प्रकार

Friday, July 11, 2008

गबाळ्या

लेखनप्रकार: (किंचित) भयकथा

उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर शाळेत आज पहिल्यांदाच सर्वांची भेट होत होती. पहिली घंटा अद्याप झाली नसल्याने दमदार दंगामस्ती सुरु होती. घंटा झाली तशी सर्वजण झपकन आपल्या बाकांपाशी परतले. 'सातवीचा वर्ग म्हणजे सकाळच्या शाळेतला शेवटचा वर्ग . पुढल्या वर्षीपासून म्हणजे आठवीत गेल्यावर शाळा दुपारी भरणार, पण सातवी म्हणजे ४ ते ६ वीच्या वर्गांचे दादा. यावर्षी बाकीची पोरं आपल्याला कशी दबून राहायला हवीत. उम्म्म...बाकीची पोरं कशाला वर्गातली पोरंही वचकूनच राहायला हवीत. मुलगी असले म्हणून काय झालं, मुलगे टरकतात, टरकवता आलं पाहिजे. काय?' माझा लाडका शेवटचा बाक पकडताना विचार डोक्यात घोळवत मी गालात हसत होते. या माझ्या अशा हसण्याला आमचे मुख्याध्यापक चिडून "गेल्या जन्मी गौतम बुद्ध होतीस काय?" असं हमखास विचारतात, पण मला असं दुसर्‍यांवर हसायला आवडतं, बुद्धालाही आवडत असावं म्हणूनच तो ही हसायचा, गालातल्या गालात.

या वर्षी आमच्या वर्गशिक्षिका सावंतबाई असणार हे गेल्या आठवड्यात आईला कळलं तेव्हा तिने सुटकेचा मोठ्ठा निश्वास सोडला होता. "बरं झालं बाई! गेल्यावर्षीच्या सातवीच्या वर्गाच्या साठ्येबाई नाहीत यावर्षी ते. भलत्याच कडक आहेत असं ऐकून आहे. सावंतबाई गरीब आहेत, मुलांना त्यांचा त्रास नाही. तू ही बर्‍याबोलाने त्यांच्याशी नीट वाग. मुलांच्या नसतील एवढ्या तुझ्या तक्रारी येतात. केवळ अभ्यासात चांगली असल्याने सुटतेस नेहमी तू. मुलींनी मुलींसारखं वागावं. वर्गातले टवाळ मुलगे दंगा करतात म्हणून तूही त्यांच्याबरोबर फाजीलपणा करावास असं नाही." आईने असा तोंडाचा पट्टा सोडला की कानात कापसाचे बोळे कोंबले आहेत असं समजून मी स्वस्थ राहते. आई बोलते बोलते आणि गप्प बसते. बिच्चारी!!

सावंतबाई वर्गात आल्या तेव्हा बाकांवर बसून सर्वांच्या मस्त टवाळक्या सुरू होत्या. बाई वर्गात कधी आल्या त्याची चाहूलच लागली नाही. बाईंनी डस्टर जोरात टेबलावर आदळला आणि पहिल्याच दिवशी फर्मान काढलं की मुलगे-मुलगे आणि मुली मुलींनी शेजारी बसायचे नाही. प्रत्येक बाकावर एक मुलगा आणि एक मुलगी असं बसायचं म्हणजे वर्गात शांतता राहिल. वर्गातल्या काही काकूबाई हे ऐकून काय हिरमुसल्या झाल्या होत्या... बावळट कुठल्या? मला मुलांशेजारी बसायला आवडतं आणि बहुतेक मुलांनाही मुली बाजूला बसलेल्या आवडतात. तसं ते दाखवत नसले म्हणून काय झालं, मला माहित आहे की त्यांना ते आवडतं. उगीच कुठल्यातरी काकूबाई शेजारी बसून "ए तू माझ्या वहीत डोकावू नकोस" नाहीतर "अय्या! तो राजू बघ कसा चोरून बघतो आहे" अशा बायकी गोष्टी करण्यापेक्षा वर्गातल्या एखाद्या उंचपुर्‍या, थोड्याशा घोगरट आवाजाच्या मुलाशेजारी बसण्यात वेगळीच मजा असते. बाई दोन दिवसांनी जागा ठरवणार होत्या. तोपर्यंत कोणी कोणा शेजारी बसायचं ते ठरलं नव्हतं. माझ्या शेजारची शैला कुरकुरत कुजबुजली "बाई तरी काय? माझ्या आईला सांगितलं की मुलांशेजारी बसायचं आहे तर ती मला ५० गोष्टी सांगत राहणार. नीट बस, फ्रॉक तोकडा तर पडत नाही ना! उगीच अंगाला हात लावायला देऊ नकोस."

