प्रकार

Friday, October 18, 2013

लघु-भयकथा - १

रोहन स्कूलबसमधून उतरून घरापाशी आला. दरवाजा आतून बंद केलेला नव्हता, म्हणजे मम्मी घरात होती. तो धावत आत शिरला.

"मम्मी!" त्याने हाक मारली पण मम्मीने ओ दिली नाही तशी तो धावत वरच्या मजल्यावर गेला. "मम्मी! कुठे आहेस?." त्याने पुन्हा हाक मारली. 

"इथेच आहे राजा. ये खाली ये." जिन्यापाशी उभी राहिलेली मम्मी रोहनला दिसली तसा तो खाली जायला निघाला. तेवढ्यात वरच्या मजल्यावरच्या कपाटाचा दरवाजा हळूच उघडला आणि 
.
.
.

" रोहन, जाऊ नकोस रे बाळा. मीही तिला खालच्या मजल्यावर पाहिलंय..." कपाटातून मम्मी कुजबुजली.

Monday, December 24, 2012

आठच्या आत घरात...


"मुलींनी रात्री आठनंतर घराबाहेर पडू नये."

"
बरोबर आहे. ही सावधगिरीची सूचना आहे. मुंबई किंवा शिकागो-न्यूयॉर्कच्या वाईट भागांत पुरुषांनीही रात्री बेरात्री एकटे दुकटे फिरू नये. जर कायदा रक्षण करू शकत नसेल तर आपण सुरक्षेचे सर्व उपाय अवलंबवायला हवेत."

“हो पण एखाद्या कुप्रसिद्ध एरियात न जाणे आणि राजरोस सर्वत्रच आठनंतर बाहेर न पडण्याची सक्ती येणे यांत काहीतरी फरक आहे ना.”

“असला तरी सावधगिरी बाळगण्यात काही चूक आहे का?”

"
खरंय पण मला कॉल सेंटरमध्ये नाइट ड्यूटी असते."

"
मग दुसरा जॉब बघ."

"
पण माझी मैत्रिण डॉक्टर आहे. तिलाही नाइट शिफ्ट्स असतात."

"
हॉस्पिटलने त्यांची रात्री राहण्याची सोय करावी. ते शक्य नसल्यास तिनेही हा जॉब करू नये. सुरक्षितता नाही ना तिथे."

"
पण माझी तिसरी मैत्रिण पत्रकार आहे. तिलाही रात्री बेरात्री न्यूज कवर कराव्या लागतात."

"
मला वाटतं या परिस्थितीत तिने या जॉबला तिलांजली द्यावी किंवा रात्रीबेरात्री ज्या न्यूज कवर कराव्या लागतात त्यांची जबाबदारी घेऊ नये."

“म्हणजे?”

“पाककृती, फ्याशन, मुलांचे संगोपन, मुलाखती, अनाथाश्रम-वृद्धाश्रमांना भेटी असे विषय तिला कवर करता येतीलच की.”

"
पण माझ्या आणखीही मैत्रिणी आहेत. काही आयटीत आहेत. त्याही रात्री बेरात्री प्रोजेक्ट्ची डेडलाईन पूर्ण करतात, एक सिरिअल्समध्ये कामं करते. तिचीही शूटींग्ज दिवसात उशीरा असतात आणि एक तर आयपीएस आहे."

"
हो हो पण मी म्हणालो ना आधी की या परिस्थितीत रात्री आठनंतर घराबाहेर पडणे योग्य नाही. मध्यंतरी महिला कॉन्स्टेबल्स सोबत काय झाले होते ते विसरलीस का? स्त्रिया या देशात सुरक्षित नाहीत ही सत्य परिस्थिती आहे. आपण परिस्थिती बदलू शकत नाही तेव्हा काळजी घेतलेली बरी एवढेच मला म्हणायचे आहे."

"
म्हणजे रात्री आठनंतर लांडगे रस्त्यांवर फिरतात असे समजायचे?"

"
दुर्दैवाने तशी परिस्थिती निर्माण झालीये खरी."

"
पण मग आता रात्री आठनंतर बायका दिसत नाही म्हटल्यावर लांडगे संध्याकाळी सहालाच सावज शोधायला बाहेर पडले तर? जंगली श्वापदे नाही का... त्यांचे नैसर्गिक अन्न कमी झाले की रानाबाहेर पडून इतरांवर हल्ले करत... तसेच."

"
हम्म! माहित नाही बुवा. मध्ययुगीन पडदापद्धती कशी वाटते? नाही सुरक्षिततेसाठी अशा पर्यायांचाही विचार करून ठेवू सध्या."
“असे असेल तर स्त्रीभ्रूणहत्येचा मार्गच काय वाईट आहे? सशा आणि लांडग्यांच्या दुनियेत बायांनी जन्मच तरी का घ्यावा?”

Monday, May 07, 2012

सत्यमेव जयते... वेगळे काय?


काल आमीर खानचा सत्यमेव जयते मुद्दाम वेळ काढून पाहिला. सादरीकरण, संचलन, सुसूत्रता, पार्श्वसंगीत या सर्वच बाबतील कार्यक्रम उजवा होता. कार्यक्रम वस्तुस्थितीला धरून होता, ऑफ-ट्रॅक झाला नाही. आमीरचा संयत चेहरा, त्याचे ते विचारात पडणे, हलकेच डोळे टिपणे वगैरे अनेकांना अभिनय वाटेल असे बेगडी नसल्याने कार्यक्रम मनाला स्पर्शून गेला. मध्यमवर्गाला लक्ष्य करून हा कार्यक्रम बनवला आहे हे सतत जाणवत राहिले. रविवारी सकाळी लोकांना जेव्हा महाभारत, रामायण वगैरेंसारख्या मालिका कुटुंबासहित एकत्र पाहण्याची सवय आहे त्या कार्यक्रमांमध्ये हा कार्यक्रम थोडा तापदायक वाटू शकेल किंवा संपूर्ण कुटुंबाने आनंद घेण्याजोगा नसल्याने कालांतराने पाहाणे कमी होईल का असे प्रश्नही पडले. या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. तूर्तास, एक चांगला कार्यक्रम प्रस्तृत केल्याबद्दल या चमूचे अभिनंदन करावेसे वाटते.

यापुढे विचार करायचा झाल्यास या कार्यक्रमात वेगळेपणा तो काय? रजनी या प्रसिद्ध मालिकेतून लोकांचे प्रश्न सोडवल्यावर प्रिया तेंडूलकर यांचा टॉक-शो एकेकाळी प्रसिद्ध झाला होता. समाजातील नानाविध प्रश्नांवर बोट ठेवणारा हा कार्यक्रम पिडितांच्या मुलाखती, बोलावलेले मान्यवर आणि त्यांनी मांडलेले विचार, लोकांनी विचारलेले प्रश्न वगैरे प्रकारांतून प्रसिद्ध झाला होता. लोक आवडीने हा कार्यक्रम पाहात पण म्हणून त्याने समाजावर फार मोठा परिणाम झाला असे म्हणता येत नाही. यानंतर टिव्हीवर असे अनेक कार्यक्रम येऊन गेले असावे. २४ तास बातम्यांच्या वाहिन्यांवर अशा प्रकारची "स्टींग ऑपरेशन्स" अनेकदा दाखवली जातात. परंतु कार्यक्रमांचे सादरीकरण अतिशय बटबटीत असते असा अनुभव आहे. प्रेक्षकांना हळहळ वाटण्यापेक्षा डोकेदुखी होईल किंवा प्रसंगाचे गांभीर्य समजण्यापेक्षा हसू येईल अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होते. त्या पार्श्वभूमीवर आमीरचा कार्यक्रम वेगळा असला तरी नवा नक्कीच नाही.

मग या कार्यक्रमात नवीन ते काय? नवीन एवढेच की या पूर्वी सर्व सुपरस्टार्सनी ढमाढम पैसे घेऊन गेम-शो सादर केले आहेत. त्याऐवजी आमीरने एका वेगळ्या धर्तीच्या कार्यक्रमातून लहान पडद्यावर आगमन केले आणि एक नवी गोष्ट अशी झाली की प्रश्नांबरोबर प्रश्नांवर उपाय शोधण्याची किंवा ते तडीस नेण्याची आशा आमीरने दाखवली. परंतु ही आशा कितपत खरी हे अद्याप कळत नाही. राजस्थान सरकार खरेच का एसएमएस पाठवल्याने स्त्रीभृणहत्येच्या केसेस फास्टट्रॅक कोर्टात नेणार आहे? लोकपाल विधेयकाचे काय झाले हे आपल्यासमोर आहे.


भारतातील मध्यमवर्गाला एक मसिहा हवा आहे. मध्यंतरी अण्णा हजारेंच्या रुपात तो मसिहा आपल्याला मिळतो आहे अशी अनेकांची धारणा झाली होती. या धारणेने जे सर्वव्यापी स्वरूप घेतले होते त्याचे कालांतराने काय झाले हे सर्वांनी पाहिले. लोकांना काहीतरी इन्स्टंट करून हवे आहे, ताबडतोब निर्णय हवा आहे परंतु असे काही करण्याची क्षमता अण्णा आणि आमीर या दोघांकडे नसावी. किंबहुना, असे काही करण्याचा आमीरचा प्रयत्न आहे असेही नसेल आणि तसे नसल्यास लोकांचा भ्रमनिरास निश्चित आहे.

सेलिब्रिटींनी अशाप्रकारे सामाजिक कार्यात भाग घ्यावा का याचे उत्तर निश्चितच "हो" असे आहे. त्यांचे फॅन फॉलोइंग लक्षात घेता, त्यांच्या तोंडून निघणारे शब्द झेलायला तयार असणारे लोक निश्चितच मिळतील आणि मिळतात. त्यातून काहीजणांचे मनपरिवर्तन होणे शक्य वाटते परंतु स्वार्थ प्रत्येकाला प्यारा आहे आणि तो निश्चितच आमीर खानपेक्षा प्यारा आहे हे विसरता येत नाही. याचसोबत, टिव्हीवर कार्यक्रम दाखवल्याने, भरपूर प्रायोजक मिळवल्याने समाजसुधारणा होईल असेही म्हणता येत नाही आणि अशी चटकन समाजसुधारणा होणार नाही हे जाणण्याइतपत आमीर सूज्ञ वाटतो. या कार्यक्रमात वेगळे काहीच नाही, तसे काही दाखवायचा प्रयत्न नाही असा सूर असल्यास ज्याप्रकारे प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उचलून धरल्याचे लक्षात येते आहे त्यामागील प्रेक्षकांची भूमिका काय असावी असा प्रश्न पडतोच.

सदर कार्यक्रमातून जाणवलेल्या, खटकलेल्या काही गोष्टी अशा की हा कार्यक्रम ज्या वेळेत दाखवला जातो ती वेळ रविवार सकाळ असल्याने संपूर्णतः कौटुंबिक वेळ आहे. यांतील काही कार्यक्रम लहानमुलांसाठी योग्य असतीलच असे नाही. काही दृश्ये अस्वस्थ करणारी होती. त्या दृश्यांबाबत पूर्वसूचना देण्याचे कसे काय सुचले नाही याचे आश्चर्य वाटले. ही दृश्ये कार्यक्रमाच्या टीआरपीला मारक ठरू नयेत अशी अपेक्षा. तसेच, संपूर्ण कार्यक्रमात दुसरी बाजू दिसली नाही. ज्याप्रमाणे पिडीत बायकांना बोलावले गेले होते त्याप्रमाणे पिडा देणार्‍यांनाही बोलायला लावले असते किंवा त्यांना बोलावून त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला असता तर आवडले असते. "पीअर प्रेशर" हा आपल्या समाजाचा एक मोठा भाग आहे. मुलगा हवा असा धोशा लावणार्‍यांनाही तो कामी येतो आणि त्याविरुद्ध त्यांची निंदा करायची झाल्यासही तोच कामी येईल.

कायदा आणि सुव्यवस्था जोपर्यंत बळकट होत नाही, लोकांना कायद्याची भीती वाटत नाही आणि ती भीती वाटण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी त्वरित होत नाही तोपर्यंत ओवरऑल वस्तुस्थितीत फारसा फरक पडेल असे वाटत नाही आणि तूर्तास तरी भारतातील उदासीन मध्यमवर्गाला जागवण्याची क्षमता या कार्यक्रमात असल्याचे दिसले नाही. परंतु, माणसाने आशावादी राहावे या तत्त्वावर आमीरला पुन्हा एकदा शुभेच्छा!

Tuesday, April 03, 2012

तिच्या बुडण्याचे शतसांवत्सरिक

ते त्या काळी पाण्यावर तरंगणारे सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. जहाजात जलाभेद्य कक्ष असल्याने ते कधीच बुडणार नाही अशी त्याची ख्याती होती. ७५ हजार टन वजनाचे हे पोलादी जहाज भक्कम बांधणीचे होते. या जहाजावर १९ जलाभेद्य कक्ष होते आणि संकटसमयी किंवा अपघातात त्यातील ९ कक्ष पाण्याने भरले तरी हे जहाज पाण्यावर तरंगण्याची क्षमता राखून होते. अमेरिकेकडून इंग्लंडकडे त्याचा पहिला प्रवास चालला होता. या विलासी जहाजावर श्रीमंत आणि अतिश्रीमंत व्यक्तींचा समावेश होता.

न्यू यॉर्कवरून यात्रा सुरू करून एप्रिलच्या महिन्यात हे जहाज उत्तर अटलांटिकमध्ये प्रवासात होते. त्या भागात समुद्र बर्फाळ होता. सर्वत्र धुकं पसरलं होतं. अशा या धोकादायी वातावरणात अचानक मध्यरात्रीच्या सुमारास जहाजाची टक्कर हिमनगाशी झाली आणि हिमनगामुळे जहाजाची उजवी बाजू (स्टारबोर्ड) चिरत गेले. जहाजात पाणी शिरू लागलं. ३००० प्रवाशांनी खच्चून भरलेल्या जहाजावर केवळ २४ लाइफबोटी होत्या. त्यावेळच्या कायद्यानुसार अशा आकाराच्या जहाजांवर किमान २४ लाइफबोटी लागत पण खच्चून भरलेल्या या जहाजावर २४ ही संख्या फारच कमी होती.

टक्कर झाल्यावर जहाजात पाणी घुसू लागले आणि जहाज पाण्याखाली जाऊ लागले. जहाजातील बायका मुलांना लाइफबोटींवर चढवण्यात आले पण तरीही जहाजावरले अर्धेअधिक प्रवासी गारठलेल्या समुद्रात बुडून मेले. समुद्राने दया दाखवली नाही.

ही प्रसिद्ध गोष्ट आपल्यापैकी अनेकांना माहित आहे पण कदाचित काही चाणाक्ष वाचकांच्या लक्षात येईल की ही कथा "टायटॅनिकची" नाही. टायटॅनिक हे जहाज अमेरिकेतून इंग्लंडकडे जात नव्हते तर ते इंग्लंडहून निघून अमेरिकेतील न्यू यॉर्क सिटीकडे चालले होते आणि या प्रचंड जहाजावर वर म्हटल्याप्रमाणे अवघ्या २४ लाइफबोटीही नव्हत्या!

वर दिलेली ही घटना सत्य नसून एक कल्पितकथा आहे. बरील कथानक फ्युटिलिटी: ऑर द रेक ऑफ टायटन१ या १८९८ मध्ये मॉर्गन रॉबर्टसनने लिहिलेल्या दीर्घकथेतील टायटन या जहाजाच्या अपघाताबद्दल आहे. टायटॅनिक या जहाजाचा अपघात होण्यापूर्वी सुमारे १४ वर्षे आधी प्रकाशित झालेल्या या दीर्घकथेत आणि टायटॅनिकच्या गोष्टीत काही महत्त्वाची साम्यस्थळे आहेत.

विशेषतः जहाजांच्या नावांतील सारखेपणा, त्यांची जलाभेद्यतेबद्दल प्रसिद्धी, मध्यरात्रीच्या सुमारास उत्तर अटलांटिकमध्ये हिमनगाशी टक्कर होणे, जहाजावर लाइफबोटींची कमतरता असणे, जहाजावरील प्रवाशांची अदमासे संख्या वगैरे योगायोग विशेष वाटतात. अन्यथा, दीर्घकथा म्हणून ही एक अतिसामान्य कथा आहे आणि टायटॅनिकच्या दुर्दैवी अपघाताशी मेळ न खाणारे किंवा तांत्रिक त्रुटी दाखवणारे अनेक प्रसंग कथानकात आहेत.

तरीही या सामान्य कथानकाला टायटॅनिकच्या अपघाताशी असणाऱ्या असामान्य साम्यामुळे बरीच प्रसिद्धी मिळाली. या प्रसिद्धीचे मूळ कारण अर्थातच १५ एप्रिलला झालेला टायटॅनिकचा अपघात हे होते. या दुर्दैवी अपघाताला या वर्षी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. या कारणास्तव उपक्रमावर हा धागा सुरू करणे अपरिहार्य वाटले.


