प्रकार

Sunday, January 20, 2008

लढा लहानगीचा

गोष्ट फारशी जुनी नाही, १९६० सालातील आहे. यावर्षी लुईझियाना राज्याने गोर्‍यांच्या आणि काळ्यांच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचा कायदा लागू केला. त्यापूर्वी गोर्‍या मुलांच्या व काळ्या मुलांच्या शाळा वेगवेगळ्या असत. या कायद्यानुसार केवळ ६ काळ्या मुलांची गोर्‍यांच्या शाळेत जाण्यासाठी निवड करण्यात आली. त्यापैकी २ मुलांच्या पालकांनी घाबरून आपल्या मुलांना पूर्वीच्या शाळेत ठेवणेच पसंत केले. राहिलेल्या चौघांपैकी ६ वर्षांच्या लहानग्या रुबीवर 'विल्यम फ्रॅन्ट्स प्राथमिक शाळेत' एकटीने जायची पाळी आली.

रुबीच्या वडलांना रुबीचे गोर्‍या मुलांच्या शाळेत जाणे फारसे पसंत नव्हते. गोरी मुले तिला आपल्यात कधीच सामावून घेणार नाहीत ही भीती त्यांना वाटत होती. रुबीच्या आईला मात्र रुबीला या शाळेत चांगले शिक्षण मिळेल अशी खात्री वाटत होती. तिने रुबीच्या बाबांची बरेच दिवस समजूत घातली, 'ही लढाई आपली नाही तर संपूर्ण काळ्या समाजाची आहे. आपल्याला सुरुवात करायची संधी मिळाली आहे ती आपण गमवून चालणार नाही.' शेवटी बाबांनी परवानगी दिलीच. खरी लढाई मात्र लढायची होती ती लहानग्या रुबीला आणि आपल्याला नेमकी कोणती लढाई लढायची आहे हेच तिला माहित नव्हते.

१४ नोव्हेंबर १९६०चा दिवस काळ्या मुलांनी गोर्‍यांच्या शाळेत जाण्यासाठी निश्चित करण्यात आला. त्या दिवशी सकाळी रुबीला आईने उठवले. तिची तयारी करताना आईने तिला नव्या शाळेत जाण्याविषयी सांगितले. नव्या शाळेत जाताना काहीतरी गडबड होईल ही शंका असल्याने चार सरकारी अधिकारी रुबीला न्यायला येणार होते. शाळेजवळ गर्दी असेल, लोक काहीतरी आरडाओरडा करतील त्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचे नाही हे आईने रुबीला सांगून ठेवले.

ठरल्याप्रमाणे चार अधिकारी सकाळीच घरी आले. त्यांच्या गाडीतून शाळेत जाताना त्यांनी रुबीला आणि तिच्या आईला सांगितले की रस्त्यावरून चालताना दोन अधिकारी त्यांच्यापुढे चालतील आणि दोन अधिकारी मागून. काही गडबड झाल्यास ते काळजी घेतील. शाळेच्या आवारात गाडी थांबली तशी रुबीला बरेच लोक गर्दी करून उभे असल्याचे दिसले. तिने आईचा हात घट्ट पकडला. काही गोरे लोक जोरजोरात काहीतरी ओरडत होते. डोळ्यांच्या कोपर्‍यातून रुबीने पाहिले तर त्यांच्या हाताच्या मुठी आवळलेल्या तिला दिसल्या. येथे नक्की काय चालले आहे याची रुबीला कल्पना येत नव्हती. तो संपूर्ण दिवस रुबीने आणि तिच्या आईने मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बसून काढला. कार्यालयाच्या खिडकीतून रुबीला ती जोरजोरात घोषणा देणारी माणसे दिसत होती. काहीजण आपल्या मुलांना शाळेतून काढून घरी घेऊन जात होते. या सर्व गोंगाटात रुबीचे नव्या वर्गात जाणे झालेच नाही.


दुसर्‍या दिवशीही ते अधिकारी रुबीला आणायला आले. आईही शाळेत आलीच. त्यादिवशीही शाळेच्या आवारात बरेच गोरे लोक जमले होते. त्यापैकी एकाने पुढे सरून शवपेटीत घातलेली काळी बाहुली रुबीला दाखवली. रुबीला ती बाहुली पाहून खूप भीती वाटली. हे लोक आपल्याला घाबरवत आहेत याची तिला प्रथमच जाणीव झाली. लोक रुबी आणि तिच्या आईवडिलांविषयी काहीतरी अर्वाच्य बोलत होते. त्यांना टाळून रुबीने शाळेत प्रवेश केला.

