प्रकार

Tuesday, January 23, 2007

लिफ्ट मागणार्‍या महाभागांसाठी

मध्यंतरी मनोगतावर कोणातरी पुणेकराला या लिफ्ट मागणार्‍या महाभागांनी त्रस्त केले होते. आता खरे बघायला गेले तर पुण्याची वाहतूक व्यवस्था पाहता पुण्यात गाड्या चालवणारे, वाहतूक (अ)व्यवस्था राखणारे, प्रवास करणारे आणि त्यातून लोकांना थांबवून लिफ्ट मागणारे सर्वचजण कौतुकास पात्र आहेत. आम्हा मुंबईच्या माणसांना त्याचे अप्रूप कळायचे नाही. धावत्या लोकलमध्ये आणि लोकलमधून उड्या कशा मारायच्या इतपतच आमची मर्दूमकी.

असो, तर काही पुणेकर या उचला-उचली प्रकरणाने त्रस्त आहेत. लोक सिग्नलला थांबतात आणि निर्लज्जपणे पुढच्या सिग्नलपाशी सोडाल का? कुठे चाललात, लिफ्ट द्याल का असे प्रश्न विचारून त्रास देतात.

लिफ्ट मागणार्‍या महाभागांना कसे टाळायचे यावर मी सुचवलेले काही उपाय...

तुमची कार असेल तर कारच्या मागच्या काचेवर एक बोर्ड चिकटवा. दुचाकी असेल तर मात्र हा बोर्ड तुम्हाला आपल्या गळ्यात घालून फिरावे लागेल. (मजेशीर दिसलात तर जबाबदारी तुमची!) बोर्डावर लोकांना सहज वाचता येईल इतक्या मोठ्या अक्षरात आणि शुद्ध मराठीत खालील मजकूर लिहा --

लिफ्ट हवी?

या! स्वागत आहे. मी आपल्यासाठीच गाडी चालवतो परंतु मागे स्वार होण्यापूर्वी खालील सूचना वाचा....

यापूर्वी या गाडीवरून ज्या तिघांना लिफ्ट दिली त्यापैकी

  • पहिल्याला माझ्यानंतर डायरेक्ट यमराजांनी रेड्यावरून लिफ्ट दिली.
  • दुसर्‍याने स्वतःची गाडी खरेदी केली...... व्हिलचेअर.
  • तिसर्‍याला नव्हे नव्हे तिसरीला माझ्या बायकोने मागे बसलेले पाहिले आणि लाटण्याचा असा फटका दिला की ती ११ नं नाही १११ नं च्या बसने जाते.....कुबड्यांसकट.

येता का? तुम्ही चौथे.

जे लिफ्ट मागणार्‍या महाभागांपासून त्रस्त आहेत त्यांनी हा प्रयोग करून पाहायला हरकत नाही.

Friday, January 19, 2007

वर्षपूर्ती

गेल्या वर्षी २० जानेवारीला पहिला ब्लॉग लिहिला त्यावेळेस तो लेख कोणी वाचणार आहे अशी कल्पनाही नव्हती. सर्व मराठी ब्लॉग्ज कोठेतरी संकलित होतात, मराठी ब्लॉगर्सचा एक समाज आहे हे ही माहित नव्हते. होता फक्त मोकळा वेळ, एकांत आणि लिहिण्याची इच्छा. लिहायला सुरुवात केली आणि परीकथेतल्या एखाद्या जादूच्या महालात शिरल्यासारखे एक एक दालन उघडत गेले.

गेल्या संपूर्ण वर्षात बर्‍याच नव्या गोष्टी कळल्या तर काही जुन्याच गोष्टींची जाणीव नव्याने झाली. मराठीत टंकलेखन करता येते ही पहिली नवी गोष्ट कळली. बरहाशी ओळख, मराठी भाषेशी पुनर्भेट, मराठी साहित्याशी पुन:श्च ओळख, माझे अगाध (अ)शुद्धलेखन, मनातले विचार लिहून काढायची संधी या नव्या, जुन्या अनेक गोष्टी प्रत्येक वळणावर, थांब्यांवर भेटत गेल्या.

आपली अनुदिनी माणसे वाचतात आणि त्यावर त्यांना प्रतिसाद देण्याची इच्छा होते याचे प्रथम थोडेसे अप्रूप वाटले. माणसाला कळत नकळत इतरांची, त्यांच्या प्रशंसेची, त्यांच्या बर्‍या-वाईट मतांची किती गरज असते हे जाणवून गेले. नंतर कधीतरी मराठीब्लॉग्ज.नेट आणि मनोगताची ओळख झाली आणि ओळखी वाढत गेल्या, माणसे जोडली गेली. ज्याच्याकडे आपली बोली बोलायला माणसे नसतील त्याला आपल्या भाषेत वाद-विवाद करायला, भांडायला माणसे मिळणे ही सुद्धा एक अनोखी भेट असते.

