प्रकार

Thursday, October 15, 2009

तिर्‍हाइत

आज कामाचा कंटाळा आला होता म्हणून वेळेवर घरी निघायचं ठरवलं. कधी नाही ते अनायसे रस्त्यावर ट्रॅफिकही कमी होते. मुलीला संध्याकाळी डान्स रिहर्सलला घेऊन जायचे होते म्हणून जेवणाचा करण्याचा बेत कॅन्सल होता. पिझ्झा ऑर्डर केला की काम भागणार होतं. घरी पोहचले तसे कळले की मुलीच्या मैत्रिणीची आई दोघींना घेऊन जाणार आहे. नवर्‍याला उशीर होणार आहे. प्रायवसी!!!

घरी यायला नेहमीप्रमाणे उशीर नाही, आल्यावर स्वयंपाक करायचं टेन्शन नाही, पुन्हा कुठेतरी धडपडत बाहेर पडायची घाई नाही. पावले आपोआप संगणकाच्या दिशेने वळतात. गेले दोनचार रात्री जागून एक लेख कितीतरी महिन्यांनी कसाबसा पूर्ण केला, आज काहीही उरलेले नाही... ब्लॉग लिहावा का असा विचार मनात डोकावतो आणि मन उदास होते. गेले कितीतरी महिने ब्लॉगवर चक्करसुद्धा मारलेली नाही. या महिन्यांत काही घडले नाही असे नाही। उलट बरेच काही घडून गेले पण मनात आलेले लिहावेसे वाटलेच नाही एवढेच.

इतक्या दिवसांनी पाहिल्यावर स्वत:चाच ब्लॉग परका वाटतो.

आपल्या जगात, आपल्या माणसांत आपणच तिर्‍हाइत आहोत ही जाणीव हुरहुर लावणारी आहे. एखाद्या आवडत्या गोष्टीपासून, जागेपासून किंवा व्यक्तीपासून फारकत घेतल्यावर निर्माण होणारा दुरावा मनाला बोचतो कधीतरी. नेमकं वाईट कशाचं वाटतं? माणसं, जागा आपल्याला दुरावतात याचं? कोण जाणे..दुराव्यापेक्षाही आपल्यालाही कोणीतरी इतक्याच ओढीने मिस करत असेल का हा चुकार प्रश्न मनात डोकावतो याचं. आपल्या आठवणीनेही कोणी बेचैन होत असेल का याचं आणि आपण आपल्याच विश्वात तिर्‍हाइत होतो याचं.

आणखी काय लिहावं? मगासपासून ५ वेगवेगळे परिच्छेद लिहून पुसले. म्हणजे लिहिण्यासारखं काही नाही किंवा आहे पण उतरवायचे नाही. शब्द जसे परके झाले आहेत.

तिर्‍हाइत नजरेने मी माझ्या ब्लॉगकडे आणि माझ्या ब्लॉगने माझ्याकडे पाहण्याचा परकेपणा या विस्कळीत शब्दांनी का होईना पण संपवावा म्हणते.

3 comments:

Mahendra said...

बरेच दिवसांनी पाहिला की आपलाच ब्लॉग परका वाटतो.. ह्या गोष्टीचा तर मला अनुभव नाही. कारण मी रेगुलर ब्लॉगला भेट देत असतो. पण एक बाकी आहे, की जेंव्हा एखादं जुनं पोस्ट काढुन पुन्हा वाचतो, तेंव्हा ते अगदी अपरिचित वाटतं.. खरंच कां आपण लिहिलंय हे?? असाही प्रश्न पडतो.

कोहम said...

तिर्‍हाइत नजरेने मी माझ्या ब्लॉगकडे आणि माझ्या ब्लॉगने माझ्याकडे पाहण्याचा परकेपणा या विस्कळीत शब्दांनी का होईना पण संपवावा म्हणते

hmm. asach kahisa vattay malahi :)

Priya said...

तू अगदी माझ्या मनातलं लिहीलंयस! मीही वर्षभर काही लिहीलेलं नाही. काही मनात आलं नाही असं नाही, पण नाही उतरलं शब्दांत... काय करणार? वेळ नाही झाला हे कारण काही खरं नाही. प्रकर्षाने वाटलं तर आपण रात्र जागून सुद्धा लिहून काढतोच जे लिहायचं ते. माझेही एकेका परिच्छेदाचे दोन-तीन ड्राफ्ट्स पडून आहेत.

आता तुझं पोस्ट पाहून मलाही थोडं काही का होईना, लिहावसं वाटू लागलंय. बघू काय जमतंय ते... :)

marathi blogs