प्रकार

Monday, May 02, 2011

चुकलेली वाट

सूचना: खालील लेखनप्रकार हा केवळ अनुभव असून सत्यकथा आहे. केवळ पात्रांची नावे बदलली आहेत. असे अनुभव अनेकांनी आयुष्यात अनुभवल्याची शक्यता असल्याने त्यात नावीन्य मिळणे कठिण आहे. कथा त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून असल्याने एकांगी आहे. त्यात दोन्हीकडील बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही. ही भयकथा किंवा गूढकथा नाही.





८:३२ ची गाडी आज नक्की चुकणार होती; गाडी चुकली की १० वाजताची मीटिंगही. घरातून निघायलाच उशीर झाला. जेव्हा वेळा साधायच्या असतात तेव्हा हमखास काहीना काही गडबड असतेच. आज काय? कामवालीला उशीर झाला. तिचं काम होईपर्यंत मला खोळंबून राहावं लागलं. तरी स्टेशन फार लांब नाही. पायी दहा मिनिटं लागतात पण हल्ली पायी स्टेशनपर्यंत पोहोचणं म्हणजे मोठं कठिण काम. रिक्शा, बाइक्स, बसेस, फेरीवाले यांनी रस्ता असा अडवलेला असतो की त्यातून वाट काढत चालणं तारेवरल्या कसरतीपेक्षा वेगळं नाही.

पिंपळाच्या पारापाशी नितीश आळसावून बसलेला दिसला. मळकटलेले कपडे, विस्कटलेले केस, पायाला बांधलेलं चिंध्या झालेलं बँडेज. त्याच्या अंगाला गेला महिनाभर तरी पाण्याचा स्पर्श झाला नसावा. मी पारापासून चार हात दूरून जायचं ठरवलं. आधीच उशीर आणि त्यात भल्या सकाळीच याचं नको असलेलं दर्शन.

"ए मला वीस रुपये दे ना! काल सकाळपासून काही खाल्लं नाही. प्लीज, डोंट से नो. " त्या गर्दीत वाट काढत, लंगडत तो कसा माझ्यापाशी पोहोचला देवजाणे. आपले पिवळे पडलेले दात दाखवत आणि चेहर्‍यावर वाढलेले खुंट खाजवत तो ओशाळवाणे हसून मला विचारत होता. त्याच्या अंगाला येणार्‍या त्या घाणेरड्या भपकार्‍याने मला मळमळून आले.
माझ्या चेहर्‍यावरचे त्रासिक भाव लपवणे मला शक्य नव्हते. "हे बघ! मला आधीच उशीर झाला आहे आणि मी तुला अजिबात पैसे देणार नाही. याआधीही दोनदा दिले आहेत. दूर हो आता! "

"ए नाही नको ना म्हणू! दे ना. भूक लागली आहे. " त्याने केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत हात पसरला. रस्त्यावरचे लोक आता वळून तमाशा पाहत होते. मला आणि नितीशला या भागात ओळखणारेही अनेक होते. मला उगीचच लाजल्यासारखं वाटलं. मी पुढे एक चकार शब्द न काढता पर्समधून चटकन वीस रुपयांची नोट काढली, त्याच्या दिशेने फेकली आणि तिथून पळ काढला. ८:३२ ची लोकल चुकली होतीच. मनातल्या मनात दोनचार शिव्या हासडून मी पुढली लोकल पकडली. पाठ टेकवून उभं राहायला मिळालं हेच खूप होतं. ट्रेन हलली आणि डोळ्यांसमोर पुन्हा नितीश उभा राहिला.


***


गोरेगावला आम्ही इमारतीत राहायला आलो तेव्हा मी फक्त दीड वर्षांची होते. मोजून ३० कुटुंबे होती इमारतीत; बरीचशी तिशी-चाळिशीची नोकरदार मंडळी. पै-पै जमवून, गृहकर्ज काढून आपल्यासाठी मुंबईत हक्काचा निवारा मिळवण्यास धडपडणारी.

तळमजल्यावर नायकांचे कुटुंब राहायला आले होते. सुरेशकाका आणि सुमनकाकींचा सुसज्ज दोन बेडरूमचा फ्लॅट होता. त्यांचा मुलगाही माझ्या एवढाच, दीड वर्षांचा होता. आसपास याच वयाची आणखीही बरीच मुलं इमारतीत होती. गाडी, फोन, उंची फर्निचर या चैनीच्या आणि श्रीमंतीच्या गोष्टी समजल्या जात असा तो काळ होता आणि राष्ट्रीय बँकेत उच्चपदस्थ असणारे सुरेशकाका फोन, गाडी, ड्रायव्हर सर्व बाळगून होते. तळमजल्यावर राहत असल्याने सुरेशकाकांची गाठभेट अनेकदा होई. सर्वांशी अदबाने बोलणारे, आमचा फोन खुश्शाल वापरा, कधी गरज लागली तर आपली गाडी आहे हं! असे आवर्जून सांगणारे सुरेशकाका इमारतीत सर्वांना आवडत. सुमनकाकीही मिळून मिसळून वागणार्‍या होत्या. लोकांना पहिले काही दिवस एका गोष्टीचे कुतूहल होते, ते म्हणजे हे दांपत्य चाळिशीला आलेले होते पण त्यामानाने त्यांचा मुलगा फार लहान होता. लवकरच या गोष्टीचा उलगडा लोकांना झाला. नितीश हा त्यांचा दत्तक मुलगा होता.

नितीश काका-काकूंचा मुलगा नाही ही गोष्ट मला लहानपणीच माहीत झाली होती. नेमकी कुणी सांगितली ते आठवत नाही पण काही मोठ्या मुलामुलींकडून समजली असावी. मुलांनी या गोष्टीला खूप महत्त्व दिल्याचे आठवत नाही. या गोष्टीवरून इमारतीतील मोठ्यांमध्येही फार चर्चा झाल्याचे आठवत नाही. सर्वांनी तो सुरेश आणि सुमनकाकींचाच मुलगा आहे हे मनापासून स्वीकारले होते. खुद्द नितीशला या गोष्टीची कल्पना नसावी बहुधा आणि कधी त्याला कुणी दुखवून सांगितले असेही आठवत नाही.

लहान बाळं सर्वांनाच गोड, गोजिरी वाटतात आणि आवडतात पण जसजशी मुलं मोठी होतात तसतशी प्रत्येक मुलातले गुणदोष इतरांना कळू लागतात. नितीशसारख्या गुटगुटीत, गबदुल लहान बाळाचे कौतुक सर्वांनी केले तरी थोड्याच काळात या बाळाचे रुपांतर अंगाने अस्ताव्यस्त सुटलेल्या खादाड मुलात होईल याची कल्पना कुणाला नव्हती. ५-६ वर्षांच्या नितीशचे कौतुक होण्यापेक्षा मुलांमध्ये हसू होऊ लागले आणि केवळ त्याचा जाडेपणाच त्याला कारणीभूत होता असे नाही. नितीशचे गुण-दुर्गुणही हळूहळू लोकांच्या नजरेत येऊ लागले. माझ्या ५ व्या वाढदिवसाची घटना...

त्या काळी आतासारखे वाढदिवसानिमित्त मोठ्ठे खर्च करायची पद्धत पडली नव्हती. आईने इमारतीतल्या लहान मुलांना बोलावले होते. घरी केक केला होता आणि बटाटेवडे तळले होते. केक कापायची वेळ झाली तशी आईने केक आणून टेबलवर ठेवला आणि सुरी आणण्यासाठी ती आत गेली. परत येऊन पाहते तो काय नितीश केकचा भलामोठा ढलपा हाताने तोडून चापण्यात मग्न होता. बाकीची मुलं आ वासून बघत होती आणि मी भोकांड पसरलं होतं. इतक्या लहान मुलाला ओरडावं तरी कसं म्हणून आई गप्प बसली. असाच अनुभव थोड्याफार फरकाने अनेकांना आला होता. कधी कुणी खाण्याची सर्वांमध्ये ठेवलेली बशी एकट्याने हिसकावून त्यावर ताव मारणे, वाढदिवसाला, पूजेला कुणी बोलावले तर हावरटासारखा खाण्यावर आडवा हात मारणे, इतरांच्या प्लेटमधले पदार्थ हिसकावून घेणे अशा अनेक प्रसंगांतून लहान आणि मोठेही मागून त्याची चेष्टा करू लागले. गोष्ट केवळ इतक्यावरच राहती तर मोठा प्रश्न होता असे वाटत नाही पण...

नितीशच्या अंगात उपजतच खोडकर गुण होते; आठ-नऊ वर्षांच्या कळत्या वयातही ते कमी झाले नाहीत. आपल्यापेक्षा लहान आणि दुर्बळ मुलांना बडवून काढणे, त्यांच्या अंगावर थुंकणे, त्यांच्या खोड्या काढणे, त्यांना शिव्या देणे अशा अनेक प्रसंगांतून तो लवकरच मुलांमध्ये अप्रिय होऊ लागला. लहान मुलांची न्यायशक्ती दांडगी असते म्हणे. ते काळ्याला काळे आणि पांढर्‍याला पांढरे म्हणायला कचरत नाहीत. यथावकाश मुलांनी नितीशला हळूहळू चोख उत्तर देणे सुरू केले. त्याला खेळातून कटाप केले जाई, घेतले तरी पकडापकडीचे, लपाछपीचे राज्य सतत त्याच्यावर दिले जाई. क्रिकेट खेळताना बॅटिंग आणि बोलिंग त्याच्या वाट्याला येत नसे. फक्त फिल्डिंग करशील तरच आमच्यात खेळ असे त्याला सुनावले जाई. अर्थातच, त्याचा फारसा उपयोग होत नसेच. मनात आले की नितीश कोणीतरी दुसरे गिर्‍हाईक शोधी किंवा एखाद्या मुलाला एकटे गाठून प्रसाद देई. एकदा त्याने खेळायला गेलेल्या तीन-चार वर्षांच्या लहान मुलांना झाडाच्या पडलेल्या फांदीने अंगावर वळ उठेपर्यंत सपासप फोडून काढले होते. त्या प्रसंगानंतर मोठेही नितीशपासून आपल्या मुलांना दूर राहण्याचा सल्ला देऊ लागले.

नितीशच्या तक्रारी सतत त्याच्या आईवडीलांकडे जाऊ लागल्या. "काकी, नितीशने मारलं.", "काकू, नितीश बघा थुंकतो आमच्या अंगावर. आम्ही नाही घेणार त्याला खेळायला. " "अहो, समजवा तुमच्या नितीशला. काल मारलं त्याने आमच्या नमूला." नितीश असे का करत असेल, त्याला एखादी मानसिक व्याधी होती की नाही ते जाणून घेण्याचा आणि उपचार करण्याचा तो काळ नव्हता. कदाचित त्याला उपचारांची गरज असू शकते, समुपदेशन करावे लागेल हे इतरांना कधी जाणवलं नाही तसं त्याच्या आई-वडिलांनाही ते जाणवलं नसावं. आपल्या मुलाला इतर मुले नावे ठेवतात. त्याला खेळायला घेत नाहीत, त्याला चिडवतात या गोष्टींनी सुमनकाकी कानकोंड्या झाल्या. पोटचं मूल नसण्याचं दु:ख आणि नितीशच्या रूपाने आपले ममत्व प्रकट करायची त्यांना मिळालेली संधी यातून त्या इतरांच्या तक्रारींकडे पूर्ण दुर्लक्ष करू लागल्या. याचा परिणाम असा झाला की नितीश दिवसेंदिवस अधिकच निगरगट्ट होऊ लागला.

एके दिवशी तक्रारी ऐकल्यावर वैतागाने सुमनकाकींनी पोरांची हजेरी घेतली. "तुम्ही सर्व नितीशला उगीच नावं ठेवता. मुद्दाम त्याला त्रास देता. त्याला तुमची गरज नाही. मी खेळेन त्याच्याशी. तुमची अरेरावी मी खपवून घेणार नाही. चल, नितीश, आजपासून आपण दोघे घरात खेळू. " असं म्हणून त्या तरातरा त्याला ओढत घेऊन गेल्या. आता हा पायंडाच पडला होता. नितीशची तक्रार गेली की सुमनकाकी आमच्यावरच करवादून त्याला खेचून घेऊन जात. मोठ्यांनीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. सुरेशकाकांच्या कानावरही नितीशच्या तक्रारी आल्या होत्या. ते समजूतदारपणे तक्रारी ऐकून घेत. नितीशला प्रेमाने, धाकाने समजवण्याचा प्रयत्न करत. सुरेशकाकांचा धाक नितीशला होता त्यामुळे तोही समजल्यासारखे दाखवी. आम्ही मुलेही समजूतदार होत असू; त्याला पुन्हा आमच्यात खेळायला घेत असू परंतु काही दिवसांनी... ये रे माझ्या मागल्या!

लहानांनी त्याचे क्रौर्य अनुभवलेले असले तरी मोठ्यांशी बोलताना नितीशचे बोलणे अतिशय अदबशीर असे. सुरेशकाकांनी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते आणि घरातही ते बरेचदा त्याच्याशी इंग्रजीतून बोलत. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार पाळण्याची सवय त्याला लागली होती. इंग्रजी माध्यमात त्या काळी आजच्या मानाने कमी मुले जात त्यामु़ळे नितीशच्या सफाईदार इंग्रजीचे कौतुक करणारे बरेचजण होते. अभ्यासातही नितीश तल्लख होता. दरवर्षी ७५-८० टक्के गुण सहज मिळवत असे. त्याच्या गुबगुबीत शरीरयष्टीमुळे इमारतीतील नाटकांत, फॅन्सी ड्रेस स्पर्धांत तो सर्वांना हवा असे. त्यामुळे कितीही नावडता असला तरी मुलांनी त्याला आपल्यात सामावून घेतले होते.

वयाच्या ११-१२ व्या वर्षीच त्याला आम्हा मुलांपैकी कुणीतरी लपून सिगरेट ओढताना पाहिले. बातमी पोरांमध्ये कानोकानी पसरली. "ए त्याच्या आईला सांगायचं का? " हा प्रश्न ज्याने उपस्थित केला त्याला दटावण्यात आले. "त्याची आई मागे काय म्हणाली होती माहित्ये ना. तुम्ही मुद्दाम त्याला त्रास देता आणि त्याच्या खोट्या तक्रारी करता. आपण कशाला मध्ये पडायचं? " वयानुसार नितीशचा खोडकरपणा इतरत्र वळला होता. अक्कल नको त्या दिशेने वाहवत चालली होती.

"ए तुला माहित्ये, त्याच्याकडे ती तसली चित्रं असतात. "
"तसली म्हणजे? "
"तसली म्हणजे उघड्या नागड्या बायकांची. " नम्रता एक दिवस माझ्या कानात कुजबुजली.
"तुला काय माहीत? "
"अगं, माझी मामेबहीण आहे त्याच्या वर्गात. ती म्हणत होती. नितीशच्या दप्तरात पाहिली काही मुलांनी. "
"होऽऽ? म्हणजे तो राजरोस जवळ बाळगतो? शाळेतही.. इइइ" मी डोळे विस्फारले. "शी! अशा घाणेरड्या मुलाशी फार बोलायचं नाही हं आपण. अंतर राखून राहिलं पाहिजे. " त्या वयात फार मोठा धक्का होता आमच्यासाठी.
"अगं, शाळेतही त्याच्याशी फारसं कोणी बोलत नाही. त्याची कुणाशी मैत्री नाही. मधल्या सुट्टीत ना, तो शाळेजवळचे फेरीवाले, पानवाले यांच्याशी गप्पा मारत असतो. गुटखा-बिटखाही खात असणार."

पुढे कधीतरी नितीशला जवळच्या विडिओ पार्लरमधून बाहेर पडताना पाहिले. दुपारच्या वेळी तिथे एक्स-रेटेड चित्रपट दाखवले जात. शाळेतल्या लहान मुलाला तेथे खरेतर प्रवेश नव्हता पण असे नियम पाळतो कोण? बातमी आम्हा मुलांमध्ये लगेच कर्णोपकर्णी झाली.
"बरं कुणाला सांगणार नसशील तर तुला एक गोष्ट सांगते. " नम्रता काळजीने सांगत होती.
"कुठली गोष्ट? " मी उत्सुकतेने विचारलं.
"माझी आईला चौथ्या मजल्यावरची सोनाली आहे ना तिच्या आईने सांगितलं. खूप रागात होती सोनालीची आई. "
"का गं? "
"अगं परवा लाइट गेले होते ना संध्याकाळी तेव्हा सोनाली क्लासमधून परत येत होती. लिफ्ट बंद होती ना त्यामुळे तिला चौथ्या मजल्यापर्यंत जिने चढावे लागले. त्या नितीशने तिला येताना पाहिलं असावं. तिच्या मागे मागे तो ही गेला आणि म्हणे तिला मागून करकचून मिठी मारली. ती घाबरून ओरडली ना तशी पळून गेला, घाणेरडा! "
"इइइइ विकृत आहे. सोनालीची आई काही बोलली नाही का? "
"ती घरी गेली होती ना नितीशच्या. पुढे मागे बघणार नाही. समोर आला तर दोन लगावून देईन म्हणाली. सुमनकाकीने हात जोडून क्षमा मागितली. डोळ्याला पदर लावला. सोनालीची आई गप्प झाली. "
"बरं झालं सांगितलंस. आजपासून मी त्या घाणेरड्याला हाय सुद्धा म्हणणार नाही. आपण सावध राहायला हवं. "

एस. एस. सी. ला आम्ही एकाच वर्षी होतो. स्वतःच्या रिझल्टबरोबरच नितीशचे काय होईल हे सुप्त कुतूहलही मनात होते. परीक्षेत त्याला ७७% पडले. याचे पुढे कसे होणार याची काळजी करणार्‍या सर्वांच्या तोंडाला कुलुपं लागली. सुरेशकाका आणि सुमनकाकींनी आनंदाने सर्वांना पेढे वाटले. मार्क चांगले असले तरी उत्तम नव्हते परंतु बी. कॉम केले की आता वेगवेगळे कंप्युटर कोर्सेस करता येतात, एम. बी. ए किंवा सी. ए. करता येतं असं नितीशला पटवून सुरेशकाकांनी त्याला कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेऊन दिली.

कॉलेजला असताना सिगरेट ओढत, येणार्‍या जाणार्‍या पोरींच्या उभारीवरून आशाळभूत नजर फिरवणारा नितीश कधीतरी स्टेशनावर दिसायचा. कधी समोर आलाच तर त्याचे ते बेरकी हास्य डोक्याला त्रास देऊन जायचे. एक दिवस चौथ्या मजल्यावरचे काळे काका सांगत आले की त्यांनी नितीशला बाजारातल्या डान्सबारमधून तर्र अवस्थेत बाहेर येताना पाहिले. त्यानंतर कळले की ही गोष्ट इमारतीतल्या इतर काही मोठ्या मुलांना आधीच ठाऊक होती. १८व्या-१९व्या वर्षी त्याला हे सर्व करण्यास पैसे आणि प्रोत्साहन कसे मिळत होते कळण्यास मार्ग नव्हता. काळेकाकांनी ही गोष्ट तत्परतेने सुरेशकाकांच्या कानी घातली तसे सुरेशकाका हबकलेच. आपल्या मुलाचे गुण या आधी त्यांना कधी जाणवलेच का नाही हे गूढ होते. इमारतीतल्या लोकांच्या मते सुमनकाकींनी सुरेशकाकांना घरात काय चालते याचा कधी थांगपत्ताही लागू दिला नव्हता. त्याला पॉकेटमनीसाठी मोठी रक्कम हातात देणार्‍या, वेळोवेळी त्याला पाठीशी घालणार्‍या, त्याच्याविषयी येणार्‍या तक्रारींवर पांघरूण घालणार्‍या सुमनकाकीच होत्या.

त्या रात्री सुरेशकाकांच्या घरात मोठमोठ्याने आवाज येत होते. सुमनकाकींच्या रडण्याचा, नितीशच्या आणि सुरेशकाकांच्या भांडणाचा. आम्हाला अगदी दुसर्‍या मजल्यापर्यंत ऐकू येत होते. शेवटी इमारतीतील कुणीतरी मध्ये पडलं. सुरेशकाकांनी या प्रकरणानंतर नितीशच्या वागणुकीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तो कधी घरी येतो, कधी बाहेर पडतो, त्याची प्रगती, पॉकेटमनी यावर ते जातीने लक्ष देऊ लागले. परिस्थिती निवळल्यासारखी झाली. सर्व काही सुरळीत सुरू झाले.

नितीशच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षी सुरेशकाका रिटायर झाले पण लगेचच त्यांना फॉरेन बँकेत अ‍ॅडवायझर म्हणून बोलावणे आले. तिथे त्यांनी नितीशसाठी शब्द टाकला; तो नाकारला जाणे केवळ अशक्य होते. ग्रॅज्युएट झाल्याक्षणी नितीशला उत्तम पगाराची नोकरी हातात पडली. "चला! गंगेत घोडं न्हालं. आता हा मुलगा बिझी राहिल, चांगल्या संगतीत राहिल. हे असले उद्योग बरीच पोरे करतात या वयात पण जबाबदारीची जाणीव झाली की येतात सगळे लायनीवर." असे म्हणून सर्वांनी सुटकेचे निश्वास सोडले. पण नाही..तसं काही घडायचं नव्हतं.

नितीश आता स्वतंत्र झाला होता. पॉकेटमनीसाठी त्याला वडिलांवर अवलंबून राहावं लागत नव्हतं. लवकरच रोजचं पिणं, नशेत तर्र होऊन घरी येणं, डान्सबार, सिगरेटी सर्व पूर्ववत सुरू झालं. सक्काळी सातला इमारती समोरच्या पानवाल्याने शटर वर केलं की त्याचे पहिले गिर्‍हाइक नितीश असे. "याने कोणतंही व्यसन बाकी ठेवलेलं नाही." असं लोक म्हणू लागले. काही काळाने या सर्वाच्या सोबतीला नितीशची कोणी एक बाई आहे. तिच्याकडे तो नियमित जातो अशी बातमीही कानावर पडली. बातमी खरी का खोटी हे माहित नाही पण सुरेशकाकांच्या घरातून दररोज भांडणाचे आणि रडारडीचे आवाज ऐकू येत. आता शेजारपाजारचेही त्रासले होते. सुरेशकाका आणि सुमनकाकींची पुण्याई मोठी म्हणून सगळे गप्प होते एवढेच. अशातच एका भांडणानंतर अ‍ॅम्ब्युलन्सच्या आवाजाने सर्व चकीत झाले. सुरेशकाकांना हृदयविकाराचा झटका आला होता. इमारतीतील सर्वांनी वेळीच धावाधाव केली म्हणून प्रसंग निभावून नेता आला.

