सुपर नाल
पाच वर्षांपूर्वी अमेरिकेत आलो तेव्हाही माझं मन टिव्हीवरच्या सासू सुनांच्या भांडणाना चटावलेलं नसलं तरी सरावलेलं नक्कीच होतं. अमेरिकन टिव्हीवर काय पाहायचं असा प्रश्न वारंवार मनाला पडायचा. कालांतराने सासू-सुना, देश, काळ, भाषा बदलल्या म्हणून अजीबात बदलत नाहीत हे 'एवरीबडी लव्ज रेमंड' पाहून लक्षात यायला लागलं आणि अमेरिकन टिव्हीशी नाळ जुळत गेली.
नंतर प्रश्न होता खेळांचा. मला लहानपणापासून क्रिकेट आवडतं. खेळातला प्रत्येक बारकावा समजला नाही तरी सर्वसामान्य प्रेक्षकापेक्षा बर्यापैकी कळतंही. म्हणजे आमच्या शेजारच्या एक काकू क्रिकेटची मॅच सुरू असताना प्रत्येकवेळी मोठ्ठा आवाज आला की 'सचिनची सेंच्युरी झाली का हो?' असं काकांना विचारायच्या अशी गत नक्कीच नाही. मॅच असली की दिवसभर टिव्हीला चिकटून बसायची सवयही होतीच, ती अमेरिकेत आल्यावर काही काळ कायम होती पण रात्रीची जाग्रणे असह्य होऊ लागली तसा या खेळाचा नाद सोडणे उत्तम असे वाटू लागले. थंडीच्या पाच-सहा महिन्यांत घरी बसून काहीतरी उद्योग तर हवा म्हणून एके दिवशी अमेरिकन फुटबॉलकडे नजर वळवली.
प्रथमदर्शनी खेळातलं काही एक ढिम्म कळलं नाही आणि चार पाच टगे कोणातरी एका बारक्या खेळाडूवर धडाधड पडताहेत, हिसकाहिसकी करताहेत हे बघून किळसच वाटली. त्यातून नाव फुटबॉल असून चक्क हाताने हा खेळ खेळला जातो ते पाहून हसूही आले. जंटलमनांचा खेळ पाहायची सवय झालेल्या माझ्या मनाला हा रांगडा खेळ बिल्कुल रुचला नाही. तेव्हापासून फुटबॉलच्या वाट्याला गेले नाही ते जॅनेट जॅकसनने फुटबॉलला एक वेगळे वलय प्राप्त करून दिल्यावर. त्याप्रकरणानंतर लोकांनी उठवलेल्या नाराजीच्या सुरावरून पुन्हा हा खेळ पाहावा की काय अशी इच्छा निर्माण झाली. या खेळातला 'ख' ही माहित नसलेल्या माझ्या डोक्याला संघ, खेळाडू, खेळ, नियम सर्वकाही जाणून घ्यायचे होते. शांतपणे एक दिवस विकिपीडियावर माहिती शोधली आणि वाचली. आश्चर्य म्हणजे या खेळात आमच्या इंडिएनाच्या संघाचे नाव वर असल्याचा पत्ता लागला. मग खरंच रस घेऊन खेळाचे नियम वाचले, खेळ समजून घेतला आणि २००५ पासून पाहायला सुरूवात केली. घरात अचानक उलटे वारे वाहायला लागले म्हणजे मी खेळ पाहते म्हणून हळूहळू नवर्यानेही पाहायला सुरूवात केली.
खेळाचा मोसम सुरू झाल्यावर खेळातील खाचाखोचा समजत गेल्या. रांगडा-रानटी वाटणारा हा खेळ अतिशय नियमाने खेळला जातो असे लक्षात आले. या खेळाचा वेग आणि लय खेळात प्रचंड रंगत आणतात हे कळले. बॉलची लांबी १ फूट असल्याने या खेळाला फुटबॉल म्हटले जाते हे कळले. त्याचबरोबर नावात 'इंडिया' असल्याचा महिमा की काय कळत नाही पण कागदावर वाघ असणारा आमचा संघही भारतीय क्रिकेट संघासारखा आयत्यावेळेला गठळतो आणि आवाक्यात आलेली फायनल दरवर्षी चुकवतो हेही कळून चुकले. गेल्यावर्षी नियमाने खेळ पाहिल्याने आमचा संघ 'फायनलच्या' आसपासही न पोहोचल्याचे बघून मनापासून वाईटही वाटले. या फायनलला अमेरिकेत "सुपर बोव्ल" म्हटले जाते. प्रत्येक संघ आपापल्या क्लबच्या नावाने आणि चिन्हाने ओळखला जातो. 'इंडिएना कोल्ट्स' या आमच्या संघाचे चिन्ह आहे घोड्याचा नाल आणि अमेरिकेतील अशा बत्तीस संघातील शेवटच्या सर्वोत्तम दोन संघात जी लढत होते ती सुपर बोव्ल.
