प्रकार

Friday, February 23, 2007

हॅपिली नेवर आफ्टर!

सिंड्रेला (भाग दोन)राजा राणीने थाटामाटात राजपुत्राच लग्न सिंड्रेलाशी लावून दिले. वधू-वरांना सर्वांनी तोंड भरून आशिर्वाद दिले. खरं बघायला गेलं तर राणीला मनातून सून पसंत नव्हती. तिच्या माहेरी सिंड्रेलापेक्षा ५६ सुंदर मुली होत्या. पण करते काय? तिच्या लाडक्या मुलाला बायको पसंत होती ना!

लग्न झालं, हनीमून झाला, सगळेजण आपापल्या कामाला लागले. सिंड्रेलाचा वेळ महालात जाईना. नटून थटून बसायचे, आल्यागेल्याला गोड हसून दाखवायचे, मेजवान्या झाडायच्या एवढेच काम सिंड्रेलाच्या वाटयाला होते. दिवसभर राबराब राबून कष्ट उपसणार्‍या सिंड्रेलाच्या शरीराचा घेर रोजच्या ऐशोआरामाने हळूहळू वाढू लागला. राजपुत्राने एक दोन वेळा मोठया प्रेमाने तिला याची कल्पनाही दिली नंतर लक्ष देणे सोडून दिले.

काही दिवसांपूर्वी एका दासीने राजपुत्राला मुख्य प्रधानांच्या कन्येसोबत बागेत फिरताना पाहिल्याचं सिंड्रेलाला येऊन सांगितलं. प्रधानकन्या राजपुत्राला अगदी खेटून बसल्याचंही सांगितलं होतं. सिंड्रेलाने राजपुत्राकडे याचा हळूवारपणे खुलासा मागितला असता त्याने प्रधान कन्येला गाणं येतं, काव्य येतं, तिला अनेक विषयांची, भाषांची उत्तम जाण आहे असं उत्तर दिलं. वर, राजपुत्रांना अनेक बायकांचा संग शोभून दिसतो असंही सुचवलं.

सिंड्रेलाला दिवसेंदिवस या सगळ्याचा कंटाळा आला होता, काहीतरी करणे आवश्यक होते, पण करावे काय यावर तिने बराच विचार केला आणि एक दिवस ती सरळ स्वयंपाकघरात घुसली.

आचार्‍यांना तिने सांगितले की आजचा खाना ती बनवणार. कंबर कसून सिंड्रेला कामाला लागली. आचारी आ करुन पहात राहिले. त्यांचा प्रमुख आचारी पुढे सरला आणि म्हणाला, "बाईसाहेब हे काय? महाराज काय म्हणतील? महाराणींना कळलं तर आमच्या नोकर्‍या जायची वेळ येईल." पण सिंड्रेलाने फारसं लक्ष दिलं नाही, आपल्याच नादात कामाला लागली होती.

एका आचार्‍याने हळूच जाऊन राणीच्या कानात झाला प्रकार सांगितला. राणीसाहेब धावत पळत भटारखान्यात आल्या.

"हे काय बाई भलतंच? राजवाडयात नोकर कमी पडले की काय?" राणीने आश्चर्याने विचारले.

"नाही राणीसाहेब, पण नुसतंच बसून बसून माझा वेळ जात नव्हता म्हणून इथे आले," सिंड्रेलाने अदबीने उत्तर दिले.

"जळ्ळ मेलं लक्षण! वेळ जात नव्हता तर मेजवानी ठरवावी. उमरावांच्या मुली बायकांना बोलवावं. नाहीतर गाणं, चित्रकला, भरतकाम वगैरे करावं," राणीसाहेब डाफरल्या.

"पण मला हे सर्व कुठे येतंयं? माझा जन्म झाड-पूस, स्वयंपाक, साफ-सफाई यांतच गेला," सिंड्रेलाच तोंड उतरुन गेलं होतं. आपल्याला स्वयंपाकघराच्या चार भिंतींबाहेरचं इतर काहीही माहित नसल्याची बोच तिला गेले काही दिवस खात होतीच.

"हो तर! तरी मी राजपुत्राला सांगितलं होतं की असला भिकारडेपणा घरात नको, पण त्याच्यावर प्रेमाचं भूत स्वार होतं ना! जशा काही सुंदर्‍या कमीच होत्या राज्यात." फणकारून राणीसाहेब म्हणाल्या.

सिंड्रेलाच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती धावतच आपल्या महालात परत आली आणि पलंगावर स्वत:ला झोकून देऊन रडू लागली. कोणीतरी हलकेच तिच्या डोक्यावरुन हात फिरवत होते. तिने वर मान करुन पाहिले तर समोर परीराणी उभी होती.

सिंड्रेला रडतरडत तिच्या कुशीत शिरली. "परीराणी, हे गं काय झालं? मला वाटल होतं की मी सुखी झाले. सावत्र आईच्या जाचातून सुटका झाली, स्वप्नातला राजकुमार मिळाला; पण वरून सुखी वाटणारं आयुष्य इतकं दु:खदायक असू शकतं याची कल्पनाच नव्हती मला. कशाला तू भरीला पाडलंस त्या समारंभाला जाण्यासाठी? ना मी तिथे गेले असते, ना राजपुत्र भेटला असता ना हे सगळं नशिबी आलं असतं....."

परीराणीने तिला कुरवाळलं आणि जरा कोरड्या आवाजात म्हटलं, "सिंड्रेला, मी नाही हो तुला भरीला पाडलं, तिथे जावं अशी तुझीच इच्छा होती. मी ती पूर्ण केली इतकंच. मी तुला राजपुत्राच्या प्रेमात पडायला आणि त्याच्याशी लग्न करायलाही भाग नाही पाडलं. ती ही तुझीच इच्छा."

"अगं पण प्रेमात कशी नसते पडले मी? राजपुत्र आहे तो राज्याचा. त्याच्यापेक्षा उमदा पुरूष इतरत्र कुठे मिळायचा?"

"बरोबर बोललीस. राज्यातील ६ वर्षाच्या पोरीपासून ६० वर्षाच्या वृद्धेपर्यंत सर्वच त्याच्या प्रेमात आहेत, म्हणून त्या त्याच्याशी लग्नाची स्वप्नं नाही पाहात. प्रेम आणि लग्न या फार वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम कधीही आणि कोणावरही करता येतं, लग्न कधीही आणि कोणाशीही केलं तर फसण्याचा संभव अधिक असतो. प्रेम टिकवावं लागत नाही, ते जसं निर्माण होतं तसं कधीतरी विरूनही जातं, त्याचा गाजावाजा करावा लागत नाही की दवंडी पिटावी लागत नाही. लग्नाचं तसं नाही, ते करताना समाजाला सांगावं लागतं, लग्न टिकवावं लागतं आणि मग 'सुख काय मानण्यातच आहे', 'ठेविले अनंते जैसे..' असं म्हणत मार्गक्रमण करावं लागतं.

