प्रकार

Saturday, January 26, 2008

भिकारीण

“इतक्या थंडीच्या सकाळी काय रे खरेदीला निघायचं सुचलं आज?” घराबाहेर पडलो तसे हातात हातमोजे सरकवत मी नवर्‍याकडे नाराजीने तक्रार केली. कालच अर्धा फूट हिमवर्षाव झाला होता आणि आज तापमापीचा पारा शून्याखाली ८-१० डी. सहज उतरला असावा. रविवारच्या दिवशी दुलईत पडून राहण्यापेक्षा धडपडत खरेदीला निघायची माझ्यामते अजिबात गरज नव्हती.

“अगं कारने तर जाणार. ख्रिसमसचे दिवस आहेत. मॉल लवकर उघडतोय. सेल आहे. खरेदीही करायची होतीच. उरकून टाकू की सकाळीच मग दिवस मोकळा! नाही का?” त्याने कारचे इंजिन सुरू केले आणि गाडीचा हीटरही सुरू केला. रस्ते निसरडे झाले होते, त्यात बोचरं वारं आमच्याकडे पाचवीला पुजलेलं. सावकाश गाडी हाकत आम्ही मॉलदर्शन घेतलं. मागच्या सीटवर लेकही सकाळी उठायला लागल्याबद्दल नाराज होती.

कुरकुरत का होईना पण आमची खरेदी नेहमीप्रमाणेच व्यवस्थित झाली. पैशांनी किती गोष्टी खरेदी करता येतात? या प्रश्नाला बर्‍याच आणि थोड्याशाच असे दुहेरी उत्तर आहे. मॉल्समध्ये गेले की आपल्याकडे पैसे असल्याचा आनंद आणि आपल्याकडे पैसे नसल्याचे दु:ख एकत्रित मिळून जाते. जे हवे असते त्याच्या किंमती परवडत नसतात आणि जे नको असते ते हमखास निम्म्या किंमतीला मिळत असते.

खरेदी झाली तेव्हा सकाळ उलटायला आली होती. “किती फिरफिर फिरलो रे या दोन चार दुकानांतच? वेगळा व्यायाम करायची गरजच नसते नाही या मॉलच्या चकरा मारल्या की. जीममध्येही पैसे देऊनच व्यायाम करतो आपण. इथे पैसे देऊन खरेदी करता करता व्यायाम होतो.” माझ्या टोमणामिश्रित विनोदाचा नवर्‍यावर गेली कित्येक वर्षे काहीही परिणाम होत नाही. त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकून खरेदीच्या पिशव्या ट्रंकमध्ये टाकल्या आणि कार सुरू केली.

दिवस वर आला असला तरी बाहेर थंडी मी म्हणत होती, वारंही सुटलं होतं. रस्त्यांच्या बाजूला बर्फाचे ढिगारे दिसत होते, रस्त्यांचा निसरडेपणाही जसाच्या तसा होता. हे असले दिवस नेहमीच नकोसे वाटतात त्यात मला, आता घरी जाऊन स्वयंपाकाचा श्रीगणेशा करायचा या कल्पनेने वैताग आला होता.

“सगळी सकाळ इथे गेली आता घरी जाऊन भूक भूक कराल, “ कंटाळलेल्या सुरात मी तक्रार केली.
“अगं ब्रंच करून जाऊ, आता कुठे घरी जाऊन स्वयंपाक करत बसणार.” हा समजुतीचा स्वर मला भयंकर प्रिय आहे. मागच्या सीटवरूनही सकाळपासून पहिल्यांदाच आनंदी हुंकार ऐकू आला. गाडी "ल पीप"च्या दिशेने वळली तशी पोटात आगीचा डोंब उसळल्याची जाणीव झाली. तसंही बाहेर खायचं म्हणजे सडसडून भूक लागतेच लागते. रेस्टॉरंटातल्या उबदार वातावरणात तर ती आणखीच प्रज्वलित होते असा नेहमीचा अनुभव आहे.

खाऊन बाहेर पडलो आणि रस्त्याला लागलो. समोरच्या सिग्नलला गाड्यांची बरीच गर्दी झाली होती. वेग मंदावून नवर्‍याने खिसे चाचपडायला सुरुवात केली.

