प्रकार

Tuesday, October 30, 2007

भयोत्सव

ऑक्टोबरच्या महिन्यापासूनच अमेरिकेत एकेका सणाला सुरुवात होते. ऑक्टोबरमध्ये हॅलोवीन, नोव्हेंबरमध्ये थॅंक्स गिव्हिंग आणि डिसेंबरमध्ये ख्रिसमस. भयकथांच्या विलक्षण आवडीमुळे हॅलोवीनबद्दल फार पूर्वी पासूनच वाचले, ऐकले होते. त्यावेळी असा कसा हा सण? यामुळे समाजात आणि विशेषत: लहान मुलांत भीती वाढत असावी की काय असे वाटत असे, परंतु अमेरिकेला आल्यावर या विचारांतला फोलपणा कळून आला. घाबरण्याचा आणि घाबरवण्याचा हा सण अतिशय लोकप्रिय असल्याचे अनुभवास आले. लहान थोरांना आवडणाऱ्या आणि या महिन्यात येणाऱ्या हॅलोवीनच्या सणाचे औचित्य साधून हा लेख उपक्रमावर देत आहे.

हॅलोवीनचा इतिहास: हॅलोवीनची पाळेमुळे प्राचीन ब्रिटन व आयर्लंड मधील केल्टिक संस्कृतीत सापडतात. नोव्हेंबरची पहिली तारीख हा नूतन वर्षारंभाचा दिवस मानला जाई. तसेच, तो त्या काळी उन्हाळ्याचा शेवटचा दिवस मानला जाई. त्यानुसार या दिवसापर्यंत पशुपालन व शेतीची बरीचशी कामे उरकली जात. या दिवसानंतर काळोखी आणि गारठवून टाकणार्‍या थंडीचा ऋतू सुरु होई. नेमकी हीच वेळ गेल्या वर्षभरात जे कोणी मरण पावले त्यांचे मृतात्मे घरी परतण्याची समजली जाई.

आख्यायिकेनुसार मृतात्म्यांना या दिवशी नवी शरीरे शोधायची संधी मिळत असे, त्यामुळे ते सर्व शरीरांच्या शोधात गावांत येत. हा दिवस वर्षातला असा दिवस मानला जाई (जातो) ज्यादिवशी आत्मे आपले जग सोडून मर्त्य मानवाच्या जगात सहज प्रवेश करू शकत (शकतात).

या दिवशी मृतात्म्यांनी आपल्या शरीराचा ताबा घेऊ नये म्हणून त्यांना भिवविण्यासाठी गावकरी गावाजवळील टेकड्यांवर किंवा घराबाहेर मोठा जाळ करत. जनावरांचा बळीही त्याठीकाणी दिला जाई. याचबरोबर ते भयानक मुखवटे व भीतिदायक वेष धारण करत; यामुळे नव्या शरीरांच्या शोधात येणाऱ्या मृतात्म्यांना खरी माणसे कोण व मृतात्मे कोण हे समजणे कठीण होईल अशी गावकऱ्यांची धारणा असे. इसवी सनानंतर पहिल्या शतकात रोमन साम्राज्याने ब्रिटन आणि आयर्लंडवर आपले वर्चस्व प्रस्थापित केल्यावर "पोमोना" या फळा-झाडांच्या रोमन देवतेची पूजा करण्याचा सणही याच दिवशी साजरा होऊ लागला. ऍपल बॉबिंग (एका मोठ्या बादलीतील किंवा हौदातील पाण्यात सफरचंदे सोडून, ती हात मागे बांधून तोंडाने पकडणे) हा हॅलोवीनचा प्रसिद्ध खेळ पोमोनाला समर्पित आहे. यानंतर सुमारे सातव्या शतकात १ नोव्हेंबर हा संतांचा दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. या दिवशी चर्चकडून संतपद मिळालेल्या किंवा न मिळालेल्या सर्व संतांचे स्मरण केले जाते, यालाच ऑल हॉलोज डे किंवा होली डे किंवा होलीमस (holy day = 'पवित्र दिवस') मानले जाऊ लागले व या दिवसाची पूर्वसंध्या हॅलोवीन म्हणून साजरी केली जाऊ लागली.

DSC00560
पोहोण्याच्या तलावात सफरचंदे पकडणारी मुलेआर्यलंडमधून विस्थापित होऊन अमेरिकेत स्थिरावलेल्या आयरिश लोकांनी हॅलोवीनचा सण अमेरिकेत आणला. हॅलोवीनचा सण प्रामुख्याने अमेरिकेची संयुक्त संस्थाने, कॅनडा, पोर्टो रिको (प्वेर्तो रिको), आयर्लंड व ब्रिटन मध्ये साजरा केला जातो. अमेरिकेत १९व्या शतकात या सणाने मूळ धरल्याचे उल्लेख वाचायला मिळतात.