प्रवासी वाहनांना जे अनेक अपघात झाले आहेत त्यात टायटॅनिक आपले नावामागचे प्रसिद्धीचे वलय राखून आहे. इतिहासात टायटॅनिकपेक्षा मोठ्या जहाजांना अपघात घडलेले आहेत आणि टायटॅनिकपेक्षा मोठ्या प्रमाणावर जीवितहानीही झालेली आहे; पण मग या अपघातात विशेष असे काय असा प्रश्न पडणे साहजिक आहे. या प्रश्नांची उत्तरे पुढीलप्रमाणे देता येतील.

  • युद्धकालीन परिस्थिती नसताना; टायटॅनिकचा अपघात हा पहिल्या महायुद्धा आधी घडलेला आहे हे लक्षात घेतल्यास इतक्या मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याचे हे महत्त्वाचे उदाहरण आहे. टायटॅनिकच्या अपघातात दीड हजारांहून अधिक माणसे मृत्युमुखी पडली. यांत अनेक बायका आणि लहान मुलांचा समावेश होता.२ अर्ध्याहून अधिक लोकांची प्रेतेही हाताला लागली नाहीत.
  • हजारोंच्या संख्येने प्रवासी घेऊन जाण्याची क्षमता असताना केवळ २० लाइफबोटी जहाजावर असणे हा व्यवस्थापनाच्या हलगर्जीचे उत्तम उदाहरण म्हणून दाखवता यावे. या घटनेनंतर जहाजांवर किमान लाइफबोटी आणि संरक्षक साधनांविषयी नियम कडक करण्यात आले.
  • टायटॅनिकचा प्रवास महागडा होता. १९१२ साली टायटॅनिकमधून पहिल्या वर्गाच्या प्रवासासाठी ४००० डॉ. च्या वर किंमत मोजावी लागत होती. टायटॅनिक हे सुखदायी प्रवासासाठीच बांधलेले जहाज होते. इलेक्ट्रिसिटी, उबदार वातावरण, गरम पाण्याचा तरण तलाव, तुर्की अंघोळ, व्यायामशाळा, बँड रुम वगैरे अनेक सोयी या "लक्झरी लायनर"वर होत्या.
  • आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे "आढ्यता". हे जहाज कधीच बुडणार नाही अशी प्रसिद्धी जहाज बांधताना करण्यात आली होती पण निसर्गाच्या कचाट्यात सापडलेले हे प्रचंड महागडे जहाज आपल्या पहिल्या प्रवासातच समुद्राने गिळंकृत केले. या निमित्ताने जहाजबांधणी व्यावसायिकांना आपल्या व्यवसायाकडे, बांधल्या जाणाऱ्या जहाजांकडे बारकाईने पाहण्याची उपरती झाली. किंबहुना, टायटॅनिकच्या अपघाताची नोंद जागतिक जलवाहतूकीने गांभीर्याने घेतली. यांत इंटरनॅशनल आईस पॅट्रोलची स्थापनेचा समावेश आहे.

या शिवायही अनेक कारणे येथे देता येतील. लोकांना एखाद्या घटने सभोवती कथानक निर्माण करून तिला प्रसिद्धी देण्याची सवय असते, त्या कथानकात टायटॅनिक चपखल बसत होती. समुद्रावरील खलाशांच्या अंधश्रद्धा, टायटॅनिकच्या प्रवाशांनी अपघाताला धैर्याने दिलेले तोंड, अपघातातून वाचलेल्यांचे अनुभव, निसर्गापुढे माणूस थिटा आहे ही श्रद्धावंतांनी केलेली कारणमीमांसा, किंवा श्रीमंत आणि गरीब असे जहाजात वर्ग असले तरी निसर्ग सर्वांना समान वागणूक देतो ही नीतिकथा, अशा अनेक कारणांमुळे इतिहासात टायटॅनिक अजरामर झाली. तिच्यासोबत अनेक कथांना आणि आख्यायिकांनाही प्रसिद्धी लाभली. यापैकी मला आवडणारी कथा/ आख्यायिका टायटॅनिकच्या बँडबद्दल आहे.

--------

टायटॅनिकवर आठजणांचा चमू बँड वाजवून श्रोत्यांचे मनोरंजन करत होता. जहाजाची हिमनगाशी टक्कर होऊन संकटाची वेळ आली तेव्हाही हा चमू लोकांमध्ये घबराट उडू नये आणि त्यांचे चित्त ठिकाणावर राहावे म्हणून वाद्ये वाजवत होता. असं सांगितलं जातं की या बँडचा प्रमुख वॉलेस हार्टली याने जहाजाला झालेला अपघात आणि लाइफबोटवर माणसांना चढवण्याची लगबग लक्षात घेऊन आठजणांच्या आपल्या चमूला जहाजाच्या पहिल्या वर्गाच्या आरामकक्षात (लाउंज) गोळा केले. तेथेच लाइफजॅकेटस घालून अनेक प्रवासी गोळा झाले होते आणि आपला जीव वाचवण्याच्या धडपडीत होते. त्या परिस्थितीत आपला गणवेश घालून आठजणांचा हा चमू शांतपणे वाद्ये वाजवत होता. जहाज जसजसे बुडू लागले तसे हा चमू आरामकक्षातून जहाजाच्या डेकवर पोहोचला आणि तेथे धून आळवू लागला. आणि बुडत्या जहाजाबरोबर समुद्राच्या पोटात गेला. या चमूने शेवटची धून कोणती वाजवली असावी, इतरांची धावपळ बघत असताना त्यांची स्वतःची मन:स्थिती कशी असावी यावर अद्यापही चर्चा झडतात.


सुमारे दोन आठवड्यांनी वॉलेस हार्टलीचा गारठलेला मृतदेह सापडला तेव्हाही वाद्याचा पट्टा त्याच्या शरीराशी बांधलेला होता. टायटॅनिकबद्दल अशा अनेक कथा आणि आख्यायिका प्रसिद्ध आहेत.


--------

आख्यायिकांसोबत हे जहाज बुडण्याची नेमकी कारणे कोणती यावर आधुनिक विज्ञानाच्या साहाय्याने अद्याप संशोधन होते. हिमनगाशी टक्कर हे मुख्य कारण असले तरी त्या सोबतीने इतर काही कारणे या जहाजाला बुडवण्यात कारणीभूत ठरली असावीत का काय यावर अभ्यास केला जातो. नुकत्याच वाचलेल्या टाइम मासिकातील एका लेखानुसार हिमनगासह चंद्रालाही या अपघाताचा धनी बनवण्यात आले आहे.

टेक्सास युनिवर्सिटीतील काही शास्त्रज्ञांच्या मते १९१२ च्या जानेवारी महिन्यात चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ आला होता. ही घटना सुमारे १४०० वर्षांनी घडत होती. याचा प्रभाव समुद्राची भरती आणि उसळणाऱ्या प्रचंड लाटांनी हिमनगाला ग्रीनलॅंडकडून वळवून एप्रिलपर्यंत न्यू फाउंडलंडजवळ; जेथे टायटॅनिकचा अपघात घडला तेथे आणून पोहोचवले असावे.

भविष्यातही टायटॅनिकविषयी असे निष्कर्ष, शंका निघतच राहतील. इतके ग्लॅमर या जहाजाने नक्कीच मिळवले आहे.

-------

टायटॅनिक आणि ग्लॅमरचा विषय निघाला की जेम्स कॅमेरुनचा सुप्रसिद्ध चित्रपट टाळून पुढे जाता येत नाही. १९९७ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट हॉलिवूडमधील सर्वांत यशस्वी दहा चित्रपटांतील एक गणला जातो. या चित्रपटाचं यश टायटॅनिकच्या दुर्दैवी अपघातात होतं की प्रणयकथेत हे ठरवायचे झाले तर प्रणयकथेचे पारडे जड होईल असे वाटते. असं म्हटलं जातं की हा चित्रपट यशस्वी होण्याचे एक कारण प्रेक्षकांनी तो पुन्हा पुन्हा येऊन बघितला हे आहे. हा भीषण अपघात असो की प्रणयकथा; टायटॅनिकनेच "आय ऍम फ्लाइंग" ही प्रणय-प्रसिद्ध अदा सिनेजगताला दिली. टायटॅनिकच्या अपघाताच्या शंभरीनिमित्त १९९७ला प्रदर्शित झालेला हा चित्रपट या वेळेस त्रिमित तंत्राच्या साहाय्याने पुन्हा एकदा प्रदर्शित होत आहे.


टायटॅनिकच्या निमित्ताने पुढील काही दिवसांत सर्वत्र चर्चा झडतील. गप्पा होतील. उपक्रमावरही या घटनेची नोंद व्हावी म्हणून हा धागा सुरू करत आहे. टायटॅनिकसंबंधीच्या कथा, आख्यायिका, इतिहास, चित्रपट परीक्षण वगैरेसाठी हा धागा सदस्यांनी वापरावा.


.

.



१ हे पुस्तक वाचावे असे मी सुचवणार नाही. उत्सुकता असल्यास तासभरात भराभर डोळ्याखालून घातल्यास संदर्भ लागू शकतील.
२ जीवन संरक्षक होडक्यांत स्त्रिया आणि मुलांनी सर्वप्रथम बसावे अशी सूचना असतानाही अनेक स्त्रिया आणि मुले यांचा समावेश मृतांत आहे यावरून खरी परिस्थिती काय असावी हे लक्षात येते. वाचलेल्या लोकांत गर्भश्रीमंत प्रवाशांचा भरणा होता.



वरील चित्रे विकिपिडीया आणि jamescameronstitanic.wikia.com वरून साभार घेतली आहेत.

Tuesday, January 24, 2012

हिची, तिची कहाणी

'ही' भल्या पहाटे पाच वाजता उठते. मुलांचं करून तिला ऑफिस गाठायचं असतं. नाश्त्याला मुलीला पॅन केक हवा तर मुलाला ऑम्लेट. 'ही' पहाटे उठून एका बाजूला कांदा कापत, दुसर्‍या बाजूला पॅनकेकचं मिश्रण घोळवत घड्याळाकडे नजर टाकून उभी असते. दोघांनी एकच नाश्ता करा सांगितलं तर सकाळी उठून भोकाड पसरतो तिचा लहानगा. जे तिला हवं असतं ते हमखास याला नको असतं. सकाळी सकाळी नको वाटतं त्याचं रडणं आणि त्याची समजूत घालत बसणं. वेळ असतो कुठे तेवढा?
'ही'चा नवरा मुलांना उठवून तयार करत असतो तेव्हा 'ही' स्वतःची तयारी करता करता मुलांचे डबे भरत असते. मुलांना शाळेत सोडलं की 'ही'सुद्धा ऑफिसच्या दिशेने सुसाट निघते. गडबडीत 'ही'चा ब्रेकफास्ट कधीच होत नाही.

रस्त्यात ट्रॅफिक जॅम नेहमीचाच. बुडाखाली गाडी असली म्हणून वेळेत पोहोचणं शक्य आहे असे थोडेच असते? पण मग गाडीत कोंडलेली हीच काय ती वेळ 'हिची' स्वतःची असते. अचानक आज तिला १५-२० वर्षांपूर्वीचा तो प्रसंग आठवतो. हिची नवी पहिली नोकरी आणि वरळीला हिच्या ऑफिसच्या फूटपाथवर बसणारी "ती". पथारी टाकून काहीबाही प्लास्टीकचे कंगवे, फण्या, आरसे विकायला बसलेली. बाजूला तिची ३-४ वर्षांची पोरगी खेळत असायची आणि मांडीत ६-८ महिन्यांचं दुसरं पोर. मध्येच कधीतरी गिर्‍हाईक आलं तर ते बाळ, त्या मुलीच्या मांडीत जाई. तिची मांडी ती केवढी! ते बाळ अर्धवट जमिनीला टेकलेलं. धुळीने माखलेल्या मुठी चोखत असायचं. ते विरलेले कपडे, पिंजारलेले केस, वाहणारी नाकं; पोरांचा अगदी अवतार असे.पोरांच्या नाकातून वाहणारा शेंबूड पुसायलाही आईला उसंत नसायची. उन्हा-तान्हात सुकायला घातल्यागत दिवसभर ती पोरं फुटपाथवर बसलेली असत. राग यायचा तेव्हा. 'सांभाळायला जमत नसेल तर कशाला जन्माला घालतात हे लोक ही पोरं?' असं वाटून जायचं. कधीतरी, रडणार्‍या मुलीला वसावसा ओरडताना आणि फटके देताना पाहिलं की जाऊन 'तिलाच' समज द्यावी असं वाटायचं.

पण मग कधीतरी समोरच्या चहावाल्याकडनं घेतलेला चहा फुंकून पोरीला देणं, दुपारच्या वेळी भाकरी पावाचा तुकडा भरवणं आणि भर रस्त्यावर पदराच्या आडोशाखाली बाळाला घेणं... तिच्यातल्या "आई"ची जाणीव करून द्यायचं. कदाचित इतरवेळेस, ज्यांच्यासाठी कमवतो त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ होत नसावा तिला. प्रत्येकाची अडचण असते. मागून हल्का हॉर्न ऐकू येतो. ही भानावर येते. ट्रॅफिक सुटलं आहे.

इतकं करूनही ऑफिस गाठेपर्यंत उशीर होतो. नेहमीचंच आहे. रोज फक्त कारणं बदलतात. मस्टर वगैरेची भानगड नसली तरी आजूबाजूच्यांचे डोळे बरंच काही बोलून जातात. परवा तर मिटींगमध्ये उशीर झाला तेव्हा बॉसने 'पुढल्यावेळी तुमच्याकडून सर्वप्रथम अपडेट्स घेणार हं!' असा टोमणा मारला.
ऑफिसमध्ये पोहोचल्या पोहोचल्या अर्ध्या तासात शाळेतून फोन येतो. 'मुलीचं अंग गरम आहे. घरी घेऊन जा.' ती नवर्‍याचा नंबर फिरवते पण तो मिटींगमध्ये आहे. फोन बंद. गेल्या आठवड्यात मुलगा घरी राहिला होता. सडकून ताप भरला होता तेव्हाही ऑफिसला दांडी मारावी लागली होती. नवरा टूरवर बाहेरगावी गेला होता. मुलाला शाळेतून 'पिक-अप' केलं, डॉक्टरकडे नेलं आणि पुढले दोन दिवस घरातून काम केलं. सर्व मिटींग्जना डायल-इन केलं. मुलाला हवं नको ते बघत कामही केलं.

मुलाचं डोकं दुखत होतं, तापाने अंग फणफणलं होतं. पाच वर्षांचा तर आहे. त्याला तू एकट्याने खोलीत झोप सांगितलं तर पटत नाही. आई जवळ लागते. 'ही'चा हात अंगावर ठेवलेला असला की शांत राहतो पण त्याला जवळ घेऊन मिटींगला डायल-इन कसं व्हायचं? खूपच पंचाईत झाली होती. शेवटी टीव्ही लावून दिला, कोंडून घातलं त्याला खोलीत आणि फोन लावला. नजरसारखी खोलीकडे जात होती. टीव्हीच्या आवाजात त्याच्या कण्हण्याचा आणि रडण्याचा आवाज पोहोचला नाही तर?

आणि आता पुन्हा मुलीचं आजारपण. 'ही' बॉससमोर उभी राहते. नजर ओशाळवाणी. 'मी घरी जाऊ का? मुलीला बरं नाहीये.' ही हळूच विचारते.
'आजही?? ३ वाजता क्लायंटबरोबर मिटींग आहे. डायल-इन करणं फारसं बरं दिसत नाही.' बॉस नाराजीने म्हणतो.
'मुलीला ताप आहे. शाळेतून फोन आला होता.' सांगताना 'ही'च्या डोळ्यात पाणी तरळतं.
'ठीक! पण ३ वाजता नक्की मिटींगला डायल-इन हो.' बॉसचा आवाज नरमतो पण डोळ्यातली नाराजी कायम राहते.

'ही' पर्स उचलून तडक बाहेर पडते. डोकं भणभणतंय. हे सर्व चाललं आहे ते पोरांसाठीच. त्यांच्या भविष्यासाठी. एकाच्या पगारात नाही भागत. दोन मुलं. त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलायची ऐपत हवी म्हणून हा खटाटोप. मुलांना चांगलं आयुष्य जगायची सवय झाली आहे. भीती वाटते ती या आयुष्याला त्यांना मुकावं लागलं तर? संसाराची दोन्ही चाकं चालताहेत. एक चाक मोडलं तर? 'ही'ला नोकरी करायलाच हवी. मंदीचे दिवस आहेत. दोघांपैकी कोणाची नोकरी कधी सुटेल याचा नेम नाही. संसाराचं गाडं चालत राहायला हवं.

'ही' मुलीला शाळेतून पिक-अप करते. मुलगी तापाने फणफणली आहे. शाळेतली नर्स विचारते 'मुलीला शाळेत पाठवतानाच ताप असावा. तुम्ही पाठवलीतच कशी?'

'ही'च्याकडे उत्तर नसतं. सकाळच्या घाईत झोपाळलेल्या मुलीला शाळेत पाठवलेलं असतं. ती कुरकुरत होती किंवा तिचं अंग गरम होतं हे पाहिलेलंच नसतं. 'ही' पुन्हा ओशाळवाणी होते.

