स्वप्नांच्या जादूनगरीत
राज्याच्या वेशीत आम्ही प्रवेश केला तसे एकाने आमंत्रणपत्रिका आमच्या हातात कोंबली. राजवाड्यात सोहळा सुरू होण्यास थोडाच वेळ बाकी होता. राजवाड्यासमोर लोकांची गर्दी जमू लागली होती. उशीर झाला तर राज्याभिषेकाचा सोहळा लांबूनच पाहावा लागेल ही जाणीव झाली तशी मी मुलीला सांगितले, "हात घट्ट पकड. थोड्या वेळात तोबा गर्दी उसळली की त्यात हरवायचीस कुठेतरी.” आणि आम्ही तिघे राजवाड्याच्या दिशेने धावत सुटलो. आजच्या सोहळ्याप्रीत्यर्थ जरीच्या पताका, कलाबतू आणि बादल्याच्या कामाने राजवाडा सजवला होता. सुवर्णनक्षीने सजवलेला राजवाडा आज विशेष खुलून दिसत होता. राजवाड्यातून सैनिकांची फलटण आणि त्यांच्या मागे अमीर उमराव राजवाड्याच्या मुख्य सदरेवर येऊ लागले. पाठोपाठ राजेसाहेब येण्याची वर्दी आली आणि राजेसाहेबांचे आपला पुत्र प्रिन्स चार्मिंग आणि पुत्रवधू सिंड्रेला यांच्यासमवेत आगमन झाले.
आपल्या कारभारातून निवृत्ती घेऊन राजेसाहेब राज्यकारभार आजपासून राजपुत्राच्या हाती सोपवणार होते. सिंड्रेला राज्याची राणी होणार आणि परीराणी आपल्या करामती दाखवायला येणार नाही असे थोडेच होईल? सिंड्रेलाच्या आगमनाबरोबरच राजवाड्याच्या सज्जात परीराणीही अवतीर्ण झाली. सोबत नौबती झडल्या, आकाशात फटाक्यांची फुले उधळली गेली. सिंड्रेला तिच्या शुभ्र सफेद वेशात खुलून दिसत होती. देखण्या राजपुत्रासमवेत जोडा अगदी शोभून दिसत होता.समारंभासाठी मोठमोठ्या पाहुण्यांना आमंत्रण होते. त्यांचेही आगमन होऊ लागले. राजेसाहेब आणि युवराज, युवराज्ञीला त्यांची ओळख करून दिली जात होती. अल्लाउद्दीन आणि जास्मीन, ब्युटी आणि बीस्ट, स्नोव्हाईट (हिमगौरी) आणि तिचा राजकुमार, स्लीपिंग ब्युटी (झोपलेली राजकन्या) आणि तिचा राजकुमार असे सर्वजण या सोहळ्याला आवर्जून उपस्थित होते. पाहुण्यांनी युवराज आणि युवराज्ञीचे अभीष्टचिंतन केले. समारंभासाठी आलेल्या कलावंतांनी नृत्य आणि गायन सादर करून पाहुण्यांना रिझवले. राजेसाहेबांनी उठून आपला मनोदय उपस्थित पाहुण्यांसमोर व्यक्त केला आणि आपला मुकुट आपल्या पुत्राच्या माथ्यावर चढवला. टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात सिंड्रेलालाही राणीचा मुकुट बहाल करण्यात आला. सिंड्रेलाने उपस्थितांचे आभार मानले.
"राज्याच्या देखरेखीत कोणताही कसूर होणार नाही, राज्याचे प्रजाजन सुखी राहोत, सर्वांचे कल्याण होवो." अशी इच्छा व्यक्त केली आणि नृत्य गायनाच्या कार्यक्रमांना पुनश्च सुरुवात झाली. यावेळेस या आनंदात सर्व उपस्थित पाहुणे, सिंड्रेला आणि प्रिन्स चार्मिंग यांनीही भाग घेतला आणि हळूहळू उपस्थितांचे निरोप घेतले.
