प्रकार

Tuesday, March 14, 2006

सल


आज कित्येक वर्षांनी मला ती दिसली. सिद्धिविनायकाच्या बस स्टॉपवर आपल्याच विचारांत उभी होती. माझी टॅक्सी भुरकन निघून सुद्धा गेली तिच्या समोरुन, पण तिला पाहिलं आणि कितीतरी आठवणी दाटून आल्या, मनात आणि डोळ्यातही. मागेही एकदा अशीच दिसली होती. त्यामानाने आज बरी वाटली पण तिची कृश मूर्ती, विस्कटलेले केस, अंगावरचे साधे कपडे पाहून तिच्या परिस्थितीत फारसा बदल झाला नसावा असं दिसत होतं. नकळत एक अपराधी भावना मनात येऊन गेली.

तिला मधुमीता म्हणू की माहताब. मला वाटत सुरुवात मधुमीतानेच करावी. मधुमीता दत्त. इंजीनिअरींगच्या पहिल्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी मला भेटली. आमच्या मराठी मुला मुलींचा ग्रुप जमून येत होता, ओळख सुरु होती आणि जवळच एका बाकावर बसून एक उंच, नाजूक, निमगोरी, केसांची घट्ट वेणी घातलेली, शेलाटी मुलगी चेहऱ्यावर स्मितहास्य आणून आमच्याकडे पहात होती. थोडयाच वेळात कोणीतरी तिला आमच्यात बोलावल आणि तिची चौकशी सुरु केली.

"मॉधुमिता दत्त. मी अंधेरीला रहाते."

"बंगाली वाटत? हे बघ, आपल्याला मॉधु बिधु जमणार नाही. आम्ही तुला मीता म्हणू. चालेल?" कोणीतरी सुचवलं आणि ती आमची "मीता" झाली ती कायमचीच.

मीताच्या चेहऱ्यावर नेहमी शांत, विचारी भाव असायचे. तिच बोलणं वागणं सुसंस्कृत होत. तिला कधी मोठ मोठयाने बोलताना, खदखदून हसताना पाहिल्याच आठवत नाही. तरीही ती स्मार्ट होती. अभ्यासात, बोलण्यात, वागण्यात तिची सफाई सर्वांनाच आवडून जायची. एक होतं मात्र, ती आमच्यात असूनही आमच्यात नसायची. कॉलेजमधे आम्ही एकत्रच असायचो पण एकदा कॉलेजच्या बाहेर पडलो की मीता कधीच आम्हाला जॉईन व्हायची नाही. ती आमच्यापैकी कोणाच्या कधी घरी आली नाही, सिनेमाला नाही, पिकनीकला नाही. स्वत:च्या घरीही कधी तिने आम्हाला बोलावलं नाही. काही काम असेल तरच ती मला घरी फोन करायची. मीही २-४ वेळाच तिच्या घरी फोन केला होता. तिच्या आईशीही बोलले होते. तिची आई माफक चौकशी करायची. थोडंफार बोलणं व्हायच.

मीता घरात सर्वांत मोठी होती. तिच्यामागे अकरावीत एक भाऊ होता आणि शाळेत जाणारी धाकटी बहिण. मीताचे वडिल बॅंकेत ऑफिसर होते, आई घरातच असायची. अंधेरी इस्टला त्यांचं दोन बेडरुमच घर होतं. मीताचे वडिल कडक शिस्तिचे होते. शिकत्या मुलांनी फॅशन, सिनेमा, पिकनिक्समधे वेळ घातला की त्यांच अभ्यासावरचं लक्ष उडतं या मताचे होते. आई मात्र मृदुभाषी होती. मीता सारखीच. बस! या व्यतिरिक्त आम्हाला मीताची फारशी माहिती नव्हती आणि त्याची गरजही नव्हती.

बघता बघता तीन वर्ष निघून गेली. आमच्यात आणि मीता मधे घट्ट नातं तयार झालं होतं पण फक्त कॉलेजमधे. शेवटच्या वर्षाला नुकतीच सुरुवात झाली होती. लेक्चरला मीता माझ्या शेजारी बसली होती. लेक्चर चालू असताना मधेच मी मीताला काहीतरी गुणगुणताना ऐकल. मी तिच्याकडे पाहिल तर ती आपल्याच नादात पेपरवर बंगालीत काहीतरी खरडत होती.

"ए मीता, काय लिहित्येस?" मी तिला उत्सुकतेने विचारलं.

"काही नाही..असचं आपलं काहीतरी," असं म्हणून ती गोडशी हसली.

