पाहुणा
गेल्या वर्षीची गोष्ट, ऑक्टोबरचा महिना संपत आला होता. बाहेर थंडी मी म्हणत होती, जोराच वारंही सुटलं होतं. खिडकीच्या फटीतून आत शिरू पाहणारा वारा घुबडासारखे घुत्कार करत नकोस वाटणारं पार्श्वसंगीत ऐकवत होता. संध्याकाळचे सहा साडेसहा वाजले असावेत पण बाहेर मिट्ट काळोख दाटून आला होता. फायर प्लेस मधल्या जळणार्या लाकडांचा एक जळकट वास घरात पसरला होता. ब्रॅम स्टोकरचं पुस्तक वाचतावाचता सोफ्यावरच माझा डोळा कधी लागला होता कळण्यास मार्ग नाही.
दरवाज्यावर ठकठक ऐकू आली तसे मी चटकन डोळे उघडले. वार्यामुळे दरवाजा थरथरला असावा की काय असा विचार मनात आला न आला तोच पुन्हा एकदा ठक ठक ऐकू आली. या वेळेस थोडी जोरात. 'कोण आले असेल या वेळेस?' तशी या वेळेस कोणी यावं ही अपेक्षाच नव्हती. 'कोणीतरी गरीबांसाठी पैसे गोळा करायला, नाहीतर आसपासची पोरं वात्रटपणा तर करत नसावीत? पाहूया कोण आहे ते,' असा विचार करून मी उठले तसा स्टोकरचा ड्रॅक्युला धाडकन माझ्या पायावर पडला.
"आई गं! कोण मरायला कडमडलंय या वेळी?" असं पुटपुटत पुस्तक उचलून मेजावर आदळलेच आणि मी दरवाज्यापाशी आले. प्रथम पीपहोलला डोळा लावला. बाहेर कुणीच दिसत नव्हते. 'उघडावा की न उघडावा दरवाजा??' या गहन विचारांत असतानाच हात आपोआप हळूच कडीवर कधी गेला आणि दरवाजा कसा उघडला गेला ते कळलंच नाही.
दरवाजा उघडता क्षणीच वार्याचा थंडगार झोत अंगावर आला आणि त्याबरोबर एक उग्र दर्प नाकात भिनला. बाहेरच्या काळोखात एक संपूर्ण काळ्या पोशाखातील सहा फुटांहून अधिक उंचीची आकृती पाठमोरी उभी होती. मी दरवाजा उघडताक्षणीच ती गर्रकन वळली. समोर हातात छडी घेतलेला एक अत्यंत देखणा पुरुष उभा होता. चटकन डोक्यात आलं, 'गॉन विद द विंड' मध्ये क्लार्क गेबल प्रत्यक्षात असाच दिसत असावा बहुधा. फरक फक्त एक होता. क्लार्क गेबलच्या खोडकर डोळ्यांऐवजी समोरच्या व्यक्तीचे लालबुंद डोळे माझ्यावर रोखलेले होते.
"येस, प्लीज??" मी थोडं दबकतच विचारले.
"नमस्कार. मी आपला नवा शेजारी. कालच मला इथे आणलं." त्याने आपली ओळख करून देताना एक तोंड भरून हास्य फेकलं. हास्य कसलं? अंधारात त्याने पांढरे शुभ्र दात विचकल्यासारखं वाटलं.
"नमस्कार. आ..आणलं म्हणजे? तुम्ही कालच इथे आलात असं म्हणायचं आहे का तुम्हाला?" मी चाचरत प्रश्न केला.
"म्हणजे पोहोचवले हो, ईप्सित स्थळापर्यंत." असे म्हणून त्याने उगीचच गडगडाटी हास्य केले, "बरं! तर मी आत येऊ का?" त्याचा आवाज अगदी मृदू होता, "आमंत्रणाशिवाय तसा मी कुणाकडे जात नाही म्हणा; पण तुम्ही सख्खे शेजारी, या म्हणाल याची खात्री होती म्हणून आलो."
आता एखाद्याने गळ्यातच पडायचं म्हटल्यावर मलाही "या" म्हणण्यावाचून पर्यायच राहिला नव्हता. "या आत या."
महाशयांचे डोळे लुच्चे हसले. जसं काही त्या लाल भडक डोळ्यांमागे काहीतरी गुपित दडवलेलं आहे. ते ताडताड पावलं टाकत आत आले तरी त्यांचे हावभाव पाहून हा माणूस बराच काळ आपल्या पायांवर उभा नसावा की काय असे वाटत होते. कुठेतरी काळजात चर्र झाले आणि कुठेतरी त्यांचा तो आवेश पाहून त्याही परिस्थितीत हसू आले.
"त्याचं काय आहे की घरातलं सामान अजून उघडायचं आहे. सहा सहा फुटी पेटारे आहेत, उघडून स्थिरस्थावर व्हायला वेळ लागणारच नाही का? बरं माझी ओळख करून देतो," महाशयांनी हातातली काठी फिरवली. त्या काठीच्या मुठीवर दोन हिरे चमचमल्याचा भास झाला, "मी द्वाड. म्हणजे माझ्या गुणांकडे पाहून माझं नांव माझ्या आई वडिलांनी 'द्वाड' असंच ठेवलं." 'बाप रे! आई-वडील हे असंही करतात?' मला जरा नवलच वाटलं.
