प्रकार

Saturday, January 26, 2008

भिकारीण

“इतक्या थंडीच्या सकाळी काय रे खरेदीला निघायचं सुचलं आज?” घराबाहेर पडलो तसे हातात हातमोजे सरकवत मी नवर्‍याकडे नाराजीने तक्रार केली. कालच अर्धा फूट हिमवर्षाव झाला होता आणि आज तापमापीचा पारा शून्याखाली ८-१० डी. सहज उतरला असावा. रविवारच्या दिवशी दुलईत पडून राहण्यापेक्षा धडपडत खरेदीला निघायची माझ्यामते अजिबात गरज नव्हती.

“अगं कारने तर जाणार. ख्रिसमसचे दिवस आहेत. मॉल लवकर उघडतोय. सेल आहे. खरेदीही करायची होतीच. उरकून टाकू की सकाळीच मग दिवस मोकळा! नाही का?” त्याने कारचे इंजिन सुरू केले आणि गाडीचा हीटरही सुरू केला. रस्ते निसरडे झाले होते, त्यात बोचरं वारं आमच्याकडे पाचवीला पुजलेलं. सावकाश गाडी हाकत आम्ही मॉलदर्शन घेतलं. मागच्या सीटवर लेकही सकाळी उठायला लागल्याबद्दल नाराज होती.

कुरकुरत का होईना पण आमची खरेदी नेहमीप्रमाणेच व्यवस्थित झाली. पैशांनी किती गोष्टी खरेदी करता येतात? या प्रश्नाला बर्‍याच आणि थोड्याशाच असे दुहेरी उत्तर आहे. मॉल्समध्ये गेले की आपल्याकडे पैसे असल्याचा आनंद आणि आपल्याकडे पैसे नसल्याचे दु:ख एकत्रित मिळून जाते. जे हवे असते त्याच्या किंमती परवडत नसतात आणि जे नको असते ते हमखास निम्म्या किंमतीला मिळत असते.

खरेदी झाली तेव्हा सकाळ उलटायला आली होती. “किती फिरफिर फिरलो रे या दोन चार दुकानांतच? वेगळा व्यायाम करायची गरजच नसते नाही या मॉलच्या चकरा मारल्या की. जीममध्येही पैसे देऊनच व्यायाम करतो आपण. इथे पैसे देऊन खरेदी करता करता व्यायाम होतो.” माझ्या टोमणामिश्रित विनोदाचा नवर्‍यावर गेली कित्येक वर्षे काहीही परिणाम होत नाही. त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकून खरेदीच्या पिशव्या ट्रंकमध्ये टाकल्या आणि कार सुरू केली.

दिवस वर आला असला तरी बाहेर थंडी मी म्हणत होती, वारंही सुटलं होतं. रस्त्यांच्या बाजूला बर्फाचे ढिगारे दिसत होते, रस्त्यांचा निसरडेपणाही जसाच्या तसा होता. हे असले दिवस नेहमीच नकोसे वाटतात त्यात मला, आता घरी जाऊन स्वयंपाकाचा श्रीगणेशा करायचा या कल्पनेने वैताग आला होता.

“सगळी सकाळ इथे गेली आता घरी जाऊन भूक भूक कराल, “ कंटाळलेल्या सुरात मी तक्रार केली.
“अगं ब्रंच करून जाऊ, आता कुठे घरी जाऊन स्वयंपाक करत बसणार.” हा समजुतीचा स्वर मला भयंकर प्रिय आहे. मागच्या सीटवरूनही सकाळपासून पहिल्यांदाच आनंदी हुंकार ऐकू आला. गाडी "ल पीप"च्या दिशेने वळली तशी पोटात आगीचा डोंब उसळल्याची जाणीव झाली. तसंही बाहेर खायचं म्हणजे सडसडून भूक लागतेच लागते. रेस्टॉरंटातल्या उबदार वातावरणात तर ती आणखीच प्रज्वलित होते असा नेहमीचा अनुभव आहे.

