प्रकार

Friday, October 27, 2006

पाहुणा

गेल्या वर्षीची गोष्ट, ऑक्टोबरचा महिना संपत आला होता. बाहेर थंडी मी म्हणत होती, जोराच वारंही सुटलं होतं. खिडकीच्या फटीतून आत शिरू पाहणारा वारा घुबडासारखे घुत्कार करत नकोस वाटणारं पार्श्वसंगीत ऐकवत होता. संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत पण बाहेर मिट्ट काळोख दाटून आला होता. फायर प्लेस मधल्या जळणार्‍या लाकडांचा एक जळकट वास घरात पसरला होता. ब्रॅम स्टोकरचं पुस्तक वाचतावाचता सोफ्यावरच माझा डोळा कधी लागला होता कळण्यास मार्ग नाही.

दरवाज्यावर ठकठक ऐकू आली तसे मी चटकन डोळे उघडले. वार्‍यामुळे दरवाजा थरथरला असावा की काय असा विचार मनात आला न आला तोच पुन्हा एकदा ठक ठक ऐकू आली. या वेळेस थोडी जोरात. 'कोण आले असेल या वेळेस?' तशी या वेळेस कोणी यावं ही अपेक्षाच नव्हती. 'कोणीतरी गरीबांसाठी पैसे गोळा करायला, नाहीतर आसपासची पोरं वात्रटपणा तर करत नसावीत? पाहूया कोण आहे ते,' असा विचार करून मी उठले तसा स्टोकरचा ड्रॅक्युला धाडकन माझ्या पायावर पडला.

"आई गं! कोण मरायला कडमडलंय या वेळी?" असं पुटपुटत पुस्तक उचलून मेजावर आदळलेच आणि मी दरवाज्यापाशी आले. प्रथम पीपहोलला डोळा लावला. बाहेर कुणीच दिसत नव्हते. 'उघडावा की न उघडावा दरवाजा??' या गहन विचारांत असतानाच हात आपोआप हळूच कडीवर कधी गेला आणि दरवाजा कसा उघडला गेला ते कळलंच नाही.

दरवाजा उघडता क्षणीच वार्‍याचा थंडगार झोत अंगावर आला आणि त्याबरोबर एक उग्र दर्प नाकात भिनला. बाहेरच्या काळोखात एक संपूर्ण काळ्या पोशाखातील सहा फुटांहून अधिक उंचीची आकृती पाठमोरी उभी होती. मी दरवाजा उघडताक्षणीच ती गर्रकन वळली. समोर हातात छडी घेतलेला एक अत्यंत देखणा पुरुष उभा होता. चटकन डोक्यात आलं, 'गॉन विद द विंड' मध्ये क्लार्क गेबल प्रत्यक्षात असाच दिसत असावा बहुधा. फरक फक्त एक होता. क्लार्क गेबलच्या खोडकर डोळ्यांऐवजी समोरच्या व्यक्तीचे लालबुंद डोळे माझ्यावर रोखलेले होते.

"येस, प्लीज??" मी थोडं दबकतच विचारले.

"नमस्कार. मी आपला नवा शेजारी. कालच मला इथे आणलं." त्याने आपली ओळख करून देताना एक तोंड भरून हास्य फेकलं. हास्य कसलं? अंधारात त्याने पांढरे शुभ्र दात विचकल्यासारखं वाटलं.

"नमस्कार. आ..आणलं म्हणजे? तुम्ही कालच इथे आलात असं म्हणायचं आहे का तुम्हाला?" मी चाचरत प्रश्न केला.

"म्हणजे पोहोचवले हो, ईप्सित स्थळापर्यंत." असे म्हणून त्याने उगीचच गडगडाटी हास्य केले, "बरं! तर मी आत येऊ का?" त्याचा आवाज अगदी मृदू होता, "आमंत्रणाशिवाय तसा मी कुणाकडे जात नाही म्हणा; पण तुम्ही सख्खे शेजारी, या म्हणाल याची खात्री होती म्हणून आलो."

