प्रकार

Monday, November 27, 2006

वादळ जगणारी माणसे

वर्षातले आठ महिने सप्टेंबर ते मे आम्ही उत्तर अमेरिकेत बंदिस्त जीवन जगतो. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला येणाऱ्या कामगार दिवसाच्या (लेबर डे) सुट्टीपासून ते मे महिन्याच्या अखेरीस येणाऱ्या सैनिक स्मृतिदिनाच्या (मेमोरिअल डे) सुट्टीपर्यंत उत्तर अमेरिकेतील उघड्यावरील बरीचशी प्रेक्षणीय स्थळे व कार्यक्रम बंद ठेवण्यात येतात. काही मोजकी ठिकाणे सुरू असली तरी खराब हवामानामुळे मुलाबाळांसकट प्रवास करणे सहसा शक्य होत नाही. राहता राहिले ४ महिने, या दिवसांत मात्र जिथे जाता येईल त्या सर्व ठिकाणी माणसे फिरून घेतात, प्रवास करतात व आठ महिने घरांत बंदिस्त राहिल्याने आनंदात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढतात.

असे असले तरी खराब हवामान सहसा साथ सोडत नाही. थंडी संपल्याच्या आनंदात आतुरतेने घराबाहेर पडणाऱ्या प्रवाशांच्या स्वागताला वादळी पाऊस नाहीतर 'टॉर्नेडो' नावाचे वादळ कधी उपटेल हे सांगणे तसे कठीणच. अमेरिकेचे हवामानखाते तसे बऱ्यापैकी विश्वासार्ह असल्याने रोज सकाळी उठून 'वेदर चॅनेल'वर एक नजर बरेचसे लोक टाकतातच, पण रोज मरे त्याला कोण रडे या उक्तीनुसार वाईट हवामानामुळे रोजचे कामकाज काही थांबून राहत नाही. घरात किंवा बाहेर, कधीतरी शेवटच्या क्षणापर्यंत वादळाचे निश्चित स्वरूप न कळल्याने वादळाचा जबरदस्त तडाखा अनुभवावा लागतो. प्रवास मात्र या काळात टाळता येण्याजोगा असतो, परंतु येणाऱ्या वादळाची कल्पनाच असेल तरच.

गेली ४-५ वर्षे अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागांत राहून अशी बरीच वादळे अनुभवलेली आहेत. एखाद्या जोरदार वादळामुळे घराची पडझड होणे, झाडे पडणे, गाड्या उलट्या पालट्या होणे, विजा पडणे, रस्ते, इमारती यांचे नुकसान होणे हे थोड्याफार प्रमाणात दरवर्षी होतेच. बरेचदा या वादळांच्या दरम्यान घरातील तळघराचा सर्वात सुरक्षित जागा म्हणून आसरा घ्यावा लागतो. सुमारे दोन आठवड्यांपूर्वी नॉर्थ कॅरोलायना राज्याला या वादळाने तडाखा दिल्याने सुमारे ८ माणसे मृत्युमुखी पडली व अंदाजे ५,००,००० डॉलर्सचे नुकसान झाले. दरवर्षी वादळांचे हे तांडव अनुभवावे लागत असल्याने त्याची भीती मनातून काही प्रमाणात कमी झाली असली तरीही प्रत्यक्ष वादळात अडकल्यावर काय होत असेल ते या वर्षीच्या एप्रिल महिन्यात आम्ही भर हायवेवर अनुभवले. निसर्गाच्या या रुद्रावताराविषयी लिहिण्यापूर्वी टॉर्नेडोबद्दल थोडी अधिक माहिती द्यायला आवडेल.

