प्रकार

Monday, March 12, 2007

सवयींचे गुलाम

हल्लीच एक गोष्ट लिहायला घेतली असताना त्यातील पात्राच्या तोंडी 'मला तिची सवय झाली होती.' असे वाक्य टाकायचे होते. सहज मनात विचार आला की "सवय" या शब्दाची व्याख्या कशी करता येईल? मला वाटतं त्यानुसार, एखाद्या सुखावणार्‍या, उत्तेजीत करणार्‍या किंवा दुखावणार्‍या, बोचणार्‍या, सलणार्‍या गोष्टीबद्दल आपली प्रतिक्रिया थंडावते त्यावेळेस आपण आपल्याला त्या गोष्टीची सवय पडली असे म्हणतो. याचबरोबर एखाद्या बोचणार्‍या, डसणार्‍या, सलणार्‍या गोष्टींविरूद्ध मनाने शोधलेला विरोधाचा मार्ग म्हणजे सवय लागणे.

आपल्या समजूतीनुसार आपण एखादी सवय चांगली किंवा वाईट ठरवत असतो उदा. मला बाहेर जाताना परफ्यूम फवारण्याची सवय आहे आणि मला ती आवडते. बाहेर जाताना हात आपसूक परफ्यूमच्या कुपीकडे वळतात, अर्थातच माझ्यामते ती चांगली सवय आहे. माझ्या लेकीच्या मते, "मम्मा! वॉलमार्टात जायला परफ्यूम कशाला लागतो? कसली ही सवय?" तिला माझी सवय नेहमीच आवडते असे नाही. म्हणजे आपल्याला चांगल्या वाटणार्‍या सवयी दुसर्‍याला चांगल्या वाटतीलच असा नेम नसतो. सवयीचेही एक गणित आहे. सवय लागणे हे ती सवय घालवण्याच्या मानाने फार सोपे असते.

सवयीचेही वेगवेगळे प्रकार असतात की काय याचा थोडासा विचार करत असता एका मित्राने बोलताना मला सुचवले की 'बघ! सवयीने स्वयंपाक चांगलाही होऊ शकतो.' मला सवयीचा पहिला प्रकार मिळाला. 'अंगवळणी पडणे', एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने त्यातील खाचाखोचा कळून आपल्यात सुधारणा करणे किंवा तशी सफाई कळत-नकळत येत जाणे. हा सवयीचा प्रकार माणसाला अचूकतेच्या जवळ नेतो म्हणून चांगला म्हणावा लागेल तर कधीतरी तो माणसाला यांत्रिकही बनवू शकतो, एकच गोष्ट पुन्हा पुन्हा केल्याने त्यातील नाविन्य, आवड संपून, ती गोष्ट कोणतेही नवे बदल टाळून उरकूनही टाकली जाते. दुसरा प्रकार मिळाला तो म्हणजे लकब; हा शब्दही सवयीशी मेळ खातो. एखाद्या अभिनेत्याची लकब जशी देव आनंदच्या हाता, खांद्यातील त्राण निघून गेल्यागत हालचाली. लकब हा शब्द सहसा एखाद्या वाईट सवयीसाठी वापरला जातो. जसे केसांवरून सतत हात फिरवण्याची सवय, नाक उडवायची सवय. सवयीचा तिसरा आणि बरीचशी नकारात्मक बाजू दाखवणारा शब्द म्हणजे चटक आणि चाळा. हे दोन्ही शब्द नकारात्मकता दाखवतात.

सवयीचा सर्वात नकारात्मक आणि धोकादायक प्रकार असावा व्यसन; मध्यंतरी मुक्तांगणावरील 'आहे हे असं आहे' या अनुदिनीवरील काही वाचनीय लेख, पुण्यातील रेव पार्टी, सिनेकलावंतांची अनेक प्रकरणे हे सर्व वाचनात आले तेव्हाही सवयीवर काही लिहावेसे वाटले होते. चांगल्या सवयी अंगी बाणवण्यास माणसाला वेळ लागतो परंतु वाईट सवयी लवकर लावून घेता येतात यावरून सवयीची वर केलेली व्याख्या बरोबर असावी असे वाटते. धूम्रपान, मद्यपान, मादक पदार्थांचे सेवन यांच्या आहारी मनुष्य फार चटकन जातो परंतु या सवयी सोडायला मात्र बराच काळ लागतो किंवा इतरांची मदत लागते. इतके करूनही जर मनावर ताबा नसेल तर ही व्यसने पुन्हा पदरी पडण्याची शक्यता बळावते.