खाऊन बाहेर पडलो आणि रस्त्याला लागलो. समोरच्या सिग्नलला गाड्यांची बरीच गर्दी झाली होती. वेग मंदावून नवर्‍याने खिसे चाचपडायला सुरुवात केली.

“काय रे काय झालं? पाकीट, सेल विसरला तर नाहीस रेस्टॉरंटात? काय शोधतो आहेस?”
“काही नाही, पाकीटच शोधत होतो. जरा एक डॉलर काढशील.” त्याने हात स्टीअरींगवर पुन्हा ठेवत म्हटले.
“एक डॉ. कशाला रे?”“समोर बघ सिग्नलजवळ एक भिकारीण दिसत्ये, तिला देतो.”

सिग्नलपाशी एक मध्यमवयीन बाई कळकट कोट, टोपी, हातमोजे घालून थंडीत कुडकुडत उभी होती. हातात "गरीबाला मदत करा" लिहिलेला एक पुठ्ठ्याचा बोर्ड होता.

“हं? सर्व सोडून भीक द्यायला कुठे निघालास?” मी आश्चर्याने विचारलं, "काही गरज आहे का अशा धडधाकट माणसांना भीक घालायची. कामं करायला काय हरकत आहे यांना? उगीच माणसं भीक देऊन त्यांना कामं न करता, ऐतखाऊ बनवण्यास भाग पाडतात. ” किती वर्षांनी भीक द्यायची वेळ आली होती कोणास ठाऊक. मागच्यावेळी नेमकी कधी भीक दिली ते आठवणेही कठिण होतं.

“असू दे गं. ती भीक मागते आहे इतक्या थंडीची. आपल्याला दोन क्षण बाहेर राहणं कठिण होतंय आणि ती केव्हाची उभी आहे कोण जाणे? सणाचे दिवस आहेत दिला एक डॉलर तर काय मोठा फरक पडणार आहे.”

“प्रश्न फरक पडण्याचा नाही, पण मग चार भिकारी उभे असते तर चारांनाही भीक दिली असतीस का? आणि भीक मागणे हा तिचा नाइलाज नसून धंदा असेल तर? ज्या पैशांसाठी आपण राबतो त्यातला एक पैसाही ऐतखाऊंना का द्यायचा?” गाडी अद्यापही गर्दीत अडकून होती.

“किती विचार करते आहेस एका क्षणात. मी इतका विचारही केला नव्हता. आनंदाचे दिवस आहेत. आपण खरेदीला निघालो. मनपसंत खरेदी झाली, बाहेर खाणं झालं. एखाद्या आनंदाचा क्षण त्या भिकारणीलाही देता येईल असं वाटलं. या मॉल्समध्ये आपण जातो, मूळ किंमतींच्यापेक्षा कितीतरी किंमत त्यातल्या वस्तूंसाठी मोजतो. त्या काउंटरवरल्या पोरींचं खोटंखोटं स्मितहास्य, दिव्यांची रोषणाई, सजावट या सर्वांचा फुकट खर्चही आपण भरतो. रेस्टॉरंटात गेलो तर वेटरला टीप दिल्याशिवाय बाहेर पडत नाही. असं तो वेटर काय अधिकच करतो आपल्यासाठी? पण रीत म्हणून आपण त्याला पगार मिळत असतानाही टीप देतो. मग जर एखादी व्यक्ती आपल्यासाठी काहीच करत नसेल आणि तरीही दिला तिला आपल्या आनंदातला थोडासा हिस्सा एके दिवशी तर काय मोठा पहाड कोसळला? काहीतरी नसेल तिच्याकडे जे आपल्याकडे आहे. काहीतरी असेल जे तिला भीक मागायला प्रवृत्त करतंय आणि आपणही कधीतरी नकळत भीक मागतो. अगदी आपल्या हक्काच्या सुट्टीचीही भीक मागावी लागते ऑफिसात.”

