लेखन प्रकार: गूढकथा
वासुदेवने बाइक पार्क केली आणि लगबगीने तो घरात शिरला. "स्वाती ए स्वाती! कुठे आहेस तू? एक खुशखबर आहे."
"कसली खुशखबर? सांग तरी," स्वाती स्वयंपाक घरातून हात पुसत बाहेर आली.
"माझी बढती झाली. बॅंकेचा व्यवस्थापक म्हणून," वासुदेवने खुशीत येऊन स्वातीला घुसळत सांगितले.
"हो??? अरे वा, बॉस! अभिनंदन. मज्जा आहे बुवा! आता केबिन, स्टाफ आणि काय काय मिळणार असेल नाही."
"हो तर! पण बढती बरोबर बदली पण हातात पडलीये. मडगावला बदलीची ऑर्डर हाती आली आहे. आठवड्याभरात निघायला हवंय, घाई घाई होईल नाही गं," वासुदेवने हलकेच पिल्लू सोडले.
"अरेच्चा! एकदम मडगाव! गोवा!!. म्हणतोस काय वासू. गोव्याला जायला मी एका पायावर तयार आहे. तुला माहित्ये ना की गोवा मला किती आवडतं आणि तिथे जाऊन पुढची काही वर्ष राहायचं म्हणजे खरंच मस्तच रे! तू काही काळजी करू नकोस. मी विशाखाला बोलावून घेते ना मदतीला. होईल सगळी व्यवस्था आठवड्यात," स्वातीने उत्साहाने सांगितले.
"अगं पण तुझे छंद?"
"चित्र ना अरे उलट मडगाव सारख्या ठिकाणी माझ्यातला चित्रकार अधिकच फुलून येईल. वासू, आपणना मडगावला एखादा छोटासा बंगला भाड्याने मिळतो का ते पाहूया. मला ना ऐसपैस घर असावं, घरासमोर छानशी बाग असावी अशी खूप दिवसांची इच्छा आहे रे. माझा वेळ मस्त जाईल अशा घरात आणि चित्रकाराला लागणारा एकांतही मिळेल," स्वातीचा उत्साह फसफसून वाहत होता.
वासुदेव आणि स्वातीच्या लग्नाला १० वर्षे उलटून गेली होती. दोघेही संसारात सुखी होते. पण संसाराच्या वेलीवर फूल उमलले नव्हते. स्वाती घरात लहान बाळाच्या येण्याला आसुसलेली होती. आपला वेळ आणि मन ती चित्रकारी करण्यात रमवत असे. अशा गोष्टी आपल्या हातात नसतात हे समजून उमजून दोघेही एकमेकांना सांभाळून घेत.
"मी बघतो. बॅंकांना भाड्याने घरं देणारे काही एजंट असतात. मडगाव ब्रॅंचला संपर्क साधून काम होतंय का पाहतो."
-----
आठवड्या भराने स्वाती आणि वासुदेव मडगावला पोहोचले. एजंटला सांगून एक घर पाहून ठेवले होते. सगळं काही पसंत पडले की सामान मागाहून विशाखा; स्वातीची धाकटी बहीण पाठवणार होती. पेडणेकर नावाचे गृहस्थ इस्टेट एजंट म्हणून काम पाहत. बॅंकेतल्या अधिकार्यांना लागणारी भाड्याची घरे पुरवायचे कामही ते करत. ठरवल्या प्रमाणे ते सकाळी १० वाजता स्वाती आणि वासूला घ्यायला त्यांच्या हॉटेलवर पोहोचले.
पेडणेकर अंदाजे ५०च्या आसपास असावेत. माणूस दिसायला सज्जन आणि मृदुभाषी होता. आपली गाडी घेऊन आला होता त्यामुळे घर पाहून पुन्हा हॉटेलवर यायची सोयही होणार होती. गाडी सुरू केल्यावर पेडणेकरांनी घराबद्दल थोडी माहिती द्यायला सुरुवात केली.