'ही' मुलीला उचलूनच घरी आणते. घरी आल्यावर तिचा ताप मोजते. १०४ भरतो. मुलीला ग्लानी आल्यासारखीही वाटते आहे. घरात दुसरं कोणी नाही. मुलीला हाका मारते पण ती 'ओ' देत नाही. तिची तब्येत खरंच खूप बिघडली असावी. 'हीला' काय करावं ते क्षणभर कळत नाही. 'ही'ला रडू फुटतं पण रडता येत नाही. सांत्वन करायला कोणी नाही. 'ही' एकटी. या घरात आणि या देशातही. ही नवर्‍याला फोन लावते. तो येतोच म्हणून सांगतो.. तू तिला इमर्जन्सीला ने... तशी 'ही' तडक निघते.
मुलीला उचलते आणि सुसाट गाडी हाकत इमर्जन्सी रूममध्ये पोहोचते. नवराही येतो. दोघे काळजीत. डॉक्टर सांगतात फ्लू आहे. तिला पुढले ४-५ दिवस तरी शाळेत पाठवू नका. 'ही' नवर्‍याकडे बघते. तो नजर फिरवतो. परवा बाहेरगावी जायचं आहे म्हणतो. 'ही' मान हलवते.

आता मुलगी बरी आहे पण डॉक्टरांनी ओव्हरनाइट हॉस्पिटलला राहायला सांगितलं आहे. 'ही'ला आठवतं की मुलगा शाळेतून घरी यायची वेळ झाली.

'ही' पुन्हा सुसाट घरी. नवरा मुलीजवळ थांबतो. 'ही' मुलाला शाळेतून घेऊन येते. त्याला दूध गरम करून देते आणि जरा सोफ्यावर टेकते. सकाळपासून 'ही'च्या पोटात अन्नाचा एक कणही गेलेला नाही... 'ही'चं डोकं गरगरतं. अचानक नजर घड्याळाकडे जाते. ४ वाजायला आलेले असतात. ३ वाजताची मिटींग चुकलेली असते.... तिला फारसं काही वाटत नाही कारण डोकं आधीच "ज्यांच्यासाठी कमवायचं, त्यांच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसतो खरा!" या विचाराने भरून गेलेलं असतं.

------------

हा प्रतिसाद मूळ मनस्वी राजन यांच्या ऐलपैलवरील स्फुटाला दिला होता. मूळ लेख मला आतिशय आवडला होता.

Friday, January 20, 2012

गूढकथेचा एक अस्सल नमुना: द अदर्स

गूढकथेमध्ये संदेह (सस्पेन्स) असतो. कधीकधी भयकल्पनेचाही कमी-जास्त अंश असतो. त्यामुळे (अधिक विचार न करता) गूढकथा आणि भयकथा या एकच, असे समजण्याची चूक केली गेली. वास्तविक भयकथेमध्ये प्रमुख तत्त्व 'भय' हेच असते. ज्या गोष्टी भयोत्पादक आहेत, मग त्या पारलौकिक, अतींद्रिय, परग्रहसंबंधित असोत की मानवी, त्यांना भयकथेमध्ये स्थान दिले जाते. कथेची मांडणीही अशी असते, की त्यातून भयाचीच निर्मिती व्हावी. जगभरच्या वाङमयात अशा उत्तम भयकथा पुष्कळ आहेत, त्यांच्यावर अनेक ग्राफिक नॉव्हेल्स, चित्रपट वगैरेही आलेले आहेत. आपल्याकडे नारायण धारपांनी 'चंद्राची सावली' सारख्या अनेक उत्कृष्ट दीर्घ भयकथा लिहिल्या आहेत.

गूढकथेमध्ये, कधीतरी, अनपेक्षित म्हणून गूढ असलेल्या भीतीचा वापर अवश्य केला जातो; पण तिच्यात अशा इतर अनेक तत्त्वांचा समावेश होतो, जी अनोळखी, नेहमीच्या वास्तवापेक्षा वेगळी असल्यामुळे अर्तक्य आणि गूढ असतात. उदाहरणार्त्य, मंत्रचळेपणा. कुलूप पक्के लावलेले आहे, हे माहित असताही परत परत ओढून पाहणे, एक जिना उरतल्यावरही परत वर जाऊन पाहण्याचे कष्ट घेणे, हे नेहमीच्या सवयींपैकी दिसणारे आहे. माणूस असे का वागतो? - उत्तर नाही. ते गूढ आहे; पण ते भयप्रद नाही. जे समजण्याच्या पलीकडे आहे, अर्तक्य आहे, ते सार गूढ आहे. नेहमीच्या पाहण्यातले नाही, त्याची कदाचित भीती वाटू शकेलः पण ते मूलतः भीतिदायक नाही, ते गूढ आहे. ते वास्तव असू शकते. तरीही नव्या आणि वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यामुळे ते वेगळे वाटते, अनाकलनीय वाटते, गूढ वाटते.


- रत्नाकर मतकरी.
प्रस्तावना - अंतर्बाह्य

रत्नाकर मतकरींनी मांडलेले मत; गूढकथा आणि भयकथेतील फरक वाचकांना सहज कळून येत नाही याचा अनुभव मला अनेकदा आला आहे. बर्‍याच वेळा वाचकांना "ही भयकथा नाही, ही गूढकथा आहे." असे स्पष्टपणे सांगावे लागते. त्यानंतरच वाचक त्याकडे गूढकथा म्हणून पाहतात.परंतु तरीही, गूढकथेचा बाज त्यांना कळतो का याविषयी शंका वाटते. वरील परिच्छेदावरून गूढकथा आणि भयकथेतील फरक समजण्यास वाचकांना मदत होईल अशी अपेक्षा करते आणि गूढकथेच्या आणखी एका उदाहरणासाठी माझ्या एका आवडत्या चित्रपटाची ओळख येथे करून देते.

काळ आहे दुसर्‍या महायुद्धाच्या वेळचा. युद्ध जवळ जवळ संपल्यात जमा आहे. ग्रेस स्टेवर्ट या स्त्रीचा नवरा फ्रान्समध्ये लढाईवर होता पण तो अद्याप परतलेला नाही. ग्रेस आणि तिची दोन लहान मुले, ऍनी आणि निकोलस हे एका मोठ्या इस्टेटीवर बांधलेल्या प्रचंड हवेलीत राहतात. ग्रेस अतिशय पापभिरू बाई आहे आणि मुलांनीही तसेच असावे यावर तिचा भर आहे. ऍनी हट्टी आहे. तिचं आणि ग्रेसचं पटत नाही. ग्रेस तिच्यावर कडक बंधने घालून शिस्त लावायचा प्रयत्न करते. निकोलस त्या मानाने खूपच बुजरा आहे. आठवड्याभरापूर्वी मायलेकीत काहीतरी झालं आहे आणि त्यावरून ऍनी ग्रेसवर नाराज आहे. ग्रेसच्या दोन्ही मुलांची कातडी प्रकाश संवेदनशील आहे त्यामुळे सूर्यप्रकाशापासून त्यांना दूर ठेवण्याची धडपड ग्रेस करते. घरातील पडदे सतत ओढलेले असतात आणि मंद दिवे किंवा मेणबत्तीच्या प्रकाशातच घरातले व्यवहार चालतात. ग्रेसला नवीन नोकर हवे आहेत कारण तिचे जुने नोकर नुकतेच काही कारणास्तव नोकरी सोडून गेलेले आहेत.

तिने वर्तमानपत्रात दिलेल्या जाहीरातीवरून एके दिवशी तीन नोकर तिच्या दाराशी येतात. त्यांत मि.टटल हा म्हातारा माळी, मिसेस मिल्स ही मध्यमवयीन स्त्री, आणि एक मुकी तरुण मुलगी; लिडिया आहे. ग्रेस त्यांना आपल्या मुलांच्या परिस्थितीची ओळख करून देते आणि मुलांना प्रकाशापासून दूर राखण्यासाठी काय करणे आवश्यक आहे त्याची कल्पना देते. ग्रेसला नोकर आणि नोकरांना नोकरी पसंत असते.

चित्र विकिपीडियावरून साभार.
परंतु एके दिवशी ग्रेसच्या लक्षात येते की तिने वर्तमानपत्रात दिलेली जाहीरात छापून आलेलीच नाही. ती मिसेस मिल्सकडे विचारणा करते. त्यावर मिसेस मिल्स सांगतात की ग्रेस या घरात राहायला येण्यापूर्वी जुन्या मालकांकडे ते तिघे नोकर कामाला होते पण नंतर नोकरी गेली. तरीही या घरात आणि इस्टेटीवर काम करणे त्यांना आवडत असे. एके दिवशी सहज नोकरी शोधायला म्हणून स्वतःहून त्यांनी येथे येऊन पाहिलं तर नोकरी मिळून गेली. जाहीरातीबद्दल फार उहापोह न झाल्याने त्यांनीही फार भर दिला नाही.

हळूहळू ग्रेसला घरात काहीतरी विचित्र अनुभव येऊ लागतात. ऍनी येऊन तक्रार करते की तिच्या खोलीत तिला व्हिक्टर नावाचा एक मुलगा दिसतो. तिला घरात इतर माणसेही कधीतरी दिसतात पण व्हिक्टर अधिक वेळा दिसतो. घरात कोणीतरी बोलते आहे, कुजबुजते आहे असे भास होतात. कधीतरी काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज येतो. ग्रेसला वाटते की ऍनी तिच्यावर रागावलेली असल्याने खोटे बोलते आहे आणि ऍनीला आणखी कडक शिक्षा होते. परंतु, मिसेस मिल्स ऍनीवर विश्वास ठेवतात आणि एक दिवस तुझ्या आईलाही या प्रकारांची प्रचिती येईल असे सांगून ऍनीची समजूत काढतात. हवेलीच्या आवारात तीन ग्रेव्हस्टोन्स आहेत. मि. टटल त्यावर वाळकी पाने टाकून त्यांना लपवायचा प्रयत्न करतात.

एके दिवशी ग्रेसला खरेच घरात काहीतरी वावगे दिसते. त्या प्रकाराने त्रस्त होऊन ग्रेस घराला ब्लेस करून घ्यायचे ठरवते आणि प्रीस्टच्या शोधासाठी घराबाहेर पडते. मिसेस मिल्स ग्रेसला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण ती जुमानत नाही. वाटेत धुकं पडलं आहे. ग्रेसला त्यातून वाट काढताना नाकी नऊ येतात पण त्याच धुक्यातून तिच्यासमोर अचानक तिचा नवरा, चार्ल्स, उभा ठाकतो. ग्रेस आनंदाने नवर्‍याला घरी घेऊन येते पण तिच्या लक्षात येते की तिचा नवरा पूर्वीसारखा राहिलेला नाही. तो अबोल झाला आहे ,अतिशय थकलेलाही आहे. त्याचा भ्रमनिरास झाला असावा. "बहुधा तो कोठे आहे हे देखील त्याला माहित नसावे"असे त्याच्याकडे पाहून मिसेस मिल्स म्हणतात.

घरातील विचित्र घटना सुरूच राहतात. ऍनी ग्रेसला व्हिक्टर आणि त्याच्या आईवडिलांचे चित्र काढून दाखवते. चित्रात त्यांच्यासोबत एक आंधळी म्हातारीही दिसते. ते चित्र पाहून ग्रेस चकित होते आणि घरात काही सापडते का हे पाहण्यासाठी घराची तपासणी सुरू करते. तशात तिला मृत्यूसमयी काढलेल्या फोटोंचा एक अल्बम दिसतो. त्यातले काही फोटो गहाळ आहेत.

एके दिवशी ग्रेस आणि ऍनी, ऍनीचा एक ड्रेस शिवत बसलेल्या असतात. काही कारणास्तव ग्रेसला खोलीबाहेर जावे लागते. ती परतते तेव्हा ऍनी तो जवळपास पूर्ण झालेला ड्रेस घालून जमिनीवर बसलेली असते पण ती ऍनी नसते. त्या ड्रेसमध्ये ती आंधळी म्हातारी असते. ग्रेसचा थरकाप उडतो आणि संतापही अनावर होतो. ती त्या मुलीला पकडून बदडून काढते. या झटापटीत ड्रेस फाटतो आणि ग्रेसच्या लक्षात येतो की तिला झाला तो भास होता. प्रत्यक्षात ती ऍनीलाच मारते आहे.

ग्रेस नवर्‍याच्या खोलीत जाते. तो शांतपणे तिला सांगतो की आठवड्याभरापूर्वी तू काय केलेस हे ऍनीने मला सांगितले आहे. हे ऐकल्यावर ग्रेस ढेपाळते आणि आपली चूक नव्हती, भावनेच्या भरात कृत्य झाले असे सांगण्याचा प्रयत्न करते. लवकरच ग्रेसचा नवरा घरातून निघून जातो. ग्रेस त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते पण तो बधत नाही.


दुसर्‍या दिवशी सकाळी घरातले सर्व पडदे गायब होतात आणि घर प्रकाशाने भरून जाते. ग्रेसची मुलं घाबरून आरडाओरडा करतात. ग्रेस संतापाने वेडीपिशी होते. तिला हे नोकरांचे कारस्थान वाटते. ती त्यांच्यावर बंदूक रोखते. ग्रेसचा हा अवतार पाहून मुले भेदरतात. त्या रात्री ती घरातून पळून जाऊन वडलांचा शोध घेण्याचा बेत आखतात आणि खिडकीतून खाली उरतरात. रागाने वेडीपिशी झालेली ग्रेस घरभर पडदे शोधते आहे. ती पडदे शोधायला नोकरांच्या खोलीत जाते आणि तेथे तिला एक पाकिट सापडते. त्या पाकिटात मृत्यूसमयी मृत शरीरांचे काढलेले तीन फोटो मिळतात. १८९१ साली वारलेल्या माळी, मिसेस मिल्स आणि लिडियाचे.

एव्हाना घराबाहेर पडलेल्या ऍनीला आवारात तीन ग्रेव्हस्टोन्स दिसतात. घरातल्या तीनही नोकरांचे. ऍनीला रहस्याचा उलगडा होतो आणि तेव्हाच मि.टटल, मिसेस मिल्स आणि लिडिया मुलांच्या दिशेने येताना दिसतात. ऍनी आणि निकोलस जीव घेऊन घराच्या दिशेने धावत सुटतात आणि....

त्या हवेलीत नेमकं रहस्य काय असतं? ते तिघे मृत नोकर ग्रेस आणि मुलांपर्यंत पोहोचतात का? व्हिक्टर त्याचे आईवडिल आणि त्या आंधळ्या म्हातारीचं काय रहस्य असतं? ग्रेसचा नवरा कुठे नाहीसा झालेला असतो या अनेक प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा चित्रपट वाचकांनी अवश्य पाहावा.

२००१ साली प्रदर्शित झालेल्या "द अदर्स" चित्रपटात निकोल किडमनची प्रमुख भूमिका आहे आणि तिने ती अतिशय ताकदीने पेलली आहे. राग, भीती, कुतूहल या सर्व भावना निकोल आपल्या डोळ्यांतून अतिशय प्रभावीपणे व्यक्त करते. चित्रपट पाहताना कोठेही किळस, ओंगळवाणे काहीतरी पाहिल्याचा प्रत्यय येत नाही. फारशी भीतीही वाटत नाही. किंबहुना, दचकवणारा एकमात्र प्रसंग ड्रेसमध्ये ग्रेसला ऍनीऐवजी म्हातारी दिसते तो असावा. तरीही, समोर जे सुरु आहे ते कुतूहल जागवते. प्रेक्षकांना बांधून ठेवते.

वातावरण निर्मिती, सशक्त रहस्य आणि कलाटणी हे गूढकथेचे मुख्य भाग असायला हवेत. या तीनही विभागांत हा चित्रपट सरस वाटतो. प्रचंड मोठी धुक्यात वेढलेली इस्टेट, प्रकाशाची ऍलर्जी असणारी मुले आणि त्यांची विशेष काळजी घेणारी ग्रेस, अचानक उपटलेले तीन नोकर, घरात वेळी अवेळी दिसणार्‍या व्यक्ती, ग्रेसच्या नवर्‍याचे येणे आणि जाणे आणि अर्थातच कथेला मिळणारी शेवटची कलाटणी.

हा चित्रपट सुमारे १० वर्षांपूर्वीचा असल्याने अनेकांनी पाहिला असावा. चित्रपटाविषयी त्यांचे विचार ऐकायला आवडतील. भय हा मुद्दा गूढकथेमध्ये मुख्य नसतो पण तो हळूच शिरकाव करतो. या चित्रपटातही रहस्याचा पत्ता शेवटपर्यंत प्रेक्षकांना न लागू देण्यात पटकथा यशस्वी ठरते. द अदर्स या चित्रपटावर काही तद्दन टुकार हिंदी चित्रपटही आले आहेत. तरीही, गूढकथेचा अस्सल आणि परिपूर्ण नमुना म्हणून "द अदर्स"चे नाव घेता यावे. या चित्रपटाची शिफारस मी आतापर्यंत अनेकांना केली आहे आणि त्या सर्वांना हा चित्रपट आवडला आहे हे विशेष.
.