आता एखाद्याने गळ्यातच पडायचं म्हटल्यावर मलाही "या" म्हणण्यावाचून पर्यायच राहिला नव्हता. "या आत या."

महाशयांचे डोळे लुच्चे हसले. जसं काही त्या लाल भडक डोळ्यांमागे काहीतरी गुपित दडवलेलं आहे. ते ताडताड पावलं टाकत आत आले तरी त्यांचे हावभाव पाहून हा माणूस बराच काळ आपल्या पायांवर उभा नसावा की काय असे वाटत होते. कुठेतरी काळजात चर्र झाले आणि कुठेतरी त्यांचा तो आवेश पाहून त्याही परिस्थितीत हसू आले.

"त्याचं काय आहे की घरातलं सामान अजून उघडायचं आहे. सहा सहा फुटी पेटारे आहेत, उघडून स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणारच नाही का? बरं माझी ओळख करून देतो," महाशयांनी हातातली काठी फिरवली. त्या काठीच्या मुठीवर दोन हिरे चमचमल्याचा भास झाला, "मी द्वाड. म्हणजे माझ्या गुणांकडे पाहून माझं नांव माझ्या आई वडिलांनी 'द्वाड' असंच ठेवलं." 'बाप रे! आई-वडील हे असंही करतात?' मला जरा नवलच वाटलं.

काय बोलावं हे न सुचून मी "हम्म!" म्हटलं आणि नजर खाली वळवली, तसा ड्रॅक्युलाच्या पुस्तकावरचा 'बेला लगोसी' माझ्याकडे पाहून छद्मी हसल्याचा भास झाला. ड्रॅक्युलाचे खरे नांव "व्लाड" होते म्हणे, या द्वाडशी किती जुळतंय नाही, असं उगीचच मनात येऊन गेलं. शेवटी शब्दांची जुळणी करून मी तोंड उघडलं, "वा! वा!" आता त्यात 'वा!' म्हणण्यासारखं काय होतं कुणास ठाऊक पण बोलायचं म्हणून पुढे विचारलं," कसं काय येणं केलंत?"

"त्याचं असं आहे," हलकेच हसून द्वाडसाहेब मधाळ शब्द बोलू लागले,"आम्ही पडलो सरदार घराण्यातले. पूर्वजांपासून ऐशोआरामाची सवय, जहागिरी गेल्या, जमीनजुमले गेले तरी जुन्या सवयी काही सुटल्या नाहीत."

"हो का?" काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत होते, डोक्यात वेगळ्यांचं विचारांनी फेर धरला होता. ड्रॅक्युला पण म्हणे सरदार घराण्यातलाच होता नाही का?

"दिवस उतरणीला लागला, म्हणजे माझा दिवस सुरू होतो." द्वाडराव आपल्याच नादात बोलत होते, "काहीतरी प्यायला मिळावं अशी इच्छा होती पण घरातलं सामान उघडलेलं नाही आणि या अनोळखी गावांत कुठे फिरत बसणार?" बोलता बोलता साहेबांनी आपल्या ओठांवरून उगीचच जीभ फिरवली. "क.. क.. काय पिणार तुम्ही?" द्वाड साहेब आता झेप घेऊन माझ्या मानेला डसतील की काय असा विचार मनात आला.

"आता या वेळेला काय पितात माणसं? माझं 'त्या' शिवाय चालत नाही हो. तुमच्याकडे एखादी बाटली उधार असेल तर घेऊन जातो म्हणतो, " मी म्हणजे कोणितरी बावळट व्यक्ती आहे अशा तोर्‍यात द्वाडरावांनी मला सुनावलं.

"नाही हो! आमच्याकडे "त्या" बाटल्या नाहीत. नाही म्हणायला रेड वाइन आहे. चालेल?" मला प्रथमच जीवांत जीव आल्यासारखं वाटलं.

"हम्म्म! गडद रंगाच कुठलंही पेय चालतं मला. संध्याकाळी रेड वाइन ही काही माझी पहिली पसंती नाही पण नेईन निभावून," माझ्याकडे आशाळभूत नजरेने पाहत द्वाड साहेब उद्गारले. मी त्वरेने बाटली काढून द्वाड साहेबांच्या हाती सुपूर्त केली. "असं करा, आख्खी बाटलीच घेऊन जा. आम्हाला नको आहे." ही ब्याद कधी टळते आहे असं मला झालं होतं.