परीकथेतील पात्रांना याचि देही याचि डोळा पाहून तृप्त झाल्यावर मी मुलीला विचारले, “आता काय करूया? अल्लाउद्दीनच्या उडत्या गालिच्यावरून सफर, डम्बोच्या पाठीवरून आकाशाची सफर, कपबशीत बसून गिरक्या घेऊया, पायरेट्सना भेटायला त्यांच्या जहाजात जाऊया, जंगल सफारीला भेट देऊया, मिकी माऊसच्या घराची सफर करूया, बाहुल्यांच्या राज्याची सफर करूया की खुद्द मिकी माऊसच्या गळ्यात पडून दोन चार फोटो काढूया?” तशी ती खुदकन हसत म्हणाली, “मम्मा, तू तर माझ्यापेक्षाही जास्त एक्सायटेड आहेस.”“असणारच!” मी तिला चिडवले, “स्वप्नांच्या या जादूनगरीत आज तू राजकन्या आहेस आणि मी.... मीही राजकन्याच आहे.”
स्वप्नातली ही नगरी सत्यात उतरते ती अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्यातील ओरलॅंडो शहरात वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टमधील मॅजिक किंगडम पार्कात.---प्रत्येक प्रौढ माणसात एक लहान मूल दडलेले असते. काहीजण या मुलाला दडपून टाकतात, काही त्याचे अस्तित्वच विसरून जातात तर काही थोडके स्वत:तील या मुलाची निरागसता, खेळकरपणा, उत्साह जपत राहतात, आपल्यातील मूल जगवतात आणि स्वत:सह इतरांनाही आनंदी करतात. वॉल्टरने लहानपणापासूनच आपला चित्रकलेचा छंद जोपासला होता. शाळेतून निघणार्या मासिकात तो चित्रे आणि कार्टून्स काढत असे. पुढे सैन्यात भरती होण्याच्या इच्छेने त्याने शाळा सोडली पण वय कमी भरल्याने त्याला सैन्यात प्रवेश मिळाला नाही. खिशात अवघे ४० डॉलर्स आणि आपल्या चित्रकलेचे बाड घेऊन वॉल्टरने हॉलिवूडमध्ये प्रवेश केला तो दिग्दर्शनाची संधी मिळावी म्हणून. परंतु हेही स्वप्न सत्यात उतरले नाही. जेथून तेथून नकार मिळाल्यावर एका गराजमध्ये त्याने आपला स्टुडिओ थाटला आणि कार्टून्सच्या निर्मितीला सुरुवात केली आणि म्हणता म्हणता एक दिवस वॉल्टरच्या आल्टर इगोचा "मिकी माऊस"चा जन्म झाला. उत्कृष्ट निर्माता, दिग्दर्शक, कार्टूनिस्ट, पटकथा लेखक, व्यावसायिक आणि मानवतावादी म्हणून जगाला वॉल्टरची, वॉल्ट डिस्नींची ओळख आहे पण त्यांच्यातल्या स्वप्नाळू, निरागस मुलाची ओळख पटते ती त्यांनी निर्माण केलेल्या डिस्नीलॅंड, डिस्नीवर्ल्डसारख्या प्रचंड स्वप्ननगरांना भेट दिल्यावर. स्लीपिंग ब्युटी, अल्लाउद्दीन, सिंड्रेलासारख्या ज्या परीकथांत रममाण होऊन आपण आपले बालपण पोसले त्या परीकथेतील पात्रे खरी होऊन आपल्यात वावरू लागणे आणि आपल्याला त्यांच्या स्वप्नांच्या दुनियेत घेऊन जाणे यांत असणारा अनोखा आनंद, गेल्या वर्षीच्या उन्हाळ्यात ओरलॅंडोच्या ३०,००० एकर जमिनीवर वसलेल्या वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टला भेट दिल्यावर आम्हाला मिळाला. करमणूकीचे आणि विसाव्याचे जगातील सर्वात मोठे ठिकाण म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट प्रसिद्ध आहे. या स्थळाचे विशेष म्हणजे,लहानमोठ्यांना जादूनगरीची सफर घडवणारे मॅजिक किंगडम, चित्रपटातील भूलभुलैया आणि करामतींची ओळख करून देणारा एमजीएम स्टुडियो, आंतरराष्ट्रीय संस्कृती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांची ओळख करून देणारे एपकॉट, ५०० एकर जमिनीवर वसलेले प्राणी उद्यान, ऍनिमल किंगडम ही चार प्रमुख थीम पार्क्स, दोन वॉटर पार्क्स, गोल्फची मैदाने, क्रीडासंकुल, मोटारींचा रेसकोर्स, डाऊनटाऊन डिस्नी आणि त्यालगत असणारी अनेक आकर्षणे, राहण्याचे सुमारे २० प्रचंड रिसॉर्टस आणि असंख्य खरेदीची ठिकाणे आणि उपाहारगृहे यांनी हा परिसर नटलेला आहे.मानवनिर्मित आकर्षणांत अमेरिकेतील एक सर्वोत्तम स्थळ म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे नाव घेता येईल. या पर्यटनस्थळाला भेट देऊ इच्छिणार्या पर्यटकांना, सहल ठरवण्यासाठी उपयुक्त होईल अशी माहिती या लेखाद्वारे येथे संकलित करण्याचा मानस ठेवून आहे.
वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टची सहल कशी ठरवावी?
सहल ठरवण्याच्या ४ ते ६ महिने आधी डील्स तपासावीत. ही डील्स वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या संकेतस्थळावर तसेच अनेक पर्यटन उद्योगांच्या संकेतस्थळांवर मिळतात. तेथून तुम्हाला विमानाची तिकिटे, राहण्याचे हॉटेल आणि पार्कची तिकिटे यांची सोय करता येते. याखेरीज अनेक इतर पर्यटन व्यावसायिकांमार्फतही या सहलीचे आयोजन करता येईल.उन्हाळ्यात फ्लोरिडाचे तापमान सुमारे ३५-४० डि. से.च्या आसपास असल्याने वसंत किंवा शरद ऋतूत ही सहल आखणे उत्तम. तसे हे स्थळ बाराही महिने पर्यटकांनी फुललेले असते आणि अत्युच्च गर्दीचा काळ रिसॉर्टच्या संकेतस्थळावर दिलेला असतो, तोही सहल ठरवण्यासाठी उपयोगी पडावा. उन्हाळ्याच्या दिवसांत सनक्रीन चोपडणे आणि पावसाची शक्यता असल्यास पाठीवरील बॅकपॅकमध्ये पातळ रेनकोट घेणे बरे पडते. आम्ही दोन वेळा मॅजिक किंगडमला भेट दिली असता, दोन्ही दिवशी तास-दोन तास मुसळधार पाऊस झाला आणि रेनकोट घालून सर्व आकर्षणांची मजा लुटावी लागली.डिस्नी वर्ल्डमधील सर्व पार्क्स आरामशीरपणे बघायची झाली तर सुमारे ५-६ दिवसांची सहल योजावी लागते. पर्यटकांनी कमीतकमी ४ दिवस तरी या सहलीसाठी राखून ठेवावेत. त्यापेक्षा कमी दिवसांत ही सहल अतिशय दगदगीची होते. या पार्कांत येणार्या प्रचंड गर्दींमुळे प्रत्येक आकर्षण पाहण्यास १ तासाहून अधिक काळही लागू शकतो. यावर उपाय म्हणून वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट "पार्क हॉपर" पासेस मिळतात. ४ दिवसांच्या वर राहणार्यांनाच थोडे अधिक डॉलर्स भरून या पासांचा फायदा होतो. हे पास घेऊन कोणत्याही पार्कात कधीही प्रवेश करता येतो किंवा एकाच पार्कात वेगवेगळ्या दिवशी प्रवेश करता येतो. तसेच येथे काही पार्कांत "फास्टपासेस" मिळतात. फास्टपासमुळे एखाद्या आकर्षणासाठी तासन्तास रांगेत उभे राहण्याचे कष्ट वाचतात. हे पास फुकट मिळतात व ते घेतले की हव्या असणार्या आकर्षणांसाठी आपल्याला हव्या त्या वेळी आपला क्रमांक राखून ठेवता येतो.