दिवसेंदिवस नितीश अधिकच शिरजोर होत चालला होता. काकांच्या आजारपणामुळे धाक थोडा कमी झाला होता आणि पंचविशीच्या मुलाला आणखी किती धाकात ठेवणार होते काका? ते हॉस्पिटलमधून घरी आले होते. काठी घेऊन घरातल्या घरात, बाहेर अंगणात फिरत, आल्या गेलेल्याशी चार शब्द बोलत पण काका मनाने खचले होते. काकी तशाही नितीशला काही बोलत नसत. पुत्रप्रेमात गाढ बुडलेल्या काकींनी डोळ्यांवर झापडे ओढून घ्यायचेच ठरवले होते. या सर्व मनःस्तापात आपले काही खरे नाही हे काकांना कळून चुकले होते. त्यांनी तातडीने एक शहाणपणाची गोष्ट केली. आपले मृत्यूपत्र तयार केले. घर,ठेवी, विमा आणि जी काही संपत्ती होती ती आपल्या पश्चात केवळ आपल्या बायकोची आहे असे लिहून ठेवले. नितीशला हे कळल्यावर घरातला ताण आणखी वाढला. त्याची गलिच्छ शिवीगाळ नेहमीची झाली होती पण आता त्याने काका-काकींवर हात उगारणेही सुरु केले होते. अशाच एका भांडणात सुरेशकाका त्राग्याने बोलून गेले -

"तू पोटचा मुलगा असतास तर असा नसता वागलास पण वळचणीचे पाणी वळचणीला जायचे. आमचे रक्त असते तर असे झाले नसते." सुरेशकाकांच्या बोलण्याला फारसा अर्थ नव्हता. पोटची पोरंही बिघडतात, वाया जातात हे त्यांना पुरेपुर माहित होते पण त्राग्यातून शब्द निघून गेले. नितीश नेमका कुणाचा मुलगा आहे याची कल्पना त्यांना होती का याची कल्पना नाही पण आपण आपल्या आईवडिलांचे पोटचे मूल नाही ही बातमी नितीशला आणखीनच वेडेपिसे करणारी ठरली. त्याने साफ ताळतंत्र सोडून दिले. कोणी म्हणायचे तो कधी बँकेत जातो, कधी जात नाही. त्याची फोरासरोडला कुणी बाई आहे. तिच्याकडेच पडलेला असतो. एक दोनदा त्याला इमारतीतल्या लोकांनी रस्त्यात दारू पिऊन अक्षरशः लोळताना पाहिला आणि घरी आणून सोडला. या सर्वाचा परिणाम व्हायचा तो झाला. काकांना आलेला पुढला झटका प्राणघातक ठरला.

घरात आता सुमनकाकी आणि नितीश दोघेच होते. नितीशला पगाराचे पैसे पुरे पडत नसत. तो काकींकडे पैशांसाठी तगादा लावत असे. त्याची नोकरीही सुटली होती. कोणी म्हणत त्याने बँकेत अफरातफर केली होती. रक्कम खूप मोठी नव्हती आणि सुरेशकाकांच्या पुण्याईमुळे बँकेने ते प्रकरण कसेबसे गुंडाळले होते आणि नितीशला नोकरीतून कमी केले. नोकरी गेली तरी नितीशचे शौक कमी झाले नव्हते; अंगात कली तर फार पूर्वीच घुसला होता. तर्र होऊन, झोकांड्या खाणार्‍या नितीशपासून लोक चार हात दूर राहत. त्याला स्वतःचे मित्र-मैत्रिणी असे कधी नव्हतेच त्यामुळे त्याला सांभाळेल, समजावेल असे कोणी उरलेच नव्हते. सुमनकाकींना आता तो पैशांसाठी धमकावत असे. भांडत असे, मारहाणही करत असे पण काकींनी स्वतःहून कधी तोंड उघडून लोकांकडे तक्रारच केली नाही.

एक दिवस मात्र बांध फुटला. मध्यरात्री घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या सुमनकाकींनी शेजार्‍यांची ठणाठणा बेल वाजवली. शेजार्‍यांनी दार उघडलं तसं त्या झटकन आत शिरल्या आणि धाय मोकलून रडू लागल्या. नितीश गेले काही दिवस त्यांच्या मागे लागला होता की हे घर विकून टाक आणि पैसे देऊन मला मोकळा कर. काकींनी नकार दिल्यावर त्यांना मारहाण करत होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी काकी कसेबसे हे सर्व सहन करत होत्या. मुकाट्याने सर्व सहन करत होत्या. त्या रात्री उशीरापर्यंत नितीश घरी आला नव्हता. रात्री साडे अकराच्या सुमारास तर्र होऊन परतला तसा काकींनी त्याला जेवणाबद्दल विचारले. त्याने नकार दिला म्हणून काकी जाऊन आपल्या खोलीत झोपल्या. मध्यरात्री उलटून गेली असावी. काकींना झोप लागली होती. अचानक नितीशने काकींच्या बेडरूममध्ये घुसून त्यांच्या नाकातोंडावर उशी दाबली. काकींच्या कृश शरीरात कसे कोणजाणे पण नशेत लडखडणार्‍या नितीशला धक्का देण्याचे बळ आले. त्या जोराचा हिसडा देऊन पळाल्या आणि थेट शेजारच्यांकडे पोहोचल्या.

प्रकरण आता अतिशय गंभीर झालं होतं. पांढरपेशा मध्यमवर्गीय फ्लॅट संस्कृतीत लोक शेजार टिकवून असले तरी एक विशिष्ट मर्यादा राखून असतात. फ्लॅटच्या बंद दारांचा आडोसा अनेक गुपिते लपवून ठेवतो. काकींच्या घरातले हे गुपीत आता बाहेर पडले होते. काकींनी यापुढे नितीशसोबत राहणे धोक्याचे होते. इमारतीतल्या लोकांनी आता एकत्र व्हायचे ठरवले आणि पोलिसांत तक्रार केली. त्या रात्रीच नितीशला अटक झाली, पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुलांवर केलेलं प्रेम इतकं घट्ट असतं की तिथेही ती माऊली पोलिसांना डोळ्यांत पाणी आणून इन्स्पेक्टरना विनंती करत होती, "त्याला मारू नका हां, त्याला उपाशी ठेवू नका हां. तो सुधारेल, त्याला समजून घ्या."

नितीशला अटक झाली आणि एक एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. नितीशने सुमनकाकींना कफल्लक करून सोडले होते. नितीश जबरदस्तीने त्यांच्या सह्या चेकवर घेई. त्यांची फिक्स्ड डिपॉझिट्स त्याने तोडायला लावली होती. दागिने नेऊन कधीच्या कधी विकले होते. सर्व हिशेब केला तेव्हा काकींच्या नावावर घर आणि केवळ ८०० रुपये शिल्लक होते. आता काय करायचे? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. काकींची जबाबदारी कोण घेणार? त्यांचा मोठा भाऊ होता पण तोच वृद्ध होता आणि आपल्या मुलांकडे राहत होता. घर विकण्यावाचून पर्याय नव्हता. इमारतीतील लोकांनी त्यांच्या भावाला बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून घर विकून टाकण्याचा निर्णय घेतला. काकींची काळजी घेतली जाईल अशा एका वृद्धाश्रमात त्यांना ठेवण्यात आले आणि घर विकून मिळालेले पैसे त्यांच्या खर्चासाठी ठेवण्यात आले. काकींच्या इच्छेनुसार पैशांचा काही हिस्सा नितीशलाही देण्यात आला. अनेकांनी या गोष्टीला विरोध केला होता पण काकी बधल्या नाहीत. त्यांनी नितीशवर केसही केली नव्हती त्यामु़ळे नितीश लवकरच बाहेर आला. त्याचा हिस्सा त्याला देऊन लोकांनी त्याला मोकळा केला. काकींची रवानगी कोठे होत आहे याची त्याला खबर लागू दिली नाही.

या घटनेनंतर मिळालेले पैसे घेऊन नितीशने तोंड कुठे काळे केले ते कळले नाही. कोणी म्हणत त्याने कुठल्याशा चाळीत जागा घेतली आहे. कुणी म्हणत तो त्या बाईकडे फोरासरोडला राहतो. कालांतराने लोकांना नायक कुटुंबातील सनसनाटी गोष्टींचा विसर पडला. ८-१० महिने निघून गेले. अचानक नितीश पुन्हा इमारतीच्या आसपास घुटमळताना दिसू लागला. रया गेली होती. घाणेरडा झाला होता. त्याला कसल्यातरी गुप्त रोगांची लागण झाली आहे असे लोक म्हणत. अनेक दिवसांत पाण्याचा स्पर्श नसलेले घाणेरडे शरीर, मळकटलेले फाटके कपडे आणि पायाला बांधलेले बँडेज घेऊन तो भ्रमिष्टागत भटकताना दिसे. त्याच्या पायाला गँगरिन झाले आहे असे कोणीतरी म्हणे. दोन बोटे कापली होती. कधी इमारतीतील कुणी दिसले तर त्यांच्याकडे तो पैसे मागत असे. लोकांच्या मनात तिरस्कार आणि करूणा एकत्रच दाटून येत असे. कधीतरी कुणी पैसे देई तर कधीतरी त्याला हाकलून लावी.

कोपर्‍यावरच्या बंगलीतले दिक्षितकाका एके दिवशी माझ्या वडिलांना म्हणाले - "तो तुमच्या इमारतीतला नायकांचा मुलगा हो, तो रात्रीचा आमच्या अंगणात घुसून आंब्याच्या झाडाखाली झोपतो. हे सगळे दुर्दैवाचे दशावतार बघायच्या आधी नायक गेले ते बरे झाले म्हणायचे. मी एकदा दोनदा हटकला त्याला पण देतो झोपायला कधीतरी. चांगल्या घरचा मुलगा ना म्हणून वाईट वाटतं पण आमच्या सूनबाईला आवडत नाही ते. जांघेत खाजवत असतो सारखा. नाती ११-१२ वर्षांच्या झाल्यात. त्यांच्यावर याची नजर नको असं म्हणते. तिचंही बरोबर आहे."

दादर स्टेशनाला गाडी लागली तशी माझ्या विचारांची शृंखला गळून पडली. 'माणूस तरी किती नको ते ताप डोक्याला लावून घेतो.' एक सुस्कारा सोडून मी थांबत आलेल्या गाडीतून उडी मारली आणि जिन्याच्या दिशेने धाव घेतली.


***


एखाद दोन महिने उलटून गेले असतील वरल्या घटनेला. कधीतरी धावपळीत स्टेशनाकडे येता-जाताना नितीश पारापाशी बसलेला दिसायचा. कधी नाही दिसायचा. मनाने त्याची नोंद ठेवणे सोडून दिले होते. नकोशा असणार्‍या तिर्‍हाईत गोष्टींकडे आपण आपसूक दुर्लक्ष करू लागतो तसेच.

आज वेळेवर ऑफिसात येऊन टेकले होते. सकाळीच डेस्कवरला फोन वाजला तसा मी रिसिव्हर कानाला लावला.
"आहे का गं वेळ ५-१० मिनिटं? मोबाईलवर फोन करत होते पण लागला नाही म्हणून इथे करून पाहिला." नम्रताचा आवाज कानावर आला.
"आहे ना. सेलफोन सायलंटवर आहे बहुधा. इतकं काय अर्जंट काम काढलंस?"
"अगं, अर्जंट असं काही नाही पण मनाला रुखरुख लागली होती म्हणून तुझ्याशी बोलावसं वाटलं. नितीश गेला काल."
"गेला म्हणजे?" नितीश प्रकरणाची परिणीती अशीच होईल याची कल्पना होती तरीही अचानक आलेल्या बातमीने आश्चर्य वाटायचे ते वाटलेच.
"अगं, काल रात्री आम्ही जेवायला गेलो होतो. ऋषीचा वाढदिवस होता ना. परतताना रात्रीचे १० वाजून गेले होते. पारापाशी गर्दी जमली होती म्हणून विचारलं तर कळलं की नितीशची बॉडी होती. म्युनिसिपल्टीची गाडी आली होती. बे..." नम्रताने आवंढा गिळला. "बेवारशी प्रेतांना उचलून न्यायला येते ना."
"अरेरे!" मला पुढे काय बोलावे ते कळेना. काळजात सूक्ष्म कळ उमटली.

मुलं बिघडतात. एका विशिष्ट वयांत अनेक उद्योग करून पाहतात. त्यातली बरीचशी मुलं चुकलेली वाट सुधारून पुन्हा मार्गी लागतात. कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांची मदत घेतात किंवा एके दिवशी काहीतरी चुकतंय ही जाणीव झाल्याने स्वतःच मार्ग बदलतात. मध्यमवर्गी पांढरपेशा वातावरणात माणसं एकमेकांना दबून राहतात. अशा परिस्थितीत सर्व बंधनं झुगारून स्वतःला गर्तेत झोकून देणारे विरळाच. सोबत वाढलेला, खेळलेला, शिकलेला, नंतर निगरगट्ट झालेला, व्यसनी आणि शेवटी भ्रमिष्टागत भीक मागत फिरणारा नितीश डोळ्यासमोरून पुन्हा तरळून गेला. कधीकधी एखादी नकोशी व्यक्तीसुद्धा हुरहुर लावून जाते खरी.


***

Sunday, November 07, 2010

पशू

हे घर भाड्याने घेतलं तेव्हा सुहासी थोडीशी कुरबुरत होती. या बायकांना प्रत्येक गोष्टीत खोड काढायची सवय का असते हेच कळत नाही. मनातून घर तिलाही आवडलं होतं पण उगीच काहीतरी लहानसहान खोड्या काढत बसली होती. घराचं तोंड पूर्वेला नाही, विहीरीवर जाळी नाही, स्वयंपाकघराचा ओटा अरुंद आहे आणि काय ना काय. तिला बराच वेळ समजावलं तेव्हा एकदा घर पसंत आहे म्हणाली. आज विचार केला तर वाटतं की उगीच तिला भरीला पाडलं मी.

पुलाच्या बांधकामाचं प्रोजेक्ट मिळालं होतं. त्यासोबत आणखीही काही बांधकामे मिळणार होती. किमान वर्षभर तरी काम चालणार होतं. सुहासी नोकरी करत नव्हतीच. वर्षभर स्वतंत्र राहायला मिळणार याचा आनंद दोघांनाही होता. माझ्या बांधकामापासून मैलभरावरच हे घर मिळत होतं. घराचा मालक पुण्याला राहत होता. तो मूळचा या इथलाच. त्याची वडिलोपार्जित जमीन होती. त्यावर त्याने घर बांधले. सरकारी पाहुणे इथे बरेच वेळा मुक्काम ठोकून असत. इथे येण्यापूर्वी मी त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटलो. घर भाड्याने द्यायचे असले तर त्याला घरात लग्न झालेलं जोडपं हवे होते त्यामुळे सौदा झटक्यात ठरला. घर तसं थोडंसं एकाकी होतं पण अगदीच काही जंगलात नव्हतं. नवी वस्ती बनत होती म्हणून आजूबाजूला थोडी मोकळी जागा होती. हाकेच्या अंतरावर इतर घरं होती. मुख्य म्हणजे साईटपासून घर जवळ होतं आणि दिमतीला बाइक होतीच की.

घर अगदी टुमदार होतं. पांढर्‍या शुभ्र भीतींवर लालचुटुक कौले, घराच्या बाहेर थोडंसं अंगण, प्रशस्त ओसरी, आत बैठकीची खोली, दोन बेडरूम्स आणि स्वयंपाकघर. हवेशीर आणि प्रसन्न. आम्हा दोघांना पुरून उरेल असं घर होतं. मुख्य दरवाजा बैठकीच्या खोलीत उघडत होता आणि स्वयंपाकघरातून मागच्या अंगणात जायला दरवाजा होता. अंगणाला पुढून मागून सुरेख लाकडी कुंपण होतं. मागच्या कुंपणाला लहानसं फाटकही होतं; माळावर जाण्यासाठी. मागच्या अंगणामागे विस्तीर्ण पसरलेला माळ होता. मोकळीच मोकळी जागा. कुंपणापासून काही अंतरावर उंचचउंच वाढलेल्या गवताचा लांबलचक पट्टा होता.

'तो माळ वापरात नाही; ओसाड आहे' असं रंगराव म्हणाला होता. रंगराव म्हणजे धरणावरला मुकादम. त्यानेच गावातली ४-५ घरं दाखवली होती मला. त्याला गावची बरीच माहिती होती; काही हवं नको झालं तर मी त्यालाच विचारत असे. 'त्या वाढलेल्या गवतात कधीतरी कोल्ही-कुत्री निघतात. उगीच फिरायच्या निमित्ताने फार आतवर घुसू नका, एखादं जनावर बाहेर येऊन पोटरीचा चावा घ्यायचं.' असं सांगून गेला होता. तशी अडचण काही नव्हती. माळावर फिरण्यासारखं काही नव्हतंच. घरासभोवतीच्या भक्कम लाकडी कुंपणातून कुणी कुत्रं अंगणात घुसण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून मी दुर्लक्ष केलं. माणसाला एखादी गोष्ट हवी असली की तो तिच्याबाबतीत फार खोलवर जात नाही. मला काम सुरू करायचं होतं, सुहासीला इथे आणायचं होतं, घर लावायचं होतं. आता मात्र वाटतं की मी आणखी चौकशी करायला हवी होती.

आम्ही आता या घरात राहायला येऊन आठवडा उलटला होता. घराची लावालावी, थोडंसं प्लंबिंगचं, कुठे थोडंफार डागडुजीचं काम यातच सगळा आठवडा व्यस्त गेला. सुहासीला टापटीप, स्वच्छता यांची भारी आवड. घर तिने मस्त सजवलं होतं. आठवडाभर गावातल्याच खानावळीतून डबा आणत होतो. आता स्वयंपाकघर लागलं होतं. रविवारी आम्ही दोघांनी मस्त आराम केला. बाजारहाट केली आणि मी सुहासीला गावात, नदीवर फिरवूनही आणली. तिचाही मूड मस्त लागला होता.

"बरं झालं नै! वर्षभर सुट्टी साजरी करणार आपण असं वाटतं आहे. " ती उत्साहाने म्हणाली.
"बघ हं! कंटाळशील लवकरच. मग म्हणशील कुठे या आडगावात येऊन पडलो. "
"अगदीच काही आडगाव नाहीये हं! आपण राहतो तिथे वस्ती अद्याप नाही एवढंच. अरे पण तू आहेस ना, पुरा माझ्या ताब्यात. आणखी कोण पाहिजे? " ती खट्याळ हसत म्हणाली.

संध्याकाळी आम्ही बाहेरच जेवलो आणि मनसोक्त गप्पा मारल्या. आमच्या लग्नाला तीन वर्षे उलटली होती पण अद्याप नवलाई गेलेली नव्हती. सुहासीचा शांत, नीटनेटका स्वभाव मला आजही हवाहवासा वाटे.

सोमवारी सकाळी मी साईटवर निघालो तेव्हा सुहासी आंघोळपांघोळ आटोपून स्वयंपाकाच्या तयारीलाही लागली होती.

"ए तू बारा वाजेपर्यंत ये हं जेवायला! उशीर करू नकोस. तुझ्या आवडीचं वांग्याचं भरीत बनवते आहे. " तिचं ते लाडिक बोलणं कानावर पडलं आणि उंबरठ्यातून बाहेर पडणारा पाय थबकला.
"जाऊच नकोस असं म्हण. हा बघ मी इथेच थांबतो की नाही ते. " मी हसून म्हटलं तशी ती तरातरा दारात आली आणि मला वेडावून म्हणाली, "निघ हं आता, नाहीतर रंगराव घरापर्यंत यायचा बोलवायला. "

दुपारी वेळेवर मी निघणारच होतो पण अचानक काही काम निघालं. सिमेंटच्या गोणी येऊन पडल्या त्याच्या पावत्यांवर सह्या हव्या होत्या. मला बाराच्या सुमारास निघताच येईना. घरातला फोन अद्याप सुरू झाला नव्हता. सुहासीला फोन करून सांगावं की 'तू जेवून घे' तर ते शक्य नव्हतं. मी मनातून वैतागलो पण हे काम हातावेगळं केल्याशिवाय निघणं बरं दिसत नव्हतं. दोनच्या सुमारास मी मोकळा झालो तशी धावतच जाऊन बाइक काढली. ऊन मी म्हणत होतं. मी सुसाट बाइक सोडली आणि एकदाचा घरी पोहोचलो. आत जाऊन आता बोलणी ऐकून घ्यायची आहेत अशी मनाची तयारी करून मी दार उघडलं. टळटळीत उन्हातून एकदम आत शिरल्यावर अंधारून आल्यासारखं वाटलं. मी डोळे किलकिले केले. आत सामसूम होती. घरात माणूस असल्याची अजिबात चाहूल लागत नव्हती. 'बाईसाहेब जाम वैतागलेल्या असाव्यात.' मी मनात म्हटलं आणि दबकतच आत गेलो. आधी बेडरूममध्ये डोकावून पाहिलं. न जाणो, खाऊनपिऊन बायकोने मस्त ताणून दिलेली असायची आणि मी आपला उगीच हवालदिल. बेडरूममध्ये सुहासी नव्हती. आता राहिलं स्वयंपाकघर. मी स्वयंपाकघरात घुसलो.

स्वयंपाकघरातली खिडकी उघडी होती आणि खिडकीपाशी सुहासी स्तब्ध उभी होती. अगदी पुतळ्यासारखी. मी मागे उभा आहे याची किंचितही जाणीव तिला झाली नव्हती. कुतूहलाने ती खिडकीबाहेर बघत होती. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्याने तिच्या बटा तेवढ्या हलत होत्या. फार सुरेख दिसत होती सुहासी. तिच्याकडे पाहिलं की मला नेहमी समाधान वाटे. सरळ नाक, नाजूक जिवणी, पाणीदार डोळे. खांद्यावर रुळणारे स्टाइलिश कापलेले केस आणि नजरेत भरणारा बांधा. या सर्वांत सुहासीचे डोळे मला फार आवडत. लहान मुलांसारखे टपोरे आणि निरागस. तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच डोळ्यांत माझा जीव गुंतला होता.

