प्रकार

Friday, November 03, 2006

डोळ्यांत वाच माझ्या...

रन-अवे ज्युरी हा चित्रपट अनेकदा पाहिला आहे काल पुन्हा एकदा पाहिला. काही क्षण, काही प्रसंग कारण नसताना मनात भरून राहतात तसा या चित्रपटात एक वेधक प्रसंग आहे.

एका मोठ्या बंदुकीच्या कंपनीविरुद्ध खटला हातात घेतलेल्या एका अत्यंत तत्त्वनिष्ठ वकिलाला मार्ली नावाची एक तरूण मुलगी खटल्यातले ज्युरी आपल्या मुठीत आहेत असे सांगून ब्लॅकमेल करत असते. अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि कायद्याशी खेळणार्‍या या मुलीचा राग आल्यावाचून आपल्याला राहवत नाही. पुढे एका प्रसंगात या वकिलाची आणि मार्लीची समोरासमोर भेट होते, बोलणं होतं आणि आपले साधे, शांत आणि थोडेसे शामळू डोळे तिच्या निर्ढावलेल्या डोळ्यांवर रोखून तो वकील तिला विचारतो, 'कोणी दुखावलंय का गं तुला, म्हणून तू हे सर्व करत्येस?' आणि संपूर्ण कथानक त्या एका वाक्यावर उलट फिरते. अनपेक्षित प्रश्नाने मार्लीच्या डोळ्यांत एक अस्पष्ट दुखरी रेषा उमटते आणि काहीतरी विलक्षण दु:ख ती मनाशी बाळगून आहे याचा अंदाज प्रेक्षकांना येतो आणि मार्लीबद्दल अचानक ओलावा निर्माण होतो.

Eyes are the windows to the soul, असं कोणीतरी म्हणून गेले आहे. आपल्या डोळ्यांतून प्रत्येक मानवी भावना व्यक्त होते. राग- लोभ- काम- मत्सर, यासारख्या आणि इतर अनेक गुणावगुणांनी भरलेले डोळे माणसाचे चारित्र्य सहज सांगून जातात.

नुकतेच जन्माला आलेले बाळ या जगाचा पहिला आस्वाद बहुधा डोळ्यांनीच घेत असावे. लहान बाळांचे डोळे फार स्वच्छ आणि नितळ असतात आणि लहान बाळांना काही फुटापर्यंतचेच दिसते म्हणतात. बहुधा लबाडी, मत्सर, राग यांनी त्या डोळ्यांत शिरकाव केलेला नसतो म्हणूनही असेल. बराच काळ आई हेच त्यांचे जग असते; म्हणूनच की काय त्यांची नजर निर्व्याज आणि निरागस असते. पण माणूस जसजसा मोठा होत जातो तसतशी त्याची दृष्टी व्यापक होते आणि चांगल्या वाईट सर्वच गोष्टी त्याच्या नजरेत भरायला लागतात आणि माणसाची नजर हळूहळू बदलत जाते, व्यापक होत जाते.

ही व्यापक झालेली नजर तरी किती प्रकारची; प्रेमळ नजर, रागीट नजर, दु:खी नजर, जरबेची नजर, लबाड नजर, अधाशी नजर, लाजाळू नजर, भेदरलेली- घाबरलेली नजर, अवखळ नजर, मादक नजर, बेफिकिर नजर, सोज्वळ नजर, आणि ही अनेक प्रकार असतीलच.

जिथे बोलताना शब्द अपुरे पडतात तिथेही डोळे बरंच काही सांगून जातात. डोळ्यांनी हसणे, रागावणे तर आलेच; पण डोळे मारणे, नेत्रपल्लवी करणे, नयनसुख घेणे या डोळ्यांच्या नशिबी येणार्‍या काहीशा वेगळ्याप्रकारच्या भावना. डोळे लक्ष ठेवून असतात, वटारलेले असतात, मिटलेले असतात, टक्क उघडे असतात, डोळ्यांत धूळ फेकता येते, डोळ्यांनी मागोवा घेतला जातो आणि पाठलागही केला जातो.

एखाद्याच्या डोळ्यांना डोळे भिडतात आणि माणसे प्रेमात पडतात. प्रेमात पडण्याचा यापेक्षा सोयिस्कर आणि सरळ मार्ग दुसरा नसावा. डोळे सरळ हृदयालाच हात घालतात म्हणे. डोळ्यांतून जे व्यक्त करता येते ते बरेचदा शब्दांतून करता येत नाही आणि तरीही डोळ्यांतील भाव व्यक्त करण्यावर अनेक वाक्प्रचार, कविता आणि गाणी लिहिली जातात.

या नजरेतलं मला जे आवडतं ते लहान मुलाच्या नजरेत असणारी निरागसता, आप्तांच्या डोळ्यांतून व्यक्त होणारा विश्वास, आपुलकी, स्नेह आणि जगातले सर्व शोध या डोळ्यांपाशी येऊन संपल्याची भावना. ती व्यक्त करायला ब्रायन ऍडम्सच्या या गीतापेक्षा सुंदर शब्द नसावेत ---


Look into my eyes - you will see
What you mean to me
Search your heart - search your soul
And when you find me there you'll search no more .....

3 comments:

मी अत्त्यानंद said...

बऱ्याच दिवसांनी इथे आलो.डोळे,नजर ह्याबद्दल लिहिलेला हा लेख छान जमलाय.

डोळ्यांवर इतकी गाणी आहेत की ती आठवता आठवता आपण थकून जाऊ.चटकन आठवलेली ही दोन गाणी:

नयन तुझे जादूगार
हरिणीचा हरिती नुर
त्यात सुंदरी कशास
काजळ हे घालतेस?

किंवा

डोळे हे जुल्मी गडे रोखून मज पाहू नका

अशी गाणी आठवायला लागतात.

आपण म्हणालात ते खरे आहे. माणूस बोलायच्या आधी त्याचे डोळे बोलतात. हा लेख वाचून आता अपेक्षा वाढल्या आहेत.पुढच्या लेखाची वाट पहातो आहे.

Anonymous said...

छान लिहीलंय तुम्ही. :)

Anonymous said...

apratim
-- nana

marathi blogs