“हो पण देण्याचंच झालं तर संस्था, अनाथालये वगैरे आहेत ना.” मी माझा हेका सोडला नाही.

“त्यांनाही देतोच ना! की देतच नाही? जे आपल्याकडे आहे ते जर त्यांच्याकडे नसेल तर प्रत्येकवेळीच मोजूनमापून विचार करून दुसर्‍याच्या पदरात टाकावं असं थोडंच आहे?” त्याने थोडंसं वैतागून विचारलं.

गाडी एव्हाना त्या भिकारणीच्या जवळ सरकली होती. त्याने गाडीची काच खाली केली तशी भप्पकन गार हवेचा झोत अंगावर आला आणि सर्वांगावर नकोशी शिरशिरी आली. तिने काच खाली झाल्याचं हेरलं असावं. ती लगबगीने खिडकीच्या दिशेने आली आणि आशेने खिडकीत डोकावत थंडीने गारठलेली मूठ तिने घाईने पसरली. तिच्या फाटक्या हातमोजांत डॉ. बिल पडलं तसं ’गॉड ब्लेस यू. हॅपी हॉलीडेज!" म्हणत तिने तोंडभरून हास्य फेकलं. तिच्या पाणीदार डोळ्यांतली लकाकी त्या पिवळ्या दातांच्या हास्यात मिसळून आनंदाची एक आगळी चमक क्षणभर दिसली, एक वेगळा आनंदही नवर्‍याच्या डोळ्यांत क्षणभर चमकून गेला आणि मनातील सर्व विचारांना खीळ पडली.

जसं आमच्याकडे काहीतरी होतं जे तिच्याकडे नव्हतं तसंच, काहीतरी वाटत होतं त्याला जे मला वाटतं नव्हतं इतकाच विचार करून मी हायवेतल्या गर्दीत मिसळून गेले.

Sunday, January 20, 2008

लढा लहानगीचा

गोष्ट फारशी जुनी नाही, १९६० सालातील आहे. यावर्षी लुईझियाना राज्याने गोर्‍यांच्या आणि काळ्यांच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचा कायदा लागू केला. त्यापूर्वी गोर्‍या मुलांच्या व काळ्या मुलांच्या शाळा वेगवेगळ्या असत. या कायद्यानुसार केवळ ६ काळ्या मुलांची गोर्‍यांच्या शाळेत जाण्यासाठी निवड करण्यात आली. त्यापैकी २ मुलांच्या पालकांनी घाबरून आपल्या मुलांना पूर्वीच्या शाळेत ठेवणेच पसंत केले. राहिलेल्या चौघांपैकी ६ वर्षांच्या लहानग्या रुबीवर 'विल्यम फ्रॅन्ट्स प्राथमिक शाळेत' एकटीने जायची पाळी आली.

रुबीच्या वडलांना रुबीचे गोर्‍या मुलांच्या शाळेत जाणे फारसे पसंत नव्हते. गोरी मुले तिला आपल्यात कधीच सामावून घेणार नाहीत ही भीती त्यांना वाटत होती. रुबीच्या आईला मात्र रुबीला या शाळेत चांगले शिक्षण मिळेल अशी खात्री वाटत होती. तिने रुबीच्या बाबांची बरेच दिवस समजूत घातली, 'ही लढाई आपली नाही तर संपूर्ण काळ्या समाजाची आहे. आपल्याला सुरुवात करायची संधी मिळाली आहे ती आपण गमवून चालणार नाही.' शेवटी बाबांनी परवानगी दिलीच. खरी लढाई मात्र लढायची होती ती लहानग्या रुबीला आणि आपल्याला नेमकी कोणती लढाई लढायची आहे हेच तिला माहित नव्हते.

