प्रकार

Tuesday, October 21, 2008

वळणावर ती येते

हल्ली मी भल्या पहाटेच उठून ऑफिसला पळायची सवय केली आहे. लवकर पोहोचलं की भराभर कामं आटोपून लवकर निघताही येतं. संध्याकाळी क्लबला जाऊन निवांत गॉल्फ खेळायला वेळ मिळतो. दिवसभर बैठं काम करणार्‍यांना काहीतरी व्यायाम हा हवाच. गॉल्फच्या निमित्ताने व्यायाम होतो, ऑफिसात शिणलेलं डोकं शांत होतं आणि संध्याकाळ बरी जाते. नाहीतर माझ्यासारख्या सड्याफटींग माणसाने घरी एकट्याने काय करायचं हा मोठा प्रश्न असतो.


पहाटेचा मी घराबाहेर पडतो तेव्हा बाहेर मिट्ट काळोख असतो. गाडीच्या प्रकाशात रस्ता दिसतो तेवढाच, बाकी सर्वत्र अंधाराचे राज्य. गेले आठ-दहा दिवस मी मुख्य रहदारीचा सोडून एक लहानसा शॉर्टकट घेतो आहे. हा रस्ता एकपदरी आणि अरुंद आहे, वळणावळणांचा नागमोडीही आहे. गाडीचा वेगही बराच कमी ठेवावा लागतो पण मायलेज आणि गॅस बर्‍यापैकी वाचतो आणि धडधडत ऑफिस गाठण्यापेक्षा रमत गमत, शीळ घालत, पहाटेचा वारा खात जाण्यात काही और मजा असते. ऑक्टोबर लागल्यापासून गेले काही दिवस हवा थंड झाली आहे तरी गाडीच्या काचा खाली सरकवून आरामात प्रवास होतो. या रस्त्याच्या एका बाजूला मोठा तलाव आहे आणि दुसर्‍या बाजूला रान माजलं आहे. त्या रानामागे उंचच उंच झाडं पसरली आहेत. काळोखात तळ्यातल्या पाण्यावर शुभ्र धुकं तरंगताना काहीतरी रहस्यमय आकार घेताना दिसतं. पहाटेच्या मंद वार्‍यात पानांची सळसळ स्पष्ट ऐकता येते. आजकाल आकाशही बरेचदा ढगाळलेलं असतं. आकाशात संथ वाहणारे ढग चंद्राला झाकोळून टाकतात तेव्हा काळोख आणि मंद प्रकाशात प्रवास करताना एक अनोखा थरार जाणवतो. मात्र निसर्गाचं हे लोभस रुप हे एवढेच हा शॉर्टकट घेण्याचे कारण नाही.


मुख्य रस्ता सोडून या लहान रस्त्याला लागलं की फर्लांगभर अंतरावर रस्ता अचानक वळतो. इथे गाडीचा वेग अतिशय कमी करावा लागतो, फारतर ५-१० मैल. गाडीने वळण पूर्ण केल्याशिवाय पुढे काय आहे याचा पत्ताही लागत नाही. वळण धोकादायक असल्याची पाटीही येथे दिसते. वेग किंचित जास्त असेल तर बाजूच्या झाडावर आपटून किंवा समोरून येणार्‍या वहानाने धडक दिल्याने कपाळमोक्ष ठरलेला. आधीही बरेच अपघात झाले आहेत म्हणतात इथे पण इतक्या पहाटे इथे वर्दळ नसते आणि गेल्या आठ दिवसांत मी हे वळण अंगवळणी पाडलं आहे...... कारण वळणावर ती दिसते.


भल्या पहाटे फेरफटका मारायची सवय असावी तिला. पांढरा सफेत टिशर्ट आणि पँट घालून पाठीवर रुळणारे केस सावरत रोज ती याच वळणावर नजरेस पडते. चंद्रप्रकाशात तिचं रुप पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मती गुंग होणे म्हणजे नेमकं काय ते कळून आलं. इतकं अप्रतिम लावण्य घेऊन स्वर्गातली अप्सरा तर रोज इथे येत नसावी ना अशी शंका मनाला चाटून गेली आणि भारावल्यासारखा रोज मी या वाटेने येऊ लागलो. गाडीचा वेग वळणावर कमी केला की तिला निरखण्यात जो आनंद जिवाला होतो त्याचं वर्णन शब्दांत केवळ अशक्य आहे. त्या वळणावर केवळ क्षण दोन क्षण ती मला दिसत असावी. नंतर माझी गाडी वळते आणि ती दिसेनाशी होते पण त्या एका झलकेसाठी मी वेडा झालो आहे. कधीतरी तिला थांबवून विचारण्याचा, तिची चौकशी करण्याचा मोह होतो पण अजून हिम्मत बांधलेली नाही. तिची ओळख काढायची अनिवार इच्छा आहे हे निश्चित, मात्र काहीतरी रहस्यमय आहे तिच्यात, जे मला तिच्याकडे खेचतं आणि थांबवूनही ठेवतं.


तिच्याशी ओळख काढून घ्यायला मी का थांबलो आहे यावर गेले काही दिवस विचार करतो आहे. माझी भीड, सभ्यता की आणखी काही? तसा मी बायकांच्याबाबत प्रसिद्ध नसलो तरी माझं व्यक्तीमत्व कोणावरही छाप पाडणारं आहे. बायकांशी सभ्यतेने बोललं की त्यांच्याकडून फारसा विरोध होत नाही ओळख करून घेण्यात असा अनुभवही गाठीशी आहे.