"हाहा! माझी आईही असंच सांगणार पण तिला सांगतंय कोण की बाई मुलांशेजारी जागा ठरवणार आहेत म्हणून. उग्गीच नसती कटकट कोण ऐकेल?" मी हसत डोळे मिचकावले.
"ग्रेटच आहेस." शैलाच्या तोंडावर कौतुकाचे भाव होते, "मला तर आईपासून कोणतीच गोष्ट लपवता येत नाही." "मला येते." मी टेचात म्हटलं, "आपण काय कुक्कुलं बाळ आहोत?"

नवं वर्ष, नवा वर्ग, नवा अभ्यास यांत दोन दिवस कधी भुर्रकन उडून गेले कळलंच नाही. तिसर्‍या दिवशी बाई वर्गात आल्या ते एका मुलाला सोबत घेऊन. शैला मला तिच्या वहीत चिकटवलेले इंडियन क्रिकेट टीमचे फोटो दाखवत होती, तिने बाईंना बघून गपकन वही बंद केली. नाराजीने मी डोकं वर केलं. बाईंच्या शेजारी एक उंच, हाडकुळा मुलगा भेदरलेल्या सशासारखा जीव मुठीत घेऊन उभा होता. जसं काही, आम्ही वर्गातली पोरं वाघोबाच होतो आणि एका फटक्यात त्याचा चट्टामट्टा करणार होतो.

"हा बाळकृष्ण गणपुले" सावंतबाईंनी ओळख करून दिली.
"बाळकृष्ण!" तिसर्‍या बाकावरचा अवि फिस्सकन हसला आणि त्याबरोबर सगळा वर्ग हसू लागला. सावंत बाईंचे डोळे मोठे झाले होते. "हसण्यासारखं काय आहे. गप्प बसा. नव्या विद्यार्थ्याचं स्वागत असं करतात का? सातवीतले घोडे झाले तरी अजून अकला आलेल्या नाहीत." बाई आवाज चढवून म्हणाल्या.

"बाळकृष्ण, मा..माझ्या आजोबांचं नाव होतं, मला सगळे बाळ म्हणतात," तो मुलगा रडवेलासा झाला होता. एखाद्या शिशुवर्गातल्या पोरासारखं त्याचं नाक वाहत होतं. त्याने ते शर्टाच्या बाहीला पुसलं. सावंतबाई त्याच्या पाठीवरून हात फिरवत होत्या. "असं कर, तू भिंतीकडच्या रांगेत जाऊन शेवटच्या बाकावर बस. मी मुलांना उंचीप्रमाणे बसवते आणि आज सर्वांच्या कायम जागाही ठरवायच्या आहेत. शैला, तू उठून पुढच्या बाकावर बस." बाईंनी एक एक करून जागा ठरवायला सुरूवात केली.

"आ..शैला म्हणजे हे ध्यान माझ्या बाजूला बसणार का काय?" माझ्या डोक्यावर आठ्या पडल्या "हीही! मज्जा आहे बुवा तुझी" शैला कुजबुजली. "हसतेस काय? या ध्यानाला दोन दिवसांत पळवून नाही लावलं तर विचार. बाई तरी काय? मीच दिसले वाटतं सगळ्या वर्गात. त्या कर्णिक काकू शेजारी बसवायचं होतं की, जोडी अगदी जमली असती."

"बरं बरं! दाखव तू त्याला पळवून." शैलाने दप्तर उचललं आणि वह्या, पुस्तकं गोळा केली आणि ती पुढच्या बाकावर जाऊन बसली.

बाळकृष्ण बाका शेजारी येऊन उभा होता. मी त्याच्याकडे मान वळवून पाहिलंही नाही. शेवटी तोच बिचकत बिचकत म्हणाला "ए तू सरक ना, मला बसायला जागा दे ना."

एखाद्या झुरळाकडे तुच्छतेने पहावं तसं मी त्याच्याकडे पाहिलं आणि उठून उभी राहिले. "भींतीकडे तू बसायचंस."

