इच्छा
लेखनप्रकार : गूढकथा
राधेच्या पायांतील शक्ती क्षीण होत चालली होती. आपण रस्ता चुकलो हे तिला जाणवत होते तरी काट्याकुट्यांची पर्वा न करता जिवाच्या आकांताने ती पाय नेतील तिथे धावत होती. अंग ठणकत होतं, डोळ्यांतील अश्रूंची संततधार थांबत नव्हती, कपाळातून रक्तही ठिबकत होतं. पायांत पेटके येत होते. काळोखात आपण कोणत्या दिशेने जात आहोत याचे भानही तिला राहिले नव्हते. श्वास फुलला, उर फुटायची पाळी आली आणि पुढे एकही पाऊल टाकणं अशक्य झालं तशी रानातल्या एका मोठ्याशा दगडावर तिने बसकण मारली.
धाय मोकलून रडावं अशी इच्छा अनावर होत होती पण त्याहूनही प्रबळ इच्छा घरी परतायची होती. घरी म्हणजे तिच्या हक्काच्या घरी, तिच्या आई-बाबाच्या. राधेच्या डोळ्यासमोरून गेल्या काही महिन्यांतल्या घटना तरळून गेल्या.
राधाची बारावी झाली तशी बाबांना आपल्या लाडाकोडात वाढलेल्या पोरीच्या लग्नाचे वेध लागले होते. पुढे शिकायची राधाची इच्छा होती पण आईबाबांना तिला एकटीला लांब तालुक्याच्या गावी पाठवायचे नव्हते. फार पुढे शिकून करायचे तरी काय होते म्हणा, चांगल्या भरल्या घरात पोरीला दिली की घरदार, जमीनजुमला हेच सांभाळायचं होतं. सहा महिन्यांपूर्वी साखरगावच्या सावंतांच्या मुलाशी, राजा सावंताशी तिचं लग्न ठरलं तेव्हा आई-बाबा किती आनंदात होते. थाटामाटात त्यांनी आपल्या एकुलत्या एका लेकीचं लग्न लावून दिलं होतं. सावंतांची भरपूर शेतीवाडी होती. पोरीला कशाची ददात पडणार नाही असं बाबांना वाटत होतं. लेकीला लग्नात चांगले ठसठशीत दागिने केले होते, जावयाला नवी मोटरसायकलही घेऊन दिली होती. सासू सासरे, नणंद, सासरची इतर मंडळी सर्वांचा मान ठेवला होता. काही करायचं म्हणून कमी ठेवलं नव्हतं. राधाही आनंदात होती. नवरा देखणा होता, शिकलेला होता. सासरचा वाडाही चांगला ऐसपैस होता. नणंद तिच्याच वयाची होती.
लग्नानंतर दोन महिने कसे भुर्रदिशी उडून गेले ते राधाला जाणवलंही नाही. घरात सासू-सासरे तिला प्रेमाने वागवत होते. नवराही लाड करत होता. नणंदेशी चांगली मैत्री जमली होती. 'आपली दृष्ट तर लागणार नाही ना या आनंदाला?' असे चुकार विचार राधेच्या मनात येत. एके दिवशी रात्र होऊ लागली तरी नवरा घरी परतलाच नाही. रात्र पडली तशी राधेने सासूकडे विचारणा केली पण तिने ताकास तूर लागू दिली नाही. इतरवेळेस दिलखुलास गप्पा मारणार्या नणंदेनेही 'दादा शेतावरच झोपला असेल.' असे म्हणून वहिनीची बोळवण केली. त्या रात्री राधेच्या डोळ्याला डोळा लागला नाही. दुसर्या दिवशी सकाळीच नवरा परतला. राधेने त्याला विचारणा केली तशी त्याने तिला उडवून लावले. 'शेतावर काम होते, परतायला उशीर झाला' असे काहीतरी त्रोटक उत्तर दिले.
