प्रकार

Sunday, November 07, 2010

पशू

हे घर भाड्याने घेतलं तेव्हा सुहासी थोडीशी कुरबुरत होती. या बायकांना प्रत्येक गोष्टीत खोड काढायची सवय का असते हेच कळत नाही. मनातून घर तिलाही आवडलं होतं पण उगीच काहीतरी लहानसहान खोड्या काढत बसली होती. घराचं तोंड पूर्वेला नाही, विहीरीवर जाळी नाही, स्वयंपाकघराचा ओटा अरुंद आहे आणि काय ना काय. तिला बराच वेळ समजावलं तेव्हा एकदा घर पसंत आहे म्हणाली. आज विचार केला तर वाटतं की उगीच तिला भरीला पाडलं मी.

पुलाच्या बांधकामाचं प्रोजेक्ट मिळालं होतं. त्यासोबत आणखीही काही बांधकामे मिळणार होती. किमान वर्षभर तरी काम चालणार होतं. सुहासी नोकरी करत नव्हतीच. वर्षभर स्वतंत्र राहायला मिळणार याचा आनंद दोघांनाही होता. माझ्या बांधकामापासून मैलभरावरच हे घर मिळत होतं. घराचा मालक पुण्याला राहत होता. तो मूळचा या इथलाच. त्याची वडिलोपार्जित जमीन होती. त्यावर त्याने घर बांधले. सरकारी पाहुणे इथे बरेच वेळा मुक्काम ठोकून असत. इथे येण्यापूर्वी मी त्याला प्रत्यक्ष जाऊन भेटलो. घर भाड्याने द्यायचे असले तर त्याला घरात लग्न झालेलं जोडपं हवे होते त्यामुळे सौदा झटक्यात ठरला. घर तसं थोडंसं एकाकी होतं पण अगदीच काही जंगलात नव्हतं. नवी वस्ती बनत होती म्हणून आजूबाजूला थोडी मोकळी जागा होती. हाकेच्या अंतरावर इतर घरं होती. मुख्य म्हणजे साईटपासून घर जवळ होतं आणि दिमतीला बाइक होतीच की.

घर अगदी टुमदार होतं. पांढर्‍या शुभ्र भीतींवर लालचुटुक कौले, घराच्या बाहेर थोडंसं अंगण, प्रशस्त ओसरी, आत बैठकीची खोली, दोन बेडरूम्स आणि स्वयंपाकघर. हवेशीर आणि प्रसन्न. आम्हा दोघांना पुरून उरेल असं घर होतं. मुख्य दरवाजा बैठकीच्या खोलीत उघडत होता आणि स्वयंपाकघरातून मागच्या अंगणात जायला दरवाजा होता. अंगणाला पुढून मागून सुरेख लाकडी कुंपण होतं. मागच्या कुंपणाला लहानसं फाटकही होतं; माळावर जाण्यासाठी. मागच्या अंगणामागे विस्तीर्ण पसरलेला माळ होता. मोकळीच मोकळी जागा. कुंपणापासून काही अंतरावर उंचचउंच वाढलेल्या गवताचा लांबलचक पट्टा होता.

'तो माळ वापरात नाही; ओसाड आहे' असं रंगराव म्हणाला होता. रंगराव म्हणजे धरणावरला मुकादम. त्यानेच गावातली ४-५ घरं दाखवली होती मला. त्याला गावची बरीच माहिती होती; काही हवं नको झालं तर मी त्यालाच विचारत असे. 'त्या वाढलेल्या गवतात कधीतरी कोल्ही-कुत्री निघतात. उगीच फिरायच्या निमित्ताने फार आतवर घुसू नका, एखादं जनावर बाहेर येऊन पोटरीचा चावा घ्यायचं.' असं सांगून गेला होता. तशी अडचण काही नव्हती. माळावर फिरण्यासारखं काही नव्हतंच. घरासभोवतीच्या भक्कम लाकडी कुंपणातून कुणी कुत्रं अंगणात घुसण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून मी दुर्लक्ष केलं. माणसाला एखादी गोष्ट हवी असली की तो तिच्याबाबतीत फार खोलवर जात नाही. मला काम सुरू करायचं होतं, सुहासीला इथे आणायचं होतं, घर लावायचं होतं. आता मात्र वाटतं की मी आणखी चौकशी करायला हवी होती.

आम्ही आता या घरात राहायला येऊन आठवडा उलटला होता. घराची लावालावी, थोडंसं प्लंबिंगचं, कुठे थोडंफार डागडुजीचं काम यातच सगळा आठवडा व्यस्त गेला. सुहासीला टापटीप, स्वच्छता यांची भारी आवड. घर तिने मस्त सजवलं होतं. आठवडाभर गावातल्याच खानावळीतून डबा आणत होतो. आता स्वयंपाकघर लागलं होतं. रविवारी आम्ही दोघांनी मस्त आराम केला. बाजारहाट केली आणि मी सुहासीला गावात, नदीवर फिरवूनही आणली. तिचाही मूड मस्त लागला होता.

"बरं झालं नै! वर्षभर सुट्टी साजरी करणार आपण असं वाटतं आहे. " ती उत्साहाने म्हणाली.
"बघ हं! कंटाळशील लवकरच. मग म्हणशील कुठे या आडगावात येऊन पडलो. "
"अगदीच काही आडगाव नाहीये हं! आपण राहतो तिथे वस्ती अद्याप नाही एवढंच. अरे पण तू आहेस ना, पुरा माझ्या ताब्यात. आणखी कोण पाहिजे? " ती खट्याळ हसत म्हणाली.

संध्याकाळी आम्ही बाहेरच जेवलो आणि मनसोक्त गप्पा मारल्या. आमच्या लग्नाला तीन वर्षे उलटली होती पण अद्याप नवलाई गेलेली नव्हती. सुहासीचा शांत, नीटनेटका स्वभाव मला आजही हवाहवासा वाटे.

