लास वेगासला विमान उतरायला लागले तत्क्षणी समोर दिसणार्या सुप्रसिद्ध वेगास स्ट्रिपने मनाला भुरळ घातली. स्पॅनिश भाषेत लास वेगासचा अर्थ वाळवंटातील हिरवळ (कुरण) असा सांगितला जातो. नजरेच्या टप्प्यात येणार्या मंडाले बे हॉटेलच्या सोनेरी झळाळणार्या इमारती, त्याच्या शेजारी लक्सरच्या काळ्याभोर पिरॅमिडसमोर विसावलेला शुभ्र स्फिन्क्स, त्यापुढे दिसणारा एक्सकॅलिबरचा परीकथेतील प्रशस्त राजवाडा, न्यूयॉर्क न्यूयॉर्कचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी, पुढे नजरेच्या टप्प्यात येणारा आयफेल टॉवर पाहून प्रवासाचा शीण कुठल्या कुठे पळून गेला होता. एकाच लास वेगासला हे सर्व आहे. सुट्टीचा आनंद घेणे, खरेदी करणे, रात्रीची खास करमणूक आणि जुगार यांच्याबद्दल प्रसिद्ध असलेले अमेरिकेतील हे सुप्रसिद्ध स्थळ जणू डोळे मिचकावून खुणावत होते.
लास वेगास एअरपोर्टला उतरले की स्लॉट मशीन्सचा खणखणाट ऐकू येतो असे पूर्वी मनोगतावरील एका लेखात वाचले होते. माणसाला जुगाराची आवड तरी किती असावी हे सांगणे अशक्य असावे. आयुष्यच जेथे एक जुगार आहे तेथे प्रत्येक माणूस जुगारीच ठरेल असे वाटते. लास वेगासला उतरल्यावर स्लॉट मशीन्सवर बसलेल्या बाया, पुरूष, म्हातारे कोतारे पाहून त्याची प्रचीती आली.
एअरपोर्टच्या बाहेर शटल बस पकडून आम्हाला एक्सकॅलिबरला जायचे होते. वातानुकूलित दरवाज्यातून बाहेर पडलो तसा भपकन ऊनाचा आणि उष्ण हवेचा झोत अंगावर आला. 'बापरे कित्ती गरम आहे इथे?' असा उद्गार तोंडातून बाहेर काढला तसा समोरचा अटेंडंट म्हणाला, 'ओह! उद्या दुपारी ११० डी फॅ. जाईल तेव्हा तुम्हाला खरा उन्हाळा भासेल.'
लास वेगासला कोठे कोठे फिरायचे याची यादी आम्ही पूर्वीच तयार केली होती. दोन दिवस लास वेगासला काढले की पुढचे दोन दिवस ग्रॅंड कॅनयन पाहायला जायचे आणि पुन्हा परतून दोन दिवस लास वेगासला राहायचे असा बेत होता. काही नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींनी लास वेगास एक-दोन दिवसांत बघून होतं, इतके दिवस काय करणार? असे निघण्यापूर्वी विचारले होते. 'काही नसेलच तर आराम करू. ते काय कमी आनंददायी आहे?' असे त्यावर आमचे उत्तर होते.
|
एक्सकॅलिबर |
पहिले दोन दिवस अर्थातच एक्सकॅलिबरला राहायचे होते. त्या हॉटेलात प्रवेश केला, आजूबाजूला नजर फिरवली तशी छाती दडपली. याला हॉटेल म्हणावे की एखादे लहानसे स्वयंपूर्ण नगर असा प्रश्न पडला. रेस्टॉरंट्स, लहान-मोठ्या गोष्टींची दुकाने, बेकरी, गाड्या भाड्याने देण्याघेण्याचे स्थान, सहलींसाठी आरक्षण केंद्रे, चित्रपटगृह, जलतरण तलाव, स्पा आणि त्यांच्या दरम्यान पसरलेला अवाढव्य कसीनो. या मायानगरीत एकदा पाऊल टाकले की दिवस आहे की रात्र याचे भान राहत नाही. दिव्यांचा चकचकाट, स्लॉट मशीन्सचे खटके दाबणारे लोक, पोकर टेबलवर बसून बोली लावणारे ग्राहक, त्यांच्या बोली लावणारे झगमगीत कपड्यांतले सेवक, मध्येच विद्युतवेगाने भटकणार्या आणि 'कॉकटेल्स' म्हणून ग्राहकांच्या मागण्या पुरवणार्या तंग कपड्यांतल्या नटव्या सेविका डोळे दिपवून टाकतात.
