प्रकार

Tuesday, September 25, 2007

भूलनगरी

सूर्यप्रकाशाची तिरिप डोळ्यांवर पडली तशी सीमाने डोळे किलकिले केले. सकाळ झाली आहे हे क्षणभर तिला कळलेच नाही. शेजारी रवी अजूनही ढाराढूर घोरत होता. ती गादीवर उठून बसली आणि बेडरूमच्या भिंतीकडे भकास नजरेने पाहू लागली. का कोणास ठाऊक, तिला थोडसं कलकल्यासारखं वाटलं. समोरच्या भिंतीवर लटकणारा त्यांच्या लग्नातला फोटो गायब होता.

’अं?’ मनाशी आश्वर्य करत सीमाने सभोवार नजर फिरवली. तिचे ड्रेसिंग टेबल, त्यावरील क्रिस्टलची फुलदाणी, तिच्याबाजूचा दोघांचा फोटो, उजव्या कोपर्‍यातलं कपाट, खिडकीला तिने लावलेले नवे सिल्कचे पडदे सगळेच नाहीसे झाले होते.

’आई गं!’ तिच्या मस्तकात तीव्र कळ उठली तसा तिने हात कपाळावर नेला. कपाळावर रुपयाच्या नाण्याएवढं टेंगूळ आलं होतं. क्षणभर ती विचारात पडली आणि त्यानंतर तिने रवीला गदगदा हलवायला सुरुवात केली.

“उठ रवी! हे बघ काय आहे? आपण बघ कुठे आहोत? अरे उठ, आपण आपल्या घरात नाही आहोत. भलतीकडेच कुठेतरी आहोत.” रवी उठला तो डोकं गच्च धरूनच. "कशाला बोंबलते आहेस? आधीच डोकं जाम चढलंय माझं.” तो सीमावर डाफरला.

“चढेल नाहीतर काय? इतकं प्यायची गरज होती का पार्टीत काल? अरे पण बघ ना! आपण कुठे आहोत नक्की? हे आपलं घरंच नाहीये.” सीमाच्या नजरेत काळजी दिसत होती. रवीनेही खोलीवरून नजर फिरवली. त्याच्या ओळखीचे त्या खोलीत काहीच नव्हते पण खोली छान प्रशस्त होती. तो ताडकन उठला आणि त्याने आपल्या विस्कटलेल्या केसांतून बोटे फिरवली.

“ऑं! असं कसं झालं?" सभोवार नजर फिरवून रवी म्हणाला, "काल रात्री कार तू चालवत होतीस. तूच कुठेतरी घेऊन आलीस. कोणाच्या घरात आहोत आपण? चल या खोलीच्या बाहेर पडू. घरात कोणी असेल त्यांना विचारू इथे कसे पोहोचलो ते.”

रवी आणि सीमाच्या एका मित्राने, मोहनने नुकतेच खंडाळ्याच्या जवळ एक फार्म हाऊस घेतलं होतं. काल त्याने सर्वांना पार्टी ठेवली होती. बरेच दिवसांनी मित्र-मित्र जमल्याने रवीने नेहमीपेक्षा थोडी जास्तच घेतली होती. रात्री गाडी चालवणं अशक्य झालं तसं सीमाने ड्रायविंग करण्याचं ठरलं. मोहनने आणि त्याच्या बायकोने; नीताने, रवी आणि सीमाला फार्म हाऊसवरच राहण्याचा आग्रहही केला होता. शनिवारची रात्र होती, दुसर्‍या दिवशी रविवार होता पण रवीला काही कामं निपटायची होती त्यामुळे परत येणं भाग होतं.




---

रवी आणि सीमा दोघे त्या खोलीच्या बाहेर पडले तसे त्यांना जाणवलं की त्यांची बेडरूम पहिल्या माळ्यावर होती. जिना उतरून खाली येताना रवीने मोठ्याने विचारलं, “अहो कोणी आहे का इथे? हलो!!” घरातली शांतता अजिबात बिघडली नाही. कोणी नव्हतंच बहुधा घरात. तळमजल्यावर लिविंगरुमला लागून स्वयंपाकघर दिसत होते. तिथे कोणी असेल तर म्हणून रवी आणि सीमा स्वयंपाकघराच्या दिशेने गेले. यावेळेस सीमाने हाक दिली, “कोणी आहे का घरात? इथे कसे पोहोचलो आम्ही?” घर तरीही शांतच राहिले. त्या दोघांनी आणखी दोन चार हाका मारल्या पण घरातून कोणतीही हालचाल झाली नाही.

"मला वाटतं रवी की काहीतरी घोटाळा आहे. आपण स्वत:हून इथे आलो नाही, आपल्याला इथे कोणीतरी घेऊन आलं आहे.” सीमा हळूच म्हणाली.

“हो? मग तू आठव ना, तू ड्रायविंग करत होतीस. तुला आठवायला हवं की आपण इथे कसे आलो? आपल्याला इथे कोणी आणलं?.”
“मी ड्रायविंग करत होते आणि तू मागच्या सीटवर अस्ताव्यस्त पसरला होतास. मला इथे कसे आलो ते काही आठवतच नाही.” सीमा वैतागून म्हणाली.
“काल तू कोक पीत होतीस त्यात काही घातलं होतंस का गं हळूच!” रवीच्या चेहर्‍यावर मिश्किल झाक होती.
“मस्करी करू नकोस रे! मला ना जरा भीती वाटायला लागली आहे.”
“बरं! बरं! असं करू, मोहनला फोन करू. तो फार्महाऊसवरून येईल इथे आणि घेऊन जाईल आपल्याला.” असं म्हणून रवी आपले खिसे चाचपडू लागला. “अरेच्चा! माझा सेलफोन आणि पाकिट गाडीत राहि्लं वाटतं”.
“गाडीत राहिलं की कोणी लंपास केलं?” सीमाचा चेहरा उतरला होता.“लंपास करणारे माझ्या हाताचं रिस्टवॉच, तुझं मंगळसूत्र, बांगड्या, अंगठी तसंच टाकून जातील का? ... बाहेर लिविंगरुममध्ये फोन आहे तिथून फोन करतो.”

रवीने बाहेरच्या खोलीत जाऊन फोन उचलला आणि कानाला लावला. पलीकडून काहीच आवाज नव्हता. त्याने वायर तपासली. वायर हवेत लोंबकळत होती. स्वयंपाकघराच्या दारात सीमा उभी होती तिला त्याने ती वायर दाखवली. “कोणीतरी फोन डिसकनेक्ट करून ठेवला आहे.”

“रवी इथून बाहेर पडूया. आपली गाडी आहे का बाहेर ते पाहू.” सीमा पुटपुटली.“अगं पण माझं डोकं जाम दुखतंय. थोडा चहा करतेस का? घरात ज्याने झोपायला दिलं तो आपण कपभर चहा प्यायला म्हणून काही म्हणणार नाही.”

सीमाने नाखुशीने फडताळातले शिस्तीत लावून ठेवलेले डबे उघडले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्वच्या सर्व डबे रिकामे होते. सीमाने स्वयंपाकघरातली लाकडी कपाटे उघडायला सुरुवात केली परंतु ती कपाटे इतकी घट्ट बसली होती की तिच्याच्याने ती उघडेनात. “ए रवी! हे कपाट दे ना रे उघडून. त्यात खायला काही सापडते का ते पाहते.”

रवीनेही नेटाने प्रयत्न केला पण दार घट्ट बसले होते. त्याने असेल नसेल तो सर्व जोर काढून दार खेचलं तसा दाराचा नॉब त्याच्या हातात आला. “ऑं! हा काय प्रकार आहे? हे दार कोणीतरी घट्ट चिकटवून बंद केले आहे की काय?” रवी आश्चर्याने मागे सरकला. त्याने झटदिशी सीमाचा हात पकडला आणि तो तिच्या कानापाशी पुटपुटला, “इथून बाहेर जाऊया! काहीतरी घोटाळा दिसतो.” घाईतच ते दोघे घराबाहेर पडले.

सकाळचे १० वाजले असावेत. रस्त्यावर शुकशुकाट होता. रस्त्याच्या दुतर्फा घरं होती, दुकानं होती मात्र कोठेही चिटपाखरू दिसत नव्हतं. रवी आणि सीमाने नजर फिरवून सर्वत्र पाहिलं पण कोणतीही हालचाल त्यांच्या नजरेने टिपली नाही.

“सीमा! चल शेजारच्या घराची बेल वाजवूया. कोणीतरी असेल तर पाहू. विचारू काय प्रकार आहे तो.” रवीने सीमाचा हात धरून तिला ओढतच शेजारच्या घराकडे नेलं. दाराची बेल वाजवली तशी ती वाजल्याचा आवाजच आला नाही म्हणून त्यांनी दरवाजा ठोठवला, पण आतून कोणतीही चाहूल लागली नाही तशी ती दोघं पुन्हा रस्त्यावर आली.

“ हे रे कुठे आलो भलतीकडे आपण? इथे सर्वत्र स्मशानशांतता आहे. मला भीती वाटायला लागली आहे. सगळी घरं कशी बंद दिसताहेत. त्यांत कोणीतरी लपून आपल्याला पाहात असेल तर? आपल्यावर पाळत ठेवून असेल तर?”

“घाबरतेस काय? मस्त कोवळं ऊन पडलंय. कोण खायला येतंय सकाळच्या वेळी? आपली कार असती तर बसून सरळ हायवेला लागलो असतो पण तुला आठवतच नाही कार कुठे गायब झाली ते.” रवीचा टोमणा सीमाला फारसा आवडला नसावा.

“रवी, मला वाटतं की काल आपण रस्ता चुकलो होतो. मी काल ड्राईव करत होते ना तेव्हा हायवेवर मध्येच रस्त्यावर दिवेच नव्हते. एकेठिकाणी मला रस्ता थोडा अरुंद झाल्यासारखा वाटला. ओळखीचा वाटत नव्हता, आणि मग नंतर काय झाले ते नाही आठवत.... तुला कित्तींदा सांगितलं की इतकी पित जाऊ नकोस. मला रात्रीबेरात्री गाडी चालवण्याची सवय नाही हे माहित होतं तुला.” सीमाने बोलता बोलता आवाज चढवला.

“मला आता कळेनासं झालंय की प्यायलं कोण होतं? मी प्यायलो होतो म्हणून मला आठवत नाही पण तुलाही कसं आठवत नाही की पुढे काय झालं ते? आर यू शुअर की तू एखादा पेग मारला नाहीस?”

“पुरे हं रवी! वाट्टेल ते विनोद करू नकोस.” सीमाने त्याला तिथेच तोडलं. “आता आपण काय करायचं ते सांग. या रस्त्यावरून सरळ चालत जाऊया. हाका मारूया लोकांना. सकाळची वेळ आहे. कामासाठी घरातून बाहेर पडणारी माणसं, शाळेला जाणारी पोरं तरी दिसायला हवी होती. रवी, आपण एखाद्या ग्रेव्हटाऊनमध्ये नाही ना आलो.”

“म्हणजे ते इंग्रजी चित्रपटात दाखवतात तसं? गावातले सगळे मृत असतात आणि ते झोंबी का काय बनून जिवंत माणसांच्या मागे जातात...” रवीने दोन हात हवेत पसरले आणि सीमाकडे पाहून दात विचकले.

“प्लीज बी सिरिअस रवी! तुला काहीच वाटत नाहीये का रे? आपण कुठेतरी येऊन फसलोय हे नक्की. चल ना त्या समोरच्या दुकानात जाऊ. ते उघडलंय म्हणजे कोणीतरी असणार आत.”

ते दोघे दुकानासमोर उभे राहिले. दुकानात अनेक गोष्टी मांडून ठेवलेल्या दिसत होत्या. त्यांनी बराचवेळ हाका मारल्या तरी कोणी बाहेर आले नाही. रवीने सीमाकडे पाहून डोळा मारला आणि दुकानात समोर ठेवलेला बिस्किटांचा पुडा हळूच आपल्या खिशात सरकवला. सीमाने रागाने त्याच्याकडे पाहिले तसे तो चटकन दुकानाबाहेर पडला. “हे काय केलंस?” सीमा मागोमाग येत खेकसली.

“अगं, काहीतरी पोटात नको का ढकलायला? बिस्किटं तर बिस्किटं!” म्हणत रवीने पुड्याचे वेष्टन फोडले आणि आ वासून तो पुड्याकडे पाहात राहिला. “अरेच्चा! पुडा चक्क रिकामा आहे की...असा रिकामा पुडा का ठेवला असावा त्या दुकानात?” रवीने डोळे विस्फारले आणि पुडा भिरकावून दिला. "विक्षिप्तच प्रकार आहे सगळा.” असे म्हणून तो रस्त्यावरून पुढे जाऊ लागला तसे सीमाने त्याला धावतच गाठले. रस्ता अद्यापही निर्मनुष्य होता.

“ए रवी तू एक पाहिलंस या ओसाडवाडीत पक्षांचा किलबिलाटही नाही, झाडंही किती तुरळक आहेत आणि कशी बावलेली, मृतवत दिसताहेत. एखादं भटकं कुत्रंही नाही.” सीमा पडेल आवाजात म्हणाली.

रवीलाही गावातला वेगळेपणा जाणवू लागला होता. सीमासारखं आपल्याला भिऊन चालणार नाही हे त्याला कळत होतं. त्याचं डोकं अजूनही ठणकत होतं. “थोडसं पाणी मिळेल तर बरं होईल, तहान लागली आहे.” त्याची नजर सभोवार फिरत होती. काही अंतराने रस्ता सोडून डावीकडे एक विहिर त्याच्या नजरेला पडली तसं दोघांनी विहिरीकडे जाणारा रस्ता पकडला. विहिरीवर आडाला बांधलेला पोहरा रवीने घाईघाईने आत सोडला.

’टण्ण!!’ आश्चर्याने रवीने विहिरीत डोकावून पाहिले. विहिर साफ सुकी होती. आत पाण्याचा टिपूसही नव्हता. पोहरा जोरात जमिनीवर आदळल्याचा आवाज झाला होता. रवीने भुवया आक्रसल्या, “सीमा, खरंच घोटाळा आहे काहीतरी इथे. विचित्रच गाव आहे. एकही सजीव गोष्ट दिसली नाही आपल्याला आतापर्यंत. काल आपला ऍक्सिडेंट झाला का गं? म्हणजे आपण मेलो असलो तर?”
“रवी अरे काहीतरीच काय बडबडतो आहेस?”
“काहीतरीच कसं? आपण मेलो असलो आणि हा नरक असला.. आपल्या पापांची शिक्षा अशाप्रकारे दिली असेल तर? अनंतापर्यंत आपण याच गावात राहायचं.. फक्त मी आणि तू.”
“पापांची शिक्षा? आपण कोणती पापं केली आहेत? आणि नरक काय असा असतो?” रवी चिडवतो आहे की गंभीर आहे ते न कळल्यानं सीमा तडकून म्हणाली, “हे बघ! मी इथे जास्त वेळ काढू शकत नाही. तू येतो आहेस ना? मी मुख्य रस्त्याने चालायला सुरुवात करणार आहे. गावाबाहेर हायवे मिळेल नाहीतर एखादा मोठा रस्ता. तिथे काही ट्रान्सपोर्ट मिळतो का पाहू.”

रवीने निमूटपणे तिच्याबरोबर चालायला सुरुवात केली तरी नजरेने तो सतत हालचाल शोधत होता. मुख्य रस्त्यावर दूरवर त्यांना एक देऊळ दिसले तसे रवीने चेहर्‍यावरच्या रेषा सरळ करत सीमाचे लक्ष देवळाकडे वेधले.

“आहा! सीमा, म्हणजे आपण नरकात नसणार. ते बघ देऊळ दिसतंय. त्यात पुजारी भेटतो का पाहू.” असं म्हणून रवीने पुन्हा सीमाचा हात पकडला आणि तिला ओढतच तो देवळाच्या दिशेने जाऊ लागला. देवळाच्या मोजक्या पायर्‍या चढून त्या दोघांनी चौथर्‍यावर प्रवेश केला. देवळातही शुकशुकाट होता. गाभार्‍याच्या दिशेने जात त्यांनी पुजार्‍याला हाका मारायला सुरुवात केली. कडक उन्हातून गाभार्‍यात प्रवेश केला तशी दोघांच्याही डोळ्यासमोर अंधारी आली. काही क्षणांनी डोळे किलकिले केल्यावर सीमाला देवळाचा गाभारा रिकामा दिसला. मूर्ती, समया, दिवे, कलश कशाकशाचाही त्या गर्भगृहात पत्ता नव्हता. भरला होता केवळ अंधार.

“हे काय अभद्र?” सीमा चित्कारली. हे एखादे मृतांचे गाव असावे अशी कल्पना गेला काही वेळ तिच्या डोक्यात घोळत होती ती खरीच असावी असे तिला पुन्हा एकदा वाटून गेले. धावतच ती बाहेर आली आणि देवळाच्या पायर्‍यांवर डोकं धरून बसली.

खांद्यावर रवीचा हात पडला तशी ती मुसमुसू लागली. “इथून बाहेर पडू रवी. आता इतर कुठे थांबायचं नाही, सरळ रस्त्याला लागूया. आपल्याला फसवून कोणीतरी इथे आणलं आहे. मगासपासून आपल्यावर कोणीतरी पाळत ठेवून असल्यासारखं वाटतंय.”

“बरं चल!” रवीला प्रकरणातील गांभीर्याची कल्पना आली होती. त्याने सीमाला उठायला मदत केली. दोघांनी पुन्हा मुख्य रस्ता धरला. सूर्य डोक्यावर तळपायला लागला होता. किती चालायचं, कुठे जायचं, कसं जायचं या सर्व प्रश्नांनी डोक्यात फेर धरला होता पण एका जागी वाट बघत बसण्यापेक्षा कुठेतरी गेलेलं बरं असं म्हणून दोघे पावले ओढत निघाले. अदमासे अर्धा मैल चालणे झाले असावे. समोर धुळीचा लोट उडताना दिसला. त्या लोटातून एक मळकट एसटी येत होती.

“सीमा पळ! ही एसटी आपल्याला पकडायलाच हवी.” असं म्हणत रवी वेड्यासारखा धावत सुटला आणि त्याच्यामागे सीमाही. एसटी मंदगतीने जात होती. रवीने चालत्या एसटीत झटकन उडी मारली आणि मागून येणा‍र्‍या सीमासाठी हात पुढे केला, “हात दे!” असे म्हणून त्याने सीमालाही आत घेतले.
धापा टाकत दोघे दरवाजाशेजारच्या सीटवर कोसळले. “रवी! वाचलो रे, सुटलो एकदा या विचित्र जागेतून.” असं म्हणत सीमाने आपले डोके रवीच्या खांद्यावर टाकले. रवीनेही डोळे बंद करून आपले डोके सीमाच्या डोक्यावर टेकवले. क्षणभराने रवीने डोळे उघडले तसे एसटीत कोणीही चिटपाखरू नजरेस पडले नाही. एसटीचा वेग अचानक वाढल्यासारखा वाटला. सीमानेही डोळे उघडून इथेतिथे नजर फिरवली.
“सीमा, एसटीत कोणी नाहीये. फक्त आपण दोघेच!” रवी कुजबुजला. सीमाने हे अपेक्षितच असल्याच्या आविर्भावात फक्त मान डोलवली. ती आश्चर्याने खिडकीतून बाहेर पाहत होती. रवीने खिडकीबाहेर नजर टाकली आणि काहीच क्षणात त्याला काय घडतं आहे याचा अंदाज आला. एसटी त्या माळरानावर गोल गोल चकरा मारत होती. एकाच ठीकाणी!

“मी..मी पुढे जाऊन ड्रायव्हरला विचारतो की हे काय चाललय?” रवी पुन्हा कुजबुजला तसा सीमाने त्याचा हात घट्ट पकडला, “रवी! मला नाही वाटत आपली यातून सुटका आहे असं.” तिला हुंदका अनावर झाला.“वेडी का? समोर ड्रायव्हर दिसतो आहे. मी विचारतो त्याला.” म्हणून रवी जागेवरून उठला.“सांभाळून रे!” चालत्या एसटीत ताडताड पावलं टाकत रवी ड्रायव्हरच्या जवळ उभा राहिला. "थांबवा! ही एसटी थांबव इथेच नाहीतर..." सर्व त्राण एकवटून त्याच्या तोंडातून शब्द बाहेर आले... नाहीतर आपण काय करणार याची त्याला कल्पनाही नव्हती.

करकच्चून ब्रेक्स दाबून एसटी थांबली तशी रवी उभ्या जागेवरच कोलमडला. फाटक्या अंगाचा, पोरगेलासा ड्रायवर, गालावर दाढीचे खुंट खाजवत तरवीकडे आश्चर्याने पाहात होता.

“ओ सायेब! वरडताय कशापाय? काय जालं बोंबलायला? ह्ये घ्या थांबवली यश्टी!” त्याने उलटा आवाज काढला. रवी धडपडत उभा राहिला. सीमाही मागच्या सीटवरून धावत त्याच्यापाशी आली.“कुठे जाते आहे ही एसटी? कोणत्या गावाला?” सीमाने तोंड उघडले.
“कोन्त्या बी गावाला जात न्हाय. हितंच फेर्‍या मारती हाय.” ड्रायवरने आपले तंबाखू खाऊन पिवळे झालेले दात उचकटले.
“रवी, चल आपण उतरूया आधी.” सीमाने काकुळतीला येऊन म्हटले. रवी आपल्या पायांवर स्थिरस्थावर झाला होता, त्याने पुढे सरून ड्रायवरची बकोट पकडली, “साल्या! काय प्रकर आहे तो सांग नाहीतर देतो तुला सटकावून.” अचानक हल्ल्याने ड्रायवर जागीच सटपटला, “ओ सायेब! कालची उतरली न्हाय वाटतं, च्यामारी! या लोकास्नी मदत करा आनी यांचा मार बी खा.. तुमा सायब लोकांची तराच न्यारी.”
“आं!” रवीने त्याची बकोट सोडली, “कसली मदत?”
“कसली मदत काय इचारता राव? काल तुमी दोगं तर्र हून गाडी हाकत व्हता. या बाईंनी गाडी रस्ता सोडून आन्ली आनी झाडाला ठोकली. दोगंबी तितंच ढेर जालं व्हतं. मी आनि रफिकचाचानं पायल म्हून बरं! तुमा दोगांना आन गाडीला फार काय जालं नवतं. तिचातूनच आनलं काल रातच्याला तुमाला हितं, आनी बंगलीत झोपवलं.”
“दोघंही तर्र होतो?” रवीने संशयाने सीमाकडे पाहिलं.
“नीता म्हणत होती की वाईन जुनी आहे, मुरलेली. थोडी चव बघ.” सीमा खजील होऊन म्हणाली.
“वा! आणि पिऊन तर्र झालो म्हणून शिव्या खायला मी,” रवी चरफडला.

