प्रकार

Monday, July 18, 2011

एका येडपटाची पत्रे

कोर्‍या चेहर्‍याने विनोद करणार्‍या व्यक्तींची मला नेहमीच गंमत वाटत आली आहे कारण ते विनोद करतात की गांभीर्याने काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात चटकन लक्षात येत नाही आणि असे माझेच का इतरांचेही होत असावे असे वाटते.

माझ्या मुलीला शाळेत इंग्लीशच्या एका गृहपाठासाठी "यडपटाची पत्रे" असा विषय होता. "लेटर्स फ्रॉम ए नट" हे पुस्तक तिने लायब्ररीतून आणले होते त्याचे थोडेफार वाचन केले आणि हसून हसून मुरकुंडी वळणे या वाक्प्रचाराची प्रचिती घेतली.

टेड नॅन्सी हे बॅरी मार्डर या विनोदी नटाचे टोपण नाव. या नावाने त्याने अनेक कंपन्यांना, व्यवसायांना आणि व्यावसायिकांना पत्रे लिहिली. पत्रांची धाटणी गंभीर पण आशय अतिशय बावळट अशा स्वरूपाची ही पत्रे ज्यांना गेली त्यातील काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले तर काहींनी त्याची गांभीर्याने उत्तरेही दिली. ही पत्रे त्याने "लेटर्स फ्रॉम ए नट" आणि इतर पुस्तकांत संकलित केली आहेत. जेरी साईनफेल्डची प्रस्तावना या पुस्तकांना आहे. त्यापैकी काही पत्रांचे संक्षिप्त रूप आणि अनुवाद येथे देते -

टेड नॅन्सीची पत्रे निळ्या रंगात आणि उत्तरे लाल रंगात टाकली आहेत.
पत्र पहिले - नॉर्डस्टॉर्म या प्रसिद्ध दुकानाला लिहिलेले

पत्राचा थोडक्यात आशय असा -


ब्रुस नॉर्डस्टॉर्म,
नॉर्डस्टॉर्म
गेल्यावेळी तुमच्या दुकानात फेरफटका मारताना दुकानात ठेवलेला एक पुतळा (mannequin)दृष्टीस पडला. हा पुतळा मला विकत घेण्याची इच्छा आहे कारण माझ्या दिवंगत मित्राच्या चेहर्‍याशी मिळता जुळता चेहरा मला तिथे सापडला. तो त्याच्या कुटुंबाला भेट देण्याचा मनसुबा आहे.

तरी मला पुतळ्याची किंमत कळवणे.

टेड नॅन्सी.


या पत्राला ब्रुस नॉर्डस्टॉर्मकडून व्यवस्थित उत्तर आले -टेड नॅन्सी,

तुमची मागणी अतिशय रोचक वाटली. खरे सांगायचे तर, आपल्या जीवलगाच्या मृत्यूनंतर त्याचा पुतळा अशाप्रकारे घरी ठेवण्याची कल्पना त्यांच्या कुटुंबाला रुचेल असे वाटत नाही.

तरीही, आमच्या सर्व गिर्‍हाईकांना सकारात्मक उत्तरे देण्याचा आमचा प्रयत्न असल्याने हे कळवू इच्छितो की आम्ही दुकानातले पुतळे जोपर्यंत वापरतो तोपर्यंत ते विकत नाही. परंतु जेव्हा ते बदलायची वेळ येईल तेव्हा ज्या किंमतीला आम्ही ते विकत घेतले त्याच किंमतीला आम्ही ते तुम्हाला विकत देऊ.

अधिक माहितीसाठी आपल्या घराजवळील स्टोर मॅनेजरशी संपर्क साधावा. मी हे पत्र त्यांनाही पाठवतो आहे.
ब्रुस नॉर्डस्टॉर्म

पत्र दुसरे -

प्रशासन,
द कोका कोला कंपनी,
अटलांटा

मी एक नवे पेय शोधले आहे - काएट डोक. हे पेय तुमच्या डाएट कोक या पेयामध्ये हस्तक्षेप करेल का हे जाणून घ्यायचे आहे. अर्थातच माझ्या पेयाची चव कोकसारखी नाही!! (ती पेप्सीसारखी आहे.)

मी हे पेय बांधकाम मजूरांना विकतो आणि त्यातील एकाने मला सांगितलेही होते की ते अजिबात कोकसारखे वाटत नाही.

मी हे पेय राजरोस विकू शकतो का हे मला कृपया कळवावे. सोबत आपण कोका कोलामध्ये कॅरमेल घालता का हे ही कळवावे.

धन्यवाद,
टेड नॅन्सी.