"मी..मी नाही बसणार भींतीजवळ. मला नाही बसायचं तिथे" केविलवाण्या आवाजात तक्रार करत त्याने आपलं वाहणारं नाक शर्टाच्या बाहीला पुसलं. बावळट कुठला!

"का रे? ही माझी जागा आहे. मी गेले दोन दिवस इथेच बसते आहे. तू भींतीच्या बाजूला बसायचंस." मी त्याला दमात म्हटलं. त्याची ती बावळटासारखी अवस्था बघून मला चेव चढला होता. नाईलाजाने तो भींतीपाशी बसला. या येड्या ध्यानाची चांगली हजेरी घेऊन कमीतकमी वेळात त्याला इथून कसं फुटवता येईल हाच विचार डोक्यात घोळत होता.

"नाव काय रे तुझं?""सांगितलं ना मघाशी वर्गासमोर," त्याला माझा अरेरावीचा स्वर आवडला नसावा पण हवं कोणाला होतं आवडून घ्यायला?"हो ना! सांगितलंस खरं, काय बरं नाव तुझं," मी त्याला वेडावत विचारलं "हं... गबाळ्या नाही का?""बाळकृष्ण गणपुले." तो हिरमुसला होऊन म्हणाला.

"तेच तर गणपुले बाळ, ग-बाळ...ग-बाळ्या...गबाळ्या. कसं चपखल नाव आहे!! आजपासून मी तुला गबाळ्या म्हणणार." गबाळ्याचा चेहरा लालेलाल झाला होता पण तो काही बोलला नाही. वाहणारं नाक त्याने पुन्हा शर्टाच्या बाहीला पुसलं. हे येडचाप ध्यान बघून मला ढवळून येत होतं. मधली सुट्टी होऊ दे याची थोडी आणखी मरम्मत करायची हे मनाशी ठरवून टाकलं होतं. मधल्या सुट्टीत संपूर्ण वर्गाला बाळकृष्णचे टोपणनाव कळले तशी पोरांनी ठेक्यावर "बाळ्या गबाळ्या" चिडवायला सुरूवात केली. गबाळ्या बिच्चारा घामाघूम झाला होता. ओक्साबोक्शी रडला असता तर आमची खैर नव्हती. मधल्या सुट्टीनंतर मोरे सरांचा गणिताचा तास होता. त्यांना हा चिडवाचिडवीचा प्रकार कळला असता तर आमची रवानगी वर्गाबाहेर होणार होती. आमच्या सुदैवाने बाळ्याने रडायला सुरुवात केली नाही.

मोरे सर चक्रवाढ व्याज उगीच वाढवून चढवून शिकवत होते. वर्गावर त्यांचं बारीक लक्ष असतं आणि बाळ्याची मधल्या सुट्टीत बरीच ताणली होती म्हणून मी त्याला थोडी विश्रांती देण्याचं ठरवलं. सर अगदी तल्लीन होऊन मुद्दल, व्याज, टक्के अशा भक्कम शब्दांचा मारा आमच्यावर करत होते. अचानक काय कोणास ठाऊक ते थांबले आणि माझ्या दिशेने रोखून बघू लागले. माझ्या? नाही माझ्या नाही, गबाळ्याच्या. गबाळ्या तोंडाचा आ वासून भिंतीकडे बघत होता. त्याच्या भित्र्या डोळ्यांत भीती मावत नव्हती.

"गबाळ्या...ए गबाळ्या" मी त्याला कोपराने ढोसलं, "सर बघताहेत. भिंतीकडे काय बघतोस? समोर बघ नाहीतर मार खाशील त्यांचा आता." गबाळ्यावर ढोसण्याचा काहीही परिणाम झाला नव्हता. तो भिंतीकडे बघत होता आणि आता त्या आ वासलेल्या तोंडातून लाळही बाहेर आलेली दिसत होती. भयंकर किळस वाटत होती या ध्यानाची. पाठीत एक धपाटा देण्याचा मोह अनावर होत होता पण ते बरं दिसलं नसतं.