वळणावर गाडीचा वेग कमी केला की तिच्याकडे क्षणभर का होईना निरखून पाहता येतं. ते काळेभोर केस, कपाळावर रुळणार्‍या बटा, सरळ चाफेकळी नाक, नाजूक जिवणी आणि डोळे. तिचे डोळे वेगळे आहेत, मोठे आहेत तिला शोभूनही दिसतात पण तेजहीन आहेत. गाडीच्या अंधुक प्रकाशातही त्यातील भाव ओळखण्याचा मी प्रयत्न केला आहे. तिचे डोळे निष्प्राण नाही..नाही निष्प्राण कसे असतील? पण थिजलेले आहेत. ते डोळे तर मला तिच्याशी ओळख वाढवून घेण्यापासून थांबवून ठेवत नाही ना हा प्रश्न मनाला मी दोन चारदा विचारला आहे पण निश्चित उत्तर मिळत नाही. तिच्याकडे पाहून काल स्मितहास्यही केलं होतं पण तिच्या त्या डोळ्यांत अस्पष्ट कुतुहलाखेरीज दुसरे कुठले भाव दिसले नाहीत.


आज घरातून निघताना लक्षात येतं आहे की आकाशात ढगांची गर्दी जमलीये. चंद्र क्वचित ढगांआडून बाहेर डोकावतो आहे तेवढाच. गाडीत बसता बसता पावसाचे दोन थेंब डोक्यावर शिडकतात. 'आज येईल का ती?’ मनात तिचेच विचार घोळत असतात. पावसाला सुरुवात होते. ती घरातून आधीच निघाली असेल तर पाऊस तिला गाठणार हे नक्की पण ती पावसाच्या अंदाजाने निघालीच नसेल तर? आज तिचं दर्शन होणार नाही. एक अनामिक हुरहुर माझ्या मनात जमा होत होती. 'आज ती दिसली तर गाडी थांबवायची. तिची ओळख काढायची. तिला गाडीत येण्याची विनंती करायची. तिला विचारायचं..... पण काय...... काय विचारायचं? ’ गाडी सुरू करता करता माझ्या डोक्यात विचारांचं मोहोळ उठलं होतं. काय विचारायचं? तिला काहीतरी विचारायचं असं मी मनाशी ठरवलं होतं पण नेमकं काय ते उलगडत नव्हतं. जिवाची घालमेल होत होती.


गाडी मुख्य रस्ता सोडून शॉर्टकटला लागली तेव्हा पाऊस रिपरिपत होता. रोजच्या वेगापेक्षाही मी थोड्या कमी वेगातच गाडी हाकत होतो. वळणावर ती येईल या आशेवर.


आणि वळणावर ती उभी होती. ओलीचिंब. तिचे ओले कपडे तिच्या भरदार शरीराला चिकटून बसले होते आणि तिच्या सौष्ठवाची जाणीव प्रकर्षाने करून देत होते. ओलेत्या बटा कपाळाला चिकटल्या होत्या. ती त्या मागे न सारता तशीच उभी होती. जशी कुणाची तरी वाट पाहत असावी. मी गाडी थांबवली, काच खाली सरकवली आणि चटकन गाडी अनलॉक केली.


"या लवकर, आत बसा. मी सोडतो घरी. " ती आत येईल की नाही अशी शंका मनाला चाटून गेली. तिने शांतपणे दरवाजा उघडला आणि ती सावकाश आत येऊन बसली. मी गाडी सुरु केली.


"कुठे सोडायचं तुम्हाला? " मी सहज आवाजात विचारलं.
"इथूनच पुढे. " ती माझ्याकडे न पाहता काचेतून सरळ बघत म्हणाली. तिच्या आवाजात गोडवा होता पण एक अनामिक रुक्षपणा त्यात भरलेला होता. घरी पोहोचण्याची घाई त्यात नव्हती की अनोळखी माणसाबरोबर त्याच्या गाडीत बसल्याची भीती. तिच्या आवाजात माझ्याशी बोलण्याची उत्सुकताही दिसत नव्हती. तरीही तिला बोलतं करणं भाग होतं. मी तिला मोजक्या शब्दांत माझी करून दिली. मी काय करतो, कुठे राहतो हे सांगता सांगता एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती, वातावरणात गारवा होता. ती ओलीचिंब होती पण तिच्या अंगावर शहारा नव्हता. तिला थंडी वाजत होती किंवा ती थंडीने थरथरत असल्याचे मुळीच जाणवत नव्हते. मी तिच्या गोर्‍यापान भिजलेल्या हातांकडे बघत होतो. अचानक तिला स्पर्श करण्याचा अनावर मोह मला झाला आणि ओळख करून दिल्यावर मी एक हात स्टिअरींगवर घट्ट रोवून दुसरा हात हस्तांदोलनासाठी पुढे केला. तिने सावकाश नजर माझ्याकडे वळवली आणि माझा हात हातात घेतला.


एक जबरदस्त सणक माझ्या डोक्यात गेली.....तिचा हात बर्फासारखा थंड होता. जिवंत माणसाचा हात असा थंड नसतो. त्यात धुगधुगी जाणवते, ती तिच्या स्पर्शात जराही नव्हती. मी कोणाबरोबर गाडीत बसलो होतो? माझ्या बाजूला बसलेली ही तरुणी कोण? मी गोंधळलो आहे पण घाबरलेला नाही.


