प्रकार

Tuesday, December 12, 2006

मुखवटे

"संपूर्ण जगात तूच सुंदर," असे सांगणारा जादूचा आरसा स्नो व्हाईटच्या गोष्टीतल्या सावत्र आईकडे खरंच होता का असा प्रश्न मला बरेचदा पडतो. म्हणजे विचार करायला लागलं तर नेमकी काय गरज अशा आरशाची? आरसा आपल्याला जे पाहायचे असते तेच दाखवतो म्हणतात. या गृहीतकानुसार प्रत्येकाने आरशात सुंदरच दिसायला हवे. तसं प्रत्येकाने सुंदरच का दिसावे यामागची कारणमीमांसा सोपी आहे, आपले दोष सहज कबूल करणारी, मोठ्या मनाने आपल्या चुका मानणारी माणसे कोठे सापडतात? मी म्हणतो तेच खरे, माझेच इतरांनी ऐकले पाहिजे, माझेच बरोबर आणि "मीच सर्वांत सुंदर!" यांत नेमका फरक तो कोणता? सौंदर्याचा बेगडी मुखवटा धारण करणार्‍यांना आपला खरा चेहरा पाहावासाच वाटत नसेल तर?

मध्यंतरी एके ठिकाणी माणसांचे गुण-दोष, आवड-नावड त्यांच्याच शब्दांत वाचण्याचा योग आला. प्रत्येकाने आपल्या गुणांचे आणि आवडींचे वारेमाप वर्णन केले होते, परंतु जेथे दोष आणि नावडीबद्दल लिहायचे होते तेथे थोडक्यात मला भ्रष्टाचाराचा राग आहे, मला स्वत:ची टिमकी वाजवणार्‍या व्यक्ती आवडत नाहीत, मला अस्वच्छता आवडत नाही, मला भिकार्‍यांचा, राजकारण्यांचा राग येतो असे प्रचारी मुद्देच मांडलेले आढळले. अगदी अभावाने एखाद्याने 'मी नकार पचवू शकत नाही, एखाद्याने माझे मत नाकारले तर माझा संताप अनावर होतो.' असे लिहिले होते. इतरांना आपले म्हणणे इतक्या परखडपणे आणि सुस्पष्टपणे मांडता आले नाही याचे कारण 'इतरांनी मला चांगले म्हणावे, माझे दोष इतरांना दिसू नयेत' अशी भीती असते की 'मी स्वत:ला आहे तसा स्वीकारू शकत नाही, माझे दोष मलाच दिसू नये याची मी काळजी घेतो' असा स्वार्थ असतो कोणास ठाऊक? मला व्यक्तिशः दुसर्‍या विधानावर जास्त विश्वास वाटतो.

यावर पुढील प्रश्न निर्माण झाला की जगात कितीजणांना नकार स्वीकारता येतो? जी उत्तरे मिळाली त्यावरून तो तसा बर्‍याचजणांना पचवता येतो पण तो पचवला जातो याचे खरे कारण त्याखेरीज आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो म्हणून. जेथे तो स्वीकारायचा नसतो तेथे समोरच्या माणसाला येन केन प्रकारेण नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्याचा अपमान करणारी, मारहाण करणारी, एखाद्याची बदनामी होईल असे उद्योग करणारी आणि कुटील कारस्थान रचणार्‍या माणसांपासून ते प्रेयसीला जाळणारी माणसे याच प्रकारात मोडतात.

माणसाला जनाची नाहीतरी मनाची लाज हवी असेही म्हटले जाते. प्रत्यक्षात मात्र माणूस स्वत:चे अंतरंग लपवून समाजात आपली पत, प्रतिष्ठा राखण्यासाठी कोठल्याही प्रकारे चकचकीत मुखवटा लेऊन तयार असतो असे दिसून येते. जनाची लाज बाळगणारे जगात बहुसंख्य आहेत पण मनाची लाज बाळगणारे अगदी कमीच असावेत की काय असे वाटते. या माणसांना आपला चेहरा आरशात सुंदर दिसत असावा का? याचे उत्तर "हो" असेच द्यावे लागेल. चेहर्‍यावरचे मुखवटे, रंग उतरवल्याशिवाय आपलाच चेहरा दिसायचा कसा? इतरांना एखाद्या सुंदर, सोज्वळ, विद्वान चेहर्‍यामागे दडलेला राक्षस दिसणे केवळ अशक्य होऊ शकते, पण माणसाला स्वत:चाच हिडिस चेहरा दिसू नये किंवा पाहायची भीती वाटावी यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय? कदाचित हा रंगवलेला मुखवटाच आपला चेहरा असावा या भ्रमात जगणे ही माणसे पसंत करत असावीत.

