प्रकार

Wednesday, June 16, 2010

ठेव

लाल दिवा लुकलुकत होता. स्मिताने प्ले बटण दाबलं तसा अंजूचा आवाज घरात घुमला.

"अजून आली नाहीस का गं? मला वाटलं घरी पोहोचली असशील म्हणून फोन केला होता. परवाही केला होता पण तेव्हाही नाही भेटलीस. इतक्यात पोहोचलीस तर फोन कर, मी वाट बघते....खट्ट"

स्मिताने क्षणभर डोळे मिटले. 'नको आता नकोच फोन करायला. नंतर करेन सावकाश. काहीतरी कारण सांगेन. आधीच उशीर झाला आहे, डोकं कावलं आहे आणि त्यात अंजूने नानाकाकांचा विषय सुरु केला तर... नकोच!'

गॅसवर तिने चहाच आधण चढवलं आणि ती तोंड धुवायला वॉशबेसिनपाशी गेली. 'नानाकाकांबद्दल सांगायला हवं अंजूला. आई म्हणत होती की कानावर घाल तिच्या... पण नुसतं सांगून प्रश्न सुटणार आहे का?' स्मिताने चेहर्‍याला खसाखसा साबण लावला. 'इथे लांब राहून फक्त चिंता करत रहायच्या. विषय उगाळत राहायचे आणि डोळ्यातून पाणी काढायचं. पटकन जाऊन पाहून यावं म्हणायला मुंबई काही तासाभरावर नाही.' स्मिताने पाण्याचा हबका तोंडावर मारला आणि टॉवेलमध्ये चेहरा लपवला.

----



अंजू तिची लहानपणापासून जिवाभावाची मैत्रिण. दोघी एकाच वयाच्या, एकाच इमारतीत राहणार्‍या, एकाच शाळेत आणि दहावीपर्यंत एकाच वर्गात होत्या. अभ्यास, खेळ, क्लास, खरेदी सगळीकडे दोघींची जोडी एकत्रच असे. जेवा-खायलाही अंजू अनेकदा स्मिताकडे असे पण त्यामानाने स्मिताचा अंजूच्या घरातला वावर कमी होता. कारण नानाकाका. अंजूच्या वडिलांचा करडा स्वभाव, माणूसघाणेपणा आणि कडक शिस्त हा सर्वांच्या नावडीचा विषय होता.

नानाकाका गरीबीत वाढलेले. त्यांचे वडिल लहानपणीच अपघातात गेले. नानांच्या आईने पोटाला चिमटा घेऊन इंटरपर्यंत त्यांना कसेबसे शिकवले. इंटरनंतर नाना नोकरीला लागले. नानांच्या मागे लग्नाची बहिण होती. एक धाकटा भाऊ होता. घरातल्यांचं करता करता नाना अबोल होऊन गेले. काटकसरीने राहण्यासाठी त्यांनी अंगाला शिस्त लावून घेतलीच पण स्वभावात तुसडेपणा शिरल्याचं त्यांच्या गावीही आले नाही. यथावकाश बहिणीचे लग्न आणि भावाचे शिक्षण त्यांनी करून दिले. नानांचेही लग्न झाले. रमाकाकूंनी नानांचा स्वभाव लवकरच ओळखला असावा. इतरवेळेस बोलक्या असणार्‍या गपिष्ट रमाकाकू नानांच्या समोर दबकून राहायच्या. घरातला नानांचा एकाधिकार मुलांच्याही अंगवळणी पडला होता. अंजू स्वभावाने गरीबच पण धाकट्या अमितलाही नानांनी जरबेत ठेवले होते. काही मोजके मित्र सोडता नाना कोणाशी हसूनखेळून बोलल्याचेही आठवत नव्हते. नोकरीत मात्र नाना हुशार आणि कामसू म्हणून ओळखले जात आणि शिक्षण कमी असले तरी जम बसवून होते.