"ए तू प्रेमा बीमात तर नाही ना पडलीस? बॉयफ्रेंड तर नाहीना गाठलास?" मला तिची फिरकी घ्यायची लहर आली. त्यावरही मीताने मला फक्त एक गोडंस स्मितहास्य फेकलं. मीताला बॉयफ्रेंड असायला माझी काहीच हरकत नव्हती. या वयांत नाही तर मग केव्हा असणार? पण मीताचा बॉयफ्रेंड कोण असेल? बंगाली कि बिन-बंगाली, हॅंडसम, मीता सारखा उंच, देखणा? आणि तो काय करत असेल म्हणजे नोकरी की कोणी बिझनेस मन? अनेक प्रश्नांनी मनात गर्दी केली.

"ए मीता कॅन्टीन मधे चल ना. सांग ना मला सगळ. कुठे भेटला? काय करतो? कुठे रहातो?" मी प्रश्नांच्या फैरी झाडल्या.

"किती प्रश्न विचारतेस? त्या पेक्षा असं कर तू स्वत:च त्याला भेट. तो आज येणार आहे कॉलेज सुटल्यावर मला घेऊन जायला. तू भेटणार?" मीताने विचारल.

"भेटणार म्हणजे काय? भेटणारच," मी म्हटल आणि मीता गोडशी लाजली.

संध्याकाळी मी आणि मीता कॉलेजच्या गेट जवळ उभे होतो. काळोख व्हायला आला होता. थोडयावेळाने मीता म्हणाली, "तो बघ, येतोय समोरुन, ओळख कोण?"

मी समोरच्या गर्दीतून येणारे चेहरे न्याहाळू लागले. माझ्या कल्पनेतला उंच, देखणा तरुण कुठेच दिसत नव्हता. जो तरुण समोर येऊन उभा राहिला तो मीतापेक्षा अंमळ बुटका होता. त्याचे दात पुढे आलेले होते, नाकावर एक बऱ्यापैकी मस होता. त्याचे कपडे यथातथा होते. शर्ट बाहेर आलेला, ढगळ पॅन्ट, कुठल्याही अंगाने तो मीताच्या बरोबरीचा नव्हता. त्याला पाहून मी आ वासला नाही हेच काय त्यातल्या त्यात बरं म्हणायच.

"मीट रियाझ, रियाझ शेख," हा दुसरा शॉक इतका जबरदस्त होता की मी हाय हॅलो झाल्यावर तिथून काढता पाय घेतला.

घरी परतताना मी विचार केला की दिसण्यावर का जाव? आणि धर्मावरुन माणसाची परीक्षा करणाऱ्यातील मी नव्हे. पण एकंदरीत रंग चांगले नव्हते. मीताच्या घरी हे नक्कीच चालण्यासारख नव्हतं. हा प्रकार काय आहे याचा आपण शहानिशा करायचाच अस ठरवूनच मी त्या दिवशी झोपले.

दुसऱ्या दिवशी सकाळच्या एकाही लेक्चरला मीता हजर नव्हती. दुपारी प्रॅक्टीकलला ती आली पण आपल्याच विचारांत हरवलेली होती.

"मीता, मला बोलायचय तुझ्याशी, आपण नंतर कॅन्टीन मधे भेटू."
ठरवल्याप्रमाणे मीता कॅन्टीन मधे आली. मी तिला रियाझ बद्दल छेडलं. कुठे भेटला, काय करतो, हे घरी चालणार आहे का? अनेक प्रश्न विचारले.

मीता नेहमी सारखीच शांत दिसली पण तिच्या शांतपणात एक प्रकारची बेफिकिरी होती.

"बस स्टॉपवर भेटला. अंधेरीला पार्ट टाइम जॉब करतो. बी कॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे. गोवंडीला त्याच्या मोठया भावाबरोबर रहातो. बाकीच कुटुंब उत्तर प्रदेशात असतं. फार चांगला मुलगा आहे. माझी खात्री आहे की ग्रॅज्युएट झाल्यावर त्याला चांगली नोकरी लागेल आणि मलाही, मग दोघे मिळून आमच चांगलं चालेल."

"आणि घरच्यांच काय? तुझ्या डॅडना चालेल का?"

"हं," मीताचा चेहरा क्षणभर पालटला. "नाही चालणार. मला माहित्ये पण धोका पत्करायला मी तयार आहे आणि पुढे मागे सर्व एकत्र होतात."