मुखवटे चढवणे वाईट असे म्हणता येत नाही, बरेचदा ते चढवणे आपल्या आणि इतरांच्या फायद्याचेच असते, कधीतरी आत्यंतिक गरजेचेही असते. परंतु सतत मुखवटे चढवून मिरवणारी माणसे स्वत:ची आणि इतरांची फसवणूकच करत असतात. माणसाने या मुखवट्यांच्या आणि रंगांच्या गर्दीत स्वतःला विसरून जावे याचे कोठेतरी आश्चर्यही वाटते.

मध्यंतरी वाचनात आले होते की काही सिने नट-नट्या झोपतानाही आपला मेक-अप उतरवत नाहीत. केवळ या भीतीपोटी की सकाळी उठून आपण स्वत:लाच ओळखले नाही तर काय घ्या? भारतीय नट नट्यांचे फारसे माहीत नाही पण मायकेल जॅकसन तोंडाला रंग लावूनच झोपतो असे ऐकले होते. विनोदाचा भाग सोडला तर या कलावंतात आणि सामान्य माणसात फार फरक आहे असे मला वाटत नाही. प्रत्यक्ष जगातही बरेचजण मुखवट्यालाच चेहरा समजून जगत असावेत आणि आरशात स्वत:ला सर्वात सुंदर समजत असावेत याचा मनाला कोठेतरी खेद वाटतो.

5 comments:

Anonymous said...

प्रियभाषिणी,
फ़ार विचार करायला लावणारा लेख लिहीलास. खरंय. आपण सर्वं काही आपले दोष झाकायचाच प्रयत्न करतो किंवा दिसले तरी त्या वेळेस मी योग्य तेच केलं होतं म्हणून स्वत:ची फ़सवणूक करतो.
खरं तर या stage ला पोचायला कितीतरी गोष्टींनी हातभार लावला नाहीतर मी येथे पोचलोच नसतो असे म्हणणारे कमी असतात. माझी लायकी जरा(?) कमीच होती पण मिळाले आता मी त्रुप्तं आहे असं किती जणांच्या मनात येत असेल?
हा, ज्याने लग्नं केले असेल त्याला तो काय आहे आणि तो किती दोषपूर्ण आहे हे त्याची बायको त्याला वेळोवेळी दाखवून देत असतेच. तेव्हा निदान त्यासाठी तरी प्रत्येक पुरूषाने लग्नं करायला हवे असे वाटते.
हा विषय जस्तं लिहीण्यासारखा आहे तेव्हा अजून वेगळं लिहीण्याचा ईरादा आहे. क्रुपया e-mail कळविणे. माझा e-mail id आहे : patilhs57@gmail.com

Priyabhashini said...

धन्यवाद हेमंत. तुम्ही म्हणता तसे हा विषय जास्त लिहिण्यासारखाच आहे. आपण कित्येकदा स्वत:चीच फसवणूक करत असतो आणि त्या खोट्यालाच सत्य मानून जगत असतो. हल्लीच असे प्रसंग डोळ्यासमोर घडल्याने हा लेख लिहावासा वाटला. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येतातच, त्याचा कधीतरी विषाद वाटतो तर कधीतरी दु:खी व्हायला होतं. तुमचे अनुभव वाचायला खूप आवडतील. एखादा झकास लेख बनवून टाका ना तुमच्या अनुदिनीत. मनापासून वाचायला आवडेल. शुभेच्छा!

Anonymous said...