दहावीनंतर अंजूने कॉमर्सला जावे असा निर्णय नानांनी घेतला. अंजूचे परीक्षेतले गुण बघता तिला सायन्सला प्रवेश सहज मिळाला असता परंतु "दोघांचे खर्च जमणार नाहीत. तू हुशार आहेस. कॉमर्सला गेलीस तरी तुझं अडणार नाही. तुझ्या शिक्षणाचा खर्च मला द्यावा लागणार नाही. अमितची शिक्षणातली बाजू लंगडी आहे; त्याला पैशांची मदत लागली तर आमच्या म्हातारपणाची ठेव म्हणून त्याला शिकवण्याकडे लक्ष अधिक द्यावे लागेल. तुझे लग्न झाले की तुझ्याकडून आम्ही अपेक्षा करू शकत नाही. तो मुलगा आहे. त्याला आता शिकवू, चांगले ठेवू तर तो आम्हाला म्हातारपणी बघेल." अशी अनेक कारणे देऊन अंजूला नानांनी कॉमर्सकडे जाण्याची गळ घातली. अंजू खट्टू झाली पण नानाकाकांना विरोध करण्याचं बळ तिच्याकडे आणि रमाकाकूंकडे नव्हतं.

बी.कॉम. झाल्यावर पुढे शिकण्याचीही अंजूची इच्छा होती पण नानांनी परस्पर आपल्या मित्राच्या पुतण्याशी तिचे लग्न करून देण्याचा घाट घातला होता. संजय अमेरिकेत होता. त्याच्या घरच्यांना त्याचे लग्न लवकर उरकून टाकायचे होते. रूपाने देखणी अंजू त्यांना पसंत होती. अंजूची मात्र इतक्या लांब लग्न करून जाण्याची इच्छा नव्हती. रमाकाकूही पोरीला इतक्या लांब पाठवायला तयार नव्हत्या. 'तिला अद्याप शिकू द्या. लहान आहे ती तशी.' असे त्यांनी सुचवूनही पाहिले पण नानांना अंजूच्या शिक्षणाच्या बाबतीत झालेली हयगय भरून काढायची होती. त्यांनी अंजूला समजावले की 'तिच्या शिक्षणाच्या बाबतीत ते कमी पडले असले तरी अमेरिकेचे स्थळामुळे ती जन्मभर सुखी राहील. भविष्यात कसलीही अडचण येणार नाही.' नानांनी अमितच्या शिक्षणासाठी भरपूर खर्च करून त्याला इंजिनिअरींगला पाठवले होते. त्याच्या अभ्यासाचा, हॉस्टेलचा खर्च भागवून अंजूचे लग्न धूमधडाक्यात लावून देणे त्यांना जमणार नव्हते. संजयच्या घरच्यांची मोठ्या लग्नाची अपेक्षा नव्हती. मुलगा लहान सुट्टीवर येथे येणार आहे, चटकन लग्न उरकून टाकायचे म्हणत होते. सर्वकाही नानांच्या पथ्यावर होते. त्यांनी अंजू आणि रमाकाकूंना न जुमानता लग्नाची बोलणी करून टाकली.

लग्न होऊन अंजू अमेरिकेला गेली तरी स्मिताला तिची नियमित पत्रे येत. संजयने अंजूला स्वतःहून पुढे शिकण्याची गळ घातली होती. अंजूची त्याला अर्थातच आनंदाने तयारी होती. आपले नवे आयुष्य, शिक्षण वगैरे यांत ती चटकन रमून गेली. आपल्या वडिलांनी आपल्यावर अन्याय केला आहे ही खंत तिच्या मनातून गेली नसावी. पत्रांतून स्मिताकडे अंजूला मन मोकळं करता येत होतं. नानांच्या अरेरावीने आपण आयुष्यात मागे पडलो ही उणीव तिला भरून काढायची होती. घरी ती अभावानेच पत्र लिहित असे किंवा फोन करत असे. केलाच तर रमाकाकूंची चौकशी करे. त्यांच्याशी बोलत असे. रमाकाकू तिला कधीतरी भारतात ये म्हणून सांगत पण ती ऐकून कानाआड करत असे.

स्मिताचे यथावकाश लग्न झाले आणि लग्नानंतर दोन वर्षांत सुधीरनेही आपले बस्तान अमेरिकेला हलवले. मधल्या वर्षांत अंजूने आपले शिक्षण पूर्ण केले, अमेरिकेत नोकरी धरली, तिला मुलगा झाला. दरवेळेस कसले ना कसले कारण पुढे करून ती भारतात येण्याचे टाळत गेली. अमितच्या लग्नालाही तिने सुट्टी मिळत नाही हे कारण सांगून टाळले. रमाकाकूंना या गोष्टीचा विलक्षण त्रास होत असे पण त्या बोलून दाखवत नसत.