"सुहासी", मी तिच्या खांद्यावर हात टाकला तशी ती मागे वळली.
"अरेच्चा! तू कधी आलास? " ती साफ गोंधळली होती. "चल जेवायला बसूया. " असे म्हणून तिने खिडकी बंद केली आणि ताटे काढली. जेवणाची वेळ टळून गेली आहे, दुपारचे दोन वाजून गेले आहेत याचा मागमूसही तिच्या तोंडावर नव्हता. शेवटी मीच म्हणालो.
"सॉरी, अगं वेळेवर येताच आलं नाही. बराच उशीर झाला. "
"उशीर झाला? " सुहासी आश्चर्याने पुटपुटली आणि तिने घड्याळाकडे नजर टाकली. "अय्या! दोन वाजून गेले. मला कळलंच नाही वेळ कुठे गेला ते. " ती चकीत झाली होती.
"का गं? असं काय करत होतीस की तुला वेळेचं भान राहिलं नाही? "

"काही नाही रे. स्वयंपाक, साफसफाई आटोपून तुझी वाट बघत बसले होते. वेळ जाईना म्हणून या खिडकीतून सहजच बाहेर बघत होते. ते मागच्या माळावरचं गवत वाऱ्यावर संथ डुलत होतं. एका लयीत. एका नादात. त्याच्या त्या हिरव्यागार रंगात सूर्याचे सोनेरी रंग मिसळले होते आणि वार्‍याने होणारी पात्यांची सळसळ ना अरे इथपर्यंत, अगदी घरात ऐकू येत होती. सर्व भानच विसरूनच गेले मी त्याच्याकडे बघताना. " ती भारावल्यासारखी बोलत होती. तिच्या आवाजातला तो बदल मला जाणवला होता खरा पण त्यावेळेस खटकला का नाही ते कळत नाही. खटकला असता तर आज ही पाळी आमच्यावर आली नसती.

"अगं, शहरातल्या माणसांना हा असा निसर्ग कुठे बघायला मिळतो? लक्की यू! मला तर इथे येऊनही मिळत नाहीये. तेच सिमेंट, रेती, कॉंक्रिट बघतो मी दिवसभर." मी हसून म्हटलं आणि भरभर जेवायला सुरुवात केली. मला साईटवर परतायचं होतं.

त्यानंतर अनेकदा मी दुपारचा जेवायला घरी यायचो तेव्हा सुहासीला स्वयंपाकघराच्या खिडकीत, नाहीतर दारात उभी पाहायचो. ती टक लावून त्या गवताकडे बघत असायची. कित्येकदा मी तिच्या बाजूला जाऊन उभा राहिलो तेव्हा जाणवलं होतं की तिच्या डोळ्यांची पापणीही हलत नसे. असं काय आहे त्या गवतात हा प्रश्न मला पडत असे मात्र मी खोलात जायचं मनावर घेतलं नाही. का केलं मी असं? ...बेफिकीर होतो मी. संकटं वगैरे आपल्या चार हात लांबून निघून जातील या गैरसमजूतीत जगत होतो.

संध्याकाळी माझ्या घरी पोहोचण्याच्या वेळेवर घरकाम करायला पद्मा आलेली असे. आमच्या साईटवरच्या हणम्याची बायको. संध्याकाळी सुहासी काम आटोपत तिच्या मागेमागेच असे. निदान त्यावेळी तरी ती त्या गवतात रमलेली नाही याचं मला बरं वाटे.

असाच एके दिवशी संध्याकाळी मला साईटवरून यायला थोडा उशीर झाला. घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. मी अंगणात बाइक लावली. घरात मिट्ट काळोख होता. 'कुठे गेली असेल सुहासी यावेळेस?' असा विचार करतच मी घराचा दरवाजा उघडला आणि आतला दिवा लावला. प्रकाशाने संपूर्ण खोली उजळून निघाली. माझी पावलं तडक स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. माझ्या अपेक्षेप्रमाणेच स्वयंपाकघरातल्या काळोखात सुहासी खिडकीसमोर उभी होती. तशीच; दुपारी उभी असे अगदी तश्शीच. स्तब्ध. पुतळ्यासारखी. आजूबाजूच्या जगाला विसरून गेलेली. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचा चेहरा मी निरखत होतो. कोड्यात पडलेला. कुतूहलाने खिडकीबाहेर माळाकडे पाहणारा. मी घाईने लाइट लावला तशी ती एकदम दचकली. "तू कधी आलास? "

"काय बघतेस सुहासी? " दुपारी मी जेवून साईटवर परतायच्या घाईत असे पण आज या प्रश्नाचा छडा लावायला बरी वेळ सापडली होती.
"काही नाही रे. ते गवत चंद्रप्रकाशात इतकं सुरेख दिसत होतं की नजरच निघत नव्हती. बघत राहावसं वाटतं त्या गवताकडे. त्या गवताचे आणि माझे जणू काही ऋणानुबंध आहेत. मी ना एकदा त्या गवतापलीकडे जाऊन बघणार आहे. " ती झोपेत बोलणार्‍या माणसाप्रमाणे बोलत होती.

मी तिच्याकडे निरखून पाहिले. गेले काही दिवस सुहासीत काहीतरी बदल होतोय अशी शंका मला येऊ लागली होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती. थोडीशी खंगल्यासारखीही वाटत होती.

"तुला रंगरावने काय सांगितलं माहित आहे ना. तिथे उगीच रानटी कुत्री वगैरे असायची. नको ते स्टंट करू नकोस. उगीच अंगाशी नको यायला. हे गाव अजूनही आपल्याला अपरिचित आहे." मी तिला खडसावलंच.

"अरे, आपण इतके दिवस इथे राहतो. तू कधी कुठल्या कुत्र्याचं भुंकणं ऐकलं आहेस का? मी तर दिवसभर घरात असते. या खिडकीशी उभी असते. गवताची सळसळही मला ऐकू येते पण कधी त्या माळरानावर कुत्र्यांना पाहिलेलं नाही की त्यांचं भुंकणं ऐकलेलं नाही. "

"हे बघ! तुला माझं ऐकायचं नसेल तर तसं सांग. तुझ्याकडे मोबाईलही नाही. त्या माळावर जाऊन कुठे तरी हरवू नकोस म्हणजे झालं. " मी तिला थोड्या तुसडेपणाने म्हटले तशी ती हिरमुसली झाली. जेवून झोपायला जाईपर्यंत ती माझ्याशी फारशी बोलली नाही.

रात्री सुहासी माझ्याकडे पाठ करूनच झोपली होती. मला वाईट वाटलं. इथे परक्या गावात आम्ही दोघेच एकमेकांचे सोबती आणि आता उगीच आमच्यातला संवाद बंद झाला. मी तिला जवळ ओढली आणि म्हणालो, "येत्या रविवारी जाऊ आपण त्या माळरानाच्या दिशेने. चक्कर मारून येऊ. एक दांडुका घेऊन जाऊ बरोबर. आलंच कुत्रं तर घालू पेकाटात. " सुहासी खुदकन हसली. "हो हो नक्की जाऊ. " असं म्हणून मला आणखीनच खेटली.

दुसर्‍या दिवशी दुपारी जेवायला मी घरी आलो तर घरात पुन्हा सामसूम होती. आपोआप माझी पावलं स्वयंपाकघराकडे वळली. खिडकीपाशी दररोज उभी असणारी सुहासी आता मला सरावाची झाली होती. त्याच अपेक्षेने मी स्वयंपाकघरात पाय टाकला पण त्या दिवशी स्वयंपाकघर मोकळं होतं. मी बेडरूमकडे गेलो; तिथेही कुणी नव्हते मग दुसर्‍या बेडरूमकडे. नाही, सुहासीचा पत्ता नव्हता. ती घरात नव्हतीच.

मला कळेना ही यावेळेस कुठे गेली असावी? मी पुन्हा स्वयंपाकघराकडे वळलो. स्वयंपाकघराचा दरवाजा ओढून घेतलेला होता पण खिडकी उघडी होती. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. मागल्या कुंपणाचे फाटक उघडे होते. त्या बाहेर विस्तीर्ण माळ पसरला होता. माळरानावरचं उंचच उंच वाढलेलं गवत वाऱ्यावर फेर धरून डोलत होतं. संथ; एका लयीत. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात हिरवीगार पाती चमचमत होती. मी स्तब्ध झालो. डोळ्यांच्या कक्षेत फक्त डोलणारं, संथ हेलकावे खाणारं गवत मावत होतं. त्याची ती मंद सळसळ कानावर पडत होती. अचानक माळरान रुंदावल्यासारखं भासलं. गवतही आणखीच उंच होत होतं. माळरान आता हळूहळू माझ्याजवळ सरकत होतं. जवळ येत होतं. त्याचा विस्तार पूर्वीपेक्षा वाढल्यासारखा वाटत होता. चकीत करणारे क्षण होते ते. मी आणि माळावरचं गवत सोडून आसमंतात दुसरं काहीच नाही असा विचार मनाला चाटून गेला. माझे डोळे त्या दृश्यावर खिळून होते... तिथे जायला हवं एक दिवस. त्या गवतात... ते गवत बोलवत होतं. एवढ्यात गवतात काहीतरी हललं आणि डोलणारं गवत एकदम स्तब्ध झाल्यासारखं वाटलं. माळाचा आकारही पूर्ववत झाला. माझी तंद्री मोडली.

त्या गवतातून सुहासी धडपडत बाहेर पडत होती. विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे, घामाघूम शरीर; सुहासीचा हा अवतार बघून मी थक्क झालो.

मी तिला पाहून चटकन मागचं दार उघडलं आणि बाहेर गेलो. ती कुंपण बंद करून आत येत होती. तिला दम लागला होता आणि चेहर्‍यावर भीतीचे सावट दिसत होतं.

"सुहासी? काय झालं? " काळजीने मी तिला विचारलं. ती धापा टाकत होती. तिच्या कुडत्यावर, सलवारवर केसांवर गवताचे तण चिकटले होते. पायांना चिखल लागला होता. काहीही न बोलता ती तरातरा घरात शिरली. मी तिच्यामागून घरात शिरलो तेव्हा दुपारचे तीनचे ठोके पडत होते. मी जेवायला घरी आल्यापासून इतका वेळ गेला होता याची जाणीव मला आत्ता होत होती. काहीतरी होतं त्या माळरानावर जे आधी सुहासीला खिळवून ठेवत होतं आणि आज मलाही त्याची प्रचिती आली होती. तो माळ संमोहन टाकत होता, आम्हाला खेचून घेत होता. मी घाईने खिडकी आणि दरवाजा बंद केले.

"सुहासी, काय झालं? "
"काही नाही. आज राहावलं नाही म्हणून मी त्या गवतात घुसले आणि रस्ता चुकले. उंच आहे ते गवत भारी. इथून जाणवत नाही पण खरंच खूप उंच आहे. परत कसं यावं तेच कळेना. वाटच मिळेना. पुढल्या वेळेस काहीतरी खुणा घेऊन गेलं पाहिजे. " ती आता शांत दिसत होती. शांतपणे बोलत होती. मगाशी तिच्या डोळ्यांतली भीती नाहीशी झाली होती. जसं काही घडलंच नव्हतं. मी मात्र धास्तावलो होतो.

"हे बघ, तिथे पुन्हा जायची अजिबात गरज नाही. पुन्हा या खिडकीतही उभी राहू नकोस. तुझ्या डोक्यातले माळाचे विचार आधी काढून टाक. हा वेडेपणा पुरे झाला." मी आवाज चढवून म्हणालो. त्या खिडकीतून पाहिल्यावर मला जे जाणवलं होतं ते तिला सांगावं की नको असा विचार मनात आला. न जाणो जे मला भासलं होतं ते तिला भासत नसलं तर ती उगीच मला वेड्यात काढायची असा विचार करून मी गप्प बसलो पण या माळरानाबद्दल खोलात चौकशी करणं गरजेचं होतं. डोळ्यांसमोर रंगराव आला.

मी साईटवर पुन्हा परतलो तर रंगराव गायब होता. कामावरल्या दोघांकडून कळलं की त्याच्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना भेटायला तो गावी गेला होता. दोन दिवसांनी परत येणार होता. पुलाचा प्लॅन घेऊन असिस्टंट इंजिनिअर येताना दिसला आणि मीही कामाच्या धांदलीत माळरानाची गोष्ट विसरून गेलो.

त्यानंतर गेले दोन दिवस मी घरी आलो तर सुहासी घरीच दिसली. ती नेहमीप्रमाणे खिडकीतही उभी नव्हती. मला मनात कुठेतरी खूप बरं वाटलं आणि तेवढीच काळजीही वाटत होती. का कुणास ठाऊक? सुहासी बदलली होती. तिचा चेहरा उतरलेला दिसे. बोलण्यात-वागण्यात उत्साह नव्हता. काहीतरी विचार करत एकटीच बसलेली असे. केस विंचरलेले नसत. कपडे टापटीप नसत. मी तिला कितींदा विचारलं की कसला विचार करतेस? पण ती उत्तर टाळत होती. 'रविवारी जायचं का माळावर आपण?' असं मी तिला मुद्दाम खोचकपणे विचारून पाहिलं पण तिने नकारार्थी मान हलवून वेळ मारून नेली. मला मनात बरंच वाटलं. निदान ते माळरानाचं भूत तिच्या मानगुटीवरून उतरलं हेच खूप होतं.

दोन दिवसांनंतरची गोष्ट. मध्यरात्र उलटून गेली असावी. कसलंतरी भयंकर स्वप्न पडलं होतं. मी दचकून जागा झालो तेव्हा सुहासी माझ्या बाजूला नव्हती. ती पाणी प्यायला उठली असेल किंवा बाथरूमला गेली असेल या विचाराने मी गादीवरून उठलो नाही पण पुन्हा डोळा लागत नव्हता. थोडा वेळ गेला, सुहासीची चाहूल लागली नाही. मला अस्वस्थ वाटू लागलं; मी उठलो आणि स्वयंपाकघरात गेलो. घराचा मागचा दरवाजा आणि कुंपणाचं फाटक दोन्ही सताड उघडे होते.

रात्रीच्या अंधारात माळ निळसर-करडा दिसत होता. आकाशात चंद्रावर ढगांनी गर्दी जमा केली होती. ढगांच्या आडून कुठेतरी चांदणी उगीच लुकलुकत होती. मी डोळे फाडून माळाकडे बघत होतो पण काहीच दिसत नव्हतं. काय करावं काही सुचेना. सुहासी पुन्हा त्या गवतात तर गेली नसेल... काय करायचं? रात्रीच्या वेळी असं माळावर... तिथे ती भटकी कुत्री असली तर? मला कुत्र्यांची भीती वाटते पण माझी बायको तिथे गेली आहे... एकटीच. विचार डोक्यात मावेनासे झाले होते. माझे पाय आपोआप माळाच्या दिशेने पडू लागले. मी दरवाजा ओलांडून मागच्या अंगणात पोहोचलो असेन नसेन तोच गवतात काहीतरी हललं. गवतातून सुहासी वाकून बाहेर पडत होती. मी धावत कुंपणापाशी गेलो. तिला दम लागला होता, श्वासही फुलला होता. अंगाला गवत चिकटलं होतं. मी तिचा हात पकडला आणि तिला खेचून घरात आणली. क्षणभर, तिच्या नजरेला माझी ओळख पटत नसावी असं मला वाटून गेलं. ही तिथे कुणाला भेटायला तर जात नसावी? कुणी प्रियकर तर नसावा? असा चुकार विचार माझ्या मनात आला आणि मलाच स्वतःची लाज वाटली. सुहासी अशी नाही. खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर. तिचं काहीतरी बिनसलं आहे, तिचं चित्त थार्‍यवर नाही आणि ती त्या गवतात गेली असावी हे कळल्यावरही मी तिचा नवरा असून तिला शोधायला तिच्यामागे गेलो नाही. मला अपराधी वाटलं.

"सुहासी. रात्री उठून तू तिथे गेली होतीस? बरं आहे ना तुला? अंधारात कुठे घुसलीस माळावर? तोंडचं पाणी पळवलंस माझ्या. खबरदार पुन्हा तिथे गेलीस तर. तिथे काहीतरी विचित्र आहे. त्या गवताच्या आसपासही फिरकू नकोस. " मी तिच्या अंगावर ओरडत होतो.
"हो, तिथे काहीतरी आहे. " ती भारावल्यागत बोलत होती.
"काय आहे? तुला काही दिसलं आहे का? " मी तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेऊन विचारलं तसं तिने नकारार्थी मान हलवली आणि हात सोडवून घेतले.
"आई गं! सुहासी तुझी नखं किती वाढली आहेत. " हात सोडवताना सुहासीच्या नखाने माझ्या हातावर भलामोठा ओरखडा उमटवला होता. "काप ती. लागलं मला. "

"उद्या सकाळी कापेन हं! " शांत आवाजात म्हणाली आणि मला एकट्याला तिथे सोडून काहीच न घडल्यासारखी बेडरूममध्ये झोपायला गेली. या प्रकरणावर आता वेळ काढून उपयोगाचे नव्हते. लवकरात लवकर या माळरानाचे रहस्य माहित करून घ्यायला हवं. मी सुहासीच्या मागोमाग बेडरूममध्ये गेलो. ती आपले पाय जवळ घेऊन झोपली होती. मला थोडंसं विचित्र वाटलं पण मी तिच्या अंगावर चादर घातली आणि झोपी गेलो.

दोन दिवसांचं सांगून रंगराव गेला होता तो ४-५ दिवस झाले तरी परतला नव्हता. त्याच्या भरवशावर राहणे उपयोगाचे नव्हते. मी धरणावर गेल्यागेल्या कामाला येणार्‍या काहीजणांकडे चौकशी करायला सुरुवात केली. पण त्यातून विशेष काही कळलं नाही. तशीही पोटापाण्यासाठी बांधकामावर आलेली माणसं होती ती. त्यांना कामधाम, पोट आणि पोरंबाळं यातून उसंतच नव्हती. एकंदरीत या विषयाविषयी औदासीन्य होतं. गावात माझ्या कोणाशी फारशा घनिष्ठ ओळखीही नव्हत्या. हणम्या गावातला होता त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यातल्या त्यात जास्त माहिती कळली. त्याच्या बोलण्यातून कळलं की दीड-दोन वर्षांपूर्वी गावात बरीच बेवारशी कुत्री झाली होती. या कुत्र्यांची पिडा टाळण्यासाठी काही टारगट पोरांनी कुत्र्यांना पकडून, गोणात घालून या माळावर आणून, त्यांच्या शेपटीला फटाके बांधून त्यांना माळाच्या दिशेने गवतात सोडून देण्याचा चंग बांधला होता. हे असं महिनाभर तरी चाललं होतं. त्यानंतर गावातली बेवारशी कुत्री बरीच कमी झाली. गावकर्‍यांनी सुटकेचे निःश्वासच सोडले.

सुमारे ६ महिन्यांपूर्वी सावत्याचा मुलगा; तो ही याच टारगट पोरांतला. एके दिवशी बापाशी कडाक्याचं भांडण केलं आणि बापाने घराबाहेर काढला. रागारागात शिव्या घालत त्याला काही लोकांनी माळावर जाताना पाहिलं. कोणी म्हणतं तो घरातून चोरी करून बापाला तुरी देऊन पळाला. कोणी म्हणतं त्याला शहरात पाहिला तर कोणी म्हणतं तो त्या गवतात खपला. गायब झाला. पोरगा काही पुन्हा घरी परतला नाही. त्याचं काय झालं त्याची काळजी खुद्द सावत्यालाही नव्हती आणि हे सर्व सांगताना हणम्याच्या आवाजातही कसली काळजी नव्हती. मी विचारतो आहे म्हणून तो सांगत होता झालं. माझं मन मात्र शंकेने ग्रासलं होतं. हणम्या सांगतो तेवढाच इतिहास या माळरानाला नसावा. सुहासीला या माळरानाच्या वेडापासून दूर करणं अतिशय गरजेचं होतं.

मी संध्याकाळी घरी परतलो तेव्हा ऊनं उतरत आली होती. आज घरी गेल्यावर सुहासीला समजवून सांगायचं, तिला थांबवायचं, या वेडापासून परावृत्त करायचं अशी खूणगाठ मनाशी बांधूनच घरात शिरलो. नेहमीप्रमाणे घरात सामसूम होती.
मी थेट स्वयंपाकघरापाशी गेलो. मागचा दरवाजा उघडा होता आणि कुंपणाचं फाटकही. मी समजायचं ते समजलो आणि मागचा पुढचा जराही विचार न करता सरळ फाटकातून बाहेर पडून समोरच्या गवतात घुसलो. गवत दाट होतं. मी जसजसा पुढे जात होतो तस तसं ते अधिकच दाट आणि उंच होत होतं. त्यातून वाट काढत जाणं जिकिरीचं होतं. मी कुठल्या दिशेने जातो आहे तेच मला कळत नव्हतं. गवत आता पुरुषभर उंचीचं तरी होती. मी सुहासीला हाका मारायला लागलो पण त्या गवतात त्या हाका विरून गेल्यासारख्या वाटत होत्या.

अचानक गवताची सळसळ सुरू झाली. जणूकाही त्या गवताला मी आल्याची जाणीव झाली होती. माझी छाती धडधडत होती पण तरीही मी वेड्यासारखा सुहासीला शोधत होतो. दिशेचं भान मला राहिलं नव्हतं. गवत तर इतकं उंच, इतकं दाट झालं होतं की त्यातून सूर्यप्रकाशही शिरणं कठीण होत होतं. मला त्या गवतात गुदमरल्यासारखं होऊ लागलं.

"सुहाऽऽऽसी” मी जिवाच्या आकांताने ओरडायचा प्रयत्न केला पण माझा आवाज आतच विरला. त्या दाट गवतात मी घुसमटत होतो. मागे काहीतरी सर्रकन आवाज झाला. कुठला तरी प्राणी आसपास असावा. मी मागे वळून पाहिलं तर कुणीच नव्हतं. "सुहाऽसी" मी आणखी एकदा आवाज दिला आणि पुढे सरकलो.