२००७ चा सुपर बोव्ल या रविवारी खेळला जाईल. संपूर्ण अमेरिका त्याकडे डोळे लावून बसली आहे आणि कधीही फायनलपर्यंत न पोहोचलेला आमचा संघ, इंडिएनापोलिस कोल्टस या वर्षी शिकागो बेअर्सबरोबर अंतिम लढत देणार आहेत. गेला आठवडाभर आमच्या शहरांत उत्सवाचे वातावरण आहे. संघाचे चिन्ह आणि रंग असणारे निळे कपडे, प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी दिसणारे भव्य नाल, "गो कोल्ट्स" म्हणून संघाला दिलेले प्रोत्साहन, घोड्याचे नाल असणारे फलक, झेंडे, दागिने, मिठाया, कपडे यांनी माणसे, गाड्या, बाजार आणि शहर सजले आहे.
सुपर बोव्लचा चषक आम्हाला मिळेल किंवा नाही मिळेल. खेळात कोणाची तरी जीत होईल कोणाची तरी हार परंतु आपला संघ इतके महिने खेळून या अंतिम लढतीपर्यंत पोहोचला याचे प्रत्येकाला कोण कौतुक. प्रत्येकजण आपापल्यापरीने संघाला प्रोत्साहन देत आहे, सच्ची चाहती म्हणून मी मागे का राहायचे? तेव्हा माझ्याकडून संघाला GO COLTS!! म्हणायला हा अनुदिनी प्रपंच.
* कोल्ट्सचे चिन्ह विकिपीडियाच्या साहाय्याने चिकटवले आहे.
5 comments:
हा खेळ मलाही कळत नाही. पण बघायला तरीपण मजा येते.
याला फूटबॉल का म्हणतात ते इथं वाचून कळलं. :)
Congratulations!
Colts jinkle ki kaal! wasnt their best performance probably - the rain did affect - but Peyton Manning was pretty good in his passing!
even i never followed American Football earlier, pan parwa Friday la office madhe eka American colleague kadun kaahi basics samjun ghetle, aani Sunday la pahilyaandaach Super Bowl paahilaa! :)
~ketan
धन्यवाद, योगेश आणि केतन.
खरंच हा खेळ एकदा पाहायला लागलं की त्याच्या प्रेमात पडायला होतं आणि जिंकणारा संघ असेल तर आणखी काय पाहिजे? :))
कोल्ट्स जिंकले की तुमचे... अभिनंदन! :) मला पण अमेरिकेत येऊन काही महिनेच झालेत! सुरुवातीला हा खेळ अगदीच आघोरी वाटायचा... उगाच लोक एकमेकांच्या अंगावर पडतायत, बॉल कुठेय ते तर दिसतच नाही, मध्येच उठून कुठेतरी धावायला लागतात... काही कळायचंच नाही. मग हळूहळू कॉलेज फ़ुटबॉल follow करायला लागले, and it started growing on me! :) मीही काल पहिल्यांदाच Super Bowl पाहिला आणि एंजॉय पण केला!
धन्यवाद प्रिया, जिंकले एकदाचे ;-) म्हणजे आयत्या वेळेस पड खाणे त्यांना बरोबर जमते म्हणून जरा शंका होती पण सहज जिंकले.
मलाही अघोरीच वाटायचा हा खेळ पण आता त्याचे वेड लागले आहे. फास्ट आणि कल्पक खेळ आहे, थंडीच्या दिवसांत करायचे तरी काय असा प्रश्न पडतो त्यावर अगदी नेमका उपाय आहे कारण थंडीतल्या उदास वातावरणात खेळ आनंद देतो आणि वेळही जातो.
Post a Comment