"छोटीशी एक मजली बंगली आहे बघा. खाली बैठकीची खोली, स्वयंपाकघर, एक बेडरूम आणि वरच्या मजल्यावर बाल्कनी आणि ३ बेडरूम आहेत. खानोलकरांच घर म्हणून सगळे ओळखतात. अंदाजे ३० एक वर्षांपूर्वी त्यांनी हे घर बांधलं, आता पती पत्नी दोघे वृद्ध झाले आहेत. गेल्या १० वर्षांपासून अमेरिकेला मुलाकडे राहतात. घर रिकामं नको म्हणून भाडेकरू ठेवतात. घराची जागा समुद्राजवळच आहे. भल्या पहाटे नाहीतर रात्री समुद्राची गाज सहज ऐकू येते. पूर्वी विहिरीचं पाणी वापरावे लागे, आता विहिरीवर पंप लावून पाणी खेळवलं आहे, नगर पालिकेचा नळही आहे पण त्याला दिवसातले थोडे तासच पाणी येतं."
बोलता बोलता पेडणेकरांनी गाडी रस्त्याच्या कडेला लावली, "चला पोहोचलो आपण, घर पाहूया."
घर छान टुमदार दिसत होतं. घराबाहेर बर्यापैकी मोठं अंगण होतं पण त्याची निगा राखलेली दिसत नव्हती. तण माजलं होतं. झाडं सुकून गेली होती. स्वातीला क्षणभर उदास वाटलं, "कोण राहत होत इथे यापूर्वी?" तिने एक सहज प्रश्न केला.
"तसं घर भाड्याने देऊन ७-८ वर्षे झाली. सगळ्यात आधी एक कुटुंब राहायचं. ४ वर्षे राहिले आणि नंतर सोडून गेले. त्यानंतर एक दोन कुटुंब आली, गेली. फार काळ नाही राहिली. त्यानंतर गेले दोन एक वर्षे म्हात्रे नावाचा एक सडाफटिंग गृहस्थ इथे राहत होता. तो वासुदेव साहेबांच्या बॅंकेतच होता. त्याची हल्लीच मुंबईला बदली झाली. आता तो कुठे बाग राखणार? म्हणून हे सगळं असं उजाड दिसतंय एवढंच. बागेला पाणी घालायला नळ आहे इथे बाहेरच. चला घरात जाऊ," लगबगीने पेडणेकरांनी दरवाजा उघडला.
बाहेरच्या प्रखर सूर्यप्रकाशातून एकदम घरात शिरल्याने स्वातीच्या डोळ्यासमोर अंधारल्यासारखं झालं. हळू हळू दृष्टी सरावली तसं घर नजरेत येऊ लागलं. बंद घरातला एक प्रकारचा कुबट वास सर्वांच्या नाकात भिनला. पेडणेकरांनी लगबगीने जाऊन खिडकी उघडली, "बंद होतं गेले थोडे दिवस. या माझ्याबरोबर. मी घर दाखवतो." आणखी एक-दोन खिडक्या त्यांनी उघडल्या.
स्वाती आणि वासूने सगळं घर फिरून पाहिले. घर प्रशस्त होतं. हवेशीर होतं. पश्चिमेकडच्या खिडक्यांतून समुद्राचा खारा वारा येत होता. "या! स्वयंपाकघराच दार मागच्या अंगणात उघडतं. इथेच विहीर आणि पंप आहे. विहीर पूर्वी उघडी होती पण आता वरून झापडं लावून बंद केली आहे. पिण्याचा पाण्यासाठी नगरपालिकेचा नळ आणि इतर सगळ्या गरजांसाठी या विहिरीचं पाणी वर्षभर पुरून उरेल, " पेडणेकर माहिती देत म्हणाले. "इथून ७-८ मिनिटांच्या अंतरावर जाधवांच किराणा मालाच दुकान आहे. कसलंही सामान घरपोच करतील. आमच्या गोव्याची माणसं तशी सुशेगात. १० वाजता दुकान उघडतो लेकाचा. पण माणूस सज्जन. घरकाम करायला कुणी बाई हवी असेल तर तीही चौकशी मी करून ठेवतो. फोनच कनेक्शन आहेच त्यामुळे ती एक कटकट मिटली."