हॅलोवीनच्या सणाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जॅक-ओ'-लॅन्टर्न नावाचा भला मोठा भोपळा कोरून केलेला कंदील. अमेरिकेत भोपळ्याचे पीक चांगले घेता येते आणि हॅलोवीनच्या हंगामात ते तयारही होते. भोपळ्याला मानवी डोक्याचा आकार देऊन त्यावर डोळे, नाक, तोंड कोरणे दिसतेही भीतीदायक. ३१ तारखेपर्यंत या भोपळ्यांवर मुखवटे कोरले जातात. रात्री या भोपळ्यांत मेणबत्ती पेटवली जाते. दिवाळीत आपल्याकडे जसा कंदील बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्यापाशी लावला जातो तसाच हा जॅक-ओ'-लॅन्टर्न प्रज्वलित करून बाल्कनीत किंवा मुख्य दरवाज्यापाशी ठेवला जातो. या जॅक-ओ'-लॅन्टर्नची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे.

कथा जॅक-ओ'-लॅन्टर्नची: या कथेची विविध रूपे आहेत, तरी बऱ्याच कथांतील एक कथा उचलून येथे थोडक्यात देत आहे.

जॅक नावाच्या एका अत्यंत हुशार परंतु तितक्याच आळशी आयरिश इसमाने आयुष्यभर काहीही केले नाही. त्याने कधी कुठले चांगले काम केले नाही की कधी कुठले वाईट काम केले नाही. त्याच्या मृत्यूची वेळ जशी जवळ आली तसे त्याला आणायला सैतान आला, परंतु आपल्या हुशारीने त्याने सैतानाला चकवून आपले आयुष्य वाढवून घेतले. असे दोन-तीन वेळा झाल्याने सैतान त्याच्यावर रुष्ट झाला व तुला आणायला परत येणार नाही असे वैतागून सांगून निघून गेला.


जॅक’ओ लॅन्टर्न


तरीही एके दिवशी अचानक नकळतच जॅकला मृत्यू आला व आपण स्वर्गाच्या मोतिया रंगाच्या फाटकापाशी उभे आहोत हे त्याला जाणवले. स्वर्गाच्या दारात उभ्या असणार्‍या सेंट पीटरने जॅकला सांगितले, 'तू आयुष्यात एकही चांगले काम केले नाहीस. तुला स्वर्गात प्रवेश मिळू शकत नाही. तेंव्हा तुला बहुधा नरकात जावे लागेल.'

जॅक यानंतर सैतानासमोर गेला. सैतानाच्या मनात जॅकला अद्दल घडवायची असल्याने त्याने जॅकला सांगितले, 'तुला नरकातही प्रवेश मिळू शकत नाही कारण आयुष्यभरात तू कोणाचेही वाईट केलेले नाहीस.'

यावर हिरमुसला होऊन जॅकने विचारले, 'तर मग मी या अंधारात जाऊ तरी कोठे?' यावर सैतानाने जवळ पडलेल्या एका कोरलेल्या पोकळ भोपळ्यात नरकातला पेटता कोळसा घातला व सांगितले, 'जेथून आलास तेथेच परत जा आणि कायमचा अंधारात हा कंदील घेऊन भटकत राहा.'

कधी कधी हॅलोवीनच्या रात्री दूरवर अंधारात अजूनही जॅक दिवा घेऊन भटकताना दिसतो म्हणतात.

अमेरिकेतील हॅलोवीन: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच अमेरिकेतील दुकाने हॅलोवीनच्या विविध साहित्यसामुग्रीने भरलेली असतात. यांत नानाविध आकारांचे भोपळे, भोपळ्याच्या आकाराचे प्लॅस्टिकचे कंदील, भयानक मुखवटे व वेष, हॅलोवीनची शुभेच्छापत्रे, आणि या सणाला साजेशा वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाया यांचा समावेश असतो. तसेच घराच्या सुशोभीकरणासाठी बनावट वटवाघुळे, काळ्या मांजरी, कोळी आणि कोळिष्टके, हाडांचे सापळे अशा अनेक भयप्रद गोष्टी विकायला ठेवतात. या सर्व गोष्टींचे रंग शिशिर ऋतूच्या रंगांशी मिळतेजुळते असतात. जसे, काळा, केशरी, जांभळा, लाल व हिरवा. या काळात घराघरांतून भोपळ्यांची खरेदी होते. 'पंपकिन पीकिंग' म्हणजे भोपळ्याच्या शेतात जाऊन आपल्याला हव्या त्या आकाराचे भोपळेही खरेदी करता येतात. कुटुंबातील सर्व व्यक्ती मिळून लहान भोपळे रंगवतात तर मोठे भोपळे कोरून पोकळ करतात. अमेरिकेत या सणाला धार्मिक महत्त्व नाही.