"तुमचा स्पर्श थंडगार आहे, " ती हलकेच म्हणाली आणि मी कच्चकन गाडीचा ब्रेक दाबला.

"माझा? " मी चकित झालो होतो. तिची नजर आता माझ्यावर रोखलेली होती पण त्यात आता कुतूहल नव्हते एकतर्‍हेचा विषाद जाणवत होता.

"आठ दिवसांपूर्वी, " ती क्षणभर थबकली आणि पुढे बोलू लागली "तुम्ही मला पहिल्यांदा पाहिलेत आणि तेव्हापासून रोज त्या वळणावर आपण एकमेकांना दिसतो. "

"हो, " मी आवंढा गिळला.

"वर्षभरापूर्वी माझा त्या जागेवर अपघात झाला होता. तेव्हापासून मी इथे... " म्हणजे माझी शंका खरी होती. ही तरुणी जिवंत नाही. तिचे ते थिजलेले डोळे, मोकळे केस, पांढरे कपडे सर्वांचा संदर्भ लागत होता. माझ्या गाडीत, माझ्या शेजारी बसलेली ही बाई मानवी नाही... पण मला जे विचारायचे होते ते हे नव्हतेच ते तर यापुढे होते.


"आणि मी? " माझे शब्द घशात विरतात का काय वाटून गेले.
पाऊस थांबला होता. चंद्रावरचं ढगाचं सावट बाजूला होत होतं. चंद्रप्रकाशात आता समोरचा परिसर उजळून निघाला होता.


“मी इथे कधीपासून?”
"आठ दिवसांपासून. मी तुम्हाला वळणावर दिसले आणि रस्ता वळताना तुम्ही पुन्हा मागे वळून पाहिलंत. " ती पुन्हा तेच सांगत होती पण या वेळेस माझ्या डोक्यात प्रकाश पडला होता. हेच तर तिला गेले आठ दिवस विचारायचं होतं पण त्या प्रश्नाचं उत्तर आज माझं मलाच मिळालं होतं.

तिला पुन्हा एकवार पाहावं म्हणून मी त्या दिवशी गाडीच्या रिअर-मिररमध्ये डोकावून पाहिलं होतं पण आरशात कोणीच दिसलं नाही तेव्हा चमकून मान वळवून मागे पाहिलं होतं आणि त्या वळणावर गाडीवरचा ताबा सुटला होता.


हॅपी हॅलोवीन!!

Wednesday, October 15, 2008

कुमारी देवी

ही गोष्ट यापूर्वीही वाचली असली तरी आज पुन्हा नव्याने वाचतानाही तेवढाच खेद वाटला. तिचा दुवा येथे चिकटवत आहे.

http://www.news.com.au/heraldsun/story/0,21985,24467194-663,00.html

कुमारी देवीची प्रथा नेपाळात फार प्राचीन नसल्याचे सांगितले जाते. सुमारे १२ व्या ते १७ व्या शतकांदरम्यान कधीतरी ही प्रथा अस्तित्वात आली. आख्यायिकेनुसार नेपाळी राजाशी दुर्गास्वरुप देवता खाजगीत सारिपाट खेळण्यास येत असे. याचा पत्ता कोणालाही नव्हता. एकदा राणीला कुणकुण लागल्याने तिने राजावर पाळत ठेवली आणि राजाला भेटायला देवी आल्यावर ती सामोरी गेली. याप्रकाराने देवी क्रोधित झाली आणि तिने राजाची कानउघडणी केली. लुप्त होण्यापूर्वी तिने राजाला सांगितले की जर राजाला तिला पुन्हा भेटायची इच्छा झाली तर ती शाक्य समाजात सापडेल. (गौतम बुद्ध हा शाक्य होता)

तेव्हापासून शाक्य समाजातील लहान मुलींना त्यांचा मासिक धर्म येण्यापूर्वी कुमारी देवी म्हणून निवडले जाते. दलाई लामा किंवा पंचेन लामा यांचा शोध घेताना जसे प्रयत्न केले जातात त्याप्रमाणेच ही देवी शोधण्यासाठीही अनेक विधी, प्रयत्न करावे लागतात आणि अनेक अटींची पूर्तता करावी लागते जसे -

तिची पत्रिका तपासली जाते. या मुलीला कधीही शारिरीक जखम झालेली नसली पाहिजे. तिचे दात पडलेले नकोत. ते २० असायला हवेत. तिचा आवाज, चालणे, बोलणे, केस, डोळे, शरीर अशी बत्तीस लक्षणे तपासली जातात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तिला अंधाराची भीती नाही हे तपासले जाते आणि मग तिची सर्वात कठिण परीक्षा घेतली जाते. कुमारी मातेच्या मंदिराच्या प्रांगणात रेडे आणि बोकडांचे बळी देऊन रात्रीच्या वेळी त्यांच्या मुंडक्यांवर दिवे लावून मुखवटेधारी व्यक्ती नृत्य करतात आणि या ठिकाणी या लहान मुलीला एकटे सोडले जाते. ती घाबरली नाही तर तिला नंतर संपूर्ण रात्र या बळी दिलेल्या प्राण्यांच्या मुंडक्यासमवेत घालवावी लागते. ही मुलगी न घाबरता, न रडता तिथे रात्रभर राहीली तर कुमारी देवी म्हणून तिची निवड होते.

