेणार आहे? लोकपाल विधेयकाचे काय झाले हे आपल्यासमोर आहे.


भारतातील मध्यमवर्गाला एक मसिहा हवा आहे. मध्यंतरी अण्णा हजारेंच्या रुपात तो मसिहा आपल्याला मिळतो आहे अशी अनेकांची धारणा झाली होती. या धारणेने जे सर्वव्यापी स्वरूप घेतले होते त्याचे कालांतराने काय झाले हे सर्वांनी पाहिले. लोकांना काहीतरी इन्स्टंट करून हवे आहे, ताबडतोब निर्णय हवा आहे परंतु असे काही करण्याची क्षमता अण्णा आणि आमीर या दोघांकडे नसावी. किंबहुना, असे काही करण्याचा आमीरचा प्रयत्न आहे असेही नसेल आणि तसे नसल्यास लोकांचा भ्रमनिरास निश्चित आहे.

सेलिब्रिटींनी अशाप्रकारे सामाजिक कार्यात भाग घ्यावा का याचे उत्तर निश्चितच "हो" असे आहे. त्यांचे फॅन फॉलोइंग लक्षात घेता, त्यांच्या तोंडून निघणारे शब्द झेलायला तयार असणारे लोक निश्चितच मिळतील आणि मिळतात. त्यातून काहीजणांचे मनपरिवर्तन होणे शक्य वाटते परंतु स्वार्थ प्रत्येकाला प्यारा आहे आणि तो निश्चितच आमीर खानपेक्षा प्यारा आहे हे विसरता येत नाही. याचसोबत, टिव्हीवर कार्यक्रम दाखवल्याने, भरपूर प्रायोजक मिळवल्याने समाजसुधारणा होईल असेही म्हणता येत नाही आणि अशी चटकन समाजसुधारणा होणार नाही हे जाणण्याइतपत आमीर सूज्ञ वाटतो. या कार्यक्रमात वेगळे काहीच नाही, तसे काही दाखवायचा प्रयत्न नाही असा सूर असल्यास ज्याप्रकारे प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उचलून धरल्याचे लक्षात येते आहे त्यामागील प्रेक्षकांची भूमिका काय असावी असा प्रश्न पडतोच.

सदर कार्यक्रमातून जाणवलेल्या, खटकलेल्या काही गोष्टी अशा की हा कार्यक्रम ज्या वेळेत दाखवला जातो ती वेळ रविवार सकाळ असल्याने संपूर्णतः कौटुंबिक वेळ आहे. यांतील काही कार्यक्रम लहानमुलांसाठी योग्य असतीलच असे नाही. काही दृश्ये अस्वस्थ करणारी होती. त्या दृश्यांबाबत पूर्वसूचना देण्याचे कसे काय सुचले नाही याचे आश्चर्य वाटले. ही दृश्ये कार्यक्रमाच्या टीआरपीला मारक ठरू नयेत अशी अपेक्षा. तसेच, संपूर्ण कार्यक्रमात दुसरी बाजू दिसली नाही. ज्याप्रमाणे पिडीत बायकांना बोलावले गेले होते त्याप्रमाणे पिडा देणार्‍यांनाही बोलायला लावले असते किंवा त्यांना बोलावून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला असता तर आवडले असते. "पीअर प्रेशर" हा आपल्या समाजाचा एक मोठा भाग आहे. मुलगा हवा असा धोशा लावणार्‍यांनाही तो कामी येतो आणि त्याविरुद्ध त्यांची निंदा करायची झाल्यासही तोच कामी येईल.

कायदा आणि सुव्यवस्था जोपर्यंत बळकट होत नाही, लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि ती भीती वाटण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी त्वरित होत नाही तोपर्यंत ओवरऑल वस्तुस्थितीत फारसा फरक पडेल असे वाटत नाही आणि तूर्तास तरी भारतातील उदासीन मध्यमवर्गाला जागवण्याची क्षमता या कार्यक्रमात असल्याचे दिसले नाही. परंतु, माणसाने आशावादी राहावे या तत्त्वावर आमीरला पुन्हा एकदा शुभेच्छा!

Saturday, January 17, 2009

दयामरण हवे का नको?

आजचा सुधारकमध्ये श्रीमती मंजिरी घाटपांडे यांचा दयामरणाला अनुमती देण्याबद्दल लेख प्रकाशित झाला होता. तो येथेही वाचता येईल. त्या लेखाला प्रतिक्रिया म्हणून माझी अंकात प्रकाशित झालेली प्रतिक्रिया येथे देत आहे.




सर्वप्रथम, मंजिरीताईंचे एका चांगल्या लेखाबद्दल आणि वेगळ्या विचारांवर मत मांडण्यास उद्युक्त केल्याबद्दल धन्यवाद.

मरण हे एकमेव शाश्वत सत्य आहे असे मानले तरी सतत मरणाचा विचार करून मनुष्य जगत नाही हे देखील सत्यच आहे. वेळ-काळ योजून जनन नियोजीत करता येते त्याप्रमाणे माणसाला मरणही नियोजीत करता यावे, तो हक्क त्याला बहाल करण्यात यावा यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले आहेत पण त्याला बहुतांशवेळा अपयशच मिळाले आहे. मरण नियोजीत करण्याचे इच्छामरण आणि दयामरण या दोन वेगळे प्रकार आहेत असे वाटते.

इच्छामरण

इच्छामरण मागण्यासाठी/ अवंलबण्यासाठी मनुष्य हा मानसिक दृष्टीने सक्षम असायला हवा. आपण स्वेच्छामरणाचा निर्णय घेतो आहोत यावर त्याचा ठाम विश्वास असायला हवा. सदर कृत्य तो एखाद्याच्या सांगण्यावरून किंवा भरीला पडल्याने करत नाही हे त्याला सिद्ध करून देता यावे. सदर निर्णय झटक्यात घेता येणार नाही हे लक्षात घेता, व्यावहारिक दृष्ट्या ही गोष्ट किंचित कठीण वाटते.

आत्महत्या हा पलायनवाद झाला. अत्यंत निराशेपोटी माणूस तो अवलंबतो परंतु त्याचे कोणत्याही प्रकारे समर्थन अयोग्य वाटते. इच्छामरणाला आत्महत्या म्हणावे का याबाबत साशंकता वाटते. आत्महत्याही बहुधा गुप्तता राखून किंवा मागचा पुढचा विचार न करता झटक्यात घेतलेल्या निर्णयाने केली जाते. इच्छामरणासाठी आपली आणि आपल्या आप्तांची मनाची तयारी करून देणे गरजेचे वाटते. भीष्म पितामहांनी जे अवलंबिले ते इच्छामरण कारण शरशय्येवरूनही ते पांडवांना उपदेश करत राहिले, इतरांना पूर्ण कल्पना देऊन प्राण त्यागला.

सावरकरांचे मरण हे इच्छामरणच असावे. अशाप्रकारचे मरण अवलंबताना मी आणखीही काही वृद्धांना पाहिले आहे. त्यांची वासना कमी होत जाऊन अन्नपाण्याचा त्याग केला जातो हे समाजात घडताना पाहिले आहे. त्यावर कायदा आक्षेप घेतो असे दिसत नाही. परंतु हे न होता, आपले मरण इतरांनी आपल्याला बहाल करावे असा विचार म्हणजे इतरांकडून आपला खून करवून घेणे आहे असे वाटते.

दुर्गाबाईंनी म्हटल्याप्रमाणे

ज्याच्या नशीबाला असह्य शारिरीक वेदना आहेत; ज्याच्या मानसिक भौतिक संवेदनांचा अंतच झालेला आहे, किंवा ज्याचं जगुन संपल आहे त्याला जर सुटका हवी असेल, तर त्याला लोळत घोळत दीनवाणे मरण येण्यापेक्षा, सन्मानाने विनायातना चटकन मरण येणं हा त्याचा हक्क आहे असे मी मानते.

प्रत्येक माणसाची सहनशक्ती वेगवेगळी असते. कॅन्सरमुळे होणार्‍या असह्य वेदनांतून जाणारी आणि तरीही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणारी एक लहान मुलगी मी पाहिली आहे तर मायग्रेनमुळे जीव द्यावासा वाटतो म्हणणारी प्रौढ माणसंही पाहिली आहेत. यावरून शारिरीक वेदनांचे आणि सहनशक्तीचे मापदंड ठरवणे हे कठीण काम वाटते. दुसरं म्हणजे, विनायातना मरण यावं ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु वैद्यकी पेशाला ती साजेशी गोष्ट वाटत नाही. खुट्ट झाले की मरण पाहिजे असे लोक म्हणू लागले तर वैद्यकशास्त्राचा हा पराभव मानावा लागेल. वैद्यकशास्त्र सहसा माणसाचे जीवन सुकर व्हावे या हेतूने कार्य करते.

एखाद्याचे जगून संपलं आहे हे तरी कितपत खरे? अमेरिकेत राहून ८० वर्षांचे वृद्ध प्रवास करतात, खेळतात, प्रेमात पडतात, लग्न करतात त्यांचे मला अतिशय कौतुक वाटते. एकदाच मिळालेल्या आयुष्याचा उपभोग ते अद्यापही घेत आहेत याची जाणीव होते. जगात थोड्या अधिक फरकाने प्रत्येकाला आपण आणि आपले आप्त हे अमरत्वाचा पट्टा घेऊन अवतरले आहेत असे वाटत असते. आपल्या मृत्युची घटका जवळ आल्याचे लक्षात येताच ती लांबवावी कशी याचा विचार सर्वसामान्य माणसांच्या मनात येतो. आयुष्यात कधीतरी निराशेपोटी मरणाचा विचार मनात आला तरी प्रत्यक्ष आत्महत्येपर्यंत पोहोचणारी माणसे अतिशय थोडकी असतात आणि एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला/ फसला म्हणून पुन्हा पुन्हा करणारी त्याहूनही कमी असतात आणि जी असतात त्यांना मानसिक व्याधी असल्याचे मानले जाते.

लेखात आलेल्या सॉक्रेटिसच्या उदाहरणावरून पाश्चात्य जगात आत्महत्येला प्रतिष्ठा होती असे वाटत नाही. सॉक्रेटिसला मृत्युदंडाची शिक्षा झाली होती आणि तीतून सुटण्याचे मार्ग नाकारत त्याने दिले गेलेले हेम्लॉक प्याले अशी कथा वाचण्यास मिळते. समाधी या मृत्युला मात्र प्रतिष्ठा असावी परंतु ती देखील संन्यास घेतलेल्यांसाठीच मर्यादीत असावी असे वाटते. अशाप्रकारे जपानमधील सामुराई योद्ध्यांनाही प्रसंगी आपले प्राण घेण्याचे शिक्षण दिले जाई परंतु तेही त्या गटापुरतेच मर्यादित वाटते आणि समाज संकल्पना वाटत नाही.

दयामरण

दयामरणाचे मला वाटतं दोन प्रकार असतात - स्वसंमतीने मागितलेले दयामरण आणि परसंमतीने अंमलात आणलेले दयामरण. यापैकी स्वसंमतीने मागितलेले दयामरण हे इच्छामरणाशी जुळते वाटते. परसंमतीने अंमलात येणार्‍या मरणाबद्दल मात्र कायद्याने अनेक बंधने येतात. ब्रेनडेथ, मरगळलेल्या भाजीसारख्या किंवा तत्सम अवस्थेत असलेल्या रुग्णाला डॉक्टर्स, कुटुंबीय आणि कायदा यांच्या सहाय्याने दयामरण देणे एकवेळ ठीक वाटते परंतु अशक्यप्राय परिस्थितीतूनही परत येणारे रुग्ण आहेतच.

पुन्हा येथे सांगावेसे वाटते की जननात हस्तक्षेप झाला म्हणून मरणात हस्तक्षेप करावा ही वैद्यकशास्त्रामागील शुद्ध हेतूची धारणा नसावी (चू. भू. दे. घे.) येथेही मरणासन्न जीवाला दयामरण द्यायचे झाले तर कोणता मार्ग अवलंबला पाहिजे यावर मतभेद दिसतात. मरणप्राय रुग्णाचा जीवनाधार काढून घेणे हे डॉक्टरने करणे म्हणजे फाशीची शिक्षा अंमलात आणणार्‍या जल्लादाप्रमाणे झाले असा मतप्रवाह दिसतो. तर, देण्यात येणारे उपचार हळू हळू कमी करून मृत्यु द्यावा असा दुसरा विचारप्रवाह दिसतो.


संपूर्ण प्रतिसादाचा गोषवारा इतकाच की स्वेच्छामरण/ इच्छामरण या कल्पना सुखदायी वाटल्या तरी कायद्याच्या आणि समाजाच्या दृष्टीने त्यात बर्‍याच अडचणी निर्माण होणे शक्य आहे आणि जगातील कोणताही समाज अद्याप या कल्पना राबवण्यास तयार आहे असे वाटत नाही.

Wednesday, October 15, 2008

कुमारी देवी

ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.

http://www.news.com.au/heraldsun/story/0,21985,24467194-663,00.html

कुमारी देवीची प्रथा नेपाळात फार प्राचीन नसल्याचे सांगितले जाते. सुमारे १२ व्या ते १७ व्या शतकांदरम्यान कधीतरी ही प्रथा अस्तित्वात आली. आख्यायिकेनुसार नेपाळी राजाशी दुर्गास्वरुप देवता खाजगीत सारिपाट खेळण्यास येत असे. याचा पत्ता कोणालाही नव्हता. एकदा राणीला कुणकुण लागल्याने तिने राजावर पाळत ठेवली आणि राजाला भेटायला देवी आल्यावर ती सामोरी गेली. याप्रकाराने देवी क्रोधित झाली आणि तिने राजाची कानउघडणी केली. लुप्त होण्यापूर्वी तिने राजाला सांगितले की जर राजाला तिला पुन्हा भेटायची इच्छा झाली तर ती शाक्य समाजात सापडेल. (गौतम बुद्ध हा शाक्य होता)

तेव्हापासून शाक्य समाजातील लहान मुलींना त्यांचा मासिक धर्म येण्यापूर्वी कुमारी देवी म्हणून निवडले जाते. दलाई लामा किंवा पंचेन लामा यांचा शोध घेताना जसे प्रयत्न केले जातात त्याप्रमाणेच ही देवी शोधण्यासाठीही अनेक विधी, प्रयत्न करावे लागतात आणि अनेक अटींची पूर्तता करावी लागते जसे -

तिची पत्रिका तपासली जाते. या मुलीला कधीही शारिरीक जखम झालेली नसली पाहिजे. तिचे दात पडलेले नकोत. ते २० असायला हवेत. तिचा आवाज, चालणे, बोलणे, केस, डोळे, शरीर अशी बत्तीस लक्षणे तपासली जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिला अंधाराची भीती नाही हे तपासले जाते आणि मग तिची सर्वात कठिण परीक्षा घेतली जाते. कुमारी मातेच्या मंदिराच्या प्रांगणात रेडे आणि बोकडांचे बळी देऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या मुंडक्यांवर दिवे लावून मुखवटेधारी व्यक्ती नृत्य करतात आणि या ठिकाणी या लहान मुलीला एकटे सोडले जाते. ती घाबरली नाही तर तिला नंतर संपूर्ण रात्र या बळी दिलेल्या प्राण्यांच्या मुंडक्यासमवेत घालवावी लागते. ही मुलगी न घाबरता, न रडता तिथे रात्रभर राहीली तर कुमारी देवी म्हणून तिची निवड होते.

kumari devi


यानंतर तिला कुटुंबापासून वेगळे, कुमारी देवीच्या मंदिरात ठेवले जाते. तिच्या कपाळावर देवीचा तिसरा नेत्र आरेखला जातो. तिची पूजा केली जाते. लोक कुमारीचौकात गर्दी करून तिचे दर्शन घेतात. दर्शन घेताना तिच्या पाया पडतात. दर्शनाच्या वेळेस देवीचे लहान मुलीसारखे वागणे जसे, टाळ्या वाजवणे, हसणे, रडणे, ओरडणे, आणलेल्या नैवेद्याकडे आशेने पाहणे भक्तांवर संकटे आणते असा समज आहे. या उलट, देवीने शांतपणे नमस्कार, नैवेद्याचा स्वीकार केला तर देवी पावते असा समज आहे. चांगली वस्त्रे, कपडे, मान या वातावरणात वाढणार्‍या मुलींना मासिकपाळी आल्यावर देवी त्यांचे शरीर सोडून जाते आणि या सर्व सुखसोयींपासून त्यांना अचानक वंचित व्हावे लागते.