वर उल्लेखल्याप्रमाणे माझ्या या गोष्टीतील नायकाला ज्या स्त्रीची सवय झाली होती, ती त्याला सोडून गेल्याने तो खोलवर कोठेतरी दु:खी आहे. माणसांची सवय व्यसनांप्रमाणेच घातक असते. एखादी रोज दिसणारी, रोज भेटणारी, घरातील व्यक्ती किंवा मित्र-मैत्रिण यांच्या वियोगाने माणसाच्या आयुष्यात जी पोकळी निर्माण होते ती भरून काढण्यासाठी वेडापिसा झालेला जीव कोणतीतरी दुसरी घातक सवय स्वत:ला लावून घेण्याची शक्यता अधिक असते.

या सर्वावर काही उपाय असावा का हा मनातील पुढचा विचार. प्रत्येक मनुष्य येन केन प्रकारेण सवयींचा गुलाम असतो. सवय कधीतरी सोडून जाण्यापेक्षा माणसालाच स्वत:बरोबर फरफटत घेऊन जाते अशा सवयींपासून कालांतराने फारकत घेणे कधीही फायद्याचे असते.मनाचा निग्रहच या सवयी सोडण्यासाठी कारणीभूत ठरतो. माणसांची सवय विसरणे थोडेसे कठिण असले तरी काळासारखे उत्तम औषध नाही हेच खरे. तो काळ जाऊ देणे आणि मनाला एखाद्या चांगल्या सवयीत गुंतवणे कधीही उत्तम.

मध्यंतरी एका व्यक्तीने माझ्या अनुदिनीवरील 'आयुष्य आयुष्य खरंच सोपं असतं, आपणच त्याला कठीण करून ठेवतो, स्वत:साठी आणि इतरांसाठी.' हे वाक्य उचलण्याची परवानगी मागितली होती. असाच मनात आलेला एक विचार म्हणून ते वाक्य मी अगदी सहज तेथे टाकले होते पण ते कोणाला तरी समर्पक वाटेल असे वाटले नव्हते. सवयींच्या संदर्भातही हे वाक्य चपखल बसू शकते. कधीतरी इतरांना आणि स्वत:लाच जाचक ठरणार्‍या सवयी आपण लावून घेतो आणि त्याचा त्रासच आपण स्वत:ला आणि इतरांना करून घेत असतो, अशा जाचक सवयींतून मुक्त होणे अवघड असेल परंतु त्या मुक्ततेत एक वेगळाच आनंद असावा.

10 comments:

Raj said...

सुरेख लेख. आवडला.
आणि वाचताना गुलजारच्या ह्या ओळी आठवल्या.
काय गंमत आहे बघ. त्या दिवशी आपण चर्चा
करत होतो, तेव्हा नाही आठवल्या. आपल्या मेंदूमधली कनेक्शन्स फार मजेदार असतात. :-)

सांस लेना भी कैसी आदत है
जिये जाना भी क्या रवायत है
...
कितने बरसों से, कितनी सदियों से
जिये जाते है, जिये जाते है
आदतें भी अजीब होती है

रवायत - बहुधा ritual पण नक्की बघायला हवे.

मला वाटते सवयीला विरोधाचा मार्ग म्हणण्यापेक्षा defense mechanism म्हटले तर? कारण मन नेहेमी पळवाटा शोधण्यात वाकबगार असते.
चांगल्या सवयी लागायला वेळ लागतो कारण मन नेहेमी instant gratification
च्या मागे असते. मुक्तांगणवरचा लेख छान आहे. ह्या वेळेस पुण्याला गेल्यावर जायला हवे.