kumari devi


यानंतर तिला कुटुंबापासून वेगळे, कुमारी देवीच्या मंदिरात ठेवले जाते. तिच्या कपाळावर देवीचा तिसरा नेत्र आरेखला जातो. तिची पूजा केली जाते. लोक कुमारीचौकात गर्दी करून तिचे दर्शन घेतात. दर्शन घेताना तिच्या पाया पडतात. दर्शनाच्या वेळेस देवीचे लहान मुलीसारखे वागणे जसे, टाळ्या वाजवणे, हसणे, रडणे, ओरडणे, आणलेल्या नैवेद्याकडे आशेने पाहणे भक्तांवर संकटे आणते असा समज आहे. या उलट, देवीने शांतपणे नमस्कार, नैवेद्याचा स्वीकार केला तर देवी पावते असा समज आहे. चांगली वस्त्रे, कपडे, मान या वातावरणात वाढणार्‍या मुलींना मासिकपाळी आल्यावर देवी त्यांचे शरीर सोडून जाते आणि या सर्व सुखसोयींपासून त्यांना अचानक वंचित व्हावे लागते.

यानंतर त्यांना दरवर्षी सरकारी मानधन मिळते परंतु अचानक आलेल्या बदलामुळे बर्‍याच मुली सामान्य जीवनाला रुळू शकत नाहीत. त्यांना नंतर लग्न करता येत असले तरी त्यांच्याशी लग्न करणारा माणूस वर्षभरात मरण पावतो असा समज अस्तित्वात आहे. (अनेक कुमारी देवींची लग्ने झाल्याचा दाखला विकिवर मिळतो) पुन्हा एकदा नव्याने देवीचा शोध सुरु होतो.

यापूर्वीची कुमारी देवी सजनी शाक्य मोठी झाल्याने तीन वर्षांच्या मतिना शाक्यची निवड करून कुमारी देवीची स्थापना करण्यात आली आहे.

हा सर्व वृत्तांत वाचताना एक प्रकारे विचित्र खेद होतो. या मुलींचे बालपण कोमेजून टाकून त्यांच्या तारुण्याशीही कळत-नकळत खेळ केला जातो. इतर अनेक धर्म आणि पंथातही कोवळ्या वयांत मुलांना देव, देवता, संन्यासी, साधू, आजन्म ब्रह्मचारी करणे होत आले आहे. ज्या वयांत निर्णय घ्यायची क्षमता नसते, चांगल्यावाईटाची जाण नसते, आपली आवड-निवड ठरवायची जाणीव नसते त्या वयांत दुसर्‍यांनी माथी मारलेले निर्णय घेऊन जगायची शिक्षा त्यांच्या माथी मारणे आणि इतर मुलांना मिळणार्‍या बाल्यापासून त्यांना वंचित ठेवणे हे सहजी पटणारे नाही. नवरात्रांत कन्यापूजा नावाचा जो प्रकार चालतो त्यात लहान मुलींच्या पाया पडणे, त्यांच्याकडून आशिर्वाद मागणे, त्यांना प्रसाद चढवणे असे प्रकार केले जातात. कुठेतरी आपण त्या उमलणार्‍या फुलांवर आपण हा प्रकार लादत असतो का? असे प्रकार, प्रथा केवळ समाजातील अशिक्षित समाजात होत असतील असे वाटत असल्यास आवर्जून सांगावेसे वाटते की कन्यापूजा ही अमेरिकेतही देवळांदेवळांतून चालते. चांगली सुशिक्षित, अतिउच्चशिक्षित माणसे लहान मुलींना रांगेत बसवून त्यांच्या पाया पडून, त्यांच्या हातात डॉलर्स कोंबताना आणि आशीर्वाद मागताना अनुभवले आहे.

अधिक माहिती:

http://en.wikipedia.org/wiki/Sajani_Shakya
http://hinduism.about.com/cs/godsgoddess/a/aa090903a.htm

चित्र http://solidaritynepal.org वरून साभार.

Tuesday, October 07, 2008

स्वप्नांच्या जादूनगरीत

राज्याच्या वेशीत आम्ही प्रवेश केला तसे एकाने आमंत्रणपत्रिका आमच्या हातात कोंबली. राजवाड्यात सोहळा सुरू होण्यास थोडाच वेळ बाकी होता. राजवाड्यासमोर लोकांची गर्दी जमू लागली होती. उशीर झाला तर राज्याभिषेकाचा सोहळा लांबूनच पाहावा लागेल ही जाणीव झाली तशी मी मुलीला सांगितले, "हात घट्ट पकड. थोड्या वेळात तोबा गर्दी उसळली की त्यात हरवायचीस कुठेतरी.” आणि आम्ही तिघे राजवाड्याच्या दिशेने धावत सुटलो. आजच्या सोहळ्याप्रीत्यर्थ जरीच्या पताका, कलाबतू आणि बादल्याच्या कामाने राजवाडा सजवला होता. सुवर्णनक्षीने सजवलेला राजवाडा आज विशेष खुलून दिसत होता. राजवाड्यातून सैनिकांची फलटण आणि त्यांच्या मागे अमीर उमराव राजवाड्याच्या मुख्य सदरेवर येऊ लागले. पाठोपाठ राजेसाहेब येण्याची वर्दी आली आणि राजेसाहेबांचे आपला पुत्र प्रिन्स चार्मिंग आणि पुत्रवधू सिंड्रेला यांच्यासमवेत आगमन झाले.DSC00316

