किंमत
कसा काय हा शब्द डोक्यात आला त्याचा विचार करताना जाणवलं की काल काहीतरी भयंकर महाग वस्तू आपण इकडचा तिकडचा जराही विचार न करता विकत घेतली आहे. त्यावरून किंमत या शब्दाची किंमत ठरवता येईल काय अशी तार छेडली गेली.
आपण हा शब्द वेगवेगळ्या ठिकाणी वापरत असतो. जसे -
- तुला माझ्या कष्टांची किंमतच नाही.
- तुला माझ्या प्रेमाची किंमत नाही.
- तुला नाते संबंधांची किंमत नाही.
- मी जगाला अजिबात किंमत देत नाही.
- इतकी काही किंमत द्यायची गरज नाही त्याला.आणि असेच काही...
बरेचदा आपण आपली आणि इतरांची किंमत ठरवत असतो जसे --
- वायफळ बोलणाऱ्या माणसाला लोक फारशी किंमत देत नाहीत.
- लोक त्याची किंमत करतात म्हणून त्याच्या मागे मागे धावतात.
मला स्वत:ला हा "किंमती" प्रश्न बरेचदा पडतो. म्हणजे लिहिताना, बोलताना, निवेदन करताना नेमके कुठले शब्द वापरले पाहिजेत जेणे करून लोक आपली किंमत करतील? (अर्थात चांगली किंमत) किंवा मी अतीच बोलून गेले की काय आणि या समोरच्या माणसाने माझी नको ती किंमत केली की काय इ. इ.
या सर्वावरून एक मजेची गोष्ट ध्यानात आली की नाती, प्रेम, कष्ट, भावना या सर्वांची जर किंमत आहे तर दुसऱ्या शब्दांत या सर्व गोष्टी विकाऊ आहेत. म्हणजे योग्य किमतीवर आपण या गोष्टी खरेदी करू शकतो. कष्ट तर पैशांत खरेदी होतातच. एखाद्याला जर प्रेमाची, मैत्रीची किंमत नसेल तर त्याच्यापेक्षा चांगला खरेदीदार मिळू शकेल? पण प्रेम, नाती, मैत्री, भावना या गोष्टी खरेदी करायचं परिमाण कुठलं? शेवटी गाडी पैशांवरच येऊन थडकणार की काय? कुठेतरी हा विचार नकोसा वाटतो पण टाळता येत नाही. माणसं कळत नकळत का प्रत्येक गोष्टीची किंमत करतात, काही गोष्टी अगदी मोफत मिळू शकतात हे स्वीकारण्याची त्यांची तयारी नसते की त्या दुसऱ्याला मोफत द्यायची तयारी नसते?
कुठेतरी वाचल्याचं आठवतं की प्रेम करावं तर with no strings attached. असं करायला गेलं म्हणजे प्रेम फक्त साधू संतांचीच मक्तेदारी होऊन राहील. सामान्य माणूस जितकं प्रेम दुसऱ्यावर करतो, तितक्याच प्रेमाच्या परतफेडीची दुसऱ्याकडून अपेक्षा करतो. आला पुन्हा व्यापार; देण्या घेण्याचा, किंमत ठरवण्याचा. माणूस माणसाला आहे तसा स्वीकारू शकत नाही हे त्यातलं एक सत्य आणि बघायला गेलं तर माणूस स्वत:ला तरी आहे तसा कुठे स्वीकारतो?
अवांतर: काही लोक किंमत या शब्दा ऐवजी कींमत असा शब्द वापरतात. तेंव्हा नेमका शब्द कोणता हे निश्चित करण्यासाठी पुस्तक उघडून पाहिला. काही म्हटलं तरी मराठी लिहिताना शुद्धलेखनाला "किंमत" द्यावी लागतेच नाही का?
4 comments:
किंमत ही सापेक्ष असते हे पटले, :) लेख सुंदर झाला आहे.
शैलेश आणि टग्या तुमचे लेख वाचण्याबद्दल आणि प्रतिक्रिया लिहीण्याबद्दल आभार.
masta lihila ahes.
lekh aavadla. pan jasa shailesh mhantoy, ya goshti khoop sapeksha ahet.
as usual vicharancha bhunga tu dokyat sodlas mazya.
--nana
Post a Comment