कुणीतरी माझ्यामागून दबकत, खुरडत येतं आहे अशी जाणीव मला व्हायला लागली. मी वळून वळूनबघत होतो पण आजूबाजूला गवतच गवत दिसत होतं. माझ्या मनात अभद्र विचार येऊ लागले. णा कुत्र्याकोल्ह्यांनी माझ्या सुहासीचं काही केलं तर नसेल. किती नाजूक आहे ती. तिच्या त्या सुरेख शरीराचे त्या कुत्र्यांनी चावे, तिचे लचके... त्या विचारांनीसुद्धा अंगावर शहारा आला. माझ्या मागच्या खुरडण्याचा आवाज अगदी जवळ आला होता. मागे वळून पाहायची माझी हिंमतही झाली नाही. मी वेगाने वाट मिळेल तिथे धावू लागलो. किती वेळ मी त्या माळावर भरकटत होतो देव जाणे पण अचानक गवत विरळ झाल्यासारखं भासलं. गवताच्या पात्यांतून मला घराचं कुंपण दिसलं आणि मी हायसं वाटून श्वास घेण्यासाठी क्षणभर थांबलो. मागचा आवाज पुन्हा एकदा जवळ आला होता. मी धीराने मागे वळून पाहिलं – बाहेर अंधारून आलं होतं पण चंद्राच्या प्रकाशात सर्व स्पष्ट दिसत होतं. त्या गवतात सुहासी एखाद्या भुकेजल्या श्वापदासारखी हातापायांवर दबा धरून बसली होती. तिच्या हाताचे पंजे जनावरासारखे जमिनीत रुतले होते. छाती धपापत होती. माझ्याकडे बघून ती दात विचकत होती. तिच्या तोंडातून जीभ बाहेर आली होती आणि त्यातून लाळ गळत होती. तिचे विस्कटलेले केस चेहर्‍यावर चिकटले होते. त्यातून तिचे ते चमकदार हिंस्र डोळे चकाकत होते. त्यांत मनुष्यासारखी कोणतीही जाणीव नव्हती की तिला माझी ओळख आहे असं दिसत नव्हतं. क्षणभर माझ्या मनात किळस दाटून आली आणि तोंडातून अस्फुट किंकाळी फुटली. ती सावध श्वापदासारखी माझ्यावर गुरगुरली आणि पुढल्या क्षणाला मी घराच्या दिशेने धाव घेतली. कुंपण पार करून मी फाटक लावून घेतलं आणि तिथेच थोडावेळ रेंगाळलो. सुहासी गवताबाहेर आली नाही. गवतात खसफस आवाज येत होता. सुहासी माघारी फिरली होती.

माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं. मी खिसा चापापला. बाइकची चावी खिशातच होती. मी थेट पुढल्या अंगणात आलो, बाइक काढली आणि पोलिस स्टेशन गाठलं.

“साहेब नाहीयेत. तालुक्याच्या गावाला गेल्येत. उद्या येणार. काय कंप्लेंट आहे? ” हवालदाराने डोकं वर करायची तसदीही घेतली नाही.
“मी पुलाच्या साईटवर चीफ इंजिनिअर आहे. माझी बायको आज संध्याकाळपासून बेपत्ता आहे. मी दुपारी जेवायला घरी आलो तेव्हा ती होती पण संध्याकाळी घरी आलो तर ती नव्हती. तिचा पत्ता नाही. ” मी चक्क खोटं बोलत होतो.
हवालदाराने माझ्याकडे रोखून पाहिलं. “नाव काय तुमचं? बायकोशी भांडण झालं होतं का? कुठे गावात गेली असेल. आताशी ९ वाजतायत रात्रीचे. थोडावेळ वाट बघा. कुठे गेली असेल तर येईल परत.” काय घाबरट माणूस आहे असे भाव त्या हवालदाराच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

"नाही हो. आमची गावात फारशी ओळख नाही. ती कुठे जाणार नाही. " त्या माळरानाचा प्रकार हवालदाराच्या कानावर घालावा की न घालावा तेच मला कळत नव्हते. "तुम्ही आमच्या घराच्या आजूबाजूचा भाग शोधून बघा प्लीज. "

"ते आता शक्य नाही. साहेब आणि बरोबर दोन हवालदार एका केसच्या कामानिमित्त शहरात गेले आहेत. ते उद्या पहाटे परततील. आम्ही इथे दोघेच आहोत आज. उद्या सकाळी बघू. आता तुम्ही कंप्लेंट लिहा आणि घरी जा. आम्ही उद्या सकाळी हजर होतो." मी बरीच गयावया केली पण हवालदार काही बधला नाही.

मी घरी परतलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते. सुहासीशिवाय घर खायला उठत होतं. मी पलंगावर जाऊन कोसळलो. डोळे भरून आले होते. डोके भणभणत होते. ती मागे त्या गवतात एकटी... मी तिचा नवरा होतो. तिची साथ देण्याची शपथ घेतली होती पण तिला एकटीला तिथे सोडून आलो होतो. तिचं ते अमानवी, अभद्र रूप सारखं डोळ्यासमोर येत होतं. काय झालं होतं तिला? काय होतं त्या माळरानावर?... एखादी पाशवी शक्ती की एक वेगळं जग? मला जे दिसलं तसं काही तिलाही दिसलं होतं का? की आमच्या जाणीवा वेगळ्या होत्या? तिला तिथे काही वेगळं दिसलं होतं तर ती बोलली का नाही? विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. मी इतका थकललो होतो की माझा डोळा कधी लागला तेच कळलं नाही.


सकाळी कुणीतरी दरवाजा ठोठावत होतं. मी खडबडून जागा झालो. घड्याळात पाहिलं. सकाळचे साडेआठ वाजले होते. मी इतका वेळ कसा झोपलो? सुहासीशिवाय... ती रात्रभर त्या गवतात... मला लाज वाटली. पुन्हा कुणीतरी दरवाजा ठोठावला तसा मी भानावर आलो.

बाहेर इन्स्पेक्टर आणि पोलीस पार्टी उभी होती. इन्स्पेक्टरने सुहासीची चौकशी केली आणि पुन्हा नव्याने सर्व सवाल जवाब केले. मी त्यांना सुहासी मागच्या गवतात हरवली असेल, माळावर रस्ता चुकली असेल अशी शंका बोलून दाखवली. इन्स्पेक्टरना त्यावर फारसा विश्वास वाटला नाही पण ते स्वत: पोलीसपार्टीसह माळावर गेले. माझा जीव घशाशी गोळा झाला होता. काय मिळेल त्यांना तिथे? पशुवत सुहासी की माझी सुहासी... ती जिवंत तरी असेल का? तासाभराने पोलिस पार्टी हात हलवत घरात परतली. त्यांनी सर्व घर उलथेपालथे केले. वासकावासकी करतानाच इन्स्पेक्टरने माझ्यावर प्रश्नांची पुन्हा सरबत्ती केली. मला कळून चुकलं होतं की पोलिसांचा संशय माझ्यावरच आहे. उत्तरे देताना मी गोंधळलो होतो, गांगरून गेलो होतो. जे सत्य होतं, जे मी अनुभवलं होतं आणि स्वत:च्या डोळ्यांनी मी जे पाहिले होतं ते त्यांना सांगू शकत नव्हतो; त्यांनी मला वेड्यात काढला असता. बराच वेळ चौकशी करून आणि बाहेर एक हवालदार उभा करून पोलिस पार्टी परत गेली. ते लवकरच परततील याची मला खात्री होती... माझे अटक वॉरंट घेऊन पोलिस पुन्हा दारात हजर होणार होते. मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्या हातात काहीही पुरावे नव्हते.

मी पुरता खचलो होतो. सुहासी गेली. माझं काय होणार? अब्रूचे धिंडवडे निघणार. अटक टळणार नाही. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. सुहासीच्या आईवडीलांना काय सांगायचं? माझ्या आईवडीलांना काय सांगायचं? तिचं ते माळावरचं अमानवी रूप राहून राहून डोळ्यासमोर येत होतं. मी त्या स्थितीत तिला एकटीला टाकून आलो.... मी अस्वस्थपणे येरझारा घालत होतो. दोन मिनिटं सोफ्यावर विसावलो तेव्हा माझं लक्ष अचानक माझ्या हातांकडे गेलं. माझी व्यवस्थित कापलेली नखं एकदम अचानक वाढलेली दिसत होती. अणकुचीदार.. एखाद्या श्वापदासारखी. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. समोर मार्ग दिसू लागला.

मी तडक स्वयंपाकघरात गेलो आणि मागची खिडकी उघडली. बाहेर कुंपणा पलीकडे गवत वार्‍यावर फेर धरून डोलत होतं. संथ, एका लयीत. एका नादात. मी स्तब्ध होऊन त्या गवताकडे बघत होतो. हळूहळू माळरानाचा आकार मोठा होऊ लागला, गवत आता डोळ्यांत मावत नव्हतं. त्याची सळसळ मला खुणावत होती. जवळ बोलावत होती. मनाला खूप बरं वाटलं...मी मागचा दरवाजा उघडला आणि माळाकडे धाव घेतली.

समाप्त

Wednesday, June 16, 2010

ठेव

लाल दिवा लुकलुकत होता. स्मिताने प्ले बटण दाबलं तसा अंजूचा आवाज घरात घुमला.

"अजून आली नाहीस का गं? मला वाटलं घरी पोहोचली असशील म्हणून फोन केला होता. परवाही केला होता पण तेव्हाही नाही भेटलीस. इतक्यात पोहोचलीस तर फोन कर, मी वाट बघते....खट्ट"

स्मिताने क्षणभर डोळे मिटले. 'नको आता नकोच फोन करायला. नंतर करेन सावकाश. काहीतरी कारण सांगेन. आधीच उशीर झाला आहे, डोकं कावलं आहे आणि त्यात अंजूने नानाकाकांचा विषय सुरु केला तर... नकोच!'

गॅसवर तिने चहाच आधण चढवलं आणि ती तोंड धुवायला वॉशबेसिनपाशी गेली. 'नानाकाकांबद्दल सांगायला हवं अंजूला. आई म्हणत होती की कानावर घाल तिच्या... पण नुसतं सांगून प्रश्न सुटणार आहे का?' स्मिताने चेहर्‍याला खसाखसा साबण लावला. 'इथे लांब राहून फक्त चिंता करत रहायच्या. विषय उगाळत राहायचे आणि डोळ्यातून पाणी काढायचं. पटकन जाऊन पाहून यावं म्हणायला मुंबई काही तासाभरावर नाही.' स्मिताने पाण्याचा हबका तोंडावर मारला आणि टॉवेलमध्ये चेहरा लपवला.

----



अंजू तिची लहानपणापासून जिवाभावाची मैत्रिण. दोघी एकाच वयाच्या, एकाच इमारतीत राहणार्‍या, एकाच शाळेत आणि दहावीपर्यंत एकाच वर्गात होत्या. अभ्यास, खेळ, क्लास, खरेदी सगळीकडे दोघींची जोडी एकत्रच असे. जेवा-खायलाही अंजू अनेकदा स्मिताकडे असे पण त्यामानाने स्मिताचा अंजूच्या घरातला वावर कमी होता. कारण नानाकाका. अंजूच्या वडिलांचा करडा स्वभाव, माणूसघाणेपणा आणि कडक शिस्त हा सर्वांच्या नावडीचा विषय होता.

नानाकाका गरीबीत वाढलेले. त्यांचे वडिल लहानपणीच अपघातात गेले. नानांच्या आईने पोटाला चिमटा घेऊन इंटरपर्यंत त्यांना कसेबसे शिकवले. इंटरनंतर नाना नोकरीला लागले. नानांच्या मागे लग्नाची बहिण होती. एक धाकटा भाऊ होता. घरातल्यांचं करता करता नाना अबोल होऊन गेले. काटकसरीने राहण्यासाठी त्यांनी अंगाला शिस्त लावून घेतलीच पण स्वभावात तुसडेपणा शिरल्याचं त्यांच्या गावीही आले नाही. यथावकाश बहिणीचे लग्न आणि भावाचे शिक्षण त्यांनी करून दिले. नानांचेही लग्न झाले. रमाकाकूंनी नानांचा स्वभाव लवकरच ओळखला असावा. इतरवेळेस बोलक्या असणार्‍या गपिष्ट रमाकाकू नानांच्या समोर दबकून राहायच्या. घरातला नानांचा एकाधिकार मुलांच्याही अंगवळणी पडला होता. अंजू स्वभावाने गरीबच पण धाकट्या अमितलाही नानांनी जरबेत ठेवले होते. काही मोजके मित्र सोडता नाना कोणाशी हसूनखेळून बोलल्याचेही आठवत नव्हते. नोकरीत मात्र नाना हुशार आणि कामसू म्हणून ओळखले जात आणि शिक्षण कमी असले तरी जम बसवून होते.

दहावीनंतर अंजूने कॉमर्सला जावे असा निर्णय नानांनी घेतला. अंजूचे परीक्षेतले गुण बघता तिला सायन्सला प्रवेश सहज मिळाला असता परंतु "दोघांचे खर्च जमणार नाहीत. तू हुशार आहेस. कॉमर्सला गेलीस तरी तुझं अडणार नाही. तुझ्या शिक्षणाचा खर्च मला द्यावा लागणार नाही. अमितची शिक्षणातली बाजू लंगडी आहे; त्याला पैशांची मदत लागली तर आमच्या म्हातारपणाची ठेव म्हणून त्याला शिकवण्याकडे लक्ष अधिक द्यावे लागेल. तुझे लग्न झाले की तुझ्याकडून आम्ही अपेक्षा करू शकत नाही. तो मुलगा आहे. त्याला आता शिकवू, चांगले ठेवू तर तो आम्हाला म्हातारपणी बघेल." अशी अनेक कारणे देऊन अंजूला नानांनी कॉमर्सकडे जाण्याची गळ घातली. अंजू खट्टू झाली पण नानाकाकांना विरोध करण्याचं बळ तिच्याकडे आणि रमाकाकूंकडे नव्हतं.

बी.कॉम. झाल्यावर पुढे शिकण्याचीही अंजूची इच्छा होती पण नानांनी परस्पर आपल्या मित्राच्या पुतण्याशी तिचे लग्न करून देण्याचा घाट घातला होता. संजय अमेरिकेत होता. त्याच्या घरच्यांना त्याचे लग्न लवकर उरकून टाकायचे होते. रूपाने देखणी अंजू त्यांना पसंत होती. अंजूची मात्र इतक्या लांब लग्न करून जाण्याची इच्छा नव्हती. रमाकाकूही पोरीला इतक्या लांब पाठवायला तयार नव्हत्या. 'तिला अद्याप शिकू द्या. लहान आहे ती तशी.' असे त्यांनी सुचवूनही पाहिले पण नानांना अंजूच्या शिक्षणाच्या बाबतीत झालेली हयगय भरून काढायची होती. त्यांनी अंजूला समजावले की 'तिच्या शिक्षणाच्या बाबतीत ते कमी पडले असले तरी अमेरिकेचे स्थळामुळे ती जन्मभर सुखी राहील. भविष्यात कसलीही अडचण येणार नाही.' नानांनी अमितच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च करून त्याला इंजिनिअरींगला पाठवले होते. त्याच्या अभ्यासाचा, हॉस्टेलचा खर्च भागवून अंजूचे लग्न धूमधडाक्यात लावून देणे त्यांना जमणार नव्हते. संजयच्या घरच्यांची मोठ्या लग्नाची अपेक्षा नव्हती. मुलगा लहान सुट्टीवर येथे येणार आहे, चटकन लग्न उरकून टाकायचे म्हणत होते. सर्वकाही नानांच्या पथ्यावर होते. त्यांनी अंजू आणि रमाकाकूंना न जुमानता लग्नाची बोलणी करून टाकली.

लग्न होऊन अंजू अमेरिकेला गेली तरी स्मिताला तिची नियमित पत्रे येत. संजयने अंजूला स्वतःहून पुढे शिकण्याची गळ घातली होती. अंजूची त्याला अर्थातच आनंदाने तयारी होती. आपले नवे आयुष्य, शिक्षण वगैरे यांत ती चटकन रमून गेली. आपल्या वडिलांनी आपल्यावर अन्याय केला आहे ही खंत तिच्या मनातून गेली नसावी. पत्रांतून स्मिताकडे अंजूला मन मोकळं करता येत होतं. नानांच्या अरेरावीने आपण आयुष्यात मागे पडलो ही उणीव तिला भरून काढायची होती. घरी ती अभावानेच पत्र लिहित असे किंवा फोन करत असे. केलाच तर रमाकाकूंची चौकशी करे. त्यांच्याशी बोलत असे. रमाकाकू तिला कधीतरी भारतात ये म्हणून सांगत पण ती ऐकून कानाआड करत असे.

स्मिताचे यथावकाश लग्न झाले आणि लग्नानंतर दोन वर्षांत सुधीरनेही आपले बस्तान अमेरिकेला हलवले. मधल्या वर्षांत अंजूने आपले शिक्षण पूर्ण केले, अमेरिकेत नोकरी धरली, तिला मुलगा झाला. दरवेळेस कसले ना कसले कारण पुढे करून ती भारतात येण्याचे टाळत गेली. अमितच्या लग्नालाही तिने सुट्टी मिळत नाही हे कारण सांगून टाळले. रमाकाकूंना या गोष्टीचा विलक्षण त्रास होत असे पण त्या बोलून दाखवत नसत.

दरम्यान, नानाकाका रिटायर झाले. त्यांना इतक्या वर्षांच्या नोकरीचा उत्तम फंड मिळाला. गावाकडली जमिनही त्यांनी विकली होती, त्याचे चांगले पैसे मिळाले होते. एकंदरीत रिटायर झाले तरी त्यांची परिस्थिती उत्तम होती. परंतु, नानांच्या स्वभावात झालेला बदल सर्वांना जाणवण्यासारखा होता. नानांच्या हेकट आणि माणूसघाण्या स्वभावाला अचानक मुरड पडल्यासारखी दिसत होती. घरातल्या सर्व गोष्टींत त्यांनी आपला अधिकार गाजवणे कमी केले होते. अमितशी आणि त्याच्या बायकोशी ते मिसळून राहण्याचा प्रयत्न करत. नातेवाईकांकडे येणेजाणे त्यांना पूर्वी आवडत नसे परंतु काही मोजक्या नातेवाईकांकडे रमाकाकूंबरोबर येणे-जाणे त्यांनी सुरू केले होते. अंजूचा फोन आला तर मागून घेत. तिच्याशी, जावयाशी, नातवाशी बोलत. तिने भारतवारी करावी म्हणून गळ घालत.

रमाकाकू सोडून सर्वांना नानांच्या बदललेल्या स्वभावाचं आश्चर्य वाटे. रमाकाकू याविषयी बोलताना स्मिताच्या आईला एकदा म्हणाल्या, "जोपर्यंत नोकरी असते तोपर्यंत गुर्मी असते. पुरुष रिटायर झाला की त्याला विचारपूस करणार्‍या माणसांची गरज लागते. बदल झाला आहे ते बरेच झाले. मी म्हणून अशा स्वभावाला दबून राहीले. सून ऐकून घेईल का? त्यांनाच ते जाणवत असेल म्हणून बदलले म्हणायचे."

नानांच्या बदललेल्या स्वभावामुळे अंजूच्या मनातली अढीही कमी झाल्यासारखं स्मिताला वाटत होती. अनेक वर्षांनी अंजूने भारतवारी केली. आजी आजोबांनी नातवाला पाहिलेही नव्हते. दोघांचे खूप कोडकौतुक नानांनी केले. अंजू फोनवर स्मिताकडे पूर्वीपेक्षा दिलखुलासपणे नानांचे नाव घेई. नानांबद्दल तिच्या बोलण्यातला विशादही ओसरल्यासारखा वाटत होता.

"बरं झालं बाई. इतक्या वर्षांनी का होईना पण रमाकाकू आणि अंजू दोघी आनंदी आहेत ना, मग झालं तर!" स्मिताची आई म्हणालीही. परंतु, आनंद फार कमी काळ टिकतो म्हणतात.

नानाकाकांना एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली पण गादीवरून उठता येईना. अमितने आणि त्याच्या बायकोने धावाधाव केली म्हणून अनर्थ टळला. नानांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला होता. शरीराची एक बाजू लुळी पडली आणि वाचेवरही परिणाम झाला. जन्मभर वाघासारख्या वागलेल्या माणसाची अशी दयनीय अवस्था पाहणे सर्वांनाच कठिण होत होते. रमाकाकू होत्या म्हणून सर्व निस्तरत होते तरी अमितला आजारी बापाचे लोढणे दिवसेंदिवस नकोसे होत चालले होते.

"म्हातारपणी मुलगा सांभाळेल म्हणून मला शिकू दिलं नाही नानांनी. त्याला शिकवलं. त्याची परिस्थिती चांगली झाली तर तो म्हातारपणाची ठेव बनेल म्हणून. आई सांगत होती की अमित त्यांच्या तोंडावर म्हणतो की 'अशा परिस्थितीत अजून किती वर्षे सांभाळायचे तुम्हाला? आमची कामेधामे सोडून नाही बघता येत तुमच्याकडे.' वाचा गेली आहे नानांची. ऐकू येतंय त्यांना अद्याप. जातील तर बरे होईल. सुटतील सगळेच पण मृत्यू असे सांगून येत नाहीत." नानांबद्दल बोलताना एके दिवशी अंजू म्हणाली.

नियतीही विचित्र असते. नानांची अशी तीन वर्षे सेवा करून रमाकाकू अचानक फ्लूचे निमित्त होऊन गेल्या. धडधाकट होत्या; त्या जातील अशी कोणालाच कल्पना नव्हती पण होणारं टळत नसतं. सगळंच त्रांगडं झालं होतं. अंजू तातडीने भारतात गेली. काकूंचे दिवस होण्याआधीच अमितने विषयाला तोंड फोडले. नानांची जबाबदारी फक्त त्याच्या खांद्यावर पडत होती ते त्याला मान्य नव्हते. "तू अमेरिकेत राहणार आणि आईबापांच्या खस्ता इथे राहून मी काढायच्या. खर्च, सेवा आणि त्रास फक्त माझ्या नशिबी." अंजूने ऐकून घेतलं. तसंही, त्या परिस्थितीत दुसरं काय जमणार होतं? नानांची काळजी घ्यायला एक गडी निश्चित केला. त्याचा पगार अंजूने द्यायचे असे ठरवले. जातेवेळी अंजू नानांचा निरोप घ्यायला गेली तशी नानांनी तिचा हात गच्च धरून ठेवला आणि लहान मुलासारखे गलबलून रडले.

परत आल्यावर अंजूला नानांच्या तब्येतीची सतत टोचणी लागून असे. घरी फोन केला तर अमितच्या आणि त्याच्या बायकोच्या फक्त तक्रारी ऐकून घ्याव्या लागत. अंजूने काही सुचवले तर त्या दोघांना पटत नसे. कधीतरी अंजूने नानांशी बोलण्याची इच्छा दाखवली तर नाना कानाला फोन लावत पण पलिकडे अंजूला फक्त रडण्याचा आवाज येई. स्मिताकडे मन मोकळं केलं की अंजूला तेवढंच बरं वाटे.