आपल्या कारभारातून निवृत्ती घेऊन राजेसाहेब राज्यकारभार आजपासून राजपुत्राच्या हाती सोपवणार होते. सिंड्रेला राज्याची राणी होणार आणि परीराणी आपल्या करामती दाखवायला येणार नाही असे थोडेच होईल? सिंड्रेलाच्या आगमनाबरोबरच राजवाड्याच्या सज्जात परीराणीही अवतीर्ण झाली. सोबत नौबती झडल्या, आकाशात फटाक्यांची फुले उधळली गेली. सिंड्रेला तिच्या शुभ्र सफेद वेशात खुलून दिसत होती. देखण्या राजपुत्रासमवेत जोडा अगदी शोभून दिसत होता.समारंभासाठी मोठमोठ्या पाहुण्यांना आमंत्रण होते. DSC00329त्यांचेही आगमन होऊ लागले. राजेसाहेब आणि युवराज, युवराज्ञीला त्यांची ओळख करून दिली जात होती. अल्लाउद्दीन आणि जास्मीन, ब्युटी आणि बीस्ट, स्नोव्हाईट (हिमगौरी) आणि तिचा राजकुमार, स्लीपिंग ब्युटी (झोपलेली राजकन्या) आणि तिचा राजकुमार असे सर्वजण या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. पाहुण्यांनी युवराज आणि युवराज्ञीचे अभीष्टचिंतन केले. समारंभासाठी आलेल्या कलावंतांनी नृत्य आणि गायन सादर करून पाहुण्यांना रिझवले. राजेसाहेबांनी उठून आपला मनोदय उपस्थित पाहुण्यांसमोर व्यक्त केला आणि आपला मुकुट आपल्या पुत्राच्या माथ्यावर चढवला. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सिंड्रेलालाही राणीचा मुकुट बहाल करण्यात आला. सिंड्रेलाने उपस्थितांचे आभार मानले.

"राज्याच्या देखरेखीत कोणताही कसूर होणार नाही, राज्याचे प्रजाजन सुखी राहोत, सर्वांचे कल्याण होवो." अशी इच्छा व्यक्त केली आणि नृत्य गायनाच्या कार्यक्रमांना पुनश्च सुरुवात झाली. यावेळेस या आनंदात सर्व उपस्थित पाहुणे, सिंड्रेला आणि प्रिन्स चार्मिंग यांनीही भाग घेतला आणि हळूहळू उपस्थितांचे निरोप घेतले.

परीकथेतील पात्रांना याचि देही याचि डोळा पाहून तृप्त झाल्यावर मी मुलीला विचारले, “आता काय करूया? अल्लाउद्दीनच्या उडत्या गालिच्यावरून सफर, डम्बोच्या पाठीवरून आकाशाची सफर, कपबशीत बसून गिरक्या घेऊया, पायरेट्सना भेटायला त्यांच्या जहाजात जाऊया, जंगल सफारीला भेट देऊया, मिकी माऊसच्या घराची सफर करूया, बाहुल्यांच्या राज्याची सफर करूया की खुद्द मिकी माऊसच्या गळ्यात पडून दोन चार फोटो काढूया?” तशी ती खुदकन हसत म्हणाली, “मम्मा, तू तर माझ्यापेक्षाही जास्त एक्सायटेड आहेस.”“असणारच!” मी तिला चिडवले, “स्वप्नांच्या या जादूनगरीत आज तू राजकन्या आहेस आणि मी.... मीही राजकन्याच आहे.”