सोमवारी सकाळी मी साईटवर निघालो तेव्हा सुहासी आंघोळपांघोळ आटोपून स्वयंपाकाच्या तयारीलाही लागली होती.

"ए तू बारा वाजेपर्यंत ये हं जेवायला! उशीर करू नकोस. तुझ्या आवडीचं वांग्याचं भरीत बनवते आहे. " तिचं ते लाडिक बोलणं कानावर पडलं आणि उंबरठ्यातून बाहेर पडणारा पाय थबकला.
"जाऊच नकोस असं म्हण. हा बघ मी इथेच थांबतो की नाही ते. " मी हसून म्हटलं तशी ती तरातरा दारात आली आणि मला वेडावून म्हणाली, "निघ हं आता, नाहीतर रंगराव घरापर्यंत यायचा बोलवायला. "

दुपारी वेळेवर मी निघणारच होतो पण अचानक काही काम निघालं. सिमेंटच्या गोणी येऊन पडल्या त्याच्या पावत्यांवर सह्या हव्या होत्या. मला बाराच्या सुमारास निघताच येईना. घरातला फोन अद्याप सुरू झाला नव्हता. सुहासीला फोन करून सांगावं की 'तू जेवून घे' तर ते शक्य नव्हतं. मी मनातून वैतागलो पण हे काम हातावेगळं केल्याशिवाय निघणं बरं दिसत नव्हतं. दोनच्या सुमारास मी मोकळा झालो तशी धावतच जाऊन बाइक काढली. ऊन मी म्हणत होतं. मी सुसाट बाइक सोडली आणि एकदाचा घरी पोहोचलो. आत जाऊन आता बोलणी ऐकून घ्यायची आहेत अशी मनाची तयारी करून मी दार उघडलं. टळटळीत उन्हातून एकदम आत शिरल्यावर अंधारून आल्यासारखं वाटलं. मी डोळे किलकिले केले. आत सामसूम होती. घरात माणूस असल्याची अजिबात चाहूल लागत नव्हती. 'बाईसाहेब जाम वैतागलेल्या असाव्यात.' मी मनात म्हटलं आणि दबकतच आत गेलो. आधी बेडरूममध्ये डोकावून पाहिलं. न जाणो, खाऊनपिऊन बायकोने मस्त ताणून दिलेली असायची आणि मी आपला उगीच हवालदिल. बेडरूममध्ये सुहासी नव्हती. आता राहिलं स्वयंपाकघर. मी स्वयंपाकघरात घुसलो.

स्वयंपाकघरातली खिडकी उघडी होती आणि खिडकीपाशी सुहासी स्तब्ध उभी होती. अगदी पुतळ्यासारखी. मी मागे उभा आहे याची किंचितही जाणीव तिला झाली नव्हती. कुतूहलाने ती खिडकीबाहेर बघत होती. खिडकीतून येणाऱ्या मंद वाऱ्याने तिच्या बटा तेवढ्या हलत होत्या. फार सुरेख दिसत होती सुहासी. तिच्याकडे पाहिलं की मला नेहमी समाधान वाटे. सरळ नाक, नाजूक जिवणी, पाणीदार डोळे. खांद्यावर रुळणारे स्टाइलिश कापलेले केस आणि नजरेत भरणारा बांधा. या सर्वांत सुहासीचे डोळे मला फार आवडत. लहान मुलांसारखे टपोरे आणि निरागस. तिला पहिल्यांदा पाहिले तेव्हाच डोळ्यांत माझा जीव गुंतला होता.

"सुहासी", मी तिच्या खांद्यावर हात टाकला तशी ती मागे वळली.
"अरेच्चा! तू कधी आलास? " ती साफ गोंधळली होती. "चल जेवायला बसूया. " असे म्हणून तिने खिडकी बंद केली आणि ताटे काढली. जेवणाची वेळ टळून गेली आहे, दुपारचे दोन वाजून गेले आहेत याचा मागमूसही तिच्या तोंडावर नव्हता. शेवटी मीच म्हणालो.
"सॉरी, अगं वेळेवर येताच आलं नाही. बराच उशीर झाला. "
"उशीर झाला? " सुहासी आश्चर्याने पुटपुटली आणि तिने घड्याळाकडे नजर टाकली. "अय्या! दोन वाजून गेले. मला कळलंच नाही वेळ कुठे गेला ते. " ती चकीत झाली होती.
"का गं? असं काय करत होतीस की तुला वेळेचं भान राहिलं नाही? "

"काही नाही रे. स्वयंपाक, साफसफाई आटोपून तुझी वाट बघत बसले होते. वेळ जाईना म्हणून या खिडकीतून सहजच बाहेर बघत होते. ते मागच्या माळावरचं गवत वाऱ्यावर संथ डुलत होतं. एका लयीत. एका नादात. त्याच्या त्या हिरव्यागार रंगात सूर्याचे सोनेरी रंग मिसळले होते आणि वार्‍याने होणारी पात्यांची सळसळ ना अरे इथपर्यंत, अगदी घरात ऐकू येत होती. सर्व भानच विसरूनच गेले मी त्याच्याकडे बघताना. " ती भारावल्यासारखी बोलत होती. तिच्या आवाजातला तो बदल मला जाणवला होता खरा पण त्यावेळेस खटकला का नाही ते कळत नाही. खटकला असता तर आज ही पाळी आमच्यावर आली नसती.

"अगं, शहरातल्या माणसांना हा असा निसर्ग कुठे बघायला मिळतो? लक्की यू! मला तर इथे येऊनही मिळत नाहीये. तेच सिमेंट, रेती, कॉंक्रिट बघतो मी दिवसभर." मी हसून म्हटलं आणि भरभर जेवायला सुरुवात केली. मला साईटवर परतायचं होतं.