एव्हाना रवी, सीमा आणि ड्रायवरचे त्रिकुट एसटीमधून खाली उतरले. “आणि आमची गाडी कुठे आहे?” रवीच्या आवाजातला संशय कायम होता.“हेडलाईट फुटलाना वं. रफिकचाचा रिपेअर करायला गेला हाय. सक्काळी धा वाजताच. यील थोड्यायेळानं. मग जा तुमी तुमच्या गावाला.”
“हं! आणि तुम्ही दोघे कोण? या गावातले वेताळ आणि संमंध?”
“आं!” ड्रायवरला काही समजलं नसावं, “मी चंदू. मी आनी रफिकचाचा हितलं केयरटेकर हाय.”
“केअरटेकर? साल्यानो या स्मशानालाही केअरटेकर लागतो होय.” रवीला अजूनही काहीतरी घोटाळा असल्यासारखे वाटले.
“ओ सायेब! शिव्या कशापाय देता? ह्ये समशान दिसतं का तुमाला?”
“नाही स्मशान नाही हे नंदनवन आहे. सकाळपासून गावात फिरून दमलो. एक जिवंत प्राणी नजरेला नाही आला. घरांत माणसं नाहीत, विहिर सुकी, दुकान रिकामं, देवळात देव नाही, या तुझ्या एसटीत प्रवासी नाहीत.” रवी घुश्श्यात म्हणाला.
“चला सायेब! चा पिऊ.” चंदूला हसण्याची उबळ आवरली नाही. “शामू शर्माच्या चित्रपटाचा स्येट हाय ह्यो. जंगी पिच्चर हाय म्हनतात. गेला म्हयनाभर समदं हितंच व्हतं, त्ये शूटींग चालू होतं. पन त्या हिरोचं आनी शामू सायबांच मधीच कायतरी बिनसलं बगा. गेले धा दिस शूटींग बंद व्हतं. उंद्यापास्न पुन्यांदा चालू व्हईल, म्हून काल खरेदीसाटी मी आन रफिकचाचा गेलो व्हतो. रातच्याला परत यीताना तुमची गाडी आमच्या फुडं, येकदम भन्नाट जात व्हती. धाडकन आपटली तशी आम्ही उतरलो आनि तुमा दोगांना भायेर काडलं आनी हितं आनलं. मला वाटलं दुपारपातुर उटनार न्हाय तुमी दोगं म्हून मी माजं काम करत व्हतो. या येश्टीची टेश्ट घ्यायची व्हती पर तुमी येवड्या गुश्श्यात याल आसं वाटलं न्हाय...”

रवीचा चेहरा गोरामोरा झाला होता. त्याने मान वळवून सीमाकडे पाहिले तशी तिने नजर खाली वळवली. रवीच्या चेहर्‍यावर स्मितरेषा उमटली, आता सर्व घोळ त्याच्या ध्यानात येत होता. त्याने चंदूच्या पाठीवर थाप मारली. “चंद्या! लेका चुकलो यार! तू आणि रफिकचाचा होता म्हणून आम्ही ठीकठाक आहोत. चल चहा पाज. डोकं अजून भणाणतंय आणि घशालाही कोरड पडलीये.” असं म्हणत त्याने आपला हात सीमाच्या खांद्यावर ठेवून त्तिला जवळ ओढलं आणि तोंड तिच्याजवळ नेऊन तो कुजबुजला, “झेपत नसेल तर पिऊ नये माणसाने आणि प्यायली तरी गाडी कधीच चालवू नये. चल! आता चंदूच्या हातचा चहा पिऊ.”

Friday, July 27, 2007

असा म्हसोबा, जन्मभरचा नवरोबा असतो

मनोगतावरील एका कवितेवरून हे विडंबन सुचले. याला विडंबन म्हणावे की प्रेरणा याबाबत मनात थोडा संदेह आहे.

सांभाळत ढेरी टकलावरचे केस चार विंचरतो
आरशामध्ये चोरून शतदा स्वतःला बघतो
अजूनही चाळीशीची बायको परी दिसावी म्हणतो
असा म्हसोबा, जन्मभरचा नवरोबा असतो


रोज सकाळी टॉमी*ला हा हमखास विचारतो
"फेरफटका मारायला का तू म्हशीस सोबत नेतो?"
सुडौल बांधा माझा याला कधी न जाणवतो
असा म्हसोबा....


हादडताना मचमच आवाज कशाला करतो?
भाजीआमटी भुरका मारून हा ओरपतो
घासाघासाला अपुल्या आईला आठवतो
असा म्हसोबा...


ऐकते जेव्हा मध्यरात्री याला घोरताना
शेजारणीला स्वप्नात पाहूनीया हसताना
पाठीमध्ये दणका याच्या घालावा वाटतो
असा म्हसोबा...


* टॉमीने येथे घरातला पाळीव कुत्रा असणे क्रमप्राप्त आहे.

----
माफीपत्र:


कवयित्रीला (खरंतर लेखिकेला) काव्य कसे करतात याची अजिबात कल्पना नाही. वृत्त, मात्रा, छंद हे शब्द तिला केवळ लिहिता येतात, त्यातले काही कळत नाही याची जाणीव ठेवून आणि हा तिचा पहिलाच प्रयत्न असल्याने तिला मोठ्या मनाने माफ करावे.

Monday, July 09, 2007

वाळवंटातील हिरवळ - लास वेगास

लास वेगासला विमान उतरायला लागले तत्क्षणी समोर दिसणार्‍या सुप्रसिद्ध वेगास स्ट्रिपने मनाला भुरळ घातली. स्पॅनिश भाषेत लास वेगासचा अर्थ वाळवंटातील हिरवळ (कुरण) असा सांगितला जातो. नजरेच्या टप्प्यात येणार्‍या मंडाले बे हॉटेलच्या सोनेरी झळाळणार्‍या इमारती, त्याच्या शेजारी लक्सरच्या काळ्याभोर पिरॅमिडसमोर विसावलेला शुभ्र स्फिन्क्स, त्यापुढे दिसणारा एक्सकॅलिबरचा परीकथेतील प्रशस्त राजवाडा, न्यूयॉर्क न्यूयॉर्कचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, पुढे नजरेच्या टप्प्यात येणारा आयफेल टॉवर पाहून प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला होता. एकाच लास वेगासला हे सर्व आहे. सुट्टीचा आनंद घेणे, खरेदी करणे, रात्रीची खास करमणूक आणि जुगार यांच्याबद्दल प्रसिद्ध असलेले अमेरिकेतील हे सुप्रसिद्ध स्थळ जणू डोळे मिचकावून खुणावत होते.

लास वेगास एअरपोर्टला उतरले की स्लॉट मशीन्सचा खणखणाट ऐकू येतो असे पूर्वी मनोगतावरील एका लेखात वाचले होते. माणसाला जुगाराची आवड तरी किती असावी हे सांगणे अशक्य असावे. आयुष्यच जेथे एक जुगार आहे तेथे प्रत्येक माणूस जुगारीच ठरेल असे वाटते. लास वेगासला उतरल्यावर स्लॉट मशीन्सवर बसलेल्या बाया, पुरूष, म्हातारे कोतारे पाहून त्याची प्रचीती आली.

एअरपोर्टच्या बाहेर शटल बस पकडून आम्हाला एक्सकॅलिबरला जायचे होते. वातानुकूलित दरवाज्यातून बाहेर पडलो तसा भपकन ऊनाचा आणि उष्ण हवेचा झोत अंगावर आला. 'बापरे कित्ती गरम आहे इथे?' असा उद्गार तोंडातून बाहेर काढला तसा समोरचा अटेंडंट म्हणाला, 'ओह! उद्या दुपारी ११० डी फॅ. जाईल तेव्हा तुम्हाला खरा उन्हाळा भासेल.'

लास वेगासला कोठे कोठे फिरायचे याची यादी आम्ही पूर्वीच तयार केली होती. दोन दिवस लास वेगासला काढले की पुढचे दोन दिवस ग्रॅंड कॅनयन पाहायला जायचे आणि पुन्हा परतून दोन दिवस लास वेगासला राहायचे असा बेत होता. काही नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींनी लास वेगास एक-दोन दिवसांत बघून होतं, इतके दिवस काय करणार? असे निघण्यापूर्वी विचारले होते. 'काही नसेलच तर आराम करू. ते काय कमी आनंददायी आहे?' असे त्यावर आमचे उत्तर होते.



DSC00129
एक्सकॅलिबर



पहिले दोन दिवस अर्थातच एक्सकॅलिबरला राहायचे होते. त्या हॉटेलात प्रवेश केला, आजूबाजूला नजर फिरवली तशी छाती दडपली. याला हॉटेल म्हणावे की एखादे लहानसे स्वयंपूर्ण नगर असा प्रश्न पडला. रेस्टॉरंट्स, लहान-मोठ्या गोष्टींची दुकाने, बेकरी, गाड्या भाड्याने देण्याघेण्याचे स्थान, सहलींसाठी आरक्षण केंद्रे, चित्रपटगृह, जलतरण तलाव, स्पा आणि त्यांच्या दरम्यान पसरलेला अवाढव्य कसीनो. या मायानगरीत एकदा पाऊल टाकले की दिवस आहे की रात्र याचे भान राहत नाही. दिव्यांचा चकचकाट, स्लॉट मशीन्सचे खटके दाबणारे लोक, पोकर टेबलवर बसून बोली लावणारे ग्राहक, त्यांच्या बोली लावणारे झगमगीत कपड्यांतले सेवक, मध्येच विद्युतवेगाने भटकणार्‍या आणि 'कॉकटेल्स' म्हणून ग्राहकांच्या मागण्या पुरवणार्‍या तंग कपड्यांतल्या नटव्या सेविका डोळे दिपवून टाकतात.

लास वेगासचे एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर येथे जागोजागी शृंगाररस वाहताना दिसतो परंतु तो बीभत्स होऊ नये याची पुरेपुर काळजी बाळगलेली आढळते.

दोन दिवस या हॉटेलचा पाहुणचार घेऊन, वेगासच्या १२ महिने दिवाळी असलेल्या रस्त्यांवरून फेरफटका मारला, करमणुकींचे काही कार्यक्रम पाहिले, कसीनोमध्ये वेळ काढला, खाद्यपदार्थांची लयलूट असणार्‍या बफे जेवणपद्धतीचा आस्वाद लुटला आणि आम्ही ग्रॅंड कॅनयनच्या भेटीला गेलो.



DSC01034
कसिनो



तेथून परत आल्यावर वेगास स्ट्रिपच्या बाहेर ऑर्लियन्स या हॉटेलमध्ये राहिलो. यावेळेस बाहेर फारसे फिरायचे नसल्याने स्विमिंगपूल, कसीनो, चित्रपट आणि लास वेगासच्या जवळपास असणार्‍या मोजक्या आकर्षणांना भेट दिली.

या निमित्ताने दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणार्‍या या नगरीबद्दल एक लेख लिहावा असे मनात आले. अमेरिकेतील आपले बहुसंख्य सदस्य यापूर्वीच या नगरीला भेट देऊन आले असतील, तरीही नव्याने जाणार्‍या पर्यटकांना या माहितीचा उपयोग होईल असे वाटते. लास वेगासला भेट देऊन आलेल्या सदस्यांनीही यथाशक्ती आपल्याकडील माहिती पुरवावी.



DSC01058
बेलाजियोचे नाचते कारंजे



लास वेगासची सहल कशी ठरवावी?

सहल ठरवण्याच्या ६ ते ४ महिने पूर्वीपासूनच लास वेगासची डील्स तपासावीत. नेटावर माहिती मुबलक असल्याने आपल्याला हवी ती एअरलाईन्स, हॉटेल, भाड्याची कार यांची सोय करता येईल. सहलीपूर्वी अर्थातच लास वेगासचे तापमान बघून घ्यावे. वसंत आणि शरद ऋतूत लास वेगासची सहल ठरवणे सर्वात उत्तम. लास वेगासचा उन्हाळा अतिशय कडक असतो. बाहेर फिरून कातडी भाजण्याची शक्यता असते. अशावेळी पाठीच्या पिशवीत पाणी आणि उत्साहवर्धक पेयाच्या बाटल्या, डोक्यावर टोप्या, डोळ्यांवर सूर्यचष्मे आणि अंगाला सनस्क्रीन लोशन (सूर्याच्या तापापासून संरक्षण देणारे मलम) चोपडायला विसरू नये.

याचबरोबर आपल्याला कसीनो आणि रात्रीच्या कार्यक्रमांवर किती डॉलर्स खर्च करायचे याचा अंदाज आधीच घेऊन ठेवावा. वाळवंटातील ही हिरवळ बर्‍याचजणांसाठी वाळवंटातील मृगजळ ठरल्याचे अनुभव ऐकू येतात म्हणून हा सावधगिरीचा इशारा.

कोठे राहावे?

लास वेगास स्ट्रिपवर राहणे सर्वात उत्तम, लास वेगासमधील चांगली हॉटेल्स येथेच असून या रस्त्यावर फिरणे सुकर होते. लास वेगासला कारने गेला असाल तर त्या कारला तुमच्या हॉटेलच्या पार्किंग लॉटमध्ये विश्रांती देणे उत्तम. या रस्त्यावर पहाटेपर्यंत प्रचंड रहदारी असते आणि एका ठिकाणापासून दुसर्‍या ठिकाणी जाण्यास प्रचंड वेळ लागतो. या रस्त्यावर दुमजली बसेस सतत पळत असतात. प्रत्येकी ५ डॉ. मध्ये २४ तासांचा पास विकत घेता येतो. या पासामुळे तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या बसेसमधून हवे तितके वेळा प्रवास करू शकता.
लास वेगास स्ट्रिपवरील हॉटेल्स त्यामानाने बरीच महागडी आणि दाटीवाटीची आहेत. या हॉटेल्सच्या खोल्याही लहान असतात. त्यामानाने या रस्त्याच्या बाहेर इतरत्र राहिल्यास कमी खर्चात मोठ्या खोल्या, अधिक सोयीसुविधा मिळतात.



DSC00133
न्यूयॉर्क, न्यूयॉर्क



काय पाहावे आणि करावे?

येथील सर्वच पाहण्यासारखे आहे. एकेक हॉटेल पाहायचे झाले तर अर्धा दिवस लागतो. इंटरनेटवरून निघण्यापूर्वीच तुम्हाला पाहायचे जे कार्यक्रम आहेत त्यांचे बुकिंग करता येईल. त्यामुळे ऐनवेळेस तिकिटे मिळाली नाहीत असा हिरमोड होणार नाही.

लहान मुले बरोबर असतील तर रात्रीचे जीवन पाहणे दुरापास्त होईल परंतु तरीही इतर अनेक पाहण्यासारखी स्थळे आहेत. बर्‍याच हॉटेल्सच्या समोर पर्यटकांसाठी फुकट कार्यक्रम आयोजीत केलेले असतात. यांत ट्रेजर आयलंडच्या सायरन या सुंदरींचा कार्यक्रम, मिराजमधील ज्वालामुखी धबधबा आणि बेलाजियो या हॉटेल समोरील सरोवरातील नाचत्या कारंज्यांचा कार्यक्रम विशेष उल्लेखनीय आहेत.

हॉटेल्सच्या बाहेर अनेक प्रकारे केलेली झगमगती रोषणाई हा ही पाहण्यासारखा प्रकार असतो. तसेच काही हॉटेल्समध्ये ठेवलेले वाघ-सिंह, डॉल्फिन शो, मत्स्यालये, लेजर शो असे अनेक कार्यक्रम तिकिटे विकत घेऊन पाहता येतात. सीझर्स पॅलेसमधील देखावे, वेनेशियनमधील वेनिस शहराची प्रतिकृती आणि गंडोला सफर, आयफेल टॉवरच्या माथ्यावरून दिसणारी जादुई नगरी. इ. इ.

मोठ्यांसाठी अनेक प्रकारचे बहुरंगी करमणुकींचे कार्यक्रम असतात. यात स्ट्रिप शोजपासून मोठमोठ्या गायकांचे, जादूगारांचे कार्यक्रम, प्रसिद्ध अभिनेते, कलावंतांचे एकपात्री कार्यक्रम, बॉक्सिंग आणि इतर खेळ यांचा समावेश असतो.

काहीच करायचे नसेल आणि हॉटेलमध्येच वेळ काढायचा असेल तर तुमच्या राहत्या हॉटेलमध्ये असणार्‍या सिनेगृहात एक मस्तसा "पिच्चर" टाकता येतो. तलावात अंग चिंब करता येते. कसीनो तर असतोच.

मुलांना घेऊन जावे का?

लास वेगासला मुलांना सहसा बरोबर नेले जात नाही कारण तेथील आनंद फक्त मोठ्यांनाच लुटता येतो, हा थोड्याप्रमाणात गैरसमज म्हणावा लागेल. मोठ्यांसाठी अधिक आकर्षणे येथे नक्कीच आहेत परंतु लहानांना आवडतील अशी गेम आर्केड्स, कार्यक्रमही येथे भरपूर आहेत. कसीनोमध्ये मुलांना प्रवेश नसला तरी त्यातून त्यांना वाटचाल करता येते. एके ठिकाणी थांबून राहता येत नाही.

काही हॉटेल्स 'किड्स फ्रेंडली' म्हणून ओळखली जातात. या हॉटेल्समध्ये सहसा स्ट्रिप शोज ठेवलेले नसतात. तसेच मुलांना सांभाळण्यासाठी प्रशस्त पाळणाघरे असतात. मुलांना त्या पाळणाघरात ठेवून तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये वेळ घालवू शकता परंतु हॉटेलच्या बाहेर जाऊ शकत नाही.

तसे करायचे असल्यास वेगासला तुमच्या खोलीत तुम्ही नॅनी (दाई) बोलवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या दाया मुलांना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित असून त्यांच्याकडे तसा परवाना असतो. आम्ही ही सुविधा वापरून पाहिली नाही. ऑरलियन्समध्ये असणारी पाळणाघराची सुविधा मात्र वापरली आणि ती मुलांना अतिशय आवडते असा अनुभव आला. १३ वर्षांवरील मुलांना खोलीत एकटे राहता येते.

काय आणि कोठे खावे?

राहत्या हॉटेलमध्ये खाण्याची अनेक ठिकाणे मिळतील. सर्वान्न खाणार्‍या खवय्यांची वेगासला चंगळ असते. प्रत्येक हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर बफे असतो. यांत देशोदेशीचे चमचमीत पदार्थ पर्यटकांसमोर मांडले जातात. अमेरिकन, इटालियन, मेक्सिकन, चायनीज, मंगोलियन, जॅपनीज तसेच बार्बेक्यू, पिझ्झा, सॅलड्स, सूप असे अनेक प्रकार तुमच्या समोर मांडले जातात. जेवणानंतर खाण्यात येणार्‍या गोड पदार्थांचे नानाविध प्रकारही येथे मिळतात. वेगासला गेलेल्या प्रत्येकाने या बफेचा आनंद घ्यावा.

याखेरीज, अनेक सुशोभित आणि महागडी रेस्टॉरंट्स या हॉटेलांत असतात. यांत दाखल होण्यापूर्वी इवनिंग ड्रेस आणि गलेलठ्ठ पाकीट (किंवा क्रेडिट कार्डस) सोबत आहे याची खातरजमा करून घ्यावी.

फास्टफूडचे पर्यायही अशा हॉटेलांत भरपूर असतात. सबसँडविचेस, पिझ्झा आणि चायनीज रेस्टॉरंट्समुळे शाकाहारी लोकांचेही सहज निभावून जाते.
बाहेर स्ट्रिपवर आणि स्ट्रिपच्या बाहेर भारतीय रेस्टॉरंट्सही दिसतात.

आसपास पाहण्यासारखी ठिकाणे

बौल्डर सिटी कसीनो वगैरेसारखी वेगासच्या आसपास असणारी हॉटेल्स आणि त्यातील कार्यक्रमही तुम्हाला पाहता येतील. यांतील काही ठिकाणी शहरातील बसेस जातात तसेच तेथे कार घेऊनही जाता येईल.

सॅम्स टाऊन
वेगास स्ट्रिपच्या पूर्वेला काही हॉटेल्स आहेत त्यातील सॅम्स टाऊन कसीनो हे स्थळ उत्तम आहे. बेलाजियोप्रमाणेच परंतु बंदिस्त जागेत येथे कारंज्यांचा आणि लेजर लाईट्सचा कार्यक्रम फुकट दाखवला जातो. तो अप्रतिम आहे.



DSC00181
फ्रेमाँट स्ट्रीट लाइट्स


फ्रेमाँट स्ट्रीट

वेगास स्ट्रिपवरून डाऊनटाऊनला जाणारी बस पकडली तर ती तुम्हाला फ्रेमाँट स्ट्रीटला घेऊन जाईल. येथे फुकट लाइट शो पाहण्यास मिळतो. या रस्त्याचे छत एका प्रचंड पडद्याने बंदिस्त केले असून त्यावर काही लाखांच्या घरांत लाइट्स आहेत. ते प्रज्वलित करून येथे एक अनोखा कार्यक्रम सादर केला जातो. याचबरोबर नृत्य गायनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले असतात.

हूवर धरण


DSC01138
हूवर डॅम


ऍरिझोना आणि नेवाडा राज्याच्या सीमेवर वसलेले आणि कोलोरॅडो नदीवर बांधलेले हूवर धरण लास वेगासपासून सुमारे ३० मैलांवर आहे. धरणाची उंची सुमारे ७२६.४ फूट आहे. या धरणाचे पाणी अडवून तयार केलेले लेक मीड हे सरोवरही नयनरम्य आहे. लास वेगासहून हूवर डॅमला जाण्यासाठी सहल-बसचे आयोजीत केलेल्या असतात.






डिस्नी वर्ल्ड, डिस्नी लँड आणि लास वेगास ही अमेरिकेतील अतिशय अप्रतिम अशी मानवनिर्मित पर्यटनस्थळे आहेत. इच्छुकांना तेथे जाण्याची संधी लवकरच चालून येवो ही सदिच्छा.

अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांचा उपयोग होईलः

लास वेगासमधील आकर्षणे
हूवर डॅम
लास वेगासचे बारमाही तापमान

---
१. लेख लिहिताना त्याचा उद्देश या पर्यटनस्थळाची माहिती पुरवणे हा आहे. सदस्यांच्या प्रतिसादातूनही तिच अपेक्षा कायम राखली जावी.
२. या लेखातून अनेक शंका निर्माण होतील, मूळ लेखाशी प्रत्यक्ष संबंधित नसलेल्या शंकांसाठी इतरत्र वेगळी चर्चा सुरू करावी. लेखासंबंधित चर्चांचे स्वागत आहे.
३. लेख परिपूर्ण आहे असा लेखिकेचा दावा नाही. चुका आढळल्यास प्रतिसादातून त्यांच्याविषयी लिहून लेखाला हातभार लावावा.
४. चित्रांवर टिचकी मारली असता ती मोठी करून पाहता येतील.