Monday, July 18, 2011

एका येडपटाची पत्रे

कोर्‍या चेहर्‍याने विनोद करणार्‍या व्यक्तींची मला नेहमीच गंमत वाटत आली आहे कारण ते विनोद करतात की गांभीर्याने काही सांगण्याचा प्रयत्न करत असतात चटकन लक्षात येत नाही आणि असे माझेच का इतरांचेही होत असावे असे वाटते.

माझ्या मुलीला शाळेत इंग्लीशच्या एका गृहपाठासाठी "यडपटाची पत्रे" असा विषय होता. "लेटर्स फ्रॉम ए नट" हे पुस्तक तिने लायब्ररीतून आणले होते त्याचे थोडेफार वाचन केले आणि हसून हसून मुरकुंडी वळणे या वाक्प्रचाराची प्रचिती घेतली.

टेड नॅन्सी हे बॅरी मार्डर या विनोदी नटाचे टोपण नाव. या नावाने त्याने अनेक कंपन्यांना, व्यवसायांना आणि व्यावसायिकांना पत्रे लिहिली. पत्रांची धाटणी गंभीर पण आशय अतिशय बावळट अशा स्वरूपाची ही पत्रे ज्यांना गेली त्यातील काहींनी त्याकडे दुर्लक्ष केले तर काहींनी त्याची गांभीर्याने उत्तरेही दिली. ही पत्रे त्याने "लेटर्स फ्रॉम ए नट" आणि इतर पुस्तकांत संकलित केली आहेत. जेरी साईनफेल्डची प्रस्तावना या पुस्तकांना आहे. त्यापैकी काही पत्रांचे संक्षिप्त रूप आणि अनुवाद येथे देते -

टेड नॅन्सीची पत्रे निळ्या रंगात आणि उत्तरे लाल रंगात टाकली आहेत.




पत्र पहिले - नॉर्डस्टॉर्म या प्रसिद्ध दुकानाला लिहिलेले

पत्राचा थोडक्यात आशय असा -


ब्रुस नॉर्डस्टॉर्म,
नॉर्डस्टॉर्म
गेल्यावेळी तुमच्या दुकानात फेरफटका मारताना दुकानात ठेवलेला एक पुतळा (mannequin)दृष्टीस पडला. हा पुतळा मला विकत घेण्याची इच्छा आहे कारण माझ्या दिवंगत मित्राच्या चेहर्‍याशी मिळता जुळता चेहरा मला तिथे सापडला. तो त्याच्या कुटुंबाला भेट देण्याचा मनसुबा आहे.

तरी मला पुतळ्याची किंमत कळवणे.

टेड नॅन्सी.






या पत्राला ब्रुस नॉर्डस्टॉर्मकडून व्यवस्थित उत्तर आले -



टेड नॅन्सी,

तुमची मागणी अतिशय रोचक वाटली. खरे सांगायचे तर, आपल्या जीवलगाच्या मृत्यूनंतर त्याचा पुतळा अशाप्रकारे घरी ठेवण्याची कल्पना त्यांच्या कुटुंबाला रुचेल असे वाटत नाही.

तरीही, आमच्या सर्व गिर्‍हाईकांना सकारात्मक उत्तरे देण्याचा आमचा प्रयत्न असल्याने हे कळवू इच्छितो की आम्ही दुकानातले पुतळे जोपर्यंत वापरतो तोपर्यंत ते विकत नाही. परंतु जेव्हा ते बदलायची वेळ येईल तेव्हा ज्या किंमतीला आम्ही ते विकत घेतले त्याच किंमतीला आम्ही ते तुम्हाला विकत देऊ.

अधिक माहितीसाठी आपल्या घराजवळील स्टोर मॅनेजरशी संपर्क साधावा. मी हे पत्र त्यांनाही पाठवतो आहे.
ब्रुस नॉर्डस्टॉर्म





पत्र दुसरे -

प्रशासन,
द कोका कोला कंपनी,
अटलांटा

मी एक नवे पेय शोधले आहे - काएट डोक. हे पेय तुमच्या डाएट कोक या पेयामध्ये हस्तक्षेप करेल का हे जाणून घ्यायचे आहे. अर्थातच माझ्या पेयाची चव कोकसारखी नाही!! (ती पेप्सीसारखी आहे.)

मी हे पेय बांधकाम मजूरांना विकतो आणि त्यातील एकाने मला सांगितलेही होते की ते अजिबात कोकसारखे वाटत नाही.

मी हे पेय राजरोस विकू शकतो का हे मला कृपया कळवावे. सोबत आपण कोका कोलामध्ये कॅरमेल घालता का हे ही कळवावे.

धन्यवाद,
टेड नॅन्सी.






याला कोकाकोलाचे उत्तर (संक्षिप्त)

टेड नॅन्सी,

आपल्या पत्राबद्दल धन्यवाद.

डाएट कोक हा आमचा ट्रेड मार्क असून आम्ही तुम्हाला काएट डोक या नावाने पेयविक्रीची परवानगी देत नाही. काएट डोक हे नाव आमच्या डाएट कोकशी मिळतेजुळते असून ते बाजारात गोंधळ निर्माण करेल अशी आम्हाला शंका वाटते आणि आमच्या गिर्‍हाइकांचा हे कोका कोला कंपनीने मान्यता दिलेले उत्पादन आहे असा गैरसमज होऊ शकतो. यामुळे आपण काएट डोकचे उत्पादन ताबडतोब बंद करावे.

ट्रेडमार्क काउन्सिल,
द कोका कोला कंपनी






याला टेड नॅन्सीनी आणखी विक्षिप्त उत्तर पाठवले.

द कोका कोला कंपनी
अटलांटा,

मी ठरवले आहे की मी काएट डोक या पेयाची विक्री करणार नाही. मी माझे बँकेतले पैसे आणि काएट डोकचे उरलेले ११ कॅन घरी नेले आहेत.

मला कळून चुकले आहेत की ही एक कमजोर कल्पना होती. माझा मूर्खपणा दुसरे काही नाही. म्हणजे असे बघा की तुम्ही ७-११ मध्ये जाऊन डॉ.पेपर, ऑरेंज क्रश, विंक आणि काएट डोक पाहिलेत तर तुम्ही काएट डोक थोडेच विकत घेणार? मला तसे वाटत नाही. माझ्या वाह्यात कल्पनेने मी शरमिंदा झालो आहे. तुमचा वेळ वाया घालवल्याबद्दल क्षमा मागतो.

तरी तुम्ही माझ्या नव्या पेयाकडे लक्ष ठेवून राहावे - पाएट डेप्सी. त्याचे घोषवाक्य ओळखीचे आहे - 'इट टेस्ट्स नथिंग लाइक कोक!'

बरं, मी ते कोकमध्ये कॅरेमेल असण्याबद्दल विचारले होते त्याला तुम्ही उत्तर दिले नाही. शक्य असल्यास कळवावे.

टेड नॅन्सी.







बॅरी मार्डर ही अशाप्रकारे अनेक पत्रे टेड नॅन्सीच्या "लेटर्स फ्रॉम ए नट", "एक्स्ट्रा लेटर्स फ्रॉम ए नट" या पुस्तकांत आहेत. कधी एखाद्या हॉटेलला पत्र पाठवून माझा दात तुमच्या हॉटेलात पडला होता तो कृपया शोधून मला पार्सल करावा अशी मागणी तर कधी दुसर्‍या हॉटेलला मी अब्राहम लिंकनसारखा दिसत असल्याने माझे संरक्षक दल सोबत घेऊन येऊ शकतो का अशी विचारणा. एका रेस्टॉरंटला या गृहस्थाने मी माझा खाजगी वेटर सोबत घेऊन येऊ का? अशी विचारणा केली होती.

असो. तर याप्रकारचा गृहपाठ करायचा आहे पण टेड नॅन्सीच्याच कल्पना जशाच्या तशा लिहायच्या नाहीत. काल आम्ही तीन कल्पना शोधल्या.

१. द स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, एलिस आयलंड फाउंडेशनला एका रंगारी कंपनीकडून स्टॅच्यू ऑफ लिबर्टी रंगवून देण्याचे पत्र लिहायचे. त्यात त्यांच्याकडून लिबर्टी देवतेच्या पोशाखाचे रंग कळवावे अशी मागणी करायची.

२. टॅटू पार्लरला मानेवर टॅटू काढून घ्यायचा आहे असे पत्र पाठवायचे. पत्रात टॅटू मानेवर कुठे हवा, किती मोठा हवा, तो काढून घेताना दुखेल का वगैरेची विचारणा करावी. शेवटी मी माझ्या शहामृगाला ठरवलेल्या वेळी घेऊन येतो असे कळवायचे.

३. हे पत्र शहराच्या झू ला पाठवायचे. माझ्या बहिणीचा १६ वा वाढदिवस आहे, त्यानिमित्त पार्टी आयोजित केली आहे. पत्रात पार्टीबद्दल थोडक्यात माहिती द्यायची आणि बहिणीला लहानपणापासून "टेडी बेअर्स" आवडतात. तिला तिच्या वाढदिवसाला सरप्राईझ द्यायचे आहे त्यासाठी दोन तास एखादे पोलर बेअर भाड्याने मिळेल का? अशी विचारणा करायची.

* चित्र जालावरून साभार

Monday, May 02, 2011

चुकलेली वाट

सूचना: खालील लेखनप्रकार हा केवळ अनुभव असून सत्यकथा आहे. केवळ पात्रांची नावे बदलली आहेत. असे अनुभव अनेकांनी आयुष्यात अनुभवल्याची शक्यता असल्याने त्यात नावीन्य मिळणे कठिण आहे. कथा त्रयस्थाच्या दृष्टीकोनातून असल्याने एकांगी आहे. त्यात दोन्हीकडील बाजू मांडण्याचा प्रयत्न नाही. ही भयकथा किंवा गूढकथा नाही.





८:३२ ची गाडी आज नक्की चुकणार होती; गाडी चुकली की १० वाजताची मीटिंगही. घरातून निघायलाच उशीर झाला. जेव्हा वेळा साधायच्या असतात तेव्हा हमखास काहीना काही गडबड असतेच. आज काय? कामवालीला उशीर झाला. तिचं काम होईपर्यंत मला खोळंबून राहावं लागलं. तरी स्टेशन फार लांब नाही. पायी दहा मिनिटं लागतात पण हल्ली पायी स्टेशनपर्यंत पोहोचणं म्हणजे मोठं कठिण काम. रिक्शा, बाइक्स, बसेस, फेरीवाले यांनी रस्ता असा अडवलेला असतो की त्यातून वाट काढत चालणं तारेवरल्या कसरतीपेक्षा वेगळं नाही.

पिंपळाच्या पारापाशी नितीश आळसावून बसलेला दिसला. मळकटलेले कपडे, विस्कटलेले केस, पायाला बांधलेलं चिंध्या झालेलं बँडेज. त्याच्या अंगाला गेला महिनाभर तरी पाण्याचा स्पर्श झाला नसावा. मी पारापासून चार हात दूरून जायचं ठरवलं. आधीच उशीर आणि त्यात भल्या सकाळीच याचं नको असलेलं दर्शन.

"ए मला वीस रुपये दे ना! काल सकाळपासून काही खाल्लं नाही. प्लीज, डोंट से नो. " त्या गर्दीत वाट काढत, लंगडत तो कसा माझ्यापाशी पोहोचला देवजाणे. आपले पिवळे पडलेले दात दाखवत आणि चेहर्‍यावर वाढलेले खुंट खाजवत तो ओशाळवाणे हसून मला विचारत होता. त्याच्या अंगाला येणार्‍या त्या घाणेरड्या भपकार्‍याने मला मळमळून आले.
माझ्या चेहर्‍यावरचे त्रासिक भाव लपवणे मला शक्य नव्हते. "हे बघ! मला आधीच उशीर झाला आहे आणि मी तुला अजिबात पैसे देणार नाही. याआधीही दोनदा दिले आहेत. दूर हो आता! "

"ए नाही नको ना म्हणू! दे ना. भूक लागली आहे. " त्याने केविलवाण्या नजरेने माझ्याकडे बघत हात पसरला. रस्त्यावरचे लोक आता वळून तमाशा पाहत होते. मला आणि नितीशला या भागात ओळखणारेही अनेक होते. मला उगीचच लाजल्यासारखं वाटलं. मी पुढे एक चकार शब्द न काढता पर्समधून चटकन वीस रुपयांची नोट काढली, त्याच्या दिशेने फेकली आणि तिथून पळ काढला. ८:३२ ची लोकल चुकली होतीच. मनातल्या मनात दोनचार शिव्या हासडून मी पुढली लोकल पकडली. पाठ टेकवून उभं राहायला मिळालं हेच खूप होतं. ट्रेन हलली आणि डोळ्यांसमोर पुन्हा नितीश उभा राहिला.


***


गोरेगावला आम्ही इमारतीत राहायला आलो तेव्हा मी फक्त दीड वर्षांची होते. मोजून ३० कुटुंबे होती इमारतीत; बरीचशी तिशी-चाळिशीची नोकरदार मंडळी. पै-पै जमवून, गृहकर्ज काढून आपल्यासाठी मुंबईत हक्काचा निवारा मिळवण्यास धडपडणारी.

तळमजल्यावर नायकांचे कुटुंब राहायला आले होते. सुरेशकाका आणि सुमनकाकींचा सुसज्ज दोन बेडरूमचा फ्लॅट होता. त्यांचा मुलगाही माझ्या एवढाच, दीड वर्षांचा होता. आसपास याच वयाची आणखीही बरीच मुलं इमारतीत होती. गाडी, फोन, उंची फर्निचर या चैनीच्या आणि श्रीमंतीच्या गोष्टी समजल्या जात असा तो काळ होता आणि राष्ट्रीय बँकेत उच्चपदस्थ असणारे सुरेशकाका फोन, गाडी, ड्रायव्हर सर्व बाळगून होते. तळमजल्यावर राहत असल्याने सुरेशकाकांची गाठभेट अनेकदा होई. सर्वांशी अदबाने बोलणारे, आमचा फोन खुश्शाल वापरा, कधी गरज लागली तर आपली गाडी आहे हं! असे आवर्जून सांगणारे सुरेशकाका इमारतीत सर्वांना आवडत. सुमनकाकीही मिळून मिसळून वागणार्‍या होत्या. लोकांना पहिले काही दिवस एका गोष्टीचे कुतूहल होते, ते म्हणजे हे दांपत्य चाळिशीला आलेले होते पण त्यामानाने त्यांचा मुलगा फार लहान होता. लवकरच या गोष्टीचा उलगडा लोकांना झाला. नितीश हा त्यांचा दत्तक मुलगा होता.

नितीश काका-काकूंचा मुलगा नाही ही गोष्ट मला लहानपणीच माहीत झाली होती. नेमकी कुणी सांगितली ते आठवत नाही पण काही मोठ्या मुलामुलींकडून समजली असावी. मुलांनी या गोष्टीला खूप महत्त्व दिल्याचे आठवत नाही. या गोष्टीवरून इमारतीतील मोठ्यांमध्येही फार चर्चा झाल्याचे आठवत नाही. सर्वांनी तो सुरेश आणि सुमनकाकींचाच मुलगा आहे हे मनापासून स्वीकारले होते. खुद्द नितीशला या गोष्टीची कल्पना नसावी बहुधा आणि कधी त्याला कुणी दुखवून सांगितले असेही आठवत नाही.

लहान बाळं सर्वांनाच गोड, गोजिरी वाटतात आणि आवडतात पण जसजशी मुलं मोठी होतात तसतशी प्रत्येक मुलातले गुणदोष इतरांना कळू लागतात. नितीशसारख्या गुटगुटीत, गबदुल लहान बाळाचे कौतुक सर्वांनी केले तरी थोड्याच काळात या बाळाचे रुपांतर अंगाने अस्ताव्यस्त सुटलेल्या खादाड मुलात होईल याची कल्पना कुणाला नव्हती. ५-६ वर्षांच्या नितीशचे कौतुक होण्यापेक्षा मुलांमध्ये हसू होऊ लागले आणि केवळ त्याचा जाडेपणाच त्याला कारणीभूत होता असे नाही. नितीशचे गुण-दुर्गुणही हळूहळू लोकांच्या नजरेत येऊ लागले. माझ्या ५ व्या वाढदिवसाची घटना...

त्या काळी आतासारखे वाढदिवसानिमित्त मोठ्ठे खर्च करायची पद्धत पडली नव्हती. आईने इमारतीतल्या लहान मुलांना बोलावले होते. घरी केक केला होता आणि बटाटेवडे तळले होते. केक कापायची वेळ झाली तशी आईने केक आणून टेबलवर ठेवला आणि सुरी आणण्यासाठी ती आत गेली. परत येऊन पाहते तो काय नितीश केकचा भलामोठा ढलपा हाताने तोडून चापण्यात मग्न होता. बाकीची मुलं आ वासून बघत होती आणि मी भोकांड पसरलं होतं. इतक्या लहान मुलाला ओरडावं तरी कसं म्हणून आई गप्प बसली. असाच अनुभव थोड्याफार फरकाने अनेकांना आला होता. कधी कुणी खाण्याची सर्वांमध्ये ठेवलेली बशी एकट्याने हिसकावून त्यावर ताव मारणे, वाढदिवसाला, पूजेला कुणी बोलावले तर हावरटासारखा खाण्यावर आडवा हात मारणे, इतरांच्या प्लेटमधले पदार्थ हिसकावून घेणे अशा अनेक प्रसंगांतून लहान आणि मोठेही मागून त्याची चेष्टा करू लागले. गोष्ट केवळ इतक्यावरच राहती तर मोठा प्रश्न होता असे वाटत नाही पण...