याला कोकाकोलाचे उत्तर (संक्षिप्त)

टेड नॅन्सी,

आपल्या पत्राबद्दल धन्यवाद.

डाएट कोक हा आमचा ट्रेड मार्क असून आम्ही तुम्हाला काएट डोक या नावाने पेयविक्रीची परवानगी देत नाही. काएट डोक हे नाव आमच्या डाएट कोकशी मिळतेजुळते असून ते बाजारात गोंधळ निर्माण करेल अशी आम्हाला शंका वाटते आणि आमच्या गिर्‍हाइकांचा हे कोका कोला कंपनीने मान्यता दिलेले उत्पादन आहे असा गैरसमज होऊ शकतो. यामुळे आपण काएट डोकचे उत्पादन ताबडतोब बंद करावे.

ट्रेडमार्क काउन्सिल,
द कोका कोला कंपनी


याला टेड नॅन्सीनी आणखी विक्षिप्त उत्तर पाठवले.

द कोका कोला कंपनी
अटलांटा,

मी ठरवले आहे की मी काएट डोक या पेयाची विक्री करणार नाही. मी माझे बँकेतले पैसे आणि काएट डोकचे उरलेले ११ कॅन घरी नेले आहेत.

मला कळून चुकले आहेत की ही एक कमजोर कल्पना होती. माझा मूर्खपणा दुसरे काही नाही. म्हणजे असे बघा की तुम्ही ७-११ मध्ये जाऊन डॉ.पेपर, ऑरेंज क्रश, विंक आणि काएट डोक पाहिलेत तर तुम्ही काएट डोक थोडेच विकत घेणार? मला तसे वाटत नाही. माझ्या वाह्यात कल्पनेने मी शरमिंदा झालो आहे. तुमचा वेळ वाया घालवल्याबद्दल क्षमा मागतो.

तरी तुम्ही माझ्या नव्या पेयाकडे लक्ष ठेवून राहावे - पाएट डेप्सी. त्याचे घोषवाक्य ओळखीचे आहे - 'इट टेस्ट्स नथिंग लाइक कोक!'

बरं, मी ते कोकमध्ये कॅरेमेल असण्याबद्दल विचारले होते त्याला तुम्ही उत्तर दिले नाही. शक्य असल्यास कळवावे.

टेड नॅन्सी.बॅरी मार्डर ही अशाप्रकारे अनेक पत्रे टेड नॅन्सीच्या "लेटर्स फ्रॉम ए नट", "एक्स्ट्रा लेटर्स फ्रॉम ए नट" या पुस्तकांत आहेत. कधी एखाद्या हॉटेलला पत्र पाठवून माझा दात तुमच्या हॉटेलात पडला होता तो कृपया शोधून मला पार्सल करावा अशी मागणी तर कधी दुसर्‍या हॉटेलला मी अब्राहम लिंकनसारखा दिसत असल्याने माझे संरक्षक दल सोबत घेऊन येऊ शकतो का अशी विचारणा. एका रेस्टॉरंटला या गृहस्थाने मी माझा खाजगी वेटर सोबत घेऊन येऊ का? अशी विचारणा केली होती.

असो. तर याप्रकारचा गृहपाठ करायचा आहे पण टेड नॅन्सीच्याच कल्पना जशाच्या तशा लिहायच्या नाहीत. काल आम्ही तीन कल्पना शोधल्या.

१. द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, एलिस आयलंड फाउंडेशनला एका रंगारी कंपनीकडून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी रंगवून देण्याचे पत्र लिहायचे. त्यात त्यांच्याकडून लिबर्टी देवतेच्या पोशाखाचे रंग कळवावे अशी मागणी करायची.

२. टॅटू पार्लरला मानेवर टॅटू काढून घ्यायचा आहे असे पत्र पाठवायचे. पत्रात टॅटू मानेवर कुठे हवा, किती मोठा हवा, तो काढून घेताना दुखेल का वगैरेची विचारणा करावी. शेवटी मी माझ्या शहामृगाला ठरवलेल्या वेळी घेऊन येतो असे कळवायचे.

३. हे पत्र शहराच्या झू ला पाठवायचे. माझ्या बहिणीचा १६ वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त पार्टी आयोजित केली आहे. पत्रात पार्टीबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आणि बहिणीला लहानपणापासून "टेडी बेअर्स" आवडतात. तिला तिच्या वाढदिवसाला सरप्राईझ द्यायचे आहे त्यासाठी दोन तास एखादे पोलर बेअर भाड्याने मिळेल का? अशी विचारणा करायची.

* चित्र जालावरून साभार

marathi blogs