प्रियभाषिणी,
तुमचा लेख सुंदर आहे, मनापासून आणि कळकळीने लिहिलेला आहे. मला आवडला. परंतु ह्याच गोष्टीकडे थोड्याशा वेगळ्या द्दृष्टीकोनातून बघावसं वाटतं. पहिल्या परिच्छेदातील प्राथमिक गृहितक तितकसं बरोबर नाही. स्नो व्हाईटच्या कथेतील आरसा सत्यवचनी होता. जोवर स्नो व्हाईटची सावत्र आई खरोखर जगातील सर्वात सुंदर स्त्री होती तोवर त्याने तसे सांगितले. जेव्हा परिस्थिती बदलली आणि स्नो व्हाईट सावत्र आईहून सुंदर झाली तेव्हा त्याने हे सत्यही निर्विकारपणे सांगितलं. फळ काय मिळालं? सावत्र आईनं आरसा फोडून टाकला. आरसा (भौतिक असो वा आंतरिक) सत्य तेच दाखवतो. आपणच ते स्वीकार करण्यास तयार नसतो. " सत्यम् शिवम् सुंदरम् " हे आपण फक्त म्हणतो. प्रत्यक्षात सत्य हे बहुतेक वेळा कटु, भीषण आणि दाहक असतं. त्या दाहकतेतून, भीषणतेतून, कटुतेतून शिवस्वरूप सौंदर्य शोधायची व स्वीकारायची छाती असणारा मनुष्य लाखातून एखादाच असतो. बाकी आपण सारे सामान्य असतो. आणि सामान्यांना स्वत:बद्दलचं सत्य पचत नाही, रुचत नाही. त्याला सामोरं जावं लागलं तर आपण कोलमडून जाऊ.तो धक्का आपण सहन करू शकणार नाही. म्हणूनच असं वाटतं की ही मुखवटे धारण करण्याची युक्ति हे आपल्यासारख्यांना परमेश्वरानं दिलेलं वरदान आहे. अति मुखवटे धारण करू नये हे खरं असलं तरी काही मुखवटे असावेच लागतात अन्यथा जगणं कठीण होईल.हे मुखवटे म्हणजे आपण आपल्या आत्मचित्राला (self-imageला) लावलेले टेकू असतात. ते सारे काढून घेतले तर प्राणपणाने जपलेला इगोचा डोलारा कोसळेल.
आपण जगासमोर जे मुखवटे घालून फिरतो ते मुखवटेच आहेत,आपला खरा चेहरा नाही हे आपण जाणून असतो व ही जाणीव आपल्याला सतत खुपत असते. त्या खुपण्याचं शल्य बोथट करण्यासाठी मग आपण स्वत:शी खोटं बोलू लागतो. जे खोटं आहे ते खरं आहे हे वारंवार स्वत:ला सांगत राहतो, सत्य आपल्या मनाच्या अधिकाधिक खोल तळघरात दडवू लागतो. शेवटी केव्हातरी आपण निदान consciously तरी खोट्यास खरे मानू लागतो. मात्र कितीही स्वत:ची फसवणूक केली तरी sub-consciously हा फक्त मुखवटा आहे हे आपण जाणून असतो. ही खोटेपणाची, अपराधीपणाची भावना कधी ना कधी, कितीही दाबली तरी उफाळून येतेच.स्वत:स फसवण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे मला नोकरी/बढती/संधी मिळाली तर माझ्या गुणवत्तेमुळे पण ती दुसऱ्यास दिली गेली तर वशिल्यामुळे वा भ्रष्टाचारामुळे. स्त्रीला बढती मिळाली तर तिचे पुरुष सहकारी तिच्याबद्दल आणि तिला बढती देणाऱ्या वरिष्ठाबद्दल काहीबाही बोलणार. पुरुषास बढती मिळाली तर त्याच्या बरोबर काम करणाऱ्या स्त्रिया म्हणणार की पुरुष स्त्रियांना वर येऊ देत नाहीत. ह्या दोन्ही गोष्टी घडत नाहीत असं नाही. पण दरवेळेस तेच घडतं का? आपल्यापैकी किती जण अशावेळी कठोर आत्मपरिक्षण करून हे मान्य करतात की ज्याला बढती दिली गेली तो/ती आपल्याहून अधिक लायक होता/ती? हा प्रामाणिकपणा, हे धैर्य , मुखवटे उतरवून स्वत:कडे बघण्याची शक्ति देवदुर्लभ आहेत. आणि त्या तशा आहेत म्हणून आपण सर्वसामान्य माणसं वेडे न होता जगू शकतो.

Priyabhashini said...

मिलिंद
सर्वप्रथम तुमच्या विस्तृत प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. प्रतिसाद आवडला, वेळ काढून तुम्ही लिहिलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद.

स्नो व्हाईटच्या आईच्या आरशाचे गृहितक तितकेसे खरे नाही हे बरोबर.:) प्रश्न एवढाच म्हणजे जो मला तुमचा प्रतिसाद वाचल्यानंतर जाणवला की स्नोव्हाईटच्या आईपेक्षाही सुंदर कोणीच नव्हते का? मला वाटतं असावे परंतु ते तिच्या खिजगणतीत नसावे त्यामुळे आपणच सुंदर हे ती मानत होती आणि आरसा सांगत होता. स्नोव्हाईट मोठी झाल्यावर ती आपल्यापेक्षा सुंदर दिसते हे तिची आई जाणत होतीच आणि मग आरसाही तसेच सांगायला लागला. कदाचित आरसा हे मनाचे रुपक असावे.

दुसर्‍या परिच्छेदात तुम्ही म्हणता ते मात्र खरे की हे मुखवटे काढून जगणे सोपे नाही. आपण आपला ego कुरवाळ्ण्यासाठी इतरांमध्ये दोष शोधतो. कठोर आत्मपरीक्षण तर सोडा obvious चुकांबद्दल माफी मागायलाही आपण तयार नसतो. 'मीच बरोबर आणि माझंच खरं' हे दुसर्‍यावर ठसवताना ते आपण आपल्या मनावरही ठसवत असतो. त्याचे कारण बहुधा गील्ट फिलींग राहू नये असे असावे आणि यासगळ्या मुखवट्यात कधीतरी आपण आपला खरा चेहराच विसरून जातो की काय असे वाटले. :)

Anonymous said...

Completely Agreed
Prachi

marathi blogs