आम्ही मराठी
मध्यंतरी मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेला संमेलनाध्यक्ष अरुण साधू यांचा लेख वाचण्याचा योग आला. वाचताना मनात अनेक विचार येऊन गेले. यावर एके ठिकाणी विस्तृत लेख लिहावा असे मनात होते, त्यानिमित्ताने काही विस्कळीत विचार मांडत आहे. माझ्या अनुदिनी मित्रपरिवाराकडून काही प्रतिक्रिया अपेक्षित आहेत ज्यामुळे या लेखाची अंतिम बांधणी करणे सोपे जाईल.
मराठी विश्वाकडून बरेचदा नव्या पिढीला मराठीशी बांधून ठेवणे अशक्य होत आहे, नवी पिढी मराठीची हेटाळणा करते, परदेशी गेलेल्या मराठी माणसांनी मराठी भाषेशी आपली नाळ तोडून टाकली आहे असा सूर बरेचदा ऐकू येतो. यांत १००% म्हणता आला नाही तरी मोठ्या प्रमाणात तथ्यांश आहे. विशेषत: अमेरिकेत स्थायिक झालेल्या अनेक भारतीयांचा सहवास मला घडतो आणि मातृभाषेबद्दल त्यांच्या मनातील औदासिन्य कोठेतरी हृदयाला बोचते.
आपल्या मातृभाषेबद्दल एक प्रकारचा तिरस्कार केवळ आपण भारतीयच बाळगतो की काय ते कळत नाही परंतु मातृभाषा शिकून फायदा नाही, नव्या पिढीला कोठे मातृभाषा लिहिता वाचता येते, करायचे आहे काय तिचे संवर्धन करून? असा कोठे भविष्यात मातृभाषेचा उपयोग होतो आपल्याला? असा विचार करणारे सर्वत्र आढळून येतात. केवळ मराठीचा विचार करताही आपल्या मराठी समाजात अशीच भावना रूजत असल्याचे दिसते. इंग्रजीच्या तोडीस तोड उतरून मराठी पैसे मिळवून देऊ शकेल का? असा प्रश्न बर्याचजणांना पडतो.
या आणि अशा प्रश्नांची नेमकी उत्तरे काय द्यावीत याचा विचार केला असता; मराठी ही माझी मातृभाषा आहे, कळायला लागल्यापासून मी ती बोलते/तो आहे. माझे आई-वडिल, मित्रमंडळ, नातेवाईक मराठीच बोलत होते/ बोलतात. तिला इतिहास आहे, व्याकरणदृष्ट्या ती सक्षम आहे. ज्ञानेश्वरीपासून ते आजकालच्या तरूण लेखक- लेखिकांपर्यंत वाचण्यासारखे, त्यातून शिकण्यासारखे, मंथन करण्यासारखे मराठीत मुबलक साहित्य आहे, मराठी माणसे गुणी आहेत, मराठीचे संवर्धन करण्याची त्यांची योग्यता आहे आणि म्हणून मराठी जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, माझी भाषा राहिली पाहिजे. आपल्या मातृभाषेबद्दल बेफिकिर, बेजबाबदार किंवा न्यूनगंडपिडीत राहण्यात कोणताही मोठेपणा नाही.
साधूंनी या लेखात म्हटल्याप्रमाणे मातृभाषेबाबत बेफिकिरी दाखवण्याचा हा प्रश्न जगात बहुधा सर्वांनाच भेडसावत असावा. जगाच्या बाजारात टिकाव धरायचा तर इंग्रजीला पर्याय नाही परंतु जर ज्ञानभाषा आणि मातृभाषा अशा दोन्ही भाषांचे संवर्धन जर आपण सारख्या प्रेमाने केले तर यांत नेमके नुकसान कोणते? अमेरिकेत राहून कधीतरी लक्षात आलेली एक गोष्ट म्हणजे मी कधीही चिनी आई-वडिलांना आपल्या मुलांशी खाजगीत इंग्रजी बोलताना पाहिलेले नाही. ते व्यवस्थित हेल काढून आपली मातृभाषा बोलतात. अनेक युरोपीयही आपल्या मुलांशी खाजगीत मातृभाषेतून बोलतात, याविरुद्ध भारतीय माणसे सार्वजनिक ठिकाणी मोठमोठ्याने आपापसात आपल्या मुलांशी इंग्रजीत संभाषण करण्यात धन्य मानतात. का ते त्यांचे तेच जाणोत. अर्थात यात चुकीचे काहीच नाही परंतु नेमके बरोबर तरी काय असावे?
शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावरून असे आढळले आहे की दोन भाषा उत्तम जाणणारी मुले प्रत्येक परीक्षेत एकभाषी मुलांच्या पुढे असतात. त्यांचे विचार अधिक परीपक्व असतात, त्यांची आकलनशक्ती इतरांपेक्षा खचितच अधिक असते. भारतीय आणि इतर आशियाई देशांतील मुलांची प्रगती पाहता या विधानावर विश्वास ठेवणे सहज शक्य आहे.
जागतिक बाजारपेठ झपाट्याने वाढत असता शर्यतीतून कधीतरी मराठी पाठी पडली. तिला दुर्लक्षित ठेवण्यास जबाबदार आपणच आणि ती दुर्लक्षित ठेवण्यात धन्य मानणारेही आपणच. गेले वर्षभर मी नेटाने मराठीत लिहित असल्याने भारतीय आणि परभारतीय मराठी वाचक मराठीला कसा तगवून आहे याची बरेचदा प्रचीती आली आहे. कौतुकाची गोष्ट म्हणजे हे करण्यात परदेशांतीलच अनेक मराठी माणसांचा सहभाग आहे. इंटरनेटवरील जोमाने वाढणारी संकेतस्थळे, अनुदिनी (blogs), वर्तमानपत्रे पाहिली की मराठी भाषेचा र्हास होत आहे ही ओरड मिथ्या वाटू लागते. आजमितीला मराठीत दरवर्षी दीड दोन हजाराहून अधिक पुस्तके प्रकाशित होतात. इतक्या मोठ्या संख्येने मराठी पुस्तके छापली जात असतील तर त्यांना वाचकगण आणि खप असणारच, याचा मनाला आनंद होतो. परदेशातूनही मराठी मंडळांतर्फे निघणारे मराठी अंक मराठी भाषा तगवून ठेवण्याचा प्रयत्न करतात परंतु लक्षपूर्वक पाहिले असता २०-२५ वयाच्या दरम्यानची तरूण पिढी अभावानेच लेखन करताना आढळते, या विसंगतीचा कोठेतरी विशाद वाटून जातो. नव्या पिढीबरोबरच आपल्या मातृभाषेपासून त्यांना वंचित ठेवणार्या आणि तिच्याविषयी गोडी निर्माण करण्याचा प्रयत्नही न करणारे पालकही या अनास्थेस जबाबदार आहेत.
या पार्श्वभूमीवर नुकत्याच पाहण्यात आलेला ऑस्कर पुरस्कार वितरण समारंभातील एनिनो मोरोकोनी या जगप्रसिद्ध इटालियन संगीतकाराचे उदाहरण द्यावेसे वाटते. The good, the bad and the ugly ची सुप्रसिद्ध धून इतर अनेक चित्रपटात मोहवून टाकणारे श्रवणीय संगीत देणार्या या ज्येष्ठ कलाकाराने ऑस्करच्या व्यासपीठावर आपले भाषण इटालियन भाषेत केले. इंग्रजी न बोलल्याची खंत किंवा लाज त्याच्या चेहर्यावर आणि प्रेक्षकांच्या चेहर्यावर कोठेही नव्हती. आपला पुरस्कार त्याने आपल्या पत्नीला समर्पित केल्यावर त्या दोघांच्या डोळ्यांतील भावना लाखो प्रेक्षकांपर्यंत नेमक्या पोहोचल्या. आपले कलागुण दाखवण्यासाठी इंग्रजीसारख्या ज्ञानभाषेची गरज नक्कीच आहे परंतु आपली मातृभाषा कोणत्याही प्रकारे आणि ठिकाणी कनिष्ठ दर्जाची नाही हेच यातून दिसले.