“काय रे काय झालं? पाकीट, सेल विसरला तर नाहीस रेस्टॉरंटात? काय शोधतो आहेस?”
“काही नाही, पाकीटच शोधत होतो. जरा एक डॉलर काढशील.” त्याने हात स्टीअरींगवर पुन्हा ठेवत म्हटले.
“एक डॉ. कशाला रे?”“समोर बघ सिग्नलजवळ एक भिकारीण दिसत्ये, तिला देतो.”

सिग्नलपाशी एक मध्यमवयीन बाई कळकट कोट, टोपी, हातमोजे घालून थंडीत कुडकुडत उभी होती. हातात "गरीबाला मदत करा" लिहिलेला एक पुठ्ठ्याचा बोर्ड होता.

“हं? सर्व सोडून भीक द्यायला कुठे निघालास?” मी आश्चर्याने विचारलं, "काही गरज आहे का अशा धडधाकट माणसांना भीक घालायची. कामं करायला काय हरकत आहे यांना? उगीच माणसं भीक देऊन त्यांना कामं न करता, ऐतखाऊ बनवण्यास भाग पाडतात. ” किती वर्षांनी भीक द्यायची वेळ आली होती कोणास ठाऊक. मागच्यावेळी नेमकी कधी भीक दिली ते आठवणेही कठिण होतं.

“असू दे गं. ती भीक मागते आहे इतक्या थंडीची. आपल्याला दोन क्षण बाहेर राहणं कठिण होतंय आणि ती केव्हाची उभी आहे कोण जाणे? सणाचे दिवस आहेत दिला एक डॉलर तर काय मोठा फरक पडणार आहे.”

“प्रश्न फरक पडण्याचा नाही, पण मग चार भिकारी उभे असते तर चारांनाही भीक दिली असतीस का? आणि भीक मागणे हा तिचा नाइलाज नसून धंदा असेल तर? ज्या पैशांसाठी आपण राबतो त्यातला एक पैसाही ऐतखाऊंना का द्यायचा?” गाडी अद्यापही गर्दीत अडकून होती.

“किती विचार करते आहेस एका क्षणात. मी इतका विचारही केला नव्हता. आनंदाचे दिवस आहेत. आपण खरेदीला निघालो. मनपसंत खरेदी झाली, बाहेर खाणं झालं. एखाद्या आनंदाचा क्षण त्या भिकारणीलाही देता येईल असं वाटलं. या मॉल्समध्ये आपण जातो, मूळ किंमतींच्यापेक्षा कितीतरी किंमत त्यातल्या वस्तूंसाठी मोजतो. त्या काउंटरवरल्या पोरींचं खोटंखोटं स्मितहास्य, दिव्यांची रोषणाई, सजावट या सर्वांचा फुकट खर्चही आपण भरतो. रेस्टॉरंटात गेलो तर वेटरला टीप दिल्याशिवाय बाहेर पडत नाही. असं तो वेटर काय अधिकच करतो आपल्यासाठी? पण रीत म्हणून आपण त्याला पगार मिळत असतानाही टीप देतो. मग जर एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीच करत नसेल आणि तरीही दिला तिला आपल्या आनंदातला थोडासा हिस्सा एके दिवशी तर काय मोठा पहाड कोसळला? काहीतरी नसेल तिच्याकडे जे आपल्याकडे आहे. काहीतरी असेल जे तिला भीक मागायला प्रवृत्त करतंय आणि आपणही कधीतरी नकळत भीक मागतो. अगदी आपल्या हक्काच्या सुट्टीचीही भीक मागावी लागते ऑफिसात.”

“हो पण देण्याचंच झालं तर संस्था, अनाथालये वगैरे आहेत ना.” मी माझा हेका सोडला नाही.

“त्यांनाही देतोच ना! की देतच नाही? जे आपल्याकडे आहे ते जर त्यांच्याकडे नसेल तर प्रत्येकवेळीच मोजूनमापून विचार करून दुसर्‍याच्या पदरात टाकावं असं थोडंच आहे?” त्याने थोडंसं वैतागून विचारलं.