Yogesh said...

We love our habits more than our money, even more than our life.
असं Bertrand Russell चं कधीतरी वाचलेलं एक वाक्य आठवलं.. :)

Anonymous said...

प्रियंभाषिणी,

लेख फारच सुंदर आणि ओघवता आहे. सवयीबद्दल असेही म्हणता येईल की सवय ही एका दृष्टीने पाहता मनाची गरज असते. मन हे एखाद्या सतत तेल घालाव्या लागणा-या समईप्रमाणे आहे. त्यात चांगल्या सवयीचे तेल सतत घालावे लागते. बाकी, चर्चेसाठी हा विषय जोरदार आहे, :)

Priyabhashini said...

धन्यवाद, राज, योगेश आणि शैलेश.

defense mechanism is the right phrase. Unfortunately, I do not recall matching marathi word. :-(

तुझं अगदी बरोबर आहे. मन इंस्टंट ग्रॅटिफिकेशनच शोधत असतं आणि मार्ग चुकिचा असला की wise men say only fools rush in....असा प्रकार होतो.

योगेश,
म्हणूनच तर गुलाम म्हटलं. आपण सर्वच इतकेच नाही तर प्राणीही सवयीचे गुलाम असतात. गुलामांचा स्वत:च्या जीवावरही हक्क नसतो. तेव्हा रसेलचे वाक्य अगदी चपखल.


शैलेश,
होय तुम्ही म्हणता ते ही योग्य आहे. सवयीविना माणूस सापडणार नाही. चांगल्या सवयी कठिण असल्या तरी लावाव्या आणि सलणार्‍या सवयी हळूहळू सोडून द्याव्या.

बाकी चर्चेचं म्हणाल तर ती येथेच करू म्हणजे मला स्वत:लाच moderate करता येईल. :)))

HAREKRISHNAJI said...

just perfect. I have written following real story on my blog

How to quit smoking or rather how I quit smoking ?

Once upon a time I was a chain smoker. It is said that once a smoker , always a smoker. It is extremly difficult to quit smoking. I tried quitting several time but nothing stopped me from returing to smoking.
One day I read a story in book written by Late Va Pu Kale as told by Acharya Rajneesh. The story goes like this.

Situation is, One young man, after getiing up from bed early in the morning is very restless as he is having great urge to smoke. All his stock is over and to get a cigarette he wants to go all the way to the vendor. He is having a guest in his house, who tells him

" Some persons when they get up from bed , first thing in the morning they have urge to Smoke, for Some people, they search for rosary to chant god's name when they get up from the bed. I am not saying that chanting is good or smoking is bad or eighter way, all I am saying habit is bad, I am not asking you to quit smoking, quit the habit.


And I quit the HABIT. Last 15-20 years I have not touched Cigarette

Priyabhashini said...

Very True! Thanks for sharing this story here. Someone may find it interesting and inspiring. :))

It is difficult to judge a habit as good or bad but addictions are certainly not good as they drown you and your closed ones in some way or the other. Sometimes old habits rebound as a reciprocation to the loss or sorrow or in such cases people look for addictions as an escape.

On your note I remembered a famous quote by Mark Twain - excuse me for not recalling the exact verbatim but it goes like this

Habit is a habit and it can't be flung out of a window but coaxed downstairs a step at a time.

HAREKRISHNAJI said...

yes you are right about addictions are certainly not good as they drown you and your closed ones in some way or the other.

I am too much hooked to internet and blogs, must control myself.

since yesterday, my wife has started communicating with me thru blogs

Priyabhashini said...

I just read your wife's post. Good she found a way to communicate with you :)))) and give my wishes to her.

Yeah! for me internet is not only an addiction but obssession too and I frequently find ways to control it.

HAREKRISHNAJI said...

for the first time I ahve written a review on the book written by my friend Shri Suresh Paranjpe on my blog

Your comments please

HAREKRISHNAJI said...

गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना नवे वर्ष सुखसमृद्धी व भरभराटीचे जावो.

marathi blogs