मजा म्हणजे 'लग्न पहावे करून...' अशी इच्छा ठेवणारी, लग्न करणारी, लग्न मोडणारी, लग्न टिकवणारी सर्वच माणसे या ना त्याप्रकारे कसल्या न कसल्या तक्रारी करत असतात. नवर्‍याला बायकोबद्दल, बायकोला नवर्‍याबद्दल, सासूबद्दल, सासूला सुनेबद्दल तक्रारीच तक्रारी. मला तर वाटतं की या सर्व परीकथांचा जो लेखक आहे त्याने कधीच लग्न केलं नसावं, नाहीतर 'देन दे लिव्ड हॅपीली एवर आफ्टर'सारखं वाक्य प्रत्येक गोष्टीच्या शेवटी त्याने टाकलंच नसतं.

तू लग्न केलंस ना सिंड्रेला, आता त्यात राहून सुखी राहायचं, सुख मानायचं की सुखी असल्याचं भासवायचं हे तुझं तू ठरवायचं. एकच लक्षात ठेव, लग्न केलेले बाकीचे सगळेही थोड्याफार प्रमाणाने तुझ्यासारखेच आहेत, तेव्हा दु:खी होण्यापेक्षा मीही त्यांच्यातलीच आहे असं समजून विचार कर. आयुष्यात काहीतरी वेगळं कर. राणी आहेस तर राणीसारखी राहा. नव्या गोष्टी शीक, आयुष्याची नवी दालने उघड आणि आणखी एक लक्षात ठेव, नव्या गोष्टी शिकलीस म्हणून सुखी होशील असे नाही; दु:ख, प्रश्न, अडचणी अनेक मार्गाने येतात. लग्न करून टिकवणं इतक सोपं असतं तर आम्हा पर्‍यांनी नसती केली लग्न?

तरीही हॅपिली नेवर आफ्टरमुळे खूप काही बिघडत नाही. दिवस उगवायचा थांबत नाही, रात्र व्हायची वाट पाहत नाही, उन्हाळे हिवाळे थांबत नाही. जगात बरेचसे माझ्यासारखेच आहेत म्हण आणि पुढे चल! किंवा जमलं तर आपल्या पायावर उभी राहा. सतत काहीतरी उद्योग करायला शीक. आपल्या गाठीशी थोडंसं श्रेय घे आणि स्वतःचं आयुष्य जगायला सुरूवात कर... मग ते राजवाड्याच्या बाहेर पडून करावं लागलं तरी... बघ! आहे तयारी? "आणि परीराणी अंतर्धान पावली.

Sunday, February 18, 2007

जो जीता वोही

गेल्या कित्येक दिवसांपासून माझा "ब्युसाफलस" पेंड खातोय. आता घोडाच तो पेंड नाही तर काय खाणार म्हणा, पण गाढवाला आपण कोणाचा घोडा आहोत ते नको लक्षात यायला?

'अलेक्झांडर द ग्रेट' लिहावा अशी बर्‍याच दिवसांपासून इच्छा होती. हल्ली विकिमुळे एक बरं झालंय की कोणीही उठून कोणत्याही विषयावर बिनधास्त लिहू शकतो. तसा सुमारे ३ वर्षांपूर्वी अलेक्झांडरवर बरेच वाचन केले होते. त्या अनुषंगाने ग्रीक इतिहासावरही बरेच हात पाय मारले होते परंतु काही दिवसांनी 'मेमरी लॉस' होणे "मैं कहाँ हूँ?" विचारणे हा माझा स्वाभाविक गुणधर्म आहे त्यामुळे सध्या आपण असे काहीतरी वाचले होते, हे जरा बिचकतच म्हणते.

मध्यंतरी ऑलिवर स्टोनचा अलेक्झांडर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता, अरेरे! काय टुकार सिनेमा होता. केवळ कॉलिन फॅरेल होता म्हणून पैसे वसूल झाले असे खोटे समाधान मानायचे. पण अलेक्झांडर काय किंवा ब्रॅड पिटने काम केलेला ट्रॉय काय, इतक्या historical inaccuracies कशा काय कोणी दाखवू शकतो? धन्य ते हॉलीवूड!

अलेक्झांडर चित्रपटात एक मजेशीर प्रसंग घुसवलेला आहे. पर्शियन सम्राट दरायसच्या बायकोला, स्ट्रटेराला बंदिवान केल्यावर अलेक्झांडर विचारतो, "हे राणी! मी तुला कसे वागवू?" आणि राणी उत्तरते, "राणीसारखी". अगं आई गं! या सिनेमावाल्यांनी आमच्या पुरुरव्याच्या तोंडचे शब्द चक्क चोरले. ते तर ते पोरसच्या नावाला आणि पात्राला फुलांच्या माळा आणि तोंडाला रंग फासून साफ रानटी करून टाकले होते. या हॉलीवूडवाल्यांची नेमकी कोणती अडचण असत्ते आयुष्यात कळायला मार्ग नाही. (What is their problem in life myan??)

याउलट, ग्रीकांच्या इतिहासात पोरसचे वर्णन साडेसहा फूटांहून अधिक उंच, धिप्पाड, देखणा, करारी असे केले आहे. 'मला राजासारखा वागव' असे सांगितल्यावर अलेक्झांडरला त्याच्या धाडसाच्या वाटलेल्या कौतुकाचे व्यवस्थित वर्णन केलेले आहे. या खेरीज अलेक्झांडरला असलेले भारतीय कला, संस्कृती यांचे कुतूहल, भारतीय संस्कृतीने आपल्याला परके समजू नये यासाठी केलेले प्रयत्न, अलक्षेंद्र म्हणून त्याचा भारतीय दस्त ऐवजांत केलेला उल्लेख, विद्वान ब्राह्मणांशी केलेल्या चर्चा, आपल्यासोबत ग्रीसला चला असे अनेक विद्वानांना केलेले आवाहन आणि कल्याण ऋषींना ग्रीसला नेण्याची जबरदस्त इच्छा इ. इ.

नव्या वर्षाची सुरूवात म्हणून विकिपीडियावर 'अलेक्झांडर द ग्रेट' खरडायला घेतला होता. पब्लिक लायब्ररीतून पुस्तके आणली, वाचन सुरू केले. एकदा लेखन सुरू केल्यावर मात्र मारुतीच्या शेपटासारखा लेख वाढतच जातोय. मॅसेडोनियन, ग्रीक, एजियन, पर्शियन, कित्येक शहरे, नद्या, प्रदेश, लढाया, सरदार, मित्र, शत्रू, मांडलिक, फितूर प्रत्येकाची गणती ठेवावी लागते. अगदी या ब्युसाफलस नावाच्या गाढवाचीही.