"स्वाती कसं वाटलं घर तुला? आवडलं तरच पुढची बोलणी करू." वासूने विचारलं.
"आवडलं रे! छानच आहे. हेच नक्की करूया."
"ठीक तर! चला इथून माझ्या कार्यालयात जाऊन राहिलेले सोपस्कार पूर्ण करू. स्वातीताई तुम्ही तेवढ्या खिडक्या दारं बंद कराल का?" पेडणेकरांनी विनंती केली.
स्वाती एक एक खिडकी बंद करत स्वयंपाकघराच्या मागच्या दरवाज्यापाशी पोहोचली. दरवाजा ओढून घेताना समुद्राच्या खार्या वार्याचा थंडगार झोत एकदम आत आल्यासारखा वाटला आणि त्याच्याबरोबर दूरवरुन एक आर्त साद, "आऽऽऽई!" एक अनामिक शिरशीरी स्वातीच्या तळपायातून मस्तकाकडे गेली. कुणीतरी लहान मूल आईला साद घालत होतं. स्वातीच्या मनाला काहीतरी बोचल्यासारखं झालं. तिने निमूटपणे दरवाजा ओढून घेतला व ती वासू आणि पेडणेकरांबरोबर घराबाहेर पडली.
-----
स्वाती आणि वासूला घरात राहायला येऊन चांगले २-३ दिवस होऊन गेले होते. घरात येण्यापूर्वीच पेडणेकरांनी अंगणातील माजलेले तण कापून दिले. पंप कसा चालवायचा या बद्दल माहिती दिली. साफसफाई करायला पेडणेकरांनी नीलाबाईंना ठरवून दिले होते. स्वातीने नीलाबाई यायच्या आधीच घर वर वर झाडून पुसून स्वच्छ करून घेतले. त्यात आजच विशाखाने पाठवलेले सामान पोहचले. वासू ऑफिसला जायला लागला होता पण आज सामान येणार म्हणून लवकर घरी आला होता. दोघे मिळून सामानाची लावालाव करत होते. स्वातीच्या पेंटीग्जच्या काही फ्रेम्स भिंतीवर लावायच्या असल्याने वासू हातोडा आणि खिळे घेऊन ठोक-ठोक करत होता तर स्वाती बेडरूमच्या कपाटात कपडे लावत होती. तळकप्प्यांत थोडीशी धूळ असल्यासारखं वाटलं म्हणून ती ओला कपडा आणायला स्वयंपाकघरात आली आणि तिचा पाय पाण्यात पडला. बघते तो स्वयंपाकघराच्या दारात हे मोठं पाण्याच तळं.
"वासू ए वासू! तू पाणी पिऊन गेलास का रे? कित्ती सांडवून ठेवलं आहेस इथे पाणी? कामांत काम वाढवतो आहेस," स्वाती करवादली.
"मी कुठे यायला? ही हातोडी आणि हे खिळे माझ्या हातातच आहेत. ठोकाठोक ऐकते आहेस ना तू?"
"अरे मग इथे पाणी कस आलं? तळ साचलंय नुसतं. घरात तू आणि मी सोडून दुसरं कुणी आलंय का?"
"तूच पाडवलं असणार. वेंधळेपणाचा अर्क आहेस स्वाती तू. विसरली असशील पाडवलं आहेस ते."
