प्रकार

Friday, September 01, 2006

स्विमिंगचा क्लास

हल्ली मी माझ्यावरच जाम खूश आहे; म्हणजे तशी कधी नव्हते? पण हा नवा आनंद थोडा वेगळाच आहे. अर्ध आयुष्य निघून गेल्यावर अचानक कसली तरी उपरती झाल्यासारखं एका दिवसांत पोहायला शिकायचं ठरवलं. कर्म धर्म संयोगाने युनिव्हर्सिटी मध्ये Adult Swimming Classes आहेत हे कळलं आणि अस्मादिक पैसे भरून लगेच तयार.

युनिव्हर्सिटी तशी जवळ नाही जाऊन येऊन ६० मैलांचा पल्ला. अर्थात, एकदा जायचंच ठरवल्यावर ६० काय आणि १०० काय? तरी डाऊन टाऊन मध्ये गाडी घालायला अजूनही थोडीशी भिती वाटते कुठेतरी. आणि संध्याकाळच्या वेळी सगळं आवरून पोरीला कारमध्ये शिकवत शिकवत घेऊन जायचं म्हणजे थोडीश्शी सर्कसच. पण पोहायची इच्छा दांडगी होती. तशी ती लहानपणापासूनच होती पण का कुणास ठाऊक मुहूर्तच लाभला नाही कधी.

पहिल्या दिवशी आमच्या swimming instructor (इ-ताई) ने 'पोहण्यात नक्की काय काय येतं तुम्हाला?' हा प्रश्न टाकला. माझ्याबरोबरच्या बाकीच्यांना काही ना काही येत होतं. माझं उत्तर मात्र, "३-४ फूट पाण्यात कडेला हात न धरता उभं राहता येतं." हे ऐकून इ-ताई पाण्यात गार झाल्या बहुधा.

"पाच फूट पाण्यात उभं राहता येईल का?" त्यांनी प्रश्न टाकला.

"अं.... माहीत नाही. प्रयत्न करते. तशी माझ्या नवऱ्याला एकच बायको आणि मुलीला एकच आई आहे. तेंव्हा सांभाळून घ्या."

"हरकत नाही. मी बाजूला उभी आहे. करा सुरुवात. प्रथम श्वासाने सुरुवात करू."

ठीक! हे सहज जमण्यासारखं होतं. मुलीबरोबर करून पाहिलं होतं बरेचदा.

"आता दोन्ही पाय उचलून पाण्यात तरंगता येतं का ते पाहा."

मी मेरी झांसी नहीं दूंगीच्या पावित्र्यात पाय रोवून उभी. "हे काय आपल्याच्याने जमणार नाही. उचलले पाय आणि तरंगलो पाण्यात असं कधी केलं नाही." असा जोरदार विचार फक्त एकदा मनातल्या मनात केला आणि दिलं झोकून आरामात. तसे ही एकदा फी भरल्यावर आणि नवरा (छडी शिवाय) समोर बसून पाहत असल्यावर माझ्याकडे इतर फार मोठे पर्याय होते यातला भाग नाही.

त्यानंतर गेल्या काही दिवसांत तरण तलावांतलं बरंचसं पाणी पिऊन घेतलं आहे. दोन चार वेळा बुड बुड घागरीही करून पाहिलं. नाका तोंडात पाणी गेल्यावर खोकून जीव ही बेजार करून घेतला. पण दरवेळेला दिलं झोकून बिनधास्त.

तेंव्हा पासून चार क्लास झाले. गेल्या १-२ क्लासेस पासून मला आपण गेल्या जन्मी कुठल्यातरी देवमाशाच्या जन्मात होतो की काय असं वाटायला लागलं आहे. (आता साइझने मला देवमासाच म्हणायला लागेल) कालच्या क्लासला ८ फ्री स्टाइलच्या perfect फेऱ्या मारल्या. बाकीचे अजून फ्लोट लावून तरंगताहेत आणि अस्मादिक पाण्यात जलपरी गत सूर मारताहेत. जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटलं. गोष्ट खूश होण्यासारखीच आहे नाही का? आमची इ-ताई ही जाम खूश आहे चेलीवर. काल संध्याकाळी म्हणाली, "असं करा, तलावाच्या मध्यापर्यंत पोहत जा."

बरं केलं मी तसं. तशा इ-ताई ओरडून म्हणाल्या,"Now shout loudly and say, YEAAHHHH.... I AM THE BEST."

मी तिथल्या तिथे संकोचाने ... डुबुक!

10 comments:

Anonymous said...

nice experiance. khupach chaan.

Anonymous said...

nice

Abhijit Bathe said...

Well written!
I have a suggestion though - 'asmadik' word irritates. Why not use 'mee'? But you have a good style. Keep it up.

Priyabhashini said...

प्रतिसादांबद्दल सर्वांचे धन्यवाद.

निरंजन उर्फ निरूभाऊ अहो इnstructor लिहायचा कंटाळा आला होता आणि ती एक तरूण मुलगी होती म्हणून मी तिला असंच टोपण नांव 'इ-ताई' दिलंय इतकंच. उगीच टाइमपास झालं.

प्रमोद देव said...

झकास!नेहेमीप्रमाणेच खुसखुशीत!
प्रियाली आपण मागे 'स्पर्श' बद्दल लिहिले होते. त्यानंतर इतर इंद्रियांवर लिहिणार होतात.काय झाले त्या संकल्पाचे.लिहिलेत की नाही?
अर्थात मी आज बऱ्याच दिवसांनी इथे चक्कर टाकली असल्यामुळे अजून पूर्ण अनुदिनी बघितली नाहीए. आपले मनोगतावरचे अस्तित्व हल्ली विशेष जाणवत नाही असे का?कामात फार व्यग्र आहात काय?असो.
आपली अनुदिनी जसजशी वाचेन तसतशी प्रतिक्रिया देत जाईन.
धन्यवाद!
प्रमोद देव

Akira said...

Priya,

Lekh wachtanna gammat watli :)..majhe pohayche asaphal prayatna athawale..

Priyabhashini said...

प्रमोदकाका आणि अकिरा तुम्हा दोघांचे धन्यवाद. प्रमोदकाका वेळ मिळाल्यास परफ्युमेनिएक जरूर वाचा. अत्तरांची आवड नसली तरी तो पंचेद्रियातील (सु)गंधाशी जवळीक साधणारा लेख आहे, आणि त्यात इतर माहीतीही आहे. बाकी तुम्हाला व्य. नि.तून कळवले आहेच.

prashant phalle said...

झक्कास आहे. देवमासा :) ग्रेट.

Gauri said...

Nice story...I remembered my adult swimming lessons in Univ. at Buffalo.
I can swim with a float and only in a lane next to the wall!
My eTai had given up on me..

ऊर्जस्वल said...

वा! खूपच लवकर शिकलात की पोहोणे. जातीच्या हुशाराला कुठलीही कला सोपीच.

marathi blogs