नितीशच्या अंगात उपजतच खोडकर गुण होते; आठ-नऊ वर्षांच्या कळत्या वयातही ते कमी झाले नाहीत. आपल्यापेक्षा लहान आणि दुर्बळ मुलांना बडवून काढणे, त्यांच्या अंगावर थुंकणे, त्यांच्या खोड्या काढणे, त्यांना शिव्या देणे अशा अनेक प्रसंगांतून तो लवकरच मुलांमध्ये अप्रिय होऊ लागला. लहान मुलांची न्यायशक्ती दांडगी असते म्हणे. ते काळ्याला काळे आणि पांढर्‍याला पांढरे म्हणायला कचरत नाहीत. यथावकाश मुलांनी नितीशला हळूहळू चोख उत्तर देणे सुरू केले. त्याला खेळातून कटाप केले जाई, घेतले तरी पकडापकडीचे, लपाछपीचे राज्य सतत त्याच्यावर दिले जाई. क्रिकेट खेळताना बॅटिंग आणि बोलिंग त्याच्या वाट्याला येत नसे. फक्त फिल्डिंग करशील तरच आमच्यात खेळ असे त्याला सुनावले जाई. अर्थातच, त्याचा फारसा उपयोग होत नसेच. मनात आले की नितीश कोणीतरी दुसरे गिर्‍हाईक शोधी किंवा एखाद्या मुलाला एकटे गाठून प्रसाद देई. एकदा त्याने खेळायला गेलेल्या तीन-चार वर्षांच्या लहान मुलांना झाडाच्या पडलेल्या फांदीने अंगावर वळ उठेपर्यंत सपासप फोडून काढले होते. त्या प्रसंगानंतर मोठेही नितीशपासून आपल्या मुलांना दूर राहण्याचा सल्ला देऊ लागले.

नितीशच्या तक्रारी सतत त्याच्या आईवडीलांकडे जाऊ लागल्या. "काकी, नितीशने मारलं.", "काकू, नितीश बघा थुंकतो आमच्या अंगावर. आम्ही नाही घेणार त्याला खेळायला. " "अहो, समजवा तुमच्या नितीशला. काल मारलं त्याने आमच्या नमूला." नितीश असे का करत असेल, त्याला एखादी मानसिक व्याधी होती की नाही ते जाणून घेण्याचा आणि उपचार करण्याचा तो काळ नव्हता. कदाचित त्याला उपचारांची गरज असू शकते, समुपदेशन करावे लागेल हे इतरांना कधी जाणवलं नाही तसं त्याच्या आई-वडिलांनाही ते जाणवलं नसावं. आपल्या मुलाला इतर मुले नावे ठेवतात. त्याला खेळायला घेत नाहीत, त्याला चिडवतात या गोष्टींनी सुमनकाकी कानकोंड्या झाल्या. पोटचं मूल नसण्याचं दु:ख आणि नितीशच्या रूपाने आपले ममत्व प्रकट करायची त्यांना मिळालेली संधी यातून त्या इतरांच्या तक्रारींकडे पूर्ण दुर्लक्ष करू लागल्या. याचा परिणाम असा झाला की नितीश दिवसेंदिवस अधिकच निगरगट्ट होऊ लागला.

एके दिवशी तक्रारी ऐकल्यावर वैतागाने सुमनकाकींनी पोरांची हजेरी घेतली. "तुम्ही सर्व नितीशला उगीच नावं ठेवता. मुद्दाम त्याला त्रास देता. त्याला तुमची गरज नाही. मी खेळेन त्याच्याशी. तुमची अरेरावी मी खपवून घेणार नाही. चल, नितीश, आजपासून आपण दोघे घरात खेळू. " असं म्हणून त्या तरातरा त्याला ओढत घेऊन गेल्या. आता हा पायंडाच पडला होता. नितीशची तक्रार गेली की सुमनकाकी आमच्यावरच करवादून त्याला खेचून घेऊन जात. मोठ्यांनीही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. सुरेशकाकांच्या कानावरही नितीशच्या तक्रारी आल्या होत्या. ते समजूतदारपणे तक्रारी ऐकून घेत. नितीशला प्रेमाने, धाकाने समजवण्याचा प्रयत्न करत. सुरेशकाकांचा धाक नितीशला होता त्यामुळे तोही समजल्यासारखे दाखवी. आम्ही मुलेही समजूतदार होत असू; त्याला पुन्हा आमच्यात खेळायला घेत असू परंतु काही दिवसांनी... ये रे माझ्या मागल्या!

लहानांनी त्याचे क्रौर्य अनुभवलेले असले तरी मोठ्यांशी बोलताना नितीशचे बोलणे अतिशय अदबशीर असे. सुरेशकाकांनी त्याला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले होते आणि घरातही ते बरेचदा त्याच्याशी इंग्रजीतून बोलत. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचार पाळण्याची सवय त्याला लागली होती. इंग्रजी माध्यमात त्या काळी आजच्या मानाने कमी मुले जात त्यामु़ळे नितीशच्या सफाईदार इंग्रजीचे कौतुक करणारे बरेचजण होते. अभ्यासातही नितीश तल्लख होता. दरवर्षी ७५-८० टक्के गुण सहज मिळवत असे. त्याच्या गुबगुबीत शरीरयष्टीमुळे इमारतीतील नाटकांत, फॅन्सी ड्रेस स्पर्धांत तो सर्वांना हवा असे. त्यामुळे कितीही नावडता असला तरी मुलांनी त्याला आपल्यात सामावून घेतले होते.

वयाच्या ११-१२ व्या वर्षीच त्याला आम्हा मुलांपैकी कुणीतरी लपून सिगरेट ओढताना पाहिले. बातमी पोरांमध्ये कानोकानी पसरली. "ए त्याच्या आईला सांगायचं का? " हा प्रश्न ज्याने उपस्थित केला त्याला दटावण्यात आले. "त्याची आई मागे काय म्हणाली होती माहित्ये ना. तुम्ही मुद्दाम त्याला त्रास देता आणि त्याच्या खोट्या तक्रारी करता. आपण कशाला मध्ये पडायचं? " वयानुसार नितीशचा खोडकरपणा इतरत्र वळला होता. अक्कल नको त्या दिशेने वाहवत चालली होती.

"ए तुला माहित्ये, त्याच्याकडे ती तसली चित्रं असतात. "
"तसली म्हणजे? "
"तसली म्हणजे उघड्या नागड्या बायकांची. " नम्रता एक दिवस माझ्या कानात कुजबुजली.
"तुला काय माहीत? "
"अगं, माझी मामेबहीण आहे त्याच्या वर्गात. ती म्हणत होती. नितीशच्या दप्तरात पाहिली काही मुलांनी. "
"होऽऽ? म्हणजे तो राजरोस जवळ बाळगतो? शाळेतही.. इइइ" मी डोळे विस्फारले. "शी! अशा घाणेरड्या मुलाशी फार बोलायचं नाही हं आपण. अंतर राखून राहिलं पाहिजे. " त्या वयात फार मोठा धक्का होता आमच्यासाठी.
"अगं, शाळेतही त्याच्याशी फारसं कोणी बोलत नाही. त्याची कुणाशी मैत्री नाही. मधल्या सुट्टीत ना, तो शाळेजवळचे फेरीवाले, पानवाले यांच्याशी गप्पा मारत असतो. गुटखा-बिटखाही खात असणार."

पुढे कधीतरी नितीशला जवळच्या विडिओ पार्लरमधून बाहेर पडताना पाहिले. दुपारच्या वेळी तिथे एक्स-रेटेड चित्रपट दाखवले जात. शाळेतल्या लहान मुलाला तेथे खरेतर प्रवेश नव्हता पण असे नियम पाळतो कोण? बातमी आम्हा मुलांमध्ये लगेच कर्णोपकर्णी झाली.
"बरं कुणाला सांगणार नसशील तर तुला एक गोष्ट सांगते. " नम्रता काळजीने सांगत होती.
"कुठली गोष्ट? " मी उत्सुकतेने विचारलं.
"माझी आईला चौथ्या मजल्यावरची सोनाली आहे ना तिच्या आईने सांगितलं. खूप रागात होती सोनालीची आई. "
"का गं? "
"अगं परवा लाइट गेले होते ना संध्याकाळी तेव्हा सोनाली क्लासमधून परत येत होती. लिफ्ट बंद होती ना त्यामुळे तिला चौथ्या मजल्यापर्यंत जिने चढावे लागले. त्या नितीशने तिला येताना पाहिलं असावं. तिच्या मागे मागे तो ही गेला आणि म्हणे तिला मागून करकचून मिठी मारली. ती घाबरून ओरडली ना तशी पळून गेला, घाणेरडा! "
"इइइइ विकृत आहे. सोनालीची आई काही बोलली नाही का? "
"ती घरी गेली होती ना नितीशच्या. पुढे मागे बघणार नाही. समोर आला तर दोन लगावून देईन म्हणाली. सुमनकाकीने हात जोडून क्षमा मागितली. डोळ्याला पदर लावला. सोनालीची आई गप्प झाली. "
"बरं झालं सांगितलंस. आजपासून मी त्या घाणेरड्याला हाय सुद्धा म्हणणार नाही. आपण सावध राहायला हवं. "

एस. एस. सी. ला आम्ही एकाच वर्षी होतो. स्वतःच्या रिझल्टबरोबरच नितीशचे काय होईल हे सुप्त कुतूहलही मनात होते. परीक्षेत त्याला ७७% पडले. याचे पुढे कसे होणार याची काळजी करणार्‍या सर्वांच्या तोंडाला कुलुपं लागली. सुरेशकाका आणि सुमनकाकींनी आनंदाने सर्वांना पेढे वाटले. मार्क चांगले असले तरी उत्तम नव्हते परंतु बी. कॉम केले की आता वेगवेगळे कंप्युटर कोर्सेस करता येतात, एम. बी. ए किंवा सी. ए. करता येतं असं नितीशला पटवून सुरेशकाकांनी त्याला कॉमर्सला अ‍ॅडमिशन घेऊन दिली.

कॉलेजला असताना सिगरेट ओढत, येणार्‍या जाणार्‍या पोरींच्या उभारीवरून आशाळभूत नजर फिरवणारा नितीश कधीतरी स्टेशनावर दिसायचा. कधी समोर आलाच तर त्याचे ते बेरकी हास्य डोक्याला त्रास देऊन जायचे. एक दिवस चौथ्या मजल्यावरचे काळे काका सांगत आले की त्यांनी नितीशला बाजारातल्या डान्सबारमधून तर्र अवस्थेत बाहेर येताना पाहिले. त्यानंतर कळले की ही गोष्ट इमारतीतल्या इतर काही मोठ्या मुलांना आधीच ठाऊक होती. १८व्या-१९व्या वर्षी त्याला हे सर्व करण्यास पैसे आणि प्रोत्साहन कसे मिळत होते कळण्यास मार्ग नव्हता. काळेकाकांनी ही गोष्ट तत्परतेने सुरेशकाकांच्या कानी घातली तसे सुरेशकाका हबकलेच. आपल्या मुलाचे गुण या आधी त्यांना कधी जाणवलेच का नाही हे गूढ होते. इमारतीतल्या लोकांच्या मते सुमनकाकींनी सुरेशकाकांना घरात काय चालते याचा कधी थांगपत्ताही लागू दिला नव्हता. त्याला पॉकेटमनीसाठी मोठी रक्कम हातात देणार्‍या, वेळोवेळी त्याला पाठीशी घालणार्‍या, त्याच्याविषयी येणार्‍या तक्रारींवर पांघरूण घालणार्‍या सुमनकाकीच होत्या.

त्या रात्री सुरेशकाकांच्या घरात मोठमोठ्याने आवाज येत होते. सुमनकाकींच्या रडण्याचा, नितीशच्या आणि सुरेशकाकांच्या भांडणाचा. आम्हाला अगदी दुसर्‍या मजल्यापर्यंत ऐकू येत होते. शेवटी इमारतीतील कुणीतरी मध्ये पडलं. सुरेशकाकांनी या प्रकरणानंतर नितीशच्या वागणुकीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. तो कधी घरी येतो, कधी बाहेर पडतो, त्याची प्रगती, पॉकेटमनी यावर ते जातीने लक्ष देऊ लागले. परिस्थिती निवळल्यासारखी झाली. सर्व काही सुरळीत सुरू झाले.

नितीशच्या कॉलेजच्या शेवटच्या वर्षी सुरेशकाका रिटायर झाले पण लगेचच त्यांना फॉरेन बँकेत अ‍ॅडवायझर म्हणून बोलावणे आले. तिथे त्यांनी नितीशसाठी शब्द टाकला; तो नाकारला जाणे केवळ अशक्य होते. ग्रॅज्युएट झाल्याक्षणी नितीशला उत्तम पगाराची नोकरी हातात पडली. "चला! गंगेत घोडं न्हालं. आता हा मुलगा बिझी राहिल, चांगल्या संगतीत राहिल. हे असले उद्योग बरीच पोरे करतात या वयात पण जबाबदारीची जाणीव झाली की येतात सगळे लायनीवर." असे म्हणून सर्वांनी सुटकेचे निश्वास सोडले. पण नाही..तसं काही घडायचं नव्हतं.

नितीश आता स्वतंत्र झाला होता. पॉकेटमनीसाठी त्याला वडिलांवर अवलंबून राहावं लागत नव्हतं. लवकरच रोजचं पिणं, नशेत तर्र होऊन घरी येणं, डान्सबार, सिगरेटी सर्व पूर्ववत सुरू झालं. सक्काळी सातला इमारती समोरच्या पानवाल्याने शटर वर केलं की त्याचे पहिले गिर्‍हाइक नितीश असे. "याने कोणतंही व्यसन बाकी ठेवलेलं नाही." असं लोक म्हणू लागले. काही काळाने या सर्वाच्या सोबतीला नितीशची कोणी एक बाई आहे. तिच्याकडे तो नियमित जातो अशी बातमीही कानावर पडली. बातमी खरी का खोटी हे माहित नाही पण सुरेशकाकांच्या घरातून दररोज भांडणाचे आणि रडारडीचे आवाज ऐकू येत. आता शेजारपाजारचेही त्रासले होते. सुरेशकाका आणि सुमनकाकींची पुण्याई मोठी म्हणून सगळे गप्प होते एवढेच. अशातच एका भांडणानंतर अ‍ॅम्ब्युलन्सच्या आवाजाने सर्व चकीत झाले. सुरेशकाकांना हृदयविकाराचा झटका आला होता. इमारतीतील सर्वांनी वेळीच धावाधाव केली म्हणून प्रसंग निभावून नेता आला.

दिवसेंदिवस नितीश अधिकच शिरजोर होत चालला होता. काकांच्या आजारपणामुळे धाक थोडा कमी झाला होता आणि पंचविशीच्या मुलाला आणखी किती धाकात ठेवणार होते काका? ते हॉस्पिटलमधून घरी आले होते. काठी घेऊन घरातल्या घरात, बाहेर अंगणात फिरत, आल्या गेलेल्याशी चार शब्द बोलत पण काका मनाने खचले होते. काकी तशाही नितीशला काही बोलत नसत. पुत्रप्रेमात गाढ बुडलेल्या काकींनी डोळ्यांवर झापडे ओढून घ्यायचेच ठरवले होते. या सर्व मनःस्तापात आपले काही खरे नाही हे काकांना कळून चुकले होते. त्यांनी तातडीने एक शहाणपणाची गोष्ट केली. आपले मृत्यूपत्र तयार केले. घर,ठेवी, विमा आणि जी काही संपत्ती होती ती आपल्या पश्चात केवळ आपल्या बायकोची आहे असे लिहून ठेवले. नितीशला हे कळल्यावर घरातला ताण आणखी वाढला. त्याची गलिच्छ शिवीगाळ नेहमीची झाली होती पण आता त्याने काका-काकींवर हात उगारणेही सुरु केले होते. अशाच एका भांडणात सुरेशकाका त्राग्याने बोलून गेले -

"तू पोटचा मुलगा असतास तर असा नसता वागलास पण वळचणीचे पाणी वळचणीला जायचे. आमचे रक्त असते तर असे झाले नसते." सुरेशकाकांच्या बोलण्याला फारसा अर्थ नव्हता. पोटची पोरंही बिघडतात, वाया जातात हे त्यांना पुरेपुर माहित होते पण त्राग्यातून शब्द निघून गेले. नितीश नेमका कुणाचा मुलगा आहे याची कल्पना त्यांना होती का याची कल्पना नाही पण आपण आपल्या आईवडिलांचे पोटचे मूल नाही ही बातमी नितीशला आणखीनच वेडेपिसे करणारी ठरली. त्याने साफ ताळतंत्र सोडून दिले. कोणी म्हणायचे तो कधी बँकेत जातो, कधी जात नाही. त्याची फोरासरोडला कुणी बाई आहे. तिच्याकडेच पडलेला असतो. एक दोनदा त्याला इमारतीतल्या लोकांनी रस्त्यात दारू पिऊन अक्षरशः लोळताना पाहिला आणि घरी आणून सोडला. या सर्वाचा परिणाम व्हायचा तो झाला. काकांना आलेला पुढला झटका प्राणघातक ठरला.

