प्रकार

Monday, October 02, 2006

विश्वासाचे पानिपत

अशीच एक इ-मेल साखळीतून आलेली गोष्ट आठवली.

एक वडील व मुलगी जंगलातून जात असतात. अंधार पडतो, वाट अरुंद असते, पुढे पाणथळ जागा लागते. वडील मुलीला सांगतात की तू माझा हात घट्ट पकड, आपण हा रस्ता पार करून जाऊ. ती लहान मुलगी वडिलांना म्हणते, 'नको बाबा, तुम्ही माझा हात पकडा आणि आपण हा रस्ता पार करून जाऊ.'

वडील आश्चर्याने विचारतात, 'तुझ्या माझ्या बोलण्यात फरक तो काय बेटा?'

तशी मुलगी म्हणते, 'बाबा मी तुमचा हात पकडला आणि पुढे संकट आलं तर मी कदाचित तुमचा हात सोडून स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करीन. पण तुम्ही माझा हात पकडला आणि संकट आलं तर तुम्ही माझा हात सोडणार नाही. आधी मला वाचवाल मग स्वत:ला.'

अशी छानशी गोष्ट असायला हरकत काहीच नाही, तशी ती मला विश्वासार्हही वाटते. मनुष्याचे आपल्या मुला बाळांवर आपल्या आई वडिलांपेक्षा अधिक प्रेम असते हे सत्यच त्यातून पुढे येते. परंतु त्यापुढे जाऊन अकबर बिरबलाची माकडिणीची गोष्ट आठवते आणि वरील गोष्टीचा पाया काहीसा डळमळीत होतो.

हौदात आपल्या पिलासमवेत एका माकडिणीला उभं करून त्यात बिरबल पाणी भरायला लावतो. माकडीण पिलाला घट्ट धरून कावरीबावरी होऊन उभी राहते. पाणी चढत जातं तशी तिची पिलाला कसं वाचवावं अशी घालमेल होते. शेवटी पाणी नाकापर्यंत चढतं तशी मात्र ती पिलाला पायाखाली टाकून त्यावर उभं राहून आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करते. प्रत्येकाला स्वत:चा जीव सर्वात प्रिय असतो हे बिरबलाचे म्हणणे खरे ठरते.

माझ्या मनात या दोन्ही गोष्टींवरून फक्त एकच प्रश्न उठतो; वरील गोष्टीतल्या मुलीने वडिलांवर जेवढा विश्वास टाकला तितकाच विश्वास त्या माकडिणीच्या पिलानेही आपल्या आईवर टाकला असेल का?

विश्वास हे मला दुधारी शस्त्र वाटतं. दुसर्‍यावर अती विश्वास ठेवला तरी फसवणूक होऊ शकते आणि सतत अविश्वास दाखवत गेलं तरी नुकसान संभवण्याची शक्यता असते. कधीतरी आपण ठरवतो की विश्वास उत्पन्न व्हायला खूप वेळ लागतो आणि कधीतरी पर्याय नाही म्हणून एखाद्यावर चटकन विश्वास ठेवतो.

या विश्वासाचं आणि माझं 'तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना' असं काहीतरी विचित्र नातं आहे. या शब्दावर विचार करायला बसलं तर दरवेळेस वेग वेगळे विचार डोक्यात येतात आणि विचार न करता कुणावरतरी विश्वास टाकून मोकळं व्हावं असं वाटतं. 'Utter confusion' यालाच म्हणत असावे. विश्वास आणि विश्वासाशी साधर्म्य सांगणार्‍या शब्दांची उकल अशी करता येईल:

१) धारणा (belief): मनुष्याची एखाद्या विषयाबाबत एखादी ठाम धारणा (किंवा पक्का समज) असू शकते. ती पाळणे, तिचे संवर्धन करणे हे त्या मनुष्याच्या इच्छेनुसार होत असते. बरेचदा धारणा खरी की खोटी या कडे फारसे लक्ष दिले जात नाही. ती आहे तशीच कुरवाळत बसण्यात माणसाला आनंद मिळत असावा. इतर प्रकारांच्या मानाने धारणा ही फारशी कडवी नसावी असे वाटते.