यानंतर त्यांना दरवर्षी सरकारी मानधन मिळते परंतु अचानक आलेल्या बदलामुळे बर्‍याच मुली सामान्य जीवनाला रुळू शकत नाहीत. त्यांना नंतर लग्न करता येत असले तरी त्यांच्याशी लग्न करणारा माणूस वर्षभरात मरण पावतो असा समज अस्तित्वात आहे. (अनेक कुमारी देवींची लग्ने झाल्याचा दाखला विकिवर मिळतो) पुन्हा एकदा नव्याने देवीचा शोध सुरु होतो.

यापूर्वीची कुमारी देवी सजनी शाक्य मोठी झाल्याने तीन वर्षांच्या मतिना शाक्यची निवड करून कुमारी देवीची स्थापना करण्यात आली आहे.

हा सर्व वृत्तांत वाचताना एक प्रकारे विचित्र खेद होतो. या मुलींचे बालपण कोमेजून टाकून त्यांच्या तारुण्याशीही कळत-नकळत खेळ केला जातो. इतर अनेक धर्म आणि पंथातही कोवळ्या वयांत मुलांना देव, देवता, संन्यासी, साधू, आजन्म ब्रह्मचारी करणे होत आले आहे. ज्या वयांत निर्णय घ्यायची क्षमता नसते, चांगल्यावाईटाची जाण नसते, आपली आवड-निवड ठरवायची जाणीव नसते त्या वयांत दुसर्‍यांनी माथी मारलेले निर्णय घेऊन जगायची शिक्षा त्यांच्या माथी मारणे आणि इतर मुलांना मिळणार्‍या बाल्यापासून त्यांना वंचित ठेवणे हे सहजी पटणारे नाही. नवरात्रांत कन्यापूजा नावाचा जो प्रकार चालतो त्यात लहान मुलींच्या पाया पडणे, त्यांच्याकडून आशिर्वाद मागणे, त्यांना प्रसाद चढवणे असे प्रकार केले जातात. कुठेतरी आपण त्या उमलणार्‍या फुलांवर आपण हा प्रकार लादत असतो का? असे प्रकार, प्रथा केवळ समाजातील अशिक्षित समाजात होत असतील असे वाटत असल्यास आवर्जून सांगावेसे वाटते की कन्यापूजा ही अमेरिकेतही देवळांदेवळांतून चालते. चांगली सुशिक्षित, अतिउच्चशिक्षित माणसे लहान मुलींना रांगेत बसवून त्यांच्या पाया पडून, त्यांच्या हातात डॉलर्स कोंबताना आणि आशीर्वाद मागताना अनुभवले आहे.

अधिक माहिती:

http://en.wikipedia.org/wiki/Sajani_Shakya
http://hinduism.about.com/cs/godsgoddess/a/aa090903a.htm

चित्र http://solidaritynepal.org वरून साभार.

Sunday, May 11, 2008

आय फील सो लकी....

काल आम्ही वर्गात हस्तकलेच्या तासाला आपापल्या आईसाठी हे उघडझाप करणारं फूल बनवलं. याच्या प्रत्येक बंद पाकळीवर तुझ्यासाठी एक छोटासा संदेश आहे. मला माझी आई का आवडते हे त्यात सांगितलं आहे.

पहिली पाकळी सांगते की मला माझी आई आवडते कारण ती माझ्या खाण्या-पिण्याकडे लक्ष पुरवते. मला भूक लागेपर्यंत थांबत नाही. माझे खाणे, माझा डबा, माझे जेवण यांकडे तिचे काटेकोर लक्ष असते.

दुसरी पाकळी सांगते की माझ्या आईला माझी काळजी घ्यायला आवडते. माझे केस विंचरायला, माझे कपडे धुवायला, इस्त्री करायला, माझ्यासाठी खरेदी करायला तिला आवडते.

तिसरी पाकळी सांगते की मला दुखलं-खुपलं, मी आजारी असले की माझी आई हवालदील होते. ती त्यावेळी थोडीशी जास्तच प्रेमळ असल्यासारखी वाटते.

चौथी पाकळी सांगते की माझ्या आईला माझ्याबरोबर बसून वाचन करायला आवडते. मी काय वाचते याकडे तिचे लक्ष असते. ती ग्रंथालयातून मला पुस्तके आणायला मदत करते आणि दररात्री ती तिचे पुस्तक वाचते आणि मी माझे पुस्तक वाचते. मला तिच्याबरोबर असा वेळ घालवणे खूप आवडते.

पाचवी पाकळी सांगते की ती मला तिच्या कामात मदत करायला देते तेव्हा ती मला खूप आवडते. यावेळी आम्ही काहीतरी खेळ खेळत कामे उरकतो.

सहावी पाकळी सांगते की मला तिच्याशी गप्पा मारायला खूप आवडतात. माझ्या शाळेच्या, वर्गातल्या, मैत्रिणींच्या गोष्टी ती दर संध्याकाळी ऐकते. मला एखादे दिवशी भीती वाटली तर तिच्या कुशीत घेते.

सहा पाकळ्यांचं हे फूल मी तुझ्यासाठी बनवलं, मम्मा! प्रत्येकाने बनवलं पण साराने नाही बनवलं. तिला आई नाही, गेल्या वर्षी कॅन्सरने वारली. तिने तिच्या मावशीला संदेश लिहिला पण आईला नाही.

आय फील सो लकी, कॉझ आय हॅव यू विद मी!

मदर्स डे निमित्त माझ्यात आणि लेकीत झालेला संवाद.

Monday, March 10, 2008

बादशहा अकबर आणि वादंग

लहानपणी अकबर बिरबलाच्या गोष्टी ऐकल्या नाहीत असा माणूस मिळणे विरळा. बादशहा अकबर आणि त्याचा वझीर (प्रधान) बिरबल. साधा,सरळ आणि थोडासा बिनडोक अकबर बादशहा आणि तल्लख बुद्धीचा हजरजबाबी बिरबल. यांच्या गोष्टी कोणा मोठ्याच्या तोंडातून ऐकताना खूप मजा वाटत असे. जंगलातला देव बनवून बादशहाला घाबरवणारा बिरबल आणि "क्यों बिरबल कैसा सेव?" असे बादशहाने विचारल्यावर "जंगल में जैसे था देव" असे उत्तर देऊन त्याला चारीमुंड्या चीत करणारा बिरबल, थंडीत कुडकुडणारा माणूस दूरवरच्या दिव्याची उब घेत होता म्हणून त्याला बक्षिस नाकारणार्‍या बादशहाला उंचावर हंडी बांधून मंद जाळावर खिचडी पकवत चिडवणारा बिरबल आणि आंब्यांबरोबर साली आणि कोयीही खाल्ल्यास म्हणून बादशहाला चिडवणारा आणि त्याच्या बेगमेचीही मर्जी संपादन करणारा बिरबल. मला अजूनही हा आपला सांस्कृतिक वारसा बिरसा वाटतो.

मला या गोष्टी ऐकताना नेहमी प्रश्न पडे की खरंच बादशहा इतका मूर्ख होता? जर इतका मूर्ख होता तर बादशहा कसा बनला? आता या विचारांचे हसू आले तरी एक प्रश्न मला कधीच पडला नव्हता आणि का ते कळत नाही. बादशहाच्या कथेत येणार्‍या त्या बेगमेचे नाव काय? मी हा प्रश्न कधी विचारल्याचे मला आठवतच नाही आणि आज त्यावर विचार केला तेव्हा ज्युली चित्रपटातील एक दृश्य आठवले.

"ओमप्रकाशचे बॉस त्याच्या घरी आलेले असतात. ओमप्रकाशची बायको नादीरा त्याला आपण अँग्लो-इंडियन असल्याबद्दल आणि आपल्या वडिलांबद्दल काहीतरी मोठ्या अभिमानाने सांगत असते. मध्येच हा बॉस तिला विचारतो, 'तुझी आई कोण होती?' त्याबरोबर ती पटकन काहीसे असे सांगते, "आईचे नाव महत्त्वाचे नाही. ते कोणी लक्षात घेतं का?" का कुणास ठाऊक पण जोधा-अकबराच्या गोंधळात हा प्रसंग नेमका आठवला.

राजा मानसिंगाची बहिण अकबराला दिली होती आणि म्हणून राजा भारमल आणि त्याचा पुत्र मानसिंग यांचा अकबराशी घरोबा होता. इतका घरोबा की आपल्या विशाल सैन्याचे सेनापती अकबराने या दोघांना नियुक्त केले होते असा इतिहास वाचलेला आठवतो. अकबराच्या पत्नीने त्यात विशेष काय केले हे मात्र आठवत नाही. तिचं नाव जोधा नसून वेगळे असते तर नेमका काय फरक पडता? मुख्य गोष्ट अशी होती की अकबराने आपल्या सेनापतीच्या मुलीशी लग्न करणे त्याच्या धोरणी स्वभावाला साजेसे वाटते. असो, मूळ इतिहासाचा, माझा आणि बादशहा अकबराचा संबंध इतकाच असावा.

यानंतर अकबर बादशहा आठवतो तो मुघल-ए-आज़म मधल्या पृथ्वीराज कपूरचा. मूल होण्यासाठी आतुरलेला आणि पुत्राच्या जन्माची वार्ता कळताच सोन्याच्या नाण्यांनी भरलेले ताट दासीच्या पदरात ओतणारा राजा. आपल्या हिंदू राणीच्यासह कृष्णजन्माष्टमीच्या उत्सवात "मोहे पनघटपे नंदलाल छेड गयो रे" या नृत्य-गीताचा आस्वाद घेणारा पती. पुत्राच्या बंडाने कासावीस झालेला आणि त्याविरुद्ध शस्त्र उचलणारा सम्राट. "सलीSSम, अनारकली तुम्हारे काबील नहीं" असे बेंबीच्या देठापासून ओरडणारा पिता आणि शेवटी दासीला दिलेले वचन अनिच्छेने का होईना पण पाळणारा बादशहा.

खूप वर्षापूर्वी वाचल्याप्रमाणे पृथ्वीराज कपूरने अकबराचे कपडे चढवले की एक अनामिक शक्ती आपला ताबा घेत असे आणि त्या कैफात आपण ही भूमिका निभावत असू असे सांगितल्याचे आठवते. बादशहा अकबर म्हटले की आजही फक्त पृथ्वीराज कपूर डोळ्यासमोर उभा राहतो.


मुघल-ए-आज़मची रंगीत फीत आली तेव्हा हा चित्रपट पुन्हा पाहिला आणि पूर्वी एवढाच आवडला. हे सर्व पहात असताना अकबर मुसलमान होता, जोधा त्याची बायको नव्हती, अनारकली त्याची बांदी नव्हती, इतिहासाला वेगळे वळण दिले आहे, के. आसिफने लोकांची फसवणूक केली आहे हे इतिहासाबद्दल मनापासून प्रेम असून कधी डोक्यातही आले नव्हते.

गोवारीकरांनी जोधा-अकबरची घोषणा केली तेव्हा ऋतिक रोशन नावाचा "एक पल का जीना" म्हणत "इधर चला,उधर चला" नाच करणारा किरकोळ शरीरयष्टीचा नायक देशाचा सम्राट म्हणून कसा काय शोभू शकेल असा प्रश्न पडला. आपल्या निर्णयावर अडून बसलेला बाप आणि प्रणयोत्सुक पती या दोन्ही भूमिका वेगळ्या असल्यातरी ऋतिकला पृथ्वीराज कपूरने निर्माण केलेले वलय आणि वजन पेलवेल का असा प्रश्न पडतो.



चित्रपट गोवारीकरांनी काढला म्हणजे त्यात काहीतरी विशेष असावं, जे त्यांच्या पारखी नजरेला दिसलं असावं. अमेरिकेत हिंदी चित्रपट एखादा दिवस लागतो आणि लगेच काढला जातो त्यामुळे नवे चित्रपट पाहण्यासाठी चांगल्या प्रतीची डिवीडी येईपर्यंत २-३ महिने थांबावे लागते. एखाद्या शुक्रवारी संध्याकाळी सिनेमा पाहिला आणि वेळ घालवला इतकीच एका चित्रपटाची महती माझ्यामते असते. लोकांना त्यावर रस्त्यावर उतरावेसे का वाटते ते तेच जाणोत.

अकबर खानने काढलेला "ताजमहल" मध्यंतरी पहायची संधी मिळाली. त्यात शहाजहानचे चित्रणही प्रेमळ आणि सत्शील बादशहा म्हणूनच केले गेले आहे परंतु त्यावरून कोणताही वाद निर्माण झालेला ऐकला नाही. (चू. भू. दे. घे) गोवारीकरांच्या अकबरावरच असे का व्हावे हे अद्यापही कळले नाही आणि हा प्रश्न विचारता ज्या अनपेक्षित उत्तरांना सामोरे जावे लागेल त्यावरून बहुधा कळणारही नाही.