टॉर्नेडो म्हणजे आकाशातील ढगाला लटकलेला आणि स्वत:भोवती जोरदार गिरक्या घेणाऱ्या वाऱ्याचा स्तंभ. या टॉर्नेडोचे एकंदरीत स्वरूप बरेचदा एखाद्या नरसाळ्याप्रमाणे दिसते. आकाशात निर्माण झालेला हा स्तंभ जमिनीला चिकटला की त्याचे रुपांतर प्रत्यक्ष टॉर्नेडोत होते. कॅनडावरून येणारी थंड हवा व अमेरिकेच्या मध्य-पश्चिम भागातील उष्ण हवा यांच्या घर्षणामुळे व या वेगाने वाहणाऱ्या हवेसोबत येणाऱ्या प्रचंड ढगांमुळे टॉर्नेडोंचा जन्म होतो. या वादळांच्या दरम्यान बरेचदा ताशी १०० किंवा अधिक मैलांच्या वेगाने वारे वाहतात. अर्थात दरवेळेसच टॉर्नेडो तयार न होता ही वादळे विजा-गडगडाट होण्यापर्यंत सीमित राहतात. अशा वादळांची आम्हाला सवय आहे, सर्रकन ऊन सरून आकाशात ढग येणे, तास दोन तास मुसळधार पाऊस कोसळणे आणि त्यापुढच्या क्षणाला काहीच न घडल्यासारखे स्वच्छ ऊन पडणे या ऊन-पावसाच्या खेळाला आम्ही सरावलो आहोत, पण भर टॉर्नेडोत अडकल्यावर काय परिस्थिती होते ते यापूर्वी अनुभवले नव्हते.

टॉर्नेडोचा खेळ तसा लहानसाच असतो. बरेचदा ८ ते १० मिनिटांतच आटोपतो. परंतु एकापाठोपाठ एक असे अनेक टॉर्नेडो थडकण्याची शक्यताही असते. अशावेळी अनेक प्रकारच्या संपत्तीचे अपरिमित नुकसान व जीवितहानी होण्याची शक्यता असते. अमेरिकेच्या काही भागांत दरवर्षी सुमारे १,००० टॉर्नेडो अनुभवण्यास मिळतात. ही वादळे आपल्यासोबत प्रचंड वेगाने वाहणारे वारे, विजा, पाऊस व बरेचदा गारा घेऊन येतात. टॉर्नेडोची रुंदी सुमारे १ मैलाचा परिसर व्यापू शकते. ज्या भागावरून टॉर्नेडो सरकतो तिथे घरांची पडझड होणे, वृक्ष उन्मळून पडणे, गाड्या उलट्यापालट्या होऊन फेकल्या जाणे हे सहज होते.

या वर्षी एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला आम्ही फिरायला केंटकी राज्यातील केवसिटी येथे जाण्याचा बेत आखला होता. मुलीला 'स्प्रिंगब्रेक' (वसंत ऋतूत येणारी सुट्टी) होता. ५-६ महिने घरांत बसून जीव विटला होता. तापमानही जरा वर चढले होते, आणि मुख्य म्हणजे केवसिटीला असणारी सर्व आकर्षणे पर्यटकांसाठी सुरू ठेवण्यात आली होती. निवांतपणे प्रवास व्हावा या हेतूने माझ्या नवऱ्याने शुक्रवारी सुट्टी काढली होती व त्यानुसार आम्ही शुक्रवारी पहाटेच घराबाहेर पडलो. निघण्यापूर्वी केवसिटीला हवामान कसे असावे याचा अंदाज अर्थातच घेतला होता. वादळी पावसाची शक्यता वर्तवली होती परंतु अशी वादळे नित्याचीच असल्याने त्यात वावगे वाटण्यासारखे काहीच नव्हते व त्यावेळेपर्यंत धोक्याची सूचनाही देण्यात आली नव्हती. आमच्या समोर नेमके काय वाढून ठेवले आहे त्याची फारशी कल्पना आली नाही.