Friday, June 15, 2007

इच्छा

लेखनप्रकार : गूढकथा

राधेच्या पायांतील शक्ती क्षीण होत चालली होती. आपण रस्ता चुकलो हे तिला जाणवत होते तरी काट्याकुट्यांची पर्वा न करता जिवाच्या आकांताने ती पाय नेतील तिथे धावत होती. अंग ठणकत होतं, डोळ्यांतील अश्रूंची संततधार थांबत नव्हती, कपाळातून रक्तही ठिबकत होतं. पायांत पेटके येत होते. काळोखात आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचे भानही तिला राहिले नव्हते. श्वास फुलला, उर फुटायची पाळी आली आणि पुढे एकही पाऊल टाकणं अशक्य झालं तशी रानातल्या एका मोठ्याशा दगडावर तिने बसकण मारली.

धाय मोकलून रडावं अशी इच्छा अनावर होत होती पण त्याहूनही प्रबळ इच्छा घरी परतायची होती. घरी म्हणजे तिच्या हक्काच्या घरी, तिच्या आई-बाबाच्या. राधेच्या डोळ्यासमोरून गेल्या काही महिन्यांतल्या घटना तरळून गेल्या.

राधाची बारावी झाली तशी बाबांना आपल्या लाडाकोडात वाढलेल्या पोरीच्या लग्नाचे वेध लागले होते. पुढे शिकायची राधाची इच्छा होती पण आईबाबांना तिला एकटीला लांब तालुक्याच्या गावी पाठवायचे नव्हते. फार पुढे शिकून करायचे तरी काय होते म्हणा, चांगल्या भरल्या घरात पोरीला दिली की घरदार, जमीनजुमला हेच सांभाळायचं होतं. सहा महिन्यांपूर्वी साखरगावच्या सावंतांच्या मुलाशी, राजा सावंताशी तिचं लग्न ठरलं तेव्हा आई-बाबा किती आनंदात होते. थाटामाटात त्यांनी आपल्या एकुलत्या एका लेकीचं लग्न लावून दिलं होतं. सावंतांची भरपूर शेतीवाडी होती. पोरीला कशाची ददात पडणार नाही असं बाबांना वाटत होतं. लेकीला लग्नात चांगले ठसठशीत दागिने केले होते, जावयाला नवी मोटरसायकलही घेऊन दिली होती. सासू सासरे, नणंद, सासरची इतर मंडळी सर्वांचा मान ठेवला होता. काही करायचं म्हणून कमी ठेवलं नव्हतं. राधाही आनंदात होती. नवरा देखणा होता, शिकलेला होता. सासरचा वाडाही चांगला ऐसपैस होता. नणंद तिच्याच वयाची होती.

लग्नानंतर दोन महिने कसे भुर्रदिशी उडून गेले ते राधाला जाणवलंही नाही. घरात सासू-सासरे तिला प्रेमाने वागवत होते. नवराही लाड करत होता. नणंदेशी चांगली मैत्री जमली होती. 'आपली दृष्ट तर लागणार नाही ना या आनंदाला?' असे चुकार विचार राधेच्या मनात येत. एके दिवशी रात्र होऊ लागली तरी नवरा घरी परतलाच नाही. रात्र पडली तशी राधेने सासूकडे विचारणा केली पण तिने ताकास तूर लागू दिली नाही. इतरवेळेस दिलखुलास गप्पा मारणार्‍या नणंदेनेही 'दादा शेतावरच झोपला असेल.' असे म्हणून वहिनीची बोळवण केली. त्या रात्री राधेच्या डोळ्याला डोळा लागला नाही. दुसर्‍या दिवशी सकाळीच नवरा परतला. राधेने त्याला विचारणा केली तशी त्याने तिला उडवून लावले. 'शेतावर काम होते, परतायला उशीर झाला' असे काहीतरी त्रोटक उत्तर दिले.

त्यानंतर हा प्रकार नेहमीच होऊ लागला. आठवड्यातून दोन-चारदा नवरा गायब होत असे. घरातल्या गडीमाणसांकडून राधेच्या कानावर हळूहळू एकएक गोष्टी येऊ लागल्या. खालच्या आळीत नवर्‍याचे प्रकरण होते म्हणे. घरातल्या कोणालाही ते पसंत नव्हते पण करतात काय? लग्नानंतर पोरगं ताळ्यावर येईल असे सर्वांना वाटायचे. राधेला या प्रकाराची कुणकुण लागली तशी तिने सासूला स्पष्टच विचारले. सासूने कोणतेही आढेवेढे न घेता गोष्ट कबूल केली. एक मूल झालं की सगळं बरं होईल. राजा मनाने चांगला आहे. तो ताळ्यावर यावा असंच आम्हाला वाटतं. संसारात पडला की जबाबदारी येईल. सासर्‍यांनीही सुचवलं की वंशाला दिवा लवकर येऊ दे. राधेला थोडा धीर वाटला. सासू-सासरे म्हणतात तोही उपाय करून पाहायला तिची हरकत नव्हतीच. दरम्यान नवरा राधाला घेऊन तिच्या आईबाबांना भेटून आला. राधेने या प्रकाराची त्यांना कल्पना दिली नाही. उगीच त्यांच्या जिवाला घोर का म्हणून ती गप्प राहिली.

पुढचे काही महिने असेच निघून गेले. सहा आठ महिन्यांत काही नवीन घडलं नाही तशी सासर्‍यांनी तालुक्याला जाऊन तपासणी करून घ्यावी असे सुचवले. राधाला घेऊन नवरा तालुक्याला जाऊनही आला. तपासणीत राजात दोष असल्याचे आढळले. वैवाहिक जीवनात तशी बाधा नव्हतीच, हा दोषही योग्य औषधोपचाराने दूर होण्यासारखा होता. राजाला मात्र हे काही केल्या पटेना. "डॉक्टर लेकाचे काही बाही सांगतात. मी पूर्ण पुरुष आहे. तुलाच नाही आणि ४ बायकांना नांदवेन मी. मला कोणत्या औषधोपचारांची गरज नाही."आणि तेव्हापासून घरातली सगळी चक्रं उलटीपालटी फिरायला लागली. सासर्‍यांनी राधेशी बोलणं सोडलं. सासू तिला कोणत्याही कामाला हात लावू देईना. बोलली तर घालून पाडून काहीतरी बोलत असे. नणंदही दूर दूर राहत असे. राजा तर तिचा जणू दुःस्वासच करत होता. सरळ शब्दांत बोलणं त्याने सोडून दिलं होतं. रोज काही ना काही कारण काढून भांडण सुरू करे. एक दोनदा तिच्यावर हातही उगारला होता. राधेचं जगणं कठिण होऊ लागलं होतं. तिला आई-बाबांची आठवण वारंवार येत असे. एकवार त्यांना भेटून यावं अशी इच्छा होत होती.

असेच एकेदिवशी राजा रात्र बाहेर काढून सकाळी परतला तसा राधेने त्याला जाब विचारला. 'नांदवायचं नसेल तर घरी सोडून या. आईबापाला मी जड नाही.' म्हणून सांगितलं. शब्दाला शब्द वाढत गेला. राधाही हट्टावर आली होती. राजाने हात उगारला, "घरी जायचंय? जाऊन त्यांना माझ्याबद्दल सांगायचंय? गावात आमच्या घराचं नाव बद्दू करायचंय? थांब! घराबाहेर पडता येणार नाही अशी दशा करेन तुझी." सट्टदिशी थोबाडीत ठेवून दिली तशी "आई गं!" म्हणत राधा खाली बसली. राजाच्या अंगात जसा राक्षस शिरला होता. त्याने लाथा बुक्क्यांनी तिला बडवायला सुरुवात केली. राधा बेंबीच्या देठापासून ओरडत होती पण सासू तिच्या वाटेला फिरकली देखील नाही. राजाने तिचा हात धरला आणि तिला फरफटवत तो गोठ्याच्या दिशेने घेऊन गेला. गोठ्याच्या मागच्या बाजूला धान्य साठवायची खोली होती. त्यात त्याने राधाला ढकलले.

"घरी जाऊन बापाला काय सांगशील? नवरा, नवरा नाही म्हणून? माहेरी कशी जातेस बघू. जीव घेईन माहेरचं नाव पुन्हा काढलंस तर. याद राख. राहा पडून या अंधारवाड्यात. डोकं ताळ्यावर येतं का ते बघ."
दरवाज्याला बाहेरून कडी घालून राजा चालता झाला. त्या अंधार्‍या खोलीत राधाचा जीव घाबरा झाला. मार खाऊन अंग आणि डोकं दोन्ही बधिर झाले होते. त्या अंधारसाम्राज्यात उंदीर घुशींचे साम्राज्य असते या विचाराने तिचा थरकाप उडत होता. अंगाचं मुटकुळं करून ती तिथेच पडून राहिली. पायावरून चुकचुकत काहीतरी गेल्यासारखं वाटलं तसे तिने पाय छातीशी गच्च धरले.

थोड्यावेळाने उठून ती दारापाशी गेली आणि तिने दरवाजा ठोठावायला सुरुवात केली. 'मला सोडवा इथून. मला माझ्या घरी जाऊ दे. दार उघडा.' बराच वेळ असा धोशा लावूनही कोणी आले नाही तशी ती थकून ढोपरांत डोकं खुपसून मुसमुसत खाली बसली. किती वेळ निघून गेला असावा कोणास ठाऊक, अचानक दरवाजापाशी कोणीतरी असल्याची चाहूल तिला लागली.

दरवाजा करकरत उघडला. बाहेर अंधारून आले होते. नणंदेने येऊन दरवाजा उघडला होता. राधेने तिला गच्च मिठी मारली आणि ती रडू लागली.

"वहिनी, मी दरवाजा उघडला हे घरात कोणाला माहित नाही. तू इथून पळून जा." नणंद तिच्या कानात कुजबुजली तसे राधेने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. "दादा आणि आई बोलत होते. त्यांना या गोष्टीचा बोभाटा नकोय. तुझ्या बायकोला परत धाडली तर आपली अब्रू जाईल, त्यापेक्षा तिची विल्हेवाट लावू, असं म्हणत होती आई."
"काय?" राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
"गावात बभ्रा नको. स्टोव फुटला आणि आग लागली असं सांगता येईल."
"नाही, नाही. मला मरायचं नाही. मला माझ्या आईबाबांकडे जायचंय."
"तू जा वहिनी. इथे थांबू नकोस. दादा परत यायची वेळ झालीये. तो इथे आला तर काहीच करता येणार नाही.""या वेळेला कुठे जाऊ? पैसे कुठे आहेत?""मला नाही माहित, पण तू जा. मी नाही थांबू शकत अधिक वेळ इथे कोणीतरी यायचं." असं नणंद म्हणायला आणि....

"बाहेर कशी आली ही बया?" राजाचा करडा आवाज कानावर यायला एकच वेळ साधली. राजा तरातरा धावत आला आणि त्याने राधेचा हात पकडला. "चल, तुला आज इंगा दाखवतो." म्हणून तो राधाला खेचायला लागला. राधा अचानक झालेल्या हल्ल्याने गळपटून गेली होती.

"नको दादा, सोड तिला, जाऊ दे तिला. सोड," नणंदेने आरडाओरडा सुरू केला तशी राधा भानावर आली. राजा बहिणीशी हुज्जत घालत होता ती संधी साधून तिने त्याच्या हाताला जोरात झटका दिला आणि ती अंगात वारं भरल्यागत धावू लागली.

आपण कोठे धावतो आहोत, कोठे जात आहोत याचा तिला अंदाज येत नव्हता. राजा आपल्यामागून येत असणार याची तिला खात्री होती परंतु ती खात्री करून घ्यायला क्षणभरही थांबली नाही. गाव संपून झाडी सुरू झाली तशी आपण रस्ता चुकलो आहोत याची जाणीव तिला झाली. अंधार चांगलाच दाटून आला होता. आपण चुकीच्या दिशेने धावत आलो, एस्टी स्टॅंडच्या दिशेने गेलो असतो तर एस्टी पकडता आली असती असा विचार तिच्या डोक्यात आला. पण राजा तेथे पोहोचला असता. एस्टी पकडायच्या आधीच राजाने तिला ताब्यात घेतलं असतं. तिचे पाय आता बोलत होते, श्वास फुलला होता. ती क्षणभर थांबली आणि तिने मागे वळून पाहिले. मागून कसलीही चाहूल लागत नव्हती.


'काय झालं आपला पाठलाग नवर्‍याने थांबवला का असावा?' असा विचार करताना तिला अंधुक प्रकाशात तो दगड दिसला. पुढे जाणं अशक्य झालं होतं म्हणून राधा शेवटी त्या दगडावर विसावली. 'मला मरायचं नाही. मला घरी जायचं आहे. आईकडे.' तिच्या मनात पुन्हा इच्छा दाटून आली पण एकही पाऊल टाकण्याची शक्ती तिच्यात उरली नव्हती. तिला हुंदका फुटला. आपला पदर तिने तोंडावर कोंबला आणि त्या दगडावर आपलं डोकं ठेवून ती निपचीत पडली.

*--*

मध्यरात्र उलटून गेली होती. चंद्र आकाशात चांगला वर आला होता. दोन दिवसांपूर्वीच पौर्णिमा होऊन गेली होती. चंद्राचा मंद प्रकाश रानाला न्हाऊ घालत होता. हवेची थंडगार झुळुक आली तसे राधेने आपले अंग आक्रसून घेतले. थोड्यावेळाने तिने हळूहळू डोळे उघडले. बहुधा अतिश्रमाने डोळा लागला होता. घडल्या घटनेची आठवण झाली तशी ती खाडकन उठून बसली आणि कावरीबावरी होऊन इथे तिथे पाहू लागली. रानात सगळं कसं शांत होतं. मध्येच रातकिडे ओरडत होते आणि हवेच्या मंद झुळुकीबरोबर पानांची सळसळ ऐकू येत होती तेवढीच.

'मला घरी जायचंय. आई आणि बाबांना भेटायचंय.' राधाच्या मनात पुन्हा इच्छा उचंबळून आली. 'जायचं तरी कुठे या रानात? रस्ताच माहित नाही. तांबडं फुटलं की कळेल कोठे आलो ते.' तिने बसलेल्या दगडाकडे निरखून पाहिलं. शुभ्र चंद्रप्रकाशात तो पाषाण उठून दिसत होता. राधेला त्या काळ्या फत्तरावर हाताचा शुभ्र पंजा चमकताना दिसला.

'चेटकिणीचा दगड.'

ती धडपडून उभी राहिली. आता फक्त ब्रह्मांड आठवायचे बाकी होते. 'हे आपण कुठे आलो?' गावाबाहेरच्या रानात चेटकीण राहते अशी वदंता तिने ऐकली होती. एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री तिचा मृत्यू या पाषाणावर झाला. तिने आपला तळवा त्या पाषाणावर जेथे टेकवला होता तेथे गावकर्‍यांना तो पंजा पाषाणावर उमटल्याचे दिसून आले. आजही रात्रीबेरात्री हिरवी साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली, मळवट भरलेली ती चेटकीण लोकांना धरते असा समज होता. अंधार पडल्यावर रानाच्या दिशेने कधी कोणी गेल्याचं ऐकलं नव्हतं. राजा आपल्यामागे का आला नाही याचा उलगडा तिला होऊ लागला आणि जीव मुठीत घेऊन ती वेड्यासारखी पुन्हा धावायला लागली.

समोरून कोणीतरी कंदील घेऊन येत होते. पुढचा मागचा कोणताही विचार न करता राधा त्या दिशेने धावत सुटली.

"कोन हाय?" कंदील धरलेल्या व्यक्तीने राधाच्या चेहर्‍यासमोर कंदील धरला. राधाच्या तोंडातून एक अस्फुट किंकाळी फुटली. समोर धारदार नाकाची, कमरेत वाकलेली, सुतरफेणीसारखे चंदेरी केस झालेली म्हातारी उभी होती.

"कोन म्हनायचं? एवड्या रातच्याला या रानात कुटुन आलसा?" म्हातारीने खणखणीत आवाजात विचारले.
भीतीने राधाची बोबडी वळली होती. तिच्या तोंडून आवाज फुटेना. "पोरी! ह्या आडरानात रातीची काय करतीस? काय इचारते हाये म्या तुला? बोल की."

"र..र..रस्ता चुकले. मला घरी जायचंय. प..पण तुम्ही कोण?"

"म्या हितं रानाच्या भायेरच र्‍हाते. गंगाक्का नाव माजं. रातच्याला येक शेळी या रानात शिरली माजी. तिला हुडकायला निगाले तर तुज्यावर नजर पडली."

"इ...इ..इतक्या रात्री शेळी शोधायला?"

"त्यात काय मोटं? किती वर्स जाली हितं र्‍हाऊन, रानाची भीती न्हाई वाटत आता." म्हातारी ठसक्यात म्हणाली.

"आणि ती चेटकीण... हे चेटकिणीचं रान आहे ना?"म्हातारीने डोळे बारीक करून राधेकडे निरखून पाहिलं. "व्हयं! ह्ये चेटकिनीचं रान हाय, पर त्यात चेटकीन न्हाय... वावडी हाय फकस्त. पर तू हितं रातच्याला काय करतीस? आसा कसा रस्ता चुकली?"

राधेला थोडा धीर आला. "खरंच रस्ता चुकल्ये हो. मला माझ्या घरी जायचं आहे. माहेरी. माझ्या आईबाबांकडे, भिवपूरला."

"भिवपूरची कोन गं? कोन्च्या घरातली? आन रानातून पायी पायी कुटं भिवपूर गाठाया निगालीस?"
म्हातारीच्या प्रश्नांना आता सविस्तर उत्तरे देणे भाग होते. राधेची भीड चेपली होती. म्हातारीचा आवाजही मऊ झाल्यासारखा वाटला.

"तुम्हाला भिवपूरची माहिती आहे?"

"म्हाईत हाय मंजी? म्या पन भिवपूरातलीच हाय. सदा पाटलाला वळखतीस? मी त्याची धाकली आत्या हाय. दादा व्हता तेवा जानं व्हायचं, दादा गेला माजं पन वय जालं, सत्तरी उलटली. कोन जातया कोनाकडं उटून आता? पर सदा भेटला तर त्याला सांग की आत्याने आठवन काडली. बरं आता हितं उबं राहन्यापरीस तुला बाजूच्या गावात पोचवते, तितं एश्टी पकड पहाटेची, ती नेईल तुला भिवपूरला."

"तुम्ही सदाकाकाच्या आत्या? सदाकाकाची माझ्या बाबांशी चांगली ओळख आहे." राधाला हायसं वाटलं. चालता चालता तिने आपल्यावर गुदरलेल्या सर्व गोष्टींबद्दल म्हातारीला सांगायला सुरुवात केली. कंदिलाच्या प्रकाशात म्हातारीच्या डोळ्यांतील करुणा दाटत आलेली दिसत होती. राधेने आपली कहाणी संपवली तशी म्हातारी म्हणाली,

"बाय माजी धीराची. या चेटकिनीच्या रानात रातची र्‍हायलीस तवाचं आलं ध्यानात की कायतरी घोटाला हाय. तुज्या घरची मानसं तुज्यामागं आली पन नाईत या रानात. आस्सा दरारा हाय चेटकिनीचा. चल म्या सोडते तुला."

"पण तुमची शेळी?"

"आगं या शेळीपुडं ती शेळी मोटी न्हाय. ती येईल घरला. या रानात कोन लांडगा न्हाई येत."

"आणि ती चेटकीण?" राधाने चाचरत विचारलं.

"कोन्ची चेटकीन? कोन चेटकीन बिटकीन न्हाय हितं."

"पण मी दगडावर पंजा पाहिला. चेटकिणीचा पंजा." त्या आठवणीने राधाला पुन्हा शहारून आले.

"हां! दगडावर पंजा हाय खरा पर तो भाऊ मोहित्याची बायकोचा आन ती प्वार चेटकीन नवती."

"भाऊ मोहिते? म्हणजे आमच्या साखरगावचे? त्यांची बायको? म्हणजे?" राधेला फारसे काही कळले नाही.

"पावलं उचल झटाझट. सांगते वाटेवर." गंगाक्का म्हणाली, "भाऊ मोहित्याचं लग्न झालं, बायको घरात आली. सारं कसं आलबेल व्हतं. पर दुर्दैव त्या पोरीचं. म्हैन्याभरात जावेचं तान्हं पोर गेलं. पांडर्‍या पायाची अवदसा घरात आली म्हनून जावेने शिमगा केला.... आन पोरीचं नशीब आसं फुटकं की गावात कसलीशी साथ आली आन दोन-चार ल्हान पोरं दगावली. भाऊ मोहित्याची बाय चेटकीन हाय म्हनून कोनी वावडी उटवली म्हाईत न्हाय पर थंडीच्या एका रातीला गावातली मान्सं वाड्यावर चालून आली. ती पोरगी वाट मिळलं तशी धावत सुटली आनी या रानात आली. आक्षी तुज्यावानी." म्हातारीने राधेवर नजर रोखून म्हटले.

"तिला बी तिच्या घरला जायचं आसलं पर रस्ता नाय गावला बिचारीला. थंडीचं दिवस व्हतं. रातच्याला कडाक्याची थंडी पडायची. नाजूक प्वार ती, गारठून गेली त्या दगडावर. सकाळी लोकांना गावली, शरीर बरफावानी कडक जालं व्हतं आनी व्हय! पंजा उमटला व्हता त्या दगडावर. कसा तो न्हाई म्हाईत, पन अजून सुदीक हाय तसाच हाय. त्या रानातच क्रियाकरम केलं तिचं. गावात पन नाय आनली तिला. तवापासून कदीतरी रातच्याला दिसते म्हनतात."

"तुम्हाला दिसली का हो कधी गंगाक्का ती?" राधेने कुतूहलाने विचारले.

"मला तू दिसलीस. तुला पन तिच्यावानी घरला जायचं हाय. तू पन रातच्याला त्याच गावातून येतीस, त्याच दगुडावर बसतीस. मग काय म्हनू म्या?" तोंडाचं बोळकं उघडून म्हातारी जोरात हसली.

"मला कुठे जायचं ते कळलं नाही अंधारात. या रानात कशी आले तेही कळलंच नाही. डोक्यात एकच होतं की माहेर गाठायचं. मीच ती चेटकीण आहे असं नाही ना वाटलं गंगाक्का तुम्हाला."

"न्हाई, कोन चेटकीन न्हाई. तू न्हाईस आन ती पन न्हाई, गरीब प्वार होती बिचारी, कदी कोनाला तरास दिला नवता तिनं, नशीब तिचं.... आडवं आलं...पन तू घरला जाशील." लांबून कोंबडा आरवल्याचा आवाज ऐकू येत होता. "गाव आलं, पहाट पन व्ह्यायला आली. चल, झटाझट... पारावर पैली एश्टी मिळंल." अंधार ओसरायला लागला होता. आकाशातले तारे मंद होत होते. क्षितिजावर कोठेतरी केशरी छटा येऊ लागल्या होत्या.

