प्रकार

Sunday, May 13, 2007

वाटणी

मदर्स डे स्पेशल!


“काय रे काही हवयं का?” स्वयंपाकघराच्या भिंतीला टेकून उभ्या असलेल्या अक्षयला मी विचारले तशी त्याने नकारार्थी मान हलवली. “मग इथे का? जाऊन खेळ की. भांडलात तर नाही ना दोघे?”

अक्षय माझ्या मैत्रिणीचा मुलगा. वय ७ वर्षे, माझ्या मुलीपेक्षा दीड वर्षांनी लहान. दोघे इतकी वर्षे एकुलते एक असल्याने एकमेकांशी त्यांचं बरं जमतं. आठवड्याभरापूर्वी अक्षयला नवा भाऊ झाल्याने म्हणजे घरात नवे बाळ आल्याने त्याला आज येथे खेळायला बोलावले होते. तेवढीच त्याच्या आईला विश्रांती म्हणून.

“काय रे भांडलात तर नाही ना दोघे? काय विचारत्ये मी?” पुन्हा त्याने मान हलवली.
“ती टीव्हीवर तिची सिरिअल पाहते आहे, मुलींची कुठलीतरी. मला नाही बघायची.”
“बरं मग तुला गेमबॉय देऊ का तिचा? किंवा दुसर्‍या टीव्हीवर गेमक्युब देऊ का लावून?”
“नको मावशी.”
“मग रे? मी काम करते, तू माझ्याशी गप्पा मार.” आता याला रमवावं तरी कसं या विचारांत मी काहीतरी बोलून गेले.
“तुझ्या शाळेतल्या गोष्टी सांगतोस?” शाळेतल्या गोष्टी सांगणे हा आमच्या कन्यकेचा आवडता विषय असला तरी मुलांना हा विषय प्रिय असावा की नाही याबाबत मी जरा साशंकच होते.
“मावशी, आता ते बाळ घरात आलं ना आता आई त्याच्यावर जास्त प्रेम करेल का गं?” अक्षय टपोर्‍या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत म्हणाला.

“नाही रे असं काही नसतं! ती तुम्हा दोघांवरही सारखंच प्रेम करेल.” हा इथे तिष्ठत का उभा होता त्याचा अंदाज मला येऊ लागला होता. त्याचा प्रश्न बहुधा कालातीत प्रश्न असावा. डोळ्यासमोरून काळ सर्रकन तीस एक वर्षे मागे सरकला.

मला भाऊ झाला तो दिवस होता दिवाळीचा आणि मी पाच वर्षांची होते. म्हटलं तर बरंच काही कळण्यासारखं आणि म्हटलं तर काहीच न उमगण्यासारखं वय. आईच्या माहेरी डॉक्टरच डॉक्टर, ती होतीही मामाच्याच नर्सिंग होममध्ये म्हणजे घरातच तशी. नवं बाळ आलंय या खुशीत मी दिवसभर हुंदडत होते. मामेभावंडं, मामी, हॉस्पिटलाचा स्टाफ, बाकीचे पेशंट सर्वांना नवं बाळ आल्याची वर्दीही देऊन टाकली होती. मध्येच डोळे किलकिले करून एक हलकीशी जांभई देऊन पुन्हा गाई गाई करणारे कपड्यात करकचून बांधलेले बाळ आवडण्याचे कोणतेही सयुक्तिक कारण नसतानाही मनापासून आवडले होते. 'त्याला थोडावेळ मांडीवर घेऊ?' असा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारल्याने आईने ते दोन चार मिनिटे मांडीवर टेकवलेही होते. कधीतरी मध्येच मामाने येऊन दम भरल्याने दिवसभरात काहीतरी खाऊनही घेतले होते. दिवाळी असल्याने बाकीही मज्जाच मज्जा सुरू होती. या सगळ्या वातावरणात रात्र कधी झाली ते कळलेच नाही.

रात्र झाली तशी माझ्या मामेभावाने हळूच पिल्लू सोडले, “आज रात्री तुझी आई बाळाला जवळ घेऊन झोपणार. तुला नाही!”

खरंतर आईचे दिवस भरल्याने मी गेले कित्येक दिवस मामेबहिणी शेजारी झोपत होते पण दादाच्या चिडवण्याने अपेक्षित परिणाम साधला होता. 'असूया' काय असते हे त्या दिवशी कळले. मनात अनेक प्रश्न आले. आई खरंच दिवसभर बाळाला जवळ ठेवून त्याच्या शेजारी झोपली होती. बाळाला बघायला किती लोक आले होते आणि किती कौतुक करत होते. बाबाही येऊन येऊन त्याच्याकडे टक लावून पाहत होते. या सर्वात मी कोठे आहे याची कोणालाच चिंता नव्हती की काय?