शाळेत पास होण्यापुरता इतिहास शिकणारे, मोघलांचा इतिहास दोन चार धड्यांत पार पाडणारे, दहावीनंतर इतिहासाच्या पुस्तकाला हातही न लावणारे इतके असंख्य आहेत की तीन तासांचा चित्रपट पाहून त्यांचे मतपरिवर्तन होईल अशी त्या चित्रपटात गोवारीकरांनी नेमकी कोणती जादू भरली असावी?

----



अकबर बिरबलाच्या कथा येथे पाहता येतील.
चित्र टाईम्स नाऊ.टिवी च्या सौजन्याने

Saturday, January 26, 2008

भिकारीण

“इतक्या थंडीच्या सकाळी काय रे खरेदीला निघायचं सुचलं आज?” घराबाहेर पडलो तसे हातात हातमोजे सरकवत मी नवर्‍याकडे नाराजीने तक्रार केली. कालच अर्धा फूट हिमवर्षाव झाला होता आणि आज तापमापीचा पारा शून्याखाली ८-१० डी. सहज उतरला असावा. रविवारच्या दिवशी दुलईत पडून राहण्यापेक्षा धडपडत खरेदीला निघायची माझ्यामते अजिबात गरज नव्हती.

“अगं कारने तर जाणार. ख्रिसमसचे दिवस आहेत. मॉल लवकर उघडतोय. सेल आहे. खरेदीही करायची होतीच. उरकून टाकू की सकाळीच मग दिवस मोकळा! नाही का?” त्याने कारचे इंजिन सुरू केले आणि गाडीचा हीटरही सुरू केला. रस्ते निसरडे झाले होते, त्यात बोचरं वारं आमच्याकडे पाचवीला पुजलेलं. सावकाश गाडी हाकत आम्ही मॉलदर्शन घेतलं. मागच्या सीटवर लेकही सकाळी उठायला लागल्याबद्दल नाराज होती.

कुरकुरत का होईना पण आमची खरेदी नेहमीप्रमाणेच व्यवस्थित झाली. पैशांनी किती गोष्टी खरेदी करता येतात? या प्रश्नाला बर्‍याच आणि थोड्याशाच असे दुहेरी उत्तर आहे. मॉल्समध्ये गेले की आपल्याकडे पैसे असल्याचा आनंद आणि आपल्याकडे पैसे नसल्याचे दु:ख एकत्रित मिळून जाते. जे हवे असते त्याच्या किंमती परवडत नसतात आणि जे नको असते ते हमखास निम्म्या किंमतीला मिळत असते.

खरेदी झाली तेव्हा सकाळ उलटायला आली होती. “किती फिरफिर फिरलो रे या दोन चार दुकानांतच? वेगळा व्यायाम करायची गरजच नसते नाही या मॉलच्या चकरा मारल्या की. जीममध्येही पैसे देऊनच व्यायाम करतो आपण. इथे पैसे देऊन खरेदी करता करता व्यायाम होतो.” माझ्या टोमणामिश्रित विनोदाचा नवर्‍यावर गेली कित्येक वर्षे काहीही परिणाम होत नाही. त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकून खरेदीच्या पिशव्या ट्रंकमध्ये टाकल्या आणि कार सुरू केली.

दिवस वर आला असला तरी बाहेर थंडी मी म्हणत होती, वारंही सुटलं होतं. रस्त्यांच्या बाजूला बर्फाचे ढिगारे दिसत होते, रस्त्यांचा निसरडेपणाही जसाच्या तसा होता. हे असले दिवस नेहमीच नकोसे वाटतात त्यात मला, आता घरी जाऊन स्वयंपाकाचा श्रीगणेशा करायचा या कल्पनेने वैताग आला होता.

“सगळी सकाळ इथे गेली आता घरी जाऊन भूक भूक कराल, “ कंटाळलेल्या सुरात मी तक्रार केली.
“अगं ब्रंच करून जाऊ, आता कुठे घरी जाऊन स्वयंपाक करत बसणार.” हा समजुतीचा स्वर मला भयंकर प्रिय आहे. मागच्या सीटवरूनही सकाळपासून पहिल्यांदाच आनंदी हुंकार ऐकू आला. गाडी "ल पीप"च्या दिशेने वळली तशी पोटात आगीचा डोंब उसळल्याची जाणीव झाली. तसंही बाहेर खायचं म्हणजे सडसडून भूक लागतेच लागते. रेस्टॉरंटातल्या उबदार वातावरणात तर ती आणखीच प्रज्वलित होते असा नेहमीचा अनुभव आहे.

खाऊन बाहेर पडलो आणि रस्त्याला लागलो. समोरच्या सिग्नलला गाड्यांची बरीच गर्दी झाली होती. वेग मंदावून नवर्‍याने खिसे चाचपडायला सुरुवात केली.

“काय रे काय झालं? पाकीट, सेल विसरला तर नाहीस रेस्टॉरंटात? काय शोधतो आहेस?”
“काही नाही, पाकीटच शोधत होतो. जरा एक डॉलर काढशील.” त्याने हात स्टीअरींगवर पुन्हा ठेवत म्हटले.
“एक डॉ. कशाला रे?”“समोर बघ सिग्नलजवळ एक भिकारीण दिसत्ये, तिला देतो.”

सिग्नलपाशी एक मध्यमवयीन बाई कळकट कोट, टोपी, हातमोजे घालून थंडीत कुडकुडत उभी होती. हातात "गरीबाला मदत करा" लिहिलेला एक पुठ्ठ्याचा बोर्ड होता.

“हं? सर्व सोडून भीक द्यायला कुठे निघालास?” मी आश्चर्याने विचारलं, "काही गरज आहे का अशा धडधाकट माणसांना भीक घालायची. कामं करायला काय हरकत आहे यांना? उगीच माणसं भीक देऊन त्यांना कामं न करता, ऐतखाऊ बनवण्यास भाग पाडतात. ” किती वर्षांनी भीक द्यायची वेळ आली होती कोणास ठाऊक. मागच्यावेळी नेमकी कधी भीक दिली ते आठवणेही कठिण होतं.

“असू दे गं. ती भीक मागते आहे इतक्या थंडीची. आपल्याला दोन क्षण बाहेर राहणं कठिण होतंय आणि ती केव्हाची उभी आहे कोण जाणे? सणाचे दिवस आहेत दिला एक डॉलर तर काय मोठा फरक पडणार आहे.”

“प्रश्न फरक पडण्याचा नाही, पण मग चार भिकारी उभे असते तर चारांनाही भीक दिली असतीस का? आणि भीक मागणे हा तिचा नाइलाज नसून धंदा असेल तर? ज्या पैशांसाठी आपण राबतो त्यातला एक पैसाही ऐतखाऊंना का द्यायचा?” गाडी अद्यापही गर्दीत अडकून होती.

“किती विचार करते आहेस एका क्षणात. मी इतका विचारही केला नव्हता. आनंदाचे दिवस आहेत. आपण खरेदीला निघालो. मनपसंत खरेदी झाली, बाहेर खाणं झालं. एखाद्या आनंदाचा क्षण त्या भिकारणीलाही देता येईल असं वाटलं. या मॉल्समध्ये आपण जातो, मूळ किंमतींच्यापेक्षा कितीतरी किंमत त्यातल्या वस्तूंसाठी मोजतो. त्या काउंटरवरल्या पोरींचं खोटंखोटं स्मितहास्य, दिव्यांची रोषणाई, सजावट या सर्वांचा फुकट खर्चही आपण भरतो. रेस्टॉरंटात गेलो तर वेटरला टीप दिल्याशिवाय बाहेर पडत नाही. असं तो वेटर काय अधिकच करतो आपल्यासाठी? पण रीत म्हणून आपण त्याला पगार मिळत असतानाही टीप देतो. मग जर एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीच करत नसेल आणि तरीही दिला तिला आपल्या आनंदातला थोडासा हिस्सा एके दिवशी तर काय मोठा पहाड कोसळला? काहीतरी नसेल तिच्याकडे जे आपल्याकडे आहे. काहीतरी असेल जे तिला भीक मागायला प्रवृत्त करतंय आणि आपणही कधीतरी नकळत भीक मागतो. अगदी आपल्या हक्काच्या सुट्टीचीही भीक मागावी लागते ऑफिसात.”

“हो पण देण्याचंच झालं तर संस्था, अनाथालये वगैरे आहेत ना.” मी माझा हेका सोडला नाही.

“त्यांनाही देतोच ना! की देतच नाही? जे आपल्याकडे आहे ते जर त्यांच्याकडे नसेल तर प्रत्येकवेळीच मोजूनमापून विचार करून दुसर्‍याच्या पदरात टाकावं असं थोडंच आहे?” त्याने थोडंसं वैतागून विचारलं.

गाडी एव्हाना त्या भिकारणीच्या जवळ सरकली होती. त्याने गाडीची काच खाली केली तशी भप्पकन गार हवेचा झोत अंगावर आला आणि सर्वांगावर नकोशी शिरशिरी आली. तिने काच खाली झाल्याचं हेरलं असावं. ती लगबगीने खिडकीच्या दिशेने आली आणि आशेने खिडकीत डोकावत थंडीने गारठलेली मूठ तिने घाईने पसरली. तिच्या फाटक्या हातमोजांत डॉ. बिल पडलं तसं ’गॉड ब्लेस यू. हॅपी हॉलीडेज!" म्हणत तिने तोंडभरून हास्य फेकलं. तिच्या पाणीदार डोळ्यांतली लकाकी त्या पिवळ्या दातांच्या हास्यात मिसळून आनंदाची एक आगळी चमक क्षणभर दिसली, एक वेगळा आनंदही नवर्‍याच्या डोळ्यांत क्षणभर चमकून गेला आणि मनातील सर्व विचारांना खीळ पडली.

जसं आमच्याकडे काहीतरी होतं जे तिच्याकडे नव्हतं तसंच, काहीतरी वाटत होतं त्याला जे मला वाटतं नव्हतं इतकाच विचार करून मी हायवेतल्या गर्दीत मिसळून गेले.

Tuesday, December 18, 2007

कुठे गायब झालीयेस?

हा प्रश्न या अनुदिनीवर येऊन विचारणार्‍या आणि इतरत्र विचारणार्‍या सर्वांचे आभार. आपण एकमेकांची आठवण काढतो, विचारपूस करतो, आपुलकीने चौकशी करतो - त्या सर्वांसाठी मी इथेच आहे, आयुष्यात काही सुखद बदल झाल्याने कामांतून डोकं काढायला वेळ मिळत नाही इतकेच.

गेली काही वर्षे मी एकाच जागेवर उभी होते आणि आयुष्य झपाट्याने पुढे जात होते. त्यावेळेस बरेचदा ’मी कुठे आहे?’ हा प्रश्न स्वत:ला विचारावा लागे. जग आपल्याला सोडून निघून जाते आहे ही भावना माणसाला वेड लावेल इतकी निराश करू शकते. परंतु निराश व्हायचे की त्यातून उत्तर शोधायचे हे निवडण्याचा हक्क आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

काही वर्षांपूर्वी इतरांपेक्षा थोड्या उशीरा कुटुंबासह अमेरिकेत आलो. इथे आलो तेव्हा भारतात बस्तान बसले होते. उच्च पदावरची नोकरी सोडून कुटुंब आणि लहान मुलीसाठी कायम घरी राहणे याला फार मोठा त्याग वगैरे म्हणणार नाही, कुटुंबासाठी इतके तर करता येणे सर्वांनाच शक्य असते पण ९/११ त्यानंतर आलेले अस्थिरतेचे वातावरण, आऊटसोर्सिंग या सर्वांमुळे अमेरिकेचे कायम रहिवासी होण्याच्या स्वप्नाला जागोजागी खीळ बसत होती.

अनोळखी जागा, एकटेपण, हातातल्या गोष्टी सोडून देण्याने आलेले रिकामेपण, घरात बसण्याखेरीज काहीही करता न येण्याच्या कायद्याने आलेली निराशा यांतून असुरक्षिततेची भावना न बळावती तर नवल होते. या काळांत खंबीर राहण्यासाठी जर मला कोणाची मदत झाली असेल तर या अनुदिनीची.

मागे वळून पाहिले तर पहिले काही लेख मीच माझ्या मनातील भीती, असुरक्षितता घालवण्यासाठी लिहिले आहेत असे दिसून येते. पुढे मात्र कल बदलला. लिहिण्याची आवड उत्पन्न झाली. काहीतरी खरडलेले लोक वाचतात तर मग मी चांगले लिहायचा प्रयत्न का करू नये ही आशा मनात डोकावली. मनोगत, विकिपीडिया, उपक्रम या माध्यमांतून लिखाण फुलत गेले. त्याला प्रोत्साहन लाभले ते वाचकांचे. माझी आठवण काढणार्‍या सर्वांचे. माझ्या लेखांचे कौतुक करणार्‍या, पटले -नाही पटले ते आवर्जून सांगणार्‍या रसिकांचे. पुढे जाणार्‍या जगासोबत पावले उचलायला या अनुदिनीने आणि तिच्या वाचकांनी मला पायांत बळ दिले.


आज इतक्या वर्षांनी परिस्थिती अचानक बदलली. कायद्याने मला इतर अमेरिकी नागरीकांप्रमाणे हक्क आणि सुविधा घेण्याची परवानगी मिळाली. पण या शर्यतीत पळण्याएवढे बळ पायांत आहे का याची कल्पना नव्हती. मनात बळ मात्र कायम होते. ’जे काही गमवण्यासारखं होतं ते आधीच गमवून बसली आहेस ना, मग आता काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न कर.’ असे मन बजावून सांगत होते. जिथे मागे हटायला जागाच नाही तिथे पुढे जाण्यावाचून गत्यंतर नसते बहुधा. किंवा....

आयुष्य खरंच खूप सोपं असतं, आपणच त्याला कठिण करून ठेवतो - आपल्या मनातल्या भीतीने, असुरक्षिततेच्या भावनेने. जी स्वप्नं अपुरी राहिली होती ती पूर्ण करण्याची संधी चालून आली आणि आलेली संधी मी सोडली नाही.

आयुष्य आता बदललं आहे. अचानक जे हवं होतं ते मिळून गेलं आहे. आयुष्याच्या गतीने धावणं आता भाग आहे. हेच तर हवं होतं इतक्या वर्षांपासून. पण या चक्रात मला हल्ली लिहायला वेळ होत नाही. धावण्याची गती सापडली की तो वेळही मिळेल. तेव्हा पुन्हा लिहिनच. गेली २ वर्षे ही अनुदिनी लिहिते आहे. तिने आणि वाचकांनी मला भरभरून दिले, या कौतुकाचा त्याग नाही करायचा. या प्रेरणास्थानाला सोडायचे नाही आहे.

मी इथेच आहे, इथेच राहणार आहे. सध्या थोडी व्यग्र आहे इतकंच, ती व्यग्रता दूर झाली की मनात आलेलं...लिहून काढायला इथेच विसावणार.