त्यानंतर हा प्रकार नेहमीच होऊ लागला. आठवड्यातून दोन-चारदा नवरा गायब होत असे. घरातल्या गडीमाणसांकडून राधेच्या कानावर हळूहळू एकएक गोष्टी येऊ लागल्या. खालच्या आळीत नवर्याचे प्रकरण होते म्हणे. घरातल्या कोणालाही ते पसंत नव्हते पण करतात काय? लग्नानंतर पोरगं ताळ्यावर येईल असे सर्वांना वाटायचे. राधेला या प्रकाराची कुणकुण लागली तशी तिने सासूला स्पष्टच विचारले. सासूने कोणतेही आढेवेढे न घेता गोष्ट कबूल केली. एक मूल झालं की सगळं बरं होईल. राजा मनाने चांगला आहे. तो ताळ्यावर यावा असंच आम्हाला वाटतं. संसारात पडला की जबाबदारी येईल. सासर्यांनीही सुचवलं की वंशाला दिवा लवकर येऊ दे. राधेला थोडा धीर वाटला. सासू-सासरे म्हणतात तोही उपाय करून पाहायला तिची हरकत नव्हतीच. दरम्यान नवरा राधाला घेऊन तिच्या आईबाबांना भेटून आला. राधेने या प्रकाराची त्यांना कल्पना दिली नाही. उगीच त्यांच्या जिवाला घोर का म्हणून ती गप्प राहिली.
पुढचे काही महिने असेच निघून गेले. सहा आठ महिन्यांत काही नवीन घडलं नाही तशी सासर्यांनी तालुक्याला जाऊन तपासणी करून घ्यावी असे सुचवले. राधाला घेऊन नवरा तालुक्याला जाऊनही आला. तपासणीत राजात दोष असल्याचे आढळले. वैवाहिक जीवनात तशी बाधा नव्हतीच, हा दोषही योग्य औषधोपचाराने दूर होण्यासारखा होता. राजाला मात्र हे काही केल्या पटेना. "डॉक्टर लेकाचे काही बाही सांगतात. मी पूर्ण पुरुष आहे. तुलाच नाही आणि ४ बायकांना नांदवेन मी. मला कोणत्या औषधोपचारांची गरज नाही."आणि तेव्हापासून घरातली सगळी चक्रं उलटीपालटी फिरायला लागली. सासर्यांनी राधेशी बोलणं सोडलं. सासू तिला कोणत्याही कामाला हात लावू देईना. बोलली तर घालून पाडून काहीतरी बोलत असे. नणंदही दूर दूर राहत असे. राजा तर तिचा जणू दुःस्वासच करत होता. सरळ शब्दांत बोलणं त्याने सोडून दिलं होतं. रोज काही ना काही कारण काढून भांडण सुरू करे. एक दोनदा तिच्यावर हातही उगारला होता. राधेचं जगणं कठिण होऊ लागलं होतं. तिला आई-बाबांची आठवण वारंवार येत असे. एकवार त्यांना भेटून यावं अशी इच्छा होत होती.
असेच एकेदिवशी राजा रात्र बाहेर काढून सकाळी परतला तसा राधेने त्याला जाब विचारला. 'नांदवायचं नसेल तर घरी सोडून या. आईबापाला मी जड नाही.' म्हणून सांगितलं. शब्दाला शब्द वाढत गेला. राधाही हट्टावर आली होती. राजाने हात उगारला, "घरी जायचंय? जाऊन त्यांना माझ्याबद्दल सांगायचंय? गावात आमच्या घराचं नाव बद्दू करायचंय? थांब! घराबाहेर पडता येणार नाही अशी दशा करेन तुझी." सट्टदिशी थोबाडीत ठेवून दिली तशी "आई गं!" म्हणत राधा खाली बसली. राजाच्या अंगात जसा राक्षस शिरला होता. त्याने लाथा बुक्क्यांनी तिला बडवायला सुरुवात केली. राधा बेंबीच्या देठापासून ओरडत होती पण सासू तिच्या वाटेला फिरकली देखील नाही. राजाने तिचा हात धरला आणि तिला फरफटवत तो गोठ्याच्या दिशेने घेऊन गेला. गोठ्याच्या मागच्या बाजूला धान्य साठवायची खोली होती. त्यात त्याने राधाला ढकलले.