ट्रिक ऑर ट्रिटींगसाठी सज्ज बालकंपनी
३१ तारखेच्या संध्याकाळी ड्रॅक्युला, फ्रॅन्केस्टाईन, ईजिप्शियन ममीज, गॉबलिन्स या खलनायकांप्रमाणे किंवा पर्‍या, राजकुमार्‍या, परीकथांतील नायक इ. प्रमाणे वेषांतर केलेली लहान मुले जवळपासच्या घरी जाऊन दरवाजा ठोठावतात व "ट्रिक ऑर ट्रीट" असे ओरडतात. यजमानांनी सहसा "ट्रीट" असे म्हणून या मुलांजवळ असलेल्या छोट्या प्लॅस्टिकच्या बादल्यांमध्ये मिठाया टाकायचा रिवाज आहे.(ट्रिक म्हटले असता मुले यजमानांना घाबरवण्याचा प्रयत्न करतात.) गोड खाल्याने मनाला लागणारी हुरहुर, काळजी, चिंता आणि भीती तात्पुरती दूर होते असे सांगितले जाते. ट्रिक ऑर ट्रीटला मिठाई वाटण्याची परंपरा यांतूनच सुरु झाली असावी का काय कोण जाणे.

अमेरिकन कुटुंबात या दिवशीची संध्याकाळ एखादा भयप्रद सिनेमा पाहण्यात, भयकथांचे मोठ्याने वाचन करण्यात किंवा एकमेकांना भयप्रद किस्से सांगण्यात व्यतीत करण्यात येते. या दिवसांत झपाटलेले वाडे, भूतबंगले, स्मशाने यांची सफर या सारख्या भयप्रद मनोरंजनाच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येते. सर्व कुटुंबीय मिळून अशा कार्यक्रमाचा आस्वाद लुटतात.

गेल्या काही वर्षांपासून आपल्या भारतीय सणांबरोबरच या अमेरिकन सणांची मजा लुटण्याचा आनंद आम्ही घेत आहोत. या मागची भावना इतकीच की आपल्या सभोवतीचे जग आनंदी असेल तर आपणही त्यात सहभागी व्हावे.


अमेरिकेतील सर्वांना हॅलोवीनच्या अनेक शुभेच्छा!

9 comments:

priyadarshan said...

There you are ! How do you manage to write such informative, full of knowledge, articles ? Just Perfect. Nice to learn about "हॅलोवीन" in details.

How true when you say "आपल्या सभोवतीचे जग आनंदी असेल तर आपणही त्यात सहभागी व्हावे ".

yes, we must enjoy along with the others. Last year we were in Dubai during Ramdaan and we enjoyed the same there.

priyadarshan said...

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!

HAREKRISHNAJI said...

बऱ्याच वेळा मला एक प्रश्न पडतो, दक्षिणेकडच्या राजांना देव म्हणुन का मान्यता मिळाली नाही ? जसे उत्तरेकडच्यांना मिळली.

या बद्दल आपल्याला काही माहीती आहे काय ?

Priyabhashini said...

हरेकृष्णजी,

तुम्ही ही कमेंट वाचाल अशी आशा करते.

तुमच्या प्रतिसादाने उत्सुकता चाळवली. तेव्हा जरा सविस्तर शंका लिहाल का? म्हणजे दक्षिणेकडील राजांवर, कोणते राजे इ. इ. मी नक्की विचार करून उत्तर देईन.

धन्यवाद.

HAREKRISHNAJI said...

मी आपल्याला जरासा त्रास देतो आहे. जसे राम, कृष्ण ( कृष्ण हा राजा नव्हता ), विष्णु,इंद्र, ब्रम्हदेव,( आर्य ) यांना जसे देवत्व प्राप्त झाले त्याच प्रमाणे दक्षिण दिशेकडच्या राज्यातील राजांना का झाले नाही असे मला नेहमी कुतुहल वाटते. बलीप्रतीपदाला आपण बली राजाचे स्मरण करतो, पण ते तेवढ्या पुरते. तो जर सर्वोत्तम राजा होतो, पण त्याला देव म्हणुन मानत नाही . असे का ? किंबहुना तेथल्या महान राजांची माहीती हि जास्त लोकांना नाही.

Priyabhashini said...

हरेकृष्णजी,

हा विषय बराच गहन आहे. :) याची सुरुवात होते ती आर्य येथे आले का यावरून. समजा आर्य आले नाहीत पण भटक्या टोळ्या ज्या येथे वसत गेल्या त्यांनी कालांतराने दक्षिणी किंवा एतद्देशीय लोकांच्या दैवतांना दुय्यम स्थान देणे सुरु केले. असे अनेक देवही दिसतात ज्यांना दक्षिणेत आणि उत्तरेत वेगवेगळे आहेत.

उत्तरेचे व्यापक राजकारण, सतत होणारे हल्ले, महत्त्वाकांक्षा यांतून या राजांचा संपर्क मोठ्या प्रदेशाशी, राजकारणाशी आला तो दक्षिणेच्या राजांचा आला नसावा. त्यामानाने त्यांची राजवट सुखासुखीची वाटते.

बळीराजा उत्तम असला तरी त्यावर विष्णू वर्चस्व गाजवताना दिसतो. म्हणजेच श्रेष्ठत्वाच्या कल्पना-रुढी पाडलेल्या दिसतात.

उत्तर मोघम आहे कारण कोणतेही अवांतर वाचन न करता दिले आहे. पुढे कधी विचार करण्याची संधी मिळाली तर वेगळा लेख लिहिन.

HAREKRISHNAJI said...

thanks

HAREKRISHNAJI said...

where are u ?

TheKing said...

kuthe gayab zaliyes? When is the next post coming?

marathi blogs