लांबून पार दिसू लागला तसा म्हातारीने राधाचा निरोप घेतला. "निगते आता. मला घरला परतायला हवं.. . मोप काम बाकी हाय.""गंगाक्का तुमचे उपकार विसरणार नाही जन्मभर. देवासारख्या आलात धावत, काय झालं असतं त्या रानात भीतीने माझं?" राधेच्या डोळ्यांत पाणी तरारलं."व्हयं पन मी व्हते तितं आन आले तुज्या मदतीला. माजं येक काम कर पोरी. तुज्या सदाकाकाला सांग गंगाक्का भेटली व्हती म्हनून. किती वर्सांत भेट न्हाई जाली. त्याला खुशाली सांग, या म्हातारीची इत्की इच्चा पुरी कर."
"घरी गेले की लगेच निरोप धाडते सदाकाकाला," राधा हसली. दूरवरून मातीचा लोट उडताना दिसला. एस टी येत आहे हे ध्यानात आलं तशी राधा पारापाशी धावली. एसटीत बसल्यावर खिडकीतून तिने नजर फिरवून सभोवार पाहिले पण गंगाक्का कधीच निघून गेली होती.

दुपारच्या वेळी राधाला दारात उभी पाहून आईला धस्स झालं. राधेने तिला आपली कर्मकहाणी ऐकवली तशी आईने तिला कुशीत घेतलं. बाबांना शेतावर निरोप धाडला होताच. बाबा हातातली कामं सोडून धावत आले. राधेला पाहून त्यांना भडभडून आलं, "सावंतांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. पोरीच्या जिवाचं बरं वाईट झालं असतं तर गोळ्या घातल्या असत्या एकेकाला. सोडणार नाही." चिडून बाबा बोलत होते. राधेच्या आईने आणि राधेने खूप वेळ समजूत घातल्यावर ते शांत झाले.

ऊन उतरले तशी राधेने बाबांना म्हातारीचा निरोप सदाकाकाला पोहचवण्याविषयी सांगितले. बाबांनी तोपर्यंत म्हातारीकडे विशेष लक्ष दिलेच नव्हते. राधेने गळ घातली तशी त्यांनी विचारले, "काय नाव म्हणालीस, सदाच्या आतेचे?"

"गंगाक्का, सदाकाकाची धाकटी आत्या आहे असं म्हणत होती."

"सदाची धाकटी आत्या?" बाबांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. "तू चल माझ्याबरोबर सदाकाकाकडे. गंगाक्काचा निरोप तूच सांग."

राधेने तोंड धुतले, साडी बदलली, केस विंचरले आणि ती बाबांसोबत सदाकाकाकडे निघाली. सदाकाका ओसरीतल्या झोपाळ्यावर आराम करत बसले होते. डावा पाय जमिनीवर रेटून झोपाळ्याला सावकाश झोका देत होते. राधेला आणि तिच्या बाबांना बघून ते उभे राहिले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले.
राधेच्या बाबांनी त्यांना थोडक्यात घडला वृत्तांत सांगितला. तो ऐकताना सदाकाकांच्या चेहर्‍यावरील रेषा सरासर बदलत होत्या. "वाचलीस पोरी! नाहीतर, काय वाढून ठेवलं होतं तुझ्या नशिबात ते देवाला माहित... पण तुला गंगाक्का दिसली हे खरं मानायचं?"

"अहो काका, दिसली म्हणजे? दिसली, बोलली, तिच्याबरोबरच एस्टी स्टॅंडकडे आले मी. तुमची आठवण काढत होती. सदाकाकाला निरोप दे म्हणत होती." सदाकाकांच्या प्रश्नातली गोम राधेला कळेना.
सदाकाकांनी राधेच्या डोक्यावर हात फिरवला, "गंगाक्काच्या लग्नात ४ वर्षांचा होतो मी. तिचा चेहराही आठवत नाही. साखरगावच्या मोहित्यांच्या घरी दिली होती तिला. पुढे काय झालं कळण्याचं वय नव्हतं पण एक दिवस बा धाय मोकलून रडत होता. गंगाक्काचं काय केलं त्या मोहित्यांनी ते कळायलाही मार्ग नव्हता. अचानक सांगावा धाडला की गंगाक्का गेली.

नंतर आजा, काका आणि बा विचारपूस करायला गेले होते, त्यांना मोहित्यांनी आमच्या गळ्यात धोंड बांधलीत असं सांगून बखेडा उभा केला. गावात गंगाक्का चेटकीण आहे असा आधीच बोभाटा झाला होता. आज्याने निमूटपणे तिथून पाय काढला. गंगाक्का गेली होती आणि त्या गावात काही बोलायची सोय राहिली नव्हती. त्या दिवसापासून गंगाक्काचा विषय घरात कोणी काढला नाही पण आम्हाला माहित होतं की गंगाक्का चेटकीण नाही. साधीसरळ होती आमची आत्या." सदाकाकांचा आवाज कापरा झाला होता.
राधेच्या अंगावर काटा फुलला होता, "म्हणजे मला भेटली ती गंगाक्का.... रानातली च..." तिला पुढे काय बोलावे ते सुचत नव्हते. "नाय पोरी! तुला भेटली ती इच्छा. तुझी इच्छा आणि तिची इच्छा. त्या इच्छेने तुला घरी आणलं. तुझ्यावाणी गंगाक्काही जीव वाचवायला घरच्या आसेने रानात धावत सुटली... पण नशीब तिचं, जे तिच्याने झालं नाही ती घरी परतायची तिची अपुरी इच्छा आज पुरी झाली."

Tuesday, June 05, 2007

सम्राट चंद्रगुप्ताची सुरक्षा: एक कोडे

सम्राट चंद्रगुप्ताला (राज्यकाळ इ.स.पूर्व ३२०-२९८) गादीवर बसल्यापासूनच आपल्या जिवाची भीती वाटत असे. अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून गुलाम म्हणून विकत आणले होते. त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. चंद्रगुप्तावर विषप्रयोगाचे प्रयत्न झाल्याने तो नेहमी सतर्कही असे. केवळ राज्यकारभाराच्या कामासाठी आणि शिकारींसाठी तो महालाबाहेर पडायचा. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे. आपल्या विहिरी, जलसंचय इ. मध्ये कोणी विष तर कालवले नाही ना याबाबत तो काळजी घेत होता.

मगधाच्या गादीला तसे अनेक विश्वसनीय दूत व सरदार मिळाले होते. त्यांच्यासोबत शिकारीस जाणे हा चंद्रगुप्ताचा आवडता छंद. कधी कधी चंद्रगुप्त अनेक आठवड्यांच्या शिकारीवर जात असे.

खरा इतिहास येथे संपवून आता कोडे सुरू करू.


एकदा चंद्रगुप्ताच्या मनात शिकारीस जाण्याचे आले. मगधाच्या सीमेबाहेर घनदाट अरण्य होतेच. आपल्या विश्वासातील निवडक २४ सरदारांना घेऊन चंद्रगुप्त शिकारीस निघाला. निघण्यापूर्वी चाणक्याने अर्थातच जिवाला अपाय होऊ नये म्हणून सोय कशी करावी याची मसलत चंद्रगुप्ताशी केली होती. त्यानुसार या वेळेस त्याच्या स्त्रीअंगरक्षक त्याच्या समवेत न जाता या २४ सरदारांवरच चंद्रगुप्ताच्या संरक्षणाची जबाबदारी येऊन पडली. अरण्यात चंद्रगुप्ताच्या वास्तव्यासाठी एक लहानसा महाल बांधलेला होताच. या महालास एकूण ९ खोल्या होत्या. त्यातील मध्यभागी चंद्रगुप्ताचे शयनगृह होते. चंद्रगुप्ताने २४ सरदारांची सोय त्या सभोवतीच्या खोल्यांत अशी केली की महालाच्या प्रत्येक दिशेला ९ सरदार असतील. हे शब्दांत सांगून स्पष्ट होत नसेल तर पुढील चित्र पाहा.


















3
3
3
3
चं.
3
3
3
3




चं=चंद्रगुप्त आणि प्रत्येक खोलीतील सरदार ३.

सरदारांना मात्र या संरचनेमुळे कैद्यासारखे वाटू लागले. त्यांनी चंद्रगुप्ताची परवानगी काढली की आम्हाला संध्याकाळी/ रात्री निदान एकमेकांच्या खोलीत जाऊन गप्पा गोष्टी करण्याची मुभा असावी. चंद्रगुप्ताने अर्थातच परवानगी दिली परंतु अट घातली की प्रत्येक दिशेला ९ सरदार असणे भाग आहे.

असो. तर पहिल्या रात्री :

चंद्रगुप्ताने झोपायला जाण्यापूर्वी सर्व खोल्यांतून फेरी मारली आणि सरदारांची मोजणी केली. त्याचा हेतू हा की आपली आज्ञा पाळली जाते की नाही हे पाहणे आणि काही सरदार जवळपासच्या खेड्यांतून चालणारे नृत्य-गायनाचे आणि लोककथांचे कार्यक्रम पाहायला तर गेले नसतील याची शहानिशा करणे. चंद्रगुप्ताला प्रत्येक दिशेला ९ सरदार दिसल्याने तो समाधानाने झोपायला गेला. प्रत्यक्षात मात्र ४ सरदार महालाबाहेर गेले होते आणि तरीही उरलेल्या सरदारांनी चंद्रगुप्ताची दिशाभूल केली होती. ती कशी बरे केली असावी?

रात्र दुसरी:
या रात्री कोणताही सरदार महालाबाहेर गेला नाही परंतु ४ गावकर्‍यांना त्यांनी रात्री येऊन आपले मनोरंजन करण्याचे आमंत्रण दिले होते. त्यानुसार ते ४ गावकरी महालात आले, पण चंद्रगुप्ताने पाहणी केली असता त्याने प्रत्येक दिशेला ९ सरदारच मोजले. ते कसे?

रात्र तिसरी:
तिसर्‍या रात्री सरदारांची भीड चेपली आणि त्यांनी ८ गावकर्‍यांना आमंत्रण दिले. आता महालात चंद्रगुप्ताव्यतिरिक्त २४+८=३२ जण होते, तरीही चंद्रगुप्ताने मोजणी केल्यावर प्रत्येक दिशेस ९ सरदारच भरले. ते कसे?

रात्र चौथी:
सरदारांना आता या प्रकरणाची मजा येऊ लागली. चौथ्या रात्री १२ पाहुणे आले. म्हणजेच ३६ जण भरले. चंद्रगुप्ताला फसवायला त्यांनी अशी मांडणी केली की प्रत्येक दिशेला ९ सरदारच भरतील.

रात्र पाचवी:
ही शिकारीची शेवटची रात्र होती. या दिवशी पाहुण्यांना आमंत्रण नव्हते. उलटपक्षी, ६ सरदार उठून जवळच्या गावात गेले. अर्थातच, चंद्रगुप्ताने प्रत्येक दिशेला ९ सरदार मोजले. ते कसे?

मंडळी, चंद्रगुप्ताचे गणित कच्चे नव्हते. सरदार मात्र त्याच्यासारखेच चलाख होते. कोडे वाचायला मोठे असले तरी सोपे आहे. उत्तरासाठी तक्ता दाखवण्याची गरज नाही.
३ ३ ३
३ च ३
३ ३ ३

अशाप्रकारेही उत्तर लिहिता येईल. पहिल्या रात्रीचे कोडे सोडवले की बाकी सोडवण्यास त्रास पडणार नाही. हे कोडे प्रसिद्ध गणिततज्ज्ञ रेमंड स्मलयन यांच्या पुस्तकातून घेतले आहे. बघा सोडवता येते का?

संदर्भ :
ऐतिहासिक संदर्भ : अशोकचरित्र - वा.गो.आपटे.
कोडे घेतले आहे : द रिडल ऑफ शहरजादी अँड अदर - रेमंड स्मलयन.

Wednesday, May 30, 2007

फ्लाइंग डचमॅन



धुकं, जमिनीला टेकणारा ढग.... सृष्टीतील एक अद्भुत प्रकार. या धुक्याचा उपयोग भय वाढवण्यासाठी बरेचदा केला जातो. रानात रस्ता चुकलेला वाटसरू आणि त्याच्या सभोवती त्याला आणि झाडा-झुडपांना वेढून टाकणारे धुकं, त्या धुक्यातून त्याचा होणारा पाठलाग. भयपटांतून दाखवलेली झपाटलेली हवेली नेहमीच धुक्याने वेढलेली असते. एखादा ड्रॅक्युलापट पाहिला असेल तर रात्रीच्या वेळी वेडीवाकडी वळणे घेत टेकडीच्या दिशेने जाणारी बग्गी आणि त्या टेकडीच्या माथ्यावर धुक्यात लपाछपी खेळणारा ड्रॅक्युलाचा वाडा नक्कीच आठवत असेल.

धुकं डोंगरावर, जमिनीवर, पाण्यावर कोठेही अचानक जन्म घेतं. भर समुद्रातही धुकं निर्माण होतं. या धुक्यातून एखादे भुताळी जहाज तुमच्यासमोर येऊन उभे ठाकले तर? स्वत: समुद्र ही काही कमी गूढ नाही. समुद्र हा अद्यापही मानवाच्या संपूर्ण ताब्यात न आलेला भाग, आजही अज्ञात, रहस्यमय आणि गूढ समजला जाणारा. कधी शांत, कधी खवळलेला, कधी वादळांत सापडलेला तर कधी भयंकर लाटा निर्माण करून बेटंच्या बेटं गिळून टाकणार्‍या समुद्र, त्यातील अगणित जीव आणि त्यावर स्वार झालेल्या जहाजांविषयी अनेक खऱ्याखोट्या अद्भुत कथा ऐकायला मिळतात. समुद्रावर खलाशांमध्ये अनेक आख्यायिका, अंधश्रद्धा असल्याचे सांगितले जाते.त्यातलीच एक सुप्रसिद्ध आख्यायिका आहे फ्लाइंग डचमॅनची.

फार लहानपणी ही गोष्ट कोणीतरी सांगितल्याचे आठवते. कालांतराने रिचर्ड वायनरच्या पुस्तकावर आधारित बाळ भागवतांचे पुस्तकही वाचले होते परंतु आता ही फ्लाइंग डचमॅनची आख्यायिका आठवण्याचे कारण म्हणजे पायरेट्स ऑफ द कॅरिबियन हा चित्रपट. डेव्ही जोन्स नावाचा कप्तान साक्षात सैतानाशी जुगार खेळतो आणि त्यात हरल्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याचे जहाज खलाशांसह जगाच्या अंतापर्यंत समुद्रात भरकटत राहते. एकाकी समुद्रात अचानक धुक्याच्या पडद्यामागून किंवा उंच उचंबळलेल्या लाटेतून प्रगट होणार्‍या या जहाजाच्या जवळपास जाणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देणे.

फ्लाइंग डचमॅनच्या तशा अनेक आख्यायिका युरोपात प्रसिद्ध आहेत. या जहाजावर अनेक कथा, नाटकेही लिहीली गेली आहेत. त्यापैकी एखाद्या गोष्टीत फ्लाइंग डचमॅन हे जहाजाचे नाव आहे तर दुसर्‍या एखाद्या आख्यायिकेत ते जहाजाच्या कप्तानाचे नाव आहे. काही आख्यायिकांत हे जहाज जगातील सर्व समुद्रात कोठे ना कोठे दिसले असे सांगितले जाते तर बहुतांश आख्यायिका केप ऑफ गुड होपला फ्लाइंग डचमॅनचे प्रमुख स्थान मानतात. या सर्व आख्यायिकांपैकी खालील दोन आख्यायिका सर्वात प्रसिद्ध आहेत.

पहिल्या आख्यायिकेचे मूळ एका डच जहाजाशी संबंधित आहे असे म्हटले जाते. सतराव्या शतकात कॅ. बर्नार्ड फोक्के हा डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजावर कप्तान होता. त्याचे जहाज जावा ते हॉलंड असा प्रवास करत असे. या प्रवासासाठी इतर जहाजांना ८ महिने लागत परंतु फोक्के हा प्रवास केवळ ३ महिन्यांत आटोपत असे. यावरून लोकांत वावडी पसरली की बर्नार्ड फोक्केने साक्षात सैतानाशी करार केला आहे आणि त्यामुळेच तो हा प्रवास इतक्या जलद करायचा, असे म्हटले जाते. पुढे अर्थातच या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याला मृत्यूनंतरही जहाजासकट समुद्रात भरकटत राहावे लागले.

दुसर्‍या एका आख्यायिकेनुसार या जहाजाचा कप्तान हेंड्रिक वॅन्डरडेकन होता. १६८० च्या सुमारास तो डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजाची ऍमस्टरडॅम ते जावा अशी वाहतूक करत असे. केप ऑफ गुड होप जवळ एकदा त्याच्या जहाजाला प्रचंड वादळाचा तडाखा बसला. यावर संतापून वॅन्डरडेकन जहाजाच्या डेकवर उभा राहिला आणि त्याने निसर्गाला यथेच्छ शिव्या घातल्या आणि इतरांनी दिलेले सल्ले धुडकावून त्या वादळात आपले जहाज घातले. परिणामी जहाज कलंडून सर्वांचा मृत्यू झाला. यामुळेच हे जहाज समुद्रात आजही भरकटत असते.

या दोन्ही आख्यायिकांत फ्लाइंग डचमॅन हे कप्तानाला उद्देशून म्हटले आहे. जहाजाला नाही. अशा अनेक आख्यायिकांचा शेवट मात्र सारखाच आहे की या जहाजाला आणि त्याच्या कर्मचारीवर्गाला अनंतापर्यंत समुद्रात भरकटत राहण्याचा शाप मिळाला आहे.

या जहाजाच्या केवळ दर्शनाने संकटे ओढवतात असे म्हटले जाते. १९व्या आणि विसाव्या शतकात अनेकांनी या जहाजाचे दर्शन झाले असल्याचे म्हटले आहे. यांतील सर्वात प्रमुख किस्सा इंग्लंडचा राजा पाचव्या जॉर्जचा येतो. पहाटे चारच्या सुमारास तांबड्या प्रकाशात न्हाऊन निघालेले हे जहाज त्यांना ऑस्ट्रेलियाजवळच्या समुद्रात दिसले असे सांगितले जाते. १९४२ सालीही या जहाजाने दर्शन दिल्याचे किस्से ऐकवले जातात.

फ्लाइंग डचमॅनही आख्यायिका आहे की सत्यकथा कोणास ठाऊक? पायरेट्स ऑफ द कॅरेबियन या चित्रपटात डेव्ही जोन्स आणि त्याच्या खलाशांचे मानवी जीवन नाहीसे होऊन समुद्र जीवांचे गुणधर्म त्यांच्यात उतरलेले दाखवले आहेत. हे जहाज पाण्यातून उसळी मारून वर येतानाही दाखवले आहे. खरे खोटे कसेही असो. पायरेट्सचा तिसरा भाग बघायची उत्सुकता फ्लाइंग डचमॅनमुळे जितकी आहे त्याच्या दसपट कॅप्टन जॅक स्पॅरोमुळे आहे.
सर्व संदर्भ आणि चित्र विकिपीडियावरून.

Sunday, May 13, 2007

वाटणी

मदर्स डे स्पेशल!


“काय रे काही हवयं का?” स्वयंपाकघराच्या भिंतीला टेकून उभ्या असलेल्या अक्षयला मी विचारले तशी त्याने नकारार्थी मान हलवली. “मग इथे का? जाऊन खेळ की. भांडलात तर नाही ना दोघे?”

अक्षय माझ्या मैत्रिणीचा मुलगा. वय ७ वर्षे, माझ्या मुलीपेक्षा दीड वर्षांनी लहान. दोघे इतकी वर्षे एकुलते एक असल्याने एकमेकांशी त्यांचं बरं जमतं. आठवड्याभरापूर्वी अक्षयला नवा भाऊ झाल्याने म्हणजे घरात नवे बाळ आल्याने त्याला आज येथे खेळायला बोलावले होते. तेवढीच त्याच्या आईला विश्रांती म्हणून.

“काय रे भांडलात तर नाही ना दोघे? काय विचारत्ये मी?” पुन्हा त्याने मान हलवली.
“ती टीव्हीवर तिची सिरिअल पाहते आहे, मुलींची कुठलीतरी. मला नाही बघायची.”
“बरं मग तुला गेमबॉय देऊ का तिचा? किंवा दुसर्‍या टीव्हीवर गेमक्युब देऊ का लावून?”
“नको मावशी.”
“मग रे? मी काम करते, तू माझ्याशी गप्पा मार.” आता याला रमवावं तरी कसं या विचारांत मी काहीतरी बोलून गेले.
“तुझ्या शाळेतल्या गोष्टी सांगतोस?” शाळेतल्या गोष्टी सांगणे हा आमच्या कन्यकेचा आवडता विषय असला तरी मुलांना हा विषय प्रिय असावा की नाही याबाबत मी जरा साशंकच होते.
“मावशी, आता ते बाळ घरात आलं ना आता आई त्याच्यावर जास्त प्रेम करेल का गं?” अक्षय टपोर्‍या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाला.

“नाही रे असं काही नसतं! ती तुम्हा दोघांवरही सारखंच प्रेम करेल.” हा इथे तिष्ठत का उभा होता त्याचा अंदाज मला येऊ लागला होता. त्याचा प्रश्न बहुधा कालातीत प्रश्न असावा. डोळ्यासमोरून काळ सर्रकन तीस एक वर्षे मागे सरकला.

मला भाऊ झाला तो दिवस होता दिवाळीचा आणि मी पाच वर्षांची होते. म्हटलं तर बरंच काही कळण्यासारखं आणि म्हटलं तर काहीच न उमगण्यासारखं वय. आईच्या माहेरी डॉक्टरच डॉक्टर, ती होतीही मामाच्याच नर्सिंग होममध्ये म्हणजे घरातच तशी. नवं बाळ आलंय या खुशीत मी दिवसभर हुंदडत होते. मामेभावंडं, मामी, हॉस्पिटलाचा स्टाफ, बाकीचे पेशंट सर्वांना नवं बाळ आल्याची वर्दीही देऊन टाकली होती. मध्येच डोळे किलकिले करून एक हलकीशी जांभई देऊन पुन्हा गाई गाई करणारे कपड्यात करकचून बांधलेले बाळ आवडण्याचे कोणतेही सयुक्तिक कारण नसतानाही मनापासून आवडले होते. 'त्याला थोडावेळ मांडीवर घेऊ?' असा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्याने आईने ते दोन चार मिनिटे मांडीवर टेकवलेही होते. कधीतरी मध्येच मामाने येऊन दम भरल्याने दिवसभरात काहीतरी खाऊनही घेतले होते. दिवाळी असल्याने बाकीही मज्जाच मज्जा सुरू होती. या सगळ्या वातावरणात रात्र कधी झाली ते कळलेच नाही.

रात्र झाली तशी माझ्या मामेभावाने हळूच पिल्लू सोडले, “आज रात्री तुझी आई बाळाला जवळ घेऊन झोपणार. तुला नाही!”