"घरी जाऊन बापाला काय सांगशील? नवरा, नवरा नाही म्हणून? माहेरी कशी जातेस बघू. जीव घेईन माहेरचं नाव पुन्हा काढलंस तर. याद राख. राहा पडून या अंधारवाड्यात. डोकं ताळ्यावर येतं का ते बघ."
दरवाज्याला बाहेरून कडी घालून राजा चालता झाला. त्या अंधार्या खोलीत राधाचा जीव घाबरा झाला. मार खाऊन अंग आणि डोकं दोन्ही बधिर झाले होते. त्या अंधारसाम्राज्यात उंदीर घुशींचे साम्राज्य असते या विचाराने तिचा थरकाप उडत होता. अंगाचं मुटकुळं करून ती तिथेच पडून राहिली. पायावरून चुकचुकत काहीतरी गेल्यासारखं वाटलं तसे तिने पाय छातीशी गच्च धरले.
थोड्यावेळाने उठून ती दारापाशी गेली आणि तिने दरवाजा ठोठावायला सुरुवात केली. 'मला सोडवा इथून. मला माझ्या घरी जाऊ दे. दार उघडा.' बराच वेळ असा धोशा लावूनही कोणी आले नाही तशी ती थकून ढोपरांत डोकं खुपसून मुसमुसत खाली बसली. किती वेळ निघून गेला असावा कोणास ठाऊक, अचानक दरवाजापाशी कोणीतरी असल्याची चाहूल तिला लागली.
दरवाजा करकरत उघडला. बाहेर अंधारून आले होते. नणंदेने येऊन दरवाजा उघडला होता. राधेने तिला गच्च मिठी मारली आणि ती रडू लागली.
"वहिनी, मी दरवाजा उघडला हे घरात कोणाला माहित नाही. तू इथून पळून जा." नणंद तिच्या कानात कुजबुजली तसे राधेने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले. "दादा आणि आई बोलत होते. त्यांना या गोष्टीचा बोभाटा नकोय. तुझ्या बायकोला परत धाडली तर आपली अब्रू जाईल, त्यापेक्षा तिची विल्हेवाट लावू, असं म्हणत होती आई."
"काय?" राधेच्या तोंडून शब्द फुटेना.
"गावात बभ्रा नको. स्टोव फुटला आणि आग लागली असं सांगता येईल."
"नाही, नाही. मला मरायचं नाही. मला माझ्या आईबाबांकडे जायचंय."
"तू जा वहिनी. इथे थांबू नकोस. दादा परत यायची वेळ झालीये. तो इथे आला तर काहीच करता येणार नाही.""या वेळेला कुठे जाऊ? पैसे कुठे आहेत?""मला नाही माहित, पण तू जा. मी नाही थांबू शकत अधिक वेळ इथे कोणीतरी यायचं." असं नणंद म्हणायला आणि....
"बाहेर कशी आली ही बया?" राजाचा करडा आवाज कानावर यायला एकच वेळ साधली. राजा तरातरा धावत आला आणि त्याने राधेचा हात पकडला. "चल, तुला आज इंगा दाखवतो." म्हणून तो राधाला खेचायला लागला. राधा अचानक झालेल्या हल्ल्याने गळपटून गेली होती.
"नको दादा, सोड तिला, जाऊ दे तिला. सोड," नणंदेने आरडाओरडा सुरू केला तशी राधा भानावर आली. राजा बहिणीशी हुज्जत घालत होता ती संधी साधून तिने त्याच्या हाताला जोरात झटका दिला आणि ती अंगात वारं भरल्यागत धावू लागली.