लास वेगासचे एक वैशिष्ट्य सांगायचे झाले तर येथे जागोजागी शृंगाररस वाहताना दिसतो परंतु तो बीभत्स होऊ नये याची पुरेपुर काळजी बाळगलेली आढळते.
दोन दिवस या हॉटेलचा पाहुणचार घेऊन, वेगासच्या १२ महिने दिवाळी असलेल्या रस्त्यांवरून फेरफटका मारला, करमणुकींचे काही कार्यक्रम पाहिले, कसीनोमध्ये वेळ काढला, खाद्यपदार्थांची लयलूट असणार्या बफे जेवणपद्धतीचा आस्वाद लुटला आणि आम्ही ग्रॅंड कॅनयनच्या भेटीला गेलो.

|
कसिनो |
तेथून परत आल्यावर वेगास स्ट्रिपच्या बाहेर ऑर्लियन्स या हॉटेलमध्ये राहिलो. यावेळेस बाहेर फारसे फिरायचे नसल्याने स्विमिंगपूल, कसीनो, चित्रपट आणि लास वेगासच्या जवळपास असणार्या मोजक्या आकर्षणांना भेट दिली.
या निमित्ताने दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करणार्या या नगरीबद्दल एक लेख लिहावा असे मनात आले. अमेरिकेतील आपले बहुसंख्य सदस्य यापूर्वीच या नगरीला भेट देऊन आले असतील, तरीही नव्याने जाणार्या पर्यटकांना या माहितीचा उपयोग होईल असे वाटते. लास वेगासला भेट देऊन आलेल्या सदस्यांनीही यथाशक्ती आपल्याकडील माहिती पुरवावी.

|
बेलाजियोचे नाचते कारंजे |
लास वेगासची सहल कशी ठरवावी?सहल ठरवण्याच्या ६ ते ४ महिने पूर्वीपासूनच लास वेगासची डील्स तपासावीत. नेटावर माहिती मुबलक असल्याने आपल्याला हवी ती एअरलाईन्स, हॉटेल, भाड्याची कार यांची सोय करता येईल. सहलीपूर्वी अर्थातच लास वेगासचे तापमान बघून घ्यावे. वसंत आणि शरद ऋतूत लास वेगासची सहल ठरवणे सर्वात उत्तम. लास वेगासचा उन्हाळा अतिशय कडक असतो. बाहेर फिरून कातडी भाजण्याची शक्यता असते. अशावेळी पाठीच्या पिशवीत पाणी आणि उत्साहवर्धक पेयाच्या बाटल्या, डोक्यावर टोप्या, डोळ्यांवर सूर्यचष्मे आणि अंगाला सनस्क्रीन लोशन (सूर्याच्या तापापासून संरक्षण देणारे मलम) चोपडायला विसरू नये.
याचबरोबर आपल्याला कसीनो आणि रात्रीच्या कार्यक्रमांवर किती डॉलर्स खर्च करायचे याचा अंदाज आधीच घेऊन ठेवावा. वाळवंटातील ही हिरवळ बर्याचजणांसाठी वाळवंटातील मृगजळ ठरल्याचे अनुभव ऐकू येतात म्हणून हा सावधगिरीचा इशारा.
कोठे राहावे?लास वेगास स्ट्रिपवर राहणे सर्वात उत्तम, लास वेगासमधील चांगली हॉटेल्स येथेच असून या रस्त्यावर फिरणे सुकर होते. लास वेगासला कारने गेला असाल तर त्या कारला तुमच्या हॉटेलच्या पार्किंग लॉटमध्ये विश्रांती देणे उत्तम. या रस्त्यावर पहाटेपर्यंत प्रचंड रहदारी असते आणि एका ठिकाणापासून दुसर्या ठिकाणी जाण्यास प्रचंड वेळ लागतो. या रस्त्यावर दुमजली बसेस सतत पळत असतात. प्रत्येकी ५ डॉ. मध्ये २४ तासांचा पास विकत घेता येतो. या पासामुळे तुम्ही रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या बसेसमधून हवे तितके वेळा प्रवास करू शकता.
लास वेगास स्ट्रिपवरील हॉटेल्स त्यामानाने बरीच महागडी आणि दाटीवाटीची आहेत. या हॉटेल्सच्या खोल्याही लहान असतात. त्यामानाने या रस्त्याच्या बाहेर इतरत्र राहिल्यास कमी खर्चात मोठ्या खोल्या, अधिक सोयीसुविधा मिळतात.