"बरं तर निघतो. तुमचा अधिक वेळ घेत नाही. तुम्हाला भेटून फार आनंद झाला."
"बरंय द्वाड साहेब तुम्हालाही भेटून आनंद झाला."
अचानक द्वाडसाहेब माझ्याकडे मिश्किल नजरेने पाहत म्हणाले, "वेल देन! लेट्स किस,"

"काय?" मी जवळ जवळ किंचाळलेच. हा माणूस नक्की मला डसणार याची खात्री झाली.
"अहो ओरडताय काय अशा, कधीपासून पाहतो आहे, तुम्ही अशा बावचळल्यासारख्या का वागत आहात? मी म्हणजे काय भूत आहे का कोणी?" द्वाडराव माझ्यावर डाफरले आणि अचानक आवाज नरम करून म्हणाले, "लेट्स किस म्हणजे "Let us Keep It Simple and Straight!!!" मला कधी रेड वाइन हवी झाली तर येईन तुमच्याकडे सरळ. शेवटी शेजारी कधी कामाला येतात? तसा मी शांतताप्रिय प्राणी असल्याने तुम्हाला माझ्यापासून काही इतर त्रास होणार नाही. बाकी, तुम्ही मला द्वाड साहेब म्हणू नका, माझे इतर मित्र मला ज्या नावाने संबोधतात तेच नाव वापरत जा."

"कुठलं नाव?" या माझ्या इवल्याश्या जीवाने तरी किती वेळा भांड्यात पडावं?

"काऊंट ड्रंक्युला!," असे म्हणून साहेब गोड हसले व वळून चालू पडले

Thursday, October 12, 2006

चकवा

थंडीच्या दिवसांतली एक ढगाळ संध्याकाळ. बाहेर दाटून आलंय पण दिवसभरात पाऊस काही पडलेला नाही, हवा कोंदट झाली आहे. तुम्ही घरात बसून कंटाळता. जरा बाहेर जाऊन पाय मोकळे करून यावं असा विचार तुमच्या मनात येतो आणि काखोटीला छत्री आणि हातात विजेरी घेऊन तुम्ही बाहेर पडता. हवेत गारवा जाणवतो. तुम्ही नेहमीची पायवाट धरता. चालता चालता गावाबाहेरच्या आडरानाजवळ येता. कितीवेळा या रानातून एक चक्कर मारावी असा विचार मनात येऊन गेला असला तरी तुम्ही यापूर्वी तसं धाडस केलेलं नसतं. आज मात्र तुमची पावलं अचानक रानात शिरतात.

अंधार पडू लागला आहे. झाडांच्या सावल्या लांब लांब होत आहेत. पर्णविरहित फांद्या आपले हात पसरून मिठी मारायच्या बेतात आहेत जशा. आपण रस्ता चुकतोय की काय असा विचार तुमच्या मनात येतो. तुम्ही आजू बाजूला पाहता. चहूकडे फक्त नीरव शांतता असते, नाही म्हणायला मध्येच कुठेतरी एखादा रातकिडा किरकिरतो. वाळक्या पानांवरून तुमच्या पावलांची करकर शांततेचा भंग करते. तुम्ही वेगाने पावले उचलता. यापेक्षा जास्त अंधार पडण्यापूर्वी इथून बाहेर पडायला पाहिजे! अचानक मागून वाळक्या पाने आणि काटक्या मोडल्याचा 'कट्! कट्!' आवाज येतो. कुणीतरी त्या वाळक्या पानांवरून काटक्यांवरून सरपटत येतंय की काय हा विचार तुमच्या मनाला शिवतो. घशाला कोरड पडते. चटचट पावलं उचलत तुम्ही हातातली छत्री आणि विजेरी घट्ट धरता. मागची सळसळ जवळ आल्यागत भासते, आता धूमच ठोकायला हवी - पण कुठे आणि कशी? अशा विचारांत तुम्ही क्षणभर थबकता, आणि तुमच्या पायाला विळखा पडतो. एक अस्फुट किंकाळी तुमच्या घशातून निघते. त्याही स्थितीत तुम्ही थरथरत्या हाताने विजेरी पेटवता.