आपण कोठे धावतो आहोत, कोठे जात आहोत याचा तिला अंदाज येत नव्हता. राजा आपल्यामागून येत असणार याची तिला खात्री होती परंतु ती खात्री करून घ्यायला क्षणभरही थांबली नाही. गाव संपून झाडी सुरू झाली तशी आपण रस्ता चुकलो आहोत याची जाणीव तिला झाली. अंधार चांगलाच दाटून आला होता. आपण चुकीच्या दिशेने धावत आलो, एस्टी स्टॅंडच्या दिशेने गेलो असतो तर एस्टी पकडता आली असती असा विचार तिच्या डोक्यात आला. पण राजा तेथे पोहोचला असता. एस्टी पकडायच्या आधीच राजाने तिला ताब्यात घेतलं असतं. तिचे पाय आता बोलत होते, श्वास फुलला होता. ती क्षणभर थांबली आणि तिने मागे वळून पाहिले. मागून कसलीही चाहूल लागत नव्हती.
'काय झालं आपला पाठलाग नवर्याने थांबवला का असावा?' असा विचार करताना तिला अंधुक प्रकाशात तो दगड दिसला. पुढे जाणं अशक्य झालं होतं म्हणून राधा शेवटी त्या दगडावर विसावली. 'मला मरायचं नाही. मला घरी जायचं आहे. आईकडे.' तिच्या मनात पुन्हा इच्छा दाटून आली पण एकही पाऊल टाकण्याची शक्ती तिच्यात उरली नव्हती. तिला हुंदका फुटला. आपला पदर तिने तोंडावर कोंबला आणि त्या दगडावर आपलं डोकं ठेवून ती निपचीत पडली.
*--*
मध्यरात्र उलटून गेली होती. चंद्र आकाशात चांगला वर आला होता. दोन दिवसांपूर्वीच पौर्णिमा होऊन गेली होती. चंद्राचा मंद प्रकाश रानाला न्हाऊ घालत होता. हवेची थंडगार झुळुक आली तसे राधेने आपले अंग आक्रसून घेतले. थोड्यावेळाने तिने हळूहळू डोळे उघडले. बहुधा अतिश्रमाने डोळा लागला होता. घडल्या घटनेची आठवण झाली तशी ती खाडकन उठून बसली आणि कावरीबावरी होऊन इथे तिथे पाहू लागली. रानात सगळं कसं शांत होतं. मध्येच रातकिडे ओरडत होते आणि हवेच्या मंद झुळुकीबरोबर पानांची सळसळ ऐकू येत होती तेवढीच.
'मला घरी जायचंय. आई आणि बाबांना भेटायचंय.' राधाच्या मनात पुन्हा इच्छा उचंबळून आली. 'जायचं तरी कुठे या रानात? रस्ताच माहित नाही. तांबडं फुटलं की कळेल कोठे आलो ते.' तिने बसलेल्या दगडाकडे निरखून पाहिलं. शुभ्र चंद्रप्रकाशात तो पाषाण उठून दिसत होता. राधेला त्या काळ्या फत्तरावर हाताचा शुभ्र पंजा चमकताना दिसला.
'चेटकिणीचा दगड.'
ती धडपडून उभी राहिली. आता फक्त ब्रह्मांड आठवायचे बाकी होते. 'हे आपण कुठे आलो?' गावाबाहेरच्या रानात चेटकीण राहते अशी वदंता तिने ऐकली होती. एका कडाक्याच्या थंडीच्या रात्री तिचा मृत्यू या पाषाणावर झाला. तिने आपला तळवा त्या पाषाणावर जेथे टेकवला होता तेथे गावकर्यांना तो पंजा पाषाणावर उमटल्याचे दिसून आले. आजही रात्रीबेरात्री हिरवी साडी नेसलेली, केस मोकळे सोडलेली, मळवट भरलेली ती चेटकीण लोकांना धरते असा समज होता. अंधार पडल्यावर रानाच्या दिशेने कधी कोणी गेल्याचं ऐकलं नव्हतं. राजा आपल्यामागे का आला नाही याचा उलगडा तिला होऊ लागला आणि जीव मुठीत घेऊन ती वेड्यासारखी पुन्हा धावायला लागली.
समोरून कोणीतरी कंदील घेऊन येत होते. पुढचा मागचा कोणताही विचार न करता राधा त्या दिशेने धावत सुटली.