----


चहा उकळायला लागला तशी स्मिता भानावर आली. कप हातात घेऊन ती डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर टेकली. चहाच्या कडक घोटाबरोबर तरतरी आल्यासारखे वाटले. आई मध्यंतरी सांगत होती.

अमितच्या बायकोने नानांची रवानगी फ्लॅटमधल्या बंद बाल्कनीमध्ये केली होती. बाल्कनी काचा लावून बंद केली तरी काचेतून इमारतीतल्या सर्वांना नानांची शोचनिय परिस्थिती दिसत होती. घराच्या मालकाची अशी परिस्थिती पाहून लोकांना विशाद वाटत होता पण मध्यात कोण पडेल म्हणून सर्व गप्प होते. उगीच अंजूला त्रास का म्हणून स्मिता हे तिला बोललीच नव्हती. काल आईचा फोन होता...

"पावसाची झड आली होती आज. अमित आणि त्याची बायको दोघे ऑफिसला आणि तो गडीही मेला कुठेतरी गायब होता. बाल्कनीच्या खिडक्या उघड्या होत्या. भिजत होते गं नाना बिचारे. बघवलं नाही पण काय करू? दरवाजा वाजवला तर उघडायला होता कुठे तो गडी? गेला असेल गाव उंडारायला. तू सांग अंजूला. बघवत नाही नानांची दैन्यावस्था. कसंही का होईना, मुले आहेत. त्यांनी नाही बघायचं तर कुणी?"

'काय सांगायचं अंजूला? नेमकं काय करणार होती ती इथे बसून? पण सांगायला तर हवं. वडिल आहेत तिचे.'

स्मिताने अर्धवट प्यालेल्या चहाचा कप बाजूला सारला आणि फोनची बटणं दाबायला सुरुवात केली.

Friday, April 09, 2010

निरागस

झाली असतील या गोष्टीला आता १२-१३ वर्षे. गल्फचा कंटाळा आल्याने आम्ही मुंबई किंवा इतरत्र स्थायिक होण्याचे ठरवले तेव्हाची. सॉफ्टवेअर व्यवसायाची तेव्हा चलती असल्याने आम्हाला दोघांनाही सहज नव्या नोकर्‍या मिळून गेल्या. माझ्या ऑफिसात मराठी माणसे तशी कमीच, त्यामुळे आम्हा ४-५ जणांचा चांगलाच कंपू बनला होता. मी, माझ्या टीममध्ये असणारा संदेश, नेटवर्किंगमधला सुनील, लायब्ररीयन आणि ऍडमिनिस्ट्रेशन पाहणारी वैशाली, एच.आर.मध्ये माझ्यानंतर लागलेली माधवी आणि दुसर्‍या एका प्रोजेक्टवरचा सिनिअर डेवलपर राहुल. केवळ सहकारी न राहता एकमेकांच्या घरी-दारी येण्यापर्यंत आमची मैत्री घट्ट झाली होती. वेगवेगळ्या डिपार्टमेंटसमधली डोकी एकत्र आल्याने फावल्यावेळातला आमच्या डिटेक्टिवगिरीचा व्यवसायही झोकात होता. एक मात्र होतं की आमच्यातल्या गप्पा कधी बाहेर गेल्या नाहीत.

असाच एके दिवशी सकाळी राहुल एका मुलीला घेऊन पहिल्या मजल्यावर माझ्या क्यूबपाशी आला. काही माणसे आपल्याला पाहताक्षणीच आवडतात. सावळा तजेलदार रंग, पाणीदार डोळे, नाजूक जिवणी, ओठांच्या वरचा रेखासारखा एक गोंडस तीळ, शिडशीडीत, फॅशनेबल मुलगी चटकन डोळ्यांत भरणारी होती. लहानशीच दिसत होती. नुकतीच कॉलेजातून बाहेर पडली असावी. ऑफिसच्या वातावरणाला दबल्यासारखी वाटत होती.

"मीट माय फ्रेंड उर्मी, उर्मीला पटेल. शी'ज जॉईन्ड अस टूडे अँड उर्मीला मीट प्रियाली. उर्मी, सायरसबरोबर काम करणार आहे. माझ्या एका जवळच्या मित्राची मावसबहीण आहे. प्रियालीची वट आहे हं इथे! तुला काही हवं असल्यास बिनधास्त तिला गाठ. ही देखील माझी चांगली मैत्रिण आहे."

सवयीचं "वेलकम!" वगैरे झाल्यावर मी तिला हसत म्हटलं, "याचं काही ऐकू नकोस. माझी काही वट वगैरे नाहीये, उगीच लोक माझ्याबद्दल गैरसमज पसरवत असतात पण सायरसवर कधी फायरिंग करायचं असेल तर सांग. आपलाच बंदा आहे."

उर्मीलाने असिस्टंट प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटर म्हणून नोकरी पत्करली होती. सायरसला, आमच्या प्रोग्रॅम को-ऑर्डिनेटरला गेल्या काही दिवसांपासून व्याप वाढल्यामुळे एका असिस्टंटची गरज होती. सायरस खरास हा एक मस्त मनुष्य. मनमिळाऊ आणि हाडाचा गरीब. झुरळ पाहिलं तरी घाबरून पळत सुटेल असा. आम्ही त्याला मागून "वेडा बावा" म्हणायचो.

दुपारी सुनिल माझ्या डेस्कपाशी थबकला. "ए तू त्या उर्मीला भेटलीस का? आयटम आहे."
"ऑफिसात तरी तोंड सांभाळून बोलत जा रे." सुनिलच्या शर्टाची सर्व बटणे आज लावलेली आहेत हे लक्षात येत होते.
"राहुलच्या मित्राची मामेबहीण आहे असं कळलं."
"मला वाटतं तो मगाशी म्हणाला मावसबहीण." मी लगेच चूक सुधारून दिली.
"असेल."

संध्याकाळी ऑफिसातून बाहेर पडले आणि रेल्वे स्टेशनकडे जाणारी बस पकडली. सराईतांना बसमध्ये चढल्याचढल्या कोणत्या जागा रिकाम्या होणार आहेत हे चटकन कळतं. मला बूड टेकवायला जागा मिळाली आणि तेव्हाच मागून बसमध्ये चढणारी उर्मीही दिसली. गर्दीत स्वतःला सावरत कशीबशी उभी होती. तिच्या बाजूचा मळकट कपड्यांतला मनुष्य तिच्या अंगचटीला येत होता असं वाटलं. आमची नजरानजर झाली तशी ती ओशाळवाणं हसली.

'अगं! मोठ्यानं बोल की गधडे त्याला की बाजूला सरक म्हणून.' मी मनात म्हटलं पण मग लक्षात आलं की बहुधा असल्या प्रसंगांची तिला सवय नसावी.
"इथे ये. माझ्याजागेवर बस." मी तिला ओरडून सांगितलं. "हिम्मत है तो इधर आके कुछ करके दिखा उसको" त्या माणसाकडे पाहून मी ओरडले. आता बसमधली माणसं त्यांच्याकडे वळून बघू लागली तशी त्या माणसाने चालत्या बसमधून उतरून पोबारा केला.

"थँक्स हं! मला काय करावं हेच सुचत नव्हतं. किती किळसवाणी माणसं असतात नै."
"अगं असे महाभाग रोजच भेटतात. त्यांचा फाजीलपणा तेवढ्यापुरताच असतो. अंगात काही धमक नसते. आपण आवाज चढवला की काम होतं. पाहिलंस ना कसा पळून गेला ते. यांचा फाजीलपणा असाच बाहेर काढायचा असतो."
"मला अनुभव नव्हता पण आता लक्षात ठेवेन."

हम्म! येशील हळूहळू अंड्यातून बाहेर येशील. रेल्वेचा ब्रिज चढताना मी तिला विचारले "तू कुठे राहतेस? सेंट्रल का वेस्टर्न?"
"वेस्टर्न, मालाडला."
"हो का? मीही मालाडलाच. लिबर्टी गार्डनजवळ."
"मीही लिबर्टी गार्डनजवळच राहते." मी तिला माझ्या इमारतीचे नाव सांगितले. ती माझ्यापासून दोन चार इमारती सोडून राहत होती.
"पण मी आधी कधी पाहिले नाही तुला." तिने विचारले.
"अगं आम्ही आताच आलो. हा फ्लॅट माझ्या बहिणीचा आहे. तात्पुरते राहतो आहोत. माझं घर बनतं आहे. बांधकाम झालं की आम्ही शिफ्ट होऊ. हा तुझा पहिलाच जॉब का गं?"
"अलमोस्ट! मी याच वर्षी बी. कॉम. झाले मग एके ठिकाणी दोन महिने काम केलं पण मला ना मल्टीनॅशनलमध्ये जॉब हवा होता. काहीही करून खूप मोठं व्हायचं आहे मला." तिच्या पाणीदार डोळ्यांत बरीच स्वप्नं तरळून गेल्यासारखी वाटली.
'निरागस आहे.' मी मनात म्हटलं.

-----


दोन-चार दिवसांनंतरची गोष्ट. उर्मीचा सकाळीच फोन आला.
"राहुल है क्या वहां?"
"नाही. इथे नाहीये."
"अजून कसा नाही आला? १० वाजत आले. तुझा मित्र आहे ना तो? तुला माहित आहे का?"
"आज मंगळवार ना! राहुल आणि वैशाली पहाटे ४ वाजल्यापासून सिद्धीविनायकाच्या रांगेत उभे असतात. आज उशीर झाला असावा."

दुपारी राहुल तणतणत आला. "तुला कोणी सांगितलं होतं त्या उर्मीला सांगायला की मी आणि वैशाली सिद्धिविनायकाच्या लायनीत उभे राहतो ते."
"का काय झालं? क्लासिफाईड इन्फो आहे का ती?"
"नाही पण तिला माझ्याबद्दल जास्त काही सांगत जाऊ नकोस."
"अरे पण तुझी मैत्रिण आहे ना ती. बरं! अरे तुला माहित्ये का? ती माझ्या घराशेजारीच राहते."
"मला माहित्ये पण तू तिच्यापासून चार हात लांब रहा."
"अं! का रे?"
"सांगेन मग कधीतरी." म्हणून राहुलने काढता पाय घेतला. राहुलचा हा विचित्रपणा पास-ऑन करणे आवश्यक होते. मी वेळ झाल्यावर वैशालीला त्याच्याबद्दल सांगितले.

"अय्या! गंमतच आहे." वैशाली उत्साहाने म्हणाली. "मलाही त्या उर्मीने दोन-चारदा फोन करून राहुलबद्दल विचारलं. मलाही विचारत होती - तुझा मित्र आहे ना तो. किती चांगला मित्र आहे वगैरे. मला वाटतं ती राहुलवर लाईन मारत असावी. गीतूला सांगायला हवं हं!"

गीतांजली ही राहुलची कॉलेजपासूनची गर्लफ्रेंड. दोघांचेही प्रकरण घरांत पसंत होते. दोघांना थोडे सेटल व्हायचे होते म्हणून लग्न झाले नव्हते इतकेच. पुढच्या महिन्यात साखरपुडा उरकून घ्यायचे ठरले होते. "फिरुन फिरुन थकले आणि लग्नाला लागले." असं संदेश म्हणायचा त्यांना.

"ती उर्मी लाईन मारते का रे तुझ्यावर?" संधी मिळाल्यावर आम्ही राहुलची थोडी खेचली.
"माहित नाही. तिला थोडं लांबच ठेवायला हवं. उगीच गळ्यात पडते आहे." राहुल रुक्षपणे म्हणाला.
"तूच आणलीस तिला. मी सांगू का रे गीतूला?" संदेशने आणखी थोडी खेचली.
"प्लीज. माझ्या आयांनो आणि बापांनो, तुम्ही त्या उर्मीपासून लांब रहा आणि कृपा करून गीतूला काही सांगू नका."
"हे बघ! उर्मी तुझ्या गळ्यात पडत असेल तर तू तिला स्पष्ट सांग की तुझं लग्न ठरलं आहे. ती आताच कॉलेजातून बाहेर पडली आहे. लहान आहे. तिला अद्याप पोच नसावी. मला तर ती अगदी निरागस वाटते."
"निरागस! माय फूट! तिचा विषय नको आता. तिला माझ्यापासून कटवायचं हे मात्र नक्की. तिला कसलीही माहिती देऊ नका आणि तुम्हीही लांब रहा. माझ्या मित्राची बहीण आहे ती. तिच्यामुळे माझे संबंध खराब होता कामा नयेत."
"ठीक आहे." आमचा करार वगैरे झाला.

काही दिवसांनी उर्मीचे चौकशीचे फोन बंद झाले. त्यावर आमचे चर्वितचर्वणही झाले. 'ऑल वेल! ब्याद टळली आहे असे दिसते.' असं संदेश म्हणाला. राहुलही निर्धास्त दिसला. उर्मीला ऑफिसात लागून आता तीन-चार महिने उलटले होते. ऑफिसातल्या अनेकांना तिचं आकर्षण वाटतंय हे सर्वांच्या लक्षात आले होते. तिच्या डेस्कपाशी घुटमळणारे, तिला लंचला बाहेर घेऊन जाणारे अनेक होते. राहुलच्या तंबीमुळे संदेश आणि सुनील सांभाळून होते. शिवाय राहुलच्या मित्राची बहीण असल्याचेही कारण असावे.

----


"सायरस माझ्याशी फटकून वागतो. अजिबात मदत करत नाही." उर्मी एक दिवस ट्रेनमध्ये बोलता बोलता म्हणाली. तशा तिच्या आणि माझ्या वेळा वेगळ्या होत्या पण कधीतरी गाठ पडतच असे.
"सायरस? आणि फटकून वागतो. काहीतरीच काय? त्याच्यासारखा गरीब मनुष्य ऑफिसमध्ये नाही."
"अगं खरंच!"
"बरं मला वेळ झाला की मी विचारेन त्याला सहज म्हणून."


मी आणि सायरस हॉलवेमध्ये काहीतरी बोलत होतो आणि समोरून राहुल येताना दिसला.
"केम छो बावा?" राहुलने त्याला खास पारशी हेल काढत विचारले.
"शाला तूने फसाया है मेरेको कैसा सॅम्पल लाया है यार?" राहुल ऐकून फिसकन हसला. हे वाक्य उर्मीसाठी आहे हे लक्षात येत होतं.
"अरे ती उर्मी सांगत होती मागे की तू तिला हेल्प करत नाहीस म्हणून." मी संधी मिळताच विचारलं.
"अरे येडी, हेल्प मेरेको चाहिये उसको क्या हेल्प? ये राहुलने बुरा फसाया है" काय झाले ते कळत नव्हते. सायरस घुश्श्यात दिसत होता आणि राहुल मजेत. ही ब्याद सायरसच्या गळ्यात पडू पाहते आहे का काय? मला उर्मी आवडत होती. तिच्यासारख्या मुलीने थोडं सांभाळून वागायला हवं असं वाटत होतं. तिच्याशी एकदा बोलून बघायला हवं.

-----


त्या दिवशी सकाळीच डेस्कवरचा फोन खणखणला. माधवी होती. लंचला सर्वांनी बाहेर जाऊया असं सांगत होती. काहीतरी जबरदस्त खबर होती तिच्याकडे. तशाही माधवीकडे बातम्या असायच्याच. कोणत्या डायरेक्टरने रिझाईन केले? कोणाला किती दिवसांची सुट्टी हवी आहे? कोणी कोणाची एच आर मध्ये तक्रार केली वगैरे वगैरे. चायनीज रेस्टॉरंटमध्ये जायचा बेत ठरला होता.

"एक सॉलिड खबर द्यायची आहे. तुमचा विश्वासही बसणार नाही. काल तो राकेश भाटिया उर्मीची चौकशी करत होता." माधवी उत्साहाने सांगत होती.
"राहुल, सायरस आणि आता राकेश. सही जा रही है बाप!" सुनिलने तोंड उघडलं.
"का रे? तुझा चान्स लागला नाही म्हणून जळतोस काय?" संदेशने नाक खुपसलं.
"तिला प्रेमात पडण्याची घाई असावी. राहुल वटलेला चेक, सायरस वेडा बावा तेव्हा आता राकेशची पाळी." वैशालीने आपली बोली लावली. माणसं गॉसिप करायला लागली की एक एक तर्क कुतर्क लढवू लागतात.
"ही काय सॉलिड खबर आहे का?" मी खट्टू होऊन विचारले.
"मला बोलू द्याल तर खबर कळेल ना. तुमची मुस्काटं आवळा मग सांगते." माधवी सरसावून म्हणाली, "राकेश बराच गोंधळलेला होता. उर्मीची चौकशी करत होता. थोडीशी पर्सनल."
"गटलेला दिसतो." इति संदेश.
"ऐक रे! उर्मीने म्हणे त्याला शुक्रवारी संध्याकाळी कुठेतरी बीचवर भेटायला बोलावलं आहे."
"कुठेतरी नाही. गोराईला असणार संध्याकाळी साडे सहाला." राहुलने पहिल्यांदाच तोंड उघडले.
"हो गोराईच म्हणत होता बहुतेक. तिथे म्हणे तिने बंगला बुक केला आहे दोन-तीन तासांसाठी. राकेश म्हणत होता की या आधीही ऑफिसातल्या एक दोन जणांना तिने अशी आमंत्रणे दिलेली आहेत. तो थोडासा टरकला होता. तक्रार अशी करत नव्हता पण एच आरच्या कानावर जावं असं त्याला वाटत होतं."

सायरस काय म्हणत होता, राहुल तिला का चुकवत होता त्याचा पत्ता आता लागत होता. बोंबला!

"तुला कसं कळलं गोराई? म्हणजे तू ही..... तुझ्या मित्राची बहीण आहे ना ती." माझी ट्यूबलाईट लख्ख पेटली होती.
"खीखीखी! माझ्या मित्राची कसली आली आहे बहीण. याहू चॅटवर भेटली होती."

च्यामारी! आणि ती आम्हाला विचारत असे की तुम्ही राहुलच्या मैत्रिणी ना!

***


(मूळ अनुभवातील पात्रे, स्थळ, प्रसंग बदलले आहेत.)

Sunday, December 20, 2009

टॅटू - एक कायमस्वरुपी शृंगार



"मला माझ्या दंडावर सिंहाचे तोंड गोंदवून घ्यायचे आहे. " काही वर्षांपूर्वी माझ्या एका मित्रवर्यांनी आपली इच्छा सहजच माझ्यासमोर मांडली.

"ईईईईव! हे काय भलतंच. नसती फ्याडं सुचतात एक एक. जंकी, ड्रगी, हिप्पी, फ्याशनच्या जगतातील काही बिघडलेले कलावंत यांच्याखेरीज कोणीही टॅटू लावत नाहीत. अमेरिकेत एखादे फ्याड निर्माण झाले की लग्गेच आपण त्याचे कित्ते गिरवायलाच हवेत, नाही का? आपल्या अंगावर काहीतरी कोरून घ्यायचे, त्याचे साइड इफेक्ट्स, इन्फेक्शन झाले तर पंचाईत. एडसचा बागुलबुवा आहेच वर. आपल्या कातडीत सुया टोचून रंग खुपसून घेण्याचा रानटीपणा आणि त्यातून काही वर्षांनी आपण कसला मूर्खपणा करून बसलो असे वाटले तर पश्चात्ताप करत बसायचं. तो टॅटू पुसून टाकणे इतके सोपेही नाही. " मी तोंड सोडले आणि त्या दटावणीमुळे बहुधा त्यांची इच्छा तिथेच विरून गेली आणि त्यांनी हलक्या सुरात केलेली तक्रारही.
"ठीक आहे नाही लावून घेत टॅटू पण ते जंकी, हिप्पींचे संदर्भ जरा चुकताहेत असे वाटत नाही का आणि आपल्याकडील लहान मुलांचे कान-नाक टोचण्याच्या रानटीपणाबद्दल काय वाटते? "


त्यानंतर अनेक वर्षे अनेक प्रसंगांतून हे टॅटू कोणत्यानं कोणत्या प्रसंगांतून डोळ्यासमोर येत राहिले. एखाद्या बाईच्या कपाळावर गोंदवलेली चंद्रकोर, हातावर गोंदवलेले हिरवट निळसर नाव, भटक्या जमातीतील स्त्रियांच्या हातावर आणि पायांवर गोंदवलेली नक्षी, दिवारमधल्या अमिताभच्या हातावरील "मेरा बाप चोर है।" हे गोंदवण, नाझी कॅंपमधील कैद्यांच्या हातावर गोंदवलेले क्रमांक, बेकहॅमचा हातावर कोरलेला देवनागरी लिपीतील व्हिक्टोरिया या बायकोच्या नावाचा टॅटू, ऍंजेलिना जोलीच्या पाठीवरील ख्मेर लिपीतील संस्कृत श्लोक, बेकहॅमचा कित्ता गिरवून सैफने हातावर कोरून घेतलेल्या करिनाच्या नावाच्या टॅटूची वदंता, मायकेल स्लेटरच्या छातीवरील ३५६ हा नंबर, हल्लीच आलेल्या गजीनीमधील अंगावर गोंदवून आपली स्मरणशक्ती काबूत ठेवण्याचा आमीरने अवलंबलेला मार्ग आणि रस्त्यावर, मॉलमध्ये, कार्यालयात दिसणाऱ्या असंख्य जनतेने अंगावर ल्यालेला हा कायमस्वरुपी शृंगार कधीना कधी नजरेस पडतोच. अगदी, आताच प्रकाशित झालेल्या डॅन ब्राऊनच्या "द लास्ट सिम्बॉल" या कथानकामध्येही टॅटूंना विशेष महत्त्व आहे.

टॅटूइंग किंवा गोंदवणे या कलेबद्दल टोकाचे विचार मांडणार्‍या अनेक व्यक्ती भेटतात. आपले अंग टोचून कायमस्वरुपी रंगवण्याविषयी नाराजी व्यक्त करणारी माझ्यासारखी माणसे किंवा टॅटू लावणे "कूल" आहे म्हणून दिमाखात आपल्या अंगावरचे गोंदवण मिरवणारे. या टॅटूंविषयी सामोआ या पॉलिनेशियन बेटावरील भाषेत एक म्हण आहे - एकवेळ तुमच्या शरीरावरील दागिना मोडून तुमची साथ सोडण्याचा संभव आहे पण गोंदवण तुमची साथ कबरीपर्यंत करेल.