यावर्षीच्या मंडळाच्या अंकाच्या संपादनात मदत करताना मला अनेक लोकांचे विचार आणि भावना कळल्या. कोठे उत्साह दिसला तर कोठे औदासिन्य, परंतु अनास्थेचे प्रमाण उत्साहाच्या प्रमाणापेक्षा फार मोठ्या प्रमाणात होते हे नमूद करावेसे वाटते. या संमिश्र भावनांतून मनात आलेले विचार येथे मांडले आहेत.
14 comments:
आजचच उदाहरण. माझी बायको म टा सन्मान सोहळा पहात होती माझ्या मुलाने काय हा BORING मराठी कायक्रम तुम्ही मराठी कायक्रम बघता कसे म्हणुन T.V. बद केला.
आम्ही एकमेकाशी english मध्ये बोलतो,मुलाचे EDUCATION , english माध्यामाच्या शाळामध्ये झाल्यामुळे मराठी फारसे वाचता येत नाही. ख्ररच मातृभाषेबद्दल बेफिकिर, बेजबाबदार किंवा न्यूनगंडपिडीत राहण्यात कोणताही मोठेपणा नाही.
Hello mam!
"Navin pidhi ani Sahitya"
arathat navin pidhi-ya natyane comment deou ichite karan tumhi namud kelelya pidhimadhe me ahe mhnun!
Marathi sahitya mhtle ki ek Longggg story smaor yete ajkal vel kuthe asto evdhya mothya stories vachayala i mean sahitya vachalayla
kalabarobar je badal marathi sahityat kinva marathilekhnat hone zarori ahet te kami padat ahe ase me mhnen ..
{kami yasthi mhnen ki blogs chya madhaymatun ajunhi marathi jagrut ahech}
karan aaj kavitan madhalya jud shabdanpeksha charolitle short n sweet words changle vatat atleast mala tari!
aso!kahi lihinyat chukale aslyas sorry
Ashwini
अश्विनी,
चुकलं कशाबद्दल. मला आनंद वाटला की तू नव्या पिढीचे म्हणणे सांगितलेस परंतु मराठी म्हणजे लॉंऽऽग स्टोरिज हे कसे? मराठीत अनेक कथा, लघुकथा, ललित साहित्य आहे की.
त्यातून मराठी साहित्याबद्दल मला तक्रार नाही असे नाही परंतु एखादी गोष्ट मिळत नाही म्हणून त्याचा नाद सोडायचा की ती मिळावी म्हणून प्रयत्न करायचा?या हात झटकून देण्यालाच मी औदासिन्य म्हणेन. मराठी साहित्यात भर कोण घालणार? नवी पिढीच ना! पण मग ती हजारो कारणे देऊन आपल्या भाषेशीच फारकत घेऊ इच्छिते तेव्हा विशाद वाटतो.
आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला काहीच हरकत नसावी. :)
हरेकृष्णजी आपला प्रतिसाद आणि इतरत्र यालेखामुळे आलेल्या सुचवण्यातून मूळ लेखात सोमवारी बदल करणार आहे. धन्यवाद.
Hello Mam,
mafi yasthi ki me 1st time jara virodhatmak bolale ahe.generally me asa matpradarshan karat nahi/mhnun.
marathi-katha, sahitya..yakadun apeksha ahe ki thoda tari realistic asave.aajkiti tari navin prashan,vishay ahet pan kahi sahitya, katha asa mhtla ki purvichech vishay lekhakankadun chagalale jatat.ajchya kalabarobar nako ka jayla marathi sahityani?aaj hindi,marathi films songs badlalelch na.
exmpl mhnal tar mam,
"Pu.la.deshpande" che lekhan
pan ase lekhan hotech nahi na!ani mag lagech sahitik mandali bolayala uthatat ajchya pidhila kimmat nahi vagiare tyamule vachak milat nahit asach kahi.
marathi sahitya sammelanat nakki kay hote?ani tyche outputs kay milatat kahich nahi.darvarshi patya taklyapramane ektra yetat, vaad kartat,navya pidhichya navane oradtat ani parat nxt yr tech!
tar mag chuk konachi
rgds
Ashwini
अश्विनी,
राग मानू नकोस पण मला वाटते तू पुरेशा माहितीशिवाय बोलत आहेस किंवा आपण दोघी वेगळ्या प्रतलांवरून बोलत आहोत. :)
मराठी साहित्य आणि आपली भाषा माहित असणे त्यात संवाद साधता येणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. जर भाषा बोलताच येत नाही, वाचताच येत नसेल, संवाद साधताच येत नाही तर पुढची पिढी काय मराठी साहित्य वाचणार?