"कोन हाय?" कंदील धरलेल्या व्यक्तीने राधाच्या चेहर्यासमोर कंदील धरला. राधाच्या तोंडातून एक अस्फुट किंकाळी फुटली. समोर धारदार नाकाची, कमरेत वाकलेली, सुतरफेणीसारखे चंदेरी केस झालेली म्हातारी उभी होती.
"कोन म्हनायचं? एवड्या रातच्याला या रानात कुटुन आलसा?" म्हातारीने खणखणीत आवाजात विचारले.
भीतीने राधाची बोबडी वळली होती. तिच्या तोंडून आवाज फुटेना. "पोरी! ह्या आडरानात रातीची काय करतीस? काय इचारते हाये म्या तुला? बोल की."
"र..र..रस्ता चुकले. मला घरी जायचंय. प..पण तुम्ही कोण?"
"म्या हितं रानाच्या भायेरच र्हाते. गंगाक्का नाव माजं. रातच्याला येक शेळी या रानात शिरली माजी. तिला हुडकायला निगाले तर तुज्यावर नजर पडली."
"इ...इ..इतक्या रात्री शेळी शोधायला?"
"त्यात काय मोटं? किती वर्स जाली हितं र्हाऊन, रानाची भीती न्हाई वाटत आता." म्हातारी ठसक्यात म्हणाली.
"आणि ती चेटकीण... हे चेटकिणीचं रान आहे ना?"म्हातारीने डोळे बारीक करून राधेकडे निरखून पाहिलं. "व्हयं! ह्ये चेटकिनीचं रान हाय, पर त्यात चेटकीन न्हाय... वावडी हाय फकस्त. पर तू हितं रातच्याला काय करतीस? आसा कसा रस्ता चुकली?"
राधेला थोडा धीर आला. "खरंच रस्ता चुकल्ये हो. मला माझ्या घरी जायचं आहे. माहेरी. माझ्या आईबाबांकडे, भिवपूरला."
"भिवपूरची कोन गं? कोन्च्या घरातली? आन रानातून पायी पायी कुटं भिवपूर गाठाया निगालीस?"
"तुम्हाला भिवपूरची माहिती आहे?"
"म्हाईत हाय मंजी? म्या पन भिवपूरातलीच हाय. सदा पाटलाला वळखतीस? मी त्याची धाकली आत्या हाय. दादा व्हता तेवा जानं व्हायचं, दादा गेला माजं पन वय जालं, सत्तरी उलटली. कोन जातया कोनाकडं उटून आता? पर सदा भेटला तर त्याला सांग की आत्याने आठवन काडली. बरं आता हितं उबं राहन्यापरीस तुला बाजूच्या गावात पोचवते, तितं एश्टी पकड पहाटेची, ती नेईल तुला भिवपूरला."
"तुम्ही सदाकाकाच्या आत्या? सदाकाकाची माझ्या बाबांशी चांगली ओळख आहे." राधाला हायसं वाटलं. चालता चालता तिने आपल्यावर गुदरलेल्या सर्व गोष्टींबद्दल म्हातारीला सांगायला सुरुवात केली. कंदिलाच्या प्रकाशात म्हातारीच्या डोळ्यांतील करुणा दाटत आलेली दिसत होती. राधेने आपली कहाणी संपवली तशी म्हातारी म्हणाली,
"बाय माजी धीराची. या चेटकिनीच्या रानात रातची र्हायलीस तवाचं आलं ध्यानात की कायतरी घोटाला हाय. तुज्या घरची मानसं तुज्यामागं आली पन नाईत या रानात. आस्सा दरारा हाय चेटकिनीचा. चल म्या सोडते तुला."
"पण तुमची शेळी?"
"आगं या शेळीपुडं ती शेळी मोटी न्हाय. ती येईल घरला. या रानात कोन लांडगा न्हाई येत."
"आणि ती चेटकीण?" राधाने चाचरत विचारलं.
"कोन्ची चेटकीन? कोन चेटकीन बिटकीन न्हाय हितं."