लोकप्रिय किंवा पॉप संस्कृतीत अंगावर टॅटू गोंदवणे हे आत्मप्रकटनाचे किंवा स्वत:ला व्यक्त करण्याचे साधन समजले जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत शरीर रंगवण्याची ही कला अनेकांना भुरळ घालते. प्रदर्शने, आर्ट-गॅलरीज, संग्रहालये अशा अनेक माध्यमांतून गोंदवण्याच्या या कलेला प्रचंड प्रसिद्धी मिळालेली आहे. एखाद्यावरील आपल्या निःसीम प्रेमाची ग्वाही देण्यासाठी, जीवनात झालेले अचानक झालेले चांगले-वाईट बदल, प्रिय व्यक्तीचा विरह किंवा मृत्यू, ईश्वरावरील किंवा सुष्ट आणि दुष्ट शक्तींवरील श्रद्धा किंवा कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, दुष्ट किंवा तांत्रिक शक्तींपासून संरक्षण मिळावे म्हणून आणि अशा नानाविध घटना आणि कारणांना व्यक्त करण्यासाठी टॅटू हा एक मार्ग समजला जातो. या प्रक्रियेत वेदना सामावली असल्याने टॅटू हे शौर्य आणि धीराचे प्रतीक असल्याचेही मानले जाते. पाठीवर किंवा स्त्रियांच्या मानेमागे गोंदवलेले नाजूकसे फूल किंवा फुलपाखरू, पायाच्या घोट्यावर गोंदवलेले असेच एखादे नाजूकसे चिन्ह किंवा पुरुषांच्या दंडावर, छातीवर गोंदवलेले प्राण्यांच्या चेहऱ्यापासून ते ग्रीक आणि चिनी भाषेतील मुळाक्षरांपर्यंत चिन्हे वगैरे हे समोरच्याला आकर्षित करण्यासाठी करवून घेतलेले असतात. यांतील काही चिन्हांचा परामर्श लेखात पुढे घेऊच. गोळ्या आणि चॉकलेट्समधून मिळणारे टॅटूंचे तात्पुरते स्टिकर्स आणि या वेडाचा फायदा घेऊन च्युईंग गम किंवा फ्रूटबार खाऊन जिभेवर तात्पुरते टॅटू उमटवण्याचा प्रयोग यांतून टॅटूंची कला लहान मुलांतही प्रसिद्धी पावली आहे.

प्राचीन काळापासून शृंगाराचे मानवाला वेड असल्याचे अनेक पुरावे देता येतात. हस्तिदंती फण्या, अत्तराच्या आणि काजळाच्या कुप्या, सुगंधी तेले, लेप, रंग यासारख्या सौंदर्य खुलवणार्‍या साधनांचे आणि कायमस्वरुपी शारीरिक शृंगार म्हणता यावे असे कान, नाक किंवा शरीराचे इतर भाग टोचणे, अंग गोंदवणे यांचेही मानवाला आकर्षण असल्याचे सिद्ध झाले आहे. भारतात हातावर, पायांवर आणि शरीराच्या अन्य भागांवर मेंदीची नक्षी काढणे ही देखील टॅटूसदृश कला मानली जाते. शाईने गोंदवण्यासारखी ती कायमस्वरुपी नसते एवढेच. अन्यथा, परदेशांत मेंदीला इंडियन टॅटू या नावाने सर्रास संबोधले जाते. मेंदीच्या नक्षींचे डाय वापरून अंग रंगवण्याची कलाकुसरही प्रसिद्ध आहे. इजिप्त, लिबियापासून भारतापर्यंत सर्व प्रदेशांत गेली हजारो वर्षे धार्मिक, सांस्कृतिक कार्यांत मेंदी लावण्याची प्रथा जोपासलेली आहे. भारतात मेंदीला सौभाग्यलंकार मानले जाते.

नवपाषाणयुगातील सुमारे ५३०० वर्षांपूर्वी सापडलेल्या ऑत्झी या आदिमानवाच्या पाठीवर पट्ट्याप्रमाणे गोंदवलेल्या लहान रेषांचा समूह आणि पायांवर गोंदवलेली काही चिन्हे हे टॅटूचे जगातील सर्वात आद्य उदाहरण मानले जाते. इटली आणि ऑस्ट्रिया यांच्या सीमेवर आल्प्स पर्वतात सापडलेल्या या मृतदेहाच्या अंगावर मोजून ५७ गोंदवल्याच्या खुणा सापडल्या आहेत. या गोंदवणांचे ऑत्झीच्या शरीरावरील स्थान ऍक्युपंक्चर पॉईंटसपाशी असल्याने कदाचित शारीरिक उपचार म्हणूनही ही गोंदवणे केलेली असावीत असा एक मतप्रवाह दिसतो. प्राचीन इजिप्त आणि लिबियामध्ये सापडलेल्या ममींच्या शरीरांवरही गोंदवल्याच्या स्पष्ट खुणा दिसून येतात.

प्राचीन संस्कृतीत गोंदवून घेण्याची कारणे मात्र निराळी असावीत असा तर्क मांडला जातो. धार्मिक विधी म्हणून, ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी, एखादा ताईत किंवा मंत्र म्हणून, त्यागाच्या भावनेतून, आपण एका कबिल्याचे, जमातीचे आहोत हे ठसवून देण्यासाठी, गुलामांची-दास्यांची ओळख पटवण्यासाठी किंवा शिक्षा म्हणूनही अंग चिन्हांकित करण्याची प्रथा अस्तित्वात आली असावी.

टॅटू हा शब्द पाश्चिमात्य जगतात प्रथम आला तो पॉलिनेशियन बेटांमधील ताहिती येथील भाषेतून. कॅप्टन जेम्स कूक हा ब्रिटिश रॉयल नेव्ही मधील प्रसिद्ध नाविक होता. त्याने पॉलिनेशियन बेटांना दिलेल्या भेटींत अंग गोंदवलेली माणसे प्रथम पाहिली आणि इथूनच टॅटू हा शब्द आणि कला दोन्ही युरोपात शिरल्या. ताहितियन भाषेतील या शब्दाचा मूळ अर्थ फराटे मारणे असा होतो. इ. स. पूर्व १२०० पासून पॉलिनेशियन संस्कृतींमध्ये टॅटूंना स्थान असल्याचे दिसते. हाडे तासून त्याच्या सुया आणि काजळाचा वापर करून गोंदवण्याची प्रक्रिया केली जात असे. न्यूझीलंडमधील माओरी जमातीत तोंडावर गोंदवणे हे भाग्याचे लक्षण मानले जाते आणि गोंदवणावरून माणसाचे समाजातील स्थान ओळखण्याची पद्धत होती. मायन संस्कृतीत ईश्वराशी जवळीक साधण्यासाठी आणि धार्मिक रीतिरिवाज म्हणून गोंदवण्याची पद्धत होती. जपानमध्येही गोंदवण्याची कला फार प्राचीन समजली जाते आणि गोंदवण्याचे पहिले पुरावे इ. स. पूर्व ३००० मधील आढळतात.

ख्रिस्ताचा क्रूस, भळभळा वाहणारे हृदय, अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक चिन्हे, आद्याक्षरे, नावे आणि असे अनेक टॅटू प्रत्येकाने आजवर पाहिले असतील परंतु टॅटूंच्या या विविध नक्षींना अर्थ असतो किंवा त्यातून एखादी भावना व्यक्त केलेली असते. काही प्रसिद्ध नक्षींबद्दल थोडक्यात माहिती पाहू:

जहाजाचा नांगर: जहाजाचा नांगर हे सावधानतेचे आणि सुरक्षिततेचे निशाण मानले जाते. खलाशी आणि जहाजावरील इतर कर्मचार्‍यांच्या मते नांगर हे जहाजाला बुडण्यापासून वाचवणारे सुचिन्ह आहे.

फुलपाखरू: फुलपाखरू हे माणसाच्या आत्म्याशी संबंधीत असल्याचे मानले जाते. आनंद, तारुण्य व्यक्त करण्याचे चिन्ह म्हणूनही फुलपाखराचा वापर केला जातो.

गुलाब: हे निःसीम प्रेमाचे प्रतीक मानले जाते तसेच सौंदर्य आणि निकोपतेचे चिन्हही. प्रेमाची आणि सौंदर्याची रोमन देवता व्हीनस हिचे प्रतीक म्हणून गुलाबाचे गोंदवण केले जाते.

सर्प: साप आपली कात टाकून नवा जन्म धारण करतो या भावनेतून साप किंवा नाग यांचे गोंदवण हे अमरत्वाशी संबंधीत मानले जाते. साप हे शक्तीचे प्रतीकही मानले जाते.

सिंह: सिंह हा वनाचा राजा मानला गेल्याने सिंहाचे चिन्ह हे पुरुषत्वाचे, शौर्याचे, विजयाचे आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते.

मासा: मासा हे प्राचीन ख्रिश्चन संस्कृतीचे प्रतीक ख्रिस्ताशी संबंधीत असल्याने माशाच्या रेखाकृतीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे.

ड्रॅगन: मानवाला भीती वाटेल असे आग ओकणार्‍या किंवा पंख विस्तारलेल्या ड्रॅगनचे गोंदवण हे भीतीवर मात केल्याचे किंवा संकटातून पुढे जाण्याचे चिन्ह मानले जाते.

सूर्य, चंद्र, तारे: सिंहाप्रमाणेच सूर्य हे देखील पुरुषत्वाचे, शौर्य आणि विजयाचे प्रतीक मानले जाते तर चंद्रकलांचा वापर जीवनातील टप्पे दाखवण्यासाठी केला जातो आणि चांदण्या हे आशेचे आणि आत्मिक आनंदाचे प्रतीक मानले जाते.

अग्नी: अग्नी हे जीवनाचे प्रतीक मानले जाते. जीवनातील चांगल्या-वाईट क्षणांची आठवण म्हणून या गोंदवणाचा वापर होतो.

पक्षी: पक्षी हे प्रेमाचे, शांततेचे, ज्ञानाचे, आशेचे आणि आत्मसाक्षात्काराचे प्रतीक मानले जाते.

लहान-मोठ्यांपासून सर्वांना आकर्षित करणार्‍या या टॅटूंबरोबर आरोग्याची सुरक्षितता आणि त्यामागील धोक्यांचे आकलन हे अतिशय महत्त्वाचे आहे हे या ठिकाणी विसरून चालणार नाही. शरीरात किंवा त्वचेत सुया खुपसण्यातून अनेक त्वचारोग, टीबी, हेपॅटॅटिस आणि HIV ची आणि इतर रोगांची लागण होण्याची शक्यता असते . अमेरिकेत टॅटू स्टुडिओ उघडण्यासाठी विशेष परवानापत्र लागते तर सरकारमान्य नसलेल्या स्टुडियोंतून टॅटू लावून घेतल्यास त्या व्यक्तीस पुढील १२ महिन्यांपर्यंत रक्तदानाची मुभा नसते. टॅटू गोंदवणारी व्यक्ती कायद्याने सज्ञान असण्याची अट घातलेली आढळते किंवा काही वेळेस पालकांच्या परवानगीने टॅटू करवून घेता येतो. केवळ आरोग्यविषयक कारणांसाठीच नाही तर बर्‍याचदा असा वैयक्तिक निर्णय भविष्यात चुकीचा वाटू शकतो आणि म्हणून हा निर्णय घेताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.
गेल्या आठवड्यात एका मिटिंगमध्ये ग्रेग नावाचा एक अतिशय बुद्धिमान आणि कर्तबगार सहकारी प्रोजेक्टमधील काही महत्त्वांच्या घटकांवर समरसून चर्चा करत होता. कामाचे काही पेपर्स माझ्या दिशेने सरकवताना त्याच्या शर्टाची बाही थोडी वर सरकली आणि त्याच्या दंडावरील राखेतून जन्म घेणारा लाल-निळा फिनिक्स पक्षी माझी नजर वेधून गेला हे त्याच्या लक्षात आले.

“आय ऍम फिनिक्स,” ग्रेग मंद हसत कुजबुजला आणि एका लेखाचा जन्म झाला.

संदर्भ :
बॉडी पिअर्सिंग ऍंड टॅटूज - जे. डी. लॉयडद बॉडी आर्ट बुक - जीन-क्रिस मिलरटॅटू - इंग्रजी विकिपीडिया
चित्रे:
अँजेलिना जोली - http://www.chinadaily.com.cn/ येथून साभार.

गजीनीमधील आमीरचे चित्र -

ममीचे चित्र - http://www.smithsonianmag.com/ येथून साभार.

Saturday, October 31, 2009

गाठ माझ्याशी आहे - २

“आई बाबा, हे बघा काय आहे माझ्या खोलीत. ” रविवारचा दिवस होता. सकाळी शम्मी उठली आणि खोलीतूनच जान्हवी आणि सुधीरला हाका मारू लागली.
“काय गं? ” म्हणत सुधीर तिच्या खोलीत शिरला आणि आतलं दृश्य बघून चकित झाला. शम्मी पलंगावर उठून बसली होती आणि थरथरत होती. तिची खोली अस्ताव्यस्त होती. कपाटातले कपडे, पुस्तकं, तिचे खेळ खोलीभर पसरले होते पण सुधीरला जाणवले ते भिंतींवर खरडलेले शब्द. शम्मीच्या खोलीतल्या सर्व भिंतींवर कुणीतरी गिचमीड अक्षरांत "घर माझं आहे. " असं अनेकदा लिहून ठेवले होते.

“हे काय आहे? ” जान्हवी आत येत म्हणाली तशी शम्मी ताडकन उठून जान्हवीला बिलगली.
“मला नाही माहीत. मी नाही केलं. मी झोपले होते. मी नाही लिहिलं भिंतीवर. ” शम्मी थरथरत होती. जान्हवीने तिला आणखी जवळ ओढले आणि तिच्या लक्षात आले की शम्मीच्या हातावर काळे निळे वळ होते. जसे काही कोणाची तरी बोटे उमटली असावीत.

“हे काय आहे गं? हे वळ कसले? ” जान्हवीने काळजीने विचारलं.
“कसले वळ आई? मला नाही माहीत. ” शम्मीने आपल्या हातांकडे पाहिलं आणि ती मुसमुसायला लागली.
सुधीरने जान्हवीला इशारा केला तशी ती शम्मीला घेऊन खोलीबाहेर आली.
“तू राजवाडेकाकांना फोन करून विचारतेस का जान्हवी? ” एकांतात सुधीरने जान्हवीला प्रश्न केला. त्याने सर्वात आधी फोन करून आपल्या साईटवरच्या माणसाला बोलवून खोली ताबडतोब रंगवून घेतली होती.
“हो विचारते पण सुधीर या घरात काही वावगं नाही ना! ”
“हम्म! काय वावगं असणार? तू फोन करून विचार काकांना. ”

राजवाडेकाका, जान्हवीच्या बाबांचे जुने मित्र. मुरलेले मानसोपचारतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. मुंबईला त्यांची अनेक वर्षांची प्रॅक्टीस होती. आता वयोमानानुसार त्यांनी प्रॅक्टिस कमी केली असली तरी काही निवडक केसेस ते हाती घेत.

“काका, तुमचा सल्ला हवा होता. ” जान्हवीने तातडीने काकांना फोन लावला आणि घडला प्रकार सांगितला.

“वयांत येणार्‍या मुलांमध्ये अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात. या बदलांबाबत इतरांशी बोलावे, अडचणी सोडवून घ्याव्यात इतक्या समजूतदारपणाची अपेक्षा त्यांच्याकडून आपण करून घेऊ शकत नाही आणि मग या बदलांना तोंड वेगवेगळ्या प्रकारे फुटते. मुले या काळात मूडी बनतात, आई-वडिलांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतात, आपल्या मित्र-मैत्रिणींवर अधिक अवलंबून राहतात किंवा आपल्याकडे आईवडीलांचे लक्ष वेधून घेण्याचे नवीन मार्ग अवलंबतात. शम्मी कदाचित तुमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असावी. ”
“म्हणजे कसे? ” जान्हवीने कुतूहलाने विचारले.

“तुला माझी एक केस सांगतो. एका सधन, सुशिक्षित घरातील नवरा बायको येऊन मला सांगायला लागले की त्यांच्या मुलीला भूतबाधा झाली आहे. तिच्या पाठीवर कुणीतरी फुल्या काढते, तिचे केस कुणीतरी ओढते आणि असे बरेच काही. आई-वडील हा भुताखेताचा प्रकार आहे म्हणून हवालदिल झाले होते. प्रत्यक्षात मात्र वाढत्या मुलीला आपल्या व्यवसायांत सतत व्यग्र असणार्‍या आईवडीलांचे लक्ष वेधून घ्यायचे होते. त्यांना काय सांगावे कसे पटवावे हे तिला कळत नव्हते पण असे काहीतरी केल्यावर आई-वडील आपल्याकडे लक्ष पुरवतात ही कल्पना तिला आली होती. शम्मीची केसही अशीच असावी का हे तूच मला सांग. या नव्या घरात तुम्ही आलात. तिची शाळा बदलली, परिसर बदलला, मित्र-मैत्रिणी बदलल्या याचा त्रास तिला होत असावाच ना आणि तो नेमक्या शब्दांत व्यक्त करता येतही नसावा कदाचित. आणखीही काही बदल असतील तर सांग बघू. ” काकांच्या बोलण्यात तथ्य वाटत होते.
“काका, या नवीन घरात शम्मीला आम्ही तिची स्वतंत्र खोली दिली. घर मोठं आहे, खोल्याही आहेत. तिलाही पसंत होती. अक्षय मात्र अजूनही माझ्या बाजूला झोपतो. हे कारण असेल का? ”

“असावे, असू शकते. शम्मी काही फार मोठी झालेली नाही. स्वतंत्र खोली हा विचार रात्री एकटं झोपायची वेळ येईपर्यंत उत्तम वाटतो परंतु एकांतात आई आपल्या लहान भावावर आणि आपल्यावर एकसमान प्रेम करत नाही अशी भावना मनात येऊ शकेल. शम्मीबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवून बघ. तिला रोज नाही तरी अधेमधे तुमच्याबरोबर झोपायचे असेल तर तशी परवानगी दे. शाळेत जाऊन तिच्या टीचर्सशी बोल. एखाद्या टीचरचा किंवा वर्गातील मुलामुलींचा तिला त्रास होतो का याची चौकशी कर.... ”

“काका, एक सहज प्रश्न विचारू? या सर्वामागे शम्मी नसून खरंच काही वेगळं असेल तर? ”“अगं वेगळं काय असणार आणि असलंच तर ते तुम्हा सर्वांनाच जाणवलं असतं ना? ”

जान्हवीच्या मनात काकांना तो भांडणाचा प्रसंग सांगण्याचे आले होते पण तिने स्वत:ला थांबवले. सुधीरच्या आणि सासूबाई-दादांच्या कानावर तिने काकांचा सल्ला घातला. सकाळी झालेल्या प्रकाराने सासूबाई थोड्या काळजीत होत्या.
“शम्मीला रात्री आमच्याबरोबर झोपू दे. नको तिला खोलीत एकटीला. माझी झोप गाढ नसते हल्ली. लक्ष राहील तिच्यावर. ”

“चालेल आई तसे करू. ” सासूबाईंचा बदलेला सूर जान्हवीला धीर देऊन गेला पण दिवसभरात तिच्या डोक्यात विचारांचे चक्र फिरत होते. "खरंच! शम्मी असं काही करत असेल? " आणि काकांचे शब्दही मनात पिंगा घालत होते. - वेगळं काय असणार आणि असलंच तर ते तुम्हा सर्वांनाच जाणवलं असतं ना!
रात्री सासूबाईंनी शम्मीला आपल्याजवळ झोपायला घेतले. अक्षय आणि सुधीरही झोपायला बेडरूममध्ये गेले होते. मागचं उरकून जान्हवी झोपायला आली आणि गादीवर टेकली. सुधीर आणि अक्षय शांत झोपले होते. तिने अक्षयच्या अंगावरची चादर सारखी केली आणि खिडकीकडे कूस बदलली. थंडगार वाऱ्याची झुळूक खिडकीतून आत येत होती. तिने आपल्या अंगावरही चादर ओढली अन डोळे मिटले. किती वेळ गेला कोणजाणे, जान्हवीचा डोळा लागत होता.

“घर माझं आहे. सोडून जा. नाहीतर गाठ माझ्याशी आहे. ” कुणीतरी कानात कुजबुजलं तशी जान्हवी ताडकन उठून बसली.“सुधीर, सुधीर ऊठ. कुणीतरी आहे इथे. ” जान्हवीचा आवाज घाबरा झाला होता.“काय आहे? ” सुधीर पुटपुटला.“अरे कोणीतरी कानात कुजबुजत होतं माझ्या कानात? ”“काहीतरीच काय? प्लीज झोप. मला लवकर उठायचं आहे उद्या. ”

जान्हवीने पुन्हा उशीवर डोके टेकवले. १०-१५ मिनिटे शांततेत गेली असावीत. पुन्हा तिच्या कानात तोच आवाज घुमला. यावेळेस आवाज गेल्यावेळेपेक्षा स्पष्ट होता आणि निर्जीव. जान्हवीच्या अंगावर काटा फुलला.