Wednesday, May 30, 2007

फ्लाइंग डचमॅन



धुकं, जमिनीला टेकणारा ढग.... सृष्टीतील एक अद्भुत प्रकार. या धुक्याचा उपयोग भय वाढवण्यासाठी बरेचदा केला जातो. रानात रस्ता चुकलेला वाटसरू आणि त्याच्या सभोवती त्याला आणि झाडा-झुडपांना वेढून टाकणारे धुकं, त्या धुक्यातून त्याचा होणारा पाठलाग. भयपटांतून दाखवलेली झपाटलेली हवेली नेहमीच धुक्याने वेढलेली असते. एखादा ड्रॅक्युलापट पाहिला असेल तर रात्रीच्या वेळी वेडीवाकडी वळणे घेत टेकडीच्या दिशेने जाणारी बग्गी आणि त्या टेकडीच्या माथ्यावर धुक्यात लपाछपी खेळणारा ड्रॅक्युलाचा वाडा नक्कीच आठवत असेल.

धुकं डोंगरावर, जमिनीवर, पाण्यावर कोठेही अचानक जन्म घेतं. भर समुद्रातही धुकं निर्माण होतं. या धुक्यातून एखादे भुताळी जहाज तुमच्यासमोर येऊन उभे ठाकले तर? स्वत: समुद्र ही काही कमी गूढ नाही. समुद्र हा अद्यापही मानवाच्या संपूर्ण ताब्यात न आलेला भाग, आजही अज्ञात, रहस्यमय आणि गूढ समजला जाणारा. कधी शांत, कधी खवळलेला, कधी वादळांत सापडलेला तर कधी भयंकर लाटा निर्माण करून बेटंच्या बेटं गिळून टाकणार्‍या समुद्र, त्यातील अगणित जीव आणि त्यावर स्वार झालेल्या जहाजांविषयी अनेक खऱ्याखोट्या अद्भुत कथा ऐकायला मिळतात. समुद्रावर खलाशांमध्ये अनेक आख्यायिका, अंधश्रद्धा असल्याचे सांगितले जाते.त्यातलीच एक सुप्रसिद्ध आख्यायिका आहे फ्लाइंग डचमॅनची.

फार लहानपणी ही गोष्ट कोणीतरी सांगितल्याचे आठवते. कालांतराने रिचर्ड वायनरच्या पुस्तकावर आधारित बाळ भागवतांचे पुस्तकही वाचले होते परंतु आता ही फ्लाइंग डचमॅनची आख्यायिका आठवण्याचे कारण म्हणजे पायरेट्स ऑफ द कॅरिबियन हा चित्रपट. डेव्ही जोन्स नावाचा कप्तान साक्षात सैतानाशी जुगार खेळतो आणि त्यात हरल्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याचे जहाज खलाशांसह जगाच्या अंतापर्यंत समुद्रात भरकटत राहते. एकाकी समुद्रात अचानक धुक्याच्या पडद्यामागून किंवा उंच उचंबळलेल्या लाटेतून प्रगट होणार्‍या या जहाजाच्या जवळपास जाणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देणे.

फ्लाइंग डचमॅनच्या तशा अनेक आख्यायिका युरोपात प्रसिद्ध आहेत. या जहाजावर अनेक कथा, नाटकेही लिहीली गेली आहेत. त्यापैकी एखाद्या गोष्टीत फ्लाइंग डचमॅन हे जहाजाचे नाव आहे तर दुसर्‍या एखाद्या आख्यायिकेत ते जहाजाच्या कप्तानाचे नाव आहे. काही आख्यायिकांत हे जहाज जगातील सर्व समुद्रात कोठे ना कोठे दिसले असे सांगितले जाते तर बहुतांश आख्यायिका केप ऑफ गुड होपला फ्लाइंग डचमॅनचे प्रमुख स्थान मानतात. या सर्व आख्यायिकांपैकी खालील दोन आख्यायिका सर्वात प्रसिद्ध आहेत.

पहिल्या आख्यायिकेचे मूळ एका डच जहाजाशी संबंधित आहे असे म्हटले जाते. सतराव्या शतकात कॅ. बर्नार्ड फोक्के हा डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजावर कप्तान होता. त्याचे जहाज जावा ते हॉलंड असा प्रवास करत असे. या प्रवासासाठी इतर जहाजांना ८ महिने लागत परंतु फोक्के हा प्रवास केवळ ३ महिन्यांत आटोपत असे. यावरून लोकांत वावडी पसरली की बर्नार्ड फोक्केने साक्षात सैतानाशी करार केला आहे आणि त्यामुळेच तो हा प्रवास इतक्या जलद करायचा, असे म्हटले जाते. पुढे अर्थातच या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याला मृत्यूनंतरही जहाजासकट समुद्रात भरकटत राहावे लागले.

दुसर्‍या एका आख्यायिकेनुसार या जहाजाचा कप्तान हेंड्रिक वॅन्डरडेकन होता. १६८० च्या सुमारास तो डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजाची ऍमस्टरडॅम ते जावा अशी वाहतूक करत असे. केप ऑफ गुड होप जवळ एकदा त्याच्या जहाजाला प्रचंड वादळाचा तडाखा बसला. यावर संतापून वॅन्डरडेकन जहाजाच्या डेकवर उभा राहिला आणि त्याने निसर्गाला यथेच्छ शिव्या घातल्या आणि इतरांनी दिलेले सल्ले धुडकावून त्या वादळात आपले जहाज घातले. परिणामी जहाज कलंडून सर्वांचा मृत्यू झाला. यामुळेच हे जहाज समुद्रात आजही भरकटत असते.

या दोन्ही आख्यायिकांत फ्लाइंग डचमॅन हे कप्तानाला उद्देशून म्हटले आहे. जहाजाला नाही. अशा अनेक आख्यायिकांचा शेवट मात्र सारखाच आहे की या जहाजाला आणि त्याच्या कर्मचारीवर्गाला अनंतापर्यंत समुद्रात भरकटत राहण्याचा शाप मिळाला आहे.

या जहाजाच्या केवळ दर्शनाने संकटे ओढवतात असे म्हटले जाते. १९व्या आणि विसाव्या शतकात अनेकांनी या जहाजाचे दर्शन झाले असल्याचे म्हटले आहे. यांतील सर्वात प्रमुख किस्सा इंग्लंडचा राजा पाचव्या जॉर्जचा येतो. पहाटे चारच्या सुमारास तांबड्या प्रकाशात न्हाऊन निघालेले हे जहाज त्यांना ऑस्ट्रेलियाजवळच्या समुद्रात दिसले असे सांगितले जाते. १९४२ सालीही या जहाजाने दर्शन दिल्याचे किस्से ऐकवले जातात.

फ्लाइंग डचमॅनही आख्यायिका आहे की सत्यकथा कोणास ठाऊक? पायरेट्स ऑफ द कॅरेबियन या चित्रपटात डेव्ही जोन्स आणि त्याच्या खलाशांचे मानवी जीवन नाहीसे होऊन समुद्र जीवांचे गुणधर्म त्यांच्यात उतरलेले दाखवले आहेत. हे जहाज पाण्यातून उसळी मारून वर येतानाही दाखवले आहे. खरे खोटे कसेही असो. पायरेट्सचा तिसरा भाग बघायची उत्सुकता फ्लाइंग डचमॅनमुळे जितकी आहे त्याच्या दसपट कॅप्टन जॅक स्पॅरोमुळे आहे.
सर्व संदर्भ आणि चित्र विकिपीडियावरून.

Monday, March 12, 2007

सवयींचे गुलाम

हल्लीच एक गोष्ट लिहायला घेतली असताना त्यातील पात्राच्या तोंडी 'मला तिची सवय झाली होती.' असे वाक्य टाकायचे होते. सहज मनात विचार आला की "सवय" या शब्दाची व्याख्या कशी करता येईल? मला वाटतं त्यानुसार, एखाद्या सुखावणार्‍या, उत्तेजीत करणार्‍या किंवा दुखावणार्‍या, बोचणार्‍या, सलणार्‍या गोष्टीबद्दल आपली प्रतिक्रिया थंडावते त्यावेळेस आपण आपल्याला त्या गोष्टीची सवय पडली असे म्हणतो. याचबरोबर एखाद्या बोचणार्‍या, डसणार्‍या, सलणार्‍या गोष्टींविरूद्ध मनाने शोधलेला विरोधाचा मार्ग म्हणजे सवय लागणे.

आपल्या समजूतीनुसार आपण एखादी सवय चांगली किंवा वाईट ठरवत असतो उदा. मला बाहेर जाताना परफ्यूम फवारण्याची सवय आहे आणि मला ती आवडते. बाहेर जाताना हात आपसूक परफ्यूमच्या कुपीकडे वळतात, अर्थातच माझ्यामते ती चांगली सवय आहे. माझ्या लेकीच्या मते, "मम्मा! वॉलमार्टात जायला परफ्यूम कशाला लागतो? कसली ही सवय?" तिला माझी सवय नेहमीच आवडते असे नाही. म्हणजे आपल्याला चांगल्या वाटणार्‍या सवयी दुसर्‍याला चांगल्या वाटतीलच असा नेम नसतो. सवयीचेही एक गणित आहे. सवय लागणे हे ती सवय घालवण्याच्या मानाने फार सोपे असते.

सवयीचेही वेगवेगळे प्रकार असतात की काय याचा थोडासा विचार करत असता एका मित्राने बोलताना मला सुचवले की 'बघ! सवयीने स्वयंपाक चांगलाही होऊ शकतो.' मला सवयीचा पहिला प्रकार मिळाला. 'अंगवळणी पडणे', एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने त्यातील खाचाखोचा कळून आपल्यात सुधारणा करणे किंवा तशी सफाई कळत-नकळत येत जाणे. हा सवयीचा प्रकार माणसाला अचूकतेच्या जवळ नेतो म्हणून चांगला म्हणावा लागेल तर कधीतरी तो माणसाला यांत्रिकही बनवू शकतो, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने त्यातील नाविन्य, आवड संपून, ती गोष्ट कोणतेही नवे बदल टाळून उरकूनही टाकली जाते. दुसरा प्रकार मिळाला तो म्हणजे लकब; हा शब्दही सवयीशी मेळ खातो. एखाद्या अभिनेत्याची लकब जशी देव आनंदच्या हाता, खांद्यातील त्राण निघून गेल्यागत हालचाली. लकब हा शब्द सहसा एखाद्या वाईट सवयीसाठी वापरला जातो. जसे केसांवरून सतत हात फिरवण्याची सवय, नाक उडवायची सवय. सवयीचा तिसरा आणि बरीचशी नकारात्मक बाजू दाखवणारा शब्द म्हणजे चटक आणि चाळा. हे दोन्ही शब्द नकारात्मकता दाखवतात.

सवयीचा सर्वात नकारात्मक आणि धोकादायक प्रकार असावा व्यसन; मध्यंतरी मुक्तांगणावरील 'आहे हे असं आहे' या अनुदिनीवरील काही वाचनीय लेख, पुण्यातील रेव पार्टी, सिनेकलावंतांची अनेक प्रकरणे हे सर्व वाचनात आले तेव्हाही सवयीवर काही लिहावेसे वाटले होते. चांगल्या सवयी अंगी बाणवण्यास माणसाला वेळ लागतो परंतु वाईट सवयी लवकर लावून घेता येतात यावरून सवयीची वर केलेली व्याख्या बरोबर असावी असे वाटते. धूम्रपान, मद्यपान, मादक पदार्थांचे सेवन यांच्या आहारी मनुष्य फार चटकन जातो परंतु या सवयी सोडायला मात्र बराच काळ लागतो किंवा इतरांची मदत लागते. इतके करूनही जर मनावर ताबा नसेल तर ही व्यसने पुन्हा पदरी पडण्याची शक्यता बळावते.

वर उल्लेखल्याप्रमाणे माझ्या या गोष्टीतील नायकाला ज्या स्त्रीची सवय झाली होती, ती त्याला सोडून गेल्याने तो खोलवर कोठेतरी दु:खी आहे. माणसांची सवय व्यसनांप्रमाणेच घातक असते. एखादी रोज दिसणारी, रोज भेटणारी, घरातील व्यक्ती किंवा मित्र-मैत्रिण यांच्या वियोगाने माणसाच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी वेडापिसा झालेला जीव कोणतीतरी दुसरी घातक सवय स्वत:ला लावून घेण्याची शक्यता अधिक असते.

या सर्वावर काही उपाय असावा का हा मनातील पुढचा विचार. प्रत्येक मनुष्य येन केन प्रकारेण सवयींचा गुलाम असतो. सवय कधीतरी सोडून जाण्यापेक्षा माणसालाच स्वत:बरोबर फरफटत घेऊन जाते अशा सवयींपासून कालांतराने फारकत घेणे कधीही फायद्याचे असते.मनाचा निग्रहच या सवयी सोडण्यासाठी कारणीभूत ठरतो. माणसांची सवय विसरणे थोडेसे कठिण असले तरी काळासारखे उत्तम औषध नाही हेच खरे. तो काळ जाऊ देणे आणि मनाला एखाद्या चांगल्या सवयीत गुंतवणे कधीही उत्तम.

मध्यंतरी एका व्यक्तीने माझ्या अनुदिनीवरील 'आयुष्य आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.' हे वाक्य उचलण्याची परवानगी मागितली होती. असाच मनात आलेला एक विचार म्हणून ते वाक्य मी अगदी सहज तेथे टाकले होते पण ते कोणाला तरी समर्पक वाटेल असे वाटले नव्हते. सवयींच्या संदर्भातही हे वाक्य चपखल बसू शकते. कधीतरी इतरांना आणि स्वत:लाच जाचक ठरणार्‍या सवयी आपण लावून घेतो आणि त्याचा त्रासच आपण स्वत:ला आणि इतरांना करून घेत असतो, अशा जाचक सवयींतून मुक्त होणे अवघड असेल परंतु त्या मुक्ततेत एक वेगळाच आनंद असावा.

Friday, March 02, 2007

आम्ही मराठी

मध्यंतरी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांचा लेख वाचण्याचा योग आला. वाचताना मनात अनेक विचार येऊन गेले. यावर एके ठिकाणी विस्तृत लेख लिहावा असे मनात होते, त्यानिमित्ताने काही विस्कळीत विचार मांडत आहे. माझ्या अनुदिनी मित्रपरिवाराकडून काही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत ज्यामुळे या लेखाची अंतिम बांधणी करणे सोपे जाईल.

मराठी विश्वाकडून बरेचदा नव्या पिढीला मराठीशी बांधून ठेवणे अशक्य होत आहे, नवी पिढी मराठीची हेटाळणा करते, परदेशी गेलेल्या मराठी माणसांनी मराठी भाषेशी आपली नाळ तोडून टाकली आहे असा सूर बरेचदा ऐकू येतो. यांत १००% म्हणता आला नाही तरी मोठ्या प्रमाणात तथ्यांश आहे. विशेषत: अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनेक भारतीयांचा सहवास मला घडतो आणि मातृभाषेबद्दल त्यांच्या मनातील औदासिन्य कोठेतरी हृदयाला बोचते.