"पण मी दगडावर पंजा पाहिला. चेटकिणीचा पंजा." त्या आठवणीने राधाला पुन्हा शहारून आले.
"हां! दगडावर पंजा हाय खरा पर तो भाऊ मोहित्याची बायकोचा आन ती प्वार चेटकीन नवती."
"भाऊ मोहिते? म्हणजे आमच्या साखरगावचे? त्यांची बायको? म्हणजे?" राधेला फारसे काही कळले नाही.
"पावलं उचल झटाझट. सांगते वाटेवर." गंगाक्का म्हणाली, "भाऊ मोहित्याचं लग्न झालं, बायको घरात आली. सारं कसं आलबेल व्हतं. पर दुर्दैव त्या पोरीचं. म्हैन्याभरात जावेचं तान्हं पोर गेलं. पांडर्या पायाची अवदसा घरात आली म्हनून जावेने शिमगा केला.... आन पोरीचं नशीब आसं फुटकं की गावात कसलीशी साथ आली आन दोन-चार ल्हान पोरं दगावली. भाऊ मोहित्याची बाय चेटकीन हाय म्हनून कोनी वावडी उटवली म्हाईत न्हाय पर थंडीच्या एका रातीला गावातली मान्सं वाड्यावर चालून आली. ती पोरगी वाट मिळलं तशी धावत सुटली आनी या रानात आली. आक्षी तुज्यावानी." म्हातारीने राधेवर नजर रोखून म्हटले.
"तिला बी तिच्या घरला जायचं आसलं पर रस्ता नाय गावला बिचारीला. थंडीचं दिवस व्हतं. रातच्याला कडाक्याची थंडी पडायची. नाजूक प्वार ती, गारठून गेली त्या दगडावर. सकाळी लोकांना गावली, शरीर बरफावानी कडक जालं व्हतं आनी व्हय! पंजा उमटला व्हता त्या दगडावर. कसा तो न्हाई म्हाईत, पन अजून सुदीक हाय तसाच हाय. त्या रानातच क्रियाकरम केलं तिचं. गावात पन नाय आनली तिला. तवापासून कदीतरी रातच्याला दिसते म्हनतात."
"तुम्हाला दिसली का हो कधी गंगाक्का ती?" राधेने कुतूहलाने विचारले.
"मला तू दिसलीस. तुला पन तिच्यावानी घरला जायचं हाय. तू पन रातच्याला त्याच गावातून येतीस, त्याच दगुडावर बसतीस. मग काय म्हनू म्या?" तोंडाचं बोळकं उघडून म्हातारी जोरात हसली.
"मला कुठे जायचं ते कळलं नाही अंधारात. या रानात कशी आले तेही कळलंच नाही. डोक्यात एकच होतं की माहेर गाठायचं. मीच ती चेटकीण आहे असं नाही ना वाटलं गंगाक्का तुम्हाला."
"न्हाई, कोन चेटकीन न्हाई. तू न्हाईस आन ती पन न्हाई, गरीब प्वार होती बिचारी, कदी कोनाला तरास दिला नवता तिनं, नशीब तिचं.... आडवं आलं...पन तू घरला जाशील." लांबून कोंबडा आरवल्याचा आवाज ऐकू येत होता. "गाव आलं, पहाट पन व्ह्यायला आली. चल, झटाझट... पारावर पैली एश्टी मिळंल." अंधार ओसरायला लागला होता. आकाशातले तारे मंद होत होते. क्षितिजावर कोठेतरी केशरी छटा येऊ लागल्या होत्या.
लांबून पार दिसू लागला तसा म्हातारीने राधाचा निरोप घेतला. "निगते आता. मला घरला परतायला हवं.. . मोप काम बाकी हाय.""गंगाक्का तुमचे उपकार विसरणार नाही जन्मभर. देवासारख्या आलात धावत, काय झालं असतं त्या रानात भीतीने माझं?" राधेच्या डोळ्यांत पाणी तरारलं."व्हयं पन मी व्हते तितं आन आले तुज्या मदतीला. माजं येक काम कर पोरी. तुज्या सदाकाकाला सांग गंगाक्का भेटली व्हती म्हनून. किती वर्सांत भेट न्हाई जाली. त्याला खुशाली सांग, या म्हातारीची इत्की इच्चा पुरी कर."