केवसिटीला जमिनीखाली प्रचंड आकाराच्या नैसर्गिक गुहा आहेत. येणाऱ्या पर्यटकांना त्यांचे मुख्य आकर्षण वाटते. याशिवाय तेथील डोंगरदऱ्यांतील उंचसखल भागांत घोडेस्वारी करता येते. उघड्या झोपाळ्यांतून डोंगरमाथ्यावर नेणाऱ्या स्कायलिफ्ट्स आणि तिथून एका छोट्याशा गाडीत बसून खाली घसरता येईल अशा अल्पाइन स्लाइड्स नावाच्या घसरगुंड्या, डायनॉसोर्सच्या प्रचंड प्रतिकृती असलेले उद्यान अशा विविध आकर्षणांनी हे ठिकाण नटलेले आहे. घरापासून केवसिटीला पोहचण्यासाठी आम्हाला सुमारे २२० मैलांचा पल्ला गाठायचा होता. २२० मैल म्हणजे सुमारे ४ तास प्रवास या हिशेबाने आम्ही सकाळीच निघालो होतो. पहिल्या दिवशी त्या परिसरातील सर्व आकर्षणांची मजा लुटायची आणि दुसऱ्या दिवशी आरामात केवसिटीच्या "मॅमथ केव" नावाच्या नैसर्गिक गुहा पाहायला जायचे असा बेत होता. या परिसरापासून ५ मैलावर असणाऱ्या 'हॉर्स केव' या ठिकाणी हॉटेलात आम्ही आमची राहण्याची सोयही केली होती.

सकाळी १०च्या सुमारास आम्ही केवसिटीला पोहोचलो तेव्हा कोवळे ऊन पडले होते. वातावरणही चांगले उबदार होते. आम्ही आमचे स्वेटर्स काढूनच गाडीच्या बाहेर पडलो आणि डायनॉसोर उद्यानात शिरलो. उद्यानातून फेरफटका झाल्यावर स्कायलिफ्टमध्ये बसायचे ठरले. स्कायलिफ्टमधून वर जाऊन अल्पाइन स्लाइड्सवरून घसरण्याचा हा खेळ माझ्या मुलीने यापूर्वीही कधीतरी खेळून पाहिला असल्याने तिला तिथे जाण्याची उत्सुकता अधिक होती. त्याप्रमाणे सुमारे १२ - १२॥च्या सुमारास आम्ही स्कायलिफ्टमधून डोंगरमाथ्यावर पोहोचलो. आकाशात ढग जमून आले होते. वाऱ्याचा वेगही वाढला होता. अल्पाइन स्लाइडवरून घसरत खाली येताना पाण्याचे हलके थेंब अंगावर पडू लागले. पावसाच्या तुरळक सरी आल्या तर त्यात काय मोठेसे असा विचार करून आम्ही दुसऱ्या फेरीतून पुन्हा डोंगरमाथ्यावर जाण्यासाठी स्कायलिफ्टमध्ये बसलो. वर जाताना पाण्याचे टपोरे थेंब वर्षायला लागले. आकाशात अचानक नेहमीपेक्षा वेगळेच दिसणारे काळेभोर ढग भरून आले. विजा चमकायला लागून गडगडाट व्हायला लागला तर उगीच या डोंगरावर अडकून पडायला नको म्हणून आम्ही ठरवले, 'आता इथून निघू, जेवून घेऊ आणि दुपारी दोनच्या सुमारास हॉटेलवर जाऊन आराम करू. संध्याकाळी पाऊस ओसरला की येऊ पुन्हा.' आमची कन्यका थोडीशी नाराज झाली खरी, पण येणाऱ्या संकटाची चाहूल कधीकधी नकळत लागते म्हणतात ती अशी. आमचा खेळ जर बंद केला नसता तर पुढे काय वाढून ठेवले होते याची कल्पना न केलेलीच बरी.

जवळच एका रेस्टॉरंटमध्ये जाऊन आम्ही जेवून घेतले. तेथून बाहेर पडलो तसा पाऊस कोसळतच होता, विजांचा चकचकाट सुरू झाला होता. 'बरं झालं आपण शहाण्यासारखं हॉटेलमध्ये परतायचं ठरवलं' असे म्हणत आम्ही गाडीत बसलो आणि गाडी हायवेवर घेतली. पाऊस बेधुंद कोसळत होता. हायवेवर इतर वेळी साधारणत: ७५-८० मैलांच्या वेगाने जाणाऱ्या गाड्या आता ३०-४० मैलांच्या वेगाने जात होत्या. आम्ही अंदाजे मैला-दोन मैलांचे अंतर कापले असावे. अचानक, "थाड!" गाडीवर काहीतरी आदळल्यासारखे वाटले. "काहीतरी आदळलं गाडीवर बहुतेक," मी नवऱ्याला म्हटले. "दगड असेल, रस्त्यावर पडलेला असेल आणि बाजूच्या गाडीमुळे उडून आपल्या गाडीला लागला असेल. गाडीवर कुठे पोचा (डेन्ट) पडला नसला म्हणजे मिळवलं," गाडीवर जिवापाड प्रेम करणाऱ्या माझ्या नवऱ्याने हळहळून म्हटले.