आपल्या मातृभाषेबद्दल एक प्रकारचा तिरस्कार केवळ आपण भारतीयच बाळगतो की काय ते कळत नाही परंतु मातृभाषा शिकून फायदा नाही, नव्या पिढीला कोठे मातृभाषा लिहिता वाचता येते, करायचे आहे काय तिचे संवर्धन करून? असा कोठे भविष्यात मातृभाषेचा उपयोग होतो आपल्याला? असा विचार करणारे सर्वत्र आढळून येतात. केवळ मराठीचा विचार करताही आपल्या मराठी समाजात अशीच भावना रूजत असल्याचे दिसते. इंग्रजीच्या तोडीस तोड उतरून मराठी पैसे मिळवून देऊ शकेल का? असा प्रश्न बर्‍याचजणांना पडतो.

या आणि अशा प्रश्नांची नेमकी उत्तरे काय द्यावीत याचा विचार केला असता; मराठी ही माझी मातृभाषा आहे, कळायला लागल्यापासून मी ती बोलते/तो आहे. माझे आई-वडिल, मित्रमंडळ, नातेवाईक मराठीच बोलत होते/ बोलतात. तिला इतिहास आहे, व्याकरणदृष्ट्या ती सक्षम आहे. ज्ञानेश्वरीपासून ते आजकालच्या तरूण लेखक- लेखिकांपर्यंत वाचण्यासारखे, त्यातून शिकण्यासारखे, मंथन करण्यासारखे मराठीत मुबलक साहित्य आहे, मराठी माणसे गुणी आहेत, मराठीचे संवर्धन करण्याची त्यांची योग्यता आहे आणि म्हणून मराठी जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, माझी भाषा राहिली पाहिजे. आपल्या मातृभाषेबद्दल बेफिकिर, बेजबाबदार किंवा न्यूनगंडपिडीत राहण्यात कोणताही मोठेपणा नाही.

साधूंनी या लेखात म्हटल्याप्रमाणे मातृभाषेबाबत बेफिकिरी दाखवण्याचा हा प्रश्न जगात बहुधा सर्वांनाच भेडसावत असावा. जगाच्या बाजारात टिकाव धरायचा तर इंग्रजीला पर्याय नाही परंतु जर ज्ञानभाषा आणि मातृभाषा अशा दोन्ही भाषांचे संवर्धन जर आपण सारख्या प्रेमाने केले तर यांत नेमके नुकसान कोणते? अमेरिकेत राहून कधीतरी लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे मी कधीही चिनी आई-वडिलांना आपल्या मुलांशी खाजगीत इंग्रजी बोलताना पाहिलेले नाही. ते व्यवस्थित हेल काढून आपली मातृभाषा बोलतात. अनेक युरोपीयही आपल्या मुलांशी खाजगीत मातृभाषेतून बोलतात, याविरुद्ध भारतीय माणसे सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आपापसात आपल्या मुलांशी इंग्रजीत संभाषण करण्यात धन्य मानतात. का ते त्यांचे तेच जाणोत. अर्थात यात चुकीचे काहीच नाही परंतु नेमके बरोबर तरी काय असावे?

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावरून असे आढळले आहे की दोन भाषा उत्तम जाणणारी मुले प्रत्येक परीक्षेत एकभाषी मुलांच्या पुढे असतात. त्यांचे विचार अधिक परीपक्व असतात, त्यांची आकलनशक्ती इतरांपेक्षा खचितच अधिक असते. भारतीय आणि इतर आशियाई देशांतील मुलांची प्रगती पाहता या विधानावर विश्वास ठेवणे सहज शक्य आहे.

जागतिक बाजारपेठ झपाट्याने वाढत असता शर्यतीतून कधीतरी मराठी पाठी पडली. तिला दुर्लक्षित ठेवण्यास जबाबदार आपणच आणि ती दुर्लक्षित ठेवण्यात धन्य मानणारेही आपणच. गेले वर्षभर मी नेटाने मराठीत लिहित असल्याने भारतीय आणि परभारतीय मराठी वाचक मराठीला कसा तगवून आहे याची बरेचदा प्रचीती आली आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे हे करण्यात परदेशांतीलच अनेक मराठी माणसांचा सहभाग आहे. इंटरनेटवरील जोमाने वाढणारी संकेतस्थळे, अनुदिनी (blogs), वर्तमानपत्रे पाहिली की मराठी भाषेचा र्‍हास होत आहे ही ओरड मिथ्या वाटू लागते. आजमितीला मराठीत दरवर्षी दीड दोन हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित होतात. इतक्या मोठ्या संख्येने मराठी पुस्तके छापली जात असतील तर त्यांना वाचकगण आणि खप असणारच, याचा मनाला आनंद होतो. परदेशातूनही मराठी मंडळांतर्फे निघणारे मराठी अंक मराठी भाषा तगवून ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु लक्षपूर्वक पाहिले असता २०-२५ वयाच्या दरम्यानची तरूण पिढी अभावानेच लेखन करताना आढळते, या विसंगतीचा कोठेतरी विशाद वाटून जातो. नव्या पिढीबरोबरच आपल्या मातृभाषेपासून त्यांना वंचित ठेवणार्‍या आणि तिच्याविषयी गोडी निर्माण करण्याचा प्रयत्नही न करणारे पालकही या अनास्थेस जबाबदार आहेत.

या पार्श्वभूमीवर नुकत्याच पाहण्यात आलेला ऑस्कर पुरस्कार वितरण समारंभातील एनिनो मोरोकोनी या जगप्रसिद्ध इटालियन संगीतकाराचे उदाहरण द्यावेसे वाटते. The good, the bad and the ugly ची सुप्रसिद्ध धून इतर अनेक चित्रपटात मोहवून टाकणारे श्रवणीय संगीत देणार्‍या या ज्येष्ठ कलाकाराने ऑस्करच्या व्यासपीठावर आपले भाषण इटालियन भाषेत केले. इंग्रजी न बोलल्याची खंत किंवा लाज त्याच्या चेहर्‍यावर आणि प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर कोठेही नव्हती. आपला पुरस्कार त्याने आपल्या पत्नीला समर्पित केल्यावर त्या दोघांच्या डोळ्यांतील भावना लाखो प्रेक्षकांपर्यंत नेमक्या पोहोचल्या. आपले कलागुण दाखवण्यासाठी इंग्रजीसारख्या ज्ञानभाषेची गरज नक्कीच आहे परंतु आपली मातृभाषा कोणत्याही प्रकारे आणि ठिकाणी कनिष्ठ दर्जाची नाही हेच यातून दिसले.

यावर्षीच्या मंडळाच्या अंकाच्या संपादनात मदत करताना मला अनेक लोकांचे विचार आणि भावना कळल्या. कोठे उत्साह दिसला तर कोठे औदासिन्य, परंतु अनास्थेचे प्रमाण उत्साहाच्या प्रमाणापेक्षा फार मोठ्या प्रमाणात होते हे नमूद करावेसे वाटते. या संमिश्र भावनांतून मनात आलेले विचार येथे मांडले आहेत.

Sunday, February 18, 2007

जो जीता वोही

गेल्या कित्येक दिवसांपासून माझा "ब्युसाफलस" पेंड खातोय. आता घोडाच तो पेंड नाही तर काय खाणार म्हणा, पण गाढवाला आपण कोणाचा घोडा आहोत ते नको लक्षात यायला?

'अलेक्झांडर द ग्रेट' लिहावा अशी बर्‍याच दिवसांपासून इच्छा होती. हल्ली विकिमुळे एक बरं झालंय की कोणीही उठून कोणत्याही विषयावर बिनधास्त लिहू शकतो. तसा सुमारे ३ वर्षांपूर्वी अलेक्झांडरवर बरेच वाचन केले होते. त्या अनुषंगाने ग्रीक इतिहासावरही बरेच हात पाय मारले होते परंतु काही दिवसांनी 'मेमरी लॉस' होणे "मैं कहाँ हूँ?" विचारणे हा माझा स्वाभाविक गुणधर्म आहे त्यामुळे सध्या आपण असे काहीतरी वाचले होते, हे जरा बिचकतच म्हणते.

मध्यंतरी ऑलिवर स्टोनचा अलेक्झांडर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता, अरेरे! काय टुकार सिनेमा होता. केवळ कॉलिन फॅरेल होता म्हणून पैसे वसूल झाले असे खोटे समाधान मानायचे. पण अलेक्झांडर काय किंवा ब्रॅड पिटने काम केलेला ट्रॉय काय, इतक्या historical inaccuracies कशा काय कोणी दाखवू शकतो? धन्य ते हॉलीवूड!

अलेक्झांडर चित्रपटात एक मजेशीर प्रसंग घुसवलेला आहे. पर्शियन सम्राट दरायसच्या बायकोला, स्ट्रटेराला बंदिवान केल्यावर अलेक्झांडर विचारतो, "हे राणी! मी तुला कसे वागवू?" आणि राणी उत्तरते, "राणीसारखी". अगं आई गं! या सिनेमावाल्यांनी आमच्या पुरुरव्याच्या तोंडचे शब्द चक्क चोरले. ते तर ते पोरसच्या नावाला आणि पात्राला फुलांच्या माळा आणि तोंडाला रंग फासून साफ रानटी करून टाकले होते. या हॉलीवूडवाल्यांची नेमकी कोणती अडचण असत्ते आयुष्यात कळायला मार्ग नाही. (What is their problem in life myan??)

याउलट, ग्रीकांच्या इतिहासात पोरसचे वर्णन साडेसहा फूटांहून अधिक उंच, धिप्पाड, देखणा, करारी असे केले आहे. 'मला राजासारखा वागव' असे सांगितल्यावर अलेक्झांडरला त्याच्या धाडसाच्या वाटलेल्या कौतुकाचे व्यवस्थित वर्णन केलेले आहे. या खेरीज अलेक्झांडरला असलेले भारतीय कला, संस्कृती यांचे कुतूहल, भारतीय संस्कृतीने आपल्याला परके समजू नये यासाठी केलेले प्रयत्न, अलक्षेंद्र म्हणून त्याचा भारतीय दस्त ऐवजांत केलेला उल्लेख, विद्वान ब्राह्मणांशी केलेल्या चर्चा, आपल्यासोबत ग्रीसला चला असे अनेक विद्वानांना केलेले आवाहन आणि कल्याण ऋषींना ग्रीसला नेण्याची जबरदस्त इच्छा इ. इ.

नव्या वर्षाची सुरूवात म्हणून विकिपीडियावर 'अलेक्झांडर द ग्रेट' खरडायला घेतला होता. पब्लिक लायब्ररीतून पुस्तके आणली, वाचन सुरू केले. एकदा लेखन सुरू केल्यावर मात्र मारुतीच्या शेपटासारखा लेख वाढतच जातोय. मॅसेडोनियन, ग्रीक, एजियन, पर्शियन, कित्येक शहरे, नद्या, प्रदेश, लढाया, सरदार, मित्र, शत्रू, मांडलिक, फितूर प्रत्येकाची गणती ठेवावी लागते. अगदी या ब्युसाफलस नावाच्या गाढवाचीही.

जो जीता वहीं सिकंदर आणि मुकद्दर का सिकंदर खेरीज अलेक्झांडर कुठे आठवतो आम्हाला? नाही, तसे ही आमीर आणि अमिताभच आठवत असावेत म्हणूनच खर्‍या अलेक्झांडरबद्दल लिहायला घेतलं होतं परंतु गेले बरेच दिवस या वाईट हवामान, सुपर बोव्ल (घोडा नाही तर घोड्याची नाल), त्यानंतर आमचे मराठी मंडळ, शाळा, मित्रमंडळ यांना सगळे कार्यक्रम एकापाठोपाठ एक करावेसे कसे वाटतात कोण जाणे? येणार्‍या बर्‍याच दिवसांत रात्री थोड्या सोंगं फार अशी परिस्थिती आहे. पुढचे काही महिने भरघोस कार्यक्रमात, जबाबदार्‍यांतच जाणार असल्याने अलेक्झांडरला भोज्जा करायला एप्रिल उजाडेल की काय अशी भीती सध्या मला वाटते आहे आणि एप्रिलपर्यंत उत्साह गळला तर? आमचं घोडं अडूनच राहिलं तर?.... :(

.... म्हणूनच हा लेखनप्रपंच. कधीतरी मनांत आलं की जो जिंकतो तोच सिकंदर असेल तर या सर्व लढाया संपल्यावर कधीतरी पुन्हा अलेक्झांडरशी लढाई लढायला घेईन, आणि यावेळीही खुश्शाल जिंकू दे त्या सिकंदराला.

Thursday, February 01, 2007

सुपर नाल

पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो तेव्हाही माझं मन टिव्हीवरच्या सासू सुनांच्या भांडणाना चटावलेलं नसलं तरी सरावलेलं नक्कीच होतं. अमेरिकन टिव्हीवर काय पाहायचं असा प्रश्न वारंवार मनाला पडायचा. कालांतराने सासू-सुना, देश, काळ, भाषा बदलल्या म्हणून अजीबात बदलत नाहीत हे 'एवरीबडी लव्ज रेमंड' पाहून लक्षात यायला लागलं आणि अमेरिकन टिव्हीशी नाळ जुळत गेली.

नंतर प्रश्न होता खेळांचा. मला लहानपणापासून क्रिकेट आवडतं. खेळातला प्रत्येक बारकावा समजला नाही तरी सर्वसामान्य प्रेक्षकापेक्षा बर्‍यापैकी कळतंही. म्हणजे आमच्या शेजारच्या एक काकू क्रिकेटची मॅच सुरू असताना प्रत्येकवेळी मोठ्ठा आवाज आला की 'सचिनची सेंच्युरी झाली का हो?' असं काकांना विचारायच्या अशी गत नक्कीच नाही. मॅच असली की दिवसभर टिव्हीला चिकटून बसायची सवयही होतीच, ती अमेरिकेत आल्यावर काही काळ कायम होती पण रात्रीची जाग्रणे असह्य होऊ लागली तसा या खेळाचा नाद सोडणे उत्तम असे वाटू लागले. थंडीच्या पाच-सहा महिन्यांत घरी बसून काहीतरी उद्योग तर हवा म्हणून एके दिवशी अमेरिकन फुटबॉलकडे नजर वळवली.