जो जीता वहीं सिकंदर आणि मुकद्दर का सिकंदर खेरीज अलेक्झांडर कुठे आठवतो आम्हाला? नाही, तसे ही आमीर आणि अमिताभच आठवत असावेत म्हणूनच खर्‍या अलेक्झांडरबद्दल लिहायला घेतलं होतं परंतु गेले बरेच दिवस या वाईट हवामान, सुपर बोव्ल (घोडा नाही तर घोड्याची नाल), त्यानंतर आमचे मराठी मंडळ, शाळा, मित्रमंडळ यांना सगळे कार्यक्रम एकापाठोपाठ एक करावेसे कसे वाटतात कोण जाणे? येणार्‍या बर्‍याच दिवसांत रात्री थोड्या सोंगं फार अशी परिस्थिती आहे. पुढचे काही महिने भरघोस कार्यक्रमात, जबाबदार्‍यांतच जाणार असल्याने अलेक्झांडरला भोज्जा करायला एप्रिल उजाडेल की काय अशी भीती सध्या मला वाटते आहे आणि एप्रिलपर्यंत उत्साह गळला तर? आमचं घोडं अडूनच राहिलं तर?.... :(

.... म्हणूनच हा लेखनप्रपंच. कधीतरी मनांत आलं की जो जिंकतो तोच सिकंदर असेल तर या सर्व लढाया संपल्यावर कधीतरी पुन्हा अलेक्झांडरशी लढाई लढायला घेईन, आणि यावेळीही खुश्शाल जिंकू दे त्या सिकंदराला.

Tuesday, February 13, 2007

पांढरेशुभ्र वादळ

हिरवे हिरवे गार गालिचे
कधी बरे नजरेस यायचे?


लाल समुद्र, काळा समुद्र यांच्यासारखा एक सफेत समुद्र रशियाच्या वायव्येस आहे. 'गंगा आली रे अंगणी' प्रमाणे तो सध्या आमच्या दारी अवतरला आहे.

गेले कित्येक दिवस आमच्या शहरात बर्फाचा शुभ्र गालिचा सर्वत्र पसरला आहे आणि आज आधीच्याच चार इंच जाड्या या गालिच्यावर आठ ते बारा इंच बर्फ पडला आहे, पडतो आहे. सोबतीला ४०- ४५ मैल वेगाने घोंघावणारे वादळी वारे, त्यांच्या जोडीने तांडव करणारे हिमकण आणि दृष्टी मर्यादित करणारा मंद प्रकाश.


त्यातल्या त्यात उत्तम गोष्ट म्हणजे राज्यात शाळा, महाविद्यालये आणि बहुतांश कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अशावेळी घरात फायरप्लेसमध्ये जाळ करायचा, हातात वाफाळलेल्या चहा-कॉफीचा मग घ्यायचा, शाल पांघरून एखादा मस्त चित्रपट टाकायचा आणि तोंडात एखाद्या आवडीच्या गाण्याची धून घोळवायची. जसे,

Oh the weather outside is frightful
But the fire is so delightful
And since we’ve no place to go
Let it snow, let it snow, let it snowDSC00798DSC00800DSC00801


"कधीकाळी" (just kidding!) ही माझ्या घराची मागची आणि पुढची बाजू होती. इतर वेळेस येथे एक हिरवेगार मोकळे मैदान, रस्ता आणि गाड्या पार्क करायला पार्किंग लॉट असतो. ते हिरवेगार मैदान पुन्हा नजरेस पडायला बहुधा एप्रिल उजाडेल.

Tuesday, February 06, 2007

आऽऽई!!

लेखन प्रकार: गूढकथा


वासुदेवने बाइक पार्क केली आणि लगबगीने तो घरात शिरला. "स्वाती ए स्वाती! कुठे आहेस तू? एक खुशखबर आहे."
"कसली खुशखबर? सांग तरी," स्वाती स्वयंपाक घरातून हात पुसत बाहेर आली.
"माझी बढती झाली. बॅंकेचा व्यवस्थापक म्हणून," वासुदेवने खुशीत येऊन स्वातीला घुसळत सांगितले.
"हो??? अरे वा, बॉस! अभिनंदन. मज्जा आहे बुवा! आता केबिन, स्टाफ आणि काय काय मिळणार असेल नाही."
"हो तर! पण बढती बरोबर बदली पण हातात पडलीये. मडगावला बदलीची ऑर्डर हाती आली आहे. आठवड्याभरात निघायला हवंय, घाई घाई होईल नाही गं," वासुदेवने हलकेच पिल्लू सोडले.
"अरेच्चा! एकदम मडगाव! गोवा!!. म्हणतोस काय वासू. गोव्याला जायला मी एका पायावर तयार आहे. तुला माहित्ये ना की गोवा मला किती आवडतं आणि तिथे जाऊन पुढची काही वर्ष राहायचं म्हणजे खरंच मस्तच रे! तू काही काळजी करू नकोस. मी विशाखाला बोलावून घेते ना मदतीला. होईल सगळी व्यवस्था आठवड्यात," स्वातीने उत्साहाने सांगितले.
"अगं पण तुझे छंद?"
"चित्र ना अरे उलट मडगाव सारख्या ठिकाणी माझ्यातला चित्रकार अधिकच फुलून येईल. वासू, आपणना मडगावला एखादा छोटासा बंगला भाड्याने मिळतो का ते पाहूया. मला ना ऐसपैस घर असावं, घरासमोर छानशी बाग असावी अशी खूप दिवसांची इच्छा आहे रे. माझा वेळ मस्त जाईल अशा घरात आणि चित्रकाराला लागणारा एकांतही मिळेल," स्वातीचा उत्साह फसफसून वाहत होता.

वासुदेव आणि स्वातीच्या लग्नाला १० वर्षे उलटून गेली होती. दोघेही संसारात सुखी होते. पण संसाराच्या वेलीवर फूल उमलले नव्हते. स्वाती घरात लहान बाळाच्या येण्याला आसुसलेली होती. आपला वेळ आणि मन ती चित्रकारी करण्यात रमवत असे. अशा गोष्टी आपल्या हातात नसतात हे समजून उमजून दोघेही एकमेकांना सांभाळून घेत.
"मी बघतो. बॅंकांना भाड्याने घरं देणारे काही एजंट असतात. मडगाव ब्रॅंचला संपर्क साधून काम होतंय का पाहतो."