२) विश्वास (trust, confidence): हा धारणेचा पुढचा टप्पा असावा. सहसा विश्वास या शब्दाचा वापर अतिशय सकारात्मक तर्‍हेने केला जातो. एखाद्या गोष्टीवर किंवा व्यक्तीवर आपण किती अवलंबून आहोत यावरून आपण त्यांच्यावर किती विश्वास टाकतो हे परिमाण बहुधा ठरत असावे. वर म्हटल्याप्रमाणे कधीतरी इतरांवर किती विश्वास टाकावा हे ही कळेनासे होते. तरीही विश्वास हा डोळस वाटतो.

एखाद्या व्यक्तीचा विश्वास जिंकणे किंवा संपादन करणे, एखाद्यावर विश्वास दर्शवणे हे सुखदायक आणि फायदेशीर ठरू शकते तर विश्वासाचे तुटणे, विश्वास खोटा पडणे, विश्वासघात होणे हे दु:खदायक असण्याची किंवा नुकसानदायी ठरण्याची शक्यता वाटते. अशा मोडलेल्या विश्वासाचे किंवा विश्वासघाताचे सल मनातून जायला फार वेळ लागत असावा.


३) श्रद्धा (faith): श्रद्धा हा शब्द बहुतेकवेळा देवाशी निगडित असतो. देवाशी नसला तर आयुष्यातील अधिकारी व्यक्तींशी असतो त्यात आई-वडील, गुरू, जोडीदार यांचा समावेश होऊ शकतो. श्रद्धा हे दृढ विश्वासाचे रूप वाटते. बरेचसे धर्म श्रद्धेला व श्रद्धेच्या बळाला महत्त्व देतात असे दिसते. श्रद्धेची व्याख्या कुठेतरी 'कसलाही पुरावा दाखवण्याची गरज नसलेली धारणा' अशी केल्याची वाचलेले आठवते. दुसर्‍या शब्दांत श्रद्धा ही आंधळी असते असेही म्हणता येईल आणि असं म्हणायला गेलं तर सर्वच श्रद्धा अंधश्रद्धा ठरतील; तरी श्रद्धा कधी खोटी पडू नये, तुटणार्‍या श्रद्धेतून सावरणे प्रत्येकालाच शक्य असते असे वाटत नाही.

विश्वासाचं असं पानिपत केल्यावरही एखाद्यावर किती, कसा आणि कधी विश्वास ठेवायचा हे मला अजूनही ठरवता आलेलं नाही, कदाचित ते त्या त्या वेळेवरील त्या त्या परिस्थितीवरच अवलंबून असावे आणि माणसाने हेच सत्य स्वीकारून 'आलीया भोगासी' म्हणावे.

3 comments:

Sumedha said...

छान लिहीले आहे! आवडले.

मी अत्त्यानंद said...

असं म्हणतात की 'विश्वासाने विश्वास वाढतो'.म्हटलं तर हे खरे आहे,म्हटलं तर खॊटे आहे. आपण कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही हे बरेचदा आपण ज्या वातावरणात वाढतो त्यावर अवलंबून असते.ज्या व्यक्तीला जीवनात कधीच वाईट अनुभव आले नसतील त्याला सगळंच छान छान वाटतं आणि त्याच्या उलट वाईट अनुभव आलेल्या व्यक्तीला सगळंच अविश्वसनीय वाटतं!
म्हणूनच संत सोयरोबानी म्हटलं आहे,"अनुभवाविण मान डोलवू नको रे".
प्रियाली आपण व्यक्त केलेल्या मतांशी मी सहमत आहे.कधी कधी आपण अगदी सहजपणे कोणावरही चटकन विश्वास टाकतो आणि कधी कधी त्याच्या अगदि उलट! 'ह्याला जीवन ऐसे नाव!' दुसरे काय?

Priyabhashini said...

सुमेधा आणि अत्यानंद धन्यवाद.

एखाद्यावर अविश्वास दाखवणे फार सोपे असते. अविश्वास दाखवणे हे एका अर्थी जबाबदारी टाळणे, प्रसंगापासून पळवाट शोधणे असे ही धरता येईल. एखाद्यावर विश्वास टाकायचे म्हटले तर विश्वास ठेवणे आणि तो कायम राखण्याचा प्रयत्न करणे हे मात्र थोडे जिकिरीचे काम आहे.

marathi blogs