प्रथमदर्शनी खेळातलं काही एक ढिम्म कळलं नाही आणि चार पाच टगे कोणातरी एका बारक्या खेळाडूवर धडाधड पडताहेत, हिसकाहिसकी करताहेत हे बघून किळसच वाटली. त्यातून नाव फुटबॉल असून चक्क हाताने हा खेळ खेळला जातो ते पाहून हसूही आले. जंटलमनांचा खेळ पाहायची सवय झालेल्या माझ्या मनाला हा रांगडा खेळ बिल्कुल रुचला नाही. तेव्हापासून फुटबॉलच्या वाट्याला गेले नाही ते जॅनेट जॅकसनने फुटबॉलला एक वेगळे वलय प्राप्त करून दिल्यावर. त्याप्रकरणानंतर लोकांनी उठवलेल्या नाराजीच्या सुरावरून पुन्हा हा खेळ पाहावा की काय अशी इच्छा निर्माण झाली. या खेळातला 'ख' ही माहित नसलेल्या माझ्या डोक्याला संघ, खेळाडू, खेळ, नियम सर्वकाही जाणून घ्यायचे होते. शांतपणे एक दिवस विकिपीडियावर माहिती शोधली आणि वाचली. आश्चर्य म्हणजे या खेळात आमच्या इंडिएनाच्या संघाचे नाव वर असल्याचा पत्ता लागला. मग खरंच रस घेऊन खेळाचे नियम वाचले, खेळ समजून घेतला आणि २००५ पासून पाहायला सुरूवात केली. घरात अचानक उलटे वारे वाहायला लागले म्हणजे मी खेळ पाहते म्हणून हळूहळू नवर्‍यानेही पाहायला सुरूवात केली.


खेळाचा मोसम सुरू झाल्यावर खेळातील खाचाखोचा समजत गेल्या. रांगडा-रानटी वाटणारा हा खेळ अतिशय नियमाने खेळला जातो असे लक्षात आले. या खेळाचा वेग आणि लय खेळात प्रचंड रंगत आणतात हे कळले. बॉलची लांबी १ फूट असल्याने या खेळाला फुटबॉल म्हटले जाते हे कळले. त्याचबरोबर नावात 'इंडिया' असल्याचा महिमा की काय कळत नाही पण कागदावर वाघ असणारा आमचा संघही भारतीय क्रिकेट संघासारखा आयत्यावेळेला गठळतो आणि आवाक्यात आलेली फायनल दरवर्षी चुकवतो हेही कळून चुकले. गेल्यावर्षी नियमाने खेळ पाहिल्याने आमचा संघ 'फायनलच्या' आसपासही न पोहोचल्याचे बघून मनापासून वाईटही वाटले. या फायनलला अमेरिकेत "सुपर बोव्ल" म्हटले जाते. प्रत्येक संघ आपापल्या क्लबच्या नावाने आणि चिन्हाने ओळखला जातो. 'इंडिएना कोल्ट्स' या आमच्या संघाचे चिन्ह आहे घोड्याचा नाल आणि अमेरिकेतील अशा बत्तीस संघातील शेवटच्या सर्वोत्तम दोन संघात जी लढत होते ती सुपर बोव्ल.

२००७ चा सुपर बोव्ल या रविवारी खेळला जाईल. संपूर्ण अमेरिका त्याकडे डोळे लावून बसली आहे आणि कधीही फायनलपर्यंत न पोहोचलेला आमचा संघ, इंडिएनापोलिस कोल्टस या वर्षी शिकागो बेअर्सबरोबर अंतिम लढत देणार आहेत. गेला आठवडाभर आमच्या शहरांत उत्सवाचे वातावरण आहे. संघाचे चिन्ह आणि रंग असणारे निळे कपडे, प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी दिसणारे भव्य नाल, "गो कोल्ट्स" म्हणून संघाला दिलेले प्रोत्साहन, घोड्याचे नाल असणारे फलक, झेंडे, दागिने, मिठाया, कपडे यांनी माणसे, गाड्या, बाजार आणि शहर सजले आहे.

सुपर बोव्लचा चषक आम्हाला मिळेल किंवा नाही मिळेल. खेळात कोणाची तरी जीत होईल कोणाची तरी हार परंतु आपला संघ इतके महिने खेळून या अंतिम लढतीपर्यंत पोहोचला याचे प्रत्येकाला कोण कौतुक. प्रत्येकजण आपापल्यापरीने संघाला प्रोत्साहन देत आहे, सच्ची चाहती म्हणून मी मागे का राहायचे? तेव्हा माझ्याकडून संघाला GO COLTS!! म्हणायला हा अनुदिनी प्रपंच.

* कोल्ट्सचे चिन्ह विकिपीडियाच्या साहाय्याने चिकटवले आहे.

Friday, January 19, 2007

वर्षपूर्ती

गेल्या वर्षी २० जानेवारीला पहिला ब्लॉग लिहिला त्यावेळेस तो लेख कोणी वाचणार आहे अशी कल्पनाही नव्हती. सर्व मराठी ब्लॉग्ज कोठेतरी संकलित होतात, मराठी ब्लॉगर्सचा एक समाज आहे हे ही माहित नव्हते. होता फक्त मोकळा वेळ, एकांत आणि लिहिण्याची इच्छा. लिहायला सुरुवात केली आणि परीकथेतल्या एखाद्या जादूच्या महालात शिरल्यासारखे एक एक दालन उघडत गेले.

गेल्या संपूर्ण वर्षात बर्‍याच नव्या गोष्टी कळल्या तर काही जुन्याच गोष्टींची जाणीव नव्याने झाली. मराठीत टंकलेखन करता येते ही पहिली नवी गोष्ट कळली. बरहाशी ओळख, मराठी भाषेशी पुनर्भेट, मराठी साहित्याशी पुन:श्च ओळख, माझे अगाध (अ)शुद्धलेखन, मनातले विचार लिहून काढायची संधी या नव्या, जुन्या अनेक गोष्टी प्रत्येक वळणावर, थांब्यांवर भेटत गेल्या.

आपली अनुदिनी माणसे वाचतात आणि त्यावर त्यांना प्रतिसाद देण्याची इच्छा होते याचे प्रथम थोडेसे अप्रूप वाटले. माणसाला कळत नकळत इतरांची, त्यांच्या प्रशंसेची, त्यांच्या बर्‍या-वाईट मतांची किती गरज असते हे जाणवून गेले. नंतर कधीतरी मराठीब्लॉग्ज.नेट आणि मनोगताची ओळख झाली आणि ओळखी वाढत गेल्या, माणसे जोडली गेली. ज्याच्याकडे आपली बोली बोलायला माणसे नसतील त्याला आपल्या भाषेत वाद-विवाद करायला, भांडायला माणसे मिळणे ही सुद्धा एक अनोखी भेट असते.

आयुष्यात बरेचदा जागा बदलत राहिल्याने अनोळखी माणसांच्या ओळखी करून घेणे मला शिक्षा वाटते. नवीन ओळखी जोडत राहायची गरजही उरलेली नाही. माणसांशिवाय जगण्याची सवय झाली आहे आणि अंगवळणी पडली आहे पण तरीही या अनुदिनीच्या निमित्ताने ओळखी आपसूक होत गेल्या. कित्येक स्वभाव कळले, विचार कळले, माणसांच्या अंतरंगांचे रंग कळले, काही आपलेसे वाटले काही नकोसे वाटले. अशाच वाढत गेलेल्या ओळखींमधून हळूहळू माणसाचे नेटवर्क कसे वाढत जाते आणि कधीतरी त्याचे व्यवस्थापन करणे जिकिरीचे होते हा ऑर्कुटवर आलेला अनुभव. १-२ करता करता जुने सहकारी, नातेवाईक, भाऊ-बहिणी, भाचवंडे एक वेगळा समाज पुन्हा एकदा जोडला गेला.

मग कधीतरी हे व्यसन तर होत नाही ना याची शंका येऊ लागली. कळफलक बडवण्यापलिकडे आयुष्यात दुसरे काही नाही की काय असे वाटायला लागले. लिहायचेच झाले तर मनात आलेले विचारच का, काहीतरी इतरांच्या उपयोगाचंही लिहिता येईल हे मराठी विकिपीडियामुळे झालेली जाणीव. आज नव्या वर्षाच्या सुरुवातीसच विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर जानेवारीचे सदर म्हणून आपला लेख झळकताना पाहून मनापासून आनंद होतो. याचबरोबर इंडी मराठी मंडळासाठी लिहिण्याची संधी मिळाली. आणखीही काही ठिकाणी लिहिण्याचा योग आला, यायची शक्यता आहे.

अमेरिकेत आल्यापासून आयुष्य कधीतरी थांबल्यासारखं वाटतं तसं ते कधीच कोणासाठी थांबत नाही हा भाग अलाहिदा. सध्या ते ज्या मार्गावरून चालले आहे त्याचा मी आनंद घेत आहे.... एका नव्या अनुदिनी वर्षाला सुरुवात होत आहे.

Thursday, January 04, 2007

सीन्स यू हॅव बीन गॉन....

केली क्लार्कसन माझ्या संगणकाच्या स्पीकर्समधून कर्णकर्कश्श केकाटते आहे, 'सीन्स यू हॅव बीन गॉन आय कॅन ब्रीद फॉर द फर्स्ट टाइम...' या पोरीची एक शैली आहे, संथ गाणे सुरू करायचे आणि मध्येच एकदम स्वर टीपेला लावून किंचाळायचे आणि पुन्हा शांत झाल्यासारखे हळुवार गाणे सुरू करायचे. का कोणजाणे पण मला आवडते तिचे गाणे. बहुधा हळुवारपणा आणि धांगडधिंग्याचा संगम होत असावा म्हणून असेल. अर्थात येथे मुद्दा तो नाही. मुद्दा असा की या गाण्यासारखी समानार्थी भावनांची इतर गाणी कोणती? पाश्चिमात्य संस्कृतीचा विचार करता अनेक नातेसंबंधांच्या अनुभवातून आयुष्याची वाट पकडणे लक्षात घेतले तर इंग्रजीत अशा भावनेवर आधारित गाणी बरीच असावीत असे वाटते, काही इंग्रजी गाणी चटकन लक्षात आली ती --

१) हिलरी डफचे "सो यस्टरडे"

If it's over, let it go and
Come tomorrow it will seem
So yesterday, so yesterday
I'm just a bird that's already flown away

२) ग्लोरिया गेनरचे "आय विल सर्वाइव"

I've got all my life to live,
I've got all my love to give
and I'll survive, I will survive.

ही दोन्ही गाणी मला अतिशय आवडतात. विशेषत: ग्लोरिया गेनरच्या आवाजातील "आय विल सर्वाइव". कदाचित तिच्या आवाजातील तडफ हिलरी डफ आणि केली क्लार्कसनच्या आवाजात नसावी म्हणून. तरीही या सर्व गाण्यांत एक प्रकारचा विषाद, आणि आत्यंतिक राग जाणवतो किंवा झाल्या प्रकारातून बाहेर पडण्याकरता आपल्या मनाची भाबडी समजूत घालण्याचा प्रयत्न. त्यामुळे कोठेतरी एक निराशेचे सावट पडल्यासारखे वाटते.

याच धर्तीवर आणि भावनेवर आधारित आपल्याकडे काही हिंदी-मराठी गाणी बनत असावीत का असा विचार मनात आला. आपल्याच माणसाची निंदा करणे, भले मग तो आपल्याला सोडून गेला असेल किंवा आपण त्याला काही कारणास्तव सोडले असेल, या प्रकाराला आपल्याकडे अद्यापही taboo मानले जाते. तसे करून वर जे केले त्याने मी फार आनंदी आहे असे म्हणण्याला आपल्या समाजात बहुधा 'कोडगेपणा' म्हणत असावेत.
या भावनेच्या थोड्याफार जवळपास जाणारे हिंदी चित्रपटातील एक गाणे चटकन आठवले ते म्हणजे --


चलो एक बार फिरसे
अजनबी बन जाये हम दोनो
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूं दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज नजरोंसे


अर्थातच हे गाणे सुटकेच्या नि:श्वासाचे नाही. या गाण्यात एक प्रकारची निराशा, दु:ख, हिरमोड जाणवतो. तसंही गुमराह चित्रपटाची आठवण केली तर हे प्रियकराने प्रेयसीच्या भावना चिथावण्यासाठी म्हटलेले गाणे म्हणता येईल. संबंध सुटले, नाती तुटली म्हणून 'ऐ मेरे दिल कहीं और चल' सारखी काही मोजकी गाणी आढळतात. मराठी भावगीतांची आणि अन्य गीतांची परंपरा पाहता मराठीत अशा भावनेचे गाणे असेल की काय अशी शंकाच होती, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या नेमक्या भावना मला अभिप्रेत होत्या ते गाणे 'जैत रे जैत' चित्रपटात आहे आणि त्यातील भावना या इतर गाण्यांपेक्षा खूपच वेगळ्या असल्याचे लक्षात आले -


मी रात टाकली, मी कात टाकली मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली.

या गाण्यात जे धैर्य आहे, जो बेदरकारपणा आहे तो इतर इंग्रजी आणि हिंदी गाण्यांत नाही. नायिकेला झाल्या प्रकाराची खंत आहे किंवा पर्वा आहे असे कोठेही या गाण्यातून दिसून येत नाही उलट एक प्रकारची मुक्ती व त्या मुक्तीतील तृप्ती ती अनुभवते आहे आणि मागचे मागे टाकून नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ती आसुसलेली आहे असे दिसते. आयुष्याकडे इतक्या सहजतेने पाहण्याचा दृष्टीकोन फारच कमीजणांकडे असावा.

एखाद्या व्यक्तीला सोडल्यावर किंवा त्याचे अस्तित्व आपल्या आयुष्यातून पुसून टाकल्यावर आपण खर्‍या समाधानाने सुटकेचा निःश्वास सोडू शकतो ही भावना आपल्या समाजात अद्याप रुजायची आहे की काय ते कळत नाही. अशी भावना माणसाच्या मनात येऊच शकत नाही असे नसावे कदाचित पूर्वायुष्यातील आठवणींमुळे ती सरळ शब्दांत व्यक्त करणे कठीण जात असावे किंवा अपराधीपणाची भावना मनात दाटून येत असावी. आपली माणसे, मैत्री, नाती ही जन्मभर सांभाळायची असतात असेच लहानपणापासून कळत नकळत आपल्यावर संस्कार केलेले असतात. एखादे नाते सांभाळणे जड किंवा कठीण होऊ शकते आणि अशा नात्यातून सुटका करणे कधीही फायद्याचे ठरू शकते हा विचार हळू हळू आपण स्वीकारतो आहोत पण संधी मिळेल तेव्हा त्याला पाश्चिमात्य संस्कृतीचे लेबल लावायलाही तयार असतो. आपल्या स्वार्थासाठी काही संबंध तोडणे किंवा त्यांच्यापासून फारकत घेणे हा विचारही नकोसा होतो.