-----

आठवड्या भराने स्वाती आणि वासुदेव मडगावला पोहोचले. एजंटला सांगून एक घर पाहून ठेवले होते. सगळं काही पसंत पडले की सामान मागाहून विशाखा; स्वातीची धाकटी बहीण पाठवणार होती. पेडणेकर नावाचे गृहस्थ इस्टेट एजंट म्हणून काम पाहत. बॅंकेतल्या अधिकार्‍यांना लागणारी भाड्याची घरे पुरवायचे कामही ते करत. ठरवल्या प्रमाणे ते सकाळी १० वाजता स्वाती आणि वासूला घ्यायला त्यांच्या हॉटेलवर पोहोचले.

पेडणेकर अंदाजे ५०च्या आसपास असावेत. माणूस दिसायला सज्जन आणि मृदुभाषी होता. आपली गाडी घेऊन आला होता त्यामुळे घर पाहून पुन्हा हॉटेलवर यायची सोयही होणार होती. गाडी सुरू केल्यावर पेडणेकरांनी घराबद्दल थोडी माहिती द्यायला सुरुवात केली.

"छोटीशी एक मजली बंगली आहे बघा. खाली बैठकीची खोली, स्वयंपाकघर, एक बेडरूम आणि वरच्या मजल्यावर बाल्कनी आणि ३ बेडरूम आहेत. खानोलकरांच घर म्हणून सगळे ओळखतात. अंदाजे ३० एक वर्षांपूर्वी त्यांनी हे घर बांधलं, आता पती पत्नी दोघे वृद्ध झाले आहेत. गेल्या १० वर्षांपासून अमेरिकेला मुलाकडे राहतात. घर रिकामं नको म्हणून भाडेकरू ठेवतात. घराची जागा समुद्राजवळच आहे. भल्या पहाटे नाहीतर रात्री समुद्राची गाज सहज ऐकू येते. पूर्वी विहिरीचं पाणी वापरावे लागे, आता विहिरीवर पंप लावून पाणी खेळवलं आहे, नगर पालिकेचा नळही आहे पण त्याला दिवसातले थोडे तासच पाणी येतं."

बोलता बोलता पेडणेकरांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावली, "चला पोहोचलो आपण, घर पाहूया."

घर छान टुमदार दिसत होतं. घराबाहेर बर्‍यापैकी मोठं अंगण होतं पण त्याची निगा राखलेली दिसत नव्हती. तण माजलं होतं. झाडं सुकून गेली होती. स्वातीला क्षणभर उदास वाटलं, "कोण राहत होत इथे यापूर्वी?" तिने एक सहज प्रश्न केला.

"तसं घर भाड्याने देऊन ७-८ वर्षे झाली. सगळ्यात आधी एक कुटुंब राहायचं. ४ वर्षे राहिले आणि नंतर सोडून गेले. त्यानंतर एक दोन कुटुंब आली, गेली. फार काळ नाही राहिली. त्यानंतर गेले दोन एक वर्षे म्हात्रे नावाचा एक सडाफटिंग गृहस्थ इथे राहत होता. तो वासुदेव साहेबांच्या बॅंकेतच होता. त्याची हल्लीच मुंबईला बदली झाली. आता तो कुठे बाग राखणार? म्हणून हे सगळं असं उजाड दिसतंय एवढंच. बागेला पाणी घालायला नळ आहे इथे बाहेरच. चला घरात जाऊ," लगबगीने पेडणेकरांनी दरवाजा उघडला.

बाहेरच्या प्रखर सूर्यप्रकाशातून एकदम घरात शिरल्याने स्वातीच्या डोळ्यासमोर अंधारल्यासारखं झालं. हळू हळू दृष्टी सरावली तसं घर नजरेत येऊ लागलं. बंद घरातला एक प्रकारचा कुबट वास सर्वांच्या नाकात भिनला. पेडणेकरांनी लगबगीने जाऊन खिडकी उघडली, "बंद होतं गेले थोडे दिवस. या माझ्याबरोबर. मी घर दाखवतो." आणखी एक-दोन खिडक्या त्यांनी उघडल्या.

स्वाती आणि वासूने सगळं घर फिरून पाहिले. घर प्रशस्त होतं. हवेशीर होतं. पश्चिमेकडच्या खिडक्यांतून समुद्राचा खारा वारा येत होता. "या! स्वयंपाकघराच दार मागच्या अंगणात उघडतं. इथेच विहीर आणि पंप आहे. विहीर पूर्वी उघडी होती पण आता वरून झापडं लावून बंद केली आहे. पिण्याचा पाण्यासाठी नगरपालिकेचा नळ आणि इतर सगळ्या गरजांसाठी या विहिरीचं पाणी वर्षभर पुरून उरेल, " पेडणेकर माहिती देत म्हणाले. "इथून ७-८ मिनिटांच्या अंतरावर जाधवांच किराणा मालाच दुकान आहे. कसलंही सामान घरपोच करतील. आमच्या गोव्याची माणसं तशी सुशेगात. १० वाजता दुकान उघडतो लेकाचा. पण माणूस सज्जन. घरकाम करायला कुणी बाई हवी असेल तर तीही चौकशी मी करून ठेवतो. फोनच कनेक्शन आहेच त्यामुळे ती एक कटकट मिटली."

"स्वाती कसं वाटलं घर तुला? आवडलं तरच पुढची बोलणी करू." वासूने विचारलं.
"आवडलं रे! छानच आहे. हेच नक्की करूया."
"ठीक तर! चला इथून माझ्या कार्यालयात जाऊन राहिलेले सोपस्कार पूर्ण करू. स्वातीताई तुम्ही तेवढ्या खिडक्या दारं बंद कराल का?" पेडणेकरांनी विनंती केली.

स्वाती एक एक खिडकी बंद करत स्वयंपाकघराच्या मागच्या दरवाज्यापाशी पोहोचली. दरवाजा ओढून घेताना समुद्राच्या खार्‍या वार्‍याचा थंडगार झोत एकदम आत आल्यासारखा वाटला आणि त्याच्याबरोबर दूरवरुन एक आर्त साद, "आऽऽऽई!" एक अनामिक शिरशीरी स्वातीच्या तळपायातून मस्तकाकडे गेली. कुणीतरी लहान मूल आईला साद घालत होतं. स्वातीच्या मनाला काहीतरी बोचल्यासारखं झालं. तिने निमूटपणे दरवाजा ओढून घेतला व ती वासू आणि पेडणेकरांबरोबर घराबाहेर पडली.