"आता मात्र हद्द झाली. मी बेडरूम मध्ये होते. इथे आले ही नाही, या नीलाबाई येतील तर कामाला थोडा हातभार लागेल," वैतागून स्वातीने कपडा घेतला आणि सगळं पाणी पुसून काढलं.
दारावरची बेल वाजली तशी स्वातीने उठून दरवाजा उघडला. बाहेर उभ्या असलेल्या बाई, नीलाबाईच असाव्यात हे ओळखून तिने विचारले, "पेडणेकरांनी पाठवलं ना तुम्हाला?"
"अं... हो! मी नीला. तुमच्याकडे काम आहे म्हणून पेडणेकर सायबांनी सांगितलं होतं म्हणून आले," नीला बाई तिशीच्या आसपास असाव्यात. बाई नीट नेटकी होती, चेहर्यावरून शालीन वाटत होती. बाईंची नजर मात्र काहीतरी शोधत होती. बोटांनी पदराशी चाळा सुरू होता. "या आत या!" स्वाती त्यांना घेऊन आत आली तरी बाईंची नजर काहीतरी धुंडाळतच होती. "मी दिवसातून एकदाच येईन. ती ही सकाळीच. नंतर येणार नाही चालेल का ते सांगा," बाईंनी आपली बाजू स्पष्ट केली, "पेडणेकर सायबांचे खूप उपकार आहेत. त्यांचा शब्द मोडवला नाही म्हणून त्यांना हो म्हटलं नाहीतर...." बाई बोलता बोलता चपापल्यागत होऊन गप्प बसल्या.
"चालेल हो! सकाळी एकदाच या ११ च्या सुमारास, तेच बरं. चला तुम्हाला काम सांगते," अस म्हणून स्वाती बाईंना घेऊन आत गेली.
दुसर्या दिवशी वासू ऑफिसला गेल्यावर स्वातीने जाधवांच्या दुकानाला भेट द्यायचे ठरवले. नाहीतरी रोजच्या खाण्या पिण्याच्या बर्याच गोष्टी तिला खरेदी करायच्या होत्या. सकाळच्या वेळी दुकानात फारशी गर्दी नव्हती. गल्ल्यावर एक सफेद सदरा लेंग्यातले साठीच्या दरम्यानचे वृद्ध गृहस्थ नाणी मोजत बसले होते, अधेमध्ये नोकराला कोंकणीतून काही सूचनाही देत होते. बहुधा तेच जाधव असावेत अस समजून स्वातीने त्यांच्याजवळ जाऊन आपली ओळख करून दिली.
"अच्छा! तर खानोलकरांच्या बंगलीत आलात तुम्ही. पण पेडणेकर म्हणत होते की ते घर आता भाड्याने द्यायचे नाही म्हणून," थोड्याशा आश्चर्याने जाधव म्हणाले.
"आम्हाला नाही तसं काही बोलले. मला असेच घर हवे होते, शांत, समुद्राजवळचं. मी चित्रकार आहे, पेंटींग्ज बनवण्यासाठी चांगला मूड येईल या घरात," स्वाती हलकेसे हसून म्हणाली.
तिने यादी जाधवांना दिली, त्याप्रमाणे त्यांनी सगळे सामान स्वातीला आणून दिले व बिल बनवायला घेतले.
"स्वातीताई, तुम्हाला एक विचारू? काही वेगळं जाणवलं का हो घरात तुम्हाला?"
"वेगळं म्हणजे?"
"नाही काही नाही. सहजच विचारलं," अस म्हणून जाधवांनी बिल स्वातीला दिले. पैसे चुकते करून स्वातीने पिशव्या उचलल्या आणि ती घराच्या दिशेने चालू लागली. वाटेत तिने जाधवांच्या प्रश्नावर विचार केला पण हाताला फारसं काही गवसलं नाही तसा तिने तो विचार मनातून काढून टाकला.