"भिंतीवर काय सोनं लागलंय रे? नाव काय गं याचं?" सरांचा करडा आवाज कानावर पडला."गबाळ्या" कोणीतरी किनर्‍या आवाजात चिरकलं तशी सगळे फिदीफिदी हसू लागले.
"गणपुले" हसू आवरत मी साळसूद उत्तर दिलं.
"ए गणपुल्या! काय विचारतोय मी? भिंतीवर काय आहे?"
"प..प..पाल सर. भिंतीवर पाल आहे." छताशी एक भली दांडगी पाल चिकटली होती.
"अरे गधड्या, पाल भिंतीवरच असणार." सरांनी त्यांचे लाडके शब्द वापरायला सुरूवात केली.
"मला भीती वाटते सर. ती बघा कशी डोळे वटारून बघते आहे माझ्याकडे," गबाळ्या काकुळतीला येऊन म्हणाला.

"पाल काय खाणार आहे का तुला?" मी त्याला ऐकू जाईल अशा आवाजात कुजबुजले.
"त...तिचे डोळे बघ. लाल लाल..बाहेर आलेले...आणि ती जीभ बघ कशी लपकन बाहेर येते. मला खूप भीती वाटते."
"आणि मला तुझी किव वाटते गबाळ्या, भेकड कुठला" मी दटावणीच्या सुरात म्हटले. एवढीशी तर पाल, तिची कसली भीती; पण गबाळ्या थरथरा कापत होता. चाललेलं नाटक कमी होतं का काय म्हणून ती पाल सर्रकन जागची सरकली तसा गबाळ्या विजेचा करंट लागल्यागत उठला आणि गळा काढून रडायला लागला. मोरेसरांना दया आली असावी किंवा या घोड्याला रडताना पाहून काय करावं ते सुचलं नसावं. त्यांनी मला भींतीकडे सरकायला लावून माझ्या जागेवर गबाळ्याला बसवलं.

"ए रडू नको रे! आजच्या पुरती बसते आहे, उद्या चूपचाप भिंतीकडे बसायचं. आज पाल दिसली म्हणून घाबरतोस. उद्या झुरळ नाहीतर उंदीर दिसला म्हणून घाबरशील."
गबाळ्याने खाली डोकं घालून डोळे पुसले आणि मान हलवली.
"तुला नाही भीती वाटत पालीची? मुली तर किती भित्र्या असतात." त्याने घाबर्‍या आवाजात विचारलं.
"हो क्का! मग तू पण मुलगीच असशील." मी त्याला चिडवत म्हटलं, "मला नाही वाटत भीती कोणाची. भित्रीभागुबाई कुठचा!" गबाळ्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी तरळलं.

शाळा सुटली तशी सर्वांनी वर्गाच्या दाराकडे धावायला सुरूवात केली. राजूने दप्तराचे बक्कल बांधणार्‍या गबाळ्याच्या पाठीवर थाप मारली आणि म्हटलं, "ए ती बघ पाल येत्ये तुझ्या दिशेने."
"कुठे..कुठे?" गबाळ्या बावळटासारखा भिंती शोधायला लागला आणि त्या धांदलीत त्याचे दप्तर धपकन खाली पडलं. सगळे त्याला हसत होते आणि हे बावळट ध्यान माना वळवून भिंती शोधण्यात गुंतलं होतं.

गबाळ्याला शेजारून हलवायचं असेल तर ही युक्ती खाशी आहे...."पाल".. पण पाल मिळवायची कशी?

***
घरी गेल्यावर आईने पुढ्यात गरमागरम पोहे ठेवले. इतर वेळेस वाफाळणारे पोहे पाहिले की पोटात नुसता डोंब उसळतो पण आज मी उगीच चमच्याने पोहे चिवडत बसले होते. एकच विचार डोक्यात पिंगा घालत होता... 'पाल मिळवायची कशी?'

"अगं काय विचारते आहे? लक्ष कुठे आहे? बाजारात येतेस का? सामान उचलायला मदत हवी आहे." आई वैतागून विचारत होती.

"अं..हम्म, येते." तसंही करण्यासारखं दुसरं फारसं काही नव्हतं. बाजार तर बाजार. या आयांना पन्नास भाज्या बघून भाव करून घेण्याची काय गरज असते कोण जाणे बा! त्या भाज्या खायला मी आणि बाबा नेहमी कुरकुरत असतो पण हीचं आपलं मेथी, मुळा, माठ चाललेलं असतं... माठ! गबाळ्या काही आज डोक्यातून हलायला तयार नव्हता. त्याची जागा बदललायलाच हवी. शेवटी, आपली पण काही वट आहे...शैलाला शब्द दिला आहे...दोन दिवस पण तेवढंही थांबता कामा नये!