आणि पुढच्या क्षणाला "थाड... थाड... थाड..." गाडीवर कोणीतरी जबरदस्त दगडफेक केल्यासारखे काहीतरी आदळायला लागले. नक्की काय होतं आहे हे लक्षात यायला थोडा वेळ लागला आणि जे दिसले त्यावरून लक्षात आले की रस्त्याच्या बाजूला टेनिस किंवा बेसबॉलच्या चेंडूइतक्या मोठ्या गारांचा खच पडत होता. याच गारा आपल्या गाडीवर आदळत आहेत हे कळल्यावर सर्वात प्रथम माझ्या मुलीने तोंड उघडले, "डॅडी! या गारा गाडीच्या काचा फोडून आत येणार. मला एकटीला पाठी बसून भीती वाटते. आपण हॉटेलात कधी पोहोचणार?" तिला उत्तर देण्यापूर्वीच आमची गाडी प्रचंड धुक्यात शिरली आणि समोरचे काहीही दिसेनासे झाले. या परिस्थितीत गाडी चालवणे निव्वळ अशक्य होते. नवऱ्याने अंदाजाने कशीबशी गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली.गारा आता आणखीनच वेगाने आदळत होत्या. इतक्या मोठ्या गारा पाहायची ही आमची पहिलीच वेळ; अशावेळी आपला जीव वाचवायला नेमके काय करायचे असते याची आम्हाला काही कल्पनाच येत नव्हती. धुक्याच्या जाड पडद्यामुळे गाडीच्या बाहेर एक फुटापलीकडचेही दिसेनासे झाले होते. काचा फुटल्या तर काय करायचे? या गारा अंगावर बरसल्या तर काय होईल याची कल्पनाही करवत नव्हती. डोके खाली घालून शांत बसण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. "घाबरू नकोस. आम्ही आहोत ना इथेच तुझ्याबरोबर, आपण गाडीच्या आत सुरक्षित आहोत," माझा नवरा मुलीला शांत करण्यासाठी हे सांगत असतानाच गाडीला जोरात हादरा बसला. एव्हाना आपण भर टॉर्नेडोत अडकलो आहोत याची जाणीव आम्हाला झाली होती. अशाच एका वादळात काही वर्षांपूर्वी संपूर्ण स्कूलबस आणि ट्रक्स उलटेपालटे झाल्याची क्षणचित्रे डोळ्यासमोरून तरळून गेली. गाडी पुन्हा एकदा हादरली तशी आमची कन्या रडायच्या बेतात म्हणाली, "आपण मरणार आता इथेच. डॅडी, काहीतरी कर प्लीज!!" निसर्गाच्या हाती सापडल्यावर आपण किती अगतिक होऊ शकतो ते आम्हाला पुन्हा एकवार कळून येत होते. "बेटा! आपण काहीही करू शकत नाही. माझा हात हातात घे तुला तेवढंच बरं वाटेल. वादळ १० मिनिटांत पुढे सरकेल. तोपर्यंत शांतपणे वाट पाहणं इतकंच आपण सगळे करू शकतो, तेव्हा रडू नकोस, शांत राहा." मी माझा हात पाठीमागे केला. मुलांसमोर मोठ्यांना घाबरून चालत नाही याचीही पुन्हा एकवार जाणीव होत होती. पुन्हा जोराचा हादरा बसला, गाडी सरकल्यासारखी वाटली.

