प्रकार

Wednesday, February 08, 2006

बाटलीतली जीनी


कसली बाटली हवी तुला?" त्याने तिला विचारले.

नाही! असे दचकू नका, तशा अर्थाने नाही विचारलं त्याने.

"नीळी, उभट, प्लास्टिकच्या बूचाची बाटली चालेल मला," तिने आपली सरळ साधी आवड व्यक्त केली.
"काहीतरीच काय? अगं तू रहाणार त्या बाटलीत, ती दिसायला सुबक, मनमोहक नको का? मी आणतो माझ्या आवडीची. तुला ही नक्की आवडेल."

"बरयं आका!" जीनीने मान डोलावली.
-----

"हे काय आका? इतक्या महागाची बाटली, माझी लायकी तरी आहे का तिच्यात रहायची?"
"अग! तुझी लायकी मला ठरवू दे, तू का काळजी करतेस?" त्याने शांतपणे म्हंटले.
"काळजी नाही आका पण थोडीशी भीती वाटते. एकदा मी बाटलीत शिरले की मी माझा आकार, माझं अस्तित्व तर नाही ना गमवून बसणार?"
"हे बघ, तू आपणहून माझी गुलामी स्विकारलीस ना! मग आता आढेवेढे कसले घेतेस?" त्याने वैतागून विचारले.
जीनी हिरमुसली झाली. आपण थोडा आणखी विचार करायला हवा होता अस म्हणून हळूच बाटलीत शिरली.

-------

"खूप आवडतेस तू मला जीनी. तुझ्याशिवाय इतके दिवस कसा जगलो काय माहित. पण तू आयुष्यात आलीस आणि सगळच कसं बदलून गेलं बघ."

आज स्वारी भारीच खुशीत दिसतेय, जीनी खुदकन हसली.

"अशीच हसत रहा, फार गोड दिसतेस."

"आज क्या मुझे बोतल में उतार रहे हो?" जीनी लटक्या रागाने म्हणाली.

"अग तुला बाटलीत उतरवल्याला बरेच दिवस होऊन गेले," त्याने हसत उत्तर दिले.
-------

"आज रात्री पार्टी आहे ऑफिसची, जीनी...तुझा आवडता ड्रेस घालून तयार रहा."

"जसा हुकूम, आका!"

"नको नको, नाहीतर असं करुया मीच येताना एक नवीन ड्रेस घेऊन येतो. तुझ्या आवडीचे सगळे ड्रेस कसले झिरझिरित असतात. आमचा बॉस ना थोडा 'हा' मनुष्य आहे. तू दिवसभर बाटलीत, तुला कल्पना नाही बाहेरच्या जगाची. अगदी निष्पाप आहेस तू."

"बरयं आका!"
आपल्या आकाना आपल्यापेक्षा खचितच जास्त अक्कल आहे या बाबत जीनीचे दुमत नव्हते. पण तरी तिला उगीचच वाटून गेले, "इतकी काय वाईट आहे माझी आवड?"
-------

बाटलीतून बाहेर पडून जीनीने आळोखे पीळोखे दिले.

"हे काय किती उशीर? आज तीन दिवसांनी बाटली उघडालीत तुम्ही आका. अंग कसं आखडून गेलं आहे. कित्ती कित्ती म्हणून वाट पाहिली तुमची. पण तुमचा काही पत्ताच नाही," जीनी नाराजीने म्हणाली.

"काम होत. सारखा घराबाहेर होतो आणि नाही जमलं बघ," त्याने उत्तर दिले. "आता फुरंगटून बसू नकोस. पण रोज रोज तुला असं बाटलीतून बाहेर काढणं आताशा कठिण होतयं. मलