आम्ही जेव्हा पिंजर्यातील प्राणी बनतो!
प्रवासातील संकटे आणि आमचा घनिष्ठ संबंध कधीपासून सुरू झाला असावा याबाबत खात्रीलायक असं सांगता येत नाही पण तसा संबंध आहे हे निश्चित. वादळं तर आमच्या जणू पाचवीला पुजलेली. वाळूची वादळे, टोरनॅडो, गारपीट, ट्रॉपिकल स्टॉर्म, मुंबईतील २००५चा वादळी पाऊस सर्वकाही आमच्या प्रवासादरम्यान हमखास घडून यायलाच हवे.
उत्तर अमेरिकेत हिंडण्याफिरण्याचे महिने तीन. जून ते ऑगस्ट. या महिन्यांखेरिज फिरायचे झाले तर पार दक्षिणेला जावे लागते किंवा स्वेटर्स, हातमोजे, बूट यासर्वांचे जड ओझे बाळगत फिरावं लागतं. तर काही दिवसांपूर्वी यावर्षी फिरायला कुठे जायचे हे ठरवायला बसलो होतो -
“न्यूयॉर्कला जाऊया.” इति नवरा.
“हम्म चालेल,” इति कन्यका.
आता दोघांचे एकमत झाले तर तिसर्याने पाय ओढावे असा आमच्या घरातील रिवाज असल्याने -“चालेल पण किती माणसं त्या शहरात? इतकी माणसं बघायची म्हणजे वैताग. गर्दी, गजबजाट, चांव-चांव, काव-काव. नको रे बाबा! "माझा नाराजीचा सूर. "इतकं लांब ड्रायविंग करून गर्दी बघायला काय जायचं? त्यापेक्षा जवळपास जाऊ. दरवर्षीचे गोंधळ गडबड, थीमपार्क्स, ऍट्रॅक्शन्स टाळून यावर्षी फक्त आराम करू. ”
मिडवेस्टात राहणारी माणसं माणूसघाणी असतात का असा प्रश्न एखाद्याला पडला असेल तर खरेखुरे उत्तर येथे मिळून जावे. खरंतर, माणसांपासून दूर जाऊन आराम करायचा झाला तर मिडवेस्टासारखी दुसरी जागा नाही पण पिकतं तिथे विकत नाही म्हणतात.
“मग कुठे जाणार? माणसंच नको असतील तर जंगलात जाऊन राहूया?" कन्यकेने फुरंगटून म्हटले.
“ऍबसोल्युटली!! जंगलातच जाऊ.”
“डन! जंगलातच जाऊया," नवर्यानेही आनंदाने म्हटले.
जंगलात जाऊन राहणे म्हणजे एखाद्या नॅशनल पार्कात जाऊन तंबू ठोकणे पण तेवढे कष्टही आपण यावर्षी घ्यायचे नाहीत यावर शिक्कामोर्तब झाल्याने तो बेत बारगळला. शेवटी, ग्रेट स्मोकी माउंटन्सच्या परिसरात वुडन कॅबिनमध्ये राहायचे ठरवले. कामाच्या अतिव्यग्रतेमुळे दोघांकडूनही शेवटच्या क्षणापर्यंत बुकिंग करायचे या ना त्या कारणाने राहून गेले. आयत्यावेळेस बुकिंग करायचे झाले तर हवी तशी कॅबिन मिळेलच असे नाही पण सुदैवाने आम्हाला बर्यापैकी कॅबिन मिळून गेली. आणि हो, या सुट्टीच्या दिवसांत वादळांची शक्यता नाही याची वारंवार खात्री आम्ही करून घेतली.
आठवड्याभराचे किराणा सामान, कपडे, फोल्डींग खुर्च्या, खेळ, डिव्हीडी, सीडीज आणि जे हाताला मिळेल ते सर्व पॅक करून आम्ही ४०० मैलाचा प्रवास करून एकदाचे गॅटलिनबर्ग परिसरात पोहोचलो. तिथून कॅबिनचा नकाशा घेऊन डोंगराच्या वाटेला लागलो. या डोंगरातल्या वुडन कॅबिनपर्यंत पोहोचायचे म्हणजे एक दिव्य असते. अरुंद आणि निमुळते घाटातील रस्ते, अचानक येणारे उतार आणि चढण, खोल दरी, रस्त्यांवर दिव्यांचा पत्ता नसणे, समोरून आपल्याला धडकायलाच येत आहे अशा आविर्भावात अचानक येणारी गाडी इ. पार करता करता आमच्या लक्षात आले की आमची कॅबिन डोंगराच्या माथ्यावरील शेवटची कॅबिन आहे.
