प्रकार

Sunday, May 07, 2006

पुस्तकनिष्ठांची मांदियाळी (डाव माझा)

नंदन कडून टयुलिपकडे आणि तिच्याकडून माझ्यापर्यंत पोहोचलेली साखळी. टयुलिप, "तेरुओ" बद्दल जे लिहिलं आहेस ते "प्रगल्भ" नाहीतर काय आहे? फारच आवडलं, शक्य होईल तेव्हा जरुर वाचेन.

मराठी पुस्तक हा माझ्यासाठी थोडासा हळवं करुन जाणारा प्रकार आहे. लग्नापासून माझ्या घरात फारशी मराठी पुस्तकं येत नाहीत. नवरा कन्नड आणि मुलीला आपण कोण हे अजून ठरवायच असल्याने सामाईक आवडीची पुस्तकच घरी येतात. एकंदरीत मराठी साहित्याची साथ सुटल्यातच जमा आहे. मी हल्ली, काय गमावलं या पेक्षा काय जमवलं याचा विचार जास्त करते, त्यामुळे इंग्रजी पुस्तकांची साथही तितकीच आवडते.

मी अगदी पहिल्यांदा वाचायला लागले तेव्हा माझ्या पुस्तकांचा खजिना एका पत्र्याच्या छोट्याशा बॅगेत मावायचा. माझ्या माहेरी, आज त्यांची संख्या चार सहा कपाटं भरुन आहे. प्रत्येकजण आपल्या आवडीची पुस्तकं घेऊन यायचा, बाबांनी मग पुस्तकांसाठी वेगळी कपाटच बनवायला सुरुवात केली. नवीन पुस्तक घरात आणणे हा आमच्या दॄष्टीने एक सोहळा असे. सुटटी लागली की दादर पार्ला किंवा इतर बुक डेपोतून नवीन पुस्तक आणायची. घरी आणून त्यांना प्लॅस्टिकच कव्हर घालायच आणि सुवाच्य अक्षरांत त्याच्या पहिल्या पानावर नाव, तारीख, दिवस घालायचा. भेट-वस्तू म्हणून मिळाले असल्यास तेही विशेष टाकायचे आणि कपाटात त्याच्यासाठी योग्य जागा निवडायची. आमच्या घरात अजूनही आम्ही एक अलिखित नियम पाळतो, तो म्हणजे, "हे पुस्तक दुमडणार नाही, त्याची पाने अलगद उलटायची आणि हे पुस्तक कुठल्याही अयोग्य व्यक्तीच्या हातात पडणार नाहीत याची काळजी घ्यायची." घरातली पुस्तकं आज इतक्या वर्षांनंतरही सुस्थितीत आहेत हे सांगायला खूप बरं वाटत.

१. शेवटचे वाचलेले वा विकत घेतलेले मराठी पुस्तक - इस्तंबुल ते कैरो - निळू दामले.

गेल्या मुंबई भेटीत वाचण्याचा योग आला. "पूर्वरंगाची अपूर्वाई" की काय माहित नाही पण प्रवासवर्णने मलाही आवडतात. काही महिन्यांपूर्वी एका लेखकाने ग्रीस पासून भारतापर्यंत ऍलेक्झांडर द ग्रेट च्या मार्गावरुन पायी प्रवास केल्याच वर्णन वाचलं होत. फार सुंदर छायचित्रे आणि वर्णन होत, पण नाव विसरले बुवा.

२. वाचले असल्यास त्यावर थोडक्यात माहिती - इस्तंबुल आणि तुर्कस्थान बद्दल तसं मला पहिल्यापासून आकर्षण होतच. दोन महाखंडांच्या उंबरठयावर वसलेले ऐतिहासिक शहर, इस्तंबुल. इस्लाम धर्म पाळत असले तरी लोक पाश्चिमात्य रहाणीमानाला सरावलेले. शहराचा काही भाग युरोपमधे तर काही आशिया खंडात होता, आता पूर्णच युरोपमधे. 'केमाल पाशा' सारख्या ध्येयवेडयाने या इस्लामिक राष्ट्राचा जो कायापालट केला ते एकंदरीतच नवलपूर्ण. दामल्यांचा प्रवास, त्यांच व्यक्ती, स्थळचित्रण, इजिप्त आणि तुर्कस्थान यांची राजकिय स्थिती हे नक्कीच वाचण्याजोगं. अधिक माहिती येथे मिळेल.