गाडी एव्हाना त्या भिकारणीच्या जवळ सरकली होती. त्याने गाडीची काच खाली केली तशी भप्पकन गार हवेचा झोत अंगावर आला आणि सर्वांगावर नकोशी शिरशिरी आली. तिने काच खाली झाल्याचं हेरलं असावं. ती लगबगीने खिडकीच्या दिशेने आली आणि आशेने खिडकीत डोकावत थंडीने गारठलेली मूठ तिने घाईने पसरली. तिच्या फाटक्या हातमोजांत डॉ. बिल पडलं तसं ’गॉड ब्लेस यू. हॅपी हॉलीडेज!" म्हणत तिने तोंडभरून हास्य फेकलं. तिच्या पाणीदार डोळ्यांतली लकाकी त्या पिवळ्या दातांच्या हास्यात मिसळून आनंदाची एक आगळी चमक क्षणभर दिसली, एक वेगळा आनंदही नवर्‍याच्या डोळ्यांत क्षणभर चमकून गेला आणि मनातील सर्व विचारांना खीळ पडली.

जसं आमच्याकडे काहीतरी होतं जे तिच्याकडे नव्हतं तसंच, काहीतरी वाटत होतं त्याला जे मला वाटतं नव्हतं इतकाच विचार करून मी हायवेतल्या गर्दीत मिसळून गेले.

16 comments:

A woman from India said...

फारच छान. विकसनशील देशातील लोकांना अमेरिकेतही टंचाई, गरीबी असु शकते ह्याची जाणिव होत नाही.
समोर भिकारी आला की त्याला भीक द्यायची की नाही हे ठरवताना होणारे सर्व विचार तुम्ही अगदी छान मांडले आहेत.

Yogesh said...

सुंदर.

अवचटांचा भिकार्‍यांबद्दल एक लेख आहे त्याचा पूर्वार्ध असेच काहीसे विचार मांडतो.

पण

काही गरज आहे का अशा धडधाकट माणसांना भीक घालायची. कामं करायला काय हरकत आहे यांना? उगीच माणसं भीक देऊन त्यांना कामं न करता, ऐतखाऊ बनवण्यास भाग पाडतात. ”


हे वाक्य माझेही पसंत आहे. अशा प्रोफेशनल व्यावसायिक भिकार्‍यांना भीक देऊन एका प्रोफ़ेशनल विद्रुपतेला, घाणेरडेपणाला आपण प्रोत्साहन देऊ नये असे वाटते.


Civilization प्रक्रियेमध्ये भीक मागण्याला सुरुवात केव्हा झाली याबद्दल काही माहिती आहे का? (असे प्रश्न मलाच पडतात)

कदाचित भीक मागणे हा आधी प्रतिष्ठेचा व्यवसाय असावा आणि नंतर त्याचे अवमूल्यन झाले असावे असेही वाटते.

Priyabhashini said...

धन्यवाद कसंकाय आणि योगेश.

अवचटांचा लेख नेटावर असल्यास लिंक देता येईल का?

मला वाटतं माणसाला "मागितलं की मिळतं" ही जाणीव जेव्हा झाली तेव्हापासून भीक मागायला सुरुवात झाली असावी.

मलातर टीप देणेही प्रोफेशनल विद्रुपता वाटते. असं तो अटेंडंट काय विशेष करतो की त्याला देण्यास भरभक्कम टीप गिर्‍हाईकाकडून (अमेरिकेत बिलाच्या १५%) वसूल केली जाते, ते कळत नाही.

Yogesh said...

सध्या नेटवर कुठे दिसत नाही. मलाही तो कोणत्या पुस्तकात आहे ते आठवत नाही. आठवल्यावर देता येईल.
लेखाच्या पहिल्या भागात पुणे स्टेशन परिसरातल्या व इतर भिकार्‍यांबद्दलची निरीक्षणे व मते. दुसर्‍या भागात अवचटांच्या खिशात पैसे नसताना त्यांना चहा पिण्याची झालेली इच्छा व त्यासाठी कोणाकडे पैसे मागावे हा पडलेला प्रश्न असा धमाल लेख आहे.

