प्रकार

Friday, February 23, 2007

हॅपिली नेवर आफ्टर!

सिंड्रेला (भाग दोन)



राजा राणीने थाटामाटात राजपुत्राच लग्न सिंड्रेलाशी लावून दिले. वधू-वरांना सर्वांनी तोंड भरून आशिर्वाद दिले. खरं बघायला गेलं तर राणीला मनातून सून पसंत नव्हती. तिच्या माहेरी सिंड्रेलापेक्षा ५६ सुंदर मुली होत्या. पण करते काय? तिच्या लाडक्या मुलाला बायको पसंत होती ना!

लग्न झालं, हनीमून झाला, सगळेजण आपापल्या कामाला लागले. सिंड्रेलाचा वेळ महालात जाईना. नटून थटून बसायचे, आल्यागेल्याला गोड हसून दाखवायचे, मेजवान्या झाडायच्या एवढेच काम सिंड्रेलाच्या वाटयाला होते. दिवसभर राबराब राबून कष्ट उपसणार्‍या सिंड्रेलाच्या शरीराचा घेर रोजच्या ऐशोआरामाने हळूहळू वाढू लागला. राजपुत्राने एक दोन वेळा मोठया प्रेमाने तिला याची कल्पनाही दिली नंतर लक्ष देणे सोडून दिले.

काही दिवसांपूर्वी एका दासीने राजपुत्राला मुख्य प्रधानांच्या कन्येसोबत बागेत फिरताना पाहिल्याचं सिंड्रेलाला येऊन सांगितलं. प्रधानकन्या राजपुत्राला अगदी खेटून बसल्याचंही सांगितलं होतं. सिंड्रेलाने राजपुत्राकडे याचा हळूवारपणे खुलासा मागितला असता त्याने प्रधान कन्येला गाणं येतं, काव्य येतं, तिला अनेक विषयांची, भाषांची उत्तम जाण आहे असं उत्तर दिलं. वर, राजपुत्रांना अनेक बायकांचा संग शोभून दिसतो असंही सुचवलं.

सिंड्रेलाला दिवसेंदिवस या सगळ्याचा कंटाळा आला होता, काहीतरी करणे आवश्यक होते, पण करावे काय यावर तिने बराच विचार केला आणि एक दिवस ती सरळ स्वयंपाकघरात घुसली.

आचार्‍यांना तिने सांगितले की आजचा खाना ती बनवणार. कंबर कसून सिंड्रेला कामाला लागली. आचारी आ करुन पहात राहिले. त्यांचा प्रमुख आचारी पुढे सरला आणि म्हणाला, "बाईसाहेब हे काय? महाराज काय म्हणतील? महाराणींना कळलं तर आमच्या नोकर्‍या जायची वेळ येईल." पण सिंड्रेलाने फारसं लक्ष दिलं नाही, आपल्याच नादात कामाला लागली होती.

एका आचार्‍याने हळूच जाऊन राणीच्या कानात झाला प्रकार सांगितला. राणीसाहेब धावत पळत भटारखान्यात आल्या.

"हे काय बाई भलतंच? राजवाडयात नोकर कमी पडले की काय?" राणीने आश्चर्याने विचारले.

"नाही राणीसाहेब, पण नुसतंच बसून बसून माझा वेळ जात नव्हता म्हणून इथे आले," सिंड्रेलाने अदबीने उत्तर दिले.

"जळ्ळ मेलं लक्षण! वेळ जात नव्हता तर मेजवानी ठरवावी. उमरावांच्या मुली बायकांना बोलवावं. नाहीतर गाणं, चित्रकला, भरतकाम वगैरे करावं," राणीसाहेब डाफरल्या.

"पण मला हे सर्व कुठे येतंयं? माझा जन्म झाड-पूस, स्वयंपाक, साफ-सफाई यांतच गेला," सिंड्रेलाच तोंड उतरुन गेलं होतं. आपल्याला स्वयंपाकघराच्या चार भिंतींबाहेरचं इतर काहीही माहित नसल्याची बोच तिला गेले काही दिवस खात होतीच.

"हो तर! तरी मी राजपुत्राला सांगितलं होतं की असला भिकारडेपणा घरात नको, पण त्याच्यावर प्रेमाचं भूत स्वार होतं ना! जशा काही सुंदर्‍या कमीच होत्या राज्यात." फणकारून राणीसाहेब म्हणाल्या.