कोठे राहावे?
डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या परिसरात राहणे कधीही उत्तम. येथे असणार्या अनेक रिसॉर्ट हॉटेल्समध्ये सामान्यांपासून श्रीमंतांना आवडेल अशा सर्व प्रकारे राहण्याची सोय होते. प्रत्येक रिसॉर्ट हॉटेलमध्ये खाण्यापिण्यासाठी फास्टफूड आणि इतर रेस्टॉरंट्स आहेत, एक दोन लहान किराणा दुकाने, स्विमिंग पूल इ. सारख्या सोयींनी ही हॉटेल्स सुसज्ज आहेत. या रिसॉर्ट हॉटेल्समध्ये राहण्याचा दुसरा फायदा म्हणजे प्रत्येक पार्काला जाणारी बस हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी येते आणि कार नेणे, ती पार्क करणे, तेथून पार्क गाठणे हे सर्व कष्ट वाचतात. विमानाने प्रवास न करता जर कार घेऊन ओरलॅंडोला जाण्याचा विचार असेल तरीही ही कार हॉटेलच्या आवारात पार्क करून बसने ये-जा करणेच सोयिस्कर ठरते.
काय पाहावे आणि करावे?
या स्वप्ननगरीतील सर्वच आकर्षणे लाजवाब आहेत. प्रत्येक पार्कातील फिरती चक्रे, झुले, झोपाळे, रोलर कोस्टर्स आणि चतुर्मितीतील सर्व नाटके किंवा चित्रपट यांची वर्णने शब्दांत करण्यासारखी नाहीत. प्रत्येक आकर्षणात त्याचा वेगळेपणा आणि एक अनोखा थरार जाणवतो.मॅजिक किंगडम पाहण्यासाठी सहसा एक पूर्ण दिवस पुरेसा पडत नाही. त्यामानाने इतर तीन थीम पार्क्स पाहण्यासाठी संपूर्ण दिवस पुरेसा ठरतो असा अनुभव आला. व्यक्तिश: माझी आवड सांगायची झाली तर ऍनिमल किंगडमच्या मानाने इतर तीनही पार्क्स अधिक आवडली. सर्वात आवडले ते मॅजिक किंगडम. एपकॉट आणि एमजीएम स्टुडियो ही दोन्ही पार्क्स लहान मुलांना आवडण्याचा संभव कमी परंतु कुमारवयीन मुले आणि मोठे यांच्यासाठी ही दोन्ही पार्क्स म्हणजे खास पर्वणीच आहे. प्रत्येक थीम पार्कमध्ये आवर्जून पाहावेत अशी काही आकर्षणे किंवा कार्यक्रम आहेत ते पुढीलप्रमाणे:
१. मॅजिक किंगडम: येथे दिवसातून दोनदा डिस्नीच्या पात्रांची मिरवणूक निघते. एकदा दुपारी आणि एकदा रात्री. या दोन्ही मिरवणुका पाहण्याजोग्या आहेत. रात्रीची विशेष. बरेचदा संपूर्ण दिवस या पार्कात घालवून थकवा जाणवल्याने अनेकजण रात्रीच्या या मिरवणुकीसाठी थांबत नाहीत असे दिसते परंतु ही मिरवणूक, रात्रीच्या अंधारात सिंड्रेलाच्या राजवाड्यावर होणारे प्रकाशाचे खेळ आणि फटाक्यांची आतषबाजी अप्रतिम दिसते.
२. एमजीएम स्टुडियो: येथे दाखवले जाणारे सर्व करामतींचे कार्यक्रम अप्रतिम आहेत. दर रात्री येथे फॅंटास्मिक नावाचा लेझर शो होतो. यांतही अनेक डिस्नी कथांतील किंवा चित्रपटांतील प्रसंग दाखवले जातात. अप्रतिम प्रकाशयोजना आणि रंगसंगती, संगीतावर नाचणारी पाण्याची कारंजी आणि मन सुखावणारी डिस्नी पात्रे यांच्या संगमाने सादर होणारा हा कार्यक्रम जगातील एक अत्युच्च दर्जाचा कार्यक्रम ठरावा.
