धुकं, जमिनीला टेकणारा ढग.... सृष्टीतील एक अद्भुत प्रकार. या धुक्याचा उपयोग भय वाढवण्यासाठी बरेचदा केला जातो. रानात रस्ता चुकलेला वाटसरू आणि त्याच्या सभोवती त्याला आणि झाडा-झुडपांना वेढून टाकणारे धुकं, त्या धुक्यातून त्याचा
होणारा पाठलाग. भयपटांतून दाखवलेली झपाटलेली हवेली नेहमीच धुक्याने वेढलेली असते. एखादा ड्रॅक्युलापट पाहिला असेल तर रात्रीच्या वेळी वेडीवाकडी वळणे घेत टेकडीच्या दिशेने जाणारी बग्गी आणि त्या टेकडीच्या माथ्यावर धुक्यात लपाछपी खेळणारा ड्रॅक्युलाचा वाडा नक्कीच आठवत असेल.
धुकं डोंगरावर, जमिनीवर, पाण्यावर कोठेही अचानक जन्म घेतं. भर समुद्रातही धुकं निर्माण होतं. या धुक्यातून एखादे भुताळी जहाज तुमच्यासमोर येऊन उभे ठाकले तर? स्वत: समुद्र ही काही कमी गूढ नाही. समुद्र हा अद्यापही मानवाच्या संपूर्ण ताब्यात न आलेला भाग, आजही अज्ञात, रहस्यमय आणि गूढ समजला जाणारा. कधी शांत, कधी खवळलेला, कधी वादळांत सापडलेला तर कधी भयंकर लाटा निर्माण करून बेटंच्या बेटं गिळून टाकणार्या समुद्र, त्यातील अगणित जीव आणि त्यावर स्वार झालेल्या जहाजांविषयी अनेक खऱ्याखोट्या अद्भुत कथा ऐकायला मिळतात. समुद्रावर खलाशांमध्ये अनेक आख्यायिका, अंधश्रद्धा असल्याचे सांगितले जाते.त्यातलीच एक सुप्रसिद्ध आख्यायिका आहे फ्लाइंग डचमॅनची.
फार लहानपणी ही गोष्ट कोणीतरी सांगितल्याचे आठवते. कालांतराने रिचर्ड वायनरच्या पुस्तकावर आधारित बाळ भागवतांचे पुस्तकही वाचले होते परंतु आता ही फ्लाइंग डचमॅनची आख्यायिका आठवण्याचे कारण म्हणजे पायरेट्स ऑफ द कॅरिबियन हा चित्रपट. डेव्ही जोन्स नावाचा कप्तान साक्षात सैतानाशी जुगार खेळतो आणि त्यात हरल्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याचे जहाज खलाशांसह जगाच्या अंतापर्यंत समुद्रात भरकटत राहते. एकाकी समुद्रात अचानक धुक्याच्या पडद्यामागून किंवा उंच उचंबळलेल्या लाटेतून प्रगट होणार्या या जहाजाच्या जवळपास जाणे म्हणजे मृत्यूलाच आमंत्रण देणे.
फ्लाइंग डचमॅनच्या तशा अनेक आख्यायिका युरोपात प्रसिद्ध आहेत. या जहाजावर अनेक कथा, नाटकेही लिहीली गेली आहेत. त्यापैकी एखाद्या गोष्टीत फ्लाइंग डचमॅन हे जहाजाचे नाव आहे तर दुसर्या एखाद्या आख्यायिकेत ते जहाजाच्या कप्तानाचे नाव आहे. काही आख्यायिकांत हे जहाज जगातील सर्व समुद्रात कोठे ना कोठे दिसले असे सांगितले जाते तर बहुतांश आख्यायिका केप ऑफ गुड होपला फ्लाइंग डचमॅनचे प्रमुख स्थान मानतात. या सर्व आख्यायिकांपैकी खालील दोन आख्यायिका सर्वात प्रसिद्ध आहेत.
पहिल्या आख्यायिकेचे मूळ एका डच जहाजाशी संबंधित आहे असे म्हटले जाते. सतराव्या शतकात कॅ. बर्नार्ड फोक्के हा डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजावर कप्तान होता. त्याचे जहाज जावा ते हॉलंड असा प्रवास करत असे. या प्रवासासाठी इतर जहाजांना ८ महिने लागत परंतु फोक्के हा प्रवास केवळ ३ महिन्यांत आटोपत असे. यावरून लोकांत वावडी पसरली की बर्नार्ड फोक्केने साक्षात सैतानाशी करार केला आहे आणि त्यामुळेच तो हा प्रवास इतक्या जलद करायचा, असे म्हटले जाते. पुढे अर्थातच या कृत्याचे प्रायश्चित्त म्हणून त्याला मृत्यूनंतरही जहाजासकट समुद्रात भरकटत राहावे लागले.
दुसर्या एका आख्यायिकेनुसार या जहाजाचा कप्तान हेंड्रिक वॅन्डरडेकन होता. १६८० च्या सुमारास तो डच ईस्ट इंडिया कंपनीच्या जहाजाची ऍमस्टरडॅम ते जावा अशी वाहतूक करत असे. केप ऑफ गुड होप जवळ एकदा त्याच्या जहाजाला प्रचंड वादळाचा तडाखा बसला. यावर संतापून वॅन्डरडेकन जहाजाच्या डेकवर उभा राहिला आणि त्याने निसर्गाला यथेच्छ शिव्या घातल्या आणि इतरांनी दिलेले सल्ले धुडकावून त्या वादळात आपले जहाज घातले. परिणामी जहाज कलंडून सर्वांचा मृत्यू झाला. यामुळेच हे जहाज समुद्रात आजही भरकटत असते.
या दोन्ही आख्यायिकांत फ्लाइंग डचमॅन हे कप्तानाला उद्देशून म्हटले आहे. जहाजाला नाही. अशा अनेक आख्यायिकांचा शेवट मात्र सारखाच आहे की या जहाजाला आणि त्याच्या कर्मचारीवर्गाला अनंतापर्यंत समुद्रात भरकटत राहण्याचा शाप मिळाला आहे.
या जहाजाच्या केवळ दर्शनाने संकटे ओढवतात असे म्हटले जाते. १९व्या आणि विसाव्या शतकात अनेकांनी या जहाजाचे दर्शन झाले असल्याचे म्हटले आहे. यांतील सर्वात प्रमुख किस्सा इंग्लंडचा राजा पाचव्या जॉर्जचा येतो. पहाटे चारच्या सुमारास तांबड्या प्रकाशात न्हाऊन निघालेले हे जहाज त्यांना ऑस्ट्रेलियाजवळच्या समुद्रात दिसले असे सांगितले जाते. १९४२ सालीही या जहाजाने दर्शन दिल्याचे किस्से ऐकवले जातात.
फ्लाइंग डचमॅनही आख्यायिका आहे की सत्यकथा कोणास ठाऊक? पायरेट्स ऑफ द कॅरेबियन या चित्रपटात डेव्ही जोन्स आणि त्याच्या खलाशांचे मानवी जीवन नाहीसे होऊन समुद्र जीवांचे गुणधर्म त्यांच्यात उतरलेले दाखवले आहेत. हे जहाज पाण्यातून उसळी मारून वर येतानाही दाखवले आहे. खरे खोटे कसेही असो. पायरेट्सचा तिसरा भाग बघायची उत्सुकता फ्लाइंग डचमॅनमुळे जितकी आहे त्याच्या दसपट कॅप्टन जॅक स्पॅरोमुळे आहे.
सर्व संदर्भ आणि चित्र विकिपीडियावरून.