त्यानंतर अनेकदा मी दुपारचा जेवायला घरी यायचो तेव्हा सुहासीला स्वयंपाकघराच्या खिडकीत, नाहीतर दारात उभी पाहायचो. ती टक लावून त्या गवताकडे बघत असायची. कित्येकदा मी तिच्या बाजूला जाऊन उभा राहिलो तेव्हा जाणवलं होतं की तिच्या डोळ्यांची पापणीही हलत नसे. असं काय आहे त्या गवतात हा प्रश्न मला पडत असे मात्र मी खोलात जायचं मनावर घेतलं नाही. का केलं मी असं? ...बेफिकीर होतो मी. संकटं वगैरे आपल्या चार हात लांबून निघून जातील या गैरसमजूतीत जगत होतो.

संध्याकाळी माझ्या घरी पोहोचण्याच्या वेळेवर घरकाम करायला पद्मा आलेली असे. आमच्या साईटवरच्या हणम्याची बायको. संध्याकाळी सुहासी काम आटोपत तिच्या मागेमागेच असे. निदान त्यावेळी तरी ती त्या गवतात रमलेली नाही याचं मला बरं वाटे.

असाच एके दिवशी संध्याकाळी मला साईटवरून यायला थोडा उशीर झाला. घरी पोहोचलो तेव्हा रात्रीचे साडेआठ वाजून गेले होते. मी अंगणात बाइक लावली. घरात मिट्ट काळोख होता. 'कुठे गेली असेल सुहासी यावेळेस?' असा विचार करतच मी घराचा दरवाजा उघडला आणि आतला दिवा लावला. प्रकाशाने संपूर्ण खोली उजळून निघाली. माझी पावलं तडक स्वयंपाकघराच्या दिशेने वळली. माझ्या अपेक्षेप्रमाणेच स्वयंपाकघरातल्या काळोखात सुहासी खिडकीसमोर उभी होती. तशीच; दुपारी उभी असे अगदी तश्शीच. स्तब्ध. पुतळ्यासारखी. आजूबाजूच्या जगाला विसरून गेलेली. खिडकीतून येणाऱ्या चंद्रप्रकाशात तिचा चेहरा मी निरखत होतो. कोड्यात पडलेला. कुतूहलाने खिडकीबाहेर माळाकडे पाहणारा. मी घाईने लाइट लावला तशी ती एकदम दचकली. "तू कधी आलास? "

"काय बघतेस सुहासी? " दुपारी मी जेवून साईटवर परतायच्या घाईत असे पण आज या प्रश्नाचा छडा लावायला बरी वेळ सापडली होती.
"काही नाही रे. ते गवत चंद्रप्रकाशात इतकं सुरेख दिसत होतं की नजरच निघत नव्हती. बघत राहावसं वाटतं त्या गवताकडे. त्या गवताचे आणि माझे जणू काही ऋणानुबंध आहेत. मी ना एकदा त्या गवतापलीकडे जाऊन बघणार आहे. " ती झोपेत बोलणार्‍या माणसाप्रमाणे बोलत होती.

मी तिच्याकडे निरखून पाहिले. गेले काही दिवस सुहासीत काहीतरी बदल होतोय अशी शंका मला येऊ लागली होती. तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागली होती. थोडीशी खंगल्यासारखीही वाटत होती.

"तुला रंगरावने काय सांगितलं माहित आहे ना. तिथे उगीच रानटी कुत्री वगैरे असायची. नको ते स्टंट करू नकोस. उगीच अंगाशी नको यायला. हे गाव अजूनही आपल्याला अपरिचित आहे." मी तिला खडसावलंच.

"अरे, आपण इतके दिवस इथे राहतो. तू कधी कुठल्या कुत्र्याचं भुंकणं ऐकलं आहेस का? मी तर दिवसभर घरात असते. या खिडकीशी उभी असते. गवताची सळसळही मला ऐकू येते पण कधी त्या माळरानावर कुत्र्यांना पाहिलेलं नाही की त्यांचं भुंकणं ऐकलेलं नाही. "

"हे बघ! तुला माझं ऐकायचं नसेल तर तसं सांग. तुझ्याकडे मोबाईलही नाही. त्या माळावर जाऊन कुठे तरी हरवू नकोस म्हणजे झालं. " मी तिला थोड्या तुसडेपणाने म्हटले तशी ती हिरमुसली झाली. जेवून झोपायला जाईपर्यंत ती माझ्याशी फारशी बोलली नाही.

रात्री सुहासी माझ्याकडे पाठ करूनच झोपली होती. मला वाईट वाटलं. इथे परक्या गावात आम्ही दोघेच एकमेकांचे सोबती आणि आता उगीच आमच्यातला संवाद बंद झाला. मी तिला जवळ ओढली आणि म्हणालो, "येत्या रविवारी जाऊ आपण त्या माळरानाच्या दिशेने. चक्कर मारून येऊ. एक दांडुका घेऊन जाऊ बरोबर. आलंच कुत्रं तर घालू पेकाटात. " सुहासी खुदकन हसली. "हो हो नक्की जाऊ. " असं म्हणून मला आणखीनच खेटली.

दुसर्‍या दिवशी दुपारी जेवायला मी घरी आलो तर घरात पुन्हा सामसूम होती. आपोआप माझी पावलं स्वयंपाकघराकडे वळली. खिडकीपाशी दररोज उभी असणारी सुहासी आता मला सरावाची झाली होती. त्याच अपेक्षेने मी स्वयंपाकघरात पाय टाकला पण त्या दिवशी स्वयंपाकघर मोकळं होतं. मी बेडरूमकडे गेलो; तिथेही कुणी नव्हते मग दुसर्‍या बेडरूमकडे. नाही, सुहासीचा पत्ता नव्हता. ती घरात नव्हतीच.