सिंड्रेलाच्या डोळ्यात पाणी तरळलं. ती धावतच आपल्या महालात परत आली आणि पलंगावर स्वत:ला झोकून देऊन रडू लागली. कोणीतरी हलकेच तिच्या डोक्यावरुन हात फिरवत होते. तिने वर मान करुन पाहिले तर समोर परीराणी उभी होती.

सिंड्रेला रडतरडत तिच्या कुशीत शिरली. "परीराणी, हे गं काय झालं? मला वाटल होतं की मी सुखी झाले. सावत्र आईच्या जाचातून सुटका झाली, स्वप्नातला राजकुमार मिळाला; पण वरून सुखी वाटणारं आयुष्य इतकं दु:खदायक असू शकतं याची कल्पनाच नव्हती मला. कशाला तू भरीला पाडलंस त्या समारंभाला जाण्यासाठी? ना मी तिथे गेले असते, ना राजपुत्र भेटला असता ना हे सगळं नशिबी आलं असतं....."

परीराणीने तिला कुरवाळलं आणि जरा कोरड्या आवाजात म्हटलं, "सिंड्रेला, मी नाही हो तुला भरीला पाडलं, तिथे जावं अशी तुझीच इच्छा होती. मी ती पूर्ण केली इतकंच. मी तुला राजपुत्राच्या प्रेमात पडायला आणि त्याच्याशी लग्न करायलाही भाग नाही पाडलं. ती ही तुझीच इच्छा."

"अगं पण प्रेमात कशी नसते पडले मी? राजपुत्र आहे तो राज्याचा. त्याच्यापेक्षा उमदा पुरूष इतरत्र कुठे मिळायचा?"

"बरोबर बोललीस. राज्यातील ६ वर्षाच्या पोरीपासून ६० वर्षाच्या वृद्धेपर्यंत सर्वच त्याच्या प्रेमात आहेत, म्हणून त्या त्याच्याशी लग्नाची स्वप्नं नाही पाहात. प्रेम आणि लग्न या फार वेगळ्या गोष्टी आहेत. प्रेम कधीही आणि कोणावरही करता येतं, लग्न कधीही आणि कोणाशीही केलं तर फसण्याचा संभव अधिक असतो. प्रेम टिकवावं लागत नाही, ते जसं निर्माण होतं तसं कधीतरी विरूनही जातं, त्याचा गाजावाजा करावा लागत नाही की दवंडी पिटावी लागत नाही. लग्नाचं तसं नाही, ते करताना समाजाला सांगावं लागतं, लग्न टिकवावं लागतं आणि मग 'सुख काय मानण्यातच आहे', 'ठेविले अनंते जैसे..' असं म्हणत मार्गक्रमण करावं लागतं.

मजा म्हणजे 'लग्न पहावे करून...' अशी इच्छा ठेवणारी, लग्न करणारी, लग्न मोडणारी, लग्न टिकवणारी सर्वच माणसे या ना त्याप्रकारे कसल्या न कसल्या तक्रारी करत असतात. नवर्‍याला बायकोबद्दल, बायकोला नवर्‍याबद्दल, सासूबद्दल, सासूला सुनेबद्दल तक्रारीच तक्रारी. मला तर वाटतं की या सर्व परीकथांचा जो लेखक आहे त्याने कधीच लग्न केलं नसावं, नाहीतर 'देन दे लिव्ड हॅपीली एवर आफ्टर'सारखं वाक्य प्रत्येक गोष्टीच्या शेवटी त्याने टाकलंच नसतं.

तू लग्न केलंस ना सिंड्रेला, आता त्यात राहून सुखी राहायचं, सुख मानायचं की सुखी असल्याचं भासवायचं हे तुझं तू ठरवायचं. एकच लक्षात ठेव, लग्न केलेले बाकीचे सगळेही थोड्याफार प्रमाणाने तुझ्यासारखेच आहेत, तेव्हा दु:खी होण्यापेक्षा मीही त्यांच्यातलीच आहे असं समजून विचार कर. आयुष्यात काहीतरी वेगळं कर. राणी आहेस तर राणीसारखी राहा. नव्या गोष्टी शीक, आयुष्याची नवी दालने उघड आणि आणखी एक लक्षात ठेव, नव्या गोष्टी शिकलीस म्हणून सुखी होशील असे नाही; दु:ख, प्रश्न, अडचणी अनेक मार्गाने येतात. लग्न करून टिकवणं इतक सोपं असतं तर आम्हा पर्‍यांनी नसती केली लग्न?