"घरी गेले की लगेच निरोप धाडते सदाकाकाला," राधा हसली. दूरवरून मातीचा लोट उडताना दिसला. एस टी येत आहे हे ध्यानात आलं तशी राधा पारापाशी धावली. एसटीत बसल्यावर खिडकीतून तिने नजर फिरवून सभोवार पाहिले पण गंगाक्का कधीच निघून गेली होती.
दुपारच्या वेळी राधाला दारात उभी पाहून आईला धस्स झालं. राधेने तिला आपली कर्मकहाणी ऐकवली तशी आईने तिला कुशीत घेतलं. बाबांना शेतावर निरोप धाडला होताच. बाबा हातातली कामं सोडून धावत आले. राधेला पाहून त्यांना भडभडून आलं, "सावंतांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. पोरीच्या जिवाचं बरं वाईट झालं असतं तर गोळ्या घातल्या असत्या एकेकाला. सोडणार नाही." चिडून बाबा बोलत होते. राधेच्या आईने आणि राधेने खूप वेळ समजूत घातल्यावर ते शांत झाले.
ऊन उतरले तशी राधेने बाबांना म्हातारीचा निरोप सदाकाकाला पोहचवण्याविषयी सांगितले. बाबांनी तोपर्यंत म्हातारीकडे विशेष लक्ष दिलेच नव्हते. राधेने गळ घातली तशी त्यांनी विचारले, "काय नाव म्हणालीस, सदाच्या आतेचे?"
"गंगाक्का, सदाकाकाची धाकटी आत्या आहे असं म्हणत होती."
"सदाची धाकटी आत्या?" बाबांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. "तू चल माझ्याबरोबर सदाकाकाकडे. गंगाक्काचा निरोप तूच सांग."
राधेने तोंड धुतले, साडी बदलली, केस विंचरले आणि ती बाबांसोबत सदाकाकाकडे निघाली. सदाकाका ओसरीतल्या झोपाळ्यावर आराम करत बसले होते. डावा पाय जमिनीवर रेटून झोपाळ्याला सावकाश झोका देत होते. राधेला आणि तिच्या बाबांना बघून ते उभे राहिले आणि त्यांनी त्यांचे स्वागत केले.
राधेच्या बाबांनी त्यांना थोडक्यात घडला वृत्तांत सांगितला. तो ऐकताना सदाकाकांच्या चेहर्यावरील रेषा सरासर बदलत होत्या. "वाचलीस पोरी! नाहीतर, काय वाढून ठेवलं होतं तुझ्या नशिबात ते देवाला माहित... पण तुला गंगाक्का दिसली हे खरं मानायचं?"
"अहो काका, दिसली म्हणजे? दिसली, बोलली, तिच्याबरोबरच एस्टी स्टॅंडकडे आले मी. तुमची आठवण काढत होती. सदाकाकाला निरोप दे म्हणत होती." सदाकाकांच्या प्रश्नातली गोम राधेला कळेना.
सदाकाकांनी राधेच्या डोक्यावर हात फिरवला, "गंगाक्काच्या लग्नात ४ वर्षांचा होतो मी. तिचा चेहराही आठवत नाही. साखरगावच्या मोहित्यांच्या घरी दिली होती तिला. पुढे काय झालं कळण्याचं वय नव्हतं पण एक दिवस बा धाय मोकलून रडत होता. गंगाक्काचं काय केलं त्या मोहित्यांनी ते कळायलाही मार्ग नव्हता. अचानक सांगावा धाडला की गंगाक्का गेली.