जन्मभर माणसे जोडताना त्यांच्याबरोबर आपण प्रेम, मैत्री, जवळीक, मदत, सहचर्य या भावनांना जवळ करतोच पण प्रसंगी मत्सर, हेवा, हुकूमशाही, राग अशा नकारात्मक भावनांनाही जवळ करत असतो आणि या भावनांचा विस्फोट झाल्यावर एखाद्याला त्यातून आपली सुटका व्हावी असे वाटणे साहजिक आहे. कधीतरी केवळ प्रेमभावना संपली, आकर्षण ओसरले, नव्याची नवलाई नऊ दिवस अनुभवून झाली इतकी सरळ पण स्वार्थी भावनाही असू शकते. या सर्व भावनांचा शेवट, 'सुटका झाल्यावर समाधानाचा निःश्वास टाकणे' असाही होऊ शकतो.

भूतकाळाला कवटाळून बसणे ही बहुधा माणसाची सहजप्रवृत्ती असावी. बरेचदा भूतकाळाचे, नात्यांचे, मैत्रीचे, आपुलकीचे बंध झुगारून देणार्‍या व्यक्तीला समाजाकडूनच प्रतारणाही सहन करावी लागते. तरीही कोठेतरी अशा व्यक्ती आयुष्यात अधिक समाधानी असतात की काय असा प्रश्न मनाला चाटून जातो. नको असलेले क्षण, माणसे, आठवणी, प्रसंग तेथेच मागे टाकून बेदरकारपणे पुढे वाटचाल करण्याची हिंमत माणसे दाखवतात हीच मोठी कौतुकाची गोष्ट वाटते.

Tuesday, December 12, 2006

मुखवटे

"संपूर्ण जगात तूच सुंदर," असे सांगणारा जादूचा आरसा स्नो व्हाईटच्या गोष्टीतल्या सावत्र आईकडे खरंच होता का असा प्रश्न मला बरेचदा पडतो. म्हणजे विचार करायला लागलं तर नेमकी काय गरज अशा आरशाची? आरसा आपल्याला जे पाहायचे असते तेच दाखवतो म्हणतात. या गृहीतकानुसार प्रत्येकाने आरशात सुंदरच दिसायला हवे. तसं प्रत्येकाने सुंदरच का दिसावे यामागची कारणमीमांसा सोपी आहे, आपले दोष सहज कबूल करणारी, मोठ्या मनाने आपल्या चुका मानणारी माणसे कोठे सापडतात? मी म्हणतो तेच खरे, माझेच इतरांनी ऐकले पाहिजे, माझेच बरोबर आणि "मीच सर्वांत सुंदर!" यांत नेमका फरक तो कोणता? सौंदर्याचा बेगडी मुखवटा धारण करणार्‍यांना आपला खरा चेहरा पाहावासाच वाटत नसेल तर?

मध्यंतरी एके ठिकाणी माणसांचे गुण-दोष, आवड-नावड त्यांच्याच शब्दांत वाचण्याचा योग आला. प्रत्येकाने आपल्या गुणांचे आणि आवडींचे वारेमाप वर्णन केले होते, परंतु जेथे दोष आणि नावडीबद्दल लिहायचे होते तेथे थोडक्यात मला भ्रष्टाचाराचा राग आहे, मला स्वत:ची टिमकी वाजवणार्‍या व्यक्ती आवडत नाहीत, मला अस्वच्छता आवडत नाही, मला भिकार्‍यांचा, राजकारण्यांचा राग येतो असे प्रचारी मुद्देच मांडलेले आढळले. अगदी अभावाने एखाद्याने 'मी नकार पचवू शकत नाही, एखाद्याने माझे मत नाकारले तर माझा संताप अनावर होतो.' असे लिहिले होते. इतरांना आपले म्हणणे इतक्या परखडपणे आणि सुस्पष्टपणे मांडता आले नाही याचे कारण 'इतरांनी मला चांगले म्हणावे, माझे दोष इतरांना दिसू नयेत' अशी भीती असते की 'मी स्वत:ला आहे तसा स्वीकारू शकत नाही, माझे दोष मलाच दिसू नये याची मी काळजी घेतो' असा स्वार्थ असतो कोणास ठाऊक? मला व्यक्तिशः दुसर्‍या विधानावर जास्त विश्वास वाटतो.

यावर पुढील प्रश्न निर्माण झाला की जगात कितीजणांना नकार स्वीकारता येतो? जी उत्तरे मिळाली त्यावरून तो तसा बर्‍याचजणांना पचवता येतो पण तो पचवला जातो याचे खरे कारण त्याखेरीज आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो म्हणून. जेथे तो स्वीकारायचा नसतो तेथे समोरच्या माणसाला येन केन प्रकारेण नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्याचा अपमान करणारी, मारहाण करणारी, एखाद्याची बदनामी होईल असे उद्योग करणारी आणि कुटील कारस्थान रचणार्‍या माणसांपासून ते प्रेयसीला जाळणारी माणसे याच प्रकारात मोडतात.

माणसाला जनाची नाहीतरी मनाची लाज हवी असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र माणूस स्वत:चे अंतरंग लपवून समाजात आपली पत, प्रतिष्ठा राखण्यासाठी कोठल्याही प्रकारे चकचकीत मुखवटा लेऊन तयार असतो असे दिसून येते. जनाची लाज बाळगणारे जगात बहुसंख्य आहेत पण मनाची लाज बाळगणारे अगदी कमीच असावेत की काय असे वाटते. या माणसांना आपला चेहरा आरशात सुंदर दिसत असावा का? याचे उत्तर "हो" असेच द्यावे लागेल. चेहर्‍यावरचे मुखवटे, रंग उतरवल्याशिवाय आपलाच चेहरा दिसायचा कसा? इतरांना एखाद्या सुंदर, सोज्वळ, विद्वान चेहर्‍यामागे दडलेला राक्षस दिसणे केवळ अशक्य होऊ शकते, पण माणसाला स्वत:चाच हिडिस चेहरा दिसू नये किंवा पाहायची भीती वाटावी यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय? कदाचित हा रंगवलेला मुखवटाच आपला चेहरा असावा या भ्रमात जगणे ही माणसे पसंत करत असावीत.

मुखवटे चढवणे वाईट असे म्हणता येत नाही, बरेचदा ते चढवणे आपल्या आणि इतरांच्या फायद्याचेच असते, कधीतरी आत्यंतिक गरजेचेही असते. परंतु सतत मुखवटे चढवून मिरवणारी माणसे स्वत:ची आणि इतरांची फसवणूकच करत असतात. माणसाने या मुखवट्यांच्या आणि रंगांच्या गर्दीत स्वतःला विसरून जावे याचे कोठेतरी आश्चर्यही वाटते.

मध्यंतरी वाचनात आले होते की काही सिने नट-नट्या झोपतानाही आपला मेक-अप उतरवत नाहीत. केवळ या भीतीपोटी की सकाळी उठून आपण स्वत:लाच ओळखले नाही तर काय घ्या? भारतीय नट नट्यांचे फारसे माहीत नाही पण मायकेल जॅकसन तोंडाला रंग लावूनच झोपतो असे ऐकले होते. विनोदाचा भाग सोडला तर या कलावंतात आणि सामान्य माणसात फार फरक आहे असे मला वाटत नाही. प्रत्यक्ष जगातही बरेचजण मुखवट्यालाच चेहरा समजून जगत असावेत आणि आरशात स्वत:ला सर्वात सुंदर समजत असावेत याचा मनाला कोठेतरी खेद वाटतो.

Friday, November 03, 2006

डोळ्यांत वाच माझ्या...

रन-अवे ज्युरी हा चित्रपट अनेकदा पाहिला आहे काल पुन्हा एकदा पाहिला. काही क्षण, काही प्रसंग कारण नसताना मनात भरून राहतात तसा या चित्रपटात एक वेधक प्रसंग आहे.

एका मोठ्या बंदुकीच्या कंपनीविरुद्ध खटला हातात घेतलेल्या एका अत्यंत तत्त्वनिष्ठ वकिलाला मार्ली नावाची एक तरूण मुलगी खटल्यातले ज्युरी आपल्या मुठीत आहेत असे सांगून ब्लॅकमेल करत असते. अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि कायद्याशी खेळणार्‍या या मुलीचा राग आल्यावाचून आपल्याला राहवत नाही. पुढे एका प्रसंगात या वकिलाची आणि मार्लीची समोरासमोर भेट होते, बोलणं होतं आणि आपले साधे, शांत आणि थोडेसे शामळू डोळे तिच्या निर्ढावलेल्या डोळ्यांवर रोखून तो वकील तिला विचारतो, 'कोणी दुखावलंय का गं तुला, म्हणून तू हे सर्व करत्येस?' आणि संपूर्ण कथानक त्या एका वाक्यावर उलट फिरते. अनपेक्षित प्रश्नाने मार्लीच्या डोळ्यांत एक अस्पष्ट दुखरी रेषा उमटते आणि काहीतरी विलक्षण दु:ख ती मनाशी बाळगून आहे याचा अंदाज प्रेक्षकांना येतो आणि मार्लीबद्दल अचानक ओलावा निर्माण होतो.

Eyes are the windows to the soul, असं कोणीतरी म्हणून गेले आहे. आपल्या डोळ्यांतून प्रत्येक मानवी भावना व्यक्त होते. राग- लोभ- काम- मत्सर, यासारख्या आणि इतर अनेक गुणावगुणांनी भरलेले डोळे माणसाचे चारित्र्य सहज सांगून जातात.

नुकतेच जन्माला आलेले बाळ या जगाचा पहिला आस्वाद बहुधा डोळ्यांनीच घेत असावे. लहान बाळांचे डोळे फार स्वच्छ आणि नितळ असतात आणि लहान बाळांना काही फुटापर्यंतचेच दिसते म्हणतात. बहुधा लबाडी, मत्सर, राग यांनी त्या डोळ्यांत शिरकाव केलेला नसतो म्हणूनही असेल. बराच काळ आई हेच त्यांचे जग असते; म्हणूनच की काय त्यांची नजर निर्व्याज आणि निरागस असते. पण माणूस जसजसा मोठा होत जातो तसतशी त्याची दृष्टी व्यापक होते आणि चांगल्या वाईट सर्वच गोष्टी त्याच्या नजरेत भरायला लागतात आणि माणसाची नजर हळूहळू बदलत जाते, व्यापक होत जाते.

ही व्यापक झालेली नजर तरी किती प्रकारची; प्रेमळ नजर, रागीट नजर, दु:खी नजर, जरबेची नजर, लबाड नजर, अधाशी नजर, लाजाळू नजर, भेदरलेली- घाबरलेली नजर, अवखळ नजर, मादक नजर, बेफिकिर नजर, सोज्वळ नजर, आणि ही अनेक प्रकार असतीलच.

जिथे बोलताना शब्द अपुरे पडतात तिथेही डोळे बरंच काही सांगून जातात. डोळ्यांनी हसणे, रागावणे तर आलेच; पण डोळे मारणे, नेत्रपल्लवी करणे, नयनसुख घेणे या डोळ्यांच्या नशिबी येणार्‍या काहीशा वेगळ्याप्रकारच्या भावना. डोळे लक्ष ठेवून असतात, वटारलेले असतात, मिटलेले असतात, टक्क उघडे असतात, डोळ्यांत धूळ फेकता येते, डोळ्यांनी मागोवा घेतला जातो आणि पाठलागही केला जातो.

एखाद्याच्या डोळ्यांना डोळे भिडतात आणि माणसे प्रेमात पडतात. प्रेमात पडण्याचा यापेक्षा सोयिस्कर आणि सरळ मार्ग दुसरा नसावा. डोळे सरळ हृदयालाच हात घालतात म्हणे. डोळ्यांतून जे व्यक्त करता येते ते बरेचदा शब्दांतून करता येत नाही आणि तरीही डोळ्यांतील भाव व्यक्त करण्यावर अनेक वाक्प्रचार, कविता आणि गाणी लिहिली जातात.

या नजरेतलं मला जे आवडतं ते लहान मुलाच्या नजरेत असणारी निरागसता, आप्तांच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा विश्वास, आपुलकी, स्नेह आणि जगातले सर्व शोध या डोळ्यांपाशी येऊन संपल्याची भावना. ती व्यक्त करायला ब्रायन ऍडम्सच्या या गीतापेक्षा सुंदर शब्द नसावेत ---


Look into my eyes - you will see
What you mean to me
Search your heart - search your soul
And when you find me there you'll search no more .....

Monday, October 02, 2006

विश्वासाचे पानिपत

अशीच एक इ-मेल साखळीतून आलेली गोष्ट आठवली.

एक वडील व मुलगी जंगलातून जात असतात. अंधार पडतो, वाट अरुंद असते, पुढे पाणथळ जागा लागते. वडील मुलीला सांगतात की तू माझा हात घट्ट पकड, आपण हा रस्ता पार करून जाऊ. ती लहान मुलगी वडिलांना म्हणते, 'नको बाबा, तुम्ही माझा हात पकडा आणि आपण हा रस्ता पार करून जाऊ.'

वडील आश्चर्याने विचारतात, 'तुझ्या माझ्या बोलण्यात फरक तो काय बेटा?'

तशी मुलगी म्हणते, 'बाबा मी तुमचा हात पकडला आणि पुढे संकट आलं तर मी कदाचित तुमचा हात सोडून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीन. पण तुम्ही माझा हात पकडला आणि संकट आलं तर तुम्ही माझा हात सोडणार नाही. आधी मला वाचवाल मग स्वत:ला.'

अशी छानशी गोष्ट असायला हरकत काहीच नाही, तशी ती मला विश्वासार्हही वाटते. मनुष्याचे आपल्या मुला बाळांवर आपल्या आई वडिलांपेक्षा अधिक प्रेम असते हे सत्यच त्यातून पुढे येते. परंतु त्यापुढे जाऊन अकबर बिरबलाची माकडिणीची गोष्ट आठवते आणि वरील गोष्टीचा पाया काहीसा डळमळीत होतो.

हौदात आपल्या पिलासमवेत एका माकडिणीला उभं करून त्यात बिरबल पाणी भरायला लावतो. माकडीण पिलाला घट्ट धरून कावरीबावरी होऊन उभी राहते. पाणी चढत जातं तशी तिची पिलाला कसं वाचवावं अशी घालमेल होते. शेवटी पाणी नाकापर्यंत चढतं तशी मात्र ती पिलाला पायाखाली टाकून त्यावर उभं राहून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाला स्वत:चा जीव सर्वात प्रिय असतो हे बिरबलाचे म्हणणे खरे ठरते.

माझ्या मनात या दोन्ही गोष्टींवरून फक्त एकच प्रश्न उठतो; वरील गोष्टीतल्या मुलीने वडिलांवर जेवढा विश्वास टाकला तितकाच विश्वास त्या माकडिणीच्या पिलानेही आपल्या आईवर टाकला असेल का?