मला कळेना ही यावेळेस कुठे गेली असावी? मी पुन्हा स्वयंपाकघराकडे वळलो. स्वयंपाकघराचा दरवाजा ओढून घेतलेला होता पण खिडकी उघडी होती. मी खिडकीपाशी जाऊन उभा राहिलो. मागल्या कुंपणाचे फाटक उघडे होते. त्या बाहेर विस्तीर्ण माळ पसरला होता. माळरानावरचं उंचच उंच वाढलेलं गवत वाऱ्यावर फेर धरून डोलत होतं. संथ; एका लयीत. सूर्याच्या सोनेरी प्रकाशात हिरवीगार पाती चमचमत होती. मी स्तब्ध झालो. डोळ्यांच्या कक्षेत फक्त डोलणारं, संथ हेलकावे खाणारं गवत मावत होतं. त्याची ती मंद सळसळ कानावर पडत होती. अचानक माळरान रुंदावल्यासारखं भासलं. गवतही आणखीच उंच होत होतं. माळरान आता हळूहळू माझ्याजवळ सरकत होतं. जवळ येत होतं. त्याचा विस्तार पूर्वीपेक्षा वाढल्यासारखा वाटत होता. चकीत करणारे क्षण होते ते. मी आणि माळावरचं गवत सोडून आसमंतात दुसरं काहीच नाही असा विचार मनाला चाटून गेला. माझे डोळे त्या दृश्यावर खिळून होते... तिथे जायला हवं एक दिवस. त्या गवतात... ते गवत बोलवत होतं. एवढ्यात गवतात काहीतरी हललं आणि डोलणारं गवत एकदम स्तब्ध झाल्यासारखं वाटलं. माळाचा आकारही पूर्ववत झाला. माझी तंद्री मोडली.

त्या गवतातून सुहासी धडपडत बाहेर पडत होती. विस्कटलेले केस, चुरगळलेले कपडे, घामाघूम शरीर; सुहासीचा हा अवतार बघून मी थक्क झालो.

मी तिला पाहून चटकन मागचं दार उघडलं आणि बाहेर गेलो. ती कुंपण बंद करून आत येत होती. तिला दम लागला होता आणि चेहर्‍यावर भीतीचे सावट दिसत होतं.

"सुहासी? काय झालं? " काळजीने मी तिला विचारलं. ती धापा टाकत होती. तिच्या कुडत्यावर, सलवारवर केसांवर गवताचे तण चिकटले होते. पायांना चिखल लागला होता. काहीही न बोलता ती तरातरा घरात शिरली. मी तिच्यामागून घरात शिरलो तेव्हा दुपारचे तीनचे ठोके पडत होते. मी जेवायला घरी आल्यापासून इतका वेळ गेला होता याची जाणीव मला आत्ता होत होती. काहीतरी होतं त्या माळरानावर जे आधी सुहासीला खिळवून ठेवत होतं आणि आज मलाही त्याची प्रचिती आली होती. तो माळ संमोहन टाकत होता, आम्हाला खेचून घेत होता. मी घाईने खिडकी आणि दरवाजा बंद केले.

"सुहासी, काय झालं? "
"काही नाही. आज राहावलं नाही म्हणून मी त्या गवतात घुसले आणि रस्ता चुकले. उंच आहे ते गवत भारी. इथून जाणवत नाही पण खरंच खूप उंच आहे. परत कसं यावं तेच कळेना. वाटच मिळेना. पुढल्या वेळेस काहीतरी खुणा घेऊन गेलं पाहिजे. " ती आता शांत दिसत होती. शांतपणे बोलत होती. मगाशी तिच्या डोळ्यांतली भीती नाहीशी झाली होती. जसं काही घडलंच नव्हतं. मी मात्र धास्तावलो होतो.

"हे बघ, तिथे पुन्हा जायची अजिबात गरज नाही. पुन्हा या खिडकीतही उभी राहू नकोस. तुझ्या डोक्यातले माळाचे विचार आधी काढून टाक. हा वेडेपणा पुरे झाला." मी आवाज चढवून म्हणालो. त्या खिडकीतून पाहिल्यावर मला जे जाणवलं होतं ते तिला सांगावं की नको असा विचार मनात आला. न जाणो जे मला भासलं होतं ते तिला भासत नसलं तर ती उगीच मला वेड्यात काढायची असा विचार करून मी गप्प बसलो पण या माळरानाबद्दल खोलात चौकशी करणं गरजेचं होतं. डोळ्यांसमोर रंगराव आला.

मी साईटवर पुन्हा परतलो तर रंगराव गायब होता. कामावरल्या दोघांकडून कळलं की त्याच्या वडिलांची तब्येत अचानक खराब झाल्याने त्यांना भेटायला तो गावी गेला होता. दोन दिवसांनी परत येणार होता. पुलाचा प्लॅन घेऊन असिस्टंट इंजिनिअर येताना दिसला आणि मीही कामाच्या धांदलीत माळरानाची गोष्ट विसरून गेलो.

त्यानंतर गेले दोन दिवस मी घरी आलो तर सुहासी घरीच दिसली. ती नेहमीप्रमाणे खिडकीतही उभी नव्हती. मला मनात कुठेतरी खूप बरं वाटलं आणि तेवढीच काळजीही वाटत होती. का कुणास ठाऊक? सुहासी बदलली होती. तिचा चेहरा उतरलेला दिसे. बोलण्यात-वागण्यात उत्साह नव्हता. काहीतरी विचार करत एकटीच बसलेली असे. केस विंचरलेले नसत. कपडे टापटीप नसत. मी तिला कितींदा विचारलं की कसला विचार करतेस? पण ती उत्तर टाळत होती. 'रविवारी जायचं का माळावर आपण?' असं मी तिला मुद्दाम खोचकपणे विचारून पाहिलं पण तिने नकारार्थी मान हलवून वेळ मारून नेली. मला मनात बरंच वाटलं. निदान ते माळरानाचं भूत तिच्या मानगुटीवरून उतरलं हेच खूप होतं.

