सत्यमेव जयते... वेगळे काय?
काल आमीर खानचा सत्यमेव जयते मुद्दाम वेळ काढून पाहिला. सादरीकरण, संचलन, सुसूत्रता, पार्श्वसंगीत या सर्वच बाबतील कार्यक्रम उजवा होता. कार्यक्रम वस्तुस्थितीला धरून होता, ऑफ-ट्रॅक झाला नाही. आमीरचा संयत चेहरा, त्याचे ते विचारात पडणे, हलकेच डोळे टिपणे वगैरे अनेकांना अभिनय वाटेल असे बेगडी नसल्याने कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला. मध्यमवर्गाला लक्ष्य करून हा कार्यक्रम बनवला आहे हे सतत जाणवत राहिले. रविवारी सकाळी लोकांना जेव्हा महाभारत, रामायण वगैरेंसारख्या मालिका कुटुंबासहित एकत्र पाहण्याची सवय आहे त्या कार्यक्रमांमध्ये हा कार्यक्रम थोडा तापदायक वाटू शकेल किंवा संपूर्ण कुटुंबाने आनंद घेण्याजोगा नसल्याने कालांतराने पाहाणे कमी होईल का असे प्रश्नही पडले. या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. तूर्तास, एक चांगला कार्यक्रम प्रस्तृत केल्याबद्दल या चमूचे अभिनंदन करावेसे वाटते.
यापुढे विचार करायचा झाल्यास या कार्यक्रमात वेगळेपणा तो काय? रजनी या प्रसिद्ध मालिकेतून लोकांचे प्रश्न सोडवल्यावर प्रिया तेंडूलकर यांचा टॉक-शो एकेकाळी प्रसिद्ध झाला होता. समाजातील नानाविध प्रश्नांवर बोट ठेवणारा हा कार्यक्रम पिडितांच्या मुलाखती, बोलावलेले मान्यवर आणि त्यांनी मांडलेले विचार, लोकांनी विचारलेले प्रश्न वगैरे प्रकारांतून प्रसिद्ध झाला होता. लोक आवडीने हा कार्यक्रम पाहात पण म्हणून त्याने समाजावर फार मोठा परिणाम झाला असे म्हणता येत नाही. यानंतर टिव्हीवर असे अनेक कार्यक्रम येऊन गेले असावे. २४ तास बातम्यांच्या वाहिन्यांवर अशा प्रकारची "स्टींग ऑपरेशन्स" अनेकदा दाखवली जातात. परंतु कार्यक्रमांचे सादरीकरण अतिशय बटबटीत असते असा अनुभव आहे. प्रेक्षकांना हळहळ वाटण्यापेक्षा डोकेदुखी होईल किंवा प्रसंगाचे गांभीर्य समजण्यापेक्षा हसू येईल अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर आमीरचा कार्यक्रम वेगळा असला तरी नवा नक्कीच नाही.
मग या कार्यक्रमात नवीन ते काय? नवीन एवढेच की या पूर्वी सर्व सुपरस्टार्सनी ढमाढम पैसे घेऊन गेम-शो सादर केले आहेत. त्याऐवजी आमीरने एका वेगळ्या धर्तीच्या कार्यक्रमातून लहान पडद्यावर आगमन केले आणि एक नवी गोष्ट अशी झाली की प्रश्नांबरोबर प्रश्नांवर उपाय शोधण्याची किंवा ते तडीस नेण्याची आशा आमीरने दाखवली. परंतु ही आशा कितपत खरी हे अद्याप कळत नाही. राजस्थान सरकार खरेच का एसएमएस पाठवल्याने स्त्रीभृणहत्येच्या केसेस फास्टट्रॅक कोर्टात नेणार आहे? लोकपाल विधेयकाचे काय झाले हे आपल्यासमोर आहे.
सेलिब्रिटींनी अशाप्रकारे सामाजिक कार्यात भाग घ्यावा का याचे उत्तर निश्चितच "हो" असे आहे. त्यांचे फॅन फॉलोइंग लक्षात घेता, त्यांच्या तोंडून निघणारे शब्द झेलायला तयार असणारे लोक निश्चितच मिळतील आणि मिळतात. त्यातून काहीजणांचे मनपरिवर्तन होणे शक्य वाटते परंतु स्वार्थ प्रत्येकाला प्यारा आहे आणि तो निश्चितच आमीर खानपेक्षा प्यारा आहे हे विसरता येत नाही. याचसोबत, टिव्हीवर कार्यक्रम दाखवल्याने, भरपूर प्रायोजक मिळवल्याने समाजसुधारणा होईल असेही म्हणता येत नाही आणि अशी चटकन समाजसुधारणा होणार नाही हे जाणण्याइतपत आमीर सूज्ञ वाटतो. या कार्यक्रमात वेगळे काहीच नाही, तसे काही दाखवायचा प्रयत्न नाही असा सूर असल्यास ज्याप्रकारे प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उचलून धरल्याचे लक्षात येते आहे त्यामागील प्रेक्षकांची भूमिका काय असावी असा प्रश्न पडतोच.
सदर कार्यक्रमातून जाणवलेल्या, खटकलेल्या काही गोष्टी अशा की हा कार्यक्रम ज्या वेळेत दाखवला जातो ती वेळ रविवार सकाळ असल्याने संपूर्णतः कौटुंबिक वेळ आहे. यांतील काही कार्यक्रम लहानमुलांसाठी योग्य असतीलच असे नाही. काही दृश्ये अस्वस्थ करणारी होती. त्या दृश्यांबाबत पूर्वसूचना देण्याचे कसे काय सुचले नाही याचे आश्चर्य वाटले. ही दृश्ये कार्यक्रमाच्या टीआरपीला मारक ठरू नयेत अशी अपेक्षा. तसेच, संपूर्ण कार्यक्रमात दुसरी बाजू दिसली नाही. ज्याप्रमाणे पिडीत बायकांना बोलावले गेले होते त्याप्रमाणे पिडा देणार्यांनाही बोलायला लावले असते किंवा त्यांना बोलावून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला असता तर आवडले असते. "पीअर प्रेशर" हा आपल्या समाजाचा एक मोठा भाग आहे. मुलगा हवा असा धोशा लावणार्यांनाही तो कामी येतो आणि त्याविरुद्ध त्यांची निंदा करायची झाल्यासही तोच कामी येईल.
कायदा आणि सुव्यवस्था जोपर्यंत बळकट होत नाही, लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि ती भीती वाटण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी त्वरित होत नाही तोपर्यंत ओवरऑल वस्तुस्थितीत फारसा फरक पडेल असे वाटत नाही आणि तूर्तास तरी भारतातील उदासीन मध्यमवर्गाला जागवण्याची क्षमता या कार्यक्रमात असल्याचे दिसले नाही. परंतु, माणसाने आशावादी राहावे या तत्त्वावर आमीरला पुन्हा एकदा शुभेच्छा!
No comments:
Post a Comment