स्वप्नातली ही नगरी सत्यात उतरते ती अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलॅंडो शहरात वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टमधील मॅजिक किंगडम पार्कात.---प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल दडलेले असते. काहीजण या मुलाला दडपून टाकतात, काही त्याचे अस्तित्वच विसरून जातात तर काही थोडके स्वत:तील या मुलाची निरागसता, खेळकरपणा, उत्साह Florida_Trip_197[1]जपत राहतात, आपल्यातील मूल जगवतात आणि स्वत:सह इतरांनाही आनंदी करतात. वॉल्टरने लहानपणापासूनच आपला चित्रकलेचा छंद जोपासला होता. शाळेतून निघणार्‍या मासिकात तो चित्रे आणि कार्टून्स काढत असे. पुढे सैन्यात भरती होण्याच्या इच्छेने त्याने शाळा सोडली पण वय कमी भरल्याने त्याला सैन्यात प्रवेश मिळाला नाही. खिशात अवघे ४० डॉलर्स आणि आपल्या चित्रकलेचे बाड घेऊन वॉल्टरने हॉलिवूडमध्ये प्रवेश केला तो दिग्दर्शनाची संधी मिळावी म्हणून. परंतु हेही स्वप्न सत्यात उतरले नाही. जेथून तेथून नकार मिळाल्यावर एका गराजमध्ये त्याने आपला स्टुडिओ थाटला आणि कार्टून्सच्या निर्मितीला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता एक दिवस वॉल्टरच्या आल्टर इगोचा "मिकी माऊस"चा जन्म झाला. उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक, कार्टूनिस्ट, पटकथा लेखक, व्यावसायिक आणि मानवतावादी म्हणून जगाला वॉल्टरची, वॉल्ट डिस्नींची ओळख आहे पण त्यांच्यातल्या स्वप्नाळू, निरागस मुलाची ओळख पटते ती त्यांनी निर्माण केलेल्या डिस्नीलॅंड, डिस्नीवर्ल्डसारख्या प्रचंड स्वप्ननगरांना भेट दिल्यावर. स्लीपिंग ब्युटी, अल्लाउद्दीन, सिंड्रेलासारख्या ज्या परीकथांत रममाण होऊन आपण आपले बालपण पोसले त्या परीकथेतील पात्रे खरी होऊन आपल्यात वावरू लागणे आणि आपल्याला त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणे यांत असणारा अनोखा आनंद, गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात ओरलॅंडोच्या ३०,००० एकर जमिनीवर वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टला भेट दिल्यावर आम्हाला मिळाला. करमणूकीचे DSC00340आणि विसाव्याचे जगातील सर्वात मोठे ठिकाण म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट प्रसिद्ध आहे. या स्थळाचे विशेष म्हणजे,लहानमोठ्यांना जादूनगरीची सफर घडवणारे मॅजिक किंगडम, चित्रपटातील भूलभुलैया आणि करामतींची ओळख करून देणारा एमजीएम स्टुडियो, आंतरराष्ट्रीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची ओळख करून देणारे एपकॉट, ५०० एकर जमिनीवर वसलेले प्राणी उद्यान, ऍनिमल किंगडम ही चार प्रमुख थीम पार्क्स, दोन वॉटर पार्क्स, गोल्फची मैदाने, क्रीडासंकुल, मोटारींचा रेसकोर्स, डाऊनटाऊन डिस्नी आणि त्यालगत असणारी अनेक आकर्षणे, राहण्याचे सुमारे २० प्रचंड रिसॉर्टस आणि असंख्य खरेदीची ठिकाणे आणि उपाहारगृहे यांनी हा परिसर नटलेला आहे.मानवनिर्मित आकर्षणांत अमेरिकेतील एक सर्वोत्तम स्थळ म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे नाव घेता येईल. या पर्यटनस्थळाला भेट देऊ इच्छिणार्‍या पर्यटकांना, सहल ठरवण्यासाठी उपयुक्त होईल अशी माहिती या लेखाद्वारे येथे संकलित करण्याचा मानस ठेवून आहे.

वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टची सहल कशी ठरवावी?

सहल ठरवण्याच्या ४ ते ६ महिने आधी डील्स तपासावीत. ही डील्स वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या संकेतस्थळावर तसेच अनेक पर्यटन उद्योगांच्या संकेतस्थळांवर मिळतात. तेथून तुम्हाला विमानाची तिकिटे, राहण्याचे हॉटेल आणि पार्कची तिकिटे यांची सोय करता येते. याखेरीज अनेक इतर पर्यटन व्यावसायिकांमार्फतही या सहलीचे आयोजन करता येईल.उन्हाळ्यात फ्लोरिडाचे तापमान सुमारे ३५-४० डि. से.च्या आसपास असल्याने वसंत किंवा शरद ऋतूत ही सहल आखणे उत्तम. DSC00529तसे हे स्थळ बाराही महिने पर्यटकांनी फुललेले असते आणि अत्युच्च गर्दीचा काळ रिसॉर्टच्या संकेतस्थळावर दिलेला असतो, तोही सहल ठरवण्यासाठी उपयोगी पडावा. उन्हाळ्याच्या दिवसांत सनक्रीन चोपडणे आणि पावसाची शक्यता असल्यास पाठीवरील बॅकपॅकमध्ये पातळ रेनकोट घेणे बरे पडते. आम्ही दोन वेळा मॅजिक किंगडमला भेट दिली असता, दोन्ही दिवशी तास-दोन तास मुसळधार पाऊस झाला आणि रेनकोट घालून सर्व आकर्षणांची मजा लुटावी लागली.डिस्नी वर्ल्डमधील सर्व पार्क्स आरामशीरपणे बघायची झाली तर सुमारे ५-६ दिवसांची सहल योजावी लागते. पर्यटकांनी कमीतकमी ४ दिवस तरी या सहलीसाठी राखून ठेवावेत. त्यापेक्षा कमी दिवसांत ही सहल अतिशय दगदगीची होते. या पार्कांत येणार्‍या प्रचंड गर्दींमुळे प्रत्येक आकर्षण पाहण्यास १ तासाहून अधिक काळही लागू शकतो. यावर उपाय म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट "पार्क हॉपर" पासेस मिळतात. ४ दिवसांच्या वर राहणार्‍यांनाच थोडे अधिक डॉलर्स भरून या पासांचा फायदा होतो. हे पास घेऊन कोणत्याही पार्कात कधीही प्रवेश करता येतो किंवा एकाच पार्कात वेगवेगळ्या दिवशी प्रवेश करता येतो. तसेच येथे काही पार्कांत "फास्टपासेस" मिळतात. फास्टपासमुळे एखाद्या आकर्षणासाठी तासन्‌तास रांगेत उभे राहण्याचे कष्ट वाचतात. हे पास फुकट मिळतात व ते घेतले की हव्या असणार्‍या आकर्षणांसाठी आपल्याला हव्या त्या वेळी आपला क्रमांक राखून ठेवता येतो.