३. एपकॉट: येथेही रात्री "रिफ्लेक्शन ऑफ द अर्थ" हा प्रकाश-रंगांचा आणि फटाक्यांच्या आतषबाजीचा कार्यक्रम होतो. नेहमी फटाक्यांची आतषबाजी काय पाहायची? त्यात वेगळेपणा काय असणार? असा विचार करून हा कार्यक्रम पाहण्याचे टाळू नये. प्रकाश आणि रंगसंगतीने अतिशय लोभसवाणा दिसणारा आणि धगधगणार्या अग्नीने मनाला भुरळ पाडणारा हा कार्यक्रम अतिशय आगळावेगळा आहे.
४. ऍनिमल किंगडम: लायन किंग या डिस्नीपटातील सुप्रसिद्ध गाणी, सिम्बा आणि त्याची मित्रमंडळी आणि चित्रविचित्र पोशाखातील कलावंत यांनी सजलेला नृत्य-गायन आणि कसरतींचा हा कार्यक्रम आवर्जून पाहण्याजोगा आहे.
आसपास पाहण्यासारखी ठिकाणे:
डिस्नी वर्ल्डच्या परिसरात ही महत्त्वाची उद्याने सोडून पाहण्यासारखी दोन प्रमुख ठिकाणे आहेत.
डाऊनटाऊन डिस्नी: या परिसरात चांगली रेस्टॉरंट्स, फास्टफूड उपाहारगृहे, खरेदी करण्यासाठी प्रशस्त दुकाने आहेत. येथे गायन-नृत्य-संगीताचे कार्यक्रम होतात. सुप्रसिद्ध सूर्य-सर्कस (Cirque du Soleil ) येथे पाहता येते. संध्याकाळच्या वेळेस खरेदी करता करता, बाजारातून फेरफटका मारण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.
प्लेजर आयलंड: सळसळत्या तारुण्याचा जोश व्यक्त करण्याचे हे एक उत्तम ठिकाण आहे. पश्चात्य संगीताचे निरनिराळे प्रकार येथे अनुभवायला मिळतील. संगीत-गायन आणि त्यावर थिरकणारी पावले यांच्या आनंदात प्लेजर आयलंडला नित्य दिवाळी असते.
बिल्झर्ड बीच आणि टायफून लगून : ही दोन जलोद्याने (वॉटर पार्क्स) डिस्नी परिसरात आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांत सतत बाहर राहून तापलेले अंग थंड करून पाण्यात डुंबण्याकरता आणि मन चिंब करण्याकरता ही दोन्ही पार्क्स उत्तम आहेत.डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टच्या बाहेर ओरलॅंडोला पाहण्यासारखी इतर अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. त्यातील दोन प्रमुख स्थळांबद्दल येथे लिहावेसे वाटते.
युनिवर्सल पार्क्स: येथे दोन पार्क्स आहेत: युनिवर्सल स्टुडिओ आणि युनिवर्सल आयलंड्स ऑफ ऍडवेंचर हे थीम पार्क. ही दोन्ही पार्क्स पाहण्यासारखी असली तरी डिस्नीसोबत यांचीही वारी करणे अतिशय दगदगीचे ठरते. इच्छुकांनी हे लक्षात घेऊनच सहल आखावी किंवा युनिवर्सल सहलीची स्वतंत्र आखणी करावी.