आईने भाजीच्या पिशव्या हातात कोंबल्या आणि आमची स्वारी घराच्या दिशेने जाऊ लागली. रस्त्यावरच्या फेरीवाल्यांकडे काही घ्यायचं नाही अशी आईची सक्त ताकीद असते पण त्यांच्या टोपल्यांत डोकावून बघायचं नाही असं थोडंच आहे. बांगड्या, चपला, पाकिटं काहीही विकत असतात हे पथारी पसरून. एका टोपलीपाशी मी जरा जास्तच रेंगाळले तशी आईने हाक दिली, "अगं चल ना, मागे काय राहिलीस?"

"ए आई, इथे ये ना. मला ती पाल हवी." रस्त्यावर एक फेरीवाला रबरी पाली, सरडे, साप, विंचू विकायला बसला होता.
"ईईईई! पाल कशाला हवी? काहीतरी भलतंच... चल चूपचाप."
"अगं साठ्येबाईंनी मागितली होती. विज्ञानाच्या तासाला." साठ्येबाईंचं नाव काढलं का आई पुढचं काही विचारत नाही हे माहित होतं. तिने भाव करून पैसे दिले आणि मी रबरी पाल हातात गच्च धरली.

दुसर्‍या दिवशी गबाळ्या भिंतीकडे बसायला कां कू करत होता पण मी ऐकूनच घेतलं नाही तसा गपगुमान बसला. संपूर्ण दिवस दप्तराचा एक बंध त्याने हातात घट्ट पकडला होता. जसं काय पाल दिसली की हा दप्तर घेऊन तिथून धूम ठोकणार होता. ती रबरी पाल मी माझ्या पिनोफ्रॉकच्या खिशात टाकली होती. संधी मिळेल तशी ती गबाळ्याच्या अंगावर टाकायची होती पण संधी काही मिळत नव्हती.
साठ्येबाईंचे दोन सलग तास होते. त्यावेळेला काही गडबड झालेली त्यांच्या लक्षात आली असती तर माझी खैर नव्हती. नंतरचे दोन तास पीटीचे होते. त्यावेळी सगळे मुलगे गबाळ्याला चिडवत होतेच आणि तो हिरमुसला होऊन दूर एकटाच उभा होता. तेव्हा काही केलं असतं तर सगळ्यांच्या नजरेत आलं असतं. दिवसभर शोधूनही संधी सापडली नाही. तरी मी त्याला अध्ये-मध्ये कानपिचक्या दिल्या होत्या, 'सांभाळून रहा हो, शाळेत भल्या मोठ्या पाली फिरत असतात,' पण गबाळ्याला माझ्याशी बोलायचं नव्हतं. तो मान फिरवून गप्प बसला.

शाळा सुटली तशी वर्गाच्या दाराशी सर्वांनी एकच गल्ला केला. इतर वर्गांतूनही मुलं मुख्य दाराकडे पळत होती. गबाळ्या आपलं दप्तर सांभाळत, आपला अर्धवट बाहेर आलेला शर्ट आत खोचत डोकं खाली घालून चालला होता. हीच संधी होती. मी खिशातून पाल बाहेर काढली. गबाळ्या धक्के खात शाळेच्या मुख्य दरवाजाशी चालला होता. मी पुढे सरून चटकन पाल त्याच्या दप्तरावर कधी टाकली ते कोणाच्या लक्षातच आले नाही. जो तो आपापल्या गडबडीत होता पण कोणीतरी चित्कारले "ईईई! पा‍ल, गबाळ्याच्या पाठीवर पाल!" क्षणार्धात सर्वजण गबाळ्यापासून दूर सरकले. "कुठे कुठे?" गबाळ्या कावराबावरा होऊन तोंडातल्या तोंडात पुटपुटला.

"तुझ्या पाठीवर...ईईई... तिची शेपटी बघ कशी वळवत्ये" कोणीतरी किंचाळलं आणि काय झालं कळण्यापूर्वी गबाळ्या अंगात वारं भरल्यागत सुसाट शाळेच्या दरवाजातून बाहेर धावला. आपल्या आजूबाजूला मुलं आहेत, शिक्षक आहेत याचा त्याला विसर पडला असावा. वाटेत येणार्‍या-जाणार्‍यांना धडक देऊन अंगात वारं भरल्यागत तो रस्त्यापर्यंत कधी पोहोचला ते कोणाला कळलंच नाही आणि समोरून वेगात ट्रक येत होता हे गबाळ्याला कळलं नाही.

