प्रकार

Wednesday, March 15, 2006

ग्रहण

काल आमचं नव्याने सुरु झालेल मंदिर बंद होतं. एक दोघांनी मला संध्याकाळी घरातून बाहेर वगैरे न पडण्याचा सल्ला देखील दिला होता, माझ्या मुलीची मैत्रीण ही खेळायला आली नाही कारण काय तर काल चंद्रग्रहण होतं. ते ही कसलं तर, penumbral lunar eclipse ,ज्यात चंद्रात फारसा फरक पडलेला दिसत नाही.

मला मजा फक्त या कारणासाठी वाटते की ज्या अमेरिकेने चंद्रावर आपला झेंडा रोवला त्याच अमेरिकेत रहाणारे सुशिक्षीत, सुसंस्कृत भारतीय राहू केतू गरीब बिच्चाऱ्या चंद्राला गिळायला टपले आहेत या भ्रामक कल्पनेवर अजूनही विश्वास ठेवतात.

माझ्या मुलीने प्रश्न विचारुन जीव हैराण केला होता, चंद्र ग्रहण म्हणजे काय? किती प्रकारचं असतं? किती वेळ असतं? आपले इंडियन्स त्याला घाबरतात का? आपण आता जर बाहेर गेलो तर आपल्याला काहीतरी होईल का? तू सांगतेस की काही होणार नाही मग आंटी (मैत्रीणीची आई) का घराबाहेर पडायचं नाही म्हणाली?

तिला सांगितलं चल बाहेर लॉनवर जाऊन ग्रहण बघू, तुझ्या कॅमेराने फोटो ही काढ आणि तिथून स्टोर्स मधे जाऊया आणि बघूया आपल्याला काही होतयं का ते? मला वाटत तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं आपसूकच मिळाली.
पण माझ्या प्रश्नाच उत्तर? हे ग्रहण कोणावरचं? चंद्रावरच की आपण स्वत:ला जखडून ठेवलेल्या भ्रामक रुढी कल्पनांवरचं? आणि ते सुटणार कधी?

4 comments:

Anand Ghare said...

मनावरची ग्रहणं सहजासहजी सुटत नाहीत. शाळाकॉलेजात गेला, विज्ञान शिकला, अगदी अमेरिकेला जाऊन पोचला म्हणजे माणूस धीट होऊन पिढ्यान् पिढ्या मनावर घट्ट चिकटलेल्या संस्कार नांवाच्या प्लॅस्टरमधून बाहेर निघेलच असे नाही. पण आपण प्रयत्न करीत रहायला पाहिजे. आपली मुलगी सुदैवी आहे, तिला राहू, केतूची भीति कुणी दाखवलेलीच नाही.
चन्द्र या विषयावर मी माझ्या (Anandghan)ब्लॉगवर एक मालिका लिहीत आहे. कदाचित आपल्याला उपयुक्त वाटेल.

Priyabhashini said...

Thanks a lot...I have already read first couple of parts and found them very interesting. I will definately read rest.

Nandan said...

छान आहे लेख. आम्ही आधुनिक विचारसरणीचे आहोत, फक्त संगणकीकृत कुंडल्या पाहतो असे म्हणणारे लोक आणि अमेरिकेत चंद्रग्रहण पाळणारे यांत फारसा फरक दिसत नाही.

Anonymous said...

पण मला मात्र काहीच वाचायला मिळू शकले नाही. सर्व अक्षरे त्यांच्या काना-मात्रांपासून सुटून गेली आहेत. मी काही चुकीचं करते आहे का.

तृप्ती.

marathi blogs