दोन दिवसांनंतरची गोष्ट. मध्यरात्र उलटून गेली असावी. कसलंतरी भयंकर स्वप्न पडलं होतं. मी दचकून जागा झालो तेव्हा सुहासी माझ्या बाजूला नव्हती. ती पाणी प्यायला उठली असेल किंवा बाथरूमला गेली असेल या विचाराने मी गादीवरून उठलो नाही पण पुन्हा डोळा लागत नव्हता. थोडा वेळ गेला, सुहासीची चाहूल लागली नाही. मला अस्वस्थ वाटू लागलं; मी उठलो आणि स्वयंपाकघरात गेलो. घराचा मागचा दरवाजा आणि कुंपणाचं फाटक दोन्ही सताड उघडे होते.

रात्रीच्या अंधारात माळ निळसर-करडा दिसत होता. आकाशात चंद्रावर ढगांनी गर्दी जमा केली होती. ढगांच्या आडून कुठेतरी चांदणी उगीच लुकलुकत होती. मी डोळे फाडून माळाकडे बघत होतो पण काहीच दिसत नव्हतं. काय करावं काही सुचेना. सुहासी पुन्हा त्या गवतात तर गेली नसेल... काय करायचं? रात्रीच्या वेळी असं माळावर... तिथे ती भटकी कुत्री असली तर? मला कुत्र्यांची भीती वाटते पण माझी बायको तिथे गेली आहे... एकटीच. विचार डोक्यात मावेनासे झाले होते. माझे पाय आपोआप माळाच्या दिशेने पडू लागले. मी दरवाजा ओलांडून मागच्या अंगणात पोहोचलो असेन नसेन तोच गवतात काहीतरी हललं. गवतातून सुहासी वाकून बाहेर पडत होती. मी धावत कुंपणापाशी गेलो. तिला दम लागला होता, श्वासही फुलला होता. अंगाला गवत चिकटलं होतं. मी तिचा हात पकडला आणि तिला खेचून घरात आणली. क्षणभर, तिच्या नजरेला माझी ओळख पटत नसावी असं मला वाटून गेलं. ही तिथे कुणाला भेटायला तर जात नसावी? कुणी प्रियकर तर नसावा? असा चुकार विचार माझ्या मनात आला आणि मलाच स्वतःची लाज वाटली. सुहासी अशी नाही. खूप प्रेम आहे तिचं माझ्यावर. तिचं काहीतरी बिनसलं आहे, तिचं चित्त थार्‍यवर नाही आणि ती त्या गवतात गेली असावी हे कळल्यावरही मी तिचा नवरा असून तिला शोधायला तिच्यामागे गेलो नाही. मला अपराधी वाटलं.

"सुहासी. रात्री उठून तू तिथे गेली होतीस? बरं आहे ना तुला? अंधारात कुठे घुसलीस माळावर? तोंडचं पाणी पळवलंस माझ्या. खबरदार पुन्हा तिथे गेलीस तर. तिथे काहीतरी विचित्र आहे. त्या गवताच्या आसपासही फिरकू नकोस. " मी तिच्या अंगावर ओरडत होतो.
"हो, तिथे काहीतरी आहे. " ती भारावल्यागत बोलत होती.
"काय आहे? तुला काही दिसलं आहे का? " मी तिचे दोन्ही हात माझ्या हातात घेऊन विचारलं तसं तिने नकारार्थी मान हलवली आणि हात सोडवून घेतले.
"आई गं! सुहासी तुझी नखं किती वाढली आहेत. " हात सोडवताना सुहासीच्या नखाने माझ्या हातावर भलामोठा ओरखडा उमटवला होता. "काप ती. लागलं मला. "

"उद्या सकाळी कापेन हं! " शांत आवाजात म्हणाली आणि मला एकट्याला तिथे सोडून काहीच न घडल्यासारखी बेडरूममध्ये झोपायला गेली. या प्रकरणावर आता वेळ काढून उपयोगाचे नव्हते. लवकरात लवकर या माळरानाचे रहस्य माहित करून घ्यायला हवं. मी सुहासीच्या मागोमाग बेडरूममध्ये गेलो. ती आपले पाय जवळ घेऊन झोपली होती. मला थोडंसं विचित्र वाटलं पण मी तिच्या अंगावर चादर घातली आणि झोपी गेलो.

दोन दिवसांचं सांगून रंगराव गेला होता तो ४-५ दिवस झाले तरी परतला नव्हता. त्याच्या भरवशावर राहणे उपयोगाचे नव्हते. मी धरणावर गेल्यागेल्या कामाला येणार्‍या काहीजणांकडे चौकशी करायला सुरुवात केली. पण त्यातून विशेष काही कळलं नाही. तशीही पोटापाण्यासाठी बांधकामावर आलेली माणसं होती ती. त्यांना कामधाम, पोट आणि पोरंबाळं यातून उसंतच नव्हती. एकंदरीत या विषयाविषयी औदासीन्य होतं. गावात माझ्या कोणाशी फारशा घनिष्ठ ओळखीही नव्हत्या. हणम्या गावातला होता त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यातल्या त्यात जास्त माहिती कळली. त्याच्या बोलण्यातून कळलं की दीड-दोन वर्षांपूर्वी गावात बरीच बेवारशी कुत्री झाली होती. या कुत्र्यांची पिडा टाळण्यासाठी काही टारगट पोरांनी कुत्र्यांना पकडून, गोणात घालून या माळावर आणून, त्यांच्या शेपटीला फटाके बांधून त्यांना माळाच्या दिशेने गवतात सोडून देण्याचा चंग बांधला होता. हे असं महिनाभर तरी चाललं होतं. त्यानंतर गावातली बेवारशी कुत्री बरीच कमी झाली. गावकर्‍यांनी सुटकेचे निःश्वासच सोडले.