त्यादिवशी शाळेत एक गोरी स्त्री त्यांची वाट पाहात होती. "गुड मॉर्निंग, रुबी नेल. मी तुझी नवी शिक्षिका, मिसेस हेन्री." गोड आवाजात तिने रुबीचे स्वागत केले. मिसेस हेन्रींचा चेहरा दयाळू दिसत होता तरी रुबीला त्या कशा असतील, आपल्याशी बाहेरच्या लोकांप्रमाणेच वागतील की काय असा प्रश्न पडला. हेन्रीबाई, रुबीला आणि तिच्या आईला दुसर्‍या मजल्यावर रुबीच्या वर्गात घेऊन गेल्या. संपूर्ण वर्ग रिकामा होता. बाईंनी रुबीला पहिल्या बाकावर बसवले आणि संपूर्ण वर्गाला शिकवतो आहे अशा थाटात तिला इंग्रजी अद्याक्षरे शिकवायला सुरूवात केली. शाळेतला तो दिवस बरा गेला.

त्यानंतरच्या दिवशी आईने रुबीला जवळ घेऊन सांगितले की आजपासून तिला कामावर जाणे भाग आहे त्यामुळे ती शाळेत येऊ शकत नाही. यापुढे ते सरकारी अधिकारीच तिला शाळेत पोहचवतील व परत आणतील. रुबीचा चेहरा पडला. ते पाहून आई म्हणाली, "घाबरू नकोस रुबी. शाळेत जाताना मन लावून देवाची प्रार्थना म्हण. देव सर्वत्र असतो. तू तुझे लक्ष प्रार्थनेत ठेवलेस तर ते लोक तुझ्याबद्दल काय बोलतात हे तुला ऐकू येणार नाही." रुबीने आईचा सल्ला मानला. ते गोरे लोक रोज शाळेच्या आवारात जमायचे, आचकट विचकट बोलायचे. त्यांना टाळून शाळेच्या पायर्‍या चढताना रुबीला हायसे वाटायचे. शाळेत हेन्रीबाई रुबीची वाट पाहत असायच्या. रुबी दिसली की तिला जवळ घ्यायच्या, गोंजारायच्या. एव्हाना रुबीला त्या आवडू लागल्या होत्या. वर्गात हेन्रीबाई आणि रुबी दोघीच असायच्या. बाकीच्या मुलांची नावे त्यांच्या पालकांनी कमी करून टाकली होती. बाई फळ्यासमोर उभ्या राहण्याऐवजी रुबीच्या शेजारी बसून तिला शिकवू लागल्या. रुबीलाही शाळेत येणे आवडू लागले.

परंतु गोष्टी इथेच थांबल्या नाहीत. वर्णद्वेषी गोरे आता रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण शहरात दंगलीचे लोण पसरले होते. रुबीच्या घराला लक्ष्य करण्याचे प्रयत्न करण्यात आले. रुबीच्या वडिलांनाही कामावरून कमी करण्यात आले. दुकानदाराने रुबीच्या कुटुंबाला धान्य व इतर सामान देणे बंद करून टाकले आणि आपल्या दुकानात येण्यास मनाई केली. रुबी आणि तिचे कुटुंबीय घराबाहेर पडले की त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या जात. धमक्यांची पत्रे येत. मिसिसीपी राज्यात राहणारे रुबीचे आजी-आजोबाही या उद्रेकाचे बळी ठरले. परंतु याचबरोबर काही सहृदय माणसांनी रुबीच्या कुटुंबाची मदतही केली. एका शेजाऱ्याने रुबीच्या वडिलांना रंगार्‍याची नोकरी दिली. काहीजणांनी रुबीच्या घरावर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. त्यांना मदत मिळवून दिली. एवढेच नव्हे तर शाळेत जाताना रुबीच्या गाडीमागून रोज शांततेने चालण्यास सुरुवात केली.

रुबीच्या वर्गात मात्र रुबी आणि हेन्रीबाई दोघीच असायच्या. मधल्या सुट्टीत रुबीला बाहेर जाऊन इतर मुलांसमवेत खेळण्याची मनाई होती. हेन्रीबाई वर्गात स्वत: रुबी बरोबर खेळायच्या. शारिरीक शिक्षणाच्या तासाला रुबीबरोबर नाचायच्या, उड्या मारायच्या. केवळ हेन्रीबाईंमुळे रुबीला शाळा आवडायची. एक दिवस रुबीने त्यांना ती बाहेरची माणसे अशी क्रूर का वागतात असा प्रश्न विचारला. तशा हेन्री बाई तिला म्हणाल्या, "काही माणसांना एकदम बदलणे जमत नाही. ते वर्षनुवर्षे असेच वागत आले आहेत, यापेक्षा वेगळे वागायला कदाचित त्यांना भीती वाटत असावी. रुबी, ते लोक तुझ्यापेक्षाही जास्त घाबरलेले आहेत." त्यादिवशी रुबीला बाईंचे म्हणणे कितपत समजले कोणास ठाऊक परंतु त्यावर्षी ती तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा शिकली. शाळेबाहेर उभे राहून अर्वाच्य बोलणारे लोक गोरे होते आणि हेन्रीबाईही गोर्‍याच होत्या, पण रुबीला भेटलेल्या प्रेमळ लोकांपैकी त्या एक होत्या. हेन्रीबाईंनी रुबीला डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांची शिकवण शिकवली. "जगात कोणलाही त्याच्या कातडीच्या रंगावरून जोखू नये. देवाने सर्वांना सारखे बनवले आहे आणि तरीही प्रत्येकाला दुसर्‍यापेक्षा वेगळे." त्यादिवशीपासून शाळेत येताना रुबीने आपल्याबरोबरच त्या बाहेरच्या गोर्‍या लोकांसाठीही प्रार्थना म्हणायला सुरूवात केली. तेही आपल्यासारखेच घाबरलेले आहेत हे तिच्या बालमनाने पक्के जाणले होते.