वाटलं हिला गदागदा हलवाव आणि म्हणाव, जागी हो. कसलं स्वप्न बघत्येस? फ्लॅट मधे वाढलेली तुझ्यासारखी मुलगी गोवंडीच्या चाळीत रहाणार आहे का? काय माहिती आहे त्याच्या कुटुंबाची, माणसांची की तू खुशाल पुढच्या आयुष्याची चित्रं रंगवत्येस. मीतासारखी मुलगी असला वेडेपणा करु शकते यावर माझा विश्वास बसत नव्हता. पण मी गप्प राहिले. फक्त एवढचं म्हंटल की, "घाई करु नकोस. शेवटचं वर्ष आहे, अभ्यासात लक्ष ठेव."
त्यानंतर मीता पार बदलून गेली, कधी लेक्चरनां दांडी, कधी प्रॅक्टीकल्सना. हजर असली तरी आपल्याच नादात. संध्याकाळ होण्याची वाट पहात. रोज संध्याकाळी रियाझ तिला घ्यायला यायचा. एव्हाना ही गोष्ट ग्रुप मध्ये सर्वांच्या लक्षात आली होती, माझा ग्रुपच नाही तर प्रोफेसर, लेक्चरर यांनाही कुणकुण लागली होती. कधी कधी मीताचा प्रचंड संताप यायचा. माणसाने इतक वेड व्हाव की चांगल्या वाईटाचा विचारच सोडून द्यावा, अनेकदा तिच्या वागण्याच आश्चर्यही वाटायच.

असच एकदा रागाच्या भरात मी तिला म्हंटल, "मीता, काय लावल आहेस हे तू? अक्कल गहाण टाकली आहेस का? मला वाटतय की एक दिवस सरळ तुझ्या मा ला फोन करावा आणि सांगाव तुझ्या बद्दल. त्या दोघांना कल्पनाही नसेल की तू कॉलेजचा वेळ कसा घालवतेस याची."

"नको नको असलं काहीतरी नको करुस. माझं घरातून बाहेर पडणं बंद होऊन जाईल. काय आनंद आहे तुला त्यात. माझ खूप प्रेम आहे रियाझवर पण देईन अभ्यासावरही लक्ष," मीताने मनधरणी केली.

त्यादिवसा नंतर ती आमच्या पासून दूर दूर राहू लागली. वर्गात लांब बसायची, कॅन्टीनमधे भेटणं नाही, दिलखुलास बोलणं नाही आणि आठवडया दोन आठवडयात पुन्हा ये रे माझ्या मागल्या. मीताची गैरहजेरी वाढतच चालली होती. त्यातच सेमिस्टर परीक्षा आल्या...मीताची गैरहजेरी इतकी जास्त झाली होती की तिला परीक्षेला बसण्याची परवानगी नाकारण्यात आली.
आपल्याला नसत्या भानगडीत पडायचं काही कारण नाही अशी ग्रुपमधे प्रत्येकाची भावना होती. राहून राहून मला आश्चर्य वाटत होतं की आता काय होणार? किती दिवस घरच्यांपासून ही गोष्ट लपून रहाणार?
परीक्षा संपल्या, शेवटचं सेमिस्टर सुरु झालं, मीताचा काही पत्ता नव्हता. तिच्या घरी फोन करुन उगीच आपल्याला नको त्या चौकशीला समोर जायला नको म्हणून कधी फोनही केला नाही...आणि मग एके दिवशी अवचितच मीता आणि रियाझ कॉलेजमधे भेटायला आले.

अंगावर साडी, गळ्यात एक काळा पोत आणि तोंडभर हसू घेऊन मीता उभी होती, "आम्ही निका केला..दोन दिवसांपूर्वी. तुम्हा सगळ्यांना भेटून सांगावसं वाटलं."

"पण घरी कधी सांगितलस?"

"घरी कुठे सांगितलय? पळून जाऊन केलं. मा ला चिठ्ठी ठेवली होती, त्यांना नक्कीच कळलं असणार. आज जाऊ घरी असं रियाझ म्हणतोय पण डॅड घरात घेणार नाहीत हे मला माहित्ये."

"अगं पण मीता...."

"मीता नाही माहताब. निका पढण्यापूर्वी धर्म बदलला." मीता म्हणाली.

मला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. मीताचं इतक्या दिवसांपासूनच वागण पाहिलं तर हे सर्व अपेक्षितच होतं. यापुढे तिला फार काही विचारण्यात अर्थ आहे असही मला वाटत नव्हतं. फक्त "कॉलेजच काय करणार?" एवढं मात्र विचारुन घेतल. पण त्यावरही अजून काही ठरवलेलं नाही असं बेफिकिर उत्तर मीताने दिलं.

त्यानंतर कित्येक महिने, वर्षे मीताची भेट झाली नाही. मी माझ्या आयुष्यात व्यस्त झाले होत. लग्न, नोकरी, घर यासगळ्यात मीताची आठवणही काढायलाही वेळ नव्हता आणि मग एक दिवस अचानक माझी तिची भेट अंधेरी स्टेशनवर झाली. जुना पंजाबी ड्रेस, विस्कटलेले केस, खांद्यावर शबनम आणि कडेवर एक दिड वर्षांच बाळ.