सीवर्ल्ड, ओरलॅंडो: प्रचंड आकाराचे किलर व्हेल्स, पाण्यात सूर मारणारे डॉल्फिन्स, माणसांच्या आज्ञा लीलया पाळणारे चतुर सील, गरीब स्वभावाचे परंतु भीतिदायक दिसणारे प्रचंड वॉलरस, उरात धडकी भरवणारे शार्क्स आणि असे अनेक सागरी जीव या उद्यानात पाहण्यास मिळतात. शामू या किलर व्हेलचे, सील आणि डॉल्फिन यांचे कार्यक्रम अप्रतिम आहेत. डिस्नी वर्ल्डची सफर करणार्या पर्यटकांनी या उद्यानाला भेट देणे चुकवू नये. हे पार्क एका दिवसात पाहून होते."ट्रिपल ए"चे सदस्यत्व असल्यास या पार्काची तिकिटे स्वस्तात मिळतात.फ्लोरिडा राज्यात ओरलॅंडो शहराबाहेर पाहण्यासारखीही इतर अनेक स्थळे आहेत यात ओरलॅंडोपासून सुमारे चार तासांवर असणारे मायामीचे समुद्र किनारे, सुमारे दोन तासांवर असणारे टॅम्पाचे समुद्र किनारे विशेष प्रसिद्ध आहेत. तसेच बुश गार्डन्स (Busch Gardens) आणि किसिमी येथील थीम पार्क्स पाहण्यासारखी आहेत.
डिस्नीनगरीबद्दल एक आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे येथील सेवादात्यांकडून आणि सेवकवर्गाकडून पर्यटकांना मिळणारी वागणूक. लाखोंच्या गर्दीला सांभाळून हसतमुखपणे आणि अदबीने पर्यटकांच्या प्रत्येक प्रश्नाला, शंकांना सविस्तर उत्तरे देणारा, त्यांना तत्परतेने मदत करणारा आणि त्यांच्या आनंदात सहभागी होणारा डिस्नीचा कर्मचारीवर्ग प्रत्येक पर्यटकाला राजपुत्र नाहीतर राजकन्या असल्याचे सतत जाणवून देतो. वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टचे उद्घाटन १९७१ साली करण्यात आले - वॉल्ट डिस्नी यांच्या मृत्यूच्या सुमारे ५ वर्षांनंतर! संपूर्ण दुनियेला स्वप्न विकणारा हा मनुष्य त्याने स्वत: स्वप्नात पाहिलेली जादूनगरी सत्यात उतरताना पाहण्यास हयात नव्हता. परंतु लहान-मोठे, तरुण-म्हातारे सर्वांना वेड लावेल अशा स्वप्ननगरीच्या निर्मितीतून त्यांनी आपले नाव चिरंतन केले. लहानांना वेड लावणार्या आणि मोठ्यांच्या हृदयात दडलेल्या बालकाला पुनश्च उभारी देणार्या या जादूमय स्वप्ननगरीत वर्षातील ३६५ दिवस दिवाळी असते. आपल्या कुटुंबासमवेत दिवाळीतील आनंदाचे क्षण प्रकाश, रोषणाई, फटाके यांच्या सोबतीने या स्वप्ननगरीत काढायची संधी पर्यटकांना लवकरच चालून येवो ही दिवाळीच्या निमित्ताने शुभेच्छा!
लेखातील काही चित्रे विकिपीडियावरून घेतली आहेत. चित्रांवर टिचकी मारली असता ती मोठी करून पाहता येतील.
(पूर्वप्रसिद्धी: मनोगत दिवाळी अंक २००७)
3 comments:
tuza abhyaspurna lekh vachun anekana madat hoil pan mala matra 4 varshanpurvichya sagalya aathavani ufalun aalya...tenva donhi mule navati aani mi aani mazya navryane aksharshaha divasatale 14-14 taas firun sagali theme parks enjoy keli...gharatala shendefal asyamule mi tar kharach lahan mulahun lahan zale hote...aata mule thodi mothi zalyavar parat jayacha plan aahe...pan mala vatata pratyek veli enjoy karanyasarakhach aahe orlando...right?
Thanks a lot Megha for your comment. This article was published in 2007 Manogat diwali issue. I forgot to paste it on my blog. We had been to Walt Disney World resort in 2006 and this winter we are planning to drive to Florida for Christmas.
I totally agree that Orlando is a magic kingdom.
आज येथे पुण्यात बसल्याबसल्या आपण जादुनगरीचि सैर घडवलीत.
बरीच वाट बघायला लावलीत नवीन पोष्ट्ची. पण त्या प्रतिक्षेनंतर जे काही वाचायला मिळाले त्या मुळे त्या प्रतिक्षेचे चीज झाले
Post a Comment