३. अतिशय आवडणारी/प्रभाव पाडणारी ५ मराठी पुस्तके

श्रीमान योगी - रणजीत देसाई
मृत्युंजय - शिवाजी सावंत
अधांतरी - जयवंत दळवी
पिंगळावेळ - जी. ए. कुलकर्णी
आकाशाशी जडले नाते - जयंत नारळीकर

४. अद्याप वाचायची आहेत, अशी ५ मराठी पुस्तके-

हृदयस्थ - अलका मांडके
झाडाझडती - विश्वास पाटील
संभाजी - विश्वास पाटील
आंधळ्याच्या गाई - मेघना पेठे
पिंगळावेळ - जी. ए. कुलकर्णी *

* पिंगळावेळ ज्या वयांत वाचल तेव्हा पूर्ण कळलं नव्हतं, आता बरचं विसरायलाही झालय म्हणून पुन्हा नाव इथे लिहिलं.

५. एका प्रिय पुस्तकाविषयी थोडेसे - प्रिय पुस्तक एक नसल्याने मला कुठल्या एकाची निवड करणं फार कठीण वाटतय. पण माझ्या संग्रही असलेल आणि इतरांनीही संग्रही ठेवाव अस संजीवनी वाडेकरांच, शोध सुखाचा.

'सुख' कुठे सापडेल? हा भाबडा प्रश्न आपल्या मनाला बरेचदा चाटून जातो. रक्ताची नाती, जुळलेली नाती आणि जुळवलेली नाती यांतून अनेक समस्या निर्माण होतात. दिवसें दिवस वाढत चाललेल्या आत्मकेंद्री वृत्तीमुळे कुटुंब व्यवस्था आणि समाज या दोहोंनाही तडे जाऊ लागले आहेत. अशा प्रत्येक नात्यातला समस्यांचा उहापोह आणि त्यातून विचारात घेतलेला, "शोध सुखाचा" नक्कीच संग्रही ठेवण्याजोगे आहे.

आता पुढच्या अनुदिनीकारांना खो देते. (सुमेधा खो छान वाटतं.)

Thursday, May 04, 2006

नवा ब्लॉग

नवा ब्लॉग टाकला आहे "विखुरलेले मोती" या नावाने. मराठी ब्लॉग वर येईलच, पण ही लिंक प्रेमाने माझ्या शब्दांची तोड फोड वाचणाऱ्या माझ्या आईसाठी.

click below:

विखुरलेले मोती

Tuesday, May 02, 2006

आठवणींचे झरोके

आज मुंबईच्या उकाडयाची खूप आठवण येतेये. या आमच्या नॉर्थ अमेरिकेला उकाडा जाणवेल तर शपथ. नाही तसं ३-४ महिने चांगलं गरम होतं पण दिमतीला एसी असल्यावर त्या बिच्चाऱ्या उकाडयाची काही किंमतच रहात नाही आणि या इथल्या उन्हाळ्याला मुंबईच्या उन्हाळ्याची तसूभर सर नाही. तसंही एप्रिल मेच्या महिन्यात इथे स्प्रिंग असतो उन्हाळा नाही. एक चांगली गोष्ट म्हणजे इथे मी छातीठोकपणे 'मला उन्हाळा आवडतो' असं म्हणू शकते. हेच वाक्य जेव्हा जेव्हा मुंबईला उच्चारलय तेव्हा तेव्हा लोकांनी विचीत्र नजरेने माझ्याकडे पाहिलय.

एप्रिलच्या महिन्यात शाळेच्या परिक्षा सुरु झाल्या की शाळेच्या आवारात एक भय्या लाल-केशरी चिनमीन बोरांची, आवळे, गाभूळलेल्या चिंचांची गाडी लावायचा. 'परीक्षांच्या दिवसांत त्या गाडीकडे ढूंकूनही बघायच नाही' अशी आईची सक्त ताकिद असायची. आशाळभूत नजरेने त्या गाडी समोरुन जाताना आमच्या बालमनावर किती अत्याचार होत असतील याची आमच्या मातोश्रींना कल्पनाही नसावी. बरं तो भय्या तरी असला दुष्ट की परीक्षा संपल्या की लागोलाग हा ही शाळेच्या आवारातून गायब. मग त्याच्या शोधात आम्ही बाजाराच्या चकरा मारायचो.