खरंतर आईचे दिवस भरल्याने मी गेले कित्येक दिवस मामेबहिणी शेजारी झोपत होते पण दादाच्या चिडवण्याने अपेक्षित परिणाम साधला होता. 'असूया' काय असते हे त्या दिवशी कळले. मनात अनेक प्रश्न आले. आई खरंच दिवसभर बाळाला जवळ ठेवून त्याच्या शेजारी झोपली होती. बाळाला बघायला किती लोक आले होते आणि किती कौतुक करत होते. बाबाही येऊन येऊन त्याच्याकडे टक लावून पाहत होते. या सर्वात मी कोठे आहे याची कोणालाच चिंता नव्हती की काय?

मी धावत धावत जीना उतरून हॉस्पिटलमध्ये गेले. आई थकून झोपली होती. तिला गदगदा हालवले आणि सांगितले, “त्या बाळाला पाळण्यात ठेव. मला इथे झोपायचं आहे तुझ्या बाजूला.”

“आज नको, आज मला बरं नाही. इथून घरी गेलो की झोप माझ्या बाजूला.” आई थकलेल्या आवाजात म्हणाली.
“नाही आजच. तू दिवसभरात मला जवळही घेतलं नाहीस. झोपायला तरी घे ना जवळ.” म्हणून मी भोकांड पसरले.


आईने शांतपणे बाळाला पाळण्यात ठेवले आणि मला कुशीत घेतले. रात्री मामीची फेरी झाली तशी तिने आईला थोडासा दम भरला. मी चुकून पोटात लाथ वगैरे मारली झोपेत तर? त्यापेक्षा झोपली की तिला कोणीतरी उचलून वर घेऊन जाईल असे सुचवले पण आईने नकार दिला. झोपू दे, तिच्याकडे दिवसभरात खरंच दुर्लक्ष झाले असावे म्हणाली. त्या रात्री मी आईशेजारीच झोपले. सकाळी उठल्यावर राग, दु:ख पळाले होते.

“मावशी, सांग ना! अम्मा सारखं प्रेम कसं करेल आता ते शेअर होईल ना?” अक्षयच्या प्रश्नाने माझ्या मनातील शृंखलेला खीळ पडली.

“नाही आईचं प्रेम शेअर नाही होत. नवीन बाळ आलं आता तिचं प्रेम डबल होईल.”
“असं कसं?”
“त्याचं असं की आता नवीन बाळाचे लाड झाले की तुझेही होतील. त्याला खेळणी-कपडे मिळाले की तुलाही मिळतील. बाळ मोठं झालं की तुम्हा दोघांच्याही आवडीचे पदार्थ, गोष्टी, खेळणी घरात येतील. घरात दोन दोन वाढदिवस साजरे होतील म्हणजे डबल मजा. ते थोडं लहान आहे, त्याला अद्याप काही करता येत नाही त्यामुळे कदाचित आई त्याच्याकडे जास्त लक्ष देते असे वाटेल तुला पण आईचं प्रेम शेअर होत नाही काही. ते वाढतं, आधी ते तुझ्या एकट्यासाठी होतं. आता ते दोघांसाठी झालं म्हणजे वाढलं, डबल झालं. हो की नाही?”

“हम्म! हो मावशी खरंय तुझं, मला गेमबॉय देतेस?” अक्षय खुदकन हसला तसं मलाही बरं वाटलं. लहान मुलांची समजूत काढणं खूप सोपं असतं हे पुन्हा जाणवलं.

----

Wednesday, April 11, 2007

अंधश्रद्ध - २

पुढचा संपूर्ण आठवडा वसुंधराताईंना कोणतेही स्वप्न पडले नाही. रोज रात्री त्यांना शांत झोप लागत होती.

दर शुक्रवारी रात्री १० वाजता रीमाच्या कार्यक्रमाचे प्रसारण होत असे. मनात धाकधूक ठेवूनच त्या टीव्ही सुरू करत परंतु गेले काही आठवडे विशेष घडले नव्हते. आजही रीमाचा कार्यक्रम पाहण्यासाठी त्या आणि नानासाहेब रात्रीची जेवणे झाल्यावर दिवाणखान्यात काहीतरी वाचत बसले होते. रात्री दहाच्या सुमारास त्यांनी टीव्ही सुरू केला. आजचा कार्यक्रम अघोर विधी आणि पूजांबाबत होता. त्यासाठी रीमा आणि तिचा चमू मुंबईला लागून असलेल्या कान्हेरी जवळच्या जंगलात गेले होते. तेथील एका आड गुंफेत अघोर पंथाचे विधी चालतात आणि अमावास्येच्या रात्री काही विशेष पूजा तेथे केल्या जातात असा त्यांना सुगावा लागला होता.कार्यक्रमाला सुरुवात झाली तेव्हा कान्हेरीतील एका पायवाटेवर कॅमेर्‍यासमोर रीमा आपले छोटेखानी भाषण देत होती.

"या जगात कोणीही अश्रद्ध नाही. प्रत्येक माणूस सश्रद्धच असतो. प्रत्येकाच्या श्रद्धा वेगळ्या असतात, त्याची खोली वेगळी असते, आयाम वेगळे असतात. एखादा माणूस देवावर अजिबात श्रद्धा ठेवत नसेल परंतु आपल्या आईवडिलांवर श्रद्धा बाळगून असेल, तर एखादा आपल्या कामावर श्रद्धा बाळगून असेल, गुरुवर, कलेवर, अभ्यासावर. माणसाच्या श्रद्धा आणि श्रद्धास्थाने वेगवेगळी असतात. ज्या श्रद्धांवर आपला विश्वास नाही त्याला आपण अंधश्रद्धेचे नाव देतो. एखादी विद्या, शास्त्र पुरातन आहे, आज तिचे महत्त्व उरले नसेल किंवा कमी झाले असेल म्हणजे ते थोतांड असेलच असे नाही. एक उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर, एखाद्या प्राण्याला किंबहुना कुत्र्याला माणसाच्या शरीराचा, त्याने वापरलेल्या वस्तूचा, हातरुमाल किंवा चपला यांचा अचूक वास येतो. त्यावरून तो हरवलेली गोष्ट, जागा, माणूस हुडकून काढू शकतो. समजा घ्राणेंद्रिय जागृत करण्याची ही कला किंवा ज्याला सिद्धी असे म्हणू माणसाने अवगत केली तर केवळ एखाद्याच्या हातरुमालाचा, केसांच्या पुंजक्याच्या आणि अशा इतर लहानसहान गोष्टींवरून कदाचित इतरांचे स्वभाववर्णन करता येईल, त्या माणसाबद्दल बरेच काही सांगता येईल. तंत्रसाधनेतून अशा अनेक सिद्धी प्राप्त होतात असे काही तज्ज्ञांचे मत आहे, जे इतर वेळेस भोंदूबाबांकडून चमत्कार, सिद्धी, जादू म्हणून खपवले जाते. हे करणी, नवस, जादूटोणा कुठेतरी याच विचारांशी संलग्न आहेत.

याच पार्श्वभूमीवर आज आम्ही अघोरींना भेट देत आहोत. अघोर म्हणजे रक्त पिणारे, बळी देणारे, मृत व्यक्तीचे मांसभक्षण करणारे असा सर्वसाधारण समज असतो परंतु अघोर म्हणजे ज्याने स्वत:ला आठ प्रकारच्या दुर्गुणांपासून मुक्त केले आहे तो. हे दुर्गुण म्हणजे अपेक्षा, अभिमान, भीती, हाव, घृणा, बीभत्स, शारीरिक सुख आणि दांभिकता. यापासून मुक्ती मिळाली तर जीवाला कोणताही घोर राहत नाही आणि म्हणून यावर विजय मिळवणार्‍याला म्हणतात अघोर आणि साधनेला म्हणतात अघोर विद्या. जो हे साधतो तो शिव म्हणजे पवित्र असतो आणि त्याला अनेक सिद्धी प्राप्त होतात, तांत्रिक विद्येत तो प्रगती करतो.

तरीही आजच्या या युगात अशा शक्तींच्या मागे लागलेल्या व्यक्तींना या साधनेची काहीही माहिती नसते आणि अर्धवट ज्ञानाच्या आधारे ते आपली शक्ती व्यर्थ घालवतात याचे आम्ही आज चित्रण करणार आहोत.”

रीमाचे भाषण ऐकून वसुंधराताईंना शिसारी आली. “अहो, यावेळी तुम्हीच तिला सांगा की ही असली कामं करू नकोस म्हणून. कुठे जाते ही पोरगी रात्रीबेरात्री या आडरानात. हे सर्व पुरे झालं आता.”
“गप गं! तिची आख्खी टीम आहे तिच्याबरोबर. उगीच काळजी करत बसतेस. काही होत नाही. साध्या वेषातले दोन पोलिसही असतात बरोबर म्हणून सांगत होती मागे ती.” नानासाहेब उद्गारले.
“तुमचीच फूस आहे तिला. सोन्यासारखी एकुलती एक मुलगी, तिला काही होऊ नये एवढीच माझी इच्छा,” वसुंधराताईंच्या आवाजात काळजी भरली होती, त्यांनी आपले लक्ष पुन्हा टीव्हीकडे वळवले.

रीमा आणि तिचे सहकारी पूजेच्या ठिकाणी पोहोचले होते. समोरचे दृश्य पाहून वसुंधराताईंना मळमळून आले. जटा वाढवलेले आणि अंगाला भस्माचे पट्टे लावलेले काही साधू धीरगंभीर आवाजात काही मंत्रोच्चार करत होते, आजूबाजूला कोंबड्यांच्या रक्ताचा सडा पडला होता. जमिनीत त्रिशूळ खोचलेले होते, भिंतींवर मशाली पेटवल्या होत्या. जवळच कालीच्या मूर्तीची पूजा सुरू होती. रीमा आणि तिचे सहकारी कार्यक्रमाचे चित्रण करत होते. अचानक कॅमेरा हालल्यासारखा वाटला आणि सोबत काहीजणांचे चढवलेले आवाज.

“यहाँ आना मना है। चले जाव वरना नतीजा अच्छा नहीं होगा।"
“हम ये विधियाँ लोगोंतक पहुँचा रहे हैं। यही हमारा काम है, क्यों नहीं कर सकते?”

आपापसातील बाचाबाची वाढत चालली होती. कॅमेर्‍याशी हिसकाहिसकी सुरू होती. इतक्यात पन्नाशीच्या आसपासचा एक जटाधारी साधू कॅमेर्‍यासमोर येऊन उभा राहिला, त्याच्या घार्‍या डोळ्यात खुनशी भाव होते. त्याने रीमाकडे नजर रोखली आणि थंड आवाजात तो म्हणाला, “लडकी यहाँ से निकल। यहाँ आकर बहुत बडी गलती कर दी। इस साधनाको आप लोगोंने खंडित किया, नतीजा तो भुगतनाही पडेगा।"
“लेकिन यहाँ आना मना है ऐसे तो कहीं नहीं लिखा?” रीमाने त्याची रेवडी उडवण्याचा प्रयत्न केला.
“जुबान नहीं लडाना, ये मेरी आँखे याद रखना, आखीरतक तुम्हारे पीछे आएगी। बहोत वक्त नहीं देंगी। तोड दो इनका सामान।" मागे वळून त्याने इतरांना सूचना दिली आणि तो ताडताड निघून गेला. त्याच्या त्या थंडपणात एक प्रकारचा खुनशीपणा होता. वसुंधराताईंच्या सर्वांगावर शहारे आले.

यानंतर स्टुडियोतून झालेल्या प्रकाराचे वर्णन करण्यात आले परंतु तो ऐकण्याच्या मनस्थितीत वसुंधराताई नव्हत्या. त्यांनी चटकन रीमाला फोन लावला.

“रीमा, बेटा हे काय चाललंय? कुठे आहेस तू? कशी आहेस?”“बरी आहे गं आई,” आईने कार्यक्रम पाहिला असावा हे जाणून रीमा म्हणाली.
“घरात आहे, टीव्हीसमोरच. कार्यक्रम अमावास्येच्या रात्री चित्रित झाला ना! दोन दिवसांपूर्वी. लाइव टेलेकास्ट नाहीये. काळजी करू नकोस.”
“ते काही नाही! तू नीघ आत्ता. असशील तशी इथे ये. हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबायला हवं,”रडवेल्या होऊन वसुंधराताई म्हणाल्या.
“रात्रीचे साडे दहा वाजायला आले आहेत आई. आता कुठे निघू म्हणतेस. ऑफिसात उद्या कामही आहे. पुढच्या आठवड्यात येते, काळजी नको गं करूस.”
“नाही, ते काही नाही. आत्ताच नीघ, मी नाही धीर धरू शकत उद्या सकाळपर्यंत. खोपोली काही लांब नाही, रात्रीच्यावेळी तासा दिडतासात पोहोचशील. उद्याचा काय भरवसा, तू नवीन कारणे देशील, टाळशील. तुला कधी बघते असं झालंय,” वसुंधराताईंना हुंदका आवरला नाही.
नानासाहेबांनी त्यांच्या हातातून फोन घेतला. “रीमा, तुला शक्य आहे का यायला?” शांतपणे त्यांनी विचारले. "उद्या सकाळीच नीघ. इतक्या रात्री नको. आई जरा जास्तच हळवी झालीये, तिचं ब्लडप्रेशर वाढलंय असं वाटतंय. मी बघतो तिच्याकडे पण उद्या आलीस तर मलाही बरं वाटेल."
"बाबा, आता तुम्हीही? ठीक आहे. मी उद्या घरी येते.”
"पण तुझं काम?"
"आई जरा जास्तच काळजीत दिसत्ये, कसही करून कोणत्याही परिस्थितीत मी येतेच. "रीमाने वचन दिले तसा नानासाहेबांनी फोन ठेवून दिला.

----

रीमा जागेवरून उठली, आईच्या रडण्याने ती पुरी बेचैन झाली होती. आताच जावं का? बारा साडेबारा वाजेपर्यंत पोहोचता येईल. आई बाबांची बर्‍याच दिवसांत भेटही नाही. तिच्या चमूला एक दिवस तिच्या गैरहजेरीत काम पाहणे अशक्य नव्हते. उद्या सकाळी फोनवरून त्यांना कळवता येईल असा विचार करतानाच तिने कपडे बदलले, पर्स उचलली आणि दरवाजा लॉक करून ती गाडीपाशी आली. रात्रपाळीची गस्त घालणारा गुरखा आपल्याकडे नजर रोखून बघतो आहे असे तिला वाटले. तिने नजर उचलून त्याच्याकडे पाहिले. “सलाम मेमशाब!” म्हणून गुरखा निघून गेला. रीमाने स्मितहास्य करून मान झटकली आणि कार सुरू केली.

बिल्डिंगच्या बाहेर गाडी काढली तशी वळणावरचा भिकारी झटकन उठून उभा राहिला. आपल्याकडे तो डोळे फाडून बघतो आहे असे रीमाला वाटले पण नंतर लक्षात आले की बहुधा त्याची जागेवरून उठायची आणि परतायची वेळ झाली असावी. स्वत:शीच हसून तिने गाडी हमरस्त्यावर नेली. मुंबईचे रस्ते साडे १० वाजले तरी तुडुंब भरलेले. सिग्नलला गाडी थांबवली तशी ट्रॅफिक हवालदार आपल्याकडे जळजळीत नजरेने बघतो आहे असे तिला वाटले, नजर फिरवली तशी बाजूच्या गाडीतील चालक टक लावून तिला पाहत होता. 'हे काय चाललंय? मी घाबरले आहे की भास होताहेत?' तिने क्षणभर डोळे मिटले. पाठच्या गाडीचा कर्णकर्कश्श हॉर्न वाजला तसे हिरवा दिवा पडल्याचे तिच्या लक्षात आले.

"भित्यापाठी ब्रह्मराक्षस!” तिने आपल्या मनाला बजावले. गाडी आता हायवेला लागली होती. दिवसाच्या मानाने रहदारी तुरळक होती. बाहेर थोडं वारं सुटलं होतं. चंद्राची कोर ढगांशी लपंडाव खेळत होती. अंधार नेहमीपेक्षा जास्तच गडद असावा की काय कोणास ठाऊक, क्षितिजावर मध्येच एखादी वीज चमकत होती. हळूहळू पावसाचे थेंब काचेवर पडायला सुरुवात झाली. वायपरच्या मंद पार्श्वसंगीतावर रीमा गाडी हाकत होती. 'मागच्या ट्रकचे दिवे जरा जास्तच प्रखर आहेत का?' असा विचार तिच्या मनात आला. “ह्यॅ॒! आज फारच शंका येताहेत मनात बुवा. या मातोश्रींनी स्वत:बरोबर मलाही घोर लावला.”

आता बरेच अंतर कापले होते. रिमझिम पाऊस पडतच होता. मागच्या गाडीच्या प्रखर दिव्यांचा अजूनही तिला त्रास होत होता. मध्येच मागची गाडी फार जवळ आली की काय असा तिला वाटून गेले. चक्ककन प्रकाश तिच्या डोळ्यात गेला आणि क्षणभर तिला गाडीवरील ताबा सुटल्यासारखे वाटले. 'हम्म! किती घाई झालीये याला. ओवरटेक करून जा की, कशाला छळतोय मला!' रीमा स्वत:शीच पुटपुटली आणि त्या मागच्या ट्रकने बाजूने निघून जावे म्हणून तिने गाडी हळू केली, मागचा ट्रक आता फारच जवळ आला होता.

---

रात्रीचे बारा वाजून गेले होते. पाऊस आता जोमाने कोसळत होता. रीमाने गाडी घराकडे जाणार्‍या रस्त्यावर घेतली. तो ट्रकवाला अजूनही तिच्या मागेच होता. तिला थोडेसे विचित्र वाटले. 'हा माझा पाठलाग तर नाही ना करत?' पावसाने आता जोर धरला होता. घरापाशी जाणार्‍या गल्लीत तिने गाडी वळवली तरी तो ट्रक तिला मागेमागेच असल्यासारखा वाटला. तिने घाईघाईत गाडी बंगल्यात घेतली आणि ती उतरून धावतच दारापाशी आली आणि तिने दोन चारवेळा बेल दाबली. आतून काही चाहूल लागली नाही तशी तिने आईच्या नावाने हाका मारायला सुरुवात केली. 'आई! दार उघड. मी आल्येय. लवकर ये. दार उघड प्लीज!!'

दरवाजाशी काहीतरी चाहूल लागली असे वाटून वसुंधराताई उठल्या आणि दरवाजापाशी गेल्या. त्यांचा हात कडीवर गेला पण त्यांनी दरवाजा उघडला नाही, बंद दारावर आपले डोके टेकवले आणि त्या लहान मुलासारख्या ओक्साबोक्शी रडू लागल्या. रीमा बाहेरून जिवाच्या आकांताने आईला हाका मारत होती."मी आल्येय आई! तुम्हाला सांगितलं होतं ना की येईन. दार उघड, मला आत घे प्लीज!"

आतमध्ये नानासाहेब थरथरत्या हाताने अजूनही पोलिसांशी बोलत होते. पंधरा वीस मिनिटांपूर्वी त्यांना फोन आला होता. खोपोलीजवळच रीमाचा अपघात झाला होता. मागून येणार्‍या भरधाव ट्रकने तिच्या कारला धडक दिली. अपघात मोठा होता, रीमाचा जागीच मृत्यू झाला असावा. कारमध्ये रीमाच्या डायरीत घरचा पत्ता सापडला आणि तो वाचून पोलिसांनी लगोलग नानासाहेबांना फोन केला होता.

(समाप्त)

Tuesday, April 10, 2007

अंधश्रद्ध - १

लेखनप्रकार: गूढकथा
रात्रीचे साडेदहा वाजून गेले होते. बाहेरची रहदारी मंदावली होती. वसुंधराताईंनी हातातील कादंबरी मिटली आणि व्हरांड्याकडे नजर टाकली. संध्याकाळपासून धो धो पाऊस कोसळत होता. आताही पावसाची मोठ्ठी सर आली होती. व्हरांड्यातील दिव्याच्या मंद प्रकाशात संगमरवरी जमिनीवर पडणारे पावसाचे टपोरे थेंब आजूबाजूच्या निरव शांततेचा भंग करत होते. वसुंधराताईंनी एक सुस्कारा सोडला. त्या आरामखुर्चीतून उठायला जाणार एवढ्यात कोणीतरी दारावरची बेल वाजवली. "कोण असेल बरं इतक्या रात्री?" असा विचार करत त्या दरवाज्यापाशी आल्या. पुन्हा बेल वाजली. वसुंधराताईंनी पीप-होलला डोळा लावून बाहेर पाहिले. दाराबाहेर रीमा ओलीचिंब होऊन थरथरत उभी होती. तिला दारापलीकडे वसुंधराताईंची चाहूल लागली तशी ती ओरडून म्हणाली,"आई! दरवाजा उघड लवकर. प्लीज लवकर कर." तिच्या आवाजात अजिजी होती. वसुंधराताईंचा हात कडीवर गेला आणि तेथेच थबकला. क्षणभराने निर्विकारपणे त्या माघारी फिरल्या. बाहेरून रीमा बेल वाजवत होती. दरवाजाही ठोठावत होती. "आई! उघड ना गं दार, असं काय करत्येस? आई मी रीमा, आई गं! ए आई उघड ना गं दरवाजा!" रीमा काकुळतीने आईला सांगत होती. वसुंधराताईंनी शांतपणे दिवा मालवला, जसे काहीच घडले नव्हते आणि त्या झोपायच्या खोलीत जायला वळल्या.

घड्याळात रात्रीचे दोन वाजले होते. वसुंधराताई खाडकन गादीवर उठून बसल्या. हवेत गारवा होता तरी त्यांना दरदरून घाम फुटला होता. गेल्या सलग तीन रात्री त्यांना हे एकच स्वप्न पडत होते. रीमा, त्यांची एकुलती एक मुलगी मुंबईला राहत होती. शिकत असताना होस्टेलवर राहायची आणि आता नोकरी लागल्यावर तिला मुंबईच्या उपनगरात ऑफिसकडून फ्लॅट मिळाला होता. नानासाहेबांनी रिटायर झाल्यावर खोपोलीला हा बंगला बांधला होता. नानासाहेब आणि वसुंधराताई खोपोलीला आरामशीर निवृत्त आयुष्य जगत होते. ऑफिसने तिला कारही दिली होती. रीमा महिन्यातून एकदा शनिवार रविवारी आई-बाबांना भेटायला खोपोलीला एक चक्कर टाकायचीच. तशी वसुंधराताईंची इच्छा असायची की प्रत्येक शनिवार रविवार तिने आपल्यासोबत घरी घालवावा परंतु रीमाच्या नोकरीमुळे, कामातील व्यग्रतेमुळे ते शक्य होत नव्हते.