घराचा दरवाजा उघडता उघडता स्वातीने टेलिफोनची रिंग ऐकली. हातातल्या पिशव्या तिथेच टाकून तिने आत जाऊन फोन उचलला व नेहमीच्या सवयीने "हॅलो" म्हटले. पलीकडून थोडीशी खरखर ऐकू आली तेवढीच. रॉंग नंबर असावा अस समजून ती रिसीव्हर खाली ठेवायला गेली आणि "आऽऽई, आई गं!" अशी एक आर्त साद काळीज चिरून गेली. कावरी बावरी होऊन स्वातीने इथे तिथे पाहिले. आवाज फोनमधून आला की घरातून कळायला मार्ग नव्हता.
घराची कर्कश बेल वाजली तशी स्वाती एकदम दचकली. तिने जाऊन थरथरत्या हातांनी दरवाजा उघडला, बाहेर नीलाबाईंना पाहून तिला हायसं वाटलं.
"काय झालं ताई? तुम्हाला बरं नाही का? असा चेहर्याचा रंग का उडालाय?" नीला बाईंनी काळजीने विचारले.
"नाही, बरंय सगळं. काम काढून ठेवली आहेत. करायला घ्या," स्वातीने मलूल आवाजात उत्तर दिलं आणि किराणा मालाचे सामान पिशवीतून एक एक करून काढायला सुरुवात केली.
संध्याकाळी वासू घरी येईपर्यंत स्वाती सगळा प्रकार विसरूनही गेली होती. दिवसभरात तिने आपला बोर्ड, रंग, ब्रशेस ठेवण्यासाठी वरच्या माळ्यावरच्या एका बेडरूम मध्ये खिडकीजवळची जागा शोधून काढली. खिडकीतून घरामागची हिरवी गर्द झाडी, शेवाळलेली विहीर, पत्र्याची छोटीशी पंपाची खोली, अंगण दिसत होतं, इथेच आपला मूड चांगला लागेल अशी तिची खात्री झाली तशी तिने सर्व वस्तू जागी मांडून ठेवल्या. वासू आल्यावर संध्याकाळ जेवण करण्यात, गप्पा टप्पा मारण्यात निघून गेली.
मध्यरात्री स्वातीला अचानक जाग आली. कुणीतरी अंगावरची चादर खेचत असावं. तिने डोकं वर करून इथे तिथे पाहिलं. खिडकीतून चंद्राचा शुभ्र प्रकाश डोकावत होता. खोलीत कुणीच नव्हत, पण चादर मात्र तिच्या अंगावरून खाली सरकली होती. दूरवर कुठेतरी कुत्रं रडत होतं आणि रातकिड्यांची किरकिर रात्रीच्या भयाणतेत भर घालत होती. खिडकी बाहेरच झाड उगीचच सळसळत होतं. स्वातीचा जीव घाबरा घुबरा झाला. तिने एका हाताने चादर घट्ट पकडली, दुसरा हात वासूच्या अंगावर टाकला आणि डोळे गच्च मिटून घेतले.
-----
घरात राहायला येऊन दोन आठवडे कसे उलटून गेले ते स्वातीला कळलंही नाही. ती आता घराला चांगलीच सरावली होती. पंप चालू करणे, बागेची निगा राखणे, झाडांना पाणी घालणे यासारखी कामे उत्साहाने करत होती. काही वेगळं घडलं तर घरात काहीतरी वावगं आहे की काय ही जाणीव तिला कधीतरी अस्वस्थ करायची, परंतु वाच्यता करावी असं काहीच घडलं नव्हत. तसंही वासूला सांगावं तर तो वेड्यात काढेल की काय या भीतीने ती गप्पच होती.