काय बोलावं हे न सुचून मी "हम्म!" म्हटलं आणि नजर खाली वळवली, तसा ड्रॅक्युलाच्या पुस्तकावरचा 'बेला लगोसी' माझ्याकडे पाहून छद्मी हसल्याचा भास झाला. ड्रॅक्युलाचे खरे नांव "व्लाड" होते म्हणे, या द्वाडशी किती जुळतंय नाही, असं उगीचच मनात येऊन गेलं. शेवटी शब्दांची जुळणी करून मी तोंड उघडलं, "वा! वा!" आता त्यात 'वा!' म्हणण्यासारखं काय होतं कुणास ठाऊक पण बोलायचं म्हणून पुढे विचारलं," कसं काय येणं केलंत?"
"त्याचं असं आहे," हलकेच हसून द्वाडसाहेब मधाळ शब्द बोलू लागले,"आम्ही पडलो सरदार घराण्यातले. पूर्वजांपासून ऐशोआरामाची सवय, जहागिरी गेल्या, जमीनजुमले गेले तरी जुन्या सवयी काही सुटल्या नाहीत."
"हो का?" काहीतरी बोलायचं म्हणून मी बोलत होते, डोक्यात वेगळ्यांचं विचारांनी फेर धरला होता. ड्रॅक्युला पण म्हणे सरदार घराण्यातलाच होता नाही का?
"दिवस उतरणीला लागला, म्हणजे माझा दिवस सुरू होतो." द्वाडराव आपल्याच नादात बोलत होते, "काहीतरी प्यायला मिळावं अशी इच्छा होती पण घरातलं सामान उघडलेलं नाही आणि या अनोळखी गावांत कुठे फिरत बसणार?" बोलता बोलता साहेबांनी आपल्या ओठांवरून उगीचच जीभ फिरवली. "क.. क.. काय पिणार तुम्ही?" द्वाड साहेब आता झेप घेऊन माझ्या मानेला डसतील की काय असा विचार मनात आला.
"आता या वेळेला काय पितात माणसं? माझं 'त्या' शिवाय चालत नाही हो. तुमच्याकडे एखादी बाटली उधार असेल तर घेऊन जातो म्हणतो, " मी म्हणजे कोणितरी बावळट व्यक्ती आहे अशा तोर्यात द्वाडरावांनी मला सुनावलं.
"नाही हो! आमच्याकडे "त्या" बाटल्या नाहीत. नाही म्हणायला रेड वाइन आहे. चालेल?" मला प्रथमच जीवांत जीव आल्यासारखं वाटलं.
"हम्म्म! गडद रंगाच कुठलंही पेय चालतं मला. संध्याकाळी रेड वाइन ही काही माझी पहिली पसंती नाही पण नेईन निभावून," माझ्याकडे आशाळभूत नजरेने पाहत द्वाड साहेब उद्गारले. मी त्वरेने बाटली काढून द्वाड साहेबांच्या हाती सुपूर्त केली. "असं करा, आख्खी बाटलीच घेऊन जा. आम्हाला नको आहे." ही ब्याद कधी टळते आहे असं मला झालं होतं.
"बरं तर निघतो. तुमचा अधिक वेळ घेत नाही. तुम्हाला भेटून फार आनंद झाला."
"बरंय द्वाड साहेब तुम्हालाही भेटून आनंद झाला."
अचानक द्वाडसाहेब माझ्याकडे मिश्किल नजरेने पाहत म्हणाले, "वेल देन! लेट्स किस,"
"काय?" मी जवळ जवळ किंचाळलेच. हा माणूस नक्की मला डसणार याची खात्री झाली.
"अहो ओरडताय काय अशा, कधीपासून पाहतो आहे, तुम्ही अशा बावचळल्यासारख्या का वागत आहात? मी म्हणजे काय भूत आहे का कोणी?" द्वाडराव माझ्यावर डाफरले आणि अचानक आवाज नरम करून म्हणाले, "लेट्स किस म्हणजे "Let us Keep It Simple and Straight!!!" मला कधी रेड वाइन हवी झाली तर येईन तुमच्याकडे सरळ. शेवटी शेजारी कधी कामाला येतात? तसा मी शांतताप्रिय प्राणी असल्याने तुम्हाला माझ्यापासून काही इतर त्रास होणार नाही. बाकी, तुम्ही मला द्वाड साहेब म्हणू नका, माझे इतर मित्र मला ज्या नावाने संबोधतात तेच नाव वापरत जा."
"कुठलं नाव?" या माझ्या इवल्याश्या जीवाने तरी किती वेळा भांड्यात पडावं?
"काऊंट ड्रंक्युला!," असे म्हणून साहेब गोड हसले व वळून चालू पडले