दरम्यान, नानाकाका रिटायर झाले. त्यांना इतक्या वर्षांच्या नोकरीचा उत्तम फंड मिळाला. गावाकडली जमिनही त्यांनी विकली होती, त्याचे चांगले पैसे मिळाले होते. एकंदरीत रिटायर झाले तरी त्यांची परिस्थिती उत्तम होती. परंतु, नानांच्या स्वभावात झालेला बदल सर्वांना जाणवण्यासारखा होता. नानांच्या हेकट आणि माणूसघाण्या स्वभावाला अचानक मुरड पडल्यासारखी दिसत होती. घरातल्या सर्व गोष्टींत त्यांनी आपला अधिकार गाजवणे कमी केले होते. अमितशी आणि त्याच्या बायकोशी ते मिसळून राहण्याचा प्रयत्न करत. नातेवाईकांकडे येणेजाणे त्यांना पूर्वी आवडत नसे परंतु काही मोजक्या नातेवाईकांकडे रमाकाकूंबरोबर येणे-जाणे त्यांनी सुरू केले होते. अंजूचा फोन आला तर मागून घेत. तिच्याशी, जावयाशी, नातवाशी बोलत. तिने भारतवारी करावी म्हणून गळ घालत.

रमाकाकू सोडून सर्वांना नानांच्या बदललेल्या स्वभावाचं आश्चर्य वाटे. रमाकाकू याविषयी बोलताना स्मिताच्या आईला एकदा म्हणाल्या, "जोपर्यंत नोकरी असते तोपर्यंत गुर्मी असते. पुरुष रिटायर झाला की त्याला विचारपूस करणार्‍या माणसांची गरज लागते. बदल झाला आहे ते बरेच झाले. मी म्हणून अशा स्वभावाला दबून राहीले. सून ऐकून घेईल का? त्यांनाच ते जाणवत असेल म्हणून बदलले म्हणायचे."

नानांच्या बदललेल्या स्वभावामुळे अंजूच्या मनातली अढीही कमी झाल्यासारखं स्मिताला वाटत होती. अनेक वर्षांनी अंजूने भारतवारी केली. आजी आजोबांनी नातवाला पाहिलेही नव्हते. दोघांचे खूप कोडकौतुक नानांनी केले. अंजू फोनवर स्मिताकडे पूर्वीपेक्षा दिलखुलासपणे नानांचे नाव घेई. नानांबद्दल तिच्या बोलण्यातला विशादही ओसरल्यासारखा वाटत होता.

"बरं झालं बाई. इतक्या वर्षांनी का होईना पण रमाकाकू आणि अंजू दोघी आनंदी आहेत ना, मग झालं तर!" स्मिताची आई म्हणालीही. परंतु, आनंद फार कमी काळ टिकतो म्हणतात.

नानाकाकांना एक दिवस सकाळी नेहमीप्रमाणे जाग आली पण गादीवरून उठता येईना. अमितने आणि त्याच्या बायकोने धावाधाव केली म्हणून अनर्थ टळला. नानांना अर्धांगवायूचा तीव्र झटका आला होता. शरीराची एक बाजू लुळी पडली आणि वाचेवरही परिणाम झाला. जन्मभर वाघासारख्या वागलेल्या माणसाची अशी दयनीय अवस्था पाहणे सर्वांनाच कठिण होत होते. रमाकाकू होत्या म्हणून सर्व निस्तरत होते तरी अमितला आजारी बापाचे लोढणे दिवसेंदिवस नकोसे होत चालले होते.

"म्हातारपणी मुलगा सांभाळेल म्हणून मला शिकू दिलं नाही नानांनी. त्याला शिकवलं. त्याची परिस्थिती चांगली झाली तर तो म्हातारपणाची ठेव बनेल म्हणून. आई सांगत होती की अमित त्यांच्या तोंडावर म्हणतो की 'अशा परिस्थितीत अजून किती वर्षे सांभाळायचे तुम्हाला? आमची कामेधामे सोडून नाही बघता येत तुमच्याकडे.' वाचा गेली आहे नानांची. ऐकू येतंय त्यांना अद्याप. जातील तर बरे होईल. सुटतील सगळेच पण मृत्यू असे सांगून येत नाहीत." नानांबद्दल बोलताना एके दिवशी अंजू म्हणाली.