त्या दिवशी ढगाळून आलं होतं, उत्तर रात्री कधीतरी विजा चमकायला सुरुवात झाली होती. स्वातीला पहाटेच उठून पंप सुरू करावा लागे, त्यानुसार तिने मागचे दार उघडले आणि ती विहिरीपाशी असलेल्या पंपाजवळ आली. बाहेर मिट्ट काळोख होता, नेहमीच्या सवयीने टॉर्चच्या प्रकाशात तिने पंपाचा स्विच ऑन केला. अचानक बाजूच्या सुकलेल्या पानांवरून काहीतरी सळसळत गेल्याचा तिला भास झाला, तिने मान वळवून टॉर्चचा झोत इथे तिथे टाकला.
"कोण आहे?....कोण आहे? समोर का येत नाही?" एक एक पाऊल मागे जात तिने पुन्हा एकदा विचारले आणि घरात धूम ठोकली. दरवाजा बंद करून कडी घालताना तिला तो नेहमीचा आर्त आवाज ऐकू आला, "आई, ए आई! मी आहे, आत घे ना गं!" तिच्या जीवाला थरथरल्यांसारखं झालं. तोच लहान मुलाचा परिचित रडवेला आवाज. 'हा काय प्रकार असावा?' ती धावतच वर गेली आणि पुन्हा चादरीत शिरली. वासूला उठवून सगळे सांगावे असा विचार मनात आला पण तिने तो तिथेच दूर सारला. वासूने ते हसण्यावारी नेले असते आणि संवाद येन केन प्रकारे आपल्याला मूल नसण्यावर येऊन ठेपला असता याची तिला खात्री होती. स्वातीला तोच जुना विषय उगाळायचा नव्हता.
सकाळी नीलाबाई आल्यावर तिने त्यांना छेडलं. झाल्या प्रकाराबद्दल सांगितले. ऐकून नीलाबाईंचा चेहरा कावरा बावरा होऊन गेला. 'नाही हो माहीत मला असं काही' असं म्हणून त्यांनी तिथून काढता पाय घेतला. दुपारच्या नीरव शांततेत स्वातीने नव्या कॅनव्हासवर सरावाच्या रेघोट्या मारायला सुरुवात केली. हात चालत असताना तिचे स्वत:शीच विचार सुरू होते. 'कुणाचं मूल असेल? का मला त्याचा आवाज ऐकू येतो? ते आईला पारखं झालेलं असावं का? त्याच्या हाकेला ओ द्यावी का?' नानाविध प्रश्नांनी तिच्याभोवती फेर धरला होता.
संध्याकाळ व्हायला आली तशी ऊन्हं भरभर उतरायला लागली. मधनंच वार्याची सळसळ आणि भरतीच्या लाटांचा आवाज गूढ शांततेचा भंग करत होता. अचानक खाली तळमजल्यावर कुणाची तरी चाहूल लागल्याचा भास झाला. स्वातीच्या काळजात कुठेतरी चर्र झालं. ती हातातला ब्रश टाकून जिना उतरून खाली गेली. बैठकीची खोली रिकामी होती. सगळं काही आलबेल होतं. स्वातीने सुटकेचा सुस्कारा सोडला. ती पुन्हा वर जायला मागे वळली तोच तिच्या पायाला पाण्याचा थंडगार स्पर्श झाला. पायर्यांवरून पाण्याचे ओघळ वाहत होते. स्वाती नखशिखान्त शहारून गेली. कुठेतरी पळून जावं की काय असा विचार क्षणभर तिच्या मनात आला न आला, त्याक्षणी तिला जाणवलं वर जिन्यात कुणीतरी बसलं होतं.
चौथ्या पाचव्या पायरीवर, सात आठ वर्षांच्या मुलाची एक कृश आकृती अंगाचं मुटकुळं करून मुसमुसत होती. स्वातीला दरदरून घाम फुटला, तिच्या पायांतलं त्राण निघून गेलं. "आई," त्याने डोकं वर केलं. पांढर्या फटक चेहर्यावरच्या दोन पांढर्या सफेत डोळ्यांकडे पाहताना स्वातीच्या सगळ्या चेतना गोठून गेल्या. समोरची आकृती उठून स्वातीच्या समोर आली.