तरीही हॅपिली नेवर आफ्टरमुळे खूप काही बिघडत नाही. दिवस उगवायचा थांबत नाही, रात्र व्हायची वाट पाहत नाही, उन्हाळे हिवाळे थांबत नाही. जगात बरेचसे माझ्यासारखेच आहेत म्हण आणि पुढे चल! किंवा जमलं तर आपल्या पायावर उभी राहा. सतत काहीतरी उद्योग करायला शीक. आपल्या गाठीशी थोडंसं श्रेय घे आणि स्वतःचं आयुष्य जगायला सुरूवात कर... मग ते राजवाड्याच्या बाहेर पडून करावं लागलं तरी... बघ! आहे तयारी? "



आणि परीराणी अंतर्धान पावली.

10 comments:

Monsieur K said...

mast lihila aahe ekdam! i was first searching for a cindrella - part 1 story, then realised ki ti story tar saglyanna maahit asnaar!

why is it that often we make choices that change our life, and then there always occurs some kind of a 'rationalization' process that helps us digest the impact of that decision/choice in a better way?
s'times, this rationalization thought process takes place in our mind itself, and s'times we have our close friends or family (fairies are a part of this) to help us out in the same.

punhaa ekda, khup chhaan lihila aahe! :)

कोहम said...

Chaan lihila aahe.....thinking beyond known.....good keep it up....kharatar asha vachalelya pratyek kathet apan pudhe jaun pahila tar kiti vegavegalya goshti umajatil...

Priyabhashini said...

Thanks Ketan! Cindrella part-1 is a wellknown fairytale so I thought further explanation is not necessary. :)

Life changes on its own, even if we are in idle state. It is a natural human tendency to substitute explanations for all the actions. We all try to get away with our responsibilities and put blame on someone else. (be it another person or fate) Like, in this case Cindrella holds fairy responsible for her sorrows.

होतं काय की आयुष्यात प्रत्येक प्रश्नाला specific उत्तर नसतं. आपण आपल्यापरीने चूक बरोबर ठरवत असतो. :)

कोहम
हो, पुढे जाऊन विचार केला तर वास्तवाचे भान येते. परीकथा सुखद अंतापर्यंतच संपतात. गोष्ट आवडल्याबद्दल धन्यवाद.

HAREKRISHNAJI said...

Think differently. That's the moral of the story.

Raj said...

गोष्ट छान आहे. नेहेमीपेक्षा वेगळी आहे म्हणून आवडली. मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून यात बरेच पैलू आहेत. मी नेहेमी मानसशास्त्रावर बोलायला लागलो तर लोकांना 'ह्याचे डोके जागेवर आहे ना?' असा संशय यायचा :-)
सिंड्रेलाजवळ घटस्फोटाचा पर्याय आहे का? निदान परीराणीच्या बोलण्यातून तरी तसे वाटत नाही. परीराणी कदाचित जुन्या विचारसरणीची असावी.

बाय द वे, तू वरच्या प्रतिसादात जे म्हटले आहेस (आपण आपल्यापरीने चूक बरोबर ठरवत असतो.)
तेच शेक्सपिअरने हॅम्लेटमध्ये म्हटले आहे.
There is nothing either good or bad, but thinking makes it so. - Hamlet , Act II, scene ii

राजेंद्र

Priyabhashini said...

हरेकृष्णजी गोष्ट वाचल्याबद्दल धन्यवाद. :)

राजेंद्र,

तू निदान माझ्या अनुदिनीवर तरी बिनधास्त मानसशास्त्रीय दृष्टीकोणातून बोल कारण मला स्वत:ला त्याची आवड आहे. (म्हणजे एखादा निर्णय माणूस का घेतो, एखादा पर्याय का निवडतो, आवड-निवड कशी ठरवतो इ.) तेव्हा मला वाचायला मनापासून आवडेल.