सुमारे ६ महिन्यांपूर्वी सावत्याचा मुलगा; तो ही याच टारगट पोरांतला. एके दिवशी बापाशी कडाक्याचं भांडण केलं आणि बापाने घराबाहेर काढला. रागारागात शिव्या घालत त्याला काही लोकांनी माळावर जाताना पाहिलं. कोणी म्हणतं तो घरातून चोरी करून बापाला तुरी देऊन पळाला. कोणी म्हणतं त्याला शहरात पाहिला तर कोणी म्हणतं तो त्या गवतात खपला. गायब झाला. पोरगा काही पुन्हा घरी परतला नाही. त्याचं काय झालं त्याची काळजी खुद्द सावत्यालाही नव्हती आणि हे सर्व सांगताना हणम्याच्या आवाजातही कसली काळजी नव्हती. मी विचारतो आहे म्हणून तो सांगत होता झालं. माझं मन मात्र शंकेने ग्रासलं होतं. हणम्या सांगतो तेवढाच इतिहास या माळरानाला नसावा. सुहासीला या माळरानाच्या वेडापासून दूर करणं अतिशय गरजेचं होतं.

मी संध्याकाळी घरी परतलो तेव्हा ऊनं उतरत आली होती. आज घरी गेल्यावर सुहासीला समजवून सांगायचं, तिला थांबवायचं, या वेडापासून परावृत्त करायचं अशी खूणगाठ मनाशी बांधूनच घरात शिरलो. नेहमीप्रमाणे घरात सामसूम होती.
मी थेट स्वयंपाकघरापाशी गेलो. मागचा दरवाजा उघडा होता आणि कुंपणाचं फाटकही. मी समजायचं ते समजलो आणि मागचा पुढचा जराही विचार न करता सरळ फाटकातून बाहेर पडून समोरच्या गवतात घुसलो. गवत दाट होतं. मी जसजसा पुढे जात होतो तस तसं ते अधिकच दाट आणि उंच होत होतं. त्यातून वाट काढत जाणं जिकिरीचं होतं. मी कुठल्या दिशेने जातो आहे तेच मला कळत नव्हतं. गवत आता पुरुषभर उंचीचं तरी होती. मी सुहासीला हाका मारायला लागलो पण त्या गवतात त्या हाका विरून गेल्यासारख्या वाटत होत्या.

अचानक गवताची सळसळ सुरू झाली. जणूकाही त्या गवताला मी आल्याची जाणीव झाली होती. माझी छाती धडधडत होती पण तरीही मी वेड्यासारखा सुहासीला शोधत होतो. दिशेचं भान मला राहिलं नव्हतं. गवत तर इतकं उंच, इतकं दाट झालं होतं की त्यातून सूर्यप्रकाशही शिरणं कठीण होत होतं. मला त्या गवतात गुदमरल्यासारखं होऊ लागलं.

"सुहाऽऽऽसी” मी जिवाच्या आकांताने ओरडायचा प्रयत्न केला पण माझा आवाज आतच विरला. त्या दाट गवतात मी घुसमटत होतो. मागे काहीतरी सर्रकन आवाज झाला. कुठला तरी प्राणी आसपास असावा. मी मागे वळून पाहिलं तर कुणीच नव्हतं. "सुहाऽसी" मी आणखी एकदा आवाज दिला आणि पुढे सरकलो.

कुणीतरी माझ्यामागून दबकत, खुरडत येतं आहे अशी जाणीव मला व्हायला लागली. मी वळून वळूनबघत होतो पण आजूबाजूला गवतच गवत दिसत होतं. माझ्या मनात अभद्र विचार येऊ लागले. णा कुत्र्याकोल्ह्यांनी माझ्या सुहासीचं काही केलं तर नसेल. किती नाजूक आहे ती. तिच्या त्या सुरेख शरीराचे त्या कुत्र्यांनी चावे, तिचे लचके... त्या विचारांनीसुद्धा अंगावर शहारा आला. माझ्या मागच्या खुरडण्याचा आवाज अगदी जवळ आला होता. मागे वळून पाहायची माझी हिंमतही झाली नाही. मी वेगाने वाट मिळेल तिथे धावू लागलो. किती वेळ मी त्या माळावर भरकटत होतो देव जाणे पण अचानक गवत विरळ झाल्यासारखं भासलं. गवताच्या पात्यांतून मला घराचं कुंपण दिसलं आणि मी हायसं वाटून श्वास घेण्यासाठी क्षणभर थांबलो. मागचा आवाज पुन्हा एकदा जवळ आला होता. मी धीराने मागे वळून पाहिलं – बाहेर अंधारून आलं होतं पण चंद्राच्या प्रकाशात सर्व स्पष्ट दिसत होतं. त्या गवतात सुहासी एखाद्या भुकेजल्या श्वापदासारखी हातापायांवर दबा धरून बसली होती. तिच्या हाताचे पंजे जनावरासारखे जमिनीत रुतले होते. छाती धपापत होती. माझ्याकडे बघून ती दात विचकत होती. तिच्या तोंडातून जीभ बाहेर आली होती आणि त्यातून लाळ गळत होती. तिचे विस्कटलेले केस चेहर्‍यावर चिकटले होते. त्यातून तिचे ते चमकदार हिंस्र डोळे चकाकत होते. त्यांत मनुष्यासारखी कोणतीही जाणीव नव्हती की तिला माझी ओळख आहे असं दिसत नव्हतं. क्षणभर माझ्या मनात किळस दाटून आली आणि तोंडातून अस्फुट किंकाळी फुटली. ती सावध श्वापदासारखी माझ्यावर गुरगुरली आणि पुढल्या क्षणाला मी घराच्या दिशेने धाव घेतली. कुंपण पार करून मी फाटक लावून घेतलं आणि तिथेच थोडावेळ रेंगाळलो. सुहासी गवताबाहेर आली नाही. गवतात खसफस आवाज येत होता. सुहासी माघारी फिरली होती.