सुटट्या लागल्या की आम्ही आमचं वेळापत्रक ठरवायचो. खरं म्हणजे सकाळी सकाळी बाबांनी 'दिवस वर आला तरी गाढवा सारखे लोळत काय पडलाहेत?' या वाक्याने सुरुवात करायला नको म्हणून आम्हा मैत्रीणींचा ग्रुप भल्या पहाटे उठून आरे कॉलनीत morning walk ला जायचा. पहाटेच्या वेळेला आरे कॉलनीत असणं हे स्वर्गसुखापेक्षा कमी नाही. ती घनदाट वनराई, मंद थंड वारा, पक्षांचा मुक्त किलबिलाट, पहाटेच्या दंवाने शिंपलेल्या लालभडक पायवाटा, आसमंतात दरवळणारा ओल्या मातीचा सुगंध, गोठयांमधली लगबग, गायींच हंबरणं, गावदेवीच्या जुन्या देवळातील पहाटेची पूजा, तो अखंड घंटानाद, मुंबईत राहून हे सर्व वाटयाला यायला भाग्य लागतं. 'वेळेवर परत या,' हा आईचा सल्ला हीच काय त्यातली negative side.

परत आल्यावर थंडगार पाण्याने मनसोक्त आंघोळ करायची. आईने, "वरच्या टांकीतलं पाणी संपेल आता, पुरे झालं" अस ओरडून सांगेपर्यंत. तिच्या आग्रहाखातर पोटांत काहीतरी ढकलून आम्ही पुन्हा एकमेकांची दारं ठोठवायला मोकळे.
जेवताना हापूसचे आंबे, पायरीचा आमरस, गऱ्या गोट्याची फणसाची भाजी हे बाकीच्या दिवसांत कुठे मिळते? आई फणसाची ठेचून भाजी करते. त्यात बारीक कोलंबी किंवा करंदीही घातली तर मी पंचपक्वान्नही फटक्यात बाजूला सारिन. त्या भाजीसाठी मी आजही वेडी आहे. दुपारच्या जेवणानंतर 'इकडे तिकडे उनाडक्या करत बसण्यापेक्षा गच्चीवर घातलेल्या वाळवणाजवळ बसा' या आईच्या आज्ञेला मात्र आम्ही शिरसावंद्य मानायचो.

भर दुपारच्या कडक उन्हातही गच्चीमधे वा-याच्या सुखद झुळुक असायची. टांकीखाली सतरंजी घालून लोळत पुस्तक वाचायला खूप मज्जा यायची. काही दिवसांपूर्वी फास्टर फेणेवरचा सुरेख ब्लॉग वाचला होता. त्याच्या जोडीला गोटया, चिंगी, जयदीपची जंगलयात्रा, ओसाडवाडीचे देव, किशोर, चांदोबाचे अंकही असायचे. काही वर्षांनी या पुस्तकांची जागा चंद्रावर स्वारी, प्रेषित, यक्षाची देणगी अशा नारळीकर, लक्ष्मण लोंढे, निरंजन घाटे सारख्या लेखकांनी घेतली. दुपारच्या निरव वेळी रत्नाकर मतकरींचं "खेकडा" वाचून अंगावर उभा राहिलेला शहारा अजूनही आठवतो. पुस्तकांच्या सोबतीला तोंडात चघळायला गच्चीवरच्या वाळवणातल्याच खारवलेल्या कैऱ्या, चिंचा असायच्या. मिटक्या मारत पुस्तक वाचायची मजा काही औरच असायची.

संध्याकाळ झाली की पुन्हा उनाडक्या करायला मोकळे. टीव्हीच्या भस्मासुराने आम्हाला तेव्हा गिळलं नव्हत त्यामुळे ईमारतीच्या आवारांत चोर पोलिस, डब्बा ऐसपैस सारखे खेळ रंगायचे.

"दिवे लागले...चला घरी आता," असं आईने निदान १० वेळा कंठशोष केला की मगच आम्ही आज्ञावंत मुलं आपापल्या घरी नाईलाजाने परतायचो. रात्री झोपताना "चला सुट्टीतला आणखी एक दिवस गेला. कधी जून उजाडतोय आणि ही पोरं पुन्हा शाळेत जातायत अस झालय मला," अशी आईची कुजबुज हमखास ऐकू यायची.

----

या सर्वांची इतकी प्रकर्षाने आठवण व्हायच कारण म्हणजे मुलीला पुढच्या महिन्यापासून सुट्टी पडत्ये आणि मला आत्तापासूनच टेन्शन आलय की हे दोन महिने कसे घालवायचे?
-----
सुमेधा, तुझ्या शिर्षकाचा वापर केला हं!

marathi blogs