आयुष्यात बरेचदा जागा बदलत राहिल्याने अनोळखी माणसांच्या ओळखी करून घेणे मला शिक्षा वाटते. नवीन ओळखी जोडत राहायची गरजही उरलेली नाही. माणसांशिवाय जगण्याची सवय झाली आहे आणि अंगवळणी पडली आहे पण तरीही या अनुदिनीच्या निमित्ताने ओळखी आपसूक होत गेल्या. कित्येक स्वभाव कळले, विचार कळले, माणसांच्या अंतरंगांचे रंग कळले, काही आपलेसे वाटले काही नकोसे वाटले. अशाच वाढत गेलेल्या ओळखींमधून हळूहळू माणसाचे नेटवर्क कसे वाढत जाते आणि कधीतरी त्याचे व्यवस्थापन करणे जिकिरीचे होते हा ऑर्कुटवर आलेला अनुभव. १-२ करता करता जुने सहकारी, नातेवाईक, भाऊ-बहिणी, भाचवंडे एक वेगळा समाज पुन्हा एकदा जोडला गेला.

मग कधीतरी हे व्यसन तर होत नाही ना याची शंका येऊ लागली. कळफलक बडवण्यापलिकडे आयुष्यात दुसरे काही नाही की काय असे वाटायला लागले. लिहायचेच झाले तर मनात आलेले विचारच का, काहीतरी इतरांच्या उपयोगाचंही लिहिता येईल हे मराठी विकिपीडियामुळे झालेली जाणीव. आज नव्या वर्षाच्या सुरुवातीसच विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर जानेवारीचे सदर म्हणून आपला लेख झळकताना पाहून मनापासून आनंद होतो. याचबरोबर इंडी मराठी मंडळासाठी लिहिण्याची संधी मिळाली. आणखीही काही ठिकाणी लिहिण्याचा योग आला, यायची शक्यता आहे.

अमेरिकेत आल्यापासून आयुष्य कधीतरी थांबल्यासारखं वाटतं तसं ते कधीच कोणासाठी थांबत नाही हा भाग अलाहिदा. सध्या ते ज्या मार्गावरून चालले आहे त्याचा मी आनंद घेत आहे.... एका नव्या अनुदिनी वर्षाला सुरुवात होत आहे.

Thursday, January 04, 2007

सीन्स यू हॅव बीन गॉन....

केली क्लार्कसन माझ्या संगणकाच्या स्पीकर्समधून कर्णकर्कश्श केकाटते आहे, 'सीन्स यू हॅव बीन गॉन आय कॅन ब्रीद फॉर द फर्स्ट टाइम...' या पोरीची एक शैली आहे, संथ गाणे सुरू करायचे आणि मध्येच एकदम स्वर टीपेला लावून किंचाळायचे आणि पुन्हा शांत झाल्यासारखे हळुवार गाणे सुरू करायचे. का कोणजाणे पण मला आवडते तिचे गाणे. बहुधा हळुवारपणा आणि धांगडधिंग्याचा संगम होत असावा म्हणून असेल. अर्थात येथे मुद्दा तो नाही. मुद्दा असा की या गाण्यासारखी समानार्थी भावनांची इतर गाणी कोणती? पाश्चिमात्य संस्कृतीचा विचार करता अनेक नातेसंबंधांच्या अनुभवातून आयुष्याची वाट पकडणे लक्षात घेतले तर इंग्रजीत अशा भावनेवर आधारित गाणी बरीच असावीत असे वाटते, काही इंग्रजी गाणी चटकन लक्षात आली ती --

१) हिलरी डफचे "सो यस्टरडे"

If it's over, let it go and
Come tomorrow it will seem
So yesterday, so yesterday
I'm just a bird that's already flown away

२) ग्लोरिया गेनरचे "आय विल सर्वाइव"

I've got all my life to live,
I've got all my love to give
and I'll survive, I will survive.

ही दोन्ही गाणी मला अतिशय आवडतात. विशेषत: ग्लोरिया गेनरच्या आवाजातील "आय विल सर्वाइव". कदाचित तिच्या आवाजातील तडफ हिलरी डफ आणि केली क्लार्कसनच्या आवाजात नसावी म्हणून. तरीही या सर्व गाण्यांत एक प्रकारचा विषाद, आणि आत्यंतिक राग जाणवतो किंवा झाल्या प्रकारातून बाहेर पडण्याकरता आपल्या मनाची भाबडी समजूत घालण्याचा प्रयत्न. त्यामुळे कोठेतरी एक निराशेचे सावट पडल्यासारखे वाटते.