"आई, मी आहे पिंटू. का गं सोडून गेलीस मला?" रडवेल्या आवाजात पिंटू विचारत होता, "किती वाट पाहिली मी तुझी. आता नाही नं सोडून जाणार तू मला. नाही जाऊ देणार मी तुला, कध्धी नाही." पिंटूने स्वातीचा हात आपल्या कृश हातांनी गच्च पकडला. त्या थंडगार, ओलसर, लिबलिबीत स्पर्शाने स्वातीच्या सर्वांगातून एक कळ शीरशीरत गेली आणि ती जागीच वेडीवाकडी कोसळली.
-----
वासूला यायला आज थोडा उशीरच झाला होता. वाटेत काही घ्यायला म्हणून जाधवांच्या दुकानात गेला, तिथे अचानक बराच वेळ निघून गेल्यावर त्याला एकदम बाहेर झुंजूमुंजू व्हायला लागल्याची जाणीव झाली तसा तो धावत पळत घरच्या रस्त्याला लागला. घर नजरेच्या टप्प्यात आलं तेंव्हा त्याच्या लक्षात आलं की घरात मिट्ट काळोख आहे. त्याने लगबगीने चावीने दरवाजा उघडला आणि खटाखट दिव्यांची बटणे दाबली. बैठकीची खोली प्रकाशाने उजळून गेली. समोर जिन्याजवळ स्वाती अस्ताव्यस्त पडली होती.
ते पाहून वासू धावत तिच्या जवळ गेला, "स्वाती, काय झालं? अशी कशी पडलीस?" अस म्हणत त्याने स्वातीला गदगदा हालवले. पाणी आणून तोंडावर मारले तसे स्वातीने डोळे उघडले. तिचे डोळे भकास होते. "काय झालं स्वाती तुला?" अस विचारत वासूने तिला उठायला मदत केली आणि सोफ्यावर बसवले. "वासू, कुणीतरी आहे रे या घरांत. मी...मी पाहिलं त्याला. त्याचा स्पर्श अनुभवला."
"हे बघ! आपण वर जाऊ. पड थोडावेळ तुला बरं वाटत नसेल तर. तुला काहीतरी सांगायचं आहे मला," वासूने स्वातीला आधार देऊन वर नेले आणि पलंगावर बसवले.
"मी येताना जाधवांच्या दुकानात गेलो होतो. त्यांनी एक विलक्षण गोष्ट सांगितली, ती आधी तुला सांगतो. सुमारे सात-आठ वर्षांपूर्वी खानोलकरांनी हे घर भाड्याने दिले तेंव्हा एक कुटुंब इथे राहायला आले. त्या कुटुंबात ३-४ वर्षांचा एक लहान मुलगा होता; पिंटू. पुढची काही वर्षे अगदी सुरळीत गेली आणि एक दिवस दुर्दैवाने खेळता खेळता विहिरीत पडलेला बॉल काढायच्या निमित्ताने पिंटू पाय घसरून विहिरीत पडला. त्याची आई घरात एकटी होती, तिला पिंटूला वेळेत बाहेर काढता आले नाही. मदत येईपर्यंत खूपच उशीर झाला होता. पिंटूला वाचवता आले नाही. या प्रकाराची हाय खाऊन ते कुटुंब घर सोडून निघून गेले. त्यानंतर आलेल्या एक दोन कुटुंबातील स्त्रियांना या घरात काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाली तशी घाबरून त्यांनी लगोलग घर बदलले. त्यानंतर गेली दोन वर्षे येथे म्हात्रे राहत होता आणि त्याला मात्र असा वावगा अनुभव कधीच आला नाही. तेंव्हा असे प्रकार थांबले असावेत किंवा केवळ अफवा असाव्यात अशी सर्वांची खात्री झाली. एकंदरीत मी गोष्ट ऐकली ना, तेंव्हा फारसा विश्वास ठेवला नाही पण हा घरी आलो तर तू मला पुन्हा पिंटूची गोष्ट सांगते आहेस. मला वाटत या घरात राहण्यात अर्थ नाही. मी उद्याच जाऊन पेडणेकरांना धारेवर धरतो."