***

पुढचे दोन दिवस शाळेला सुट्टी होती. पंचनामा, साक्षी, पोलीसी कार्यवाही या दिवसांत उरकून टाकण्यात आले. खरं सांगायचं तर माझं धाबं दणाणलं होतं. 'ती पाल कोणाला सापडली तर? कोणी मला ती पाल गबाळ्याच्या पाठीवर टाकताना पाहिलं असलं तर?' दोन दिवस मला धड अन्नपाणी गेलं नव्हतं. दाराची घंटी वाजली की कापरं भरल्यागत वाटत होतं. आई-बाबा बोलताना शाळेबद्दल बोलत असावेत काय असं वाटून कान टवकारले जात होते. पण काहीच घडलं नाही. माझी अस्वस्थता आईला जाणवत होती. रात्री तिने जवळ घेऊन सांगितलं की 'विचार करू नकोस. जे झालं ते विसरायचा प्रयत्न कर. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. देवाची कृपा!' तिला काहीच कल्पना नव्हती. माझ्या वर्गातल्या कोण्या एका मुलाचा अपघाती मृत्यू झाला असंच तिला वाटत होतं.

दोन दिवसांनी मी दबकतच वर्गात शिरले. शाळेत काय होईल या भीतीने छाती धडधडत होती. सावंत बाई वर्गाच्या दाराशीच उभ्या होत्या. मला पाहून त्यांनी मला पोटाशी धरलं आणि स्वत:शीच बोलल्यागत म्हणाल्या, "तुला धक्का बसला असेल गं बाळा. बाजूला बसायचा बाळकृष्ण तुझ्या. असा पालीला घाबरून जिवाची पर्वा न करता रस्त्यावर धाव घेईल असं कसं कोणाला वाटावं? गरीब होता बिचारा, नशीब त्याचं. तू मनाला लावून घेऊ नकोस हो. धीराने घे." त्यांच्या डोळ्यांत पाणी तरारलं होतं. मी माझे डोळे गपकन बंद केले. गबाळ्याला असं मरण यावं याबद्दल गेले दोन दिवस थोडं वाईट वाटलं होतं. मी त्याचं काही बरं-वाईट व्हावं म्हणून पाल टाकली नव्हती. बाई म्हणाल्या ते खरंच 'ते त्याचं नशीब.' माझं नशीब मात्र चांगलं बलवत्तर होतं. कोणाला काही कळलं नव्हतं, जाणवलं नव्हतं! मी गबाळ्याच्या पाठीवर ती पाल टाकली हे कोणाला दिसलंच नव्हतं. ती पालही गर्दीत कुठे गेली ते कोणाला कळलं नसावं. मला हायसं वाटलं. दोन दिवस डोक्यात विचारांची गर्दी झाली होती ती पांगल्यासारखी वाटली. दोन दिवसांत पहिल्यांदा मोकळा श्वास घेतला. सारं कसं शांत शांत होतं. गबाळ्यापासून सुटका झाली होती. आता कोणतीही टोचणी नव्हती. बाईंनी माझ्या डोक्यावरून हलकेच हात फिरवला.

"जा! आज तुझ्याबाजूला शैला बसेल. तुम्ही दोघी चांगल्या मैत्रिणी आहात. तुला बरं वाटेल तेवढंच." मी गबाळ्याच्या शेजारी बसत होते म्हणून मला धक्का-बिक्का बसला असावा असं बाईंना वाटलं असावं. माझ्या चेहर्‍यावर उमटणारी स्मितरेषा मी दाबून धरली. आज सगळं शांत आहे. इतक्यात नको, हे आवडतं बुद्धासारखं स्मितही नको. सर्वांना वाटत असेल की मला धक्का बसला आहे तर तसंच असू दे, पथ्यावर पडलं.