तुझं निरीक्षण बरोबर आहे, गोष्ट खूप जुन्या काळातीलच आहे (परीकथा आहे म्हणून, प्रिन्सेस डायना असती तर घटस्फोट घेऊन मोकळी झाली असती.) एक अधिक गोष्ट म्हणजे तू घटस्फोटाला पर्याय म्हणालास ते ही अचूक कारण घटस्फोट पर्याय होऊ शकतो उपाय नाही त्यामुळे परीराणी अगदी पहिल्या क्षणाला घे घटस्फोट आणि हो मोकळी असे म्हणू शकत नाही म्हणूनच तिच्यापरीने उपाय सुचवते.

:) पुन्हा चूक-बरोबर असे काहीच नसल्याने घटस्फोट घेऊन तरी सिंड्रेला काय करणार होती? ही पुरातन कथा असल्याने तिला राजपुत्राकडून भारंभार पोटगी मिळाली असती, पुढचे आयुष्य सुखात गेले असते इ. इ. अपेक्षाही ठेवता येत नाहीत.

हॅम्लेटच्या संवादांबद्दल अनेक धन्यवाद. मी हॅम्लेट शब्द न शब्द वाचला नाही. (वाचला तरी quotes कधीही लक्षात राहत नाहीत.) माझे वाक्य हे असेच अर्धे आयुष्य गेल्यावर सुचलेल्या शहाणपणातून आले आहे. ;-) :D

पुन्हा एकदा विस्तृत प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

प्रिया said...

:) You have mastered the art of precision! थोडक्यात बरंच काही सांगून जातेस, आणि विचार अगदी सुटसुटीतपणे मांडतेस तू. गोष्ट अर्थातच आवडली. पण तुझं सगळंच लेखन एकंदर मला खूप प्रभावी, नेमकं, सुटसुटीत वाटतं. I would be happy if I could be half as effective as you are, while expressing my thoughts in the written form. Kudos!

यावरून माझ्या ओळखीच्या एक काकू नेहमी म्हणतात ते आठवलं... "नवरा कुठे made to order मिळत नाही. नवराही नाही आणि बायकोही नाही! ’पदरी पडलं नि पवित्र झालं’ असंच असतं बरेचदा. त्यामुळे आहे त्याच्याशी जुळवून घेऊन संसार गोड,सुखाचा करायचा त्यातल्या त्यात!" तुझी गोष्ट वाचताना परीच्या ठिकाणी काकू दिसायला लागल्या मला एकदम! :D

Priyabhashini said...

प्रिया,

तुला परीच्या ठिकाणी काकू दिसल्याना तेच केतनने वर लिहिले आहे - The fairy usually comes in the disguise of a close friend of family members and I am sure when you'll be my age you will come out with even more precise thoughts.

काय असतं की माणूस चांगल्यावाईट अनुभवातून जाऊ लागला की तसा विचार करणे, लेख लिहिणे सोपे होते. तुला भरपूर वेळ आहे अजून. ;)

Socrates once said, my advice to you is to get married, if you find a good wife (or husband ofcourse) you'll be happy or you will become a philosopher.

I am yet to meet a completely happy person so we all are philosophers in some way or the other. :D

तुझ्या प्रतिसादाबद्दल खूप धन्यवाद.

अनुराधा कुलकर्णी said...

सुंदर कथा.शैली आणि विषय बऱ्यापैकी व. पुं. ची आठवण करुन देतो. आधी मी 'बालकथा' असेल असे नावावरुन वाटून कथा वाचली नव्हती.

Anonymous said...

सुंदर ओघवती शैली आहे. वास्तववादी कथा. मुले झाल्यावर तर कदाचित त्यांच्यात रमेल. मग एवढा एकटापणा नाही जाणवणार. पण तरी तिच्या वैयक्तिक आयुष्यातला आनंद तिलाच शोधायला हवा. असे काहीतरी कारण शोधून काढायला हवे की जे करताना खूप आनंद वाटेल. जसे लिखाण-शिक्षण-एखाद्या विषयाचा अभ्यास. अध्यात्माची आवड असेल तर श्री. सदगुरूंच्या मार्गदर्शनाने जीवनातल्या सर्व प्रश्नांची उकल होईल आणि आत्यंतिक आनंदही मिळेल.

marathi blogs