१४ नोव्हेंबर १९६०चा दिवस काळ्या मुलांनी गोर्‍यांच्या शाळेत जाण्यासाठी निश्चित करण्यात आला. त्या दिवशी सकाळी रुबीला आईने उठवले. तिची तयारी करताना आईने तिला नव्या शाळेत जाण्याविषयी सांगितले. नव्या शाळेत जाताना काहीतरी गडबड होईल ही शंका असल्याने चार सरकारी अधिकारी रुबीला न्यायला येणार होते. शाळेजवळ गर्दी असेल, लोक काहीतरी आरडाओरडा करतील त्याकडे आपण अजिबात लक्ष द्यायचे नाही हे आईने रुबीला सांगून ठेवले.

ठरल्याप्रमाणे चार अधिकारी सकाळीच घरी आले. त्यांच्या गाडीतून शाळेत जाताना त्यांनी रुबीला आणि तिच्या आईला सांगितले की रस्त्यावरून चालताना दोन अधिकारी त्यांच्यापुढे चालतील आणि दोन अधिकारी मागून. काही गडबड झाल्यास ते काळजी घेतील. शाळेच्या आवारात गाडी थांबली तशी रुबीला बरेच लोक गर्दी करून उभे असल्याचे दिसले. तिने आईचा हात घट्ट पकडला. काही गोरे लोक जोरजोरात काहीतरी ओरडत होते. डोळ्यांच्या कोपर्‍यातून रुबीने पाहिले तर त्यांच्या हाताच्या मुठी आवळलेल्या तिला दिसल्या. येथे नक्की काय चालले आहे याची रुबीला कल्पना येत नव्हती. तो संपूर्ण दिवस रुबीने आणि तिच्या आईने मुख्याध्यापकांच्या कार्यालयात बसून काढला. कार्यालयाच्या खिडकीतून रुबीला ती जोरजोरात घोषणा देणारी माणसे दिसत होती. काहीजण आपल्या मुलांना शाळेतून काढून घरी घेऊन जात होते. या सर्व गोंगाटात रुबीचे नव्या वर्गात जाणे झालेच नाही.


दुसर्‍या दिवशीही ते अधिकारी रुबीला आणायला आले. आईही शाळेत आलीच. त्यादिवशीही शाळेच्या आवारात बरेच गोरे लोक जमले होते. त्यापैकी एकाने पुढे सरून शवपेटीत घातलेली काळी बाहुली रुबीला दाखवली. रुबीला ती बाहुली पाहून खूप भीती वाटली. हे लोक आपल्याला घाबरवत आहेत याची तिला प्रथमच जाणीव झाली. लोक रुबी आणि तिच्या आईवडिलांविषयी काहीतरी अर्वाच्य बोलत होते. त्यांना टाळून रुबीने शाळेत प्रवेश केला.

त्यादिवशी शाळेत एक गोरी स्त्री त्यांची वाट पाहात होती. "गुड मॉर्निंग, रुबी नेल. मी तुझी नवी शिक्षिका, मिसेस हेन्री." गोड आवाजात तिने रुबीचे स्वागत केले. मिसेस हेन्रींचा चेहरा दयाळू दिसत होता तरी रुबीला त्या कशा असतील, आपल्याशी बाहेरच्या लोकांप्रमाणेच वागतील की काय असा प्रश्न पडला. हेन्रीबाई, रुबीला आणि तिच्या आईला दुसर्‍या मजल्यावर रुबीच्या वर्गात घेऊन गेल्या. संपूर्ण वर्ग रिकामा होता. बाईंनी रुबीला पहिल्या बाकावर बसवले आणि संपूर्ण वर्गाला शिकवतो आहे अशा थाटात तिला इंग्रजी अद्याक्षरे शिकवायला सुरूवात केली. शाळेतला तो दिवस बरा गेला.