कोठे राहावे?

डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या परिसरात राहणे कधीही उत्तम. येथे असणार्‍या अनेक रिसॉर्ट हॉटेल्समध्ये सामान्यांपासून श्रीमंतांना आवडेल अशा सर्व प्रकारे राहण्याची सोय होते. प्रत्येक रिसॉर्ट हॉटेलमध्ये खाण्यापिण्यासाठी फास्टफूड आणि इतर रेस्टॉरंट्स आहेत, एक दोन लहान किराणा दुकाने, स्विमिंग पूल इ. सारख्या सोयींनी ही हॉटेल्स सुसज्ज आहेत. या रिसॉर्ट हॉटेल्समध्ये राहण्याचा दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक पार्काला जाणारी बस हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी येते आणि कार नेणे, ती पार्क करणे, तेथून पार्क गाठणे हे सर्व कष्ट वाचतात. विमानाने प्रवास न करता जर कार घेऊन ओरलॅंडोला जाण्याचा विचार असेल तरीही ही कार हॉटेलच्या आवारात पार्क करून बसने ये-जा करणेच सोयिस्कर ठरते.

काय पाहावे आणि करावे?

या स्वप्ननगरीतील सर्वच आकर्षणे लाजवाब आहेत. प्रत्येक पार्कातील फिरती चक्रे, झुले, झोपाळे, रोलर कोस्टर्स आणि चतुर्मितीतील सर्व नाटके किंवा चित्रपट यांची वर्णने शब्दांत करण्यासारखी नाहीत. प्रत्येक आकर्षणात त्याचा वेगळेपणा आणि एक अनोखा थरार जाणवतो.मॅजिक किंगडम पाहण्यासाठी सहसा एक पूर्ण दिवस पुरेसा पडत नाही. त्यामानाने इतर तीन थीम पार्क्स पाहण्यासाठी संपूर्ण दिवस पुरेसा ठरतो असा अनुभव आला. व्यक्तिश: माझी आवड सांगायची झाली तर ऍनिमल DSC00510किंगडमच्या मानाने इतर तीनही पार्क्स अधिक आवडली. सर्वात आवडले ते मॅजिक किंगडम. एपकॉट आणि एमजीएम स्टुडियो ही दोन्ही पार्क्स लहान मुलांना आवडण्याचा संभव कमी परंतु कुमारवयीन मुले आणि मोठे यांच्यासाठी ही दोन्ही पार्क्स म्हणजे खास पर्वणीच आहे. प्रत्येक थीम पार्कमध्ये आवर्जून पाहावेत अशी काही आकर्षणे किंवा कार्यक्रम आहेत ते पुढीलप्रमाणे:

१. मॅजिक किंगडम: येथे दिवसातून दोनदा डिस्नीच्या पात्रांची मिरवणूक निघते. एकदा दुपारी आणि एकदा रात्री. या दोन्ही मिरवणुका पाहण्याजोग्या आहेत. रात्रीची विशेष. बरेचदा संपूर्ण दिवस या पार्कात घालवून थकवा जाणवल्याने अनेकजण रात्रीच्या या मिरवणुकीसाठी थांबत नाहीत असे दिसते परंतु ही मिरवणूक, रात्रीच्या अंधारात सिंड्रेलाच्या राजवाड्यावर होणारे प्रकाशाचे खेळ आणि फटाक्यांची आतषबाजी अप्रतिम दिसते.

२. एमजीएम स्टुडियो: येथे दाखवले जाणारे सर्व करामतींचे कार्यक्रम अप्रतिम आहेत. दर रात्री येथे फॅंटास्मिक नावाचा लेझर शो होतो. यांतही अनेक डिस्नी कथांतील किंवा चित्रपटांतील प्रसंग दाखवले जातात. अप्रतिम प्रकाशयोजना आणि रंगसंगती, संगीतावर नाचणारी पाण्याची कारंजी आणि मन सुखावणारी डिस्नी पात्रे यांच्या संगमाने सादर होणारा हा कार्यक्रम जगातील एक अत्युच्च दर्जाचा कार्यक्रम ठरावा.

३. एपकॉट: येथेही रात्री "रिफ्लेक्शन ऑफ द अर्थ" हा प्रकाश-रंगांचा आणि फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. नेहमी फटाक्यांची आतषबाजी काय पाहायची? त्यात वेगळेपणा काय असणार? असा विचार करून हा कार्यक्रम पाहण्याचे टाळू नये. प्रकाश आणि रंगसंगतीने अतिशय लोभसवाणा दिसणारा आणि धगधगणार्‍या अग्नीने मनाला भुरळ पाडणारा हा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा आहे.

४. ऍनिमल किंगडम: लायन किंग या डिस्नीपटातील सुप्रसिद्ध गाणी, सिम्बा आणि त्याची मित्रमंडळी आणि चित्रविचित्र पोशाखातील कलावंत यांनी सजलेला नृत्य-गायन आणि कसरतींचा हा कार्यक्रम आवर्जून पाहण्याजोगा आहे.

आसपास पाहण्यासारखी ठिकाणे:

डिस्नी वर्ल्डच्या परिसरात ही महत्त्वाची उद्याने सोडून पाहण्यासारखी दोन प्रमुख ठिकाणे आहेत.