-----


स्वाती आणि वासूला घरात राहायला येऊन चांगले २-३ दिवस होऊन गेले होते. घरात येण्यापूर्वीच पेडणेकरांनी अंगणातील माजलेले तण कापून दिले. पंप कसा चालवायचा या बद्दल माहिती दिली. साफसफाई करायला पेडणेकरांनी नीलाबाईंना ठरवून दिले होते. स्वातीने नीलाबाई यायच्या आधीच घर वर वर झाडून पुसून स्वच्छ करून घेतले. त्यात आजच विशाखाने पाठवलेले सामान पोहचले. वासू ऑफिसला जायला लागला होता पण आज सामान येणार म्हणून लवकर घरी आला होता. दोघे मिळून सामानाची लावालाव करत होते. स्वातीच्या पेंटीग्जच्या काही फ्रेम्स भिंतीवर लावायच्या असल्याने वासू हातोडा आणि खिळे घेऊन ठोक-ठोक करत होता तर स्वाती बेडरूमच्या कपाटात कपडे लावत होती. तळकप्प्यांत थोडीशी धूळ असल्यासारखं वाटलं म्हणून ती ओला कपडा आणायला स्वयंपाकघरात आली आणि तिचा पाय पाण्यात पडला. बघते तो स्वयंपाकघराच्या दारात हे मोठं पाण्याच तळं.

"वासू ए वासू! तू पाणी पिऊन गेलास का रे? कित्ती सांडवून ठेवलं आहेस इथे पाणी? कामांत काम वाढवतो आहेस," स्वाती करवादली.
"मी कुठे यायला? ही हातोडी आणि हे खिळे माझ्या हातातच आहेत. ठोकाठोक ऐकते आहेस ना तू?"
"अरे मग इथे पाणी कस आलं? तळ साचलंय नुसतं. घरात तू आणि मी सोडून दुसरं कुणी आलंय का?"
"तूच पाडवलं असणार. वेंधळेपणाचा अर्क आहेस स्वाती तू. विसरली असशील पाडवलं आहेस ते."
"आता मात्र हद्द झाली. मी बेडरूम मध्ये होते. इथे आले ही नाही, या नीलाबाई येतील तर कामाला थोडा हातभार लागेल," वैतागून स्वातीने कपडा घेतला आणि सगळं पाणी पुसून काढलं.

दारावरची बेल वाजली तशी स्वातीने उठून दरवाजा उघडला. बाहेर उभ्या असलेल्या बाई, नीलाबाईच असाव्यात हे ओळखून तिने विचारले, "पेडणेकरांनी पाठवलं ना तुम्हाला?"
"अं... हो! मी नीला. तुमच्याकडे काम आहे म्हणून पेडणेकर सायबांनी सांगितलं होतं म्हणून आले," नीला बाई तिशीच्या आसपास असाव्यात. बाई नीट नेटकी होती, चेहर्‍यावरून शालीन वाटत होती. बाईंची नजर मात्र काहीतरी शोधत होती. बोटांनी पदराशी चाळा सुरू होता. "या आत या!" स्वाती त्यांना घेऊन आत आली तरी बाईंची नजर काहीतरी धुंडाळतच होती. "मी दिवसातून एकदाच येईन. ती ही सकाळीच. नंतर येणार नाही चालेल का ते सांगा," बाईंनी आपली बाजू स्पष्ट केली, "पेडणेकर सायबांचे खूप उपकार आहेत. त्यांचा शब्द मोडवला नाही म्हणून त्यांना हो म्हटलं नाहीतर...." बाई बोलता बोलता चपापल्यागत होऊन गप्प बसल्या.

"चालेल हो! सकाळी एकदाच या ११ च्या सुमारास, तेच बरं. चला तुम्हाला काम सांगते," अस म्हणून स्वाती बाईंना घेऊन आत गेली.

दुसर्‍या दिवशी वासू ऑफिसला गेल्यावर स्वातीने जाधवांच्या दुकानाला भेट द्यायचे ठरवले. नाहीतरी रोजच्या खाण्या पिण्याच्या बर्‍याच गोष्टी तिला खरेदी करायच्या होत्या. सकाळच्या वेळी दुकानात फारशी गर्दी नव्हती. गल्ल्यावर एक सफेद सदरा लेंग्यातले साठीच्या दरम्यानचे वृद्ध गृहस्थ नाणी मोजत बसले होते, अधेमध्ये नोकराला कोंकणीतून काही सूचनाही देत होते. बहुधा तेच जाधव असावेत अस समजून स्वातीने त्यांच्याजवळ जाऊन आपली ओळख करून दिली.

"अच्छा! तर खानोलकरांच्या बंगलीत आलात तुम्ही. पण पेडणेकर म्हणत होते की ते घर आता भाड्याने द्यायचे नाही म्हणून," थोड्याशा आश्चर्याने जाधव म्हणाले.
"आम्हाला नाही तसं काही बोलले. मला असेच घर हवे होते, शांत, समुद्राजवळचं. मी चित्रकार आहे, पेंटींग्ज बनवण्यासाठी चांगला मूड येईल या घरात," स्वाती हलकेसे हसून म्हणाली.

तिने यादी जाधवांना दिली, त्याप्रमाणे त्यांनी सगळे सामान स्वातीला आणून दिले व बिल बनवायला घेतले.
"स्वातीताई, तुम्हाला एक विचारू? काही वेगळं जाणवलं का हो घरात तुम्हाला?"
"वेगळं म्हणजे?"
"नाही काही नाही. सहजच विचारलं," अस म्हणून जाधवांनी बिल स्वातीला दिले. पैसे चुकते करून स्वातीने पिशव्या उचलल्या आणि ती घराच्या दिशेने चालू लागली. वाटेत तिने जाधवांच्या प्रश्नावर विचार केला पण हाताला फारसं काही गवसलं नाही तसा तिने तो विचार मनातून काढून टाकला.

घराचा दरवाजा उघडता उघडता स्वातीने टेलिफोनची रिंग ऐकली. हातातल्या पिशव्या तिथेच टाकून तिने आत जाऊन फोन उचलला व नेहमीच्या सवयीने "हॅलो" म्हटले. पलीकडून थोडीशी खरखर ऐकू आली तेवढीच. रॉंग नंबर असावा अस समजून ती रिसीव्हर खाली ठेवायला गेली आणि "आऽऽई, आई गं!" अशी एक आर्त साद काळीज चिरून गेली. कावरी बावरी होऊन स्वातीने इथे तिथे पाहिले. आवाज फोनमधून आला की घरातून कळायला मार्ग नव्हता.

घराची कर्कश बेल वाजली तशी स्वाती एकदम दचकली. तिने जाऊन थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला, बाहेर नीलाबाईंना पाहून तिला हायसं वाटलं.

"काय झालं ताई? तुम्हाला बरं नाही का? असा चेहर्‍याचा रंग का उडालाय?" नीला बाईंनी काळजीने विचारले.
"नाही, बरंय सगळं. काम काढून ठेवली आहेत. करायला घ्या," स्वातीने मलूल आवाजात उत्तर दिलं आणि किराणा मालाचे सामान पिशवीतून एक एक करून काढायला सुरुवात केली.

