प्रकार

Tuesday, May 02, 2006

आठवणींचे झरोके

आज मुंबईच्या उकाडयाची खूप आठवण येतेये. या आमच्या नॉर्थ अमेरिकेला उकाडा जाणवेल तर शपथ. नाही तसं ३-४ महिने चांगलं गरम होतं पण दिमतीला एसी असल्यावर त्या बिच्चाऱ्या उकाडयाची काही किंमतच रहात नाही आणि या इथल्या उन्हाळ्याला मुंबईच्या उन्हाळ्याची तसूभर सर नाही. तसंही एप्रिल मेच्या महिन्यात इथे स्प्रिंग असतो उन्हाळा नाही. एक चांगली गोष्ट म्हणजे इथे मी छातीठोकपणे 'मला उन्हाळा आवडतो' असं म्हणू शकते. हेच वाक्य जेव्हा जेव्हा मुंबईला उच्चारलय तेव्हा तेव्हा लोकांनी विचीत्र नजरेने माझ्याकडे पाहिलय.

एप्रिलच्या महिन्यात शाळेच्या परिक्षा सुरु झाल्या की शाळेच्या आवारात एक भय्या लाल-केशरी चिनमीन बोरांची, आवळे, गाभूळलेल्या चिंचांची गाडी लावायचा. 'परीक्षांच्या दिवसांत त्या गाडीकडे ढूंकूनही बघायच नाही' अशी आईची सक्त ताकिद असायची. आशाळभूत नजरेने त्या गाडी समोरुन जाताना आमच्या बालमनावर किती अत्याचार होत असतील याची आमच्या मातोश्रींना कल्पनाही नसावी. बरं तो भय्या तरी असला दुष्ट की परीक्षा संपल्या की लागोलाग हा ही शाळेच्या आवारातून गायब. मग त्याच्या शोधात आम्ही बाजाराच्या चकरा मारायचो.

सुटट्या लागल्या की आम्ही आमचं वेळापत्रक ठरवायचो. खरं म्हणजे सकाळी सकाळी बाबांनी 'दिवस वर आला तरी गाढवा सारखे लोळत काय पडलाहेत?' या वाक्याने सुरुवात करायला नको म्हणून आम्हा मैत्रीणींचा ग्रुप भल्या पहाटे उठून आरे कॉलनीत morning walk ला जायचा. पहाटेच्या वेळेला आरे कॉलनीत असणं हे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. ती घनदाट वनराई, मंद थंड वारा, पक्षांचा मुक्त किलबिलाट, पहाटेच्या दंवाने शिंपलेल्या लालभडक पायवाटा, आसमंतात दरवळणारा ओल्या मातीचा सुगंध, गोठयांमधली लगबग, गायींच हंबरणं, गावदेवीच्या जुन्या देवळातील पहाटेची पूजा, तो अखंड घंटानाद, मुंबईत राहून हे सर्व वाटयाला यायला भाग्य लागतं. 'वेळेवर परत या,' हा आईचा सल्ला हीच काय त्यातली negative side.

परत आल्यावर थंडगार पाण्याने मनसोक्त आंघोळ करायची. आईने, "वरच्या टांकीतलं पाणी संपेल आता, पुरे झालं" अस ओरडून सांगेपर्यंत. तिच्या आग्रहाखातर पोटांत काहीतरी ढकलून आम्ही पुन्हा एकमेकांची दारं ठोठवायला मोकळे.
जेवताना हापूसचे आंबे, पायरीचा आमरस, गऱ्या गोट्याची फणसाची भाजी हे बाकीच्या दिवसांत कुठे मिळते? आई फणसाची ठेचून भाजी करते. त्यात बारीक कोलंबी किंवा करंदीही घातली तर मी पंचपक्वान्नही फटक्यात बाजूला सारिन. त्या भाजीसाठी मी आजही वेडी आहे. दुपारच्या जेवणानंतर 'इकडे तिकडे उनाडक्या करत बसण्यापेक्षा गच्चीवर घातलेल्या वाळवणाजवळ बसा' या आईच्या आज्ञेला मात्र आम्ही शिरसावंद्य मानायचो.

भर दुपारच्या कडक उन्हातही गच्चीमधे वा-याच्या सुखद झुळुक असायची. टांकीखाली सतरंजी घालून लोळत पुस्तक वाचायला खूप मज्जा यायची. काही दिवसांपूर्वी फास्टर फेणेवरचा सुरेख ब्लॉग वाचला होता. त्याच्या जोडीला गोटया, चिंगी, जयदीपची जंगलयात्रा, ओसाडवाडीचे देव, किशोर, चांदोबाचे अंकही असायचे. काही वर्षांनी या पुस्तकांची जागा चंद्रावर स्वारी, प्रेषित, यक्षाची देणगी अशा नारळीकर, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे सारख्या लेखकांनी घेतली. दुपारच्या निरव वेळी रत्नाकर मतकरींचं "खेकडा" वाचून अंगावर उभा राहिलेला शहारा अजूनही आठवतो. पुस्तकांच्या सोबतीला तोंडात चघळायला गच्चीवरच्या वाळवणातल्याच खारवलेल्या कैऱ्या, चिंचा असायच्या. मिटक्या मारत पुस्तक वाचायची मजा काही औरच असायची.

संध्याकाळ झाली की पुन्हा उनाडक्या करायला मोकळे. टीव्हीच्या भस्मासुराने आम्हाला तेव्हा गिळलं नव्हत त्यामुळे ईमारतीच्या आवारांत चोर पोलिस, डब्बा ऐसपैस सारखे खेळ रंगायचे.

"दिवे लागले...चला घरी आता," असं आईने निदान १० वेळा कंठशोष केला की मगच आम्ही आज्ञावंत मुलं आपापल्या घरी नाईलाजाने परतायचो. रात्री झोपताना "चला सुट्टीतला आणखी एक दिवस गेला. कधी जून उजाडतोय आणि ही पोरं पुन्हा शाळेत जातायत अस झालय मला," अशी आईची कुजबुज हमखास ऐकू यायची.

----

या सर्वांची इतकी प्रकर्षाने आठवण व्हायच कारण म्हणजे मुलीला पुढच्या महिन्यापासून सुट्टी पडत्ये आणि मला आत्तापासूनच टेन्शन आलय की हे दोन महिने कसे घालवायचे?
-----
सुमेधा, तुझ्या शिर्षकाचा वापर केला हं!

4 comments:

Sumedha said...

बघितलं गं :-)

खूप छान लिहीलं आहेस, मस्त वाटलं! आणि माझ्याही आठवणींचे झरोके उघडून सुखद झुळूक आली...

bforu said...

खूप छान लिहीलं आहेस, मस्त वाटलं! आणि माझ्याही आठवणींचे झरोके उघडून सुखद झुळूक आली...

Pranav Jawale said...

bhari lihilay..

विचारमंथन said...

उन्हाळ्यातील आठवणींना उजाळा दिल्याबद्दल धन्यवाद.

marathi blogs