नंतर आजा, काका आणि बा विचारपूस करायला गेले होते, त्यांना मोहित्यांनी आमच्या गळ्यात धोंड बांधलीत असं सांगून बखेडा उभा केला. गावात गंगाक्का चेटकीण आहे असा आधीच बोभाटा झाला होता. आज्याने निमूटपणे तिथून पाय काढला. गंगाक्का गेली होती आणि त्या गावात काही बोलायची सोय राहिली नव्हती. त्या दिवसापासून गंगाक्काचा विषय घरात कोणी काढला नाही पण आम्हाला माहित होतं की गंगाक्का चेटकीण नाही. साधीसरळ होती आमची आत्या." सदाकाकांचा आवाज कापरा झाला होता.
11 comments:
वा ! गोष्ट मस्त जमलीय.
राधेला म्हातारी भेटली हे वाचताना थोडी भीती वाटली होती, पण शेवट आवडला
गोष्ट छान आहे. म्हातारीचा प्रवेश झाल्यावर अंदाज आला होता की इथे काहीतरी पाणी मुरते आहे :)
शेवट दु:खद नाही हे बरे वाटले. शेवटचे वाक्य थोडे मोघम वाटते. तिची इच्छा म्हणजे नेमके काय ते स्पष्ट होत नाही.
धन्यवाद, माझी दुनिया आणि राज.
बरं, घातली एक दोन अधिकची वाक्य. शेवट थोडा संदिग्धच बरा वाटतो मला. :)
जशी लेखिकेची इच्छा. :)
गूढकथा हा प्रकार आपल्याला चांगलाच जमतो. गूढकथा हा विषय हाताळाणारे फार कमी लेखक आहेत, लेखिका तर जवळ्पास नसाव्यात. (कदाचीत लिहितांनाच त्यांची घाबरगुंडी उडत असावी )
स्त्रीजन्मा तुझी ही कहाणी. आयुष्य खरच सोपे आहे का ? बिशेषःता जेव्हा ते ईतर माणसे रुल
(rule) करीत असतात तेव्हा. अन्याय सहन करु नये वगैरे बोलणे ठीक असते पण प्रत्यक्षात अन्यायी माणसांचा प्रतिकार करणे कठीण असते. स्त्री ला तर अधिकच जड जात असावे. माहेरीही वहीनीच्या राज्यात परत आलेल्या बाईला सामावुन घेणे अवघड असते, ्तीने खंबीरपणॆ आपल्या पायावर ठाम पणॆ उभे रहाणे हाच एकमात्र पर्याय असतो.
गोष्टीचा शेवटही आता चांगला जमला आहे.
व पुं ची परोपकारी भुतांची गोष्ट आपण वाचली आहेत का ?
I had been wanting to read this new story from you since the last few days. Aaj shevti vel milaalaa.
Vaachtaanaa shevti, angaavar thode shahaare aalele. Khara mhanje, I had sensed the end, but even after that, when I actually read it, I was stumped!
And as everyone says, alls well that ends well :)
Pudhli post kashaavar asel, hee utsuktaa aahe aataa maajhyaa manaat.
हरेकृष्णजी आणि केतन,
तुमच्या प्रतिसादांबद्दल आभार मानायला थोडा उशीरच झाला, अनेक धन्यवाद. गूढकथा हा प्रकार नेमका किती जमतो हे माहित नाही पण लिहायला नक्कीच आवडतो. शेवट अपेक्षित असूनही जर वाचकाला शेवट पर्यंत वाचायची इच्छा होत असेल तर ते त्या कथेचे यश मानायला हवे.
पुन्हा एकदा धन्यवाद.
kharach khup chan aahe katha...anakhi post kar
khup chan !!! :)
Sundar... Dusare shabdach nahit mazyakade.... :)
Hi,
This is Kimantu. I am editor of Aanandrutu E-Magazine. Recently read your blog. Its very nice. Especially I like your short stories. With your permission may I publish your stories with Aanandrutu E-Magazine? Please let me know asap.
Thanks & Regards
Kimantu
Official Website:
http://aanandrutu.com/
Official E-Mail Address:
aanandrutu@gmail.com
Facebook Page:
https://www.facebook.com/Aanandrutu
Facebook Profile link:
https://www.facebook.com/kimantu
Post a Comment