पुढची आठ-दहा मिनिटे गाडीला सतत हादरे बसत होते. आदळणाऱ्या गारा काचा फोडून आपल्यापर्यंत पोहोचतील की काय या विचाराने जिवाचा थरकाप उडत होता. आठ-दहा मिनिटांचा तो अवधीही प्रचंड भासत होता, आणि एक वादळ गेल्यावर लगेच दुसरे मागून आले तर? या जर-तरसाठी आमच्याकडे उत्तरच नव्हते. आमच्या सुदैवाने तसे झाले नाही, काही वेळाने धुक्याचा पडदा हळू हळू ओसरू लागला. गारा मंदावल्या. वाऱ्याचा जोरही कमी झाला. आमच्यासारख्याच अनेक गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या आहेत हे आम्हाला आता दिसू लागले. त्यापैकी कोणीतरी हळूच आपली गाडी पुन्हा रस्त्यावर आणली आणि एक-एक करून पुन्हा रहदारी सुरू झाली.

आम्ही आमच्या मुक्कामाला हॉर्स केवला पोहोचलो तसे हॉटेलची स्वागतिका म्हणाली, "इथे वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे आम्ही लिफ्ट्स बंद ठेवल्या आहेत. या भागात बऱ्याचशा घरांच्या काचा फुटल्या म्हणून आम्ही आमच्या हॉटेलात राहणाऱ्या सर्वांना इथे तळमजल्यावर सुरक्षित जागी बसायला सांगितले आहे. काही नवीन वादळे तयार होत आहेत. पुन्हा येतील की काय याची खात्री नाही. तेव्हा तुम्ही बॅगा घेऊन इथेच तळमजल्यावर थांबा. कुठेही जाऊ नका, विजेच्या उपकरणांना हात लावू नका." त्यानुसार पुढचे तास-दीड तास आम्ही शांतपणे इतरांसोबत तळमजल्यावर बसून काढले. त्यानंतर सर्व काही सुरळीत झाले.

संध्याकाळी पुन्हा आम्ही केवसिटीला फिरायला गेलो तेव्हा दुपारी या भागावरून वादळ घोंघावत गेले असावे असे क्षणभर वाटलेही नाही, नंतर एक एक गोष्टी कळल्या तेव्हा प्रसंगातील गंभीरपणा लक्षात येऊ लागला. ज्या वादळाने आम्हाला गाठले होते त्याने अमेरिकेच्या टेनिसी आणि केंटकी राज्यांच्या काही भागांत खूपच नुकसान केले होते. मालमत्तेची प्रचंड हानी झाली होती आणि सुमारे १०-१२ माणसे मृत्युमुखी पडली होती. केवसिटीच्या भागात कोठे पाणी साचले होते, बऱ्याच ठिकाणी खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. वीजपुरवठा खंडित झाला होता. काही पर्यटकांना गारांचा फटका बसल्याने वैद्यकीय मदत घ्यावी लागली होती. आमचे नुकसान पाहायला गेले तर आमच्या गाडीची अवस्था तुळशीबागेत मिळणाऱ्या ठोक्याच्या भांड्यांसारखी झाली होती. एका पोच्यावरून हळहळणारा माझा नवरा मात्र "जान बची लाखों पाये।.... हे काय कमी आहे? होतं असं आयुष्यात कधीतरी, ती वेळ आपली नव्हती इतकंच." असे म्हणून स्वस्थ होता.

त्यानंतर दोन दिवस केवसिटीला राहून आम्ही 'मॅमथ केव' त्या परिसरातील संरक्षित वनोद्यान व बाकीच्या सर्व आकर्षणांचा आनंद लुटला.


गारेचे चित्र www.gluttonsess.com या संकेतस्थळावरून घेतले आहे. टोर्नेडोची सर्व चित्रे विकिपिडियाच्या सहाय्याने घेतली आहेत.

2 comments:

Priyabhashini said...

Hey Mints

I recd. your comment but for some unknown reason I am not able to publish it. Thanks a lot for your response. I am pasting your words here.

Oh my Goodness!!
sundar lihiles! te anubhavane ani tasech utaravun kadhane khup kathin.

Anonymous said...

bapre! vilakshan anubhav asel na? good that no-one of you got hurt. chhan lihilaye tumhi..

marathi blogs