सीन्स यू हॅव बीन गॉन....
केली क्लार्कसन माझ्या संगणकाच्या स्पीकर्समधून कर्णकर्कश्श केकाटते आहे, 'सीन्स यू हॅव बीन गॉन आय कॅन ब्रीद फॉर द फर्स्ट टाइम...' या पोरीची एक शैली आहे, संथ गाणे सुरू करायचे आणि मध्येच एकदम स्वर टीपेला लावून किंचाळायचे आणि पुन्हा शांत झाल्यासारखे हळुवार गाणे सुरू करायचे. का कोणजाणे पण मला आवडते तिचे गाणे. बहुधा हळुवारपणा आणि धांगडधिंग्याचा संगम होत असावा म्हणून असेल. अर्थात येथे मुद्दा तो नाही. मुद्दा असा की या गाण्यासारखी समानार्थी भावनांची इतर गाणी कोणती? पाश्चिमात्य संस्कृतीचा विचार करता अनेक नातेसंबंधांच्या अनुभवातून आयुष्याची वाट पकडणे लक्षात घेतले तर इंग्रजीत अशा भावनेवर आधारित गाणी बरीच असावीत असे वाटते, काही इंग्रजी गाणी चटकन लक्षात आली ती --
१) हिलरी डफचे "सो यस्टरडे"
If it's over, let it go and
Come tomorrow it will seem
So yesterday, so yesterday
I'm just a bird that's already flown away
२) ग्लोरिया गेनरचे "आय विल सर्वाइव"
I've got all my life to live,
I've got all my love to give
and I'll survive, I will survive.
ही दोन्ही गाणी मला अतिशय आवडतात. विशेषत: ग्लोरिया गेनरच्या आवाजातील "आय विल सर्वाइव". कदाचित तिच्या आवाजातील तडफ हिलरी डफ आणि केली क्लार्कसनच्या आवाजात नसावी म्हणून. तरीही या सर्व गाण्यांत एक प्रकारचा विषाद, आणि आत्यंतिक राग जाणवतो किंवा झाल्या प्रकारातून बाहेर पडण्याकरता आपल्या मनाची भाबडी समजूत घालण्याचा प्रयत्न. त्यामुळे कोठेतरी एक निराशेचे सावट पडल्यासारखे वाटते.
चलो एक बार फिरसे
अजनबी बन जाये हम दोनो
न मैं तुमसे कोई उम्मीद रखूं दिलनवाज़ी की
न तुम मेरी तरफ देखो गलत अंदाज नजरोंसे
अर्थातच हे गाणे सुटकेच्या नि:श्वासाचे नाही. या गाण्यात एक प्रकारची निराशा, दु:ख, हिरमोड जाणवतो. तसंही गुमराह चित्रपटाची आठवण केली तर हे प्रियकराने प्रेयसीच्या भावना चिथावण्यासाठी म्हटलेले गाणे म्हणता येईल. संबंध सुटले, नाती तुटली म्हणून 'ऐ मेरे दिल कहीं और चल' सारखी काही मोजकी गाणी आढळतात. मराठी भावगीतांची आणि अन्य गीतांची परंपरा पाहता मराठीत अशा भावनेचे गाणे असेल की काय अशी शंकाच होती, मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्या नेमक्या भावना मला अभिप्रेत होत्या ते गाणे 'जैत रे जैत' चित्रपटात आहे आणि त्यातील भावना या इतर गाण्यांपेक्षा खूपच वेगळ्या असल्याचे लक्षात आले -
मी रात टाकली, मी कात टाकली मी मोडक्या संसाराची बाई लाज टाकली.
या गाण्यात जे धैर्य आहे, जो बेदरकारपणा आहे तो इतर इंग्रजी आणि हिंदी गाण्यांत नाही. नायिकेला झाल्या प्रकाराची खंत आहे किंवा पर्वा आहे असे कोठेही या गाण्यातून दिसून येत नाही उलट एक प्रकारची मुक्ती व त्या मुक्तीतील तृप्ती ती अनुभवते आहे आणि मागचे मागे टाकून नव्या जीवनाची सुरुवात करण्यासाठी ती आसुसलेली आहे असे दिसते. आयुष्याकडे इतक्या सहजतेने पाहण्याचा दृष्टीकोन फारच कमीजणांकडे असावा.