मी धावत धावत जीना उतरून हॉस्पिटलमध्ये गेले. आई थकून झोपली होती. तिला गदगदा हालवले आणि सांगितले, “त्या बाळाला पाळण्यात ठेव. मला इथे झोपायचं आहे तुझ्या बाजूला.”

“आज नको, आज मला बरं नाही. इथून घरी गेलो की झोप माझ्या बाजूला.” आई थकलेल्या आवाजात म्हणाली.
“नाही आजच. तू दिवसभरात मला जवळही घेतलं नाहीस. झोपायला तरी घे ना जवळ.” म्हणून मी भोकांड पसरले.


आईने शांतपणे बाळाला पाळण्यात ठेवले आणि मला कुशीत घेतले. रात्री मामीची फेरी झाली तशी तिने आईला थोडासा दम भरला. मी चुकून पोटात लाथ वगैरे मारली झोपेत तर? त्यापेक्षा झोपली की तिला कोणीतरी उचलून वर घेऊन जाईल असे सुचवले पण आईने नकार दिला. झोपू दे, तिच्याकडे दिवसभरात खरंच दुर्लक्ष झाले असावे म्हणाली. त्या रात्री मी आईशेजारीच झोपले. सकाळी उठल्यावर राग, दु:ख पळाले होते.

“मावशी, सांग ना! अम्मा सारखं प्रेम कसं करेल आता ते शेअर होईल ना?” अक्षयच्या प्रश्नाने माझ्या मनातील शृंखलेला खीळ पडली.

“नाही आईचं प्रेम शेअर नाही होत. नवीन बाळ आलं आता तिचं प्रेम डबल होईल.”
“असं कसं?”
“त्याचं असं की आता नवीन बाळाचे लाड झाले की तुझेही होतील. त्याला खेळणी-कपडे मिळाले की तुलाही मिळतील. बाळ मोठं झालं की तुम्हा दोघांच्याही आवडीचे पदार्थ, गोष्टी, खेळणी घरात येतील. घरात दोन दोन वाढदिवस साजरे होतील म्हणजे डबल मजा. ते थोडं लहान आहे, त्याला अद्याप काही करता येत नाही त्यामुळे कदाचित आई त्याच्याकडे जास्त लक्ष देते असे वाटेल तुला पण आईचं प्रेम शेअर होत नाही काही. ते वाढतं, आधी ते तुझ्या एकट्यासाठी होतं. आता ते दोघांसाठी झालं म्हणजे वाढलं, डबल झालं. हो की नाही?”

“हम्म! हो मावशी खरंय तुझं, मला गेमबॉय देतेस?” अक्षय खुदकन हसला तसं मलाही बरं वाटलं. लहान मुलांची समजूत काढणं खूप सोपं असतं हे पुन्हा जाणवलं.

----

8 comments:

Abhijit Bathe said...

Good one!

कोहम said...

good view point....double prem, double fun....

Anand Sarolkar said...

A sweet sweet post:)

Rajendra Kshirsagar said...

छान स्फुट आहे. मी घरात सर्वात लहान असल्यामुळे प्रत्यक्ष अनुभव नाही, पण बर्‍याचदा पाहिले आहे.

मागच्याच आठवड्यात एका सहकार्‍याला दुसरा मुलगा झाला. त्याच्याशी बोलताना तो म्हणाला की बाकी सर्व गोष्टींपेक्षा मोठ्याला समजेल की नाही याची काळजी जास्त आहे.

Monsieur K said...

nice one!
me n my younger bro always keep telling my mom tht she loves the other one more, knowing very well at the back of our mind tht she loves us equally :)

Yogesh said...

khara ahe.

HAREKRISHNAJI said...

किती साध्या सोप्या भाषेत आपण एका महान समस्येची उकल केली आहेत. नेहमीच मोठ्या माणसांना आपण लहान मुलांशी कसे वागवे कळतच नाही, त्यांच्या मनात ते वाटेल ते भरवुन देतात, मग ती बिथरतात, याचे परीणाम फार दुरगामी असतात, वेळीच त्यांना सांभाळुन घ्यावे लागते, अगदी आपल्या कथे प्रमाणे. ची तयारी खर तर पालकांनी आधी पासुनच सुरु केली पाहीजे.

Priyabhashini said...

सर्वांचे धन्यवाद. मुलांना खरेच असे प्रश्न पडतात आणि त्यावर ती फार खोलात जाऊन विचारही करतात. अशावेळी मोठ्यांनी त्यांच्या विचारांची दिशा बदलणे योग्य ठरते.

पुन्हा एकदा धन्यवाद.

marathi blogs