विजेरीच्या मंद प्रकाशात कुठेतरी उरलीसुरली कातडी लोंबते आहे असा एक मांस झडलेला सांगाडा तुमच्या पायाला गच्च पकडून दात विचकताना तुम्हाला दिसतो. तुमचे हातपाय लटपटतात, त्या थंडीतही दरदरून घाम फुटतो. जिवाच्या निकरानं तुम्ही हातातली छत्री त्या सांगाड्यावर हाणता. पकड थोडीशी ढिली होते; ते पाहून तुम्ही जिवाच्या आकांतानं धूम ठोकता. आपण किती वेळ धावलो याचा तुम्हाला अंदाज लागत नाही, रान अधिकच दाट झालंय. दूरवर एक दिवा लुकलुकताना दिसतो. तुम्ही सगळं त्राण एकवटून दिव्याच्या दिशेनं धावू लागता.

समोर एक पडकी हवेली दिसते. आत प्रकाश आहे. तुम्ही दार ठोठावता. क्षणा दोन क्षणांनी दरवाजा उघडतो. दरवाज्यामागे एक सत्तरीची म्हातारी तुमच्याकडे आश्चर्याने पाहते आहे. 'काय पाहिजे?' म्हणून विचारते. तुम्ही घाईघाईतच तिला आपला किस्सा सांगता. ती दरवाजा उघडून तुम्हाला आत घेते. 'कशाला बाबा या आडरानात फिरायला जायचं, रात्री बेरात्री हे असं निर्जन ठिकाणी जाऊच नये. त्यात खरं काही नसतं, चकवे असतात ते; पण अनुभव घेणारा तिथेच ढेर होतो कधीतरी.' असं म्हणून म्हातारी चहाचा आग्रह करते.

म्हातारीच्या हातचा चहा अमृतासारखा भासतो. चहा पितापिता तुम्ही तिची चौकशी करता. म्हातारी सालसपणे आपली कर्मकहाणी सांगते. 'आडरानातली बापाची इस्टेट आणि म्हातारी, पोरांना नको झाली तशी पोरांनी म्हातारीला मागे ठेवून आपापल्या वाटा पकडल्या.' म्हातारी डोळ्यात पाणी आणून सांगते. 'बर्‍याच दिवसांनी घरात कुणीतरी आलं, रात्र इथेच काढ कुठे जाशील त्या चकव्यात बाहेर? जेवणाचं पाहते, तुझ्या निमित्तानं माझ्याही पोटात चार सुखाचे घास पडतील,' असं म्हणून म्हातारी उठते.

गरमागरम चहाने तुम्हाला हुशारी येते. रानातला प्रकार डोक्यातून मागे पडतो. आडरानात राहणार्‍या म्हातारीबद्दल चुकार विचार मनात येतात. रात्री बेरात्री अनोळखी माणसाला घरात घेणारी म्हातारी मूर्खच दिसते; जीवाची पर्वा नाही की काय हिला? की अगदी एकाकी पडली आहे, कुणास ठाऊक? या वयात अक्कल साथ देत नसावी बहुधा. तुमचे डोळे लबाड स्मित करतात. म्हातारीचा गळा दाबून टाकला तर कुणाला वर्षे न वर्षे कळायचेही नाही! 'आज्जे, तुझ्याशी गप्पा मारायला येऊ का गं आत?' तुम्ही घरात शिरकाव करण्याची संधी शोधता. म्हातारीही आतूनच आत ये हो म्हणून सुचवते.