संध्याकाळी वासू घरी येईपर्यंत स्वाती सगळा प्रकार विसरूनही गेली होती. दिवसभरात तिने आपला बोर्ड, रंग, ब्रशेस ठेवण्यासाठी वरच्या माळ्यावरच्या एका बेडरूम मध्ये खिडकीजवळची जागा शोधून काढली. खिडकीतून घरामागची हिरवी गर्द झाडी, शेवाळलेली विहीर, पत्र्याची छोटीशी पंपाची खोली, अंगण दिसत होतं, इथेच आपला मूड चांगला लागेल अशी तिची खात्री झाली तशी तिने सर्व वस्तू जागी मांडून ठेवल्या. वासू आल्यावर संध्याकाळ जेवण करण्यात, गप्पा टप्पा मारण्यात निघून गेली.

मध्यरात्री स्वातीला अचानक जाग आली. कुणीतरी अंगावरची चादर खेचत असावं. तिने डोकं वर करून इथे तिथे पाहिलं. खिडकीतून चंद्राचा शुभ्र प्रकाश डोकावत होता. खोलीत कुणीच नव्हत, पण चादर मात्र तिच्या अंगावरून खाली सरकली होती. दूरवर कुठेतरी कुत्रं रडत होतं आणि रातकिड्यांची किरकिर रात्रीच्या भयाणतेत भर घालत होती. खिडकी बाहेरच झाड उगीचच सळसळत होतं. स्वातीचा जीव घाबरा घुबरा झाला. तिने एका हाताने चादर घट्ट पकडली, दुसरा हात वासूच्या अंगावर टाकला आणि डोळे गच्च मिटून घेतले.

-----

घरात राहायला येऊन दोन आठवडे कसे उलटून गेले ते स्वातीला कळलंही नाही. ती आता घराला चांगलीच सरावली होती. पंप चालू करणे, बागेची निगा राखणे, झाडांना पाणी घालणे यासारखी कामे उत्साहाने करत होती. काही वेगळं घडलं तर घरात काहीतरी वावगं आहे की काय ही जाणीव तिला कधीतरी अस्वस्थ करायची, परंतु वाच्यता करावी असं काहीच घडलं नव्हत. तसंही वासूला सांगावं तर तो वेड्यात काढेल की काय या भीतीने ती गप्पच होती.

त्या दिवशी ढगाळून आलं होतं, उत्तर रात्री कधीतरी विजा चमकायला सुरुवात झाली होती. स्वातीला पहाटेच उठून पंप सुरू करावा लागे, त्यानुसार तिने मागचे दार उघडले आणि ती विहिरीपाशी असलेल्या पंपाजवळ आली. बाहेर मिट्ट काळोख होता, नेहमीच्या सवयीने टॉर्चच्या प्रकाशात तिने पंपाचा स्विच ऑन केला. अचानक बाजूच्या सुकलेल्या पानांवरून काहीतरी सळसळत गेल्याचा तिला भास झाला, तिने मान वळवून टॉर्चचा झोत इथे तिथे टाकला.

"कोण आहे?....कोण आहे? समोर का येत नाही?" एक एक पाऊल मागे जात तिने पुन्हा एकदा विचारले आणि घरात धूम ठोकली. दरवाजा बंद करून कडी घालताना तिला तो नेहमीचा आर्त आवाज ऐकू आला, "आई, ए आई! मी आहे, आत घे ना गं!" तिच्या जीवाला थरथरल्यांसारखं झालं. तोच लहान मुलाचा परिचित रडवेला आवाज. 'हा काय प्रकार असावा?' ती धावतच वर गेली आणि पुन्हा चादरीत शिरली. वासूला उठवून सगळे सांगावे असा विचार मनात आला पण तिने तो तिथेच दूर सारला. वासूने ते हसण्यावारी नेले असते आणि संवाद येन केन प्रकारे आपल्याला मूल नसण्यावर येऊन ठेपला असता याची तिला खात्री होती. स्वातीला तोच जुना विषय उगाळायचा नव्हता.

सकाळी नीलाबाई आल्यावर तिने त्यांना छेडलं. झाल्या प्रकाराबद्दल सांगितले. ऐकून नीलाबाईंचा चेहरा कावरा बावरा होऊन गेला. 'नाही हो माहीत मला असं काही' असं म्हणून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. दुपारच्या नीरव शांततेत स्वातीने नव्या कॅनव्हासवर सरावाच्या रेघोट्या मारायला सुरुवात केली. हात चालत असताना तिचे स्वत:शीच विचार सुरू होते. 'कुणाचं मूल असेल? का मला त्याचा आवाज ऐकू येतो? ते आईला पारखं झालेलं असावं का? त्याच्या हाकेला ओ द्यावी का?' नानाविध प्रश्नांनी तिच्याभोवती फेर धरला होता.

संध्याकाळ व्हायला आली तशी ऊन्हं भरभर उतरायला लागली. मधनंच वार्‍याची सळसळ आणि भरतीच्या लाटांचा आवाज गूढ शांततेचा भंग करत होता. अचानक खाली तळमजल्यावर कुणाची तरी चाहूल लागल्याचा भास झाला. स्वातीच्या काळजात कुठेतरी चर्र झालं. ती हातातला ब्रश टाकून जिना उतरून खाली गेली. बैठकीची खोली रिकामी होती. सगळं काही आलबेल होतं. स्वातीने सुटकेचा सुस्कारा सोडला. ती पुन्हा वर जायला मागे वळली तोच तिच्या पायाला पाण्याचा थंडगार स्पर्श झाला. पायर्‍यांवरून पाण्याचे ओघळ वाहत होते. स्वाती नखशिखान्त शहारून गेली. कुठेतरी पळून जावं की काय असा विचार क्षणभर तिच्या मनात आला न आला, त्याक्षणी तिला जाणवलं वर जिन्यात कुणीतरी बसलं होतं.

चौथ्या पाचव्या पायरीवर, सात आठ वर्षांच्या मुलाची एक कृश आकृती अंगाचं मुटकुळं करून मुसमुसत होती. स्वातीला दरदरून घाम फुटला, तिच्या पायांतलं त्राण निघून गेलं. "आई," त्याने डोकं वर केलं. पांढर्‍या फटक चेहर्‍यावरच्या दोन पांढर्‍या सफेत डोळ्यांकडे पाहताना स्वातीच्या सगळ्या चेतना गोठून गेल्या. समोरची आकृती उठून स्वातीच्या समोर आली.

"आई, मी आहे पिंटू. का गं सोडून गेलीस मला?" रडवेल्या आवाजात पिंटू विचारत होता, "किती वाट पाहिली मी तुझी. आता नाही नं सोडून जाणार तू मला. नाही जाऊ देणार मी तुला, कध्धी नाही." पिंटूने स्वातीचा हात आपल्या कृश हातांनी गच्च पकडला. त्या थंडगार, ओलसर, लिबलिबीत स्पर्शाने स्वातीच्या सर्वांगातून एक कळ शीरशीरत गेली आणि ती जागीच वेडीवाकडी कोसळली.