रीमाने ग्रॅज्युएशननंतर जर्नालिझमचा अभ्यासक्रम पूर्ण केला होता. गेले वर्षभर मुंबईतील एका अग्रगण्य टीव्ही चॅनेलच्या दैनंदिन बातम्यांच्या कार्यक्रमासाठी ती काही ठळक बातम्या गोळा करत होती. काही महिन्यांपूर्वी तिच्या बॉसने बढती आणि सोबत एक आगळीवेगळी जबाबदारी तिच्या गळ्यात टाकली होती. त्यानुसार काही 'हटके' बातम्या तिला गोळा करायच्या होत्या. त्यांच्या टीव्ही चॅनेलला अंधश्रद्धा, बुवाबाजी, करणी, मंत्र-तंत्र, भुताटकी अशा थोड्याशा वेगळ्या विषयांवर एक टाइम-स्लॉट टाकायचा होता. रीमाच्या बेधडक स्वभावाची माहिती असलेल्या तिच्या बॉसला रीमाशिवाय दुसरा कोणताही वार्ताहर या कामगिरीसाठी सुचणे केवळ अशक्य होते. रीमानेही आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. महिन्याभरात तिने आणि तिच्या चमूने मुंबईतील एक बंगाली बाबा आणि त्यानंतर भानामतीच्या एका प्रकरणाचा छडा लावला होता. अगदी हिरिरीने त्यांनी या प्रकरणांचा पाठपुरावा केला होता. स्वत: रीमाचा या बुवाबाजी, भुतेखेते, देवदेवस्कीसारख्या गोष्टींवर काडीमात्र विश्वास नव्हता. परंतु त्या बंगालीबाबाचे बिंग फुटल्यावर त्याने रीमाला बरेच शिव्याशाप दिले होते आणि याचे चित्रण वसुंधराताईंनी पाहिल्यापासून त्या हवालदिल झाल्या होत्या.

रीमाला फोन करून त्यांनी परोपरीने हे काम न करण्याबाबत सुचवले होते. परंतु ऐकेल तर ती रीमा कसली? तिने निक्षून आईला सांगितले होते की हे काम तिला मनापासून आवडते आणि ती ते करत राहणार. बहुधा त्याचा परिपाक वसुंधराताईंना या स्वप्नांत दिसत होता. सकाळ झाल्यावर आधी रीमाला फोन लावायचा असे ठरवून त्या पुन्हा गादीवर पडल्या.


----

सकाळी आठ वाजता त्यांनी रीमाच्या मोबाईलफोनचा क्रमांक फिरवला. "ए आई! काय गं इतक्या सकाळी फोन करत्येस? जाम घाईत आहे मी. उशीरच झाला होता निघायला," पलीकडून रीमाचा आवाज आला. "काही नाही गं! सहजच फोन केला." वसुंधराताई उद्गारल्या. "हम्म! म्हणजे नक्की काहीतरी खास कारण असणार," आपल्या आईची सवय जाणून रीमा हसत म्हणाली. आईच्या या सहज फोन करण्याची आता तिला सवय झाली होती. कधीतरी चांगले स्थळ आले म्हणून, कधीतरी मुंबईला गडबड उडाली म्हणून तर गेल्या महिन्यापासून स्वीकारलेल्या या नव्या जबाबदारीची काळजी वाटते म्हणून वसुंधराताई बरेचदा वेळीअवेळी 'सहजच' फोन करायच्या.

"हे कारमध्ये मोबाईलवर बोलणे जमत नाही अद्याप मला, लक्ष ड्रायव्हिंगवर राहत नाही पण सांग का फोन केलास ते?" रीमाने आईला सांगितले.
"मला ना गेले काही दिवस एकच स्वप्न पडतंय रीमा आणि त्याने मला अस्वस्थ करून टाकलंय."
"कुठलं स्वप्न?" रीमाने कुतूहलाने विचारले.वसुंधराताईंनी स्वप्नाची इत्थंभूत माहिती रीमाला दिली. रीमाने शांतपणे ती ऐकून घेतली. आपली आई देवाधर्मावर विश्वास ठेवणारी असली तरी अशा फुटकळ स्वप्नांवर विश्वास ठेवणारी नाही हे ती जाणून होती. बहुतेक लागोपाठ पडलेल्या एकाच स्वप्नाने आईला बेचैन केले असेल हे तिला जाणवले.
"हे बघ आई! मन बेचैन असलं ना की अशी स्वप्न पडतात बरेचदा. स्वप्न आणि सत्य यांच्यामध्ये बरेच दरवाजे असतात. मानवी मनाला सत्यातून स्वप्नापर्यंतच्या वाटेवर लागणार्‍या या दरवाजांना अजून उघडणे जमलेले नाही. या बंद दरवाज्यांमागे काय आहे न जाणता उगीच एखाद्या घटनेला अद्भुताचे विशेषण लावणे बरोबर नाही. अंधश्रद्धा या अशाच जन्माला येतात." समजावणीच्या सुरात रीमाने म्हटले.
"पुन्हा बंद दरवाजाचा विषय नको बाई," आपल्या स्वप्नाची आठवण येऊन वसुंधराताई म्हणाल्या,"पण मला सांग हे स्वप्न, सत्याचे दरवाजे वगैरे नवीनच कुठेतरी वाचलेलं दिसतंय."
"हो, हो नवीनच. हल्ली मानसशास्त्रावरील बर्‍याच पुस्तकांचा फडशा पाडत असते त्यातच कोठेतरी मिळालं," रीमा उत्साहाने फसफसून बोलत होती.
"हम्म! रीमा या मानसशास्त्राचं आणि मानसशास्त्रज्ञांचंही काही खरं नसतं बघ. ते सर्व जगाला आपले क्लायंट्स मानतात की काय कोण जाणे," लेक सुखरूप आहे याची खात्री पटल्यावर वसुंधराताई जरा मोकळेपणाने म्हणाल्या.
"अगं आई यापुढे आम्हाला जादूटोणे, मंत्र-तंत्र, काळी जादू, अघोर विधी असे काहीसे करणार्‍या काही व्यक्तींवर एक कार्यक्रम करायचा आहे" रीमा पुन्हा उत्साहाने सांगू लागली.क्षणभरापूर्वी अनुभवलेला मोकळेपणा वसुंधराताईंना पुन्हा दगा देऊन गेला.
"रीमा, कशाला या गोष्टींच्या मागे लागतेस? तू तुझ्या बॉसना सांगून बदली करून घेऊ शकत नाहीस का? हे असलं काहीतरी नसतं लचांड मागे का लावून घेतेस बाई? तो बंगाली बाबा कसं काहीबाही बोलत सुटला होता माहित्ये ना, उगीच कोणाचे शाप नको लागायला मागे. सोड हे सगळं."
रीमाला आईचे बोलणे ऐकून थोडीशी गंमत वाटली पण आईच्या आवाजातली काळजी पाहून तिने हळूच म्हटले,"आई, नको अशी अंधश्रद्धा बाळगू. काहीही होणार नाही. या असल्या भोंदूबाबांचे शाप कुठले आल्येत भोवायला? अशा अंधश्रद्धांच्या भीतीच्या पगड्यातून लोकांची सुटका झालीच पाहिजे. मी, आमचे चॅनेल, माझी टीम जे काम करतो आहोत ना ते समाजाच्या चांगल्यासाठीच आहे. आमचं काहीही वाईट होणार नाही. ऑफिस आलंच माझं, बंद करते आता फोन. तू अजिबात काळजी करू नकोस. निर्धास्त झोपत जा नाहीतर बाबांनाच सांगते तुझ्या स्वप्नांबद्दल."
"नको नको, त्यांना सांगू नकोस. ते उगीच माझी रेवडी उडवतील. चल, काळजी घे आणि येत्या शनिवारी जमल्यास ये गं राहायला, तुला पाहावंस वाटतंय!" असं म्हणून वसुंधराताईंनी फोन बंद केला. लेकीशी बोलल्यावर त्यांना मनापासून बरं वाटलं.


----
(क्रमश:)

Monday, March 12, 2007

सवयींचे गुलाम

हल्लीच एक गोष्ट लिहायला घेतली असताना त्यातील पात्राच्या तोंडी 'मला तिची सवय झाली होती.' असे वाक्य टाकायचे होते. सहज मनात विचार आला की "सवय" या शब्दाची व्याख्या कशी करता येईल? मला वाटतं त्यानुसार, एखाद्या सुखावणार्‍या, उत्तेजीत करणार्‍या किंवा दुखावणार्‍या, बोचणार्‍या, सलणार्‍या गोष्टीबद्दल आपली प्रतिक्रिया थंडावते त्यावेळेस आपण आपल्याला त्या गोष्टीची सवय पडली असे म्हणतो. याचबरोबर एखाद्या बोचणार्‍या, डसणार्‍या, सलणार्‍या गोष्टींविरूद्ध मनाने शोधलेला विरोधाचा मार्ग म्हणजे सवय लागणे.

आपल्या समजूतीनुसार आपण एखादी सवय चांगली किंवा वाईट ठरवत असतो उदा. मला बाहेर जाताना परफ्यूम फवारण्याची सवय आहे आणि मला ती आवडते. बाहेर जाताना हात आपसूक परफ्यूमच्या कुपीकडे वळतात, अर्थातच माझ्यामते ती चांगली सवय आहे. माझ्या लेकीच्या मते, "मम्मा! वॉलमार्टात जायला परफ्यूम कशाला लागतो? कसली ही सवय?" तिला माझी सवय नेहमीच आवडते असे नाही. म्हणजे आपल्याला चांगल्या वाटणार्‍या सवयी दुसर्‍याला चांगल्या वाटतीलच असा नेम नसतो. सवयीचेही एक गणित आहे. सवय लागणे हे ती सवय घालवण्याच्या मानाने फार सोपे असते.

सवयीचेही वेगवेगळे प्रकार असतात की काय याचा थोडासा विचार करत असता एका मित्राने बोलताना मला सुचवले की 'बघ! सवयीने स्वयंपाक चांगलाही होऊ शकतो.' मला सवयीचा पहिला प्रकार मिळाला. 'अंगवळणी पडणे', एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने त्यातील खाचाखोचा कळून आपल्यात सुधारणा करणे किंवा तशी सफाई कळत-नकळत येत जाणे. हा सवयीचा प्रकार माणसाला अचूकतेच्या जवळ नेतो म्हणून चांगला म्हणावा लागेल तर कधीतरी तो माणसाला यांत्रिकही बनवू शकतो, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने त्यातील नाविन्य, आवड संपून, ती गोष्ट कोणतेही नवे बदल टाळून उरकूनही टाकली जाते. दुसरा प्रकार मिळाला तो म्हणजे लकब; हा शब्दही सवयीशी मेळ खातो. एखाद्या अभिनेत्याची लकब जशी देव आनंदच्या हाता, खांद्यातील त्राण निघून गेल्यागत हालचाली. लकब हा शब्द सहसा एखाद्या वाईट सवयीसाठी वापरला जातो. जसे केसांवरून सतत हात फिरवण्याची सवय, नाक उडवायची सवय. सवयीचा तिसरा आणि बरीचशी नकारात्मक बाजू दाखवणारा शब्द म्हणजे चटक आणि चाळा. हे दोन्ही शब्द नकारात्मकता दाखवतात.

सवयीचा सर्वात नकारात्मक आणि धोकादायक प्रकार असावा व्यसन; मध्यंतरी मुक्तांगणावरील 'आहे हे असं आहे' या अनुदिनीवरील काही वाचनीय लेख, पुण्यातील रेव पार्टी, सिनेकलावंतांची अनेक प्रकरणे हे सर्व वाचनात आले तेव्हाही सवयीवर काही लिहावेसे वाटले होते. चांगल्या सवयी अंगी बाणवण्यास माणसाला वेळ लागतो परंतु वाईट सवयी लवकर लावून घेता येतात यावरून सवयीची वर केलेली व्याख्या बरोबर असावी असे वाटते. धूम्रपान, मद्यपान, मादक पदार्थांचे सेवन यांच्या आहारी मनुष्य फार चटकन जातो परंतु या सवयी सोडायला मात्र बराच काळ लागतो किंवा इतरांची मदत लागते. इतके करूनही जर मनावर ताबा नसेल तर ही व्यसने पुन्हा पदरी पडण्याची शक्यता बळावते.

वर उल्लेखल्याप्रमाणे माझ्या या गोष्टीतील नायकाला ज्या स्त्रीची सवय झाली होती, ती त्याला सोडून गेल्याने तो खोलवर कोठेतरी दु:खी आहे. माणसांची सवय व्यसनांप्रमाणेच घातक असते. एखादी रोज दिसणारी, रोज भेटणारी, घरातील व्यक्ती किंवा मित्र-मैत्रिण यांच्या वियोगाने माणसाच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी वेडापिसा झालेला जीव कोणतीतरी दुसरी घातक सवय स्वत:ला लावून घेण्याची शक्यता अधिक असते.

या सर्वावर काही उपाय असावा का हा मनातील पुढचा विचार. प्रत्येक मनुष्य येन केन प्रकारेण सवयींचा गुलाम असतो. सवय कधीतरी सोडून जाण्यापेक्षा माणसालाच स्वत:बरोबर फरफटत घेऊन जाते अशा सवयींपासून कालांतराने फारकत घेणे कधीही फायद्याचे असते.मनाचा निग्रहच या सवयी सोडण्यासाठी कारणीभूत ठरतो. माणसांची सवय विसरणे थोडेसे कठिण असले तरी काळासारखे उत्तम औषध नाही हेच खरे. तो काळ जाऊ देणे आणि मनाला एखाद्या चांगल्या सवयीत गुंतवणे कधीही उत्तम.

मध्यंतरी एका व्यक्तीने माझ्या अनुदिनीवरील 'आयुष्य आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.' हे वाक्य उचलण्याची परवानगी मागितली होती. असाच मनात आलेला एक विचार म्हणून ते वाक्य मी अगदी सहज तेथे टाकले होते पण ते कोणाला तरी समर्पक वाटेल असे वाटले नव्हते. सवयींच्या संदर्भातही हे वाक्य चपखल बसू शकते. कधीतरी इतरांना आणि स्वत:लाच जाचक ठरणार्‍या सवयी आपण लावून घेतो आणि त्याचा त्रासच आपण स्वत:ला आणि इतरांना करून घेत असतो, अशा जाचक सवयींतून मुक्त होणे अवघड असेल परंतु त्या मुक्ततेत एक वेगळाच आनंद असावा.

Friday, March 02, 2007

आम्ही मराठी

मध्यंतरी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांचा लेख वाचण्याचा योग आला. वाचताना मनात अनेक विचार येऊन गेले. यावर एके ठिकाणी विस्तृत लेख लिहावा असे मनात होते, त्यानिमित्ताने काही विस्कळीत विचार मांडत आहे. माझ्या अनुदिनी मित्रपरिवाराकडून काही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत ज्यामुळे या लेखाची अंतिम बांधणी करणे सोपे जाईल.

मराठी विश्वाकडून बरेचदा नव्या पिढीला मराठीशी बांधून ठेवणे अशक्य होत आहे, नवी पिढी मराठीची हेटाळणा करते, परदेशी गेलेल्या मराठी माणसांनी मराठी भाषेशी आपली नाळ तोडून टाकली आहे असा सूर बरेचदा ऐकू येतो. यांत १००% म्हणता आला नाही तरी मोठ्या प्रमाणात तथ्यांश आहे. विशेषत: अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनेक भारतीयांचा सहवास मला घडतो आणि मातृभाषेबद्दल त्यांच्या मनातील औदासिन्य कोठेतरी हृदयाला बोचते.

आपल्या मातृभाषेबद्दल एक प्रकारचा तिरस्कार केवळ आपण भारतीयच बाळगतो की काय ते कळत नाही परंतु मातृभाषा शिकून फायदा नाही, नव्या पिढीला कोठे मातृभाषा लिहिता वाचता येते, करायचे आहे काय तिचे संवर्धन करून? असा कोठे भविष्यात मातृभाषेचा उपयोग होतो आपल्याला? असा विचार करणारे सर्वत्र आढळून येतात. केवळ मराठीचा विचार करताही आपल्या मराठी समाजात अशीच भावना रूजत असल्याचे दिसते. इंग्रजीच्या तोडीस तोड उतरून मराठी पैसे मिळवून देऊ शकेल का? असा प्रश्न बर्‍याचजणांना पडतो.

या आणि अशा प्रश्नांची नेमकी उत्तरे काय द्यावीत याचा विचार केला असता; मराठी ही माझी मातृभाषा आहे, कळायला लागल्यापासून मी ती बोलते/तो आहे. माझे आई-वडिल, मित्रमंडळ, नातेवाईक मराठीच बोलत होते/ बोलतात. तिला इतिहास आहे, व्याकरणदृष्ट्या ती सक्षम आहे. ज्ञानेश्वरीपासून ते आजकालच्या तरूण लेखक- लेखिकांपर्यंत वाचण्यासारखे, त्यातून शिकण्यासारखे, मंथन करण्यासारखे मराठीत मुबलक साहित्य आहे, मराठी माणसे गुणी आहेत, मराठीचे संवर्धन करण्याची त्यांची योग्यता आहे आणि म्हणून मराठी जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, माझी भाषा राहिली पाहिजे. आपल्या मातृभाषेबद्दल बेफिकिर, बेजबाबदार किंवा न्यूनगंडपिडीत राहण्यात कोणताही मोठेपणा नाही.

साधूंनी या लेखात म्हटल्याप्रमाणे मातृभाषेबाबत बेफिकिरी दाखवण्याचा हा प्रश्न जगात बहुधा सर्वांनाच भेडसावत असावा. जगाच्या बाजारात टिकाव धरायचा तर इंग्रजीला पर्याय नाही परंतु जर ज्ञानभाषा आणि मातृभाषा अशा दोन्ही भाषांचे संवर्धन जर आपण सारख्या प्रेमाने केले तर यांत नेमके नुकसान कोणते? अमेरिकेत राहून कधीतरी लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे मी कधीही चिनी आई-वडिलांना आपल्या मुलांशी खाजगीत इंग्रजी बोलताना पाहिलेले नाही. ते व्यवस्थित हेल काढून आपली मातृभाषा बोलतात. अनेक युरोपीयही आपल्या मुलांशी खाजगीत मातृभाषेतून बोलतात, याविरुद्ध भारतीय माणसे सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आपापसात आपल्या मुलांशी इंग्रजीत संभाषण करण्यात धन्य मानतात. का ते त्यांचे तेच जाणोत. अर्थात यात चुकीचे काहीच नाही परंतु नेमके बरोबर तरी काय असावे?

शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावरून असे आढळले आहे की दोन भाषा उत्तम जाणणारी मुले प्रत्येक परीक्षेत एकभाषी मुलांच्या पुढे असतात. त्यांचे विचार अधिक परीपक्व असतात, त्यांची आकलनशक्ती इतरांपेक्षा खचितच अधिक असते. भारतीय आणि इतर आशियाई देशांतील मुलांची प्रगती पाहता या विधानावर विश्वास ठेवणे सहज शक्य आहे.

जागतिक बाजारपेठ झपाट्याने वाढत असता शर्यतीतून कधीतरी मराठी पाठी पडली. तिला दुर्लक्षित ठेवण्यास जबाबदार आपणच आणि ती दुर्लक्षित ठेवण्यात धन्य मानणारेही आपणच. गेले वर्षभर मी नेटाने मराठीत लिहित असल्याने भारतीय आणि परभारतीय मराठी वाचक मराठीला कसा तगवून आहे याची बरेचदा प्रचीती आली आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे हे करण्यात परदेशांतीलच अनेक मराठी माणसांचा सहभाग आहे. इंटरनेटवरील जोमाने वाढणारी संकेतस्थळे, अनुदिनी (blogs), वर्तमानपत्रे पाहिली की मराठी भाषेचा र्‍हास होत आहे ही ओरड मिथ्या वाटू लागते. आजमितीला मराठीत दरवर्षी दीड दोन हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित होतात. इतक्या मोठ्या संख्येने मराठी पुस्तके छापली जात असतील तर त्यांना वाचकगण आणि खप असणारच, याचा मनाला आनंद होतो. परदेशातूनही मराठी मंडळांतर्फे निघणारे मराठी अंक मराठी भाषा तगवून ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु लक्षपूर्वक पाहिले असता २०-२५ वयाच्या दरम्यानची तरूण पिढी अभावानेच लेखन करताना आढळते, या विसंगतीचा कोठेतरी विशाद वाटून जातो. नव्या पिढीबरोबरच आपल्या मातृभाषेपासून त्यांना वंचित ठेवणार्‍या आणि तिच्याविषयी गोडी निर्माण करण्याचा प्रयत्नही न करणारे पालकही या अनास्थेस जबाबदार आहेत.

या पार्श्वभूमीवर नुकत्याच पाहण्यात आलेला ऑस्कर पुरस्कार वितरण समारंभातील एनिनो मोरोकोनी या जगप्रसिद्ध इटालियन संगीतकाराचे उदाहरण द्यावेसे वाटते. The good, the bad and the ugly ची सुप्रसिद्ध धून इतर अनेक चित्रपटात मोहवून टाकणारे श्रवणीय संगीत देणार्‍या या ज्येष्ठ कलाकाराने ऑस्करच्या व्यासपीठावर आपले भाषण इटालियन भाषेत केले. इंग्रजी न बोलल्याची खंत किंवा लाज त्याच्या चेहर्‍यावर आणि प्रेक्षकांच्या चेहर्‍यावर कोठेही नव्हती. आपला पुरस्कार त्याने आपल्या पत्नीला समर्पित केल्यावर त्या दोघांच्या डोळ्यांतील भावना लाखो प्रेक्षकांपर्यंत नेमक्या पोहोचल्या. आपले कलागुण दाखवण्यासाठी इंग्रजीसारख्या ज्ञानभाषेची गरज नक्कीच आहे परंतु आपली मातृभाषा कोणत्याही प्रकारे आणि ठिकाणी कनिष्ठ दर्जाची नाही हेच यातून दिसले.

यावर्षीच्या मंडळाच्या अंकाच्या संपादनात मदत करताना मला अनेक लोकांचे विचार आणि भावना कळल्या. कोठे उत्साह दिसला तर कोठे औदासिन्य, परंतु अनास्थेचे प्रमाण उत्साहाच्या प्रमाणापेक्षा फार मोठ्या प्रमाणात होते हे नमूद करावेसे वाटते. या संमिश्र भावनांतून मनात आलेले विचार येथे मांडले आहेत.

Friday, February 23, 2007

हॅपिली नेवर आफ्टर!

सिंड्रेला (भाग दोन)



राजा राणीने थाटामाटात राजपुत्राच लग्न सिंड्रेलाशी लावून दिले. वधू-वरांना सर्वांनी तोंड भरून आशिर्वाद दिले. खरं बघायला गेलं तर राणीला मनातून सून पसंत नव्हती. तिच्या माहेरी सिंड्रेलापेक्षा ५६ सुंदर मुली होत्या. पण करते काय? तिच्या लाडक्या मुलाला बायको पसंत होती ना!