“सुधीर ऊठ रे. खरंच कोणीतरी आहे इथे? ”“कुठे? कोण आहे? ” सुधीर झोपाळलेल्या आवाजात म्हणाला तरी त्याने जान्हवीचा थरथरता आवाज ऐकला होता.“असं कर. तू माझ्या जागेवर झोप. मी खिडकीकडे झोपतो. ”
दोघांनी जागांची अदलाबदल केली आणि अगदी पाच मिनिटांत सुधीर घोरायला लागला. जान्हवीचा डोळा अद्याप लागला नव्हता पण तिने डोळे गच्च मिटून घेतले होते.
“च्यायला! हे काय आहे? ” आता सुधीर उठून बसला होता. “माझ्याही कानात कोणीतरी बोलत होते. इतका थंडगार निर्जीव आवाज मी कधी ऐकला नव्हता. ” त्याने जान्हवी आणि अक्षय दोघांना जवळ घेतले. जान्हवीला हुंदका फुटला.
“सुधीर, काहीतरी आहे रे या घरात. ”

“मी चौकशी करतो. आजूबाजूचे, शेजारी, दुकानदार कोणाला तरी माहीत असेलच. ” दुसर्‍या दिवशी सकाळी घराबाहेर निघताना सुधीर म्हणाला. “मी निघतो आता. तुम्ही सगळे सांभाळून राहा. ”
“सुधीर, हे घर सोडता येईल का रे? ” जान्हवी बिचकत म्हणाली. प्रश्नाचे उत्तर काय असावे ही कल्पना तिला होती.“कठिण आहे गं. पैसे गुंतवून बसलो पण तू काळजी करू नकोस. आपण मार्ग काढू. अशा घरात फार दिवस राहण्यात अर्थ नाही हे मलाही कळतंय. आई-दादा, तू, मुलं यांच्यापेक्षा पैसा मोठा नाही. तू राजवाडेकाकांना बोलावून घेतेस का? ते काय म्हणतात ते बघू किंवा एखादा शांतीपाठ करूया का?“आपण गृहप्रवेशाची पूजा घातली होतीच ना रे. असे उपाय काम करतात का ते कळत नाही. त्यापेक्षा मी राजवाडेकाकांना फोन लावते. ”

राजवाडेकाका येईपर्यंत घरात बरेच काही घडून गेले होते. कधी पावलांचे दणदणा आवाज, कधी खोल्यांतील सामान अस्ताव्यस्त होणे. एके रात्री जान्हवीला आपल्या अंगावरून कोणीतरी हात फिरवत असल्याचा भासही झाला पण तिला स्वत:पेक्षा मुलांची काळजी लागून राहिली होती. सासूबाईंचे ब्लडप्रेशरही थोडे वाढले होते. दादांनाही अस्वस्थ वाटत होते. आपल्या सर्वांव्यतिरिक्त घरात कोणीतरी आहे ही जाणीव प्रत्येकालाच होत होती. घराचे एकूण स्वास्थ्य बिघडले होते. राजवाडेकाका लोणावळ्याला आले त्यानंतरची गोष्ट...
राजवाडेकाका आणि दादा बैठकीच्या खोलीत चहा घेत बसले होते. शम्मी शाळेत, सुधीर साईटवर, जान्हवी आणि सासूबाई स्वयंपाकघरात जेवणाची तयारी करत होत्या. अक्षय घरातच खेळत होता. अचानक, दादांना त्याची हाक ऐकू आली.

“आजोबा, मी उडी मारू? ”
अक्षय वरच्या मजल्यावर पायरीच्या अगदी टोकाशी उभा होता. दादांनी त्याचे बोलणे नीटसे ऐकले नव्हते.
“अरे मागे हो. किती कडेशी उभा आहेस. पडशील. ” म्हणत ते उभे राहिले.“उडी मारू का आजोबा? हा काका म्हणतोय की मार. ”

राजवाडेकाका आणि दादा दोघे ताडकन पायर्‍यांपाशी आले. दादांनी क्षणाचा उसंत न घेता पायऱ्या चढायला सुरुवात केली पण तोपर्यंत अक्षयचा पाय वरच्या पायरीवरून सटकला होता...


***
संध्याकाळी सुधीर घरी आल्यावर राजवाडेकाकांनी विषयाला वाचा फोडली. जान्हवी अक्षयला कुशीत घेऊन बसली होती. अक्षयचा पाय मुरगळला होता. तो अधेमधे कण्हत होता पण काही गंभीर झाले नव्हते. जान्हवीच्या तोंडावरची रया मात्र पार ओसरली होती. सासूबाई आणि दादांच्या तोंडावरही तणाव दिसून येत होता.

“सुधीर, हे घर घेताना चौकशी केली होती? काही पूर्वातिहास वगैरे? ” राजवाडेकाकांनी विचारले.
“पूर्वातिहास...म्हणजे” सुधीरचा आवाज अडखळला.. “या बंगल्याचा केअरटेकर होता गुलाबराव. दारुड्या होता. बंगला त्याच्या ताब्यात. मालकाच्या ऐटीत तोच वापर करत असे. माणूस मोठा रंगेल होता आणि बदमाशही असं म्हणतात. मी आजूबाजूला, किराणा दुकानात चौकशी केली तेव्हा कळलं की गेल्यावर्षी या घरातच त्याचा मृत्यू झाला. त्यात अनैसर्गिक काही नव्हते, अतिदारूपानाने मेला. दर दोन दिवसांनी बाहेरची बाग राखायला माळी येतो त्याला बंगल्यात हालचाल दिसली नाही तेव्हा घर फोडले. स्वयंपाकघराच्या भिंतीशी त्याचा देह मिळाला. ”
“काय आणि हे तू आम्हाला सांगितलेही नाहीस सुधीर. ” दादांनी काळजीने विचारले.
“दादा, मला त्यात काही गैर वाटले नाही. घर रिसेलचे होते, नवे नाही. प्रत्येक घरात काही ना काही किस्से घडलेले असतातच. ”
“गैर वाटले नाही? पोराच्या जिवावर बेतले आज. काही वेडेवाकडे झाले असते म्हणजे. गेले किती दिवस घरातले वातावरण बिघडले होते. ” सासूबाई जान्हवीकडे बघत म्हणाल्या.
जान्हवीचे डोळे पाण्याने भरले. “स्वयंपाकघरात... " तिच्या अंगावर शहारे आले. "मला या घरात राहायचे नाही. ”
“मी काही बोलू का? ” राजवाडे काका म्हणाले. “मला अक्षयला काही विचारायचे आहे. अक्षय राजा, तुला कोणी सांगितले पायरीवरून उडी मारायला? त्या काकाला काही नाव आहे का? ”
“लाकशश काका. ”
“काय म्हणतोय गं हा? ” राजवाडेकाकांनी काही न कळून विचारले तशी जान्हवीने अक्षयला पुन्हा तोच प्रश्न केला.
“लाकशश काका. त्या भिंतीवर होता ना. ” स्वयंपाकघराकडे बोट दाखवत अक्षय म्हणाला.
“राक्षस काका" विस्मयाने जान्हवी म्हणाली आणि तिला त्या भिंतीवरील धब्ब्यांची आठवण झाली. त्या धब्ब्यांत अक्षयला राक्षस दिसला होता आणि तो गुलाबराव त्याच भिंतीपाशी.... तिने अक्षयला जवळ घेतले आणि ती मुसमुसू लागली. “माझ्या मुलांच्या जिवावर उठला आहे राक्षस मेला. ”

“किंवा तुम्हाला फक्त घाबरवायचा प्रयत्न करतो आहे. ” राजवाडेकाका म्हणाले.
“काका तुम्ही पेशाने डॉक्टर. तुमचा या अशा अमानवी गोष्टीवर विश्वास आहे? ” सुधीरने विचारले.

“याला विश्वास म्हणावे की नाही ते मला माहीत नाही. वैद्यकशास्त्रात या जगातील प्रत्येक गोष्ट नमूद आहे असे नव्हे. इथे या घरात भूत, पिशाच्च, हैवान आहे असंच मला म्हणायचं नाही. कदाचित, चुंबकीय क्षेत्र असेल, एखादी ऊर्जा किंवा शक्ती असेल पण सोयीसाठी गुलाबरावाचे भूतच आहे असे मानू. प्रश्न हा आहे की ही शक्ती तुमच्या जिवावर उठली आहे किंवा तुम्हाला घाबरवते आहे का? तर मला वाटते हो. सध्या घाबरवते आहे पण तुम्ही घाबरत नाही म्हटल्यावर पुढचा प्रयत्न करून बघेलच आणि हे काही भूतपिशाच्चांबाबत होते असे नाही तर आपण सर्वच एक उपाय चालत नाही म्हटल्यावर दुसरा करून बघत असतो त्यातलाच प्रकार आहे.

आपण मानूया की इथे गुलाबराव नावाचा अमानवी हैवान आहे आणि पुढे चलू. गुलाबराव या घराशी बांधलेला आहे. त्याच्या नजरेत तुम्ही परके आहात आणि या घरावर कब्जा करून आहात. म्हणतात की कधीतरी काळ एका क्षणी गोठतो. ती ऊर्जा त्या जागी, त्या वेळी सीमित होते. वैज्ञानिक भाषेत याची तर्कनिष्ठता पडताळून पाहता येईलच असे नाही पण गुलाबराव या घराशी अद्याप बांधलेला आहे हे टाळता येत नाही. आता पुढचे तुम्ही ठरवायचे. एक कुटुंब म्हणून तुम्हाला या घरात राहायचे आहे का ते? मला असं वाटतं की हे प्रकार बंद होणार नाहीत. पूजापाठ, शांतीपाठ यांनी फरक पडतो असे मला वाटत नाही. फारतर वातावरण बदलते, श्रद्धेचे बळ मिळते. अशा बदलेल्या वातावरणाचा फायदा तुम्हाला होईल पण तो तात्पुरताही असू शकतो. ”

“मला अजिबात इथे राहायचे नाही. ” जान्हवीने निकराने सांगितले. “माझ्या मुलांना घाबरवेल, त्यांच्या जिवावर उठेल अशा जागी मला राहायचेच नाही. काका, हे घर सोडले तर हा उच्छाद थांबेल ना. हे घर त्या गुलाबरावालाच लखलाभ होवो. ”

“थांब! इथे मुलांना घाबरवण्याचे प्रयत्न आहेत असं मला वाटत नाही. एक लक्षात घे. या घरातली सर्वात घाबरलेली व्यक्ती आहेत तू. तू दिवसभर घरात असतेस, तुला मुलांची काळजी आहे, घराची, नवर्‍याची, सासू-सासर्‍यांची काळजी आहे. मी तुला म्हटले तसे ही शक्ती या घराचा ताबा मागते आहे, या घरावर मालकी हक्क दाखवते आहे. अनेकांचे अनुभव सांगतात की अशा शक्ती त्या जागेपुरत्या मर्यादित असतात. घर सोडणे हा उत्तम पर्याय आहे पण अशा शक्तींच्या बाबतीत कोणताही ठोस नियम नाही. कोणतेही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येत नाहीत. गुलाबराव या घराशी बांधलेला आहे. त्याची इच्छा, वासना, हक्क या घरावर असल्याचे तो तुम्हाला दाखवून देतो आहे. मला वाटतं की विषाची परीक्षा न बघता तुम्ही हे घर सोडावेत. बाकी निर्णय तुमचा आहे. ” राजवाडेकाकांनी सुधीरकडे पाहत म्हटले.

“काका, घर सोडणे ही काही सोपी गोष्ट नाही. ”

“अरे, हा रोजचा त्रास आणि भीती बाळगणं सोपं आहे का रे? ” सासूबाई अक्षयच्या पायावरून हलकेच हात फिरवत म्हणाल्या. दादांनीही राजवाडेकाकांच्या मताला अनुमोदन दिले. जान्हवी तर काही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीतच नव्हती. शेवटी, सुधीरने मुंबई-पुण्यात निदान भाड्याने घर घ्यावे असे ठरले आणि तोपर्यंत शांतीपाठ करून घ्यायचा असा सर्वांनी निर्णय घेतला.

***

घर घेई-घेईपर्यंत पुढचे तीन चार महिने गेलेच. साग्रसंगीत शांतीपाठाने घरातले वातावरण निवळल्यासारखे झाले होते. या तीनचार महिन्यांत त्रास झाला नाही असे नाही पण जिवावर बेतेल असे काही झाले नाही. कदाचित, लवकरच आपल्याला घराचा ताबा मिळणार आहे हे गुलाबरावलाही कळले असावे.
कोथरुडसारख्या गजबजलेल्या वस्तीत सुधीरने फ्लॅट घेतला तेव्हा जान्हवीला हायसे वाटले. शहरात वातावरण कसं मोकळं असतं. माणसांची, वाहनांची वर्दळ, रोजच्या कामांत माणूस इतका गुंतलेला असतो की वेडेवाकडे विचार करायलाही त्याला वेळ नसतो. शाळेचे वर्ष संपत असताना शम्मीची ऍडमिशन होणे कठिण झाले होते पण ओळखी काढून सुधीरने कशीबशी शम्मीच्या शाळेची व्यवस्थाही केली. जान्हवीने अक्षयलाही बालवाडीत घातले होते. पुढल्या वर्षी त्याचीही शम्मीच्या शाळेत ऍडमिशन होणार होती. या नव्या घरात कसं सर्व सुरळीत झालं होतं.
दुपारची वेळ होती. बाहेर टळटळीत ऊन पडले होते. शम्मी आणि अक्षय दोघेही शाळेत गेले होते. बेडरूममध्ये जान्हवी धुतलेल्या कपड्यांच्या घड्या करण्यात मग्न होती. रस्त्यावरील रहदारीचा आवाज तिला सुखावून जात होता. मध्येच रस्त्यावर ओरडणारा फेरीवाला सर्व काही आलबेल असल्याचं सांगून जात होता. बेडरूमच्या खिडकीकडे तिची नजर गेली आणि तिला लोणावळ्याच्या घरातल्या मोठ्या खिडक्या आठवल्या. त्या खिडक्यांपेक्षा शहरातली ही काडेपेटीसारखी खिडकीच बरी. तिच्या डोक्यात विचार आला आणि ओठांवर स्मितहास्य.

“जान्हवी, इथे जरा स्वयंपाकघरात येतेस का? ” सासूबाई स्वयंपाकघरातून बोलावत होत्या.
“आले हं! ” जान्हवीने हातातील शर्ट टाकला आणि ती बेडरूमच्या दरवाज्याकडे वळली. दारात तिची पावलं एकदम थबकली. तिला आठवलं की आज ती घरात एकटीच होती. सासूबाईंना झाल्या प्रकारातून थोडासा बदल हवा होता म्हणून दादा आणि सासूबाई आज सकाळीच मेधाकडे बडोद्याला गेले होते. जान्हवीच त्यांना सकाळी बसमध्ये बसवून आली होती.

राजवाडेकाका म्हणाले होते, ' या शक्तींच्या बाबतीत कोणताही ठोस नियम नाहीत. कोणतेही ठोकताळे, निष्कर्ष मांडता येत नाहीत.'

गुलाबराव आता त्या घराशी बांधलेला नव्हता.....

(एका तथाकथित सत्यघटनेवर आधारीत)
हॅपी हॅलोवीन

गाठ माझ्याशी आहे - १

"बरं, ते काय आहे सांग बघू. " जान्हवीने आकाशातून स्वस्थ विहरणार्‍या ढगाच्या एका लहान पुंजक्याकडे बोट दाखवले."अम्म्म.... ते माऊ आहे. " अक्षय खिदळत म्हणाला आणि जान्हवी त्याच्या हसण्यात सामील झाली.

मायलेकांचा हा खेळ दर संध्याकाळी चाले. मुंबईच्या उपनगरातल्या इमारतीच्या लहानशा खिडकीतून दिसणार्‍या टीचभर आकाशात ढगांचे विविध आकार शोधायला जान्हवीने अक्षयला शिकवले होते. सुधीरची वाट बघता बघता अंधार पडायचा. दादा आणि सासूबाई फिरायला बाहेर तरी जायचे. शम्मीच्या अभ्यासामुळे जान्हवीला तेही करता येत नव्हते. सकाळी सहा वाजता उठून सुधीरचा डबा, मुलांचे डबे, शाळा, सकाळचा स्वयंपाक, बाजारहाट, संध्याकाळचा स्वयंपाक, मुलांचे अभ्यास यांत जान्हवीचा जीव मेटाकुटीला येत असे. सुधीरला गेले सहा महिने पुणा-मुंबई हायवेवर एका रिसॉर्टच्या बांधकामाचे कंत्राट मिळाले होते. तो आठवड्यातले २-३ दिवस तिथेच राहत असे. मध्येच यावंस वाटलं तर उठून रात्री उशीरा घरी येई आणि सकाळीच उठून चालता होई. सासूबाईंची तब्येतही गेले काही दिवस नरमच होती. बीपी वाढले होते, डायबिटीसही सुरू झाला होता. त्यांचं पथ्यपाणी बघावं लागे. संसाराच्या रगाड्यात जान्हवी पिचून जात होती. अडीच वर्षांचा अक्षयच काय तो तिचा विरंगुळा होता.

"आई, झाला होमवर्क. मी थोडावेळ टीव्ही बघू? " शम्मी विचारत होती.
"हो बघ. " जान्हवी खिडकीतून उठत म्हणाली. संध्याकाळचे साडेसात वाजत आले होते. आज शुक्रवार असल्याने सुधीर घरी यायचा होता. जान्हवीने त्याचा मोबाईल नंबर फिरवला."सुधीर, निघालास का रे? कधीपर्यंत पोहोचतो आहेस? "

"हो हो निघालो आहे. पोहोचेन तासा-दोन तासांत. ट्रॅफिकवर अवलंबून आहे गं. तसं फारसं ट्रॅफिक नाहीये आज. बऱ्यापैकी वेळेत पोहोचेन म्हणतो. तुला काहीतरी महत्त्वाचं सांगायचं आहे. घरी आल्यावर बोलू. पोरांना जेवायला वाढून झोपायला सांग. बाबा उद्या खेळेल म्हणावं. बाहेरही घेऊन जाईल किंवा त्यांना सांग की मला यायला थोडा उशीरच होणार असं. आई-बाबांना मात्र थांबायला सांग. तुम्हा सर्वांशी बोलायचं आहे. बरं ठेवतो. " सुधीरने मोबाईल बंदही करून टाकला.

जान्हवीने ओठ मुडपला. 'असं काय सांगायचं आहे याला? आणखी एखादे प्रोजेक्ट मिळाले असेल. आता उरलेल्या दिवशीही घरी येत नाही, असे सांगतो का काय? ' जान्हवीच्या कपाळावर आठ्यांचे जाळे पडले आणि तेवढ्यात दाराची बेल वाजली.

शम्मीने धावत जाऊन दार उघडले. संध्याकाळचा फेरफटका मारून सासूबाई आणि सासरे परतले होते. "अगं, कोपर्‍यावरच्या भय्याकडे ताजी मेथी दिसत होती. मी दोन जुड्या आणल्या. उद्या सकाळी पालेभाजी करूया. मी मेथी निवडून ठेवते, " म्हणत सासूबाई घरात शिरल्या आणि थेट स्वयंपाकघरात घुसल्या. त्यांच्या मागोमाग जान्हवीही स्वयंपाक घरात आली. "मी पोळ्या करायला घेते. सुधीरला फोन केला होता, दोन तासांत येईल म्हणाला. "

"माझ्यासाठी एकच लाट गं पोळी. संध्याकाळचं नको वाटतं हल्ली जड खाणं. मी येऊ का मदतीला? ""नको. आधी मुलांसाठी करते. त्यांना जेवायला वाढते आणि मग आपल्या करते. " जान्हवी सासूबाईंशेजारी गेली. "म्हणत होता काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. मुलांना झोपव. " जान्हवी हलकेच म्हणाली."हं! आता काय बाई आणखी नवीन? " सासूबाईंनी डोळे मोठे केले तशी जान्हवीने खांदे उडवले. सासूशी जान्हवीचे सूत जमत होते. जान्हवी कॉलेजात असताना तिची आई गेली. आपल्या सुनेला आई नाही याची खंत जान्हवीच्या सासूला होती. त्या प्रेमाने जान्हवीचे करत. सुधीर एकटाच मुलगा त्यामुळे त्याच्यावरच आई वडिलांची जबाबदारी होती. त्यांची मोठी मुलगी मेधा बडोद्याला असे. तिच्याकडेही कधीतरी सासू-सासऱ्यांचे जाणे होई पण सासूबाईंची तब्येत हल्ली मलूल झाल्यापासून त्यांनी बाहेरगावी जाणे बंद केले होते.

घरातल्या कामांत, मुलांचं पाहण्यात त्यांची पूर्वी खूप मदत व्हायची पण आताशा तब्येत खालावल्यापासून त्या स्वतःला सांभाळूनच सर्व करत. जान्हवीलाही त्याची जाणीव होती.

मुलांची जेवणं उरकली तशी जान्हवीने 'बाबाला यायला उशीर होणार आहे. बाबा उद्या तुम्हाला बाहेर घेऊन जाईल. आता झोपायला जा. ' अशी समजूत घालायला सुरुवात केली. अक्षयला फारसा फरक पडला नव्हता. तसाही त्याला जान्हवीचा लळा जास्त होता. शम्मी मात्र हिरमुसली झाली होती. तिची समजूत काढता काढता जान्हवीच्या नाकी नऊ आले. शेवटी, दादांनी तिला गोष्ट वाचून दाखवण्याचे कबूल केले तशी ती आजोबांबरोबर पाय आपटत का होईना पण झोपायला गेली. पावणे दहाच्या सुमारास सुधीर परतला तोपर्यंत मुले झोपली होती.

"लवकर येत जा रे. किती उशीर करतोस? जेवायचे थांबले आहेत सगळे. " घरात शिरतानाच आईंनी सुधीरला दटावले."अगं आई, तू जेवून घेत जा ना. तुला आताशा बरं नसतं, कशाला उशीरापर्यंत जेवणाची वाट बघत बसता. मी जान्हवीलाही सांगितलं आहे की तू जेवून घेत जा मुलांसोबत. " बुटांचे बंद सोडता सोडता सुधीर म्हणाला."अरे, तू कधी येतोस कधी येत नाहीस. आलास तरी उशीरा उगवतोस. काळजी वाटत राहते रे. घास उतरत नाही घशाखाली. त्यापेक्षा थांबलेलं बरं, " सुधीरच्या आई टेबलावर ताटं मांडत म्हणाल्या."काळजी नको गं करूस? मी काय अक्षयच्या वयाचा आहे का आता? चल जेवायला बसूया. जान्हवी तू पण ये गं. " म्हणत सुधीर बेसिनपाशी हात धुवायला गेला.

जान्हवीने सुरण आणि वांग्याची भाजी ताटात वाढली. काळ्या वाटाण्यांची आमटी वाटीत काढली आणि दोन गरमा गरम फुलके प्रत्येकाच्या ताटात वाढले. सुधीरला जेवताना काहीतरी गोड लागते म्हणून सासूबाईंनी केलेला आंब्याचा मुरंबाही वाढला आणि सगळे जेवायला बसले.