मराठी साहित्यात गौरी देशपांडे, मेघना पेठे, मोहना जोगळेकर, निळू दामले, मिलिंद बोकिल आणि असे बरेच नवे आणि वेगळ्या विषयांवर लिहिणारे लेखक आहेत. दुर्देवाने आम्ही पु.ल. देशपांड्यांनाच आठवतो. (सर्व वाचकांनी मला माफ करावे, पु.ल. मला आवडत असले तरी त्यांनी मराठी साहित्याला हलकेफुलके बनवले आणि मराठी वाचकांना गंभीर लेखनापासून दूर नेले असे माझे स्पष्ट मत आहे. अर्थात याचा दोष पु.लंना देऊन चालणार नाही, पुन्हा दोष आपलाच आहे.)
जर पु.लं.चे मुबलक साहित्य वाचूनही आपण इतरांकडून तशाचप्रकारची अपेक्षा करत असू तर आपण सुजाण वाचक नाही असेही म्हणता यावे.
पु.लं. महान होते यात प्रश्नच नाही परंतु नोबेल पुरस्कार मिळवणार्या रविंद्रनाथ टागोरांएवढे महान का नाही झाले? प्रश्न भाषेच्या किमतीचा नाही, परंतु नवे लेखन करणार कोण? ६०-७० वर्षंचे दुढ्ढाचार्य की नव्या विचारांची नवी पिढी. सुधारणा हवी सांगायला सर्वच तयार असतात आणि वेळ येते तेव्हा आपल्या पायांवर डुगडुगत उभे राहणार्या नेतेमंडळींकडे बोट दाखवतात त्यातीलच हा प्रकार झाला. यालाच अनास्था म्हणता येईल.
मराठी साहित्यिक म्हणजे काय एखाद्या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेली बॅच आहे का? की ते आपल्यातीलच हौशी लेखकु असतील/ असावेत? मराठी साहित्य संमेलनात होते ते सर्वच बरोबर आहे असे मी म्हणत नाही (वादविवादातच आपली माणसे अधिक भाग घेणे पसंत करतात) परंतु तू माझा लेख जर नीट वाचलास तर मी मराठी साहित्याविषयी अजीबात बोलत नाहीये. साधूही त्यांच्या लेखात साहित्याविषयी बोलत नव्हते. मी फक्त भाषा बोलणे, मातृभाषेत संवाद साधणे, मातृभाषेची ओळख असणे इतक्या गोष्टींवरच भर देत आहे जर याच गोष्टी माहित नसतील तर "मराठी साहित्य" म्हणजे काय हा फार पुढचा विचार आहे असे खेदानेच म्हणावे लागेल.
धन्यवाद.
सुरेख लेख, आवडला. त्याचबरोबर विषय गुंतागुंतीचा आहे. तू इटालियनचे उदाहरण दिलेस, ते अगदी बरोबर आहे. युरोपमध्ये इटली, फ्रान्स या देशांमध्ये आपल्या भाषेचा जबरदस्त अभिमान आहे. (फ्रेंच-इंग्रजी शत्रुत्व तर प्रसिद्ध आहे.) त्याचबरोबर जपान-चीन-कोरीयामध्येही ही भावना दिसून येते. आपल्याकडेच फाडफाड इंग्रजी बोलले की 'स्मार्ट' हा समज कसा तयार झाला कळत नाही. तेही सगळीकडे नाही. दाक्षिणात्य लोक एकमेकांशी त्यांच्या भाषेत बोलतात. मराठीतील सुरेख अनुदिन्या (त्यातली ही एक) बघून छान वाटते, आणि अजूनही आशा वाटते.
