प्रकार

Tuesday, April 11, 2006

चिरनिद्रा

काल रात्री Tuesdays With Morrie वाचायला घेतले. मला वाचायला आवडतं असं कळल्यावर मेलिसाने, (माझी gym partner) मोठया प्रेमाने स्वत:ची काही पुस्तकं आणून माझ्या सुपूर्त केली होती. पुस्तकाची फक्त पहिली ४० पानं वाचली असल्याने त्याच्या बद्दल नाही बोलायचय पण त्याच्या अनुषंगाने काही पूर्वीच्या गोष्टी आठवल्या. मरणाच्या, मृत्युच्या. प्रत्येकाने त्याला वेगळ्या रुपात पाहिल्याच्या.

शाळेत असताना मराठीच्या पुस्तकात पानिपतच्या लढाईवर एक धडा होता. त्यात दत्ताजी शिंद्यांच्या तोंडचे एक सुरेख वाक्य होते. मला ते पूर्ण आठवत नाही पण "आप मेला जग बुडाले....." असंच काहीतरी होते. अर्थ असा की आपण मेलो की जग आपल्यासाठी संपून जाते, मागे काय आणि कोण राहिलं याचा विचार व्यर्थ आहे.

दुसरं एक विचीत्र उदाहरण म्हणजे लहान मुलांच बडबड गीत Ring a Ring O Roses. लहान मुलांच्या तोंडात सहज बसणारे हे गाणे प्लेग, मृत्यु, शेवटचा श्वास याबद्दल आहे हे पटकन लक्षातही येत नाही. लहान मुलांना अशी गाणी का शिकवावी ही न कळण्याजोगी बाब आहे.

मॉरी वाचताना असेच काहीतरी विचार मनात भरकटून गेले. मरताना काहीतरी मागे सोडून जातोय याची चुटपुट लागेल का मनाला? आणि ती सर्वात जास्त कुठल्या गोष्टिची? माझ्या मुलीची? नवऱ्याची? आणखी कोणाची?...... माझ्या घराची? ऑफिसची, मित्र मैत्रिणींच्या कोंडाळ्याची, माझ्या जन्मभर नेटीने गोळा केलेल्या वस्तूंची? या गावाची? अशी काय एक गोष्ट आहे की मी ती सगळ्यात जास्त miss करेन?

पलंगावर अंग टेकल आणि प्रश्नाच उत्तर माझ्या समोर उभं राहिलं. मरणाच्या चिरनीद्रेत एकदा प्रवेश केला की जी गोष्ट सर्वात miss होईल ती या पलंगावरच्या उबदार, सुखद झोपेतून जागं होण्याची. नव्या दिवसाची नवलाई miss केल्याची. साखर झोपेतून जागं होऊन सगळ्या चेतना जागवण्याची, जागं होताना आपण कोण, आपली माणसं, आपली कामं, कर्तव्य कुठली याची जाणीव होण्याची.

दत्ताजी शिंद्यांच बरोबर आहे नाही, जिथे चेतनाच संपेल तिथे आपण कोण आणि आपल कोण?

5 comments:

Anonymous said...

आप मेला, जग बुडाले.
आबरु जाते अन वांचतो कोण...

Priyabhashini said...

Thanks for complete quote. I had forgotten it...probably it means more than I remembered but my mind always halted at initial line....आप मेला, जग बुडाले....thanks anyways.

Anonymous said...

"आप मेला, जग बुडाले"प्रमाणेच फ्रान्सच्या पंधराव्या लुईचे हुबेहूब अशाच अर्थाचे "Après moi, le déluge" ("After me, the deluge") असेही एक वाक्य/quote आहे.

Priyabhashini said...

yeah I have read about it...May I know who left this comment here. Thanks for the quote.

चित्तरंजन भट said...

तुमचा ब्लॉग आवडला. थेट आहे. चिरनिद्रेबाबत असेच काहीसे विचार येत-जात राहतात. असो.

आप मेला, जग बुडाले.

marathi blogs