कुठे गायब झालीयेस?
हा प्रश्न या अनुदिनीवर येऊन विचारणार्या आणि इतरत्र विचारणार्या सर्वांचे आभार. आपण एकमेकांची आठवण काढतो, विचारपूस करतो, आपुलकीने चौकशी करतो - त्या सर्वांसाठी मी इथेच आहे, आयुष्यात काही सुखद बदल झाल्याने कामांतून डोकं काढायला वेळ मिळत नाही इतकेच.
गेली काही वर्षे मी एकाच जागेवर उभी होते आणि आयुष्य झपाट्याने पुढे जात होते. त्यावेळेस बरेचदा ’मी कुठे आहे?’ हा प्रश्न स्वत:ला विचारावा लागे. जग आपल्याला सोडून निघून जाते आहे ही भावना माणसाला वेड लावेल इतकी निराश करू शकते. परंतु निराश व्हायचे की त्यातून उत्तर शोधायचे हे निवडण्याचा हक्क आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
काही वर्षांपूर्वी इतरांपेक्षा थोड्या उशीरा कुटुंबासह अमेरिकेत आलो. इथे आलो तेव्हा भारतात बस्तान बसले होते. उच्च पदावरची नोकरी सोडून कुटुंब आणि लहान मुलीसाठी कायम घरी राहणे याला फार मोठा त्याग वगैरे म्हणणार नाही, कुटुंबासाठी इतके तर करता येणे सर्वांनाच शक्य असते पण ९/११ त्यानंतर आलेले अस्थिरतेचे वातावरण, आऊटसोर्सिंग या सर्वांमुळे अमेरिकेचे कायम रहिवासी होण्याच्या स्वप्नाला जागोजागी खीळ बसत होती.
अनोळखी जागा, एकटेपण, हातातल्या गोष्टी सोडून देण्याने आलेले रिकामेपण, घरात बसण्याखेरीज काहीही करता न येण्याच्या कायद्याने आलेली निराशा यांतून असुरक्षिततेची भावना न बळावती तर नवल होते. या काळांत खंबीर राहण्यासाठी जर मला कोणाची मदत झाली असेल तर या अनुदिनीची.
मागे वळून पाहिले तर पहिले काही लेख मीच माझ्या मनातील भीती, असुरक्षितता घालवण्यासाठी लिहिले आहेत असे दिसून येते. पुढे मात्र कल बदलला. लिहिण्याची आवड उत्पन्न झाली. काहीतरी खरडलेले लोक वाचतात तर मग मी चांगले लिहायचा प्रयत्न का करू नये ही आशा मनात डोकावली. मनोगत, विकिपीडिया, उपक्रम या माध्यमांतून लिखाण फुलत गेले. त्याला प्रोत्साहन लाभले ते वाचकांचे. माझी आठवण काढणार्या सर्वांचे. माझ्या लेखांचे कौतुक करणार्या, पटले -नाही पटले ते आवर्जून सांगणार्या रसिकांचे. पुढे जाणार्या जगासोबत पावले उचलायला या अनुदिनीने आणि तिच्या वाचकांनी मला पायांत बळ दिले.
आज इतक्या वर्षांनी परिस्थिती अचानक बदलली. कायद्याने मला इतर अमेरिकी नागरीकांप्रमाणे हक्क आणि सुविधा घेण्याची परवानगी मिळाली. पण या शर्यतीत पळण्याएवढे बळ पायांत आहे का याची कल्पना नव्हती. मनात बळ मात्र कायम होते. ’जे काही गमवण्यासारखं होतं ते आधीच गमवून बसली आहेस ना, मग आता काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न कर.’ असे मन बजावून सांगत होते. जिथे मागे हटायला जागाच नाही तिथे पुढे जाण्यावाचून गत्यंतर नसते बहुधा. किंवा....
आयुष्य खरंच खूप सोपं असतं, आपणच त्याला कठिण करून ठेवतो - आपल्या मनातल्या भीतीने, असुरक्षिततेच्या भावनेने. जी स्वप्नं अपुरी राहिली होती ती पूर्ण करण्याची संधी चालून आली आणि आलेली संधी मी सोडली नाही.
आयुष्य आता बदललं आहे. अचानक जे हवं होतं ते मिळून गेलं आहे. आयुष्याच्या गतीने धावणं आता भाग आहे. हेच तर हवं होतं इतक्या वर्षांपासून. पण या चक्रात मला हल्ली लिहायला वेळ होत नाही. धावण्याची गती सापडली की तो वेळही मिळेल. तेव्हा पुन्हा लिहिनच. गेली २ वर्षे ही अनुदिनी लिहिते आहे. तिने आणि वाचकांनी मला भरभरून दिले, या कौतुकाचा त्याग नाही करायचा. या प्रेरणास्थानाला सोडायचे नाही आहे.
मी इथेच आहे, इथेच राहणार आहे. सध्या थोडी व्यग्र आहे इतकंच, ती व्यग्रता दूर झाली की मनात आलेलं...लिहून काढायला इथेच विसावणार.
11 comments:
न लिहीण्याचं इतकं चांगलं कारण! छान वाटलं वाचून, शुभेच्छा!
अभिनंदन!
पुढील लिखाणाच्या प्रतिक्षेत.
Welcome back :)
Congrats.
We are all here only, waiting for you
welcome back and good luck! :)
All the best Buddy
hey priya.. so nice to c yu here again! chhan ch lihil ahes. tujh lekhan miss karat ahot khup teva lavakarat lavakar ithe parat regular yeta yaav mhanun tula khup shubhechha.
i agree with sumedha!
feels good to know why u havent been able to write here often. :)
enjoy maadi!!
तुम्हा सर्वांना धन्यवाद. वेळ होईल तसं खरडत राहण्याचा संकल्प नव्या वर्षापासून सोडायचा आहे तेव्हा बघू कसं जमतंय... :)
Mala tumche likhan khup khup aawadle.Maze nav shubhada sadekar aahe.Me 72 years old aahe.Mala marathitun comments lihayala aawdel pan marathi font kuthala download karycha mahit nahi.jara guide kelet tar changle hoil.Mala tashi khup changli computerchi mahiti nahi.Mazi mulagi muscatmadhye(OMan) rahate. Tichyashi me chat karate and email pathavate.Pan tasa P.C. use karayachi khup mahiti nahi
शुभदाताई, मराठी फॉंट www.baraha.com तुम्हाला इथून डाऊनलोड करता येईल. बरहामधून BarahaIME डाऊनलोड करा आणि जसं तुम्ही मला इंग्रजीत प्रतिसाद लिहिलात तसंच मराठीत टाईप करा. या साईटवर व्यवस्थित मदत मिळेलच. अन्य मदत, तुमच्या मुलीकडून घ्या. काही लागल्यास मलाही विचारा.
तुम्ही माझ्या ब्लॉगचे कौतुक केल्याबद्दल अनेक धन्यवाद. तुम्हाला सहजरित्या मराठीत टाईप करण्यासाठी अनेक शुभेच्छा!
Post a Comment