|
न्यूयॉर्क, न्यूयॉर्क |
काय पाहावे आणि करावे?येथील सर्वच पाहण्यासारखे आहे. एकेक हॉटेल पाहायचे झाले तर अर्धा दिवस लागतो. इंटरनेटवरून निघण्यापूर्वीच तुम्हाला पाहायचे जे कार्यक्रम आहेत त्यांचे बुकिंग करता येईल. त्यामुळे ऐनवेळेस तिकिटे मिळाली नाहीत असा हिरमोड होणार नाही.
लहान मुले बरोबर असतील तर रात्रीचे जीवन पाहणे दुरापास्त होईल परंतु तरीही इतर अनेक पाहण्यासारखी स्थळे आहेत. बर्याच हॉटेल्सच्या समोर पर्यटकांसाठी फुकट कार्यक्रम आयोजीत केलेले असतात. यांत ट्रेजर आयलंडच्या सायरन या सुंदरींचा कार्यक्रम, मिराजमधील ज्वालामुखी धबधबा आणि बेलाजियो या हॉटेल समोरील सरोवरातील नाचत्या कारंज्यांचा कार्यक्रम विशेष उल्लेखनीय आहेत.
हॉटेल्सच्या बाहेर अनेक प्रकारे केलेली झगमगती रोषणाई हा ही पाहण्यासारखा प्रकार असतो. तसेच काही हॉटेल्समध्ये ठेवलेले वाघ-सिंह, डॉल्फिन शो, मत्स्यालये, लेजर शो असे अनेक कार्यक्रम तिकिटे विकत घेऊन पाहता येतात. सीझर्स पॅलेसमधील देखावे, वेनेशियनमधील वेनिस शहराची प्रतिकृती आणि गंडोला सफर, आयफेल टॉवरच्या माथ्यावरून दिसणारी जादुई नगरी. इ. इ.
मोठ्यांसाठी अनेक प्रकारचे बहुरंगी करमणुकींचे कार्यक्रम असतात. यात स्ट्रिप शोजपासून मोठमोठ्या गायकांचे, जादूगारांचे कार्यक्रम, प्रसिद्ध अभिनेते, कलावंतांचे एकपात्री कार्यक्रम, बॉक्सिंग आणि इतर खेळ यांचा समावेश असतो.
काहीच करायचे नसेल आणि हॉटेलमध्येच वेळ काढायचा असेल तर तुमच्या राहत्या हॉटेलमध्ये असणार्या सिनेगृहात एक मस्तसा "पिच्चर" टाकता येतो. तलावात अंग चिंब करता येते. कसीनो तर असतोच.
मुलांना घेऊन जावे का?लास वेगासला मुलांना सहसा बरोबर नेले जात नाही कारण तेथील आनंद फक्त मोठ्यांनाच लुटता येतो, हा थोड्याप्रमाणात गैरसमज म्हणावा लागेल. मोठ्यांसाठी अधिक आकर्षणे येथे नक्कीच आहेत परंतु लहानांना आवडतील अशी गेम आर्केड्स, कार्यक्रमही येथे भरपूर आहेत. कसीनोमध्ये मुलांना प्रवेश नसला तरी त्यातून त्यांना वाटचाल करता येते. एके ठिकाणी थांबून राहता येत नाही.
काही हॉटेल्स 'किड्स फ्रेंडली' म्हणून ओळखली जातात. या हॉटेल्समध्ये सहसा स्ट्रिप शोज ठेवलेले नसतात. तसेच मुलांना सांभाळण्यासाठी प्रशस्त पाळणाघरे असतात. मुलांना त्या पाळणाघरात ठेवून तुम्ही तुमच्या हॉटेलमध्ये वेळ घालवू शकता परंतु हॉटेलच्या बाहेर जाऊ शकत नाही.
तसे करायचे असल्यास वेगासला तुमच्या खोलीत तुम्ही नॅनी (दाई) बोलवण्याची सुविधा उपलब्ध आहे. या दाया मुलांना सांभाळण्यासाठी प्रशिक्षित असून त्यांच्याकडे तसा परवाना असतो. आम्ही ही सुविधा वापरून पाहिली नाही. ऑरलियन्समध्ये असणारी पाळणाघराची सुविधा मात्र वापरली आणि ती मुलांना अतिशय आवडते असा अनुभव आला. १३ वर्षांवरील मुलांना खोलीत एकटे राहता येते.