त्यानंतरच्या दिवशी आईने रुबीला जवळ घेऊन सांगितले की आजपासून तिला कामावर जाणे भाग आहे त्यामुळे ती शाळेत येऊ शकत नाही. यापुढे ते सरकारी अधिकारीच तिला शाळेत पोहचवतील व परत आणतील. रुबीचा चेहरा पडला. ते पाहून आई म्हणाली, "घाबरू नकोस रुबी. शाळेत जाताना मन लावून देवाची प्रार्थना म्हण. देव सर्वत्र असतो. तू तुझे लक्ष प्रार्थनेत ठेवलेस तर ते लोक तुझ्याबद्दल काय बोलतात हे तुला ऐकू येणार नाही." रुबीने आईचा सल्ला मानला. ते गोरे लोक रोज शाळेच्या आवारात जमायचे, आचकट विचकट बोलायचे. त्यांना टाळून शाळेच्या पायर्‍या चढताना रुबीला हायसे वाटायचे. शाळेत हेन्रीबाई रुबीची वाट पाहत असायच्या. रुबी दिसली की तिला जवळ घ्यायच्या, गोंजारायच्या. एव्हाना रुबीला त्या आवडू लागल्या होत्या. वर्गात हेन्रीबाई आणि रुबी दोघीच असायच्या. बाकीच्या मुलांची नावे त्यांच्या पालकांनी कमी करून टाकली होती. बाई फळ्यासमोर उभ्या राहण्याऐवजी रुबीच्या शेजारी बसून तिला शिकवू लागल्या. रुबीलाही शाळेत येणे आवडू लागले.

परंतु गोष्टी इथेच थांबल्या नाहीत. वर्णद्वेषी गोरे आता रस्त्यावर उतरले होते. संपूर्ण शहरात दंगलीचे लोण पसरले होते. रुबीच्या घराला लक्ष्य करण्याचे प्रयत्न करण्यात आले. रुबीच्या वडिलांनाही कामावरून कमी करण्यात आले. दुकानदाराने रुबीच्या कुटुंबाला धान्य व इतर सामान देणे बंद करून टाकले आणि आपल्या दुकानात येण्यास मनाई केली. रुबी आणि तिचे कुटुंबीय घराबाहेर पडले की त्यांना अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या जात. धमक्यांची पत्रे येत. मिसिसीपी राज्यात राहणारे रुबीचे आजी-आजोबाही या उद्रेकाचे बळी ठरले. परंतु याचबरोबर काही सहृदय माणसांनी रुबीच्या कुटुंबाची मदतही केली. एका शेजाऱ्याने रुबीच्या वडिलांना रंगार्‍याची नोकरी दिली. काहीजणांनी रुबीच्या घरावर लक्ष ठेवण्यास सुरूवात केली. त्यांना मदत मिळवून दिली. एवढेच नव्हे तर शाळेत जाताना रुबीच्या गाडीमागून रोज शांततेने चालण्यास सुरुवात केली.

रुबीच्या वर्गात मात्र रुबी आणि हेन्रीबाई दोघीच असायच्या. मधल्या सुट्टीत रुबीला बाहेर जाऊन इतर मुलांसमवेत खेळण्याची मनाई होती. हेन्रीबाई वर्गात स्वत: रुबी बरोबर खेळायच्या. शारिरीक शिक्षणाच्या तासाला रुबीबरोबर नाचायच्या, उड्या मारायच्या. केवळ हेन्रीबाईंमुळे रुबीला शाळा आवडायची. एक दिवस रुबीने त्यांना ती बाहेरची माणसे अशी क्रूर का वागतात असा प्रश्न विचारला. तशा हेन्री बाई तिला म्हणाल्या, "काही माणसांना एकदम बदलणे जमत नाही. ते वर्षनुवर्षे असेच वागत आले आहेत, यापेक्षा वेगळे वागायला कदाचित त्यांना भीती वाटत असावी. रुबी, ते लोक तुझ्यापेक्षाही जास्त घाबरलेले आहेत." त्यादिवशी रुबीला बाईंचे म्हणणे कितपत समजले कोणास ठाऊक परंतु त्यावर्षी ती तिच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा धडा शिकली. शाळेबाहेर उभे राहून अर्वाच्य बोलणारे लोक गोरे होते आणि हेन्रीबाईही गोर्‍याच होत्या, पण रुबीला भेटलेल्या प्रेमळ लोकांपैकी त्या एक होत्या. हेन्रीबाईंनी रुबीला डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांची शिकवण शिकवली. "जगात कोणलाही त्याच्या कातडीच्या रंगावरून जोखू नये. देवाने सर्वांना सारखे बनवले आहे आणि तरीही प्रत्येकाला दुसर्‍यापेक्षा वेगळे." त्यादिवशीपासून शाळेत येताना रुबीने आपल्याबरोबरच त्या बाहेरच्या गोर्‍या लोकांसाठीही प्रार्थना म्हणायला सुरूवात केली. तेही आपल्यासारखेच घाबरलेले आहेत हे तिच्या बालमनाने पक्के जाणले होते.