एखाद्या व्यक्तीला सोडल्यावर किंवा त्याचे अस्तित्व आपल्या आयुष्यातून पुसून टाकल्यावर आपण खर्या समाधानाने सुटकेचा निःश्वास सोडू शकतो ही भावना आपल्या समाजात अद्याप रुजायची आहे की काय ते कळत नाही. अशी भावना माणसाच्या मनात येऊच शकत नाही असे नसावे कदाचित पूर्वायुष्यातील आठवणींमुळे ती सरळ शब्दांत व्यक्त करणे कठीण जात असावे किंवा अपराधीपणाची भावना मनात दाटून येत असावी. आपली माणसे, मैत्री, नाती ही जन्मभर सांभाळायची असतात असेच लहानपणापासून कळत नकळत आपल्यावर संस्कार केलेले असतात. एखादे नाते सांभाळणे जड किंवा कठीण होऊ शकते आणि अशा नात्यातून सुटका करणे कधीही फायद्याचे ठरू शकते हा विचार हळू हळू आपण स्वीकारतो आहोत पण संधी मिळेल तेव्हा त्याला पाश्चिमात्य संस्कृतीचे लेबल लावायलाही तयार असतो. आपल्या स्वार्थासाठी काही संबंध तोडणे किंवा त्यांच्यापासून फारकत घेणे हा विचारही नकोसा होतो.
जन्मभर माणसे जोडताना त्यांच्याबरोबर आपण प्रेम, मैत्री, जवळीक, मदत, सहचर्य या भावनांना जवळ करतोच पण प्रसंगी मत्सर, हेवा, हुकूमशाही, राग अशा नकारात्मक भावनांनाही जवळ करत असतो आणि या भावनांचा विस्फोट झाल्यावर एखाद्याला त्यातून आपली सुटका व्हावी असे वाटणे साहजिक आहे. कधीतरी केवळ प्रेमभावना संपली, आकर्षण ओसरले, नव्याची नवलाई नऊ दिवस अनुभवून झाली इतकी सरळ पण स्वार्थी भावनाही असू शकते. या सर्व भावनांचा शेवट, 'सुटका झाल्यावर समाधानाचा निःश्वास टाकणे' असाही होऊ शकतो.
भूतकाळाला कवटाळून बसणे ही बहुधा माणसाची सहजप्रवृत्ती असावी. बरेचदा भूतकाळाचे, नात्यांचे, मैत्रीचे, आपुलकीचे बंध झुगारून देणार्या व्यक्तीला समाजाकडूनच प्रतारणाही सहन करावी लागते. तरीही कोठेतरी अशा व्यक्ती आयुष्यात अधिक समाधानी असतात की काय असा प्रश्न मनाला चाटून जातो. नको असलेले क्षण, माणसे, आठवणी, प्रसंग तेथेच मागे टाकून बेदरकारपणे पुढे वाटचाल करण्याची हिंमत माणसे दाखवतात हीच मोठी कौतुकाची गोष्ट वाटते.
5 comments:
गाईडमधले 'कांटो से खींचके ये आँचल' सुद्धा बहुधा या category मध्ये येईल. हिंदी-इंग्रजी समानार्थी गाण्यांवरुन पटकन आठवले ते Greenday चे boulevard of broken dreams. हे गाणे जेव्हा प्रथम ऐकले, तेव्हा त्यातल्या 'My shadow's the only that walks beside me' वरुन जाने कहां गये वो दिन मधली 'साया ही अपने साथ था, सायाही अपने साथ है' या ओळीची आठवण झाली होती.
अरे हो! बरोबर आहे. गाईडची आठवण झालीच नाही. अगदी समर्पक गाणे, यांतही नायिकेला खंत नाही, ती नवे आयुष्य जगायला उत्सुक आहे. खरे तर गाईड चित्रपटच या संकल्पनेवर आधारित आहे.
धन्यवाद! :)
व्वा! सुरेख लिहीलंयस... खरंच मनाची पाटी स्वच्छ, कोरी करून नव्याने जगायला सुरूवात करणारे कमीच दिसतात. BTW, 'चलो एक बार फिरसे...' वरून मला संदीप खरेची 'करार' ही कविता आठवली... समजूतदारपणे वेगळ्या होणाऱ्या दोन प्रेमी जीवांबद्दलची सुंदर कविता आहे ती:
'चल आता बोलून घेऊ, बोलून घेऊ थोडॆ
सुकण्याआधी काळ आणि जाण्याआधी तडे'
वाचली आहेस का तू?
धन्यवाद प्रिया. नाही मी वाचली नाही संदीपची कविता. हल्ली मराठी वाचन कमीच होतं त्यातून कविता फारच कमी. :)
परंतु या दोन ओळींवरून समजूतदार मनाची कविता वाटली.
हा लेख वाचल्यावर, विचार करता करता आठवण झाली ती 'आंधी' या चित्रपटाची.
एकमेका पासुन दुर गेलेले दोन जीव परत आल्यावर कोणत्या भावना दाटुन येउ शकतात?
'तेरे बिना जिंदगी से कोइ, शिकवा तो नही
शिकवा नही, शिकवा नही, शिकवा नही
तेरे बिना जिंदगी भी लेकिन, जिंदगी तो नही
जिंदगी नही, जिंदगी नही, जिंदगी नही....'
अशी आणखी कोणती गाणी आठताहेत तुम्हाला?
Post a Comment