डाऊनटाऊन डिस्नी: या परिसरात चांगली रेस्टॉरंट्स, फास्टफूड उपाहारगृहे, खरेदी करण्यासाठी प्रशस्त दुकाने आहेत. येथे गायन-नृत्य-संगीताचे कार्यक्रम होतात. सुप्रसिद्ध सूर्य-सर्कस (Cirque du Soleil ) येथे पाहता येते. संध्याकाळच्या वेळेस खरेदी करता करता, बाजारातून फेरफटका मारण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

प्लेजर आयलंड: सळसळत्या तारुण्याचा जोश व्यक्त करण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे. पश्चात्य संगीताचे निरनिराळे प्रकार येथे अनुभवायला मिळतील. संगीत-गायन आणि त्यावर थिरकणारी पावले यांच्या आनंदात प्लेजर आयलंडला नित्य दिवाळी असते.

बिल्झर्ड बीच आणि टायफून लगून : ही दोन जलोद्याने (वॉटर पार्क्स) डिस्नी परिसरात आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत बाहर राहून तापलेले अंग थंड करून पाण्यात डुंबण्याकरता आणि मन चिंब करण्याकरता ही दोन्ही पार्क्स उत्तम आहेत.डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या बाहेर ओरलॅंडोला पाहण्यासारखी इतर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यातील दोन प्रमुख स्थळांबद्दल येथे लिहावेसे वाटते.

युनिवर्सल पार्क्स: येथे दोन पार्क्स आहेत: युनिवर्सल स्टुडिओ आणि युनिवर्सल आयलंड्स ऑफ ऍडवेंचर हे थीम पार्क. ही दोन्ही पार्क्स पाहण्यासारखी असली तरी डिस्नीसोबत यांचीही वारी करणे अतिशय दगदगीचे ठरते. इच्छुकांनी हे लक्षात घेऊनच सहल आखावी किंवा युनिवर्सल सहलीची स्वतंत्र आखणी करावी.DSC00593

सीवर्ल्ड, ओरलॅंडो: प्रचंड आकाराचे किलर व्हेल्स, पाण्यात सूर मारणारे डॉल्फिन्स, माणसांच्या आज्ञा लीलया पाळणारे चतुर सील, गरीब स्वभावाचे परंतु भीतिदायक दिसणारे प्रचंड वॉलरस, उरात धडकी भरवणारे शार्क्स आणि असे अनेक सागरी जीव या उद्यानात पाहण्यास मिळतात. शामू या किलर व्हेलचे, सील आणि डॉल्फिन यांचे कार्यक्रम अप्रतिम आहेत. डिस्नी वर्ल्डची सफर करणार्‍या पर्यटकांनी या उद्यानाला भेट देणे चुकवू नये. हे पार्क एका दिवसात पाहून होते."ट्रिपल ए"चे सदस्यत्व असल्यास या पार्काची तिकिटे स्वस्तात मिळतात.फ्लोरिडा राज्यात ओरलॅंडो शहराबाहेर पाहण्यासारखीही इतर अनेक स्थळे आहेत यात ओरलॅंडोपासून सुमारे चार तासांवर असणारे मायामीचे समुद्र किनारे, सुमारे दोन तासांवर असणारे टॅम्पाचे समुद्र किनारे विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच बुश गार्डन्स (Busch Gardens) आणि किसिमी येथील थीम पार्क्स पाहण्यासारखी आहेत.


---

डिस्नीनगरीबद्दल एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे येथील सेवादात्यांकडून आणि सेवकवर्गाकडून पर्यटकांना मिळणारी वागणूक. लाखोंच्या गर्दीला सांभाळून हसतमुखपणे आणि अदबीने पर्यटकांच्या प्रत्येक प्रश्नाला, शंकांना सविस्तर उत्तरे देणारा, त्यांना तत्परतेने मदत करणारा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणारा डिस्नीचा कर्मचारीवर्ग प्रत्येक पर्यटकाला राजपुत्र नाहीतर राजकन्या असल्याचे सतत जाणवून देतो. वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे उद्घाटन १९७१ साली करण्यात आले - वॉल्ट डिस्नी यांच्या मृत्यूच्या सुमारे ५ वर्षांनंतर! संपूर्ण दुनियेला स्वप्न विकणारा हा मनुष्य त्याने स्वत: स्वप्नात पाहिलेली जादूनगरी सत्यात उतरताना पाहण्यास हयात नव्हता. परंतु लहान-मोठे, तरुण-म्हातारे सर्वांना वेड लावेल अशा स्वप्ननगरीच्या निर्मितीतून त्यांनी आपले नाव चिरंतन केले. लहानांना वेड लावणार्‍या आणि मोठ्यांच्या हृदयात दडलेल्या बालकाला पुनश्च उभारी देणार्‍या या जादूमय स्वप्ननगरीत वर्षातील ३६५ दिवस दिवाळी असते. आपल्या कुटुंबासमवेत दिवाळीतील आनंदाचे क्षण प्रकाश, रोषणाई, फटाके यांच्या सोबतीने या स्वप्ननगरीत काढायची संधी पर्यटकांना लवकरच चालून येवो ही दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा!

लेखातील काही चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. चित्रांवर टिचकी मारली असता ती मोठी करून पाहता येतील.


Disney_fireworks2[1]


(पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००७)

marathi blogs