माझ्या तोंडचं पाणी पळालं होतं. मी खिसा चापापला. बाइकची चावी खिशातच होती. मी थेट पुढल्या अंगणात आलो, बाइक काढली आणि पोलिस स्टेशन गाठलं.

“साहेब नाहीयेत. तालुक्याच्या गावाला गेल्येत. उद्या येणार. काय कंप्लेंट आहे? ” हवालदाराने डोकं वर करायची तसदीही घेतली नाही.
“मी पुलाच्या साईटवर चीफ इंजिनिअर आहे. माझी बायको आज संध्याकाळपासून बेपत्ता आहे. मी दुपारी जेवायला घरी आलो तेव्हा ती होती पण संध्याकाळी घरी आलो तर ती नव्हती. तिचा पत्ता नाही. ” मी चक्क खोटं बोलत होतो.
हवालदाराने माझ्याकडे रोखून पाहिलं. “नाव काय तुमचं? बायकोशी भांडण झालं होतं का? कुठे गावात गेली असेल. आताशी ९ वाजतायत रात्रीचे. थोडावेळ वाट बघा. कुठे गेली असेल तर येईल परत.” काय घाबरट माणूस आहे असे भाव त्या हवालदाराच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होते.

"नाही हो. आमची गावात फारशी ओळख नाही. ती कुठे जाणार नाही. " त्या माळरानाचा प्रकार हवालदाराच्या कानावर घालावा की न घालावा तेच मला कळत नव्हते. "तुम्ही आमच्या घराच्या आजूबाजूचा भाग शोधून बघा प्लीज. "

"ते आता शक्य नाही. साहेब आणि बरोबर दोन हवालदार एका केसच्या कामानिमित्त शहरात गेले आहेत. ते उद्या पहाटे परततील. आम्ही इथे दोघेच आहोत आज. उद्या सकाळी बघू. आता तुम्ही कंप्लेंट लिहा आणि घरी जा. आम्ही उद्या सकाळी हजर होतो." मी बरीच गयावया केली पण हवालदार काही बधला नाही.

मी घरी परतलो तेव्हा रात्रीचे साडे अकरा वाजून गेले होते. सुहासीशिवाय घर खायला उठत होतं. मी पलंगावर जाऊन कोसळलो. डोळे भरून आले होते. डोके भणभणत होते. ती मागे त्या गवतात एकटी... मी तिचा नवरा होतो. तिची साथ देण्याची शपथ घेतली होती पण तिला एकटीला तिथे सोडून आलो होतो. तिचं ते अमानवी, अभद्र रूप सारखं डोळ्यासमोर येत होतं. काय झालं होतं तिला? काय होतं त्या माळरानावर?... एखादी पाशवी शक्ती की एक वेगळं जग? मला जे दिसलं तसं काही तिलाही दिसलं होतं का? की आमच्या जाणीवा वेगळ्या होत्या? तिला तिथे काही वेगळं दिसलं होतं तर ती बोलली का नाही? विचार करून डोकं फुटायची वेळ आली होती. मी इतका थकललो होतो की माझा डोळा कधी लागला तेच कळलं नाही.


सकाळी कुणीतरी दरवाजा ठोठावत होतं. मी खडबडून जागा झालो. घड्याळात पाहिलं. सकाळचे साडेआठ वाजले होते. मी इतका वेळ कसा झोपलो? सुहासीशिवाय... ती रात्रभर त्या गवतात... मला लाज वाटली. पुन्हा कुणीतरी दरवाजा ठोठावला तसा मी भानावर आलो.

बाहेर इन्स्पेक्टर आणि पोलीस पार्टी उभी होती. इन्स्पेक्टरने सुहासीची चौकशी केली आणि पुन्हा नव्याने सर्व सवाल जवाब केले. मी त्यांना सुहासी मागच्या गवतात हरवली असेल, माळावर रस्ता चुकली असेल अशी शंका बोलून दाखवली. इन्स्पेक्टरना त्यावर फारसा विश्वास वाटला नाही पण ते स्वत: पोलीसपार्टीसह माळावर गेले. माझा जीव घशाशी गोळा झाला होता. काय मिळेल त्यांना तिथे? पशुवत सुहासी की माझी सुहासी... ती जिवंत तरी असेल का? तासाभराने पोलिस पार्टी हात हलवत घरात परतली. त्यांनी सर्व घर उलथेपालथे केले. वासकावासकी करतानाच इन्स्पेक्टरने माझ्यावर प्रश्नांची पुन्हा सरबत्ती केली. मला कळून चुकलं होतं की पोलिसांचा संशय माझ्यावरच आहे. उत्तरे देताना मी गोंधळलो होतो, गांगरून गेलो होतो. जे सत्य होतं, जे मी अनुभवलं होतं आणि स्वत:च्या डोळ्यांनी मी जे पाहिले होतं ते त्यांना सांगू शकत नव्हतो; त्यांनी मला वेड्यात काढला असता. बराच वेळ चौकशी करून आणि बाहेर एक हवालदार उभा करून पोलिस पार्टी परत गेली. ते लवकरच परततील याची मला खात्री होती... माझे अटक वॉरंट घेऊन पोलिस पुन्हा दारात हजर होणार होते. मी निर्दोष आहे हे सिद्ध करण्यासाठी माझ्या हातात काहीही पुरावे नव्हते.