"कित्ती बदलली आहेस तू मीता. ओळखलच नाही बघ तुला. कशी आहेस? काय करतेस? आणि हे बाळ कोण? मुलगा की मुलगी? कुठे निघाली आहेस? आणि रियाझ काय म्हणतो?" मी एका दमात सगळे प्रश्न विचारुन घेतले.

मीताने नेहमीसारख स्मितहास्य केलं पण त्यात एक प्रकारचा विशाद होता. मला कससच वाटून गेल.

"ही सारा. सव्वा वर्षांची आहे. रियाझ दुबईला असतो. तिथे नोकरी करतो."

"बरं झालं ना. तू का नाही गेलीस? की जाणार आहेस लवकरच?"

"नाही गं. तलाक देऊन गेला. आपलं जमतं नाही, तू आणि मी भिन्न परिस्थितीतून आलो आहोत असं म्हणायला लागला. मी तयार होते गं जमवून घ्यायला. सारा फक्त चार महिन्यांची होती. तेव्हापासून मा कडे असतो आम्ही दोघी. डॅड बोलतही नाहीत कधी बोललेच तर म्हणतात, तुझ्यामुळे आमची लाज गेली. धाकटया बहिणीच्या लग्नात अडथळे येतील. सगळीकडे छी थू झाली. आता आणि हे आणखी एक लोढणं गळ्यात बांधून घेतलं आहेस," मीताच्या डोळ्यात पाणी तरळत होतं.

समोरच्या प्लॅटफॉर्मवरुन ट्रेन धडधडत गेली की मीताच्या गोष्टीने पायाखालची जमीन थरथरली ते नाही सांगता यायचं.

"तू काही करतेस का मीता? म्हणजे नोकरी वगैरे?"

"हो. हल्लीच एके ठिकाणी असेंब्लरचा जॉब लागला आहे."

"असेंब्लर?"

"मी कुठे ग्रॅज्युएशन केलं? जी मिळाली ती नोकरी धरलीये गं. जगणं नकोस झालयं. मा कडे फार दिवस नाही राहू शकत. पायावर उभ रहायच म्हंटल तर कुठुन तरी सुरुवात करायला हवीच ना," मीता मंद हसत म्हणाली.

माझी ट्रेन येत होती, "मीता मला निघायला हवं, मीटींग आहे ऑफिसात महत्वाची, चुकवून चालणार नाही." घाई घाईत पर्स मधे हात घातला आणि पाचशेची एक नोट साराच्या हातात कोंबली आणि ट्रेनमधे घुसले.

"तुझा नंबर दे ना गं," मीता खालून ओरडली. गडबडीत लक्षातच आलं नव्हतं माझ्या आणि आता इतक्या गर्दीतून देणं अशक्यच होतं. त्यानंतर पुन्हा मीताची भेट झालीच नाही. दिसली ती आज. सिद्धिविनायकाच्या बस स्टॉपपाशी.

पण मनाला एक गोष्ट जरुर सलते. एक फोन कॉल मीताच्या इच्छेविरुद्ध मी तिच्या मा ला करायला हवा होता का? आपल्याला काय घेणं देणं? नसतं लफडं आपल्या मागे नको म्हणून मी नामानिराळे राहून तिच्या अधोगतीला जबाबदार आहे का? मैत्रीण तर तशीही गमावणारच होते, पण अचूक निर्णय घ्यायला मी कचरले होते हा सल अजूनही मनात कायम आहे.

6 comments:

P said...

वाईट वाटल वाचुन.पण खर सांगु का नंतर आपल्याला कितीही वाटल "आपण तस करायला हव होत का?""तस केल असत का?" तर "नाही". जेव्हा जस वागायच तसेच वागतो आपण. त्या त्या परिस्थितीनुसार. :(

Priyabhashini said...

अगदी खरयं. मी मला यात गुन्हेगार किंवा जबाबदार समजत नाही. हे ही खरं की आपण जसं वागायच तसं वागतो. पण आपण चुकलेल्याच्या डोक्यावर सहज खापर फोडतो आणि विसरतो की कदाचित त्याच्या बरोबर आपण स्वत:ही कुठेतरी चुकत असतो.

Anyways, Thanks for your comment. I have read your blogs. You write very touching. Keep it up!

Anonymous said...
This comment has been removed by a blog administrator.
जयदीप कुलकर्णी said...

Lekh surekh lihila aahe. Atishay vyavaharik .
Jaydeep.

Nayana Kulkarni-Dongare said...

आपण प्रयत्न करू शकतो पण कुणाच नशीब बदलवू शकत नाही याची खंत राहूनच जाते कुठेतरी. क्षणोक्षणी चुका घडतात आणि द्येये हरवून बसतात, आपल्याच रिकाम्या ओंजली, आपल्याला काही शिकवत असतात.

विचारमंथन said...

छान लिहिता तुम्ही....लिहत रहा

marathi blogs