विश्वास हे मला दुधारी शस्त्र वाटतं. दुसर्‍यावर अती विश्वास ठेवला तरी फसवणूक होऊ शकते आणि सतत अविश्वास दाखवत गेलं तरी नुकसान संभवण्याची शक्यता असते. कधीतरी आपण ठरवतो की विश्वास उत्पन्न व्हायला खूप वेळ लागतो आणि कधीतरी पर्याय नाही म्हणून एखाद्यावर चटकन विश्वास ठेवतो.

या विश्वासाचं आणि माझं 'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं काहीतरी विचित्र नातं आहे. या शब्दावर विचार करायला बसलं तर दरवेळेस वेग वेगळे विचार डोक्यात येतात आणि विचार न करता कुणावरतरी विश्वास टाकून मोकळं व्हावं असं वाटतं. 'Utter confusion' यालाच म्हणत असावे. विश्वास आणि विश्वासाशी साधर्म्य सांगणार्‍या शब्दांची उकल अशी करता येईल:

१) धारणा (belief): मनुष्याची एखाद्या विषयाबाबत एखादी ठाम धारणा (किंवा पक्का समज) असू शकते. ती पाळणे, तिचे संवर्धन करणे हे त्या मनुष्याच्या इच्छेनुसार होत असते. बरेचदा धारणा खरी की खोटी या कडे फारसे लक्ष दिले जात नाही. ती आहे तशीच कुरवाळत बसण्यात माणसाला आनंद मिळत असावा. इतर प्रकारांच्या मानाने धारणा ही फारशी कडवी नसावी असे वाटते.

२) विश्वास (trust, confidence): हा धारणेचा पुढचा टप्पा असावा. सहसा विश्वास या शब्दाचा वापर अतिशय सकारात्मक तर्‍हेने केला जातो. एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर आपण किती अवलंबून आहोत यावरून आपण त्यांच्यावर किती विश्वास टाकतो हे परिमाण बहुधा ठरत असावे. वर म्हटल्याप्रमाणे कधीतरी इतरांवर किती विश्वास टाकावा हे ही कळेनासे होते. तरीही विश्वास हा डोळस वाटतो.

एखाद्या व्यक्तीचा विश्वास जिंकणे किंवा संपादन करणे, एखाद्यावर विश्वास दर्शवणे हे सुखदायक आणि फायदेशीर ठरू शकते तर विश्वासाचे तुटणे, विश्वास खोटा पडणे, विश्वासघात होणे हे दु:खदायक असण्याची किंवा नुकसानदायी ठरण्याची शक्यता वाटते. अशा मोडलेल्या विश्वासाचे किंवा विश्वासघाताचे सल मनातून जायला फार वेळ लागत असावा.


३) श्रद्धा (faith): श्रद्धा हा शब्द बहुतेकवेळा देवाशी निगडित असतो. देवाशी नसला तर आयुष्यातील अधिकारी व्यक्तींशी असतो त्यात आई-वडील, गुरू, जोडीदार यांचा समावेश होऊ शकतो. श्रद्धा हे दृढ विश्वासाचे रूप वाटते. बरेचसे धर्म श्रद्धेला व श्रद्धेच्या बळाला महत्त्व देतात असे दिसते. श्रद्धेची व्याख्या कुठेतरी 'कसलाही पुरावा दाखवण्याची गरज नसलेली धारणा' अशी केल्याची वाचलेले आठवते. दुसर्‍या शब्दांत श्रद्धा ही आंधळी असते असेही म्हणता येईल आणि असं म्हणायला गेलं तर सर्वच श्रद्धा अंधश्रद्धा ठरतील; तरी श्रद्धा कधी खोटी पडू नये, तुटणार्‍या श्रद्धेतून सावरणे प्रत्येकालाच शक्य असते असे वाटत नाही.

विश्वासाचं असं पानिपत केल्यावरही एखाद्यावर किती, कसा आणि कधी विश्वास ठेवायचा हे मला अजूनही ठरवता आलेलं नाही, कदाचित ते त्या त्या वेळेवरील त्या त्या परिस्थितीवरच अवलंबून असावे आणि माणसाने हेच सत्य स्वीकारून 'आलीया भोगासी' म्हणावे.

Thursday, September 28, 2006

मी, गूगल आणि चंगीझ

They rode the fastest horses
left the wind behind
thousand men
and one man led the way
the others followed blind
Genghis Khan.
They galloped over mountains and desert sands
they carried desolation throughout the land
and nothing there could stop them in this world.



Phew!!! साध्याच ओळी काहीही विशेष नसलेल्या. विशेष फक्त एकच नाव गेंगिझ खान किंवा चंगीझ खान. इतिहासातला क्रूरकर्मा अशी सहसा ओळख करून दिला जाणारा बाराव्या शतकातील मंगोल शासनकर्ता.

फारा वर्षांपूर्वी शाळेत असताना कुणीतरी माहीती पुरवली, "खान या शब्दाचा अर्थ 'राजा' असा होतो माहीत्ये?"
"कुठल्या भाषेत, उर्दु?" "उर्दुत नाही पण बहुधा मंगोलियन मध्ये असावे."
"हॅ! हॅ! काहीतरीच काय?"
"काहीतरीच नाही काय, मुघल हा शब्द पण मंगोल या शब्दाचीच व्युत्पत्ती आहे. चंगीझ खानही मंगोलियन होता."
"आता हा कोण चंगीझ? तो प्रेमनाथ आणि बीना रॉयच्या सिनेमात होता तो? लांब लोंबणार्‍या मिशांचा आणि पिचक्या डोळ्यांचा मनुष्य? तो सगळ्या खानांचा 'बाप' आहे की काय? मजाच आहे म्हणायची."
तशी त्याकाळात फक्त कुर्बानी फेम फिरोझखान आणि शोले फेम अमजदखान आणि कधीतरी कादरखान एवढेच प्रसिद्ध होते.

चंगीझची पहिली ओळख तिथे झाली. नंतर कधीतरी ऐतिहासिक पुस्तकांतून ओझरतं चंगीझ दर्शन व्हायचं तितकंच. त्यानंतर कुणा शेजार्‍यांच्या घरांत Dschingiz Khan या जर्मन ग्रुपचं गाणं ऐकलं. आता ७०-८० च्या दशकांतल्या डिस्को गाण्यांत चपखल बसेल असे पेहराव, वेशभूषा आणि हावभाव दाखवणारे चित्र आणि गाणे. त्यातले 'हे रायडर, हो रायडर, चेंग चेंग चेंगीझ खान' फारच मजेशीर वाटायचं. Whoa!! हा माझा आवडता शब्द कदाचित मी यांच गाण्यातून शिकले. त्यावेळी काही या गाण्यांचे व्हिडिओ निघायचे नाहीत. निघाले तरी ते भारतात पोहोचायचे नाहीत.

गेल्या काही दिवसांत सहज गूगल व्हिडिओवर गुगलताना मला हे गाणं चटकन मिळून गेलं. आता इतक्या वर्षांनी त्याचा व्हिडिओ पाहणे म्हणजे फारच विनोदी प्रकार; तरी हे गाणं पुन्हा इतक्या वर्षांनी ऐकायला आणि पाहायला मिळाल्याचा आनंदही झाला. कर्म धर्म संयोगाने त्याच दिवसांत NGC वर चंगीझ खानबद्दल डॉक्युमेंटरी दाखवली गेली. माझ्या मनात चंगीझ घोटाळत राहायला यापेक्षा अधिक काय हवं?


तसंही अलेक्झांडर द ग्रेट वाचून झालेला आहे तेंव्हा चंगीझ सुरू करायला हरकतच नव्हती. दोघेही अफाट कर्तृत्वाचे; पण अलेक्झांडर एवढा मान चंगीझच्या वाट्याला न यायचे कारण त्याचे मंगोलियन पठारावरील रानटी समजल्या जाणार्‍या टोळ्यांतून येणे व एरिअन आणि प्लुटार्क सारखे इतिहासकार न लाभणे असू शकेल. यानंतर चंगीझची माहीती गुगलून काढली, काढते आहे, काम सुरू आहे. फक्त वाचनाबरोबरच लिहून काढायचे मनात आले.... आणि मराठी विकीवर चंगीझने पुनश्च जन्म घेतला.

Saturday, September 23, 2006

परफ्युमेनिएक

हे परफ्युम्जच वेड कधी लागलं ते आठवणं फार कठीण नाही. अबुधाबीला ऑफिसमध्ये दर उन्हाळ्याच्या आधी नोटीस लागायची, 'उन्हाळा सुरू होत आहे तरी प्रत्येकाने चांगल्या प्रतीची परफ्युम्ज लावून येणे.' आज्ञा शिरसावंद्य या नात्याने वेगवेगळ्या आकाराच्या, नक्षीच्या आणि अर्थातच वासांच्या बाटल्यांची वर्णी घरात लागायची. नंतर डिओडरन्ट्स, EDP, EDT आणि EDC असं शेपूट वाढतच गेलं.

आवडीच्या वस्तूंचं व्यसन लागायला वेळ लागत नाही म्हणतात, तसं हे व्यसन गेली बरेच वर्षे माझ्या बोकांडी बसले आहे. सुगंधाची आवड कुणाला नसते म्हणा. त्या अनुषंगाने अत्तरांचा उगम शोधायचा थोडासा प्रयत्न केला.

पुरातन काळातही अत्तराच्या कुप्या आढळून आल्याचे पुरावे सापडतात. अर्थातच याचा पहिला रोख जातो इजिप्तकडे. तेथील पिरॅमिड्समध्ये अत्तराच्या कुप्या सापडलेले आहेत. अत्तरे मृतांची शरीरे राखून ठेवण्याच्या कामी वापरली जायची. इतर धार्मिक कार्यातही अत्तरांचा वापर होत असे. ही अत्तरे माती किंवा लाकडाच्या सुबक बाटल्यांमध्ये साठवली जात. काचेच्या बाटल्यांत अत्तरे साठवण्याची सुरुवात अर्थातच ग्रीक किंवा रोमन संस्कृतीत सुरू झाली. प्राचीन अत्तरांच्या काचेच्या कुप्या अजूनही उत्खननातून सापडल्या आहेत. सॉक्रेटीसला म्हणे अत्तरांच्या वापरावर आक्षेप होता. त्याच कारण अगदी साधं सरळ होतं. अत्तराच्या वापराने गरीब कोण व श्रीमंत कोण याची वर्गवारी करणे कठीण होईल असे त्याला वाटायचे. गरीबांच्या अंगाला फक्त घामाचाच वास आला पाहिजे अत्तरांचा नाही. श्रीमंत ग्रीक मौल्यवान रत्ने कोरून त्यात अत्तरे साठवायचे असा उल्लेखही वाचनात आला आहे.त्या पार्श्वभूमीवर भारताच्या पुरातन इतिहासात अत्तरांचे संदर्भ मिळतात का तेही शोधले तेंव्हा सिंधू नदीच्या संस्कृतींमध्ये मातीच्या भाजलेल्या (Terra-Cotta) कुप्यांमध्ये अत्तरे साठवली जात.

आपल्या देवांनाही या सुगंधाचे (fragrance) किती वेड. (देवांना की भक्तांना तो वेगळा विषय.) चंदन, फुलांचे हार, अगरबत्ती, धूप, तूप यांच्या सुवासातच आपले देव सदा माखलेले. सुवासाने चित्त उल्हासित राहते. मन शांत राहते. आनंद द्विगुणित होतो याच त्या मागच्या खऱ्या भावना असाव्यात.

पंचेंद्रियातील एक इंद्रिय म्हणजे गंध. माणसाच्या नाकाशी संबंधित. सुगंध बरंच सांगून जातो म्हणतात. दुसऱ्याला आकर्षित करणे, आपल्याजवळ येण्यास भाग पाडणे, दुसऱ्याच्या मनात चटकन आपल्याबद्दल आवड उत्पन्न करणे अशा अनेक गोष्टींसाठी सुवासाचा वापर होतो. विशेषत: पुरातन काळापासून बायका डोक्यात फुले माळणे, गळ्यांत फुलांचे हार किंवा केसांत वेणी माळणे हे याच कारणास्तव करायच्या.


सुगंधाची निर्मिती माणसाने निसर्गातील अनेक सुगंधी वस्तूंचा वापर केल्याचे जाणवते, त्यात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश होतो. जसे विविध फुले, पाने (नीलगीरी, लव्हेंडर, रोझमेरी), झाडांची मुळे (आले), खोडे (चंदन, पाईन, रोझवूड), झाडांची साले (दालचिनी), बिया (कोको, वेलची, नट्मेग), फळे, डिंक, मध, कस्तुरी अशा अनेक गोष्टींपासून सुगंध निर्मिती होते. यांच्यापासून अर्क काढून ते पाण्यात मिसळल्यावर अर्काच्या पाण्यातील प्रमाणावरून परफ्युम की EDP, EDT आणि EDC ते ठरवले जाते.

आता सुगंधावरून कुठला परफ्युम बाई की पुरुषासाठी, कुठला सकाळ/ संध्याकाळसाठी, कुठला परफ्युम कुठल्या समारंभासाठी हे ठरवले जाते. इतकंच नव्हे तर हल्ली माणसाच्या मनोवृत्तीला साजेसे परफ्युम्ज बनवले जातात. म्हणजे एखाद्याला आपला trade mark त्यावरून सहज ठरवता यावा.

हे सर्व लिहिण्याचं मनात आलं कारण एक लेख वाचत होते. 'When to buy perfumes?' आता माझ्यासारख्या परफ्युमेनिएकला खरेदीसाठी काळ वेळ थोडाच लागतो. अमेरिकेला परफ्युमेनिआ नावाची दुकाने आहेत. या दुकाना समोरून रिकाम्या हाताने कधी गेल्याचे आठवत नाही. (नाही म्हणजे या दुकानासमोर उभं राहण्याची संधी माझा नवरा फार वेळा देतो अशातलाही भाग नाही. :) ) जेव्हा संधी मिळेल तेंव्हा या दुकानात घुसून खरेदी करते. आता एक एक किंमती पाहता नक्की काय परवडत हा वेगळा विचार करण्याजोगा विषय.

जिथे जायचं तिथे परफ्युम वापरण्याचा आणि कुठेही जायचे नसेल तरी ह्या परफ्युम वापरण्याच्या माझ्या वेडामुळे घरच्या माणसांनी परफ्युमेनिएक असं माझं बारसं करून टाकलं आहे. माझ्या आत्तापर्यंतच्या पाच आवडत्या परफ्युम्जची यादी येथे देत आहे. सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत. या यादीत भर पडावी अशीच इच्छा.

POISON by Christian Dior
AMARIGE by Givenchy
ORGANZA by Givenchy
POEME by Lancome
BEAUTIFUL by Estee Lauder

marathi blogs