म्हणता म्हणता वर्ष कसे सरले ते रुबीला कळलेही नाही. हेन्रीबाईंच्या सान्निध्यात तिचे व्यक्तिमत्त्व फुलून येत होते. वर्षभरात तिने एकही दिवस शाळा चुकवली नाही. बाहेरचे लोकही थंडावले. शाळेबाहेर येईनासे झाले. जून महिन्यात उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडल्या तशा रुबीने आणि हेन्रीबाईंनी एकमेकींचा निरोप घेतला. सप्टेंबरमध्ये रुबी शाळेत परतली तर शाळेचे रुपच पालटले होते. तिला पोहचवायला न्यायला येणारे ते अधिकारी आले नव्हते, शाळेत काही अधिक काळी मुले भरती झाली होती. शाळेबाहेर गोंगाट नव्हता. रुबीच्या वर्गात इतर मुलेही होती आणि त्यातली काही काळीही होती. जसे काही शाळेत काही घडूनच गेले नव्हते. रुबीला हेन्रीबाई मात्र दिसल्या नाहीत. चौकशी केले असता कळले की त्यांची बोस्टनला बदली झाली होती.

रुबीची शाळा व्यवस्थित सुरू झाली. तिने प्राथमिक शाळेनंतर, महाविद्यालयात प्रवेश मिळवला व आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर व्यवसाय शाखेचा अभासक्रम पूर्ण केला. पर्यटन विभागात नोकरी केली. रुबी ब्रिजेस हॉल आज पन्नाशीची आहे आणि आपल्या कुटुंबासमवेत सुखी आयुष्य जगते आहे. संपूर्ण गोर्‍यांच्या प्राथमिक शाळेत जाणरी ती अमेरिकेतील पहिली काळी मुलगी गणली जाते. वर्णद्वेषाबद्दल तिच्याच शब्दांत सांगायचे झाले तर, "आपल्यापैकी प्रत्येकजण निर्मळ मन घेऊन जन्माला येतो. आपल्या मुलांना वर्णद्वेषाबद्दल काहीही माहित नसते.. त्यांनी ती माहिती पुरवतो आपण. आपण वर्णद्वेष जीवंत ठेवतो आणि त्याचा वारसा आपल्या मुलांना देतो. आपल्या मुलांची मने निर्मळ राहावीत ही आपली जबाबदारी आहे."



१५ जानेवारी डॉ. मार्टिन ल्युथर किंग ज्यु. यांचा जन्मदिवस म्हणून अमेरिकेत साजरा होतो. त्यांच्याशी आणि त्यांच्या विचारांशी आपली बांधिलकी असेल नसेल परंतु वयाच्या सहाव्या वर्षी आपल्याला किंवा आपल्या मुलांना कनिष्ठतेची वागणूक मिळून एखादा दिवसतरी शाळेत रुबीप्रमाणे घालवावा लागल्यास काय वाटेल याची कल्पना करावी.

* प्रसिद्ध चित्रकर नॉर्मन रॉकवेल यांचे 'The problem we all live with' हे रुबीवर तयार केलेले तैलचित्र विकिपीडियावरून चिकटवले आहे.

marathi blogs