-----

वासूला यायला आज थोडा उशीरच झाला होता. वाटेत काही घ्यायला म्हणून जाधवांच्या दुकानात गेला, तिथे अचानक बराच वेळ निघून गेल्यावर त्याला एकदम बाहेर झुंजूमुंजू व्हायला लागल्याची जाणीव झाली तसा तो धावत पळत घरच्या रस्त्याला लागला. घर नजरेच्या टप्प्यात आलं तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की घरात मिट्ट काळोख आहे. त्याने लगबगीने चावीने दरवाजा उघडला आणि खटाखट दिव्यांची बटणे दाबली. बैठकीची खोली प्रकाशाने उजळून गेली. समोर जिन्याजवळ स्वाती अस्ताव्यस्त पडली होती.

ते पाहून वासू धावत तिच्या जवळ गेला, "स्वाती, काय झालं? अशी कशी पडलीस?" अस म्हणत त्याने स्वातीला गदगदा हालवले. पाणी आणून तोंडावर मारले तसे स्वातीने डोळे उघडले. तिचे डोळे भकास होते. "काय झालं स्वाती तुला?" अस विचारत वासूने तिला उठायला मदत केली आणि सोफ्यावर बसवले. "वासू, कुणीतरी आहे रे या घरांत. मी...मी पाहिलं त्याला. त्याचा स्पर्श अनुभवला."

"हे बघ! आपण वर जाऊ. पड थोडावेळ तुला बरं वाटत नसेल तर. तुला काहीतरी सांगायचं आहे मला," वासूने स्वातीला आधार देऊन वर नेले आणि पलंगावर बसवले.

"मी येताना जाधवांच्या दुकानात गेलो होतो. त्यांनी एक विलक्षण गोष्ट सांगितली, ती आधी तुला सांगतो. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी खानोलकरांनी हे घर भाड्याने दिले तेंव्हा एक कुटुंब इथे राहायला आले. त्या कुटुंबात ३-४ वर्षांचा एक लहान मुलगा होता; पिंटू. पुढची काही वर्षे अगदी सुरळीत गेली आणि एक दिवस दुर्दैवाने खेळता खेळता विहिरीत पडलेला बॉल काढायच्या निमित्ताने पिंटू पाय घसरून विहिरीत पडला. त्याची आई घरात एकटी होती, तिला पिंटूला वेळेत बाहेर काढता आले नाही. मदत येईपर्यंत खूपच उशीर झाला होता. पिंटूला वाचवता आले नाही. या प्रकाराची हाय खाऊन ते कुटुंब घर सोडून निघून गेले. त्यानंतर आलेल्या एक दोन कुटुंबातील स्त्रियांना या घरात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाली तशी घाबरून त्यांनी लगोलग घर बदलले. त्यानंतर गेली दोन वर्षे येथे म्हात्रे राहत होता आणि त्याला मात्र असा वावगा अनुभव कधीच आला नाही. तेंव्हा असे प्रकार थांबले असावेत किंवा केवळ अफवा असाव्यात अशी सर्वांची खात्री झाली. एकंदरीत मी गोष्ट ऐकली ना, तेंव्हा फारसा विश्वास ठेवला नाही पण हा घरी आलो तर तू मला पुन्हा पिंटूची गोष्ट सांगते आहेस. मला वाटत या घरात राहण्यात अर्थ नाही. मी उद्याच जाऊन पेडणेकरांना धारेवर धरतो."

"नाही रे वासू! ते प्रकार थांबले नव्हते. पिंटू इथेच होता असणार, याच घरांत. त्याला आई हवी आहे. म्हात्रे मध्ये आई कशी मिळणार होती त्याला म्हणून म्हात्रेला काही जाणवलं नाही पण आपण आलो तशी पुन्हा पिंटूने उचल खाल्ली आहे. त्याला आई हवी आहे रे, वासू. आईच्या प्रेमाचं भुकेलं आहे ते पोरगं," स्वाती स्वतःशीच बोलल्यागत पुटपुटली.

"काय बोलते आहेस स्वाती? ते मूल नाही. भास आहे... एक जीवघेणा भास. तुझ्यातली आई इतकी वेडी आहे का की सत्य आणि भास यातला फरक ओळखू शकत नाही? शुद्ध वेडे विचार आहेत तुझ्या आसुसलेल्या डोक्यात. ते काही नाही, आपण उद्याच इथून निघूया. या घरात राहायचं नाही, हा माझा ठाम निर्णय आहे. तू पड थोडावेळ आणि फार विचार करू नकोस."

वासू उठला आणि बाल्कनीत जाऊन येरझारा घालू लागला. स्वातीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. "आऽऽऽई!" या हाकेतली आर्तता तिच्या हृदयाला पिळवटून गेली होती पण वासू म्हणत होता ते सत्य होतं. 'आपल्या आयुष्यात मूल यावं ते ही अशा मार्गाने?' स्वातीला हुंदका आवरला नाही. तिने स्वत:ला पलंगावर झोकून दिलं आणि उशीत तोंड लपवलं.

किती वेळ गेला कुणास ठाऊक? अचानक बाहेरून धप्प असा काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि सोबत वासूची कर्णबधिर किंचाळी. स्वाती धावत धावत बाल्कनीत गेली. रस्त्यावरच्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश बागेत पडला होता. तिने पाहिलं वासू खाली डोक्यावर पडला होता. रक्ताचा पाट त्याच्या डोक्याशेजारून वाहत होता. ते पाहून स्वाती थरथरायला लागली तरीही कशीबशी धावत जिन्याच्या दिशेने गेली आणि त्राण निघून गेल्यासारखी मटकन खाली बसली.

जिन्याच्या शेवटच्या पायरीवर पिंटू उभा होता. जिन्यातल्या दिव्याचा पिवळाधम्मक प्रकाश त्याच्या पांढर्‍या फटक शरीरावर पडला होता, "तो माणूस तुला घेऊन जाणार होता ना, आई पण बघ! मी आता तुला इथून अजिबात जायला देणार नाही, कुणी तुला घेऊन जायला लागलं तर सगळ्यांचं असंच करेन." पिंटू छद्मी हसत एक एक पायरी वर चढत होता. स्वातीच्या तोंडातून शब्द ही फुटला नाही. "मी ढकललं त्याला. आता कुणी माझ्या आईला माझ्यापासून दूर नेणार नाही," पिंटूचे पांढरे फटक डोळे अचानक चमकून गेले. "आऽई!" म्हणून पिंटूने स्वातीचे हात आपल्या हातात घेतले.