वरची मराठी साहित्यावरची चर्चा वाचली. मी फारसे मराठी साहित्य वाचलेले नाही. आणि पुलंच म्हणशील तर मला त्यांच गंभीर लेखन जास्त भावतं, जसे की वंगचित्रे. त्यांनी तसे लेखन जास्त केले नाही हे दुर्दैव. मराठी साहित्य चाकोरीबाहेर फारसे जात नाही असे मला वाटते. त्यामानाने इंग्रजी साहित्याचा परिघ जवळपास जगभर असल्याने त्यात विविधता भरपूर आहे. तरीही मला मराठी वाचायला, बोलायला आणि लिहायला मनापासून आवडते. शेवटी माझी पहिली मैत्रीण आहे ना :-)
राजेंद्र
अगदी!! :) पहिली मैत्रिण माझीही. विषय गुंतागुंतीचा आहेच कारण येथे आपण पटकन कोणालाही चूक ठरवू शकत नाही. म्हणून फक्त विचार मांडला. जसे तू म्हणतोस की इतरांना आपल्या राष्ट्रभाषेचा, मातृभाषेचा जाज्वल्य अभिमान असतो. अभिमान बाळगला नाही तरी प्रेम, आत्मीयता, जिव्हाळा बाळगायला काय हरकत आहे?
दोन भाषांवर प्रभुत्व असेल तर तुमच्या आयुष्यातील, समाजातील, साहित्यातील अनेक विचार तुम्ही संपूर्ण जगासमोर मांडू शकता, भाषांतरे होऊ शकतात परंतु यासाठी दोन्ही भाषांचे आकलन होणे महत्त्वाचे. मराठी साहित्य चाकोरीबाहेर न जाण्याचे कारण लेखकांबरोबरच वाचकांची अनास्था असेच आहे. आपण गंभीर किंवा वेगळ्या विचारांकडे पाठ दाखवतो. नारळीकर विज्ञानकथा लिहित, वाचकांनी त्या उचलून धरल्या असत्यातर इतरांनी त्यात अधिक सकस लिखाण केले असते.
hi priyambhashini,
first of all thanx for reading my blog.. n yes, i completely agree wid ur comment.. TOI vachnyachya layakicha ch nahiy.. mi fakt ascent vachte!
neways.. i had read ur blog previously.. chan ch lihtes tu.. tu manogat varchi priyali na??
तुझे विचार तंतोतंत पटले, प्रिया! तरुण पिढीत भाषेबद्दल गोडी न निर्माण करण्यास सर्वस्वी पालकच जबाबदार आहेत, हेही पटलं. शेवटी लहानपणी जे भाषेचे संस्कार होतात, ते सगळ्यात महत्त्वाचे ठरतात. अगं अमेरिकेचं काय घेऊन बसलीस, मी तर पुण्यातदेखिल आई-वडिलांना उगाचंच मुलांशी इंग्रजीतून बोलताना पाहिलं आहे. फार वाईट वाटतं असं पाहून. रागही येतो.
पण आनंदाची गोष्ट अशी की इंटरनेटवरील काही उत्कॄष्ट ब्लॉग्ज २०-२५ या वयोगटाच्या आसपासच्या तरुण पिढीचेदेखिल आहेत! :) काही तरुण लेखक, कवी अजूनही चांगली साहित्यनिर्मीती करताना दिसतात. म्हणजे परिस्थिती अगदीच हाताबाहेर नाहीये... पण चिंताजनक आहे, नक्कीच. कारण मोजक्या मंडळींनी चांगलं लेखन केलं, तरी वाचणारे हवेत ना!
असो. तुझ्या लेखासाठी शुभेच्छा! ऑनलाईन प्रसिद्ध होणार आहे का हा लेख?
आपण अश्विनीला दिलेले उत्तर योग्य आहे. गौरी देशपांडे, मेघना पेठे, मोहना जोगळेकर, निळू दामले, मिलिंद बोकिल ह्याची पुस्तके मी वाचली आहेत. हयाच प्रकारचे माझे पत्र लोकसत्ता मद्धे प्रसिद्द झाले होते आपण तरुण पिढीच गाणे केव्हा ऐकायचे ? अजुन कितो दिवस त्याच त्याच वयोव्रूध्याचे गाणे सहन करीत रहायचे अश्या आशयाचे.