लग्न झालं, हनीमून झाला, सगळेजण आपापल्या कामाला लागले. सिंड्रेलाचा वेळ महालात जाईना. नटून थटून बसायचे, आल्यागेल्याला गोड हसून दाखवायचे, मेजवान्या झाडायच्या एवढेच काम सिंड्रेलाच्या वाटयाला होते. दिवसभर राबराब राबून कष्ट उपसणार्‍या सिंड्रेलाच्या शरीराचा घेर रोजच्या ऐशोआरामाने हळूहळू वाढू लागला. राजपुत्राने एक दोन वेळा मोठया प्रेमाने तिला याची कल्पनाही दिली नंतर लक्ष देणे सोडून दिले.

काही दिवसांपूर्वी एका दासीने राजपुत्राला मुख्य प्रधानांच्या कन्येसोबत बागेत फिरताना पाहिल्याचं सिंड्रेलाला येऊन सांगितलं. प्रधानकन्या राजपुत्राला अगदी खेटून बसल्याचंही सांगितलं होतं. सिंड्रेलाने राजपुत्राकडे याचा हळूवारपणे खुलासा मागितला असता त्याने प्रधान कन्येला गाणं येतं, काव्य येतं, तिला अनेक विषयांची, भाषांची उत्तम जाण आहे असं उत्तर दिलं. वर, राजपुत्रांना अनेक बायकांचा संग शोभून दिसतो असंही सुचवलं.

सिंड्रेलाला दिवसेंदिवस या सगळ्याचा कंटाळा आला होता, काहीतरी करणे आवश्यक होते, पण करावे काय यावर तिने बराच विचार केला आणि एक दिवस ती सरळ स्वयंपाकघरात घुसली.

आचार्‍यांना तिने सांगितले की आजचा खाना ती बनवणार. कंबर कसून सिंड्रेला कामाला लागली. आचारी आ करुन पहात राहिले. त्यांचा प्रमुख आचारी पुढे सरला आणि म्हणाला, "बाईसाहेब हे काय? महाराज काय म्हणतील? महाराणींना कळलं तर आमच्या नोकर्‍या जायची वेळ येईल." पण सिंड्रेलाने फारसं लक्ष दिलं नाही, आपल्याच नादात कामाला लागली होती.

एका आचार्‍याने हळूच जाऊन राणीच्या कानात झाला प्रकार सांगितला. राणीसाहेब धावत पळत भटारखान्यात आल्या.

"हे काय बाई भलतंच? राजवाडयात नोकर कमी पडले की काय?" राणीने आश्चर्याने विचारले.

"नाही राणीसाहेब, पण नुसतंच बसून बसून माझा वेळ जात नव्हता म्हणून इथे आले," सिंड्रेलाने अदबीने उत्तर दिले.

"जळ्ळ मेलं लक्षण! वेळ जात नव्हता तर मेजवानी ठरवावी. उमरावांच्या मुली बायकांना बोलवावं. नाहीतर गाणं, चित्रकला, भरतकाम वगैरे करावं," राणीसाहेब डाफरल्या.

"पण मला हे सर्व कुठे येतंयं? माझा जन्म झाड-पूस, स्वयंपाक, साफ-सफाई यांतच गेला," सिंड्रेलाच तोंड उतरुन गेलं होतं. आपल्याला स्वयंपाकघराच्या चार भिंतींबाहेरचं इतर काहीही माहित नसल्याची बोच तिला गेले काही दिवस खात होतीच.

"हो तर! तरी मी राजपुत्राला सांगितलं होतं की असला भिकारडेपणा घरात नको, पण त्याच्यावर प्रेमाचं भूत स्वार होतं ना! जशा काही सुंदर्‍या कमीच होत्या राज्यात." फणकारून राणीसाहेब म्हणाल्या.

सिंड्रेलाच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती धावतच आपल्या महालात परत आली आणि पलंगावर स्वत:ला झोकून देऊन रडू लागली. कोणीतरी हलकेच तिच्या डोक्यावरुन हात फिरवत होते. तिने वर मान करुन पाहिले तर समोर परीराणी उभी होती.

सिंड्रेला रडतरडत तिच्या कुशीत शिरली. "परीराणी, हे गं काय झालं? मला वाटल होतं की मी सुखी झाले. सावत्र आईच्या जाचातून सुटका झाली, स्वप्नातला राजकुमार मिळाला; पण वरून सुखी वाटणारं आयुष्य इतकं दु:खदायक असू शकतं याची कल्पनाच नव्हती मला. कशाला तू भरीला पाडलंस त्या समारंभाला जाण्यासाठी? ना मी तिथे गेले असते, ना राजपुत्र भेटला असता ना हे सगळं नशिबी आलं असतं....."

परीराणीने तिला कुरवाळलं आणि जरा कोरड्या आवाजात म्हटलं, "सिंड्रेला, मी नाही हो तुला भरीला पाडलं, तिथे जावं अशी तुझीच इच्छा होती. मी ती पूर्ण केली इतकंच. मी तुला राजपुत्राच्या प्रेमात पडायला आणि त्याच्याशी लग्न करायलाही भाग नाही पाडलं. ती ही तुझीच इच्छा."

"अगं पण प्रेमात कशी नसते पडले मी? राजपुत्र आहे तो राज्याचा. त्याच्यापेक्षा उमदा पुरूष इतरत्र कुठे मिळायचा?"

"बरोबर बोललीस. राज्यातील ६ वर्षाच्या पोरीपासून ६० वर्षाच्या वृद्धेपर्यंत सर्वच त्याच्या प्रेमात आहेत, म्हणून त्या त्याच्याशी लग्नाची स्वप्नं नाही पाहात. प्रेम आणि लग्न या फार वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम कधीही आणि कोणावरही करता येतं, लग्न कधीही आणि कोणाशीही केलं तर फसण्याचा संभव अधिक असतो. प्रेम टिकवावं लागत नाही, ते जसं निर्माण होतं तसं कधीतरी विरूनही जातं, त्याचा गाजावाजा करावा लागत नाही की दवंडी पिटावी लागत नाही. लग्नाचं तसं नाही, ते करताना समाजाला सांगावं लागतं, लग्न टिकवावं लागतं आणि मग 'सुख काय मानण्यातच आहे', 'ठेविले अनंते जैसे..' असं म्हणत मार्गक्रमण करावं लागतं.

मजा म्हणजे 'लग्न पहावे करून...' अशी इच्छा ठेवणारी, लग्न करणारी, लग्न मोडणारी, लग्न टिकवणारी सर्वच माणसे या ना त्याप्रकारे कसल्या न कसल्या तक्रारी करत असतात. नवर्‍याला बायकोबद्दल, बायकोला नवर्‍याबद्दल, सासूबद्दल, सासूला सुनेबद्दल तक्रारीच तक्रारी. मला तर वाटतं की या सर्व परीकथांचा जो लेखक आहे त्याने कधीच लग्न केलं नसावं, नाहीतर 'देन दे लिव्ड हॅपीली एवर आफ्टर'सारखं वाक्य प्रत्येक गोष्टीच्या शेवटी त्याने टाकलंच नसतं.

तू लग्न केलंस ना सिंड्रेला, आता त्यात राहून सुखी राहायचं, सुख मानायचं की सुखी असल्याचं भासवायचं हे तुझं तू ठरवायचं. एकच लक्षात ठेव, लग्न केलेले बाकीचे सगळेही थोड्याफार प्रमाणाने तुझ्यासारखेच आहेत, तेव्हा दु:खी होण्यापेक्षा मीही त्यांच्यातलीच आहे असं समजून विचार कर. आयुष्यात काहीतरी वेगळं कर. राणी आहेस तर राणीसारखी राहा. नव्या गोष्टी शीक, आयुष्याची नवी दालने उघड आणि आणखी एक लक्षात ठेव, नव्या गोष्टी शिकलीस म्हणून सुखी होशील असे नाही; दु:ख, प्रश्न, अडचणी अनेक मार्गाने येतात. लग्न करून टिकवणं इतक सोपं असतं तर आम्हा पर्‍यांनी नसती केली लग्न?

तरीही हॅपिली नेवर आफ्टरमुळे खूप काही बिघडत नाही. दिवस उगवायचा थांबत नाही, रात्र व्हायची वाट पाहत नाही, उन्हाळे हिवाळे थांबत नाही. जगात बरेचसे माझ्यासारखेच आहेत म्हण आणि पुढे चल! किंवा जमलं तर आपल्या पायावर उभी राहा. सतत काहीतरी उद्योग करायला शीक. आपल्या गाठीशी थोडंसं श्रेय घे आणि स्वतःचं आयुष्य जगायला सुरूवात कर... मग ते राजवाड्याच्या बाहेर पडून करावं लागलं तरी... बघ! आहे तयारी? "



आणि परीराणी अंतर्धान पावली.

Sunday, February 18, 2007

जो जीता वोही

गेल्या कित्येक दिवसांपासून माझा "ब्युसाफलस" पेंड खातोय. आता घोडाच तो पेंड नाही तर काय खाणार म्हणा, पण गाढवाला आपण कोणाचा घोडा आहोत ते नको लक्षात यायला?

'अलेक्झांडर द ग्रेट' लिहावा अशी बर्‍याच दिवसांपासून इच्छा होती. हल्ली विकिमुळे एक बरं झालंय की कोणीही उठून कोणत्याही विषयावर बिनधास्त लिहू शकतो. तसा सुमारे ३ वर्षांपूर्वी अलेक्झांडरवर बरेच वाचन केले होते. त्या अनुषंगाने ग्रीक इतिहासावरही बरेच हात पाय मारले होते परंतु काही दिवसांनी 'मेमरी लॉस' होणे "मैं कहाँ हूँ?" विचारणे हा माझा स्वाभाविक गुणधर्म आहे त्यामुळे सध्या आपण असे काहीतरी वाचले होते, हे जरा बिचकतच म्हणते.

मध्यंतरी ऑलिवर स्टोनचा अलेक्झांडर फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता, अरेरे! काय टुकार सिनेमा होता. केवळ कॉलिन फॅरेल होता म्हणून पैसे वसूल झाले असे खोटे समाधान मानायचे. पण अलेक्झांडर काय किंवा ब्रॅड पिटने काम केलेला ट्रॉय काय, इतक्या historical inaccuracies कशा काय कोणी दाखवू शकतो? धन्य ते हॉलीवूड!

अलेक्झांडर चित्रपटात एक मजेशीर प्रसंग घुसवलेला आहे. पर्शियन सम्राट दरायसच्या बायकोला, स्ट्रटेराला बंदिवान केल्यावर अलेक्झांडर विचारतो, "हे राणी! मी तुला कसे वागवू?" आणि राणी उत्तरते, "राणीसारखी". अगं आई गं! या सिनेमावाल्यांनी आमच्या पुरुरव्याच्या तोंडचे शब्द चक्क चोरले. ते तर ते पोरसच्या नावाला आणि पात्राला फुलांच्या माळा आणि तोंडाला रंग फासून साफ रानटी करून टाकले होते. या हॉलीवूडवाल्यांची नेमकी कोणती अडचण असत्ते आयुष्यात कळायला मार्ग नाही. (What is their problem in life myan??)

याउलट, ग्रीकांच्या इतिहासात पोरसचे वर्णन साडेसहा फूटांहून अधिक उंच, धिप्पाड, देखणा, करारी असे केले आहे. 'मला राजासारखा वागव' असे सांगितल्यावर अलेक्झांडरला त्याच्या धाडसाच्या वाटलेल्या कौतुकाचे व्यवस्थित वर्णन केलेले आहे. या खेरीज अलेक्झांडरला असलेले भारतीय कला, संस्कृती यांचे कुतूहल, भारतीय संस्कृतीने आपल्याला परके समजू नये यासाठी केलेले प्रयत्न, अलक्षेंद्र म्हणून त्याचा भारतीय दस्त ऐवजांत केलेला उल्लेख, विद्वान ब्राह्मणांशी केलेल्या चर्चा, आपल्यासोबत ग्रीसला चला असे अनेक विद्वानांना केलेले आवाहन आणि कल्याण ऋषींना ग्रीसला नेण्याची जबरदस्त इच्छा इ. इ.

नव्या वर्षाची सुरूवात म्हणून विकिपीडियावर 'अलेक्झांडर द ग्रेट' खरडायला घेतला होता. पब्लिक लायब्ररीतून पुस्तके आणली, वाचन सुरू केले. एकदा लेखन सुरू केल्यावर मात्र मारुतीच्या शेपटासारखा लेख वाढतच जातोय. मॅसेडोनियन, ग्रीक, एजियन, पर्शियन, कित्येक शहरे, नद्या, प्रदेश, लढाया, सरदार, मित्र, शत्रू, मांडलिक, फितूर प्रत्येकाची गणती ठेवावी लागते. अगदी या ब्युसाफलस नावाच्या गाढवाचीही.

जो जीता वहीं सिकंदर आणि मुकद्दर का सिकंदर खेरीज अलेक्झांडर कुठे आठवतो आम्हाला? नाही, तसे ही आमीर आणि अमिताभच आठवत असावेत म्हणूनच खर्‍या अलेक्झांडरबद्दल लिहायला घेतलं होतं परंतु गेले बरेच दिवस या वाईट हवामान, सुपर बोव्ल (घोडा नाही तर घोड्याची नाल), त्यानंतर आमचे मराठी मंडळ, शाळा, मित्रमंडळ यांना सगळे कार्यक्रम एकापाठोपाठ एक करावेसे कसे वाटतात कोण जाणे? येणार्‍या बर्‍याच दिवसांत रात्री थोड्या सोंगं फार अशी परिस्थिती आहे. पुढचे काही महिने भरघोस कार्यक्रमात, जबाबदार्‍यांतच जाणार असल्याने अलेक्झांडरला भोज्जा करायला एप्रिल उजाडेल की काय अशी भीती सध्या मला वाटते आहे आणि एप्रिलपर्यंत उत्साह गळला तर? आमचं घोडं अडूनच राहिलं तर?.... :(

.... म्हणूनच हा लेखनप्रपंच. कधीतरी मनांत आलं की जो जिंकतो तोच सिकंदर असेल तर या सर्व लढाया संपल्यावर कधीतरी पुन्हा अलेक्झांडरशी लढाई लढायला घेईन, आणि यावेळीही खुश्शाल जिंकू दे त्या सिकंदराला.

Tuesday, February 13, 2007

पांढरेशुभ्र वादळ

हिरवे हिरवे गार गालिचे
कधी बरे नजरेस यायचे?


लाल समुद्र, काळा समुद्र यांच्यासारखा एक सफेत समुद्र रशियाच्या वायव्येस आहे. 'गंगा आली रे अंगणी' प्रमाणे तो सध्या आमच्या दारी अवतरला आहे.

गेले कित्येक दिवस आमच्या शहरात बर्फाचा शुभ्र गालिचा सर्वत्र पसरला आहे आणि आज आधीच्याच चार इंच जाड्या या गालिच्यावर आठ ते बारा इंच बर्फ पडला आहे, पडतो आहे. सोबतीला ४०- ४५ मैल वेगाने घोंघावणारे वादळी वारे, त्यांच्या जोडीने तांडव करणारे हिमकण आणि दृष्टी मर्यादित करणारा मंद प्रकाश.


त्यातल्या त्यात उत्तम गोष्ट म्हणजे राज्यात शाळा, महाविद्यालये आणि बहुतांश कार्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. अशावेळी घरात फायरप्लेसमध्ये जाळ करायचा, हातात वाफाळलेल्या चहा-कॉफीचा मग घ्यायचा, शाल पांघरून एखादा मस्त चित्रपट टाकायचा आणि तोंडात एखाद्या आवडीच्या गाण्याची धून घोळवायची. जसे,

Oh the weather outside is frightful
But the fire is so delightful
And since we’ve no place to go
Let it snow, let it snow, let it snow



DSC00798



DSC00800



DSC00801


"कधीकाळी" (just kidding!) ही माझ्या घराची मागची आणि पुढची बाजू होती. इतर वेळेस येथे एक हिरवेगार मोकळे मैदान, रस्ता आणि गाड्या पार्क करायला पार्किंग लॉट असतो. ते हिरवेगार मैदान पुन्हा नजरेस पडायला बहुधा एप्रिल उजाडेल.

Tuesday, February 06, 2007

आऽऽई!!

लेखन प्रकार: गूढकथा


वासुदेवने बाइक पार्क केली आणि लगबगीने तो घरात शिरला. "स्वाती ए स्वाती! कुठे आहेस तू? एक खुशखबर आहे."
"कसली खुशखबर? सांग तरी," स्वाती स्वयंपाक घरातून हात पुसत बाहेर आली.
"माझी बढती झाली. बॅंकेचा व्यवस्थापक म्हणून," वासुदेवने खुशीत येऊन स्वातीला घुसळत सांगितले.
"हो??? अरे वा, बॉस! अभिनंदन. मज्जा आहे बुवा! आता केबिन, स्टाफ आणि काय काय मिळणार असेल नाही."
"हो तर! पण बढती बरोबर बदली पण हातात पडलीये. मडगावला बदलीची ऑर्डर हाती आली आहे. आठवड्याभरात निघायला हवंय, घाई घाई होईल नाही गं," वासुदेवने हलकेच पिल्लू सोडले.
"अरेच्चा! एकदम मडगाव! गोवा!!. म्हणतोस काय वासू. गोव्याला जायला मी एका पायावर तयार आहे. तुला माहित्ये ना की गोवा मला किती आवडतं आणि तिथे जाऊन पुढची काही वर्ष राहायचं म्हणजे खरंच मस्तच रे! तू काही काळजी करू नकोस. मी विशाखाला बोलावून घेते ना मदतीला. होईल सगळी व्यवस्था आठवड्यात," स्वातीने उत्साहाने सांगितले.
"अगं पण तुझे छंद?"
"चित्र ना अरे उलट मडगाव सारख्या ठिकाणी माझ्यातला चित्रकार अधिकच फुलून येईल. वासू, आपणना मडगावला एखादा छोटासा बंगला भाड्याने मिळतो का ते पाहूया. मला ना ऐसपैस घर असावं, घरासमोर छानशी बाग असावी अशी खूप दिवसांची इच्छा आहे रे. माझा वेळ मस्त जाईल अशा घरात आणि चित्रकाराला लागणारा एकांतही मिळेल," स्वातीचा उत्साह फसफसून वाहत होता.

वासुदेव आणि स्वातीच्या लग्नाला १० वर्षे उलटून गेली होती. दोघेही संसारात सुखी होते. पण संसाराच्या वेलीवर फूल उमलले नव्हते. स्वाती घरात लहान बाळाच्या येण्याला आसुसलेली होती. आपला वेळ आणि मन ती चित्रकारी करण्यात रमवत असे. अशा गोष्टी आपल्या हातात नसतात हे समजून उमजून दोघेही एकमेकांना सांभाळून घेत.
"मी बघतो. बॅंकांना भाड्याने घरं देणारे काही एजंट असतात. मडगाव ब्रॅंचला संपर्क साधून काम होतंय का पाहतो."

-----

आठवड्या भराने स्वाती आणि वासुदेव मडगावला पोहोचले. एजंटला सांगून एक घर पाहून ठेवले होते. सगळं काही पसंत पडले की सामान मागाहून विशाखा; स्वातीची धाकटी बहीण पाठवणार होती. पेडणेकर नावाचे गृहस्थ इस्टेट एजंट म्हणून काम पाहत. बॅंकेतल्या अधिकार्‍यांना लागणारी भाड्याची घरे पुरवायचे कामही ते करत. ठरवल्या प्रमाणे ते सकाळी १० वाजता स्वाती आणि वासूला घ्यायला त्यांच्या हॉटेलवर पोहोचले.

पेडणेकर अंदाजे ५०च्या आसपास असावेत. माणूस दिसायला सज्जन आणि मृदुभाषी होता. आपली गाडी घेऊन आला होता त्यामुळे घर पाहून पुन्हा हॉटेलवर यायची सोयही होणार होती. गाडी सुरू केल्यावर पेडणेकरांनी घराबद्दल थोडी माहिती द्यायला सुरुवात केली.

"छोटीशी एक मजली बंगली आहे बघा. खाली बैठकीची खोली, स्वयंपाकघर, एक बेडरूम आणि वरच्या मजल्यावर बाल्कनी आणि ३ बेडरूम आहेत. खानोलकरांच घर म्हणून सगळे ओळखतात. अंदाजे ३० एक वर्षांपूर्वी त्यांनी हे घर बांधलं, आता पती पत्नी दोघे वृद्ध झाले आहेत. गेल्या १० वर्षांपासून अमेरिकेला मुलाकडे राहतात. घर रिकामं नको म्हणून भाडेकरू ठेवतात. घराची जागा समुद्राजवळच आहे. भल्या पहाटे नाहीतर रात्री समुद्राची गाज सहज ऐकू येते. पूर्वी विहिरीचं पाणी वापरावे लागे, आता विहिरीवर पंप लावून पाणी खेळवलं आहे, नगर पालिकेचा नळही आहे पण त्याला दिवसातले थोडे तासच पाणी येतं."

बोलता बोलता पेडणेकरांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावली, "चला पोहोचलो आपण, घर पाहूया."

घर छान टुमदार दिसत होतं. घराबाहेर बर्‍यापैकी मोठं अंगण होतं पण त्याची निगा राखलेली दिसत नव्हती. तण माजलं होतं. झाडं सुकून गेली होती. स्वातीला क्षणभर उदास वाटलं, "कोण राहत होत इथे यापूर्वी?" तिने एक सहज प्रश्न केला.

"तसं घर भाड्याने देऊन ७-८ वर्षे झाली. सगळ्यात आधी एक कुटुंब राहायचं. ४ वर्षे राहिले आणि नंतर सोडून गेले. त्यानंतर एक दोन कुटुंब आली, गेली. फार काळ नाही राहिली. त्यानंतर गेले दोन एक वर्षे म्हात्रे नावाचा एक सडाफटिंग गृहस्थ इथे राहत होता. तो वासुदेव साहेबांच्या बॅंकेतच होता. त्याची हल्लीच मुंबईला बदली झाली. आता तो कुठे बाग राखणार? म्हणून हे सगळं असं उजाड दिसतंय एवढंच. बागेला पाणी घालायला नळ आहे इथे बाहेरच. चला घरात जाऊ," लगबगीने पेडणेकरांनी दरवाजा उघडला.

बाहेरच्या प्रखर सूर्यप्रकाशातून एकदम घरात शिरल्याने स्वातीच्या डोळ्यासमोर अंधारल्यासारखं झालं. हळू हळू दृष्टी सरावली तसं घर नजरेत येऊ लागलं. बंद घरातला एक प्रकारचा कुबट वास सर्वांच्या नाकात भिनला. पेडणेकरांनी लगबगीने जाऊन खिडकी उघडली, "बंद होतं गेले थोडे दिवस. या माझ्याबरोबर. मी घर दाखवतो." आणखी एक-दोन खिडक्या त्यांनी उघडल्या.