बाहेरच्या खोलीच्या मानानं स्वयंपाकघरातला उजेड थोडा मंदच वाटतो. समोर चुलीतल्या जाळात एक मोठा हंडा आहे आणि त्यात काहीतरी खदखदतंय. त्याच्या खमंग वासानं तुमच्या पोटात कावळे कोकलतात. तुम्ही आत शिरता. पाय थोडेसे भेलकांडल्यासारखे वाटतात. म्हातारी पाठमोरी आहे; तुमची चाहूल लागते तशी तुम्हाला खुर्चीत बसायची सूचना करते. बसताबसता डोळ्यांपुढे अंधारल्यासारखं वाटतं. तुम्ही डोळे किलकिले करून समोर बघता. म्हातारी मन लावून एका भल्या मोठ्ठ्या सुर्‍याला धार लावते आहे.

'आजे असं चक्करल्यासारखं का वाटतंय?' तुम्ही तिला विचारता. म्हातारी मागे वळते, चुलीच्या प्रकाशात तिचे पांढरे केस आणि सुरकुतलेला चेहरा भयाण दिसतो. 'काही नाही रे बाळा, चहात थोडंसं गुंगीचं औषध घातलं होतं. बर्‍याच दिवसांत मेजवानी झाली नाही बघ. घाबरू नकोस, तुला काहीही त्रास होणार नाही, कळणारही नाही सुरी कशी फिरते ते.'

समोरचा रश्शानं खदखदणारा हंडा आणि सुरीची धार हे सगळं आपल्यासाठी होतं हे तुमच्या लक्षात येतं आणि तुम्ही तिथेच कोसळता.

Monday, October 02, 2006

विश्वासाचे पानिपत

अशीच एक इ-मेल साखळीतून आलेली गोष्ट आठवली.

एक वडील व मुलगी जंगलातून जात असतात. अंधार पडतो, वाट अरुंद असते, पुढे पाणथळ जागा लागते. वडील मुलीला सांगतात की तू माझा हात घट्ट पकड, आपण हा रस्ता पार करून जाऊ. ती लहान मुलगी वडिलांना म्हणते, 'नको बाबा, तुम्ही माझा हात पकडा आणि आपण हा रस्ता पार करून जाऊ.'

वडील आश्चर्याने विचारतात, 'तुझ्या माझ्या बोलण्यात फरक तो काय बेटा?'

तशी मुलगी म्हणते, 'बाबा मी तुमचा हात पकडला आणि पुढे संकट आलं तर मी कदाचित तुमचा हात सोडून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीन. पण तुम्ही माझा हात पकडला आणि संकट आलं तर तुम्ही माझा हात सोडणार नाही. आधी मला वाचवाल मग स्वत:ला.'

अशी छानशी गोष्ट असायला हरकत काहीच नाही, तशी ती मला विश्वासार्हही वाटते. मनुष्याचे आपल्या मुला बाळांवर आपल्या आई वडिलांपेक्षा अधिक प्रेम असते हे सत्यच त्यातून पुढे येते. परंतु त्यापुढे जाऊन अकबर बिरबलाची माकडिणीची गोष्ट आठवते आणि वरील गोष्टीचा पाया काहीसा डळमळीत होतो.

हौदात आपल्या पिलासमवेत एका माकडिणीला उभं करून त्यात बिरबल पाणी भरायला लावतो. माकडीण पिलाला घट्ट धरून कावरीबावरी होऊन उभी राहते. पाणी चढत जातं तशी तिची पिलाला कसं वाचवावं अशी घालमेल होते. शेवटी पाणी नाकापर्यंत चढतं तशी मात्र ती पिलाला पायाखाली टाकून त्यावर उभं राहून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाला स्वत:चा जीव सर्वात प्रिय असतो हे बिरबलाचे म्हणणे खरे ठरते.

माझ्या मनात या दोन्ही गोष्टींवरून फक्त एकच प्रश्न उठतो; वरील गोष्टीतल्या मुलीने वडिलांवर जेवढा विश्वास टाकला तितकाच विश्वास त्या माकडिणीच्या पिलानेही आपल्या आईवर टाकला असेल का?

