मनात आलं ... लिहिलं
मी काही तत्वज्ञ किंवा विचारवंत नाही पण मनातल्या अनेक वादळांना करुन दिलेली ही एक वाट आहे. कोणी वाचेल नाही वाचेल यापेक्षा माझ्या मनात कधीतरी हा विचार येऊन गेला आणि मी तो लिहून काढला हे अधिक महत्वाचे. विचारांचा श्रीगणेशा गणपतीने किंवा देवाने का न करावा?
खरतर मी आस्तिक नाही, नास्तिक ही नाही. ज्याला इंग्रजीत ऍग्नोस्टिक म्हणतात... सोप्या शब्दांत "बाप दाखव नाही तर श्राद्ध कर" अशातलीही मी नाही. मी फक्त जिज्ञासू आहे.
देवा बरोबर एक गोष्ट येते आणि ती म्हणजे श्रद्धा. आज काल सर्वत्र या श्रद्धेचा सुकाळ झालाय. उठ सूठ प्रत्येकजण हा देव तो देव, हे बाबा ते बाबा, गुरु, मठ, मांत्रिक यांच्या मागे लागलेला दिसतो. खेदाची बाब अशी की यात तरुण पिढी जास्त दिसू लागली आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात वाईट ते काय? व्यसनांच्या मागे लागण्यापेक्षा देवा - गुरुच्या मागे लागणे कधीही बरे. माझही याबाबत दुमत नाही. पण अशा काय चिंता, दुख: आहे की आपण आपल जगणं, आपल कर्तव्य विसरुन देव देव करावे. विशेषत: तरुण पिढी आपला अभ्यास, काम धंदा सोडून तासन तास देवदर्शनासाठी किंवा गुरु पूजेसाठी रांगेत उभी दिसते तेव्हा मनात विचार येतो ही श्रद्धा म्हणायची की भिती?
श्रद्धेविषयी बोलायच झाल तर प्रत्येकाची कुठल्या न कुठल्या प्रकारची श्रद्धा असते. देवाविषयी, आई वडिलांविषयी, गुरूविषयी. प्रत्येक्षात मनुष्य आपल्यापेक्षा जे मोठे अथवा महान आहे त्यावर श्रद्धा ठेवतो. श्रद्धेला दुसरे नाव देता येईल विश्वास. देव सदैव माझ्या पाठीशी आहे, मी माझ्या श्रद्धास्थानांच्या सावलीत सुरक्षित आहे, मी चांगला आहे म्हणून माझे चांगलेच होईल, माझं चांगल व्हाव म्हणून मी रोज देवाला हात जोडतो ही झाली श्रद्धा. उदाहरणार्थ, एखादे लहान मूल आपल्या आई वडिलांविषयी कधीही शंका करत नाही. त्याचा गाढ विश्वास हीच त्याची श्रद्धा. या श्रद्धेत भितीचा अंशही नाही.
पण श्रद्धा हळूच कधी भितीत बदलेल ते सांगता येणे कठिण. काही कारणाने आजची पूजा चुकली तर माझं बरं होणार नाही, मी मंगळवारी श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले तरच मला देव पावेल, मी नित्यनेमाने माझ्या गुरुंच्या पायावर डोके ठेवले नाही तर माझे नुकसान होईल, ही झाली भिती. मी माझ्या आई वडिलांना घाबरतो किंवा मी फक्त देवाला घाबरतो अस बरेचजणांना म्हणताना आपण ऎकल असेल नाही. यात चुकीचं तसं काहीच नाही पण आपली श्रद्धास्थाने ही भितीदायक नाहीत, मग मी अस काय करतो किंवा केले आहे की त्यामुळे मला या सर्वांची भिती वाटावी? हा प्रश्न आपल्यापैकी कितीजणांना पडतो?
आजच्या वेगवान जगात प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या भितीच्या छायेत जगत असतो. कोणाला अभ्यासाची, कोणाला धंद्याची, तब्येतीची, कुटूंबाची तर कोणाला आणखी कसली ना कसली चिंता नाहीतर भिती भेडसावत असते. अमिताभ, ऎश्वर्या पासून सर्वचजणांना आजकाल सिद्धिविनायकाचीच गरज का भासते? त्यांना स्वत:च्या घरातला, गल्लीतला, गावातला देव पावत नाही की काय? कोणाला गुरुंचे फोटो, ताईत, माळ जवळ असेल तर सुरक्षित वाटते म्हणे. मला प्रश्न हा पडतो की तुमचं सर्वथाने भलं फक्त तुमचे आई-वडिल इच्छितात मग आपल्यापैकी कितीजण सतत आपल्या आई-वडिलांचे फोटो जवळ बाळगतात?
लिहिण्याचा हेतू केवळ हाच की प्रत्येकाने आपली श्रद्धा कोणती आणि भिती कोणती हे पडताळून पहाण्याची नितांत गरज आहे आणि त्याहीपेक्षा मोठी गरज आहे ती भितीमुक्त श्रद्धाळू समाजाची.