"पोरं झोपली का गं? " सुधीरने पहिला घास तोंडात टाकायच्या आधी प्रश्न केला.
"हो रे झोपली. काहीतरी सांगायचं म्हणत होतास ना. तूच म्हणालास की झोपव. शम्मी कुरकुरत होती पण झोपली एकदाची. " जान्हवी म्हणाली.
"अगं हो, तसं त्यांच्यापासून लपवण्यासारखं काही नाही. निवांत बोलायला मिळावं म्हणून त्यांना झोपव म्हटलं. "
"आणखी एखादं प्रोजेक्ट गळ्यात बांधून घेऊ नकोस म्हणजे झालं. त्या पोरांना बाप, जान्हवीला नवरा आणि आम्हाला मुलगा म्हणूनही कधीतरी वेळ देत जा. स्पष्टच सांगतो. " दादांनी सुधीरच्या मनातलं जसं काही ओळखलंच होतं.
"दादा, नवं प्रोजेक्ट तर आहेच. धंदा जमतो आहे. चांगली संधी मिळाली तर सोडवत नाही. उद्याचं कोणी पाहिलं आहे. दिवस बरे आहेत. हवी तशी संधी चालून आली आहे. सोडावी कशी? " सुधीर आवाज पाडून म्हणाला.
"अरे पण.. " आईंनी जान्हवीकडे बघत म्हटले. जान्हवी गप्प होती. डोकं खाली करून पोळीचे तुकडे करत होती.
"अगं आई, ऐक तर खरी. लोणावळ्यापासून २५ एक किलोमीटर आत एक नवा रिसॉर्ट बनतो आहे. दोन वर्षांचं प्रोजेक्ट आहे. ज्या बिझनेसमनचं आहे त्याने या कामावरून लोणावळा आणि पुढे पुण्याजवळ आणखी कामे मिळवून देईन अशी ऑफर दिली आहे. माझी सगळी कामाची माणसंही तिथेच राहतात. एक मीच ये-जा करतो मुंबईपर्यंत. "
"तिथेच राहणार का रे मग तू आता? " जान्हवीने एकदाचे तोंड उघडले. तिच्या आवाजातली निराशा स्पष्ट जाणवत होती.
"हो असं म्हणतो आहे खरं. " मंद हसत सुधीर म्हणाला "पण एकटा नाही, आपण सर्वांनीच तिथे शिफ्ट करूया असा विचार करत होतो. "
"काऽऽय? हे मुंबईतलं घर सोडून लोणावळ्याला? " जान्हवी वैतागून म्हणाली.

"मग त्यात वाईट काय? तूच विचार कर. या लहान घरात इतक्या माणसांची किती कुतरओढ होते. मुलांना बाहेर खेळायला धड जागा नाही. दादा-आई संध्याकाळचे ट्रॅफिकमध्ये जीव मुठीत धरून फिरायला जातात. मला रोज घरी यायला जमत नाही. तुला सगळ्यांचं काम पडतं. मुंबईत नोकर टिकत नाहीत. या मुंबईच्या प्रदूषणात आईची तब्येत म्हणावी तशी सुधारत नाही. पोरं मला भेटायला आतुर असतात. या सगळ्यापेक्षा आपण सर्व एकत्र एके ठिकाणी राहिलो, बंगल्यात... तर... " बंगल्यावर जोर देत एका दमात सुधीरने सर्व यादी दिली.
"बंगल्यात? " जान्हवी आश्चर्याने म्हणाली.

"तलवारसाहेबांनी, म्हणजे हे नवं प्रोजेक्ट ज्यांचं आहे त्यांनी, एक बंगला दाखवला त्यांच्या मित्राचा. मित्र मुंबईत राहतो पण सुट्टीत म्हणून बंगला बांधला होता लोणावळ्याला. मध्यंतरी त्यांची बायको गेली. त्यांचंही आता वय झालं तसं त्यांच्याच्याने आडगावी जाणं होत नाही. बंगल्याचा केअर टेकर होता म्हणे इतके वर्ष पण तोही आता राहिला नाही तेव्हा ते बंगला विकायचं म्हणत होते. तलवार म्हणाले की मी मध्यस्थी करतो. तुम्हा सर्वांना पसंत असेल तर रविवारीच बोलणी करता येतील. " ताटावरून उठत सुधीर म्हणाला.

जान्हवीची आणि सासूबाईची नजरानजर झाली पण दोघी काहीच बोलल्या नाहीत. दादा पानावरून उठताना तोंडात पुटपुटले, "सर्व ठरवूनच आला आहे हा. "

स्वयंपाकघरातलं आवरून जान्हवी बेडरूममध्ये शिरली तेव्हा तिचा चेहरा साफ पडलेला होता.

"अगं काय जान्हवी. मुंबईपेक्षा लोणावळा चांगला नाही का? आणि लोणावळा म्हणजे काही खेडेगाव नाही. " सुधीर पलंगावर फायली मांडून पाय ताणून बसला होता. जान्हवीने त्या फायली एक एक करून बंद करायला सुरुवात केली. "अगं, लोणावळ्याला राहिलो तर हा एकांताचा वेळ मलाही मोकळा मिळेल ना. घरी कामं घेऊन यायला नको. " सुधीरचा स्वर समजुतीचा होता.

"हो रे पण शम्मीची शाळा, तिच्या मित्र-मैत्रिणी, आपला शेजार सगळं सोडून जायचं? आणि शम्मी मोठी झाली की कॉलेजसाठी पुन्हा मुंबई पुण्याला नको का यायला? "

"अगं, तेव्हाचं तेव्हा बघू. धंद्यात जम बसला की पुण्याला फ्लॅट घेता येईल. आई-दादांचंही तोपर्यंत कसं असेल काही सांगता येतं का? ही काही वर्षं आपण सर्वांनी मजेत मोठ्या घरात घालवली, आई दादांना-पोरांना मोकळं फिरता-खेळता आलं तर काही बिघडणार आहे का? लोणावळ्याला चांगल्या शाळा आहेत. मी चौकशी करून ठेवली आहे. "

"हम्म! तू सर्व काही ठरवूनच आला आहेस सुधीर. " जान्हवीला आपलं काही चालणार नाही याची जाणीव झाली.
"नाही गं। शम्मीला विचारूया. ती तयार असेल तर जाऊ. अक्षय लहान आहे. लहान मुलं चटकन मागचं विसरतात पण शम्मीला शाळा सोडताना, मित्रमैत्रिणी सोडताना त्रास होईल हे कबूल आहे. आपण तिच्याशी बोलूया. ती मानली तरच जाऊ. " सुधीर नरमाईने म्हणाला पण जान्हवीला एव्हाना खात्री झाली होती की आपण आता लोणावळ्याला जाणार.


***
बंगल्याबाहेर गाडी थांबली तसा सुधीर झटकन उतरला आणि मोठ्या झोकात वाकून त्याने जान्हवीसाठी दरवाजा उघडला.
"उतरा मालकीणबाई. "

जान्हवीने गाडीतून उतरून सभोवार नजर टाकली. रस्त्यावर एकापेक्षा एक सुंदर बंगल्यांची रांग होती. सकाळच्या उन्हात तलवार साहेबांचा बंगला तळपून निघाला होता. प्रथमदर्शनातच जान्हवीला बंगला आवडून गेला. सुधीरने फाटकाचं कुलूप उघडलं आणि दोघेही आत आले. गेटमधून गाडी आत घेता येईल इतक्या जागेवर डांबरी सडक होती पण सुधीरने गाडी बाहेरच उभी केली. बंगला अद्याप त्यांच्या नावावर व्हायचा होता. सडकेच्या दुतर्फा हिरवळ वाढली होती पण अंगण चांगलं राखलेलं होतं. लगबगीने जाऊन सुधीरने दाराचे कुलुप काढले आणि दरवाजा उघडला.

सकाळचे ऊन घरात पडले होते. जान्हवीने भराभरा सर्व खोल्यांत जाऊन घराची पाहणी केली. घर प्रशस्त होते. मोठ्या हौसेने बंगला बांधला असावा हे पाहता क्षणीच लक्षात येत होते. मुख्य दरवाज्यासमोर बैठकीची खोली, तिथून वरच्या मजल्यावर जाण्यास जिना आणि स्वयंपाक घराचे प्रवेशद्वार. स्वयंपाक घराला लागून डायनिंग रूम आणि त्यानंतर एक बेडरूम. वरच्या मजल्यावर तीन बेडरूम होत्या. मास्टर बेडरूम घराच्या एका टोकाला होती. जान्हवीला ती पाहता क्षणीच आवडली. प्रायव्हसी असावी तर अशी. बेडरूमला मोठी खिडकी होती. ती पाहून जान्हवीला मुंबईच्या घराची खिडकी आठवली. तिने खिडकी उघडली आणि खिडकीतून टेकड्या आणि वनराईचे दृश्य बघून ती हरखून गेली. आकाशात ढगांचा पुंजका धीम्या गतीने विहरत होता. तिला चटकन अक्षयची आठवण आली.

"पायर्‍यांवर सांभाळायला हवं नाही अक्षयला. त्याला घरात जिना असण्याची सवय नाही. " जान्हवी म्हणाली.
"अगं, होईल सवय. " बेफिकिरीने सुधीरने उत्तर दिले.

स्वयंपाकघर प्रशस्त होते. जान्हवीला पाहताक्षणीच ते आवडले. इंग्रजी एलच्या आकारातले प्रशस्त ओटे, त्यावरील कॅबिनेट्स, भिंतीतलं लाकडी कपाट. स्वयंपाकघराच्या एका भिंतीवर धब्बे दिसत होते.
“सुधीर अरे इथे पाणी गळतंय असं दिसतंय. बघ लीकेज आहे कुठेतरी भिंतीत. ”“अगं, हा मी घरचा प्लंबर आहे. काळजी कशाला करतेस. मी बोलावून घेतो काही मजूर आणि कामाला लावतो. घरात इतर कुठे काही डागडुजी करायची आहे ती देखील करून घेऊ आणि रंगही देऊ, राहायला यायच्या आधी. फक्त तुला घर आवडलं म्हणून सांग की झालं. ”

घरात न आवडण्यासारखं काही नव्हतंच. बाजारहाट, शाळा, डॉक्टर सर्वांची चौकशीही सुधीरने करून ठेवली होती. घर मोक्याच्या ठिकाणी होते.

“आपला मुंबईचा फ्लॅट विकायचा का रे? ठेवला तर भविष्यात उपयोगाला येईल ना! पुढे मागे शम्मी कॉलेजात गेली की. ”“अगं, मुंबई नको वाटते बघ आणि या बंगल्यासाठी पैसे उभारायचे तर तो फ्लॅट विकूनच उभारायला हवेत आणि फार पुढचे विचार करू नकोस गं. शम्मीला कॉलेजात जायला अजून वेळ आहे. तेव्हाचं तेव्हा बघू. ” जान्हवी बेत फिसकटवते की काय असा सूक्ष्म विचार सुधीरच्या मनात आला.“बरं! घर छानच आहे. तू करून घेतोस ना जरा रंगरंगोटी वगैरे. ” जान्हवी म्हणाली आणि सुधीरला हायसं वाटलं.

मे महिन्याच्या शेवटी सुधीर आणि जान्हवीने संसार लोणावळ्याला हालवला. शम्मीच्या शाळेची ऍडमिशन झाली होती. सुधीरने घराची डागडुजीही करून घेतली होती. बागेसाठी माळी आणि घरकामासाठी बाईही ठेवून घेतली. सुधीरने आपल्या काही माणसांच्या मदतीने घर लावून घेतलं. जान्हवी आणि सासूबाईंना फारशी दगदगही होवू दिली नाही. संध्याकाळच्या सुमारास जान्हवी, मुले आणि सुधीरचे आईबाबा पोहोचले तेव्हा हे घर राहते नाही असे कोणालाही वाटले नाही.

अक्षय मात्र आल्यापासून जरा नाखूश होता. त्याला नेमकं काय सांगावं हे कळत नव्हतं पण आपण आपल्या घरी कधी जायचं असं त्याने जान्हवीला दोन-चारदा विचारलं. आता हेच आपलं घर आहे हे त्याला कसं समजावून सांगावं हे जान्हवीला कळत नव्हतं.

दुसर्‍या दिवशी सकाळीही अक्षय सर्वात आधी उठून बसला. “मलाही नं जरा वेगळं वेगळं वाटतंय. मुंबईच्या काडेपेटीसारख्या घरात राहण्याची सवय झाली होती. ” जान्हवी सुधीरला म्हणाली. “आपण गृहप्रवेशाची पूजा करायची का रे? ”

“करू ना. जरा सर्व स्थिरस्थावर होऊ दे मग सावकाश करूया. ”“बरं. त्यानिमित्ताने जरा आजूबाजूच्यांशी ओळखीही होतील. ” जान्हवीने अक्षयला उचलले आणि ती बेडरूमच्या बाहेर आली.“हे बघ. जिना हळूच उतरायचा. गडगडशील हं नाहीतर आणि भू होईल. चल आपण दूदू पिऊया. ”

जान्हवीने अक्षयला ओट्यावर बसवला आणि दुधाची पिशवी फोडून तिने दूध गरम करायला ठेवले. “नीट बस हं. एकदम उडी मारू नकोस. ” नव्या घराची अक्षयला ओळख करून देताना सर्व सूचना देणेही गरजेचे होते.

"लाकशश"
“काय रे? ”
“आई तो बग, लाकशश" अक्षय स्वयंपाकघराच्या भिंतीकडे बोट दाखवत म्हणाला. जान्हवीने वळून पाहिले तर भिंतीवर पुन्हा पाण्याचे धब्बे दिसत होते.

“सुधीर ए सुधीर. हे बघ रे काय? ” जान्हवीने सुधीरला हाक दिली.
सुधीर खाली येईपर्यंत सासूबाईही स्वयंपाकघरात पोहोचल्या होत्या. “अगं काल नव्हते हे डाग. ”
“हो नं, आम्ही पहिल्यांदा घर बघायला आलो ना तेव्हा होते डाग आणि सुधीर म्हणाला की मी रिपेअर करून घेतो. असं रे काय काम करतात तुझी माणसं? ”

सुधीर डोळे विस्फारून भिंतीकडे बघत होता. “असं कसं झालं बुवा? मी स्वत: हजर होतो काम सुरू होते तेव्हा आणि मी इतरांच्या कामात हलगर्जी करत नाही तर स्वत:च्या घरात कसा करेन? ”

“पावसाळा सुरू होईल रे लवकर आणि मग आणखी गळायला लागेल. छतावरून तर गळत नाहीये ना पाणी. माणसांना जरा वर चढून बघायला सांग. डांबर घालायचं असेल गच्चीवर तर घालून घेऊ. ” दादांनी स्वयंपाकघरात डोकावत सल्ला दिला.
“मी करून घेतो. रंगाचा हातही पुन्हा द्यायला सांगतो. ” उतरत्या आवाजात सुधीर म्हणाला.

पावसाळा सुरू होऊन महिना झाला होता. गेले दोन चार दिवस पावसाची संततधार लागली होती. शम्मी दुपारी शाळेतून येऊन वरच्या मजल्यावर अभ्यासाला बसली होती. दादा आणि सासूबाई मराठी सिरियल बघण्यात दंग होत्या आणि अक्षय दुपारची झोप काढत होता. साडेतीन वाजून गेले तशी जान्हवी चहा करायला स्वयंपाकघरात गेली. चहाचे आधण ठेवले तशी वरच्या मजल्यावरून पावलांचे दाण दाण आवाज ऐकू येऊ लागले.

“ए शम्मी! नाचत्येस का गं? अभ्यास कर. ” जान्हवी खालूनच ओरडली.
“नाही आई अभ्यास करत्ये. ”

जान्हवी पुन्हा चहाकडे वळली पण पावलांचा दणदणाट कमी झाला नाही. जान्हवीने गॅस बंद केला आणि ती वरच्या मजल्यावर गेली. “शम्मी तुला सांगितलं ना एकदा की इतक्या जोरात नाचू नको. करत्येस काय नक्की? उड्या मारत्येस का? ” जान्हवी शम्मीच्या खोलीत डोकावली.

“नाही आई. अभ्यास करत्ये. सायन्सच्या मिसने केवढा होमवर्क दिला आहे माहित्ये. ” शम्मी जमिनीवर पुस्तकांचा पसारा मांडून बसली होती.
“खोटं! मी खाली होते तर पायांचा दणदणा आवाज येत होता. तो तू नाहीस तर कोण करत होतं? ” जान्हवी आवाज मोठा करून म्हणाली. शम्मी मुद्दाम खोडकरपणा करत असावी.
“हे काय गं आई! यू डोंट बिलीव मी. मी सांगितलं ना की अभ्यास करत होते. ” शम्मीचा आवाज रडवेला झाला. हे अस्त्र आईवर हमखास काम करते हे तिला माहीत होते.
“बरं बरं! कर अभ्यास. ” जान्हवी जिना उतरून खाली आली. पुन्हा आवाज आला तर हळूच जाऊन शम्मीला एक धपाटा घालायचे तिने ठरवले होते पण पुन्हा आवाज आला नाही.

काही दिवसांनंतरची गोष्ट. सुधीर सकाळीच घराबाहेर पडला होता. जाताना शम्मीला शाळेत सोडून जाणार होता. जान्हवी मागचं उरकत होती. सासूबाई आणि दादा दोघेही आज त्यांच्या खोलीबाहेर आले नव्हते म्हणून शेवटी जान्हवीने जाऊन त्यांच्या खोलीचे दार ठोठावले. दादांनी दार उघडले. सासूबाई पलंगावर बसल्या होत्या.

“हे काय आई? बरं आहे ना, बाहेर नाही का यायचं? चहा निवून गेला. ”
“तिला म्हणावं की तू जा. येईन मी बाहेर मला यायचं तेव्हा. उगीच मनकवडेपणा करण्याची गरज नाही. ” सासूबाई फणकार्‍याने म्हणाल्या.
“अं! असं काय झालं? ” काही न कळून जान्हवीने विचारले.
“काही नाही. तू जा इथून. तुझ्याशी एक शब्दही बोलण्याची इच्छा नाही माझी. ” सासूबाईंचा हा अवतार जान्हवीला नवा होता.
“अहो पण काय झालं ते तरी सांगा. चुकलं का आमचं काही? सुधीर काही म्हणाला का? ”
“सुधीर कशाला काही म्हणायला? आम्ही आमच्या मुलाला चांगले संस्कार दिले आहेत. आई बापांना उलटूनही बोलत नाही तो कधी. शिव्याशाप तर दूरची गोष्ट. ”
सासूबाई काय बोलताहेत त्याचा अर्थ जान्हवीला लागत नव्हता. “कोणी शिव्याशाप दिले? मला सांगता का आई की काय सुरू आहे. ”
“तू दिलेस. ऐकले आम्ही काल रात्री. तू भांडत होतीस सुधीरशी तो काल रात्री उशीरा आला म्हणून आणि इतक्या घाणेरड्या शिव्या तुझ्या तोंडात. शी शी! आमच्या कानावर पडल्या तर आम्हालाच लाज वाटली. काय बिघडवलं आहे गं सुधीरने तुझं? घरासाठीच खपतो ना आणि त्याला इतक्या अर्वाच्य शिव्या? त्याची आई आहे मी. ऐकवल्या नाहीत. “ सासूबाईंनी तोंड वेंगाडले.

"काहीतरीच काय बोलताय आई? मी कशाला सुधीरला शिव्या घालू? असं का म्हणताय तुम्ही तेच कळत नाही मला. माझं आणि सुधीरचं मोठ्या आवाजात बोलणंही नाही झालं काल. भांडण तर नाहीच नाही. सुधीर उशीरा आला ही गोष्ट खरी पण तो इतका थकला होता की जेवला आणि सरळ वर झोपायला गेला. मी मागचं उरकून वर जाईपर्यंत त्याला झोपही लागली होती. ”

“मग मी ऐकलं ते खोटं की मला तुझा आवाज कळत नव्हता? यांनी थांबवलं म्हणून नाहीतर मी तेव्हाच बाहेर येणार होते. ”
जान्हवीने दादांकडे पाहिलं, “दादा तुम्हीही? ”
“जे ऐकलं ते किळसवाणं होतं. निदान बायकांच्या तोंडीतरी.. जाऊ दे! याबाबतीत मला अधिक काही बोलायचं नाही. ” दादांनी मान फिरवली.

जान्हवीच्या डोळ्यांत पाणी तरारलं. तिने हात तोंडावर दाबला आणि ती धावतच वरच्या मजल्यावर बेडरूममध्ये धावली आणि पलंगावर झोकून देऊन तिने अश्रूंना मोकळीक दिली. दिवसभरात सासूबाई फारशा खोलीबाहेर आल्याच नाहीत. दुपारचे जेवणही त्यांनी टाळले तशी जान्हवीने फोन करून सुधीरला लवकर घरी यायला सांगितले. संध्याकाळी सुधीर घरी आल्यावर तिने हळूच त्याच्या कानावर प्रकार घातला. त्यालाही आईच्या अशा वागण्याचे आश्चर्य वाटले. त्याने समजुतीने आई-वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला पण फारसा उपयोग झाला नाही. निदान सुधीरच्या समजवण्याने त्या दोघांनी रात्री दोन घास तरी खाल्ले.

संपूर्ण दिवसभर जान्हवीचे तोंड उतरले होते. न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा तिला तोंड दाबून स्वीकारावी लागत होती. रात्री खोलीत थोडा एकांत मिळाला तेव्हा तिने ही व्यथा सुधीरकडे बोलून दाखवली.
“काही कळत नाही गं। आई अशी एकदम बिथरल्यासारखी का वागते आहे ते. तिला मी किती समजावण्याचा प्रयत्न केला तर म्हणाली तू बायकोची बाजू घेऊ नकोस. तुला काही स्वाभिमान आहे की नाही. ऐकूनच घेत नाही ती, आणखी काय समजावू तिला. त्यामानाने दादा निवळल्यासारखे वाटले. जान्हवी, तू समजूतदार आहेस. मला वाटतं की पुढचे काही दिवस तू मोठ्या मनाने घे. काही दिवस गेले की सर्व सुरळीत होईल. ”

जान्हवीने कूस बदलली आणि खिडकीकडे तोंड केले। बेडरूमच्या मोठ्या खिडकीतून चंद्राचे चांदणे आत येत होते. जान्हवीला मुंबईच्या घरातल्या खिडकीची आठवण झाली. पौर्णिमेचे चंद्रबिंब आकाशात लखलखत होते. अचानक ढगाचे सावट चंद्राला ग्रासून गेले आणि खोलीही काळोखात बुडली तशी जान्हवीने डोळे गपकन मिटून घेतले. रात्री तिला विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात एक सावली तिच्या उशाशी उभं राहून तिला निरखत होती.

त्यानंतर पुढचे काही दिवस सासूबाई तुटक तुटक वागत होत्या. जान्हवीने जवळीक साधायचा प्रयत्न केला परंतु फारसा उपयोग झाला नाही. सर्वांच्याच वागण्यात एक प्रकारचा दुरावा निर्माण झाला होता।
***
(क्रमश:)

marathi blogs