विश्वास हे मला दुधारी शस्त्र वाटतं. दुसर्‍यावर अती विश्वास ठेवला तरी फसवणूक होऊ शकते आणि सतत अविश्वास दाखवत गेलं तरी नुकसान संभवण्याची शक्यता असते. कधीतरी आपण ठरवतो की विश्वास उत्पन्न व्हायला खूप वेळ लागतो आणि कधीतरी पर्याय नाही म्हणून एखाद्यावर चटकन विश्वास ठेवतो.

या विश्वासाचं आणि माझं 'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं काहीतरी विचित्र नातं आहे. या शब्दावर विचार करायला बसलं तर दरवेळेस वेग वेगळे विचार डोक्यात येतात आणि विचार न करता कुणावरतरी विश्वास टाकून मोकळं व्हावं असं वाटतं. 'Utter confusion' यालाच म्हणत असावे. विश्वास आणि विश्वासाशी साधर्म्य सांगणार्‍या शब्दांची उकल अशी करता येईल:

१) धारणा (belief): मनुष्याची एखाद्या विषयाबाबत एखादी ठाम धारणा (किंवा पक्का समज) असू शकते. ती पाळणे, तिचे संवर्धन करणे हे त्या मनुष्याच्या इच्छेनुसार होत असते. बरेचदा धारणा खरी की खोटी या कडे फारसे लक्ष दिले जात नाही. ती आहे तशीच कुरवाळत बसण्यात माणसाला आनंद मिळत असावा. इतर प्रकारांच्या मानाने धारणा ही फारशी कडवी नसावी असे वाटते.

२) विश्वास (trust, confidence): हा धारणेचा पुढचा टप्पा असावा. सहसा विश्वास या शब्दाचा वापर अतिशय सकारात्मक तर्‍हेने केला जातो. एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर आपण किती अवलंबून आहोत यावरून आपण त्यांच्यावर किती विश्वास टाकतो हे परिमाण बहुधा ठरत असावे. वर म्हटल्याप्रमाणे कधीतरी इतरांवर किती विश्वास टाकावा हे ही कळेनासे होते. तरीही विश्वास हा डोळस वाटतो.

एखाद्या व्यक्तीचा विश्वास जिंकणे किंवा संपादन करणे, एखाद्यावर विश्वास दर्शवणे हे सुखदायक आणि फायदेशीर ठरू शकते तर विश्वासाचे तुटणे, विश्वास खोटा पडणे, विश्वासघात होणे हे दु:खदायक असण्याची किंवा नुकसानदायी ठरण्याची शक्यता वाटते. अशा मोडलेल्या विश्वासाचे किंवा विश्वासघाताचे सल मनातून जायला फार वेळ लागत असावा.


३) श्रद्धा (faith): श्रद्धा हा शब्द बहुतेकवेळा देवाशी निगडित असतो. देवाशी नसला तर आयुष्यातील अधिकारी व्यक्तींशी असतो त्यात आई-वडील, गुरू, जोडीदार यांचा समावेश होऊ शकतो. श्रद्धा हे दृढ विश्वासाचे रूप वाटते. बरेचसे धर्म श्रद्धेला व श्रद्धेच्या बळाला महत्त्व देतात असे दिसते. श्रद्धेची व्याख्या कुठेतरी 'कसलाही पुरावा दाखवण्याची गरज नसलेली धारणा' अशी केल्याची वाचलेले आठवते. दुसर्‍या शब्दांत श्रद्धा ही आंधळी असते असेही म्हणता येईल आणि असं म्हणायला गेलं तर सर्वच श्रद्धा अंधश्रद्धा ठरतील; तरी श्रद्धा कधी खोटी पडू नये, तुटणार्‍या श्रद्धेतून सावरणे प्रत्येकालाच शक्य असते असे वाटत नाही.

विश्वासाचं असं पानिपत केल्यावरही एखाद्यावर किती, कसा आणि कधी विश्वास ठेवायचा हे मला अजूनही ठरवता आलेलं नाही, कदाचित ते त्या त्या वेळेवरील त्या त्या परिस्थितीवरच अवलंबून असावे आणि माणसाने हेच सत्य स्वीकारून 'आलीया भोगासी' म्हणावे.

marathi blogs