कॅबिन मात्र अतिशय सुरेख होती. टापटिप, स्वच्छ, आरामशीर आणि उबदार. उबदार कारण स्मोकीच्या माथ्यावर भर उन्हाळ्यातही कुडकुडायला होते. कॅबिनमधून स्मोकीच्या शिखराचे अप्रतिम दर्शन होत होते तर डेकच्या खाली घळ दिसत होती. कॅबिनच्या मागून रानात उतरण्यासाठी वाट दिसत होती. स्थिरस्थावर झाल्यावर दोन गोष्टी आमच्या लक्षात आल्या. डेकवरच्या जकुझीचे कव्हर अडकून बसले होते आणि टिव्ही चालत नव्हता. एव्हाना संध्याकाळचे साडेसहा झाले असावेत. आम्ही ऑफिसात फोन करून आमची अडचण कळवली तशी रिसेप्शनिस्टने १५-२० मि. मेन्टेनन्सचा मनुष्य येऊन जाईल याची खात्री दिली.
सांगितल्याप्रमाणे १५-२० मिनिटांत मेन्टेनन्सचा मनुष्य हजर झाला. त्याने हॉट टबचे झाकण काढून दिले आणि टिव्ही प्रोग्रॅम करून दिला. वर, आता आलोच आहे तर तुम्हाला बाकीचे सर्व कंट्रोल्स बघून घेतो आणि तुम्हालाही दाखवतो असं म्हणून त्याने सर्व काही व्यवस्थित करून दिले. निघताना त्याला काय वाटले कोणास ठाऊक पण तो थबकला आणि म्हणाला -
“या कॅबिनपाशी हमखास अस्वले येतात. ही मागची बाजू पाहिलीत. सरळ रानात उतरते आणि उतरण्या-चढण्यासाठी चांगली वाट आहे. हा अस्वलांचा रस्ता. मागच्या वेळेस मी येथे आलो असता समोर अस्वल उभे होते. नशीबाने मी गाडीतूनच पाहिले आणि आत बसून राहिलो. तुम्ही सांभाळून असा, संध्याकाळी उन्हं उतरण्याच्या वेळेस अस्वलं इथे हमखास दिसल्याचे ऐकून आहे.”
“अरे बापरे! मी ती वाट मगाशीच पाहिली होती. तिथून रानात एखादी चक्कर मारता येईल का काय असा विचार करत होते.” मी म्हटलं.
“नाही. ती सुरक्षित वाट नाही, तिच्या वाटेलाही जाऊ नका किंबहुना गाडीतून आणि कॅबिनमधून बाहेर पडताना आजूबाजूला एक नजर टाका. नशीबवान असाल तर अस्वल दिसेलही पण सांभाळून रहा.” असं म्हणून तो निघून गेला.
“काय रे हा माणूस घाबरवून गेला. आता दबकतच बाहेर पडावं लागणार रोज.”
“घाबरवून नाही पण सावध करून गेला. बरंच झालं की.”
त्या रात्री आमच्या स्वागताला पर्जन्यराज नेहमीप्रमाणे हजर झाले. विजांच्या चकचकाटात आणि ढगांच्या गडगडाटात मुसळधार पाऊस पडला. भर जंगलात डोंगरमाथ्यावर रात्रीच्या काळोखात निसर्गाचे विलोभनीय रुद्र रूप आणि अधूनमधून येणारे प्राण्यांचे चित्रविचित्र आवाज, घुत्कार आणि चित्कारांत ती रात्र सरली.