सावंतबाईंचा तास संपला तशी शैला मला म्हणाली, "वाईट झालं नै. बाळचं असं काही व्हायला नको होतं."
मी थोडीशी चुळबूळ केली आणि "हं" म्हणून गप्प बसले.
"तुला नाही वाईट वाटलं?"
"वाईट काय वाटायचं? रोज हजारो लोक अपघातात मरतात. सर्वांचं वाईट वाटून घ्यायचं का?" मी तुसडेपणाने उत्तर दिलं. गबाळ्याचा विषय मला नको होता. माझ्यासाठी गबाळ्या आणि त्याचा विषय दोन्ही संपले होते आणि माझ्या मनातली भीतीही संपली होती. बिचकत, दचकत, टरकत राहायला मी काय गबाळ्या थोडीच होते? सर्वकाही ठीक होणार होतं, दोनचार दिवसांत वातावरण निवळणार होतं.

साठ्येबाईंचा तास सुरु झाला. साठ्येबाईंच्या तासाला वर्गात तशीही शांतताच असे. आज तर अगदी सुतकी वातावरण होतं. सगळी पोरं कशी निमूट पुस्तकांत माना घालून बसली होती. साठ्येबाईही आज कधी नव्हे ते नरमाईने बोलत होत्या. माझं लक्ष सहजच भिंतीकडे गेलं....

शैला मला ढोसत होती, "काय झालं? आ वासून काय बघते आहेस खुळ्यासारखी? अगं तोंड बंद कर. किती बावळट दिसते आहेस...बाई बघतील." तिचा आवाज माझ्या कानाशी रेंगाळून परत जात होता. "बाई! ही बघा कसं करत्ये. इथे या ना बाई," शैला मला गदागदा हलवत होती. माझे डोळे भिंतीवर खिळले होते, त्यांत भीती मावत नव्हती. तिच्या हलवण्याचा, ओरडण्याचा माझ्यावर कसलाही परिणाम होत नव्हता. माझ्या सर्वांगाला कापरं भरलं होतं. अंग घामाने निथळत होतं.

भिंतीच्या छताला गबाळ्या पालीसारखा चिकटला होता. त्याचे ते बटबटीत डोळे माझ्यावर रोखलेले होते आणि जीभ मध्येच लपकन माझ्या दिशेने बाहेर येत होती.

****

14 comments:

HAREKRISHNAJI said...

My god.

Monsieur K said...

incredible!!
it turned so horrific (aint sure if thts the correct word) towards the end... angaavar kaaTaa aalaa.. especially with the last line...
u built it up really well.. characterization.. sanvaad... plot.. saglach ekdam mast!!

Priyabhashini said...

Thanks again!

The narrator of this story is a 12 years old kid. So the dialogues, characterization, situation are very simple but story twists in last few paragraphs and turns horrific.

Satish said...

mast..
mala avadtata asha goshti..'Gudh katha'

Anonymous said...

Khoop chan lihilay! maja ali!

Priyabhashini said...

Thank you so much Satish and Nivedita.

Unknown said...

ekdum sahi...

last turn tar sahich hota...

story telling style is really fantstic.

Keep writing

Mahesh

Unknown said...

आयला एवढ सही लिहल आहे. वाचतांना अंगावर काटा आला.

नीरजा पटवर्धन said...

wow!

HAREKRISHNAJI said...

लिहीण्याचे आता परत कधी मनात येणार ?

Priyabhashini said...

प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून धन्यवाद.

हरेकृष्णजी, आवर्जून चौकशी केल्याबद्दल डबल धन्यवाद. :-) वेळ होत नाही हल्ली. बरीच बिझी असते. काही लेख येत आहेत दिवाळीत. तेव्हा टाकेनच.

cutehobit said...

प्रिय ब्लोगर ,
तुझा मराठी ब्लोग वाचुन खुप छान वाटलं..
खुप उत्तम प्रतीच लिखण तु तुझ्या ब्लोग मध्ये केलं आहेस..
परंतू हे लिखाण जस्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचविणही महत्वाच आहे..
त्याबद्दल मी थोड माझ्या ब्लोग मध्ये लिहिल आहे..
त्याची तुला नक्कीच मदत होइल..
चल..पुन्हा भेटुच ब्लोग मधून..
मझ्या ब्लोग वर नक्की ये..
http://pune-marathi-blog.blogspot.com/

विचारमंथन said...

अप्रतिम रंगवलय तुम्ही कथानक

विचारमंथन said...

मस्त लिहलीय कथा

marathi blogs