वर्षपूर्ती
गेल्या वर्षी २० जानेवारीला पहिला ब्लॉग लिहिला त्यावेळेस तो लेख कोणी वाचणार आहे अशी कल्पनाही नव्हती. सर्व मराठी ब्लॉग्ज कोठेतरी संकलित होतात, मराठी ब्लॉगर्सचा एक समाज आहे हे ही माहित नव्हते. होता फक्त मोकळा वेळ, एकांत आणि लिहिण्याची इच्छा. लिहायला सुरुवात केली आणि परीकथेतल्या एखाद्या जादूच्या महालात शिरल्यासारखे एक एक दालन उघडत गेले.
गेल्या संपूर्ण वर्षात बर्याच नव्या गोष्टी कळल्या तर काही जुन्याच गोष्टींची जाणीव नव्याने झाली. मराठीत टंकलेखन करता येते ही पहिली नवी गोष्ट कळली. बरहाशी ओळख, मराठी भाषेशी पुनर्भेट, मराठी साहित्याशी पुन:श्च ओळख, माझे अगाध (अ)शुद्धलेखन, मनातले विचार लिहून काढायची संधी या नव्या, जुन्या अनेक गोष्टी प्रत्येक वळणावर, थांब्यांवर भेटत गेल्या.
आपली अनुदिनी माणसे वाचतात आणि त्यावर त्यांना प्रतिसाद देण्याची इच्छा होते याचे प्रथम थोडेसे अप्रूप वाटले. माणसाला कळत नकळत इतरांची, त्यांच्या प्रशंसेची, त्यांच्या बर्या-वाईट मतांची किती गरज असते हे जाणवून गेले. नंतर कधीतरी मराठीब्लॉग्ज.नेट आणि मनोगताची ओळख झाली आणि ओळखी वाढत गेल्या, माणसे जोडली गेली. ज्याच्याकडे आपली बोली बोलायला माणसे नसतील त्याला आपल्या भाषेत वाद-विवाद करायला, भांडायला माणसे मिळणे ही सुद्धा एक अनोखी भेट असते.
आयुष्यात बरेचदा जागा बदलत राहिल्याने अनोळखी माणसांच्या ओळखी करून घेणे मला शिक्षा वाटते. नवीन ओळखी जोडत राहायची गरजही उरलेली नाही. माणसांशिवाय जगण्याची सवय झाली आहे आणि अंगवळणी पडली आहे पण तरीही या अनुदिनीच्या निमित्ताने ओळखी आपसूक होत गेल्या. कित्येक स्वभाव कळले, विचार कळले, माणसांच्या अंतरंगांचे रंग कळले, काही आपलेसे वाटले काही नकोसे वाटले. अशाच वाढत गेलेल्या ओळखींमधून हळूहळू माणसाचे नेटवर्क कसे वाढत जाते आणि कधीतरी त्याचे व्यवस्थापन करणे जिकिरीचे होते हा ऑर्कुटवर आलेला अनुभव. १-२ करता करता जुने सहकारी, नातेवाईक, भाऊ-बहिणी, भाचवंडे एक वेगळा समाज पुन्हा एकदा जोडला गेला.
मग कधीतरी हे व्यसन तर होत नाही ना याची शंका येऊ लागली. कळफलक बडवण्यापलिकडे आयुष्यात दुसरे काही नाही की काय असे वाटायला लागले. लिहायचेच झाले तर मनात आलेले विचारच का, काहीतरी इतरांच्या उपयोगाचंही लिहिता येईल हे मराठी विकिपीडियामुळे झालेली जाणीव. आज नव्या वर्षाच्या सुरुवातीसच विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर जानेवारीचे सदर म्हणून आपला लेख झळकताना पाहून मनापासून आनंद होतो. याचबरोबर इंडी मराठी मंडळासाठी लिहिण्याची संधी मिळाली. आणखीही काही ठिकाणी लिहिण्याचा योग आला, यायची शक्यता आहे.
अमेरिकेत आल्यापासून आयुष्य कधीतरी थांबल्यासारखं वाटतं तसं ते कधीच कोणासाठी थांबत नाही हा भाग अलाहिदा. सध्या ते ज्या मार्गावरून चालले आहे त्याचा मी आनंद घेत आहे.... एका नव्या अनुदिनी वर्षाला सुरुवात होत आहे.
7 comments:
प्रिया.. नव्या अनुदिनी वर्षासाठी तुला शुभेच्छा!
खूप लिही... खूप आनंद घे!
वाचक म्हणून आम्हीही त्यात आनंदाने सहभागी होऊ!!
अमेरिकेसारख्या दूरदेशी राहूनसुद्धा अनुदिनीवर सातत्याने उत्कृष्ट प्रतीचे लेखन करून एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व कौतुकाची शाबासकी देत आहे. (वयानुसार हा अधिकार आहे असे समजायला हरकत नाही). या अवधीत लेखनाच्या क्षेत्रात इतरत्र केलेल्या प्रगतीबद्दल वाचून आनंद झाला.
मनात आलं .. लिहिलं ही ओळच मला इतकी आवडली की मी ही तसंच करायला सुरुवात केली. चार लोक ते ही वाचायला लागले आहेत.
ट्युलिप आणि आनंदकाका अनेक धन्यवाद.
ट्युलिप तुझ्यासारखे वाचक आहेत म्हणूनच लिहिण्याचा आनंद द्विगुणित होतो.
आनंदकाका, अभिनंदन आणि शाबासकीबद्दल अत्यंत आभारी आहे. माणसाने मनातलेच लिहावे, बरेचदा आपण इतरांना खूश करायला, त्यांची मर्जी-मने सांभाळायला बोलत लिहित असतो. अनुदिनीच्या निमित्ताने आपल्या मनातले खरे विचार मांडायची संधी मिळते आणि लिहित गेलं की आधी आपलं आपल्याला आणि कालांतराने इतरांनाही ते आवडायला लागते.
पुन्हा एकदा धन्यवाद. :)
अभिनंदन व शुभेच्छा :)
वर्षपूर्तीनिमित्त अभिनंदन आणि नवीन अनुदिनीवर्षासाठी अनेक शुभेच्छा. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे -- हे अगदी पटले.
हार्दिक शुभेच्छा.
ओजस, नंदन आणि योगेश शुभेच्छा आणि अभिनंदनांबद्दल अनेक आभार. :)
Post a Comment