दुसर्या दिवशी सकाळी आम्ही लॉरेल धबधब्याच्या ट्रेकसाठी जाणार होतो. यापूर्वी स्मोकी माऊंटनच्या भेटीत अवघड ट्रेक्स केले आहेत परंतु यावेळेस आराम करायचा असे ठरल्याने अडिच मैलांचा सोपा ट्रेक निवडला होता. बाहेर स्वच्छ उन पडले होते. सामान गाडीत ठेवायला नवरा पुढे गेला आणि मागाहून आम्ही दरवाजा बंद करून गाडीत बसलो. गाडी सुरू करता करता तो म्हणाला "मी आता गाडीपाशी आलो तेव्हा बाहेर काहीतरी आवाज आल्यासारखा वाटला. मागे वळून पाहिलं तर झाडापाशी एक मांजर उभं होतं.”
“हुश्श! मांजरच ना.” मी निश्वास टाकून म्हटलं.
“हाऊसक्याट की बॉबक्याट? म्हणजे हाऊसक्याट जंगलात काय करत होती?” पोरीने अक्कल पाजळली.
“काळी मांजरी होती म्हणजे बहुधा हाऊसक्याटच.” नवर्याने शंकानिरसन केले आणि गाडी सुरू केली.
लॉरेल धबधब्याचा ट्रेक सुरू करण्याच्या ठिकाणी एक मोठा फलक लावला होता.
तिथून स्मोकीच्या परिसरात फिरत, केड्स कोव्हची गाडीतून सफर करत संध्याकाळी ६च्या सुमारास आम्ही गॅटलिनबर्ग परिसरात परत आलो. रात्रीच्या जेवणाची सोय पहायची होती. जेवण प्याक करून कॅबिनमध्ये जावं असं ठरवून समोरच ऍपल बीज रेस्टॉरंट दिसलं म्हणून तिथून जेवण घेऊन आम्ही कॅबिनच्या वाटेला लागलो. सकाळपासून जंगलात सटर फटर खाल्लं होतं पण व्यवस्थित जेवण पोटात न गेल्याने सर्वांना भूक लागली होती.
सातच्या सुमारास कॅबिनपाशी पोहोचलो तर उन्हं उतरली होती. उंचच उंच झाडांच्या सावल्याही उन्हासोबत जमिनीवर अस्ताव्यस्त पसरल्या होत्या. मध्येच एखादी उन्हाची तिरिप अद्याप सूर्यास्त न झाल्याची जाणीव करून देत होती.
“आधी आत जावून जेवूया. नंतर गाडीतलं सामान, कॅमेरे इ. बाहेर काढतो.” “ठीक आहे" असं म्हणून आम्ही दोघी डेकच्या वाटेला लागलो. दरवाजा उघडत असताना मागून नवरा धावतच आला आणि म्हणाला "लवकर आत चला. मागे रानात काहीतरी आहे. खसफस ऐकू येत होती.”
“ते सकाळचं मांजर असेल" मी दरवाजा बंद करता करता म्हटलं आणि लिविंग रूमच्या दुसर्या टोकाकडून "डॅडी...इथे बघ बेअर" अशी पोरीची हाक ऐकू आली.रानाच्या त्या वाटेवरून अस्वलाची मादी आणि तीने छावे आरामात ड्राईव्ह वे वर अवतीर्ण झाले होते. “अरेच्चा! खरंच अस्वल होतं तर. बरं झालं आपण आत पोहोचलो. थोडक्यात चुकामुक झाली वाटतंय.” मी आश्चर्याने म्हटलं.“माझी गाडी.... ही अस्वलं खरवडून तर नाही ना ठेवणार?” ह्याच्या डोक्यात तिसरेच विचार सुरू होते.“अरे ते सकाळी तुला काळं मांजर दिसलं...ते या अस्वलाच्या छाव्या एवढंच होतं का रे?”
अस्वलाच्या मादीने संपूर्ण ड्राईव वे फिरून घेतला. छावेही मस्त बागडत होते. सुदैवाने (नवर्याच्या) आमच्या गाडीत त्यांना काडीचाही इंटरेश्ट नव्हता. आजूबाजूला कोणी नाही याची खात्री करून अस्वलाच्या मादीने चक्क बसकण मारली.
“आता हे रात्रभर इथेच राहिले म्हणजे?” काचेला नाक लावत कन्येने विचारलं.
“काही इथे रात्रभर राहात नाहीत. जंगली प्राणी असे एका जागेवर बसून राहात नाहीत.”
“पण राहिले तर?”
“तर आपण ९११ डायल करू.”
“ह्य॒! ९११ माणसांसाठी असतं, प्राण्यांसाठी नाही काय?”