याच धर्तीवर आणि भावनेवर आधारित आपल्याकडे काही हिंदी-मराठी गाणी बनत असावीत का असा विचार मनात आला. आपल्याच माणसाची निंदा करणे, भले मग तो आपल्याला सोडून गेला असेल किंवा आपण त्याला काही कारणास्तव सोडले असेल, या प्रकाराला आपल्याकडे अद्यापही taboo मानले जाते. तसे करून वर जे केले त्याने मी फार आनंदी आहे असे म्हणण्याला आपल्या समाजात बहुधा 'कोडगेपणा' म्हणत असावेत.
या भावनेच्या थोड्याफार जवळपास जाणारे हिंदी चित्रपटातील एक गाणे चटकन आठवले ते म्हणजे --


चलो एक बार फिरसे
अजनबी बन जाये हम दोनो
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूं दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज नजरोंसे


अर्थातच हे गाणे सुटकेच्या नि:श्वासाचे नाही. या गाण्यात एक प्रकारची निराशा, दु:ख, हिरमोड जाणवतो. तसंही गुमराह चित्रपटाची आठवण केली तर हे प्रियकराने प्रेयसीच्या भावना चिथावण्यासाठी म्हटलेले गाणे म्हणता येईल. संबंध सुटले, नाती तुटली म्हणून 'ऐ मेरे दिल कहीं और चल' सारखी काही मोजकी गाणी आढळतात. मराठी भावगीतांची आणि अन्य गीतांची परंपरा पाहता मराठीत अशा भावनेचे गाणे असेल की काय अशी शंकाच होती, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या नेमक्या भावना मला अभिप्रेत होत्या ते गाणे 'जैत रे जैत' चित्रपटात आहे आणि त्यातील भावना या इतर गाण्यांपेक्षा खूपच वेगळ्या असल्याचे लक्षात आले -


मी रात टाकली, मी कात टाकली मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली.

या गाण्यात जे धैर्य आहे, जो बेदरकारपणा आहे तो इतर इंग्रजी आणि हिंदी गाण्यांत नाही. नायिकेला झाल्या प्रकाराची खंत आहे किंवा पर्वा आहे असे कोठेही या गाण्यातून दिसून येत नाही उलट एक प्रकारची मुक्ती व त्या मुक्तीतील तृप्ती ती अनुभवते आहे आणि मागचे मागे टाकून नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ती आसुसलेली आहे असे दिसते. आयुष्याकडे इतक्या सहजतेने पाहण्याचा दृष्टीकोन फारच कमीजणांकडे असावा.

एखाद्या व्यक्तीला सोडल्यावर किंवा त्याचे अस्तित्व आपल्या आयुष्यातून पुसून टाकल्यावर आपण खर्‍या समाधानाने सुटकेचा निःश्वास सोडू शकतो ही भावना आपल्या समाजात अद्याप रुजायची आहे की काय ते कळत नाही. अशी भावना माणसाच्या मनात येऊच शकत नाही असे नसावे कदाचित पूर्वायुष्यातील आठवणींमुळे ती सरळ शब्दांत व्यक्त करणे कठीण जात असावे किंवा अपराधीपणाची भावना मनात दाटून येत असावी. आपली माणसे, मैत्री, नाती ही जन्मभर सांभाळायची असतात असेच लहानपणापासून कळत नकळत आपल्यावर संस्कार केलेले असतात. एखादे नाते सांभाळणे जड किंवा कठीण होऊ शकते आणि अशा नात्यातून सुटका करणे कधीही फायद्याचे ठरू शकते हा विचार हळू हळू आपण स्वीकारतो आहोत पण संधी मिळेल तेव्हा त्याला पाश्चिमात्य संस्कृतीचे लेबल लावायलाही तयार असतो. आपल्या स्वार्थासाठी काही संबंध तोडणे किंवा त्यांच्यापासून फारकत घेणे हा विचारही नकोसा होतो.

जन्मभर माणसे जोडताना त्यांच्याबरोबर आपण प्रेम, मैत्री, जवळीक, मदत, सहचर्य या भावनांना जवळ करतोच पण प्रसंगी मत्सर, हेवा, हुकूमशाही, राग अशा नकारात्मक भावनांनाही जवळ करत असतो आणि या भावनांचा विस्फोट झाल्यावर एखाद्याला त्यातून आपली सुटका व्हावी असे वाटणे साहजिक आहे. कधीतरी केवळ प्रेमभावना संपली, आकर्षण ओसरले, नव्याची नवलाई नऊ दिवस अनुभवून झाली इतकी सरळ पण स्वार्थी भावनाही असू शकते. या सर्व भावनांचा शेवट, 'सुटका झाल्यावर समाधानाचा निःश्वास टाकणे' असाही होऊ शकतो.

भूतकाळाला कवटाळून बसणे ही बहुधा माणसाची सहजप्रवृत्ती असावी. बरेचदा भूतकाळाचे, नात्यांचे, मैत्रीचे, आपुलकीचे बंध झुगारून देणार्‍या व्यक्तीला समाजाकडूनच प्रतारणाही सहन करावी लागते. तरीही कोठेतरी अशा व्यक्ती आयुष्यात अधिक समाधानी असतात की काय असा प्रश्न मनाला चाटून जातो. नको असलेले क्षण, माणसे, आठवणी, प्रसंग तेथेच मागे टाकून बेदरकारपणे पुढे वाटचाल करण्याची हिंमत माणसे दाखवतात हीच मोठी कौतुकाची गोष्ट वाटते.

marathi blogs