म्हणता म्हणता वर्ष कसे सरले ते रुबीला कळलेही नाही. हेन्रीबाईंच्या सान्निध्यात तिचे व्यक्तिमत्त्व फुलून येत होते. वर्षभरात तिने एकही दिवस शाळा चुकवली नाही. बाहेरचे लोकही थंडावले. शाळेबाहेर येईनासे झाले. जून महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या तशा रुबीने आणि हेन्रीबाईंनी एकमेकींचा निरोप घेतला. सप्टेंबरमध्ये रुबी शाळेत परतली तर शाळेचे रुपच पालटले होते. तिला पोहचवायला न्यायला येणारे ते अधिकारी आले नव्हते, शाळेत काही अधिक काळी मुले भरती झाली होती. शाळेबाहेर गोंगाट नव्हता. रुबीच्या वर्गात इतर मुलेही होती आणि त्यातली काही काळीही होती. जसे काही शाळेत काही घडूनच गेले नव्हते. रुबीला हेन्रीबाई मात्र दिसल्या नाहीत. चौकशी केले असता कळले की त्यांची बोस्टनला बदली झाली होती.

रुबीची शाळा व्यवस्थित सुरू झाली. तिने प्राथमिक शाळेनंतर, महाविद्यालयात प्रवेश मिळवला व आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर व्यवसाय शाखेचा अभासक्रम पूर्ण केला. पर्यटन विभागात नोकरी केली. रुबी ब्रिजेस हॉल आज पन्नाशीची आहे आणि आपल्या कुटुंबासमवेत सुखी आयुष्य जगते आहे. संपूर्ण गोर्‍यांच्या प्राथमिक शाळेत जाणरी ती अमेरिकेतील पहिली काळी मुलगी गणली जाते. वर्णद्वेषाबद्दल तिच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, "आपल्यापैकी प्रत्येकजण निर्मळ मन घेऊन जन्माला येतो. आपल्या मुलांना वर्णद्वेषाबद्दल काहीही माहित नसते.. त्यांनी ती माहिती पुरवतो आपण. आपण वर्णद्वेष जीवंत ठेवतो आणि त्याचा वारसा आपल्या मुलांना देतो. आपल्या मुलांची मने निर्मळ राहावीत ही आपली जबाबदारी आहे."



१५ जानेवारी डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांचा जन्मदिवस म्हणून अमेरिकेत साजरा होतो. त्यांच्याशी आणि त्यांच्या विचारांशी आपली बांधिलकी असेल नसेल परंतु वयाच्या सहाव्या वर्षी आपल्याला किंवा आपल्या मुलांना कनिष्ठतेची वागणूक मिळून एखादा दिवसतरी शाळेत रुबीप्रमाणे घालवावा लागल्यास काय वाटेल याची कल्पना करावी.

* प्रसिद्ध चित्रकर नॉर्मन रॉकवेल यांचे 'The problem we all live with' हे रुबीवर तयार केलेले तैलचित्र विकिपीडियावरून चिकटवले आहे.

3 comments:

HAREKRISHNAJI said...

खुप छान लिहीले आहेत.

Anonymous said...

khup emotional,sunder katha ahe. Tumhi farach parinamkarak anuvaad kelela ahe. tumachya blogchi link anu chya blogvarun milali.tiche abharach manale pahijet.
(mala marathit pratisaad kasa dyayacha te sangal ka?)

Priyabhashini said...

हरेकृष्णजी आवर्जून अनुदिनी वाचण्याबद्दल तुमचे अनेक धन्यवाद.

अनामिक (Anonymous) प्रशंसेबद्दल आभारी आहे. अनुही उत्तम लिहिते आणि तिने ज्यांची नावे तिच्या अनुदिनीवर टाकली तेही सर्व उत्तम लिहितात, तेव्हा वाचत जा. त्यानिमित्ताने तुम्हालाही अनुदिनी लिहावीशी वाट्ली तर लिहाच. :)

मराठीत लिहिण्यासाठी www.baraha.com वरून BarahaIME डाऊनलोड करा आणि ते इन्स्टॉल करून अनुदिनीवर मराठीत लिहा.

marathi blogs