का कुणास ठाऊक तो थंडगार लिबलिबीत स्पर्श स्वातीला या वेळेस परका वाटला नाही. तिने हळूच आपला हात पिंटूच्या पाठीवर ठेवला आणि त्याला जवळ ओढले. पिंटूनेही तिच्या गळ्याला गच्च मिठी मारली.

(समाप्त)

Thursday, February 01, 2007

सुपर नाल

पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो तेव्हाही माझं मन टिव्हीवरच्या सासू सुनांच्या भांडणाना चटावलेलं नसलं तरी सरावलेलं नक्कीच होतं. अमेरिकन टिव्हीवर काय पाहायचं असा प्रश्न वारंवार मनाला पडायचा. कालांतराने सासू-सुना, देश, काळ, भाषा बदलल्या म्हणून अजीबात बदलत नाहीत हे 'एवरीबडी लव्ज रेमंड' पाहून लक्षात यायला लागलं आणि अमेरिकन टिव्हीशी नाळ जुळत गेली.

नंतर प्रश्न होता खेळांचा. मला लहानपणापासून क्रिकेट आवडतं. खेळातला प्रत्येक बारकावा समजला नाही तरी सर्वसामान्य प्रेक्षकापेक्षा बर्‍यापैकी कळतंही. म्हणजे आमच्या शेजारच्या एक काकू क्रिकेटची मॅच सुरू असताना प्रत्येकवेळी मोठ्ठा आवाज आला की 'सचिनची सेंच्युरी झाली का हो?' असं काकांना विचारायच्या अशी गत नक्कीच नाही. मॅच असली की दिवसभर टिव्हीला चिकटून बसायची सवयही होतीच, ती अमेरिकेत आल्यावर काही काळ कायम होती पण रात्रीची जाग्रणे असह्य होऊ लागली तसा या खेळाचा नाद सोडणे उत्तम असे वाटू लागले. थंडीच्या पाच-सहा महिन्यांत घरी बसून काहीतरी उद्योग तर हवा म्हणून एके दिवशी अमेरिकन फुटबॉलकडे नजर वळवली.

प्रथमदर्शनी खेळातलं काही एक ढिम्म कळलं नाही आणि चार पाच टगे कोणातरी एका बारक्या खेळाडूवर धडाधड पडताहेत, हिसकाहिसकी करताहेत हे बघून किळसच वाटली. त्यातून नाव फुटबॉल असून चक्क हाताने हा खेळ खेळला जातो ते पाहून हसूही आले. जंटलमनांचा खेळ पाहायची सवय झालेल्या माझ्या मनाला हा रांगडा खेळ बिल्कुल रुचला नाही. तेव्हापासून फुटबॉलच्या वाट्याला गेले नाही ते जॅनेट जॅकसनने फुटबॉलला एक वेगळे वलय प्राप्त करून दिल्यावर. त्याप्रकरणानंतर लोकांनी उठवलेल्या नाराजीच्या सुरावरून पुन्हा हा खेळ पाहावा की काय अशी इच्छा निर्माण झाली. या खेळातला 'ख' ही माहित नसलेल्या माझ्या डोक्याला संघ, खेळाडू, खेळ, नियम सर्वकाही जाणून घ्यायचे होते. शांतपणे एक दिवस विकिपीडियावर माहिती शोधली आणि वाचली. आश्चर्य म्हणजे या खेळात आमच्या इंडिएनाच्या संघाचे नाव वर असल्याचा पत्ता लागला. मग खरंच रस घेऊन खेळाचे नियम वाचले, खेळ समजून घेतला आणि २००५ पासून पाहायला सुरूवात केली. घरात अचानक उलटे वारे वाहायला लागले म्हणजे मी खेळ पाहते म्हणून हळूहळू नवर्‍यानेही पाहायला सुरूवात केली.


खेळाचा मोसम सुरू झाल्यावर खेळातील खाचाखोचा समजत गेल्या. रांगडा-रानटी वाटणारा हा खेळ अतिशय नियमाने खेळला जातो असे लक्षात आले. या खेळाचा वेग आणि लय खेळात प्रचंड रंगत आणतात हे कळले. बॉलची लांबी १ फूट असल्याने या खेळाला फुटबॉल म्हटले जाते हे कळले. त्याचबरोबर नावात 'इंडिया' असल्याचा महिमा की काय कळत नाही पण कागदावर वाघ असणारा आमचा संघही भारतीय क्रिकेट संघासारखा आयत्यावेळेला गठळतो आणि आवाक्यात आलेली फायनल दरवर्षी चुकवतो हेही कळून चुकले. गेल्यावर्षी नियमाने खेळ पाहिल्याने आमचा संघ 'फायनलच्या' आसपासही न पोहोचल्याचे बघून मनापासून वाईटही वाटले. या फायनलला अमेरिकेत "सुपर बोव्ल" म्हटले जाते. प्रत्येक संघ आपापल्या क्लबच्या नावाने आणि चिन्हाने ओळखला जातो. 'इंडिएना कोल्ट्स' या आमच्या संघाचे चिन्ह आहे घोड्याचा नाल आणि अमेरिकेतील अशा बत्तीस संघातील शेवटच्या सर्वोत्तम दोन संघात जी लढत होते ती सुपर बोव्ल.

२००७ चा सुपर बोव्ल या रविवारी खेळला जाईल. संपूर्ण अमेरिका त्याकडे डोळे लावून बसली आहे आणि कधीही फायनलपर्यंत न पोहोचलेला आमचा संघ, इंडिएनापोलिस कोल्टस या वर्षी शिकागो बेअर्सबरोबर अंतिम लढत देणार आहेत. गेला आठवडाभर आमच्या शहरांत उत्सवाचे वातावरण आहे. संघाचे चिन्ह आणि रंग असणारे निळे कपडे, प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी दिसणारे भव्य नाल, "गो कोल्ट्स" म्हणून संघाला दिलेले प्रोत्साहन, घोड्याचे नाल असणारे फलक, झेंडे, दागिने, मिठाया, कपडे यांनी माणसे, गाड्या, बाजार आणि शहर सजले आहे.

सुपर बोव्लचा चषक आम्हाला मिळेल किंवा नाही मिळेल. खेळात कोणाची तरी जीत होईल कोणाची तरी हार परंतु आपला संघ इतके महिने खेळून या अंतिम लढतीपर्यंत पोहोचला याचे प्रत्येकाला कोण कौतुक. प्रत्येकजण आपापल्यापरीने संघाला प्रोत्साहन देत आहे, सच्ची चाहती म्हणून मी मागे का राहायचे? तेव्हा माझ्याकडून संघाला GO COLTS!! म्हणायला हा अनुदिनी प्रपंच.

* कोल्ट्सचे चिन्ह विकिपीडियाच्या साहाय्याने चिकटवले आहे.

marathi blogs