काय आणि कोठे खावे?राहत्या हॉटेलमध्ये खाण्याची अनेक ठिकाणे मिळतील. सर्वान्न खाणार्या खवय्यांची वेगासला चंगळ असते. प्रत्येक हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर बफे असतो. यांत देशोदेशीचे चमचमीत पदार्थ पर्यटकांसमोर मांडले जातात. अमेरिकन, इटालियन, मेक्सिकन, चायनीज, मंगोलियन, जॅपनीज तसेच बार्बेक्यू, पिझ्झा, सॅलड्स, सूप असे अनेक प्रकार तुमच्या समोर मांडले जातात. जेवणानंतर खाण्यात येणार्या गोड पदार्थांचे नानाविध प्रकारही येथे मिळतात. वेगासला गेलेल्या प्रत्येकाने या बफेचा आनंद घ्यावा.
याखेरीज, अनेक सुशोभित आणि महागडी रेस्टॉरंट्स या हॉटेलांत असतात. यांत दाखल होण्यापूर्वी इवनिंग ड्रेस आणि गलेलठ्ठ पाकीट (किंवा क्रेडिट कार्डस) सोबत आहे याची खातरजमा करून घ्यावी.
फास्टफूडचे पर्यायही अशा हॉटेलांत भरपूर असतात. सबसँडविचेस, पिझ्झा आणि चायनीज रेस्टॉरंट्समुळे शाकाहारी लोकांचेही सहज निभावून जाते.
बाहेर स्ट्रिपवर आणि स्ट्रिपच्या बाहेर भारतीय रेस्टॉरंट्सही दिसतात.
आसपास पाहण्यासारखी ठिकाणे
बौल्डर सिटी कसीनो वगैरेसारखी वेगासच्या आसपास असणारी हॉटेल्स आणि त्यातील कार्यक्रमही तुम्हाला पाहता येतील. यांतील काही ठिकाणी शहरातील बसेस जातात तसेच तेथे कार घेऊनही जाता येईल.
सॅम्स टाऊनवेगास स्ट्रिपच्या पूर्वेला काही हॉटेल्स आहेत त्यातील सॅम्स टाऊन कसीनो हे स्थळ उत्तम आहे. बेलाजियोप्रमाणेच परंतु बंदिस्त जागेत येथे कारंज्यांचा आणि लेजर लाईट्सचा कार्यक्रम फुकट दाखवला जातो. तो अप्रतिम आहे.

|
फ्रेमाँट स्ट्रीट लाइट्स |
फ्रेमाँट स्ट्रीटवेगास स्ट्रिपवरून डाऊनटाऊनला जाणारी बस पकडली तर ती तुम्हाला फ्रेमाँट स्ट्रीटला घेऊन जाईल. येथे फुकट लाइट शो पाहण्यास मिळतो. या रस्त्याचे छत एका प्रचंड पडद्याने बंदिस्त केले असून त्यावर काही लाखांच्या घरांत लाइट्स आहेत. ते प्रज्वलित करून येथे एक अनोखा कार्यक्रम सादर केला जातो. याचबरोबर नृत्य गायनाचे कार्यक्रमही आयोजित केलेले असतात.
हूवर धरण

|
हूवर डॅम |
ऍरिझोना आणि नेवाडा राज्याच्या सीमेवर वसलेले आणि कोलोरॅडो नदीवर बांधलेले हूवर धरण लास वेगासपासून सुमारे ३० मैलांवर आहे. धरणाची उंची सुमारे ७२६.४ फूट आहे. या धरणाचे पाणी अडवून तयार केलेले लेक मीड हे सरोवरही नयनरम्य आहे. लास वेगासहून हूवर डॅमला जाण्यासाठी सहल-बसचे आयोजीत केलेल्या असतात.
डिस्नी वर्ल्ड, डिस्नी लँड आणि लास वेगास ही अमेरिकेतील अतिशय अप्रतिम अशी मानवनिर्मित पर्यटनस्थळे आहेत. इच्छुकांना तेथे जाण्याची संधी लवकरच चालून येवो ही सदिच्छा.
अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळांचा उपयोग होईलः
लास वेगासमधील आकर्षणेहूवर डॅमलास वेगासचे बारमाही तापमान---
१. लेख लिहिताना त्याचा उद्देश या पर्यटनस्थळाची माहिती पुरवणे हा आहे. सदस्यांच्या प्रतिसादातूनही तिच अपेक्षा कायम राखली जावी.
२. या लेखातून अनेक शंका निर्माण होतील, मूळ लेखाशी प्रत्यक्ष संबंधित नसलेल्या शंकांसाठी इतरत्र वेगळी चर्चा सुरू करावी. लेखासंबंधित चर्चांचे स्वागत आहे.
३. लेख परिपूर्ण आहे असा लेखिकेचा दावा नाही. चुका आढळल्यास प्रतिसादातून त्यांच्याविषयी लिहून लेखाला हातभार लावावा.
४. चित्रांवर टिचकी मारली असता ती मोठी करून पाहता येतील.