घरात आता सुमनकाकी आणि नितीश दोघेच होते. नितीशला पगाराचे पैसे पुरे पडत नसत. तो काकींकडे पैशांसाठी तगादा लावत असे. त्याची नोकरीही सुटली होती. कोणी म्हणत त्याने बँकेत अफरातफर केली होती. रक्कम खूप मोठी नव्हती आणि सुरेशकाकांच्या पुण्याईमुळे बँकेने ते प्रकरण कसेबसे गुंडाळले होते आणि नितीशला नोकरीतून कमी केले. नोकरी गेली तरी नितीशचे शौक कमी झाले नव्हते; अंगात कली तर फार पूर्वीच घुसला होता. तर्र होऊन, झोकांड्या खाणार्‍या नितीशपासून लोक चार हात दूर राहत. त्याला स्वतःचे मित्र-मैत्रिणी असे कधी नव्हतेच त्यामुळे त्याला सांभाळेल, समजावेल असे कोणी उरलेच नव्हते. सुमनकाकींना आता तो पैशांसाठी धमकावत असे. भांडत असे, मारहाणही करत असे पण काकींनी स्वतःहून कधी तोंड उघडून लोकांकडे तक्रारच केली नाही.

एक दिवस मात्र बांध फुटला. मध्यरात्री घाबर्‍याघुबर्‍या झालेल्या सुमनकाकींनी शेजार्‍यांची ठणाठणा बेल वाजवली. शेजार्‍यांनी दार उघडलं तसं त्या झटकन आत शिरल्या आणि धाय मोकलून रडू लागल्या. नितीश गेले काही दिवस त्यांच्या मागे लागला होता की हे घर विकून टाक आणि पैसे देऊन मला मोकळा कर. काकींनी नकार दिल्यावर त्यांना मारहाण करत होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी काकी कसेबसे हे सर्व सहन करत होत्या. मुकाट्याने सर्व सहन करत होत्या. त्या रात्री उशीरापर्यंत नितीश घरी आला नव्हता. रात्री साडे अकराच्या सुमारास तर्र होऊन परतला तसा काकींनी त्याला जेवणाबद्दल विचारले. त्याने नकार दिला म्हणून काकी जाऊन आपल्या खोलीत झोपल्या. मध्यरात्री उलटून गेली असावी. काकींना झोप लागली होती. अचानक नितीशने काकींच्या बेडरूममध्ये घुसून त्यांच्या नाकातोंडावर उशी दाबली. काकींच्या कृश शरीरात कसे कोणजाणे पण नशेत लडखडणार्‍या नितीशला धक्का देण्याचे बळ आले. त्या जोराचा हिसडा देऊन पळाल्या आणि थेट शेजारच्यांकडे पोहोचल्या.

प्रकरण आता अतिशय गंभीर झालं होतं. पांढरपेशा मध्यमवर्गीय फ्लॅट संस्कृतीत लोक शेजार टिकवून असले तरी एक विशिष्ट मर्यादा राखून असतात. फ्लॅटच्या बंद दारांचा आडोसा अनेक गुपिते लपवून ठेवतो. काकींच्या घरातले हे गुपीत आता बाहेर पडले होते. काकींनी यापुढे नितीशसोबत राहणे धोक्याचे होते. इमारतीतल्या लोकांनी आता एकत्र व्हायचे ठरवले आणि पोलिसांत तक्रार केली. त्या रात्रीच नितीशला अटक झाली, पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मुलांवर केलेलं प्रेम इतकं घट्ट असतं की तिथेही ती माऊली पोलिसांना डोळ्यांत पाणी आणून इन्स्पेक्टरना विनंती करत होती, "त्याला मारू नका हां, त्याला उपाशी ठेवू नका हां. तो सुधारेल, त्याला समजून घ्या."

नितीशला अटक झाली आणि एक एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. नितीशने सुमनकाकींना कफल्लक करून सोडले होते. नितीश जबरदस्तीने त्यांच्या सह्या चेकवर घेई. त्यांची फिक्स्ड डिपॉझिट्स त्याने तोडायला लावली होती. दागिने नेऊन कधीच्या कधी विकले होते. सर्व हिशेब केला तेव्हा काकींच्या नावावर घर आणि केवळ ८०० रुपये शिल्लक होते. आता काय करायचे? असा प्रश्न सर्वांसमोर उभा राहिला. काकींची जबाबदारी कोण घेणार? त्यांचा मोठा भाऊ होता पण तोच वृद्ध होता आणि आपल्या मुलांकडे राहत होता. घर विकण्यावाचून पर्याय नव्हता. इमारतीतील लोकांनी त्यांच्या भावाला बोलावून घेतले आणि सर्वांनी मिळून घर विकून टाकण्याचा निर्णय घेतला. काकींची काळजी घेतली जाईल अशा एका वृद्धाश्रमात त्यांना ठेवण्यात आले आणि घर विकून मिळालेले पैसे त्यांच्या खर्चासाठी ठेवण्यात आले. काकींच्या इच्छेनुसार पैशांचा काही हिस्सा नितीशलाही देण्यात आला. अनेकांनी या गोष्टीला विरोध केला होता पण काकी बधल्या नाहीत. त्यांनी नितीशवर केसही केली नव्हती त्यामु़ळे नितीश लवकरच बाहेर आला. त्याचा हिस्सा त्याला देऊन लोकांनी त्याला मोकळा केला. काकींची रवानगी कोठे होत आहे याची त्याला खबर लागू दिली नाही.

या घटनेनंतर मिळालेले पैसे घेऊन नितीशने तोंड कुठे काळे केले ते कळले नाही. कोणी म्हणत त्याने कुठल्याशा चाळीत जागा घेतली आहे. कुणी म्हणत तो त्या बाईकडे फोरासरोडला राहतो. कालांतराने लोकांना नायक कुटुंबातील सनसनाटी गोष्टींचा विसर पडला. ८-१० महिने निघून गेले. अचानक नितीश पुन्हा इमारतीच्या आसपास घुटमळताना दिसू लागला. रया गेली होती. घाणेरडा झाला होता. त्याला कसल्यातरी गुप्त रोगांची लागण झाली आहे असे लोक म्हणत. अनेक दिवसांत पाण्याचा स्पर्श नसलेले घाणेरडे शरीर, मळकटलेले फाटके कपडे आणि पायाला बांधलेले बँडेज घेऊन तो भ्रमिष्टागत भटकताना दिसे. त्याच्या पायाला गँगरिन झाले आहे असे कोणीतरी म्हणे. दोन बोटे कापली होती. कधी इमारतीतील कुणी दिसले तर त्यांच्याकडे तो पैसे मागत असे. लोकांच्या मनात तिरस्कार आणि करूणा एकत्रच दाटून येत असे. कधीतरी कुणी पैसे देई तर कधीतरी त्याला हाकलून लावी.

कोपर्‍यावरच्या बंगलीतले दिक्षितकाका एके दिवशी माझ्या वडिलांना म्हणाले - "तो तुमच्या इमारतीतला नायकांचा मुलगा हो, तो रात्रीचा आमच्या अंगणात घुसून आंब्याच्या झाडाखाली झोपतो. हे सगळे दुर्दैवाचे दशावतार बघायच्या आधी नायक गेले ते बरे झाले म्हणायचे. मी एकदा दोनदा हटकला त्याला पण देतो झोपायला कधीतरी. चांगल्या घरचा मुलगा ना म्हणून वाईट वाटतं पण आमच्या सूनबाईला आवडत नाही ते. जांघेत खाजवत असतो सारखा. नाती ११-१२ वर्षांच्या झाल्यात. त्यांच्यावर याची नजर नको असं म्हणते. तिचंही बरोबर आहे."

दादर स्टेशनाला गाडी लागली तशी माझ्या विचारांची शृंखला गळून पडली. 'माणूस तरी किती नको ते ताप डोक्याला लावून घेतो.' एक सुस्कारा सोडून मी थांबत आलेल्या गाडीतून उडी मारली आणि जिन्याच्या दिशेने धाव घेतली.


***


एखाद दोन महिने उलटून गेले असतील वरल्या घटनेला. कधीतरी धावपळीत स्टेशनाकडे येता-जाताना नितीश पारापाशी बसलेला दिसायचा. कधी नाही दिसायचा. मनाने त्याची नोंद ठेवणे सोडून दिले होते. नकोशा असणार्‍या तिर्‍हाईत गोष्टींकडे आपण आपसूक दुर्लक्ष करू लागतो तसेच.

आज वेळेवर ऑफिसात येऊन टेकले होते. सकाळीच डेस्कवरला फोन वाजला तसा मी रिसिव्हर कानाला लावला.
"आहे का गं वेळ ५-१० मिनिटं? मोबाईलवर फोन करत होते पण लागला नाही म्हणून इथे करून पाहिला." नम्रताचा आवाज कानावर आला.
"आहे ना. सेलफोन सायलंटवर आहे बहुधा. इतकं काय अर्जंट काम काढलंस?"
"अगं, अर्जंट असं काही नाही पण मनाला रुखरुख लागली होती म्हणून तुझ्याशी बोलावसं वाटलं. नितीश गेला काल."
"गेला म्हणजे?" नितीश प्रकरणाची परिणीती अशीच होईल याची कल्पना होती तरीही अचानक आलेल्या बातमीने आश्चर्य वाटायचे ते वाटलेच.
"अगं, काल रात्री आम्ही जेवायला गेलो होतो. ऋषीचा वाढदिवस होता ना. परतताना रात्रीचे १० वाजून गेले होते. पारापाशी गर्दी जमली होती म्हणून विचारलं तर कळलं की नितीशची बॉडी होती. म्युनिसिपल्टीची गाडी आली होती. बे..." नम्रताने आवंढा गिळला. "बेवारशी प्रेतांना उचलून न्यायला येते ना."
"अरेरे!" मला पुढे काय बोलावे ते कळेना. काळजात सूक्ष्म कळ उमटली.

मुलं बिघडतात. एका विशिष्ट वयांत अनेक उद्योग करून पाहतात. त्यातली बरीचशी मुलं चुकलेली वाट सुधारून पुन्हा मार्गी लागतात. कुटुंब, नातेवाईक, मित्र-मैत्रिणी यांची मदत घेतात किंवा एके दिवशी काहीतरी चुकतंय ही जाणीव झाल्याने स्वतःच मार्ग बदलतात. मध्यमवर्गी पांढरपेशा वातावरणात माणसं एकमेकांना दबून राहतात. अशा परिस्थितीत सर्व बंधनं झुगारून स्वतःला गर्तेत झोकून देणारे विरळाच. सोबत वाढलेला, खेळलेला, शिकलेला, नंतर निगरगट्ट झालेला, व्यसनी आणि शेवटी भ्रमिष्टागत भीक मागत फिरणारा नितीश डोळ्यासमोरून पुन्हा तरळून गेला. कधीकधी एखादी नकोशी व्यक्तीसुद्धा हुरहुर लावून जाते खरी.


***

Sunday, November 07, 2010

पशू

हे घर भाड्याने घेतलं तेव्हा सुहासी थोडीशी कुरबुरत होती. या बायकांना प्रत्येक गोष्टीत खोड काढायची सवय का असते हेच कळत नाही. मनातून घर तिलाही आवडलं होतं पण उगीच काहीतरी लहानसहान खोड्या काढत बसली होती. घराचं तोंड पूर्वेला नाही, विहीरीवर जाळी नाही, स्वयंपाकघराचा ओटा अरुंद आहे आणि काय ना काय. तिला बराच वेळ समजावलं तेव्हा एकदा घर पसंत आहे म्हणाली. आज विचार केला तर वाटतं की उगीच तिला भरीला पाडलं मी.

पुलाच्या बांधकामाचं प्रोजेक्ट मिळालं होतं. त्यासोबत आणखीही काही बांधकामे मिळणार होती. किमान वर्षभर तरी काम चालणार होतं. सुहासी नोकरी करत नव्हतीच. वर्षभर स्वतंत्र राहायला मिळणार याचा आनंद दोघांनाही होता. माझ्या बांधकामापासून मैलभरावरच हे घर मिळत होतं. घराचा मालक पुण्याला राहत होता. तो मूळचा या इथलाच. त्याची वडिलोपार्जित जमीन होती. त्यावर त्याने घर बांधले. सरकारी पाहुणे इथे बरेच वेळा मुक्काम ठोकून असत. इथे येण्यापूर्वी मी त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटलो. घर भाड्याने द्यायचे असले तर त्याला घरात लग्न झालेलं जोडपं हवे होते त्यामुळे सौदा झटक्यात ठरला. घर तसं थोडंसं एकाकी होतं पण अगदीच काही जंगलात नव्हतं. नवी वस्ती बनत होती म्हणून आजूबाजूला थोडी मोकळी जागा होती. हाकेच्या अंतरावर इतर घरं होती. मुख्य म्हणजे साईटपासून घर जवळ होतं आणि दिमतीला बाइक होतीच की.

घर अगदी टुमदार होतं. पांढर्‍या शुभ्र भीतींवर लालचुटुक कौले, घराच्या बाहेर थोडंसं अंगण, प्रशस्त ओसरी, आत बैठकीची खोली, दोन बेडरूम्स आणि स्वयंपाकघर. हवेशीर आणि प्रसन्न. आम्हा दोघांना पुरून उरेल असं घर होतं. मुख्य दरवाजा बैठकीच्या खोलीत उघडत होता आणि स्वयंपाकघरातून मागच्या अंगणात जायला दरवाजा होता. अंगणाला पुढून मागून सुरेख लाकडी कुंपण होतं. मागच्या कुंपणाला लहानसं फाटकही होतं; माळावर जाण्यासाठी. मागच्या अंगणामागे विस्तीर्ण पसरलेला माळ होता. मोकळीच मोकळी जागा. कुंपणापासून काही अंतरावर उंचचउंच वाढलेल्या गवताचा लांबलचक पट्टा होता.

'तो माळ वापरात नाही; ओसाड आहे' असं रंगराव म्हणाला होता. रंगराव म्हणजे धरणावरला मुकादम. त्यानेच गावातली ४-५ घरं दाखवली होती मला. त्याला गावची बरीच माहिती होती; काही हवं नको झालं तर मी त्यालाच विचारत असे. 'त्या वाढलेल्या गवतात कधीतरी कोल्ही-कुत्री निघतात. उगीच फिरायच्या निमित्ताने फार आतवर घुसू नका, एखादं जनावर बाहेर येऊन पोटरीचा चावा घ्यायचं.' असं सांगून गेला होता. तशी अडचण काही नव्हती. माळावर फिरण्यासारखं काही नव्हतंच. घरासभोवतीच्या भक्कम लाकडी कुंपणातून कुणी कुत्रं अंगणात घुसण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून मी दुर्लक्ष केलं. माणसाला एखादी गोष्ट हवी असली की तो तिच्याबाबतीत फार खोलवर जात नाही. मला काम सुरू करायचं होतं, सुहासीला इथे आणायचं होतं, घर लावायचं होतं. आता मात्र वाटतं की मी आणखी चौकशी करायला हवी होती.

आम्ही आता या घरात राहायला येऊन आठवडा उलटला होता. घराची लावालावी, थोडंसं प्लंबिंगचं, कुठे थोडंफार डागडुजीचं काम यातच सगळा आठवडा व्यस्त गेला. सुहासीला टापटीप, स्वच्छता यांची भारी आवड. घर तिने मस्त सजवलं होतं. आठवडाभर गावातल्याच खानावळीतून डबा आणत होतो. आता स्वयंपाकघर लागलं होतं. रविवारी आम्ही दोघांनी मस्त आराम केला. बाजारहाट केली आणि मी सुहासीला गावात, नदीवर फिरवूनही आणली. तिचाही मूड मस्त लागला होता.

"बरं झालं नै! वर्षभर सुट्टी साजरी करणार आपण असं वाटतं आहे. " ती उत्साहाने म्हणाली.
"बघ हं! कंटाळशील लवकरच. मग म्हणशील कुठे या आडगावात येऊन पडलो. "
"अगदीच काही आडगाव नाहीये हं! आपण राहतो तिथे वस्ती अद्याप नाही एवढंच. अरे पण तू आहेस ना, पुरा माझ्या ताब्यात. आणखी कोण पाहिजे? " ती खट्याळ हसत म्हणाली.

संध्याकाळी आम्ही बाहेरच जेवलो आणि मनसोक्त गप्पा मारल्या. आमच्या लग्नाला तीन वर्षे उलटली होती पण अद्याप नवलाई गेलेली नव्हती. सुहासीचा शांत, नीटनेटका स्वभाव मला आजही हवाहवासा वाटे.

सोमवारी सकाळी मी साईटवर निघालो तेव्हा सुहासी आंघोळपांघोळ आटोपून स्वयंपाकाच्या तयारीलाही लागली होती.