नियतीही विचित्र असते. नानांची अशी तीन वर्षे सेवा करून रमाकाकू अचानक फ्लूचे निमित्त होऊन गेल्या. धडधाकट होत्या; त्या जातील अशी कोणालाच कल्पना नव्हती पण होणारं टळत नसतं. सगळंच त्रांगडं झालं होतं. अंजू तातडीने भारतात गेली. काकूंचे दिवस होण्याआधीच अमितने विषयाला तोंड फोडले. नानांची जबाबदारी फक्त त्याच्या खांद्यावर पडत होती ते त्याला मान्य नव्हते. "तू अमेरिकेत राहणार आणि आईबापांच्या खस्ता इथे राहून मी काढायच्या. खर्च, सेवा आणि त्रास फक्त माझ्या नशिबी." अंजूने ऐकून घेतलं. तसंही, त्या परिस्थितीत दुसरं काय जमणार होतं? नानांची काळजी घ्यायला एक गडी निश्चित केला. त्याचा पगार अंजूने द्यायचे असे ठरवले. जातेवेळी अंजू नानांचा निरोप घ्यायला गेली तशी नानांनी तिचा हात गच्च धरून ठेवला आणि लहान मुलासारखे गलबलून रडले.

परत आल्यावर अंजूला नानांच्या तब्येतीची सतत टोचणी लागून असे. घरी फोन केला तर अमितच्या आणि त्याच्या बायकोच्या फक्त तक्रारी ऐकून घ्याव्या लागत. अंजूने काही सुचवले तर त्या दोघांना पटत नसे. कधीतरी अंजूने नानांशी बोलण्याची इच्छा दाखवली तर नाना कानाला फोन लावत पण पलिकडे अंजूला फक्त रडण्याचा आवाज येई. स्मिताकडे मन मोकळं केलं की अंजूला तेवढंच बरं वाटे.

----


चहा उकळायला लागला तशी स्मिता भानावर आली. कप हातात घेऊन ती डायनिंग टेबलाच्या खुर्चीवर टेकली. चहाच्या कडक घोटाबरोबर तरतरी आल्यासारखे वाटले. आई मध्यंतरी सांगत होती.

अमितच्या बायकोने नानांची रवानगी फ्लॅटमधल्या बंद बाल्कनीमध्ये केली होती. बाल्कनी काचा लावून बंद केली तरी काचेतून इमारतीतल्या सर्वांना नानांची शोचनिय परिस्थिती दिसत होती. घराच्या मालकाची अशी परिस्थिती पाहून लोकांना विशाद वाटत होता पण मध्यात कोण पडेल म्हणून सर्व गप्प होते. उगीच अंजूला त्रास का म्हणून स्मिता हे तिला बोललीच नव्हती. काल आईचा फोन होता...

"पावसाची झड आली होती आज. अमित आणि त्याची बायको दोघे ऑफिसला आणि तो गडीही मेला कुठेतरी गायब होता. बाल्कनीच्या खिडक्या उघड्या होत्या. भिजत होते गं नाना बिचारे. बघवलं नाही पण काय करू? दरवाजा वाजवला तर उघडायला होता कुठे तो गडी? गेला असेल गाव उंडारायला. तू सांग अंजूला. बघवत नाही नानांची दैन्यावस्था. कसंही का होईना, मुले आहेत. त्यांनी नाही बघायचं तर कुणी?"

'काय सांगायचं अंजूला? नेमकं काय करणार होती ती इथे बसून? पण सांगायला तर हवं. वडिल आहेत तिचे.'

स्मिताने अर्धवट प्यालेल्या चहाचा कप बाजूला सारला आणि फोनची बटणं दाबायला सुरुवात केली.

4 comments:

Anonymous said...

खर आहे. ती इंग्रजीतली म्हण ठाऊक आहे." A son is a son who is for wife, but daughter she is for life" बऱ्याचदा हि अशी उदाहरणे आपल्या डोळ्यां देखत असतात. तरीदेखील मुलगा खूप जणांना हवा असतो. अस का?

Abhishek M. Chaudhari said...

छान ... छान रंगवली आहे कथा...
घराघराची कथा आहे म्हणा... पण भिडली

Anonymous said...

khup chan....tashi hi katha navi nahi pan tumcha lekhan farach chhan vatla...ekonek chritra, tyanchi kalpana, sagla sammor ghadtaya asa vatla...apratim....ata pudhcha bhaag vachaychi ichchha ahe....

Priyabhashini said...

अभिप्रायासाठी धन्यवाद. त्यासोबत तुमचं नाव असतं तर कुणाचा अभिप्राय तेही कळलं असतं.कथेत नावीन्य नाही पण घराघरात घडणारी कथा आहे. मांडणीच्या श्रेयाबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

marathi blogs