स्वाती आणि वासूने सगळं घर फिरून पाहिले. घर प्रशस्त होतं. हवेशीर होतं. पश्चिमेकडच्या खिडक्यांतून समुद्राचा खारा वारा येत होता. "या! स्वयंपाकघराच दार मागच्या अंगणात उघडतं. इथेच विहीर आणि पंप आहे. विहीर पूर्वी उघडी होती पण आता वरून झापडं लावून बंद केली आहे. पिण्याचा पाण्यासाठी नगरपालिकेचा नळ आणि इतर सगळ्या गरजांसाठी या विहिरीचं पाणी वर्षभर पुरून उरेल, " पेडणेकर माहिती देत म्हणाले. "इथून ७-८ मिनिटांच्या अंतरावर जाधवांच किराणा मालाच दुकान आहे. कसलंही सामान घरपोच करतील. आमच्या गोव्याची माणसं तशी सुशेगात. १० वाजता दुकान उघडतो लेकाचा. पण माणूस सज्जन. घरकाम करायला कुणी बाई हवी असेल तर तीही चौकशी मी करून ठेवतो. फोनच कनेक्शन आहेच त्यामुळे ती एक कटकट मिटली."

"स्वाती कसं वाटलं घर तुला? आवडलं तरच पुढची बोलणी करू." वासूने विचारलं.
"आवडलं रे! छानच आहे. हेच नक्की करूया."
"ठीक तर! चला इथून माझ्या कार्यालयात जाऊन राहिलेले सोपस्कार पूर्ण करू. स्वातीताई तुम्ही तेवढ्या खिडक्या दारं बंद कराल का?" पेडणेकरांनी विनंती केली.

स्वाती एक एक खिडकी बंद करत स्वयंपाकघराच्या मागच्या दरवाज्यापाशी पोहोचली. दरवाजा ओढून घेताना समुद्राच्या खार्‍या वार्‍याचा थंडगार झोत एकदम आत आल्यासारखा वाटला आणि त्याच्याबरोबर दूरवरुन एक आर्त साद, "आऽऽऽई!" एक अनामिक शिरशीरी स्वातीच्या तळपायातून मस्तकाकडे गेली. कुणीतरी लहान मूल आईला साद घालत होतं. स्वातीच्या मनाला काहीतरी बोचल्यासारखं झालं. तिने निमूटपणे दरवाजा ओढून घेतला व ती वासू आणि पेडणेकरांबरोबर घराबाहेर पडली.

-----


स्वाती आणि वासूला घरात राहायला येऊन चांगले २-३ दिवस होऊन गेले होते. घरात येण्यापूर्वीच पेडणेकरांनी अंगणातील माजलेले तण कापून दिले. पंप कसा चालवायचा या बद्दल माहिती दिली. साफसफाई करायला पेडणेकरांनी नीलाबाईंना ठरवून दिले होते. स्वातीने नीलाबाई यायच्या आधीच घर वर वर झाडून पुसून स्वच्छ करून घेतले. त्यात आजच विशाखाने पाठवलेले सामान पोहचले. वासू ऑफिसला जायला लागला होता पण आज सामान येणार म्हणून लवकर घरी आला होता. दोघे मिळून सामानाची लावालाव करत होते. स्वातीच्या पेंटीग्जच्या काही फ्रेम्स भिंतीवर लावायच्या असल्याने वासू हातोडा आणि खिळे घेऊन ठोक-ठोक करत होता तर स्वाती बेडरूमच्या कपाटात कपडे लावत होती. तळकप्प्यांत थोडीशी धूळ असल्यासारखं वाटलं म्हणून ती ओला कपडा आणायला स्वयंपाकघरात आली आणि तिचा पाय पाण्यात पडला. बघते तो स्वयंपाकघराच्या दारात हे मोठं पाण्याच तळं.

"वासू ए वासू! तू पाणी पिऊन गेलास का रे? कित्ती सांडवून ठेवलं आहेस इथे पाणी? कामांत काम वाढवतो आहेस," स्वाती करवादली.
"मी कुठे यायला? ही हातोडी आणि हे खिळे माझ्या हातातच आहेत. ठोकाठोक ऐकते आहेस ना तू?"
"अरे मग इथे पाणी कस आलं? तळ साचलंय नुसतं. घरात तू आणि मी सोडून दुसरं कुणी आलंय का?"
"तूच पाडवलं असणार. वेंधळेपणाचा अर्क आहेस स्वाती तू. विसरली असशील पाडवलं आहेस ते."
"आता मात्र हद्द झाली. मी बेडरूम मध्ये होते. इथे आले ही नाही, या नीलाबाई येतील तर कामाला थोडा हातभार लागेल," वैतागून स्वातीने कपडा घेतला आणि सगळं पाणी पुसून काढलं.

दारावरची बेल वाजली तशी स्वातीने उठून दरवाजा उघडला. बाहेर उभ्या असलेल्या बाई, नीलाबाईच असाव्यात हे ओळखून तिने विचारले, "पेडणेकरांनी पाठवलं ना तुम्हाला?"
"अं... हो! मी नीला. तुमच्याकडे काम आहे म्हणून पेडणेकर सायबांनी सांगितलं होतं म्हणून आले," नीला बाई तिशीच्या आसपास असाव्यात. बाई नीट नेटकी होती, चेहर्‍यावरून शालीन वाटत होती. बाईंची नजर मात्र काहीतरी शोधत होती. बोटांनी पदराशी चाळा सुरू होता. "या आत या!" स्वाती त्यांना घेऊन आत आली तरी बाईंची नजर काहीतरी धुंडाळतच होती. "मी दिवसातून एकदाच येईन. ती ही सकाळीच. नंतर येणार नाही चालेल का ते सांगा," बाईंनी आपली बाजू स्पष्ट केली, "पेडणेकर सायबांचे खूप उपकार आहेत. त्यांचा शब्द मोडवला नाही म्हणून त्यांना हो म्हटलं नाहीतर...." बाई बोलता बोलता चपापल्यागत होऊन गप्प बसल्या.

"चालेल हो! सकाळी एकदाच या ११ च्या सुमारास, तेच बरं. चला तुम्हाला काम सांगते," अस म्हणून स्वाती बाईंना घेऊन आत गेली.

दुसर्‍या दिवशी वासू ऑफिसला गेल्यावर स्वातीने जाधवांच्या दुकानाला भेट द्यायचे ठरवले. नाहीतरी रोजच्या खाण्या पिण्याच्या बर्‍याच गोष्टी तिला खरेदी करायच्या होत्या. सकाळच्या वेळी दुकानात फारशी गर्दी नव्हती. गल्ल्यावर एक सफेद सदरा लेंग्यातले साठीच्या दरम्यानचे वृद्ध गृहस्थ नाणी मोजत बसले होते, अधेमध्ये नोकराला कोंकणीतून काही सूचनाही देत होते. बहुधा तेच जाधव असावेत अस समजून स्वातीने त्यांच्याजवळ जाऊन आपली ओळख करून दिली.

"अच्छा! तर खानोलकरांच्या बंगलीत आलात तुम्ही. पण पेडणेकर म्हणत होते की ते घर आता भाड्याने द्यायचे नाही म्हणून," थोड्याशा आश्चर्याने जाधव म्हणाले.
"आम्हाला नाही तसं काही बोलले. मला असेच घर हवे होते, शांत, समुद्राजवळचं. मी चित्रकार आहे, पेंटींग्ज बनवण्यासाठी चांगला मूड येईल या घरात," स्वाती हलकेसे हसून म्हणाली.

तिने यादी जाधवांना दिली, त्याप्रमाणे त्यांनी सगळे सामान स्वातीला आणून दिले व बिल बनवायला घेतले.
"स्वातीताई, तुम्हाला एक विचारू? काही वेगळं जाणवलं का हो घरात तुम्हाला?"
"वेगळं म्हणजे?"
"नाही काही नाही. सहजच विचारलं," अस म्हणून जाधवांनी बिल स्वातीला दिले. पैसे चुकते करून स्वातीने पिशव्या उचलल्या आणि ती घराच्या दिशेने चालू लागली. वाटेत तिने जाधवांच्या प्रश्नावर विचार केला पण हाताला फारसं काही गवसलं नाही तसा तिने तो विचार मनातून काढून टाकला.

घराचा दरवाजा उघडता उघडता स्वातीने टेलिफोनची रिंग ऐकली. हातातल्या पिशव्या तिथेच टाकून तिने आत जाऊन फोन उचलला व नेहमीच्या सवयीने "हॅलो" म्हटले. पलीकडून थोडीशी खरखर ऐकू आली तेवढीच. रॉंग नंबर असावा अस समजून ती रिसीव्हर खाली ठेवायला गेली आणि "आऽऽई, आई गं!" अशी एक आर्त साद काळीज चिरून गेली. कावरी बावरी होऊन स्वातीने इथे तिथे पाहिले. आवाज फोनमधून आला की घरातून कळायला मार्ग नव्हता.

घराची कर्कश बेल वाजली तशी स्वाती एकदम दचकली. तिने जाऊन थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला, बाहेर नीलाबाईंना पाहून तिला हायसं वाटलं.

"काय झालं ताई? तुम्हाला बरं नाही का? असा चेहर्‍याचा रंग का उडालाय?" नीला बाईंनी काळजीने विचारले.
"नाही, बरंय सगळं. काम काढून ठेवली आहेत. करायला घ्या," स्वातीने मलूल आवाजात उत्तर दिलं आणि किराणा मालाचे सामान पिशवीतून एक एक करून काढायला सुरुवात केली.

संध्याकाळी वासू घरी येईपर्यंत स्वाती सगळा प्रकार विसरूनही गेली होती. दिवसभरात तिने आपला बोर्ड, रंग, ब्रशेस ठेवण्यासाठी वरच्या माळ्यावरच्या एका बेडरूम मध्ये खिडकीजवळची जागा शोधून काढली. खिडकीतून घरामागची हिरवी गर्द झाडी, शेवाळलेली विहीर, पत्र्याची छोटीशी पंपाची खोली, अंगण दिसत होतं, इथेच आपला मूड चांगला लागेल अशी तिची खात्री झाली तशी तिने सर्व वस्तू जागी मांडून ठेवल्या. वासू आल्यावर संध्याकाळ जेवण करण्यात, गप्पा टप्पा मारण्यात निघून गेली.

मध्यरात्री स्वातीला अचानक जाग आली. कुणीतरी अंगावरची चादर खेचत असावं. तिने डोकं वर करून इथे तिथे पाहिलं. खिडकीतून चंद्राचा शुभ्र प्रकाश डोकावत होता. खोलीत कुणीच नव्हत, पण चादर मात्र तिच्या अंगावरून खाली सरकली होती. दूरवर कुठेतरी कुत्रं रडत होतं आणि रातकिड्यांची किरकिर रात्रीच्या भयाणतेत भर घालत होती. खिडकी बाहेरच झाड उगीचच सळसळत होतं. स्वातीचा जीव घाबरा घुबरा झाला. तिने एका हाताने चादर घट्ट पकडली, दुसरा हात वासूच्या अंगावर टाकला आणि डोळे गच्च मिटून घेतले.

-----

घरात राहायला येऊन दोन आठवडे कसे उलटून गेले ते स्वातीला कळलंही नाही. ती आता घराला चांगलीच सरावली होती. पंप चालू करणे, बागेची निगा राखणे, झाडांना पाणी घालणे यासारखी कामे उत्साहाने करत होती. काही वेगळं घडलं तर घरात काहीतरी वावगं आहे की काय ही जाणीव तिला कधीतरी अस्वस्थ करायची, परंतु वाच्यता करावी असं काहीच घडलं नव्हत. तसंही वासूला सांगावं तर तो वेड्यात काढेल की काय या भीतीने ती गप्पच होती.

त्या दिवशी ढगाळून आलं होतं, उत्तर रात्री कधीतरी विजा चमकायला सुरुवात झाली होती. स्वातीला पहाटेच उठून पंप सुरू करावा लागे, त्यानुसार तिने मागचे दार उघडले आणि ती विहिरीपाशी असलेल्या पंपाजवळ आली. बाहेर मिट्ट काळोख होता, नेहमीच्या सवयीने टॉर्चच्या प्रकाशात तिने पंपाचा स्विच ऑन केला. अचानक बाजूच्या सुकलेल्या पानांवरून काहीतरी सळसळत गेल्याचा तिला भास झाला, तिने मान वळवून टॉर्चचा झोत इथे तिथे टाकला.

"कोण आहे?....कोण आहे? समोर का येत नाही?" एक एक पाऊल मागे जात तिने पुन्हा एकदा विचारले आणि घरात धूम ठोकली. दरवाजा बंद करून कडी घालताना तिला तो नेहमीचा आर्त आवाज ऐकू आला, "आई, ए आई! मी आहे, आत घे ना गं!" तिच्या जीवाला थरथरल्यांसारखं झालं. तोच लहान मुलाचा परिचित रडवेला आवाज. 'हा काय प्रकार असावा?' ती धावतच वर गेली आणि पुन्हा चादरीत शिरली. वासूला उठवून सगळे सांगावे असा विचार मनात आला पण तिने तो तिथेच दूर सारला. वासूने ते हसण्यावारी नेले असते आणि संवाद येन केन प्रकारे आपल्याला मूल नसण्यावर येऊन ठेपला असता याची तिला खात्री होती. स्वातीला तोच जुना विषय उगाळायचा नव्हता.

सकाळी नीलाबाई आल्यावर तिने त्यांना छेडलं. झाल्या प्रकाराबद्दल सांगितले. ऐकून नीलाबाईंचा चेहरा कावरा बावरा होऊन गेला. 'नाही हो माहीत मला असं काही' असं म्हणून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. दुपारच्या नीरव शांततेत स्वातीने नव्या कॅनव्हासवर सरावाच्या रेघोट्या मारायला सुरुवात केली. हात चालत असताना तिचे स्वत:शीच विचार सुरू होते. 'कुणाचं मूल असेल? का मला त्याचा आवाज ऐकू येतो? ते आईला पारखं झालेलं असावं का? त्याच्या हाकेला ओ द्यावी का?' नानाविध प्रश्नांनी तिच्याभोवती फेर धरला होता.

संध्याकाळ व्हायला आली तशी ऊन्हं भरभर उतरायला लागली. मधनंच वार्‍याची सळसळ आणि भरतीच्या लाटांचा आवाज गूढ शांततेचा भंग करत होता. अचानक खाली तळमजल्यावर कुणाची तरी चाहूल लागल्याचा भास झाला. स्वातीच्या काळजात कुठेतरी चर्र झालं. ती हातातला ब्रश टाकून जिना उतरून खाली गेली. बैठकीची खोली रिकामी होती. सगळं काही आलबेल होतं. स्वातीने सुटकेचा सुस्कारा सोडला. ती पुन्हा वर जायला मागे वळली तोच तिच्या पायाला पाण्याचा थंडगार स्पर्श झाला. पायर्‍यांवरून पाण्याचे ओघळ वाहत होते. स्वाती नखशिखान्त शहारून गेली. कुठेतरी पळून जावं की काय असा विचार क्षणभर तिच्या मनात आला न आला, त्याक्षणी तिला जाणवलं वर जिन्यात कुणीतरी बसलं होतं.

चौथ्या पाचव्या पायरीवर, सात आठ वर्षांच्या मुलाची एक कृश आकृती अंगाचं मुटकुळं करून मुसमुसत होती. स्वातीला दरदरून घाम फुटला, तिच्या पायांतलं त्राण निघून गेलं. "आई," त्याने डोकं वर केलं. पांढर्‍या फटक चेहर्‍यावरच्या दोन पांढर्‍या सफेत डोळ्यांकडे पाहताना स्वातीच्या सगळ्या चेतना गोठून गेल्या. समोरची आकृती उठून स्वातीच्या समोर आली.

"आई, मी आहे पिंटू. का गं सोडून गेलीस मला?" रडवेल्या आवाजात पिंटू विचारत होता, "किती वाट पाहिली मी तुझी. आता नाही नं सोडून जाणार तू मला. नाही जाऊ देणार मी तुला, कध्धी नाही." पिंटूने स्वातीचा हात आपल्या कृश हातांनी गच्च पकडला. त्या थंडगार, ओलसर, लिबलिबीत स्पर्शाने स्वातीच्या सर्वांगातून एक कळ शीरशीरत गेली आणि ती जागीच वेडीवाकडी कोसळली.

-----

वासूला यायला आज थोडा उशीरच झाला होता. वाटेत काही घ्यायला म्हणून जाधवांच्या दुकानात गेला, तिथे अचानक बराच वेळ निघून गेल्यावर त्याला एकदम बाहेर झुंजूमुंजू व्हायला लागल्याची जाणीव झाली तसा तो धावत पळत घरच्या रस्त्याला लागला. घर नजरेच्या टप्प्यात आलं तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की घरात मिट्ट काळोख आहे. त्याने लगबगीने चावीने दरवाजा उघडला आणि खटाखट दिव्यांची बटणे दाबली. बैठकीची खोली प्रकाशाने उजळून गेली. समोर जिन्याजवळ स्वाती अस्ताव्यस्त पडली होती.

ते पाहून वासू धावत तिच्या जवळ गेला, "स्वाती, काय झालं? अशी कशी पडलीस?" अस म्हणत त्याने स्वातीला गदगदा हालवले. पाणी आणून तोंडावर मारले तसे स्वातीने डोळे उघडले. तिचे डोळे भकास होते. "काय झालं स्वाती तुला?" अस विचारत वासूने तिला उठायला मदत केली आणि सोफ्यावर बसवले. "वासू, कुणीतरी आहे रे या घरांत. मी...मी पाहिलं त्याला. त्याचा स्पर्श अनुभवला."

"हे बघ! आपण वर जाऊ. पड थोडावेळ तुला बरं वाटत नसेल तर. तुला काहीतरी सांगायचं आहे मला," वासूने स्वातीला आधार देऊन वर नेले आणि पलंगावर बसवले.

"मी येताना जाधवांच्या दुकानात गेलो होतो. त्यांनी एक विलक्षण गोष्ट सांगितली, ती आधी तुला सांगतो. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी खानोलकरांनी हे घर भाड्याने दिले तेंव्हा एक कुटुंब इथे राहायला आले. त्या कुटुंबात ३-४ वर्षांचा एक लहान मुलगा होता; पिंटू. पुढची काही वर्षे अगदी सुरळीत गेली आणि एक दिवस दुर्दैवाने खेळता खेळता विहिरीत पडलेला बॉल काढायच्या निमित्ताने पिंटू पाय घसरून विहिरीत पडला. त्याची आई घरात एकटी होती, तिला पिंटूला वेळेत बाहेर काढता आले नाही. मदत येईपर्यंत खूपच उशीर झाला होता. पिंटूला वाचवता आले नाही. या प्रकाराची हाय खाऊन ते कुटुंब घर सोडून निघून गेले. त्यानंतर आलेल्या एक दोन कुटुंबातील स्त्रियांना या घरात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाली तशी घाबरून त्यांनी लगोलग घर बदलले. त्यानंतर गेली दोन वर्षे येथे म्हात्रे राहत होता आणि त्याला मात्र असा वावगा अनुभव कधीच आला नाही. तेंव्हा असे प्रकार थांबले असावेत किंवा केवळ अफवा असाव्यात अशी सर्वांची खात्री झाली. एकंदरीत मी गोष्ट ऐकली ना, तेंव्हा फारसा विश्वास ठेवला नाही पण हा घरी आलो तर तू मला पुन्हा पिंटूची गोष्ट सांगते आहेस. मला वाटत या घरात राहण्यात अर्थ नाही. मी उद्याच जाऊन पेडणेकरांना धारेवर धरतो."

"नाही रे वासू! ते प्रकार थांबले नव्हते. पिंटू इथेच होता असणार, याच घरांत. त्याला आई हवी आहे. म्हात्रे मध्ये आई कशी मिळणार होती त्याला म्हणून म्हात्रेला काही जाणवलं नाही पण आपण आलो तशी पुन्हा पिंटूने उचल खाल्ली आहे. त्याला आई हवी आहे रे, वासू. आईच्या प्रेमाचं भुकेलं आहे ते पोरगं," स्वाती स्वतःशीच बोलल्यागत पुटपुटली.

"काय बोलते आहेस स्वाती? ते मूल नाही. भास आहे... एक जीवघेणा भास. तुझ्यातली आई इतकी वेडी आहे का की सत्य आणि भास यातला फरक ओळखू शकत नाही? शुद्ध वेडे विचार आहेत तुझ्या आसुसलेल्या डोक्यात. ते काही नाही, आपण उद्याच इथून निघूया. या घरात राहायचं नाही, हा माझा ठाम निर्णय आहे. तू पड थोडावेळ आणि फार विचार करू नकोस."

वासू उठला आणि बाल्कनीत जाऊन येरझारा घालू लागला. स्वातीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. "आऽऽऽई!" या हाकेतली आर्तता तिच्या हृदयाला पिळवटून गेली होती पण वासू म्हणत होता ते सत्य होतं. 'आपल्या आयुष्यात मूल यावं ते ही अशा मार्गाने?' स्वातीला हुंदका आवरला नाही. तिने स्वत:ला पलंगावर झोकून दिलं आणि उशीत तोंड लपवलं.

किती वेळ गेला कुणास ठाऊक? अचानक बाहेरून धप्प असा काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि सोबत वासूची कर्णबधिर किंचाळी. स्वाती धावत धावत बाल्कनीत गेली. रस्त्यावरच्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश बागेत पडला होता. तिने पाहिलं वासू खाली डोक्यावर पडला होता. रक्ताचा पाट त्याच्या डोक्याशेजारून वाहत होता. ते पाहून स्वाती थरथरायला लागली तरीही कशीबशी धावत जिन्याच्या दिशेने गेली आणि त्राण निघून गेल्यासारखी मटकन खाली बसली.

जिन्याच्या शेवटच्या पायरीवर पिंटू उभा होता. जिन्यातल्या दिव्याचा पिवळाधम्मक प्रकाश त्याच्या पांढर्‍या फटक शरीरावर पडला होता, "तो माणूस तुला घेऊन जाणार होता ना, आई पण बघ! मी आता तुला इथून अजिबात जायला देणार नाही, कुणी तुला घेऊन जायला लागलं तर सगळ्यांचं असंच करेन." पिंटू छद्मी हसत एक एक पायरी वर चढत होता. स्वातीच्या तोंडातून शब्द ही फुटला नाही. "मी ढकललं त्याला. आता कुणी माझ्या आईला माझ्यापासून दूर नेणार नाही," पिंटूचे पांढरे फटक डोळे अचानक चमकून गेले. "आऽई!" म्हणून पिंटूने स्वातीचे हात आपल्या हातात घेतले.

का कुणास ठाऊक तो थंडगार लिबलिबीत स्पर्श स्वातीला या वेळेस परका वाटला नाही. तिने हळूच आपला हात पिंटूच्या पाठीवर ठेवला आणि त्याला जवळ ओढले. पिंटूनेही तिच्या गळ्याला गच्च मिठी मारली.

(समाप्त)

marathi blogs