“बरं बरं! उद्या सकाळचं उद्या सकाळी बघू. कॅमेरा गाडीत राहिला. निदान यांचे फोटो तरी काढता आले असते.”
“माझ्याकडे आहेना माझा कॅमेरा. आता काही नाहीतर तोच वापरू,” लेकीने आपल्या कमरेचा कॅमेरा काढून दिला. गेल्यावर्षी तिला एक वापरायला सोपा डिजिटल कॅमेरा घेऊन दिला होता.
अस्वलाचे छावे दंगामस्ती करून दमले होते. त्यांच्याही भुकेची वेळ झाली असावी. त्यांनी आईला लुचायला सुरूवात केली. आईही त्यांना प्रेमाने चाटत होती. जंगली प्राण्यांचे असे दृश्य या आधी प्रत्यक्ष डोळ्यांनी कधी बघायला मिळाले नव्हते पण जंगली असो का पाळीव, प्राणी असो का मनुष्य- आईही आईच असते याची जाणीव त्या दृष्यातून होत होती.
“मी डेकवर जाऊन फोटो काढतो,” असं म्हणून नवरा हळूच बाहेर सटकला आणि क्षणार्धात परत आला. “तुम्हा दोघींना बाहेर येऊन बघायचे असेल तर आताच या, त्यांचं इतरत्र लक्ष नाही.”
आम्हीही दबकत बाहेर गेलो. अस्वलं आता अगदी जवळून दिसत होती. त्यांना आमच्या अस्तित्वाची कल्पनाही नव्हती. तेवढ्यात
“डॅडी बस हो गया। अब अंदर जायेंगे" आमच्या छाव्याला अद्याप कुठे मोठ्याने बोलावं आणि कुठे कुजबुजावं त्याची अक्कल आलेली नाही पण तो आवाज अस्वलाच्या मादीपर्यंत सहज पोहोचला आणि ती ताडकन उभी राहिली आणि आम्ही पुन्हा आत धूम ठोकली.
आता काय होणार याची कल्पना करत होतो पण त्या आईला पोरांची भूक महत्वाची असावी. तिने पुन्हा बसकण मारली आणि स्तनपानाला सुरूवात झाली. तिला माणसांची भीती नव्हती की या माणसांना आपण पिंजर्यात बंद केलं आहे याची खात्री झाली होती का काय देव जाणे. भूकशमनानंतर सुमारे अर्धातास छाव्यांनी पुन्हा धांगडधिंगा घातला आणि मग सर्वजण आल्या वाटेने आरामात निघून गेले. आम्हाला भूक लागली होती हे आम्ही या वेळात विसरूनच गेलो होतो.
पुढचे दोन्ही दिवस आम्ही खिडक्यांतून बाहेर बघून "ऑल वेल"चे ईशारे करून नंतरच घराबाहेर पडत होतो. बाहेर पडल्यावरही रानातील त्या वाटेवर एक नजर होतीच, पण सुदैवाने आमच्या हजेरीत अस्वलं परतली नाहीत.
फोटोंवर टिचकी मारल्यास ते मोठ्या स्वरूपात पाहता येतील.
9 comments:
chaan varNan
Great Thrill, Fantastic.
You must have really enjoyed the vacation. weren't you scared ? staying alone on the Top of the mountian having bears around you ?
(I might say I am sitting on the op of the mountain havin rainbow around my shoulders - PG Woodhouse )
That was a lovely experience!
Thanks all!
This was one of the best vacation I ever had. I know many people who have been to Smokeys several times and still never seen a bear.
Enjoyed readng many posts on your blog, particularly this one. Enjoyed my first visit to your blog, looking forward to more contributions, I will be visiting regularly now.
Vivek
Thanks Vivek. These days I don't write as often as before but readers comments like these, do make difference. Thanks once again! your comment was very encouraging.
Nicely written..
I relived my smokeys experience.
Although I was not fortunate enough to see bears
Farach sunder lihilay! ekandaritach sampurNa blog atishay sunder aahe. I came across this blog and couldn't stop reading one thing after the other...all the thriller stories are just too good. Wish you all the best!
प्रतिसादासाठी सर्वांचे धन्यवाद.
असाच लोभ राहू दे. :-)
Post a Comment