"नाही रे वासू! ते प्रकार थांबले नव्हते. पिंटू इथेच होता असणार, याच घरांत. त्याला आई हवी आहे. म्हात्रे मध्ये आई कशी मिळणार होती त्याला म्हणून म्हात्रेला काही जाणवलं नाही पण आपण आलो तशी पुन्हा पिंटूने उचल खाल्ली आहे. त्याला आई हवी आहे रे, वासू. आईच्या प्रेमाचं भुकेलं आहे ते पोरगं," स्वाती स्वतःशीच बोलल्यागत पुटपुटली.
"काय बोलते आहेस स्वाती? ते मूल नाही. भास आहे... एक जीवघेणा भास. तुझ्यातली आई इतकी वेडी आहे का की सत्य आणि भास यातला फरक ओळखू शकत नाही? शुद्ध वेडे विचार आहेत तुझ्या आसुसलेल्या डोक्यात. ते काही नाही, आपण उद्याच इथून निघूया. या घरात राहायचं नाही, हा माझा ठाम निर्णय आहे. तू पड थोडावेळ आणि फार विचार करू नकोस."
वासू उठला आणि बाल्कनीत जाऊन येरझारा घालू लागला. स्वातीच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. "आऽऽऽई!" या हाकेतली आर्तता तिच्या हृदयाला पिळवटून गेली होती पण वासू म्हणत होता ते सत्य होतं. 'आपल्या आयुष्यात मूल यावं ते ही अशा मार्गाने?' स्वातीला हुंदका आवरला नाही. तिने स्वत:ला पलंगावर झोकून दिलं आणि उशीत तोंड लपवलं.
किती वेळ गेला कुणास ठाऊक? अचानक बाहेरून धप्प असा काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि सोबत वासूची कर्णबधिर किंचाळी. स्वाती धावत धावत बाल्कनीत गेली. रस्त्यावरच्या मिणमिणत्या दिव्याचा प्रकाश बागेत पडला होता. तिने पाहिलं वासू खाली डोक्यावर पडला होता. रक्ताचा पाट त्याच्या डोक्याशेजारून वाहत होता. ते पाहून स्वाती थरथरायला लागली तरीही कशीबशी धावत जिन्याच्या दिशेने गेली आणि त्राण निघून गेल्यासारखी मटकन खाली बसली.
जिन्याच्या शेवटच्या पायरीवर पिंटू उभा होता. जिन्यातल्या दिव्याचा पिवळाधम्मक प्रकाश त्याच्या पांढर्या फटक शरीरावर पडला होता, "तो माणूस तुला घेऊन जाणार होता ना, आई पण बघ! मी आता तुला इथून अजिबात जायला देणार नाही, कुणी तुला घेऊन जायला लागलं तर सगळ्यांचं असंच करेन." पिंटू छद्मी हसत एक एक पायरी वर चढत होता. स्वातीच्या तोंडातून शब्द ही फुटला नाही. "मी ढकललं त्याला. आता कुणी माझ्या आईला माझ्यापासून दूर नेणार नाही," पिंटूचे पांढरे फटक डोळे अचानक चमकून गेले. "आऽई!" म्हणून पिंटूने स्वातीचे हात आपल्या हातात घेतले.
का कुणास ठाऊक तो थंडगार लिबलिबीत स्पर्श स्वातीला या वेळेस परका वाटला नाही. तिने हळूच आपला हात पिंटूच्या पाठीवर ठेवला आणि त्याला जवळ ओढले. पिंटूनेही तिच्या गळ्याला गच्च मिठी मारली.
(समाप्त)