"ए तू बारा वाजेपर्यंत ये हं जेवायला! उशीर करू नकोस. तुझ्या आवडीचं वांग्याचं भरीत बनवते आहे. " तिचं ते लाडिक बोलणं कानावर पडलं आणि उंबरठ्यातून बाहेर पडणारा पाय थबकला.
"जाऊच नकोस असं म्हण. हा बघ मी इथेच थांबतो की नाही ते. " मी हसून म्हटलं तशी ती तरातरा दारात आली आणि मला वेडावून म्हणाली, "निघ हं आता, नाहीतर रंगराव घरापर्यंत यायचा बोलवायला. "

दुपारी वेळेवर मी निघणारच होतो पण अचानक काही काम निघालं. सिमेंटच्या गोणी येऊन पडल्या त्याच्या पावत्यांवर सह्या हव्या होत्या. मला बाराच्या सुमारास निघताच येईना. घरातला फोन अद्याप सुरू झाला नव्हता. सुहासीला फोन करून सांगावं की 'तू जेवून घे' तर ते शक्य नव्हतं. मी मनातून वैतागलो पण हे काम हातावेगळं केल्याशिवाय निघणं बरं दिसत नव्हतं. दोनच्या सुमारास मी मोकळा झालो तशी धावतच जाऊन बाइक काढली. ऊन मी म्हणत होतं. मी सुसाट बाइक सोडली आणि एकदाचा घरी पोहोचलो. आत जाऊन आता बोलणी ऐकून घ्यायची आहेत अशी मनाची तयारी करून मी दार उघडलं. टळटळीत उन्हातून एकदम आत शिरल्यावर अंधारून आल्यासारखं वाटलं. मी डोळे किलकिले केले. आत सामसूम होती. घरात माणूस असल्याची अजिबात चाहूल लागत नव्हती. 'बाईसाहेब जाम वैतागलेल्या असाव्यात.' मी मनात म्हटलं आणि दबकतच आत गेलो. आधी बेडरूममध्ये डोकावून पाहिलं. न जाणो, खाऊनपिऊन बायकोने मस्त ताणून दिलेली असायची आणि मी आपला उगीच हवालदिल. बेडरूममध्ये सुहासी नव्हती. आता राहिलं स्वयंपाकघर. मी स्वयंपाकघरात घुसलो.

स्वयंपाकघरातली खिडकी उघडी होती आणि खिडकीपाशी सुहासी स्तब्ध उभी होती. अगदी पुतळ्यासारखी. मी मागे उभा आहे याची किंचितही जाणीव तिला झाली नव्हती. कुतूहलाने ती खिडकीबाहेर बघत होती. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्याने तिच्या बटा तेवढ्या हलत होत्या. फार सुरेख दिसत होती सुहासी. तिच्याकडे पाहिलं की मला नेहमी समाधान वाटे. सरळ नाक, नाजूक जिवणी, पाणीदार डोळे. खांद्यावर रुळणारे स्टाइलिश कापलेले केस आणि नजरेत भरणारा बांधा. या सर्वांत सुहासीचे डोळे मला फार आवडत. लहान मुलांसारखे टपोरे आणि निरागस. तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच डोळ्यांत माझा जीव गुंतला होता.

"सुहासी", मी तिच्या खांद्यावर हात टाकला तशी ती मागे वळली.
"अरेच्चा! तू कधी आलास? " ती साफ गोंधळली होती. "चल जेवायला बसूया. " असे म्हणून तिने खिडकी बंद केली आणि ताटे काढली. जेवणाची वेळ टळून गेली आहे, दुपारचे दोन वाजून गेले आहेत याचा मागमूसही तिच्या तोंडावर नव्हता. शेवटी मीच म्हणालो.
"सॉरी, अगं वेळेवर येताच आलं नाही. बराच उशीर झाला. "
"उशीर झाला? " सुहासी आश्चर्याने पुटपुटली आणि तिने घड्याळाकडे नजर टाकली. "अय्या! दोन वाजून गेले. मला कळलंच नाही वेळ कुठे गेला ते. " ती चकीत झाली होती.
"का गं? असं काय करत होतीस की तुला वेळेचं भान राहिलं नाही? "

"काही नाही रे. स्वयंपाक, साफसफाई आटोपून तुझी वाट बघत बसले होते. वेळ जाईना म्हणून या खिडकीतून सहजच बाहेर बघत होते. ते मागच्या माळावरचं गवत वाऱ्यावर संथ डुलत होतं. एका लयीत. एका नादात. त्याच्या त्या हिरव्यागार रंगात सूर्याचे सोनेरी रंग मिसळले होते आणि वार्‍याने होणारी पात्यांची सळसळ ना अरे इथपर्यंत, अगदी घरात ऐकू येत होती. सर्व भानच विसरूनच गेले मी त्याच्याकडे बघताना. " ती भारावल्यासारखी बोलत होती. तिच्या आवाजातला तो बदल मला जाणवला होता खरा पण त्यावेळेस खटकला का नाही ते कळत नाही. खटकला असता तर आज ही पाळी आमच्यावर आली नसती.

"अगं, शहरातल्या माणसांना हा असा निसर्ग कुठे बघायला मिळतो? लक्की यू! मला तर इथे येऊनही मिळत नाहीये. तेच सिमेंट, रेती, कॉंक्रिट बघतो मी दिवसभर." मी हसून म्हटलं आणि भरभर जेवायला सुरुवात केली. मला साईटवर परतायचं होतं.

त्यानंतर अनेकदा मी दुपारचा जेवायला घरी यायचो तेव्हा सुहासीला स्वयंपाकघराच्या खिडकीत, नाहीतर दारात उभी पाहायचो. ती टक लावून त्या गवताकडे बघत असायची. कित्येकदा मी तिच्या बाजूला जाऊन उभा राहिलो तेव्हा जाणवलं होतं की तिच्या डोळ्यांची पापणीही हलत नसे. असं काय आहे त्या गवतात हा प्रश्न मला पडत असे मात्र मी खोलात जायचं मनावर घेतलं नाही. का केलं मी असं? ...बेफिकीर होतो मी. संकटं वगैरे आपल्या चार हात लांबून निघून जातील या गैरसमजूतीत जगत होतो.

संध्याकाळी माझ्या घरी पोहोचण्याच्या वेळेवर घरकाम करायला पद्मा आलेली असे. आमच्या साईटवरच्या हणम्याची बायको. संध्याकाळी सुहासी काम आटोपत तिच्या मागेमागेच असे. निदान त्यावेळी तरी ती त्या गवतात रमलेली नाही याचं मला बरं वाटे.

असाच एके दिवशी संध्याकाळी मला साईटवरून यायला थोडा उशीर झाला. घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. मी अंगणात बाइक लावली. घरात मिट्ट काळोख होता. 'कुठे गेली असेल सुहासी यावेळेस?' असा विचार करतच मी घराचा दरवाजा उघडला आणि आतला दिवा लावला. प्रकाशाने संपूर्ण खोली उजळून निघाली. माझी पावलं तडक स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. माझ्या अपेक्षेप्रमाणेच स्वयंपाकघरातल्या काळोखात सुहासी खिडकीसमोर उभी होती. तशीच; दुपारी उभी असे अगदी तश्शीच. स्तब्ध. पुतळ्यासारखी. आजूबाजूच्या जगाला विसरून गेलेली. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचा चेहरा मी निरखत होतो. कोड्यात पडलेला. कुतूहलाने खिडकीबाहेर माळाकडे पाहणारा. मी घाईने लाइट लावला तशी ती एकदम दचकली. "तू कधी आलास? "

"काय बघतेस सुहासी? " दुपारी मी जेवून साईटवर परतायच्या घाईत असे पण आज या प्रश्नाचा छडा लावायला बरी वेळ सापडली होती.
"काही नाही रे. ते गवत चंद्रप्रकाशात इतकं सुरेख दिसत होतं की नजरच निघत नव्हती. बघत राहावसं वाटतं त्या गवताकडे. त्या गवताचे आणि माझे जणू काही ऋणानुबंध आहेत. मी ना एकदा त्या गवतापलीकडे जाऊन बघणार आहे. " ती झोपेत बोलणार्‍या माणसाप्रमाणे बोलत होती.

मी तिच्याकडे निरखून पाहिले. गेले काही दिवस सुहासीत काहीतरी बदल होतोय अशी शंका मला येऊ लागली होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती. थोडीशी खंगल्यासारखीही वाटत होती.

"तुला रंगरावने काय सांगितलं माहित आहे ना. तिथे उगीच रानटी कुत्री वगैरे असायची. नको ते स्टंट करू नकोस. उगीच अंगाशी नको यायला. हे गाव अजूनही आपल्याला अपरिचित आहे." मी तिला खडसावलंच.

"अरे, आपण इतके दिवस इथे राहतो. तू कधी कुठल्या कुत्र्याचं भुंकणं ऐकलं आहेस का? मी तर दिवसभर घरात असते. या खिडकीशी उभी असते. गवताची सळसळही मला ऐकू येते पण कधी त्या माळरानावर कुत्र्यांना पाहिलेलं नाही की त्यांचं भुंकणं ऐकलेलं नाही. "

"हे बघ! तुला माझं ऐकायचं नसेल तर तसं सांग. तुझ्याकडे मोबाईलही नाही. त्या माळावर जाऊन कुठे तरी हरवू नकोस म्हणजे झालं. " मी तिला थोड्या तुसडेपणाने म्हटले तशी ती हिरमुसली झाली. जेवून झोपायला जाईपर्यंत ती माझ्याशी फारशी बोलली नाही.

रात्री सुहासी माझ्याकडे पाठ करूनच झोपली होती. मला वाईट वाटलं. इथे परक्या गावात आम्ही दोघेच एकमेकांचे सोबती आणि आता उगीच आमच्यातला संवाद बंद झाला. मी तिला जवळ ओढली आणि म्हणालो, "येत्या रविवारी जाऊ आपण त्या माळरानाच्या दिशेने. चक्कर मारून येऊ. एक दांडुका घेऊन जाऊ बरोबर. आलंच कुत्रं तर घालू पेकाटात. " सुहासी खुदकन हसली. "हो हो नक्की जाऊ. " असं म्हणून मला आणखीनच खेटली.

दुसर्‍या दिवशी दुपारी जेवायला मी घरी आलो तर घरात पुन्हा सामसूम होती. आपोआप माझी पावलं स्वयंपाकघराकडे वळली. खिडकीपाशी दररोज उभी असणारी सुहासी आता मला सरावाची झाली होती. त्याच अपेक्षेने मी स्वयंपाकघरात पाय टाकला पण त्या दिवशी स्वयंपाकघर मोकळं होतं. मी बेडरूमकडे गेलो; तिथेही कुणी नव्हते मग दुसर्‍या बेडरूमकडे. नाही, सुहासीचा पत्ता नव्हता. ती घरात नव्हतीच.

मला कळेना ही यावेळेस कुठे गेली असावी? मी पुन्हा स्वयंपाकघराकडे वळलो. स्वयंपाकघराचा दरवाजा ओढून घेतलेला होता पण खिडकी उघडी होती. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. मागल्या कुंपणाचे फाटक उघडे होते. त्या बाहेर विस्तीर्ण माळ पसरला होता. माळरानावरचं उंचच उंच वाढलेलं गवत वाऱ्यावर फेर धरून डोलत होतं. संथ; एका लयीत. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात हिरवीगार पाती चमचमत होती. मी स्तब्ध झालो. डोळ्यांच्या कक्षेत फक्त डोलणारं, संथ हेलकावे खाणारं गवत मावत होतं. त्याची ती मंद सळसळ कानावर पडत होती. अचानक माळरान रुंदावल्यासारखं भासलं. गवतही आणखीच उंच होत होतं. माळरान आता हळूहळू माझ्याजवळ सरकत होतं. जवळ येत होतं. त्याचा विस्तार पूर्वीपेक्षा वाढल्यासारखा वाटत होता. चकीत करणारे क्षण होते ते. मी आणि माळावरचं गवत सोडून आसमंतात दुसरं काहीच नाही असा विचार मनाला चाटून गेला. माझे डोळे त्या दृश्यावर खिळून होते... तिथे जायला हवं एक दिवस. त्या गवतात... ते गवत बोलवत होतं. एवढ्यात गवतात काहीतरी हललं आणि डोलणारं गवत एकदम स्तब्ध झाल्यासारखं वाटलं. माळाचा आकारही पूर्ववत झाला. माझी तंद्री मोडली.

त्या गवतातून सुहासी धडपडत बाहेर पडत होती. विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे, घामाघूम शरीर; सुहासीचा हा अवतार बघून मी थक्क झालो.

मी तिला पाहून चटकन मागचं दार उघडलं आणि बाहेर गेलो. ती कुंपण बंद करून आत येत होती. तिला दम लागला होता आणि चेहर्‍यावर भीतीचे सावट दिसत होतं.

"सुहासी? काय झालं? " काळजीने मी तिला विचारलं. ती धापा टाकत होती. तिच्या कुडत्यावर, सलवारवर केसांवर गवताचे तण चिकटले होते. पायांना चिखल लागला होता. काहीही न बोलता ती तरातरा घरात शिरली. मी तिच्यामागून घरात शिरलो तेव्हा दुपारचे तीनचे ठोके पडत होते. मी जेवायला घरी आल्यापासून इतका वेळ गेला होता याची जाणीव मला आत्ता होत होती. काहीतरी होतं त्या माळरानावर जे आधी सुहासीला खिळवून ठेवत होतं आणि आज मलाही त्याची प्रचिती आली होती. तो माळ संमोहन टाकत होता, आम्हाला खेचून घेत होता. मी घाईने खिडकी आणि दरवाजा बंद केले.

"सुहासी, काय झालं? "
"काही नाही. आज राहावलं नाही म्हणून मी त्या गवतात घुसले आणि रस्ता चुकले. उंच आहे ते गवत भारी. इथून जाणवत नाही पण खरंच खूप उंच आहे. परत कसं यावं तेच कळेना. वाटच मिळेना. पुढल्या वेळेस काहीतरी खुणा घेऊन गेलं पाहिजे. " ती आता शांत दिसत होती. शांतपणे बोलत होती. मगाशी तिच्या डोळ्यांतली भीती नाहीशी झाली होती. जसं काही घडलंच नव्हतं. मी मात्र धास्तावलो होतो.

"हे बघ, तिथे पुन्हा जायची अजिबात गरज नाही. पुन्हा या खिडकीतही उभी राहू नकोस. तुझ्या डोक्यातले माळाचे विचार आधी काढून टाक. हा वेडेपणा पुरे झाला." मी आवाज चढवून म्हणालो. त्या खिडकीतून पाहिल्यावर मला जे जाणवलं होतं ते तिला सांगावं की नको असा विचार मनात आला. न जाणो जे मला भासलं होतं ते तिला भासत नसलं तर ती उगीच मला वेड्यात काढायची असा विचार करून मी गप्प बसलो पण या माळरानाबद्दल खोलात चौकशी करणं गरजेचं होतं. डोळ्यांसमोर रंगराव आला.

मी साईटवर पुन्हा परतलो तर रंगराव गायब होता. कामावरल्या दोघांकडून कळलं की त्याच्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना भेटायला तो गावी गेला होता. दोन दिवसांनी परत येणार होता. पुलाचा प्लॅन घेऊन असिस्टंट इंजिनिअर येताना दिसला आणि मीही कामाच्या धांदलीत माळरानाची गोष्ट विसरून गेलो.

त्यानंतर गेले दोन दिवस मी घरी आलो तर सुहासी घरीच दिसली. ती नेहमीप्रमाणे खिडकीतही उभी नव्हती. मला मनात कुठेतरी खूप बरं वाटलं आणि तेवढीच काळजीही वाटत होती. का कुणास ठाऊक? सुहासी बदलली होती. तिचा चेहरा उतरलेला दिसे. बोलण्यात-वागण्यात उत्साह नव्हता. काहीतरी विचार करत एकटीच बसलेली असे. केस विंचरलेले नसत. कपडे टापटीप नसत. मी तिला कितींदा विचारलं की कसला विचार करतेस? पण ती उत्तर टाळत होती. 'रविवारी जायचं का माळावर आपण?' असं मी तिला मुद्दाम खोचकपणे विचारून पाहिलं पण तिने नकारार्थी मान हलवून वेळ मारून नेली. मला मनात बरंच वाटलं. निदान ते माळरानाचं भूत तिच्या मानगुटीवरून उतरलं हेच खूप होतं.

दोन दिवसांनंतरची गोष्ट. मध्यरात्र उलटून गेली असावी. कसलंतरी भयंकर स्वप्न पडलं होतं. मी दचकून जागा झालो तेव्हा सुहासी माझ्या बाजूला नव्हती. ती पाणी प्यायला उठली असेल किंवा बाथरूमला गेली असेल या विचाराने मी गादीवरून उठलो नाही पण पुन्हा डोळा लागत नव्हता. थोडा वेळ गेला, सुहासीची चाहूल लागली नाही. मला अस्वस्थ वाटू लागलं; मी उठलो आणि स्वयंपाकघरात गेलो. घराचा मागचा दरवाजा आणि कुंपणाचं फाटक दोन्ही सताड उघडे होते.

