मी, गूगल आणि चंगीझ
Phew!!! साध्याच ओळी काहीही विशेष नसलेल्या. विशेष फक्त एकच नाव गेंगिझ खान किंवा चंगीझ खान. इतिहासातला क्रूरकर्मा अशी सहसा ओळख करून दिला जाणारा बाराव्या शतकातील मंगोल शासनकर्ता.
फारा वर्षांपूर्वी शाळेत असताना कुणीतरी माहीती पुरवली, "खान या शब्दाचा अर्थ 'राजा' असा होतो माहीत्ये?"
"कुठल्या भाषेत, उर्दु?" "उर्दुत नाही पण बहुधा मंगोलियन मध्ये असावे."
"हॅ! हॅ! काहीतरीच काय?"
"काहीतरीच नाही काय, मुघल हा शब्द पण मंगोल या शब्दाचीच व्युत्पत्ती आहे. चंगीझ खानही मंगोलियन होता."
"आता हा कोण चंगीझ? तो प्रेमनाथ आणि बीना रॉयच्या सिनेमात होता तो? लांब लोंबणार्या मिशांचा आणि पिचक्या डोळ्यांचा मनुष्य? तो सगळ्या खानांचा 'बाप' आहे की काय? मजाच आहे म्हणायची."
तशी त्याकाळात फक्त कुर्बानी फेम फिरोझखान आणि शोले फेम अमजदखान आणि कधीतरी कादरखान एवढेच प्रसिद्ध होते.
चंगीझची पहिली ओळख तिथे झाली. नंतर कधीतरी ऐतिहासिक पुस्तकांतून ओझरतं चंगीझ दर्शन व्हायचं तितकंच. त्यानंतर कुणा शेजार्यांच्या घरांत Dschingiz Khan या जर्मन ग्रुपचं गाणं ऐकलं. आता ७०-८० च्या दशकांतल्या डिस्को गाण्यांत चपखल बसेल असे पेहराव, वेशभूषा आणि हावभाव दाखवणारे चित्र आणि गाणे. त्यातले 'हे रायडर, हो रायडर, चेंग चेंग चेंगीझ खान' फारच मजेशीर वाटायचं. Whoa!! हा माझा आवडता शब्द कदाचित मी यांच गाण्यातून शिकले. त्यावेळी काही या गाण्यांचे व्हिडिओ निघायचे नाहीत. निघाले तरी ते भारतात पोहोचायचे नाहीत.
गेल्या काही दिवसांत सहज गूगल व्हिडिओवर गुगलताना मला हे गाणं चटकन मिळून गेलं. आता इतक्या वर्षांनी त्याचा व्हिडिओ पाहणे म्हणजे फारच विनोदी प्रकार; तरी हे गाणं पुन्हा इतक्या वर्षांनी ऐकायला आणि पाहायला मिळाल्याचा आनंदही झाला. कर्म धर्म संयोगाने त्याच दिवसांत NGC वर चंगीझ खानबद्दल डॉक्युमेंटरी दाखवली गेली. माझ्या मनात चंगीझ घोटाळत राहायला यापेक्षा अधिक काय हवं?
तसंही अलेक्झांडर द ग्रेट वाचून झालेला आहे तेंव्हा चंगीझ सुरू करायला हरकतच नव्हती. दोघेही अफाट कर्तृत्वाचे; पण अलेक्झांडर एवढा मान चंगीझच्या वाट्याला न यायचे कारण त्याचे मंगोलियन पठारावरील रानटी समजल्या जाणार्या टोळ्यांतून येणे व एरिअन आणि प्लुटार्क सारखे इतिहासकार न लाभणे असू शकेल. यानंतर चंगीझची माहीती गुगलून काढली, काढते आहे, काम सुरू आहे. फक्त वाचनाबरोबरच लिहून काढायचे मनात आले.... आणि मराठी विकीवर चंगीझने पुनश्च जन्म घेतला.
2 comments:
छान माहितीपूर्ण लेख.
मंगोल (http://www.imdb.com/title/tt0416044/) चित्रपट बघितल्यानंतर चंगीझ खान बद्दल उत्सुकता निर्माण झाली , तेंव्हा या लेखाची परत एकदा आठवण झाली. त्यानिमीत्ताने विकीवरला लेख पुन्हा एकदा वाचुन काढला. दोन्ही लेख आवडले
Post a Comment