भीक मागण्याच्या प्रथेवरून आठवलं
आमचे एक मास्तर येशू ख्रिस्ताची ३ तत्त्वे सांगत
१. शोधा म्हणजे सापडेल
२. ठोका म्हणजे उघडेल
३. मागा म्हणजे मिळेल

यापैकी ३रे सूत्र भिक्षेचे समर्थन करते असे म्हणायला हरकत नाही ;)

(ह.घ्या.)

टग्या said...
This comment has been removed by the author.
HAREKRISHNAJI said...

लेख उत्तम का त्या वरील प्रतिक्रीया ? काही कळेनासे झाले आहे.

Priyabhashini said...

प्रतिसादांबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

एकाच गोष्टीकडे पाहण्याच्या दोन व्यक्तींच्या दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांबद्दल आहे.

अगदी खरे. नेमका हाच मुद्दा लिहायचा होता. वेगवेगळ्या क्षणी एकाच विषयावर एकच व्यक्तीही वेगवेगळे विचार करू शकते. एखाद्या क्षणी एखाद्याबद्दल सहानुभूती दाटून येऊ शकते, तर दुसर्‍या क्षणी तिरस्कार वाटू शकतो. आणि दोन वेगवेगळ्या माणसांच्या एकाच विषयावर प्रतिक्रिया वेगवेगळ्या असू शकतात. तेव्हा बघायचे हे असते की तो विषय आपल्याला किती महत्त्वाचा आहे, नसल्यास अशा न संपणार्‍या विषयांना विसरून इतर विचारांच्या "गर्दीत मिसळून" जाणे योग्य ठरते.

HAREKRISHNAJI said...

काय बॉग वर रुसला आहात वाटते ?

Monsieur K said...

an extremely thought-provoking post!
there have been times, when i pay a tip in a restaurant - walk out of the restaurant - to bump into beggars - as a rule, i never ever give them money - i just hate to do that! and s'times i do wonder, that i just paid a tip for a service which they must offer me, or i just paid more than it actually deserves for the food - and now how do i not give alms to the beggar.
it is a very disturbing thought. and as u say, most of the times, or rather everytime, this thought gets lost in the crowd of other thoughts.

well written!

Priyabhashini said...

as a rule, i never ever give them money

As a rule, I never ever give them money too but when I sit and calculate I often see that I have spent money for people who don't deserve it.

Indeed its a disturbing thought but then very casually we walk away from the situation.

Thanks a lot Ketan, for sharing your views.

Anonymous said...

>>>काही गरज आहे का अशा धडधाकट माणसांना भीक घालायची. कामं करायला काय हरकत आहे यांना? उगीच माणसं भीक देऊन त्यांना कामं न करता, ऐतखाऊ बनवण्यास भाग पाडतात. ”

असा सामान्यपणे मनात विचार येतो, पण....त्या निमित्ताने आपण केलेले चिंतन सहीच आहे, त्याच्याइतकेच अमेरिकेतही सिग्नलजवळ उभे राहून भीक मागणारे भिकारी आहेत, हे वाचून अतिशय आनंद झाला.मला उगाच इकडे भिकारी सिग्नलजवळ भीक मागतात त्याचा संताप यायचा.!!!!

Priyabhashini said...

धन्यवाद! परंतु भिकारी भारतात किंवा अमेरिकेत पाहणे ही आनंदाची गोष्ट असू शकत नाही. :) असो.

निनाद said...

सुरेख लेखन...आवडले!

:Dhananjay said...

लेख छान आहे.
ह्या लेखामुळे मला लिओ टोलस्टॉय यांची एक कथा आठवली. जागेअभावी आणि वेळेअभावी थेट इंग्रजी लेखाची लिंक येथे देत आहे.
http://www.online-literature.com/tolstoy/2735/

Priyabhashini said...

प्रतिसादांसाठी धन्यवाद.

:D टॉल्सटॉयच्या दुव्याबद्दल धन्यवाद.

निनाद, मिशा मस्त आहेत. :)))

हरेकृष्णजी, अहो हल्ली वेळ मिळत नाही. बरीच बिझी झाले आहे.

HAREKRISHNAJI said...

मिश्यांची तारीफ ऐकुन बिचाऱ्या निनादनी आपला फोटो गायब केलेला दिसतोय.

marathi blogs