अजुन किती आम्ही जुन्या आठवणीत रमायचे?
भाषा बोलणे, मातृभाषेत संवाद साधणे, मातृभाषेची ओळख असणे आणि त्या साठी भरपुर साहित्य वाचणॆ
भाग्यश्री, प्रिया आणि हरेकृष्णजी अनेक धन्यवाद.
भाग्यश्री,
हो मीच ती! :)
हरेकृष्णजी,
हो संगीताचे, गाण्याचेही अशाच बाबींत येते. मला वाटतं की गद्यापेक्षा पद्य लिहिणे कठिण असते. त्यासाठी भाषेची जाण अधिक हवी, शिवाय कविता (or songs for that matter) हृदयातून मनातून स्फुरतात तेव्हा भाषेवर प्रभुत्त्व हवेच ते नसेल तर मराठीत नवी गाणी लिहिणार कोण? अश्विनीने तिचे मत मनापासून आडपडदा न ठेवता मांडले याबाबत मी तिची आभारीच आहे.
प्रिया,
तू, नंदन, चक्रपाणि, गायत्री, अश्विनी, भाग्यश्री, योगेश आणि इतर बरेच (नावे राहून गेल्यास क्षमस्व!) ही नवी पिढी पाहिली की खूप बरं वाटतं, पण इंग्रजी माध्यमातून शिकल्याने आम्ही दोन ओळी मराठी लिहू शकत नाही सांगणारी पिढी पाहिली की तितकेच वाईट वाटते.
काय आहे की हा लेख आमच्या मराठी मंडळासाठी लिहिला होता. इथे राहिले की जी नवी पिढी आहे(not 20-25 yrs old but young kids of age 12-14) तिला मराठी भाषा पारतर कळते पण औषधालाही बोलता येत नाही. (अर्थात इथेही अपवाद आहेतच) त्यामानाने दाक्षिणात्य मुलांना त्यांची मातृभाषा अधिक प्रमाणात बोलता येते हे जाणवले. (लिहिणे ही फारच पुढची पायरी म्हणता येईल.)
तू पुण्या-मुंबईचे उदा. दिलेस ते ही खरेच. कालच म.टा.चा लेख वाचला. येथे दुवा देते.
लेख
लेखाच्या नावापासून लेखिकेच्या सहीपर्यंत सर्व इंग्रजी, याला मराठी लेख म्हणायचे का? अशी परिस्थिती आहे आपल्याकडे सध्या.
हा लेख म.मं.च्या अंकात टाकायचा होता. ऑनलाईन म्हणजे येथेच अनुदिनीवर. त्यानिमित्ताने ऑर्कुटवर मला मोलाच्या सूचना देणार्या शैलेश खांडेकर आणि इतरांचेही येथेच आभार मानते.
प्रियंभाषिणी, लेख मूळातच उत्कृष्ट होता, :) त्यात आपण अजून मुद्दे जोडून तो अतिशय सुरेख केला आहे.
प्रियालीताई,
ब्लॉग बराच लोकप्रिय दिसतो.
सगळेच लेख आवडलेत.
चित्तरंजन
तुमचा ब्लॉग वाचणाऱ्यांसाठी माहिती
कविवर्य सुरेश भट ह्यांच्या नावाने संकेतस्थळ नुकतेच सुरू झाले आहे. मराठी गझल आणि कविवर्य सुरेश भट ह्यांना समर्पित असे हे संकेतस्थळ आहे. www.sureshbhat.in आणि www.sureshbhat.com ह्या दोन पत्त्यांवरून ह्या संकेतस्थळाला भेट देता येईल.
चित्तरंजन भट
पूर्ण ब्लोग वाचला. मनोगत वर तुमचं लिखाण वाचलयं. हा लेख आज वाचला म्हणून आत्ता प्रतिसाद देत आहे. अमेरिकेत राहुन मुलांना मराठी शिकवणे अवघड आहे पण यावर उपाय काय सुचवाल? ofcourse आपण घरी त्यांच्याशी मराठीत बोलु पण लिहिणं-वाचणं शिकवणं फ़ार अवघड किंबहुना पुष्कळ्सं अशक्य वाटतं.
Post a Comment