रात्रीच्या अंधारात माळ निळसर-करडा दिसत होता. आकाशात चंद्रावर ढगांनी गर्दी जमा केली होती. ढगांच्या आडून कुठेतरी चांदणी उगीच लुकलुकत होती. मी डोळे फाडून माळाकडे बघत होतो पण काहीच दिसत नव्हतं. काय करावं काही सुचेना. सुहासी पुन्हा त्या गवतात तर गेली नसेल... काय करायचं? रात्रीच्या वेळी असं माळावर... तिथे ती भटकी कुत्री असली तर? मला कुत्र्यांची भीती वाटते पण माझी बायको तिथे गेली आहे... एकटीच. विचार डोक्यात मावेनासे झाले होते. माझे पाय आपोआप माळाच्या दिशेने पडू लागले. मी दरवाजा ओलांडून मागच्या अंगणात पोहोचलो असेन नसेन तोच गवतात काहीतरी हललं. गवतातून सुहासी वाकून बाहेर पडत होती. मी धावत कुंपणापाशी गेलो. तिला दम लागला होता, श्वासही फुलला होता. अंगाला गवत चिकटलं होतं. मी तिचा हात पकडला आणि तिला खेचून घरात आणली. क्षणभर, तिच्या नजरेला माझी ओळख पटत नसावी असं मला वाटून गेलं. ही तिथे कुणाला भेटायला तर जात नसावी? कुणी प्रियकर तर नसावा? असा चुकार विचार माझ्या मनात आला आणि मलाच स्वतःची लाज वाटली. सुहासी अशी नाही. खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर. तिचं काहीतरी बिनसलं आहे, तिचं चित्त थार्‍यवर नाही आणि ती त्या गवतात गेली असावी हे कळल्यावरही मी तिचा नवरा असून तिला शोधायला तिच्यामागे गेलो नाही. मला अपराधी वाटलं.

"सुहासी. रात्री उठून तू तिथे गेली होतीस? बरं आहे ना तुला? अंधारात कुठे घुसलीस माळावर? तोंडचं पाणी पळवलंस माझ्या. खबरदार पुन्हा तिथे गेलीस तर. तिथे काहीतरी विचित्र आहे. त्या गवताच्या आसपासही फिरकू नकोस. " मी तिच्या अंगावर ओरडत होतो.
"हो, तिथे काहीतरी आहे. " ती भारावल्यागत बोलत होती.
"काय आहे? तुला काही दिसलं आहे का? " मी तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेऊन विचारलं तसं तिने नकारार्थी मान हलवली आणि हात सोडवून घेतले.
"आई गं! सुहासी तुझी नखं किती वाढली आहेत. " हात सोडवताना सुहासीच्या नखाने माझ्या हातावर भलामोठा ओरखडा उमटवला होता. "काप ती. लागलं मला. "

"उद्या सकाळी कापेन हं! " शांत आवाजात म्हणाली आणि मला एकट्याला तिथे सोडून काहीच न घडल्यासारखी बेडरूममध्ये झोपायला गेली. या प्रकरणावर आता वेळ काढून उपयोगाचे नव्हते. लवकरात लवकर या माळरानाचे रहस्य माहित करून घ्यायला हवं. मी सुहासीच्या मागोमाग बेडरूममध्ये गेलो. ती आपले पाय जवळ घेऊन झोपली होती. मला थोडंसं विचित्र वाटलं पण मी तिच्या अंगावर चादर घातली आणि झोपी गेलो.

दोन दिवसांचं सांगून रंगराव गेला होता तो ४-५ दिवस झाले तरी परतला नव्हता. त्याच्या भरवशावर राहणे उपयोगाचे नव्हते. मी धरणावर गेल्यागेल्या कामाला येणार्‍या काहीजणांकडे चौकशी करायला सुरुवात केली. पण त्यातून विशेष काही कळलं नाही. तशीही पोटापाण्यासाठी बांधकामावर आलेली माणसं होती ती. त्यांना कामधाम, पोट आणि पोरंबाळं यातून उसंतच नव्हती. एकंदरीत या विषयाविषयी औदासीन्य होतं. गावात माझ्या कोणाशी फारशा घनिष्ठ ओळखीही नव्हत्या. हणम्या गावातला होता त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यातल्या त्यात जास्त माहिती कळली. त्याच्या बोलण्यातून कळलं की दीड-दोन वर्षांपूर्वी गावात बरीच बेवारशी कुत्री झाली होती. या कुत्र्यांची पिडा टाळण्यासाठी काही टारगट पोरांनी कुत्र्यांना पकडून, गोणात घालून या माळावर आणून, त्यांच्या शेपटीला फटाके बांधून त्यांना माळाच्या दिशेने गवतात सोडून देण्याचा चंग बांधला होता. हे असं महिनाभर तरी चाललं होतं. त्यानंतर गावातली बेवारशी कुत्री बरीच कमी झाली. गावकर्‍यांनी सुटकेचे निःश्वासच सोडले.

सुमारे ६ महिन्यांपूर्वी सावत्याचा मुलगा; तो ही याच टारगट पोरांतला. एके दिवशी बापाशी कडाक्याचं भांडण केलं आणि बापाने घराबाहेर काढला. रागारागात शिव्या घालत त्याला काही लोकांनी माळावर जाताना पाहिलं. कोणी म्हणतं तो घरातून चोरी करून बापाला तुरी देऊन पळाला. कोणी म्हणतं त्याला शहरात पाहिला तर कोणी म्हणतं तो त्या गवतात खपला. गायब झाला. पोरगा काही पुन्हा घरी परतला नाही. त्याचं काय झालं त्याची काळजी खुद्द सावत्यालाही नव्हती आणि हे सर्व सांगताना हणम्याच्या आवाजातही कसली काळजी नव्हती. मी विचारतो आहे म्हणून तो सांगत होता झालं. माझं मन मात्र शंकेने ग्रासलं होतं. हणम्या सांगतो तेवढाच इतिहास या माळरानाला नसावा. सुहासीला या माळरानाच्या वेडापासून दूर करणं अतिशय गरजेचं होतं.

मी संध्याकाळी घरी परतलो तेव्हा ऊनं उतरत आली होती. आज घरी गेल्यावर सुहासीला समजवून सांगायचं, तिला थांबवायचं, या वेडापासून परावृत्त करायचं अशी खूणगाठ मनाशी बांधूनच घरात शिरलो. नेहमीप्रमाणे घरात सामसूम होती.
मी थेट स्वयंपाकघरापाशी गेलो. मागचा दरवाजा उघडा होता आणि कुंपणाचं फाटकही. मी समजायचं ते समजलो आणि मागचा पुढचा जराही विचार न करता सरळ फाटकातून बाहेर पडून समोरच्या गवतात घुसलो. गवत दाट होतं. मी जसजसा पुढे जात होतो तस तसं ते अधिकच दाट आणि उंच होत होतं. त्यातून वाट काढत जाणं जिकिरीचं होतं. मी कुठल्या दिशेने जातो आहे तेच मला कळत नव्हतं. गवत आता पुरुषभर उंचीचं तरी होती. मी सुहासीला हाका मारायला लागलो पण त्या गवतात त्या हाका विरून गेल्यासारख्या वाटत होत्या.

अचानक गवताची सळसळ सुरू झाली. जणूकाही त्या गवताला मी आल्याची जाणीव झाली होती. माझी छाती धडधडत होती पण तरीही मी वेड्यासारखा सुहासीला शोधत होतो. दिशेचं भान मला राहिलं नव्हतं. गवत तर इतकं उंच, इतकं दाट झालं होतं की त्यातून सूर्यप्रकाशही शिरणं कठीण होत होतं. मला त्या गवतात गुदमरल्यासारखं होऊ लागलं.

"सुहाऽऽऽसी” मी जिवाच्या आकांताने ओरडायचा प्रयत्न केला पण माझा आवाज आतच विरला. त्या दाट गवतात मी घुसमटत होतो. मागे काहीतरी सर्रकन आवाज झाला. कुठला तरी प्राणी आसपास असावा. मी मागे वळून पाहिलं तर कुणीच नव्हतं. "सुहाऽसी" मी आणखी एकदा आवाज दिला आणि पुढे सरकलो.

कुणीतरी माझ्यामागून दबकत, खुरडत येतं आहे अशी जाणीव मला व्हायला लागली. मी वळून वळूनबघत होतो पण आजूबाजूला गवतच गवत दिसत होतं. माझ्या मनात अभद्र विचार येऊ लागले. णा कुत्र्याकोल्ह्यांनी माझ्या सुहासीचं काही केलं तर नसेल. किती नाजूक आहे ती. तिच्या त्या सुरेख शरीराचे त्या कुत्र्यांनी चावे, तिचे लचके... त्या विचारांनीसुद्धा अंगावर शहारा आला. माझ्या मागच्या खुरडण्याचा आवाज अगदी जवळ आला होता. मागे वळून पाहायची माझी हिंमतही झाली नाही. मी वेगाने वाट मिळेल तिथे धावू लागलो. किती वेळ मी त्या माळावर भरकटत होतो देव जाणे पण अचानक गवत विरळ झाल्यासारखं भासलं. गवताच्या पात्यांतून मला घराचं कुंपण दिसलं आणि मी हायसं वाटून श्वास घेण्यासाठी क्षणभर थांबलो. मागचा आवाज पुन्हा एकदा जवळ आला होता. मी धीराने मागे वळून पाहिलं – बाहेर अंधारून आलं होतं पण चंद्राच्या प्रकाशात सर्व स्पष्ट दिसत होतं. त्या गवतात सुहासी एखाद्या भुकेजल्या श्वापदासारखी हातापायांवर दबा धरून बसली होती. तिच्या हाताचे पंजे जनावरासारखे जमिनीत रुतले होते. छाती धपापत होती. माझ्याकडे बघून ती दात विचकत होती. तिच्या तोंडातून जीभ बाहेर आली होती आणि त्यातून लाळ गळत होती. तिचे विस्कटलेले केस चेहर्‍यावर चिकटले होते. त्यातून तिचे ते चमकदार हिंस्र डोळे चकाकत होते. त्यांत मनुष्यासारखी कोणतीही जाणीव नव्हती की तिला माझी ओळख आहे असं दिसत नव्हतं. क्षणभर माझ्या मनात किळस दाटून आली आणि तोंडातून अस्फुट किंकाळी फुटली. ती सावध श्वापदासारखी माझ्यावर गुरगुरली आणि पुढल्या क्षणाला मी घराच्या दिशेने धाव घेतली. कुंपण पार करून मी फाटक लावून घेतलं आणि तिथेच थोडावेळ रेंगाळलो. सुहासी गवताबाहेर आली नाही. गवतात खसफस आवाज येत होता. सुहासी माघारी फिरली होती.

माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं. मी खिसा चापापला. बाइकची चावी खिशातच होती. मी थेट पुढल्या अंगणात आलो, बाइक काढली आणि पोलिस स्टेशन गाठलं.

“साहेब नाहीयेत. तालुक्याच्या गावाला गेल्येत. उद्या येणार. काय कंप्लेंट आहे? ” हवालदाराने डोकं वर करायची तसदीही घेतली नाही.
“मी पुलाच्या साईटवर चीफ इंजिनिअर आहे. माझी बायको आज संध्याकाळपासून बेपत्ता आहे. मी दुपारी जेवायला घरी आलो तेव्हा ती होती पण संध्याकाळी घरी आलो तर ती नव्हती. तिचा पत्ता नाही. ” मी चक्क खोटं बोलत होतो.
हवालदाराने माझ्याकडे रोखून पाहिलं. “नाव काय तुमचं? बायकोशी भांडण झालं होतं का? कुठे गावात गेली असेल. आताशी ९ वाजतायत रात्रीचे. थोडावेळ वाट बघा. कुठे गेली असेल तर येईल परत.” काय घाबरट माणूस आहे असे भाव त्या हवालदाराच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

"नाही हो. आमची गावात फारशी ओळख नाही. ती कुठे जाणार नाही. " त्या माळरानाचा प्रकार हवालदाराच्या कानावर घालावा की न घालावा तेच मला कळत नव्हते. "तुम्ही आमच्या घराच्या आजूबाजूचा भाग शोधून बघा प्लीज. "

"ते आता शक्य नाही. साहेब आणि बरोबर दोन हवालदार एका केसच्या कामानिमित्त शहरात गेले आहेत. ते उद्या पहाटे परततील. आम्ही इथे दोघेच आहोत आज. उद्या सकाळी बघू. आता तुम्ही कंप्लेंट लिहा आणि घरी जा. आम्ही उद्या सकाळी हजर होतो." मी बरीच गयावया केली पण हवालदार काही बधला नाही.

मी घरी परतलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते. सुहासीशिवाय घर खायला उठत होतं. मी पलंगावर जाऊन कोसळलो. डोळे भरून आले होते. डोके भणभणत होते. ती मागे त्या गवतात एकटी... मी तिचा नवरा होतो. तिची साथ देण्याची शपथ घेतली होती पण तिला एकटीला तिथे सोडून आलो होतो. तिचं ते अमानवी, अभद्र रूप सारखं डोळ्यासमोर येत होतं. काय झालं होतं तिला? काय होतं त्या माळरानावर?... एखादी पाशवी शक्ती की एक वेगळं जग? मला जे दिसलं तसं काही तिलाही दिसलं होतं का? की आमच्या जाणीवा वेगळ्या होत्या? तिला तिथे काही वेगळं दिसलं होतं तर ती बोलली का नाही? विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. मी इतका थकललो होतो की माझा डोळा कधी लागला तेच कळलं नाही.


सकाळी कुणीतरी दरवाजा ठोठावत होतं. मी खडबडून जागा झालो. घड्याळात पाहिलं. सकाळचे साडेआठ वाजले होते. मी इतका वेळ कसा झोपलो? सुहासीशिवाय... ती रात्रभर त्या गवतात... मला लाज वाटली. पुन्हा कुणीतरी दरवाजा ठोठावला तसा मी भानावर आलो.

बाहेर इन्स्पेक्टर आणि पोलीस पार्टी उभी होती. इन्स्पेक्टरने सुहासीची चौकशी केली आणि पुन्हा नव्याने सर्व सवाल जवाब केले. मी त्यांना सुहासी मागच्या गवतात हरवली असेल, माळावर रस्ता चुकली असेल अशी शंका बोलून दाखवली. इन्स्पेक्टरना त्यावर फारसा विश्वास वाटला नाही पण ते स्वत: पोलीसपार्टीसह माळावर गेले. माझा जीव घशाशी गोळा झाला होता. काय मिळेल त्यांना तिथे? पशुवत सुहासी की माझी सुहासी... ती जिवंत तरी असेल का? तासाभराने पोलिस पार्टी हात हलवत घरात परतली. त्यांनी सर्व घर उलथेपालथे केले. वासकावासकी करतानाच इन्स्पेक्टरने माझ्यावर प्रश्नांची पुन्हा सरबत्ती केली. मला कळून चुकलं होतं की पोलिसांचा संशय माझ्यावरच आहे. उत्तरे देताना मी गोंधळलो होतो, गांगरून गेलो होतो. जे सत्य होतं, जे मी अनुभवलं होतं आणि स्वत:च्या डोळ्यांनी मी जे पाहिले होतं ते त्यांना सांगू शकत नव्हतो; त्यांनी मला वेड्यात काढला असता. बराच वेळ चौकशी करून आणि बाहेर एक हवालदार उभा करून पोलिस पार्टी परत गेली. ते लवकरच परततील याची मला खात्री होती... माझे अटक वॉरंट घेऊन पोलिस पुन्हा दारात हजर होणार होते. मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्या हातात काहीही पुरावे नव्हते.

मी पुरता खचलो होतो. सुहासी गेली. माझं काय होणार? अब्रूचे धिंडवडे निघणार. अटक टळणार नाही. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. सुहासीच्या आईवडीलांना काय सांगायचं? माझ्या आईवडीलांना काय सांगायचं? तिचं ते माळावरचं अमानवी रूप राहून राहून डोळ्यासमोर येत होतं. मी त्या स्थितीत तिला एकटीला टाकून आलो.... मी अस्वस्थपणे येरझारा घालत होतो. दोन मिनिटं सोफ्यावर विसावलो तेव्हा माझं लक्ष अचानक माझ्या हातांकडे गेलं. माझी व्यवस्थित कापलेली नखं एकदम अचानक वाढलेली दिसत होती. अणकुचीदार.. एखाद्या श्वापदासारखी. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. समोर मार्ग दिसू लागला.

मी तडक स्वयंपाकघरात गेलो आणि मागची खिडकी उघडली. बाहेर कुंपणा पलीकडे गवत वार्‍यावर फेर धरून डोलत होतं. संथ, एका लयीत. एका नादात. मी स्तब्ध होऊन त्या गवताकडे बघत होतो. हळूहळू माळरानाचा आकार मोठा होऊ लागला, गवत आता डोळ्यांत मावत नव्हतं. त्याची सळसळ मला खुणावत होती. जवळ बोलावत होती. मनाला खूप बरं वाटलं...मी मागचा दरवाजा उघडला आणि माळाकडे धाव घेतली.

समाप्त

marathi blogs