मी पुरता खचलो होतो. सुहासी गेली. माझं काय होणार? अब्रूचे धिंडवडे निघणार. अटक टळणार नाही. माझ्या अंगाला दरदरून घाम फुटला होता. सुहासीच्या आईवडीलांना काय सांगायचं? माझ्या आईवडीलांना काय सांगायचं? तिचं ते माळावरचं अमानवी रूप राहून राहून डोळ्यासमोर येत होतं. मी त्या स्थितीत तिला एकटीला टाकून आलो.... मी अस्वस्थपणे येरझारा घालत होतो. दोन मिनिटं सोफ्यावर विसावलो तेव्हा माझं लक्ष अचानक माझ्या हातांकडे गेलं. माझी व्यवस्थित कापलेली नखं एकदम अचानक वाढलेली दिसत होती. अणकुचीदार.. एखाद्या श्वापदासारखी. डोक्यात लख्ख प्रकाश पडला. समोर मार्ग दिसू लागला.

मी तडक स्वयंपाकघरात गेलो आणि मागची खिडकी उघडली. बाहेर कुंपणा पलीकडे गवत वार्‍यावर फेर धरून डोलत होतं. संथ, एका लयीत. एका नादात. मी स्तब्ध होऊन त्या गवताकडे बघत होतो. हळूहळू माळरानाचा आकार मोठा होऊ लागला, गवत आता डोळ्यांत मावत नव्हतं. त्याची सळसळ मला खुणावत होती. जवळ बोलावत होती. मनाला खूप बरं वाटलं...मी मागचा दरवाजा उघडला आणि माळाकडे धाव घेतली.

समाप्त

8 comments:

Unknown said...

जबरदस्त. शब्दच नाहीत. इतकं चांगलं खूप दिवसात वाचलं नव्हतं. केवळ सुंदर. ही घटना सत्य नाही असं गृहित धरलं आहे मी. पण तुम्हई ज्या प्रकारे लिहिली आहे त्याला काही तोड नाही. म्हणजे सुहासीचं काही दिवस नुसतं माळाकडे बघत रहाणं, मग तिचे वागणं बदलणं, चेहरा बदलणं, नखं वाढणं आणि मग तिथे जाण्याचा हट्ट करणं, या सार्‍या गोष्टी योग्य वेळी आल्या आणि त्यांचा योग्य असा परिणाम झाला. मग मधेच ’हा रंगराव कधी येणार?’ असा पडलेला प्रश्न. मग ’आता सुहासी माळावर जाणार’ हे माहित असूनही तिनं जाऊ नये असं वाटणं. मधेच मग मुख्य पात्राची येणारी चीड की हा बायकोला स्पष्ट विचारत का नाही. आणि शेवटची (?) दिसलेली सुहासी आणि तिचं वर्णन यातली भीती अधिक थ्रिल याचे सारे श्रेय तुम्च्या लिखाणाला. अश्या अनेक गोष्टी घडल्या वाचताना. लिहू तरी किती? आणि शेवट असा अपुर्ण ठेवला त्यात्ली मजा काही औरच. सुहासी माळातून परत आली आहे आणि ते दोघं दुसरीकडे रहायला गेले. मग हळू हळू ति ठिक झाली असा शेवट सगळ्यांना अपेक्षित असेल, पण तुम्ही तो तस केला नाही आणि प्रचंड सस्पेंस जागा
ठेवला यातच सगळं आलं. आणि हे सगळं मुख्य पात्राच्या दृष्टिकोनातून लिहिलंय यातच या कथेची सारी ताकद आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा सन्ग्तो, खुप मस्त कथा आहे आणि मजा आली वाचून. धन्यवाद लिहिल्याबद्दल.

Unknown said...

जबरदस्त. शब्दच नाहीत. इतकं चांगलं खूप दिवसात वाचलं नव्हतं. केवळ सुंदर. ही घटना सत्य नाही असं गृहित धरलं आहे मी. पण तुम्हई ज्या प्रकारे लिहिली आहे त्याला काही तोड नाही. म्हणजे सुहासीचं काही दिवस नुसतं माळाकडे बघत रहाणं, मग तिचे वागणं बदलणं, चेहरा बदलणं, नखं वाढणं आणि मग तिथे जाण्याचा हट्ट करणं, या सार्‍या गोष्टी योग्य वेळी आल्या आणि त्यांचा योग्य असा परिणाम झाला. मग मधेच ’हा रंगराव कधी येणार?’ असा पडलेला प्रश्न. मग ’आता सुहासी माळावर जाणार’ हे माहित असूनही तिनं जाऊ नये असं वाटणं. मधेच मग मुख्य पात्राची येणारी चीड की हा बायकोला स्पष्ट विचारत का नाही. आणि शेवटची (?) दिसलेली सुहासी आणि तिचं वर्णन यातली भीती अधिक थ्रिल याचे सारे श्रेय तुम्च्या लिखाणाला. अश्या अनेक गोष्टी घडल्या वाचताना. लिहू तरी किती? आणि शेवट असा अपुर्ण ठेवला त्यात्ली मजा काही औरच. सुहासी माळातून परत आली आहे आणि ते दोघं दुसरीकडे रहायला गेले. मग हळू हळू ति ठिक झाली असा शेवट सगळ्यांना अपेक्षित असेल, पण तुम्ही तो तस केला नाही आणि प्रचंड सस्पेंस जागा
ठेवला यातच सगळं आलं. आणि हे सगळं मुख्य पात्राच्या दृष्टिकोनातून लिहिलंय यातच या कथेची सारी ताकद आहे.
त्यामुळे पुन्हा एकदा सन्ग्तो, खुप मस्त कथा आहे आणि मजा आली वाचून. धन्यवाद लिहिल्याबद्दल.

अभिलाष मेहेन्दळे said...

अप्रतीम! फारच छान!!

Bhagyashree said...

story mast vatli... ekdam gudh!!

Prasad Kulkarni said...

जबरदस्त....!!

Anonymous said...

khupach chan

विचारमंथन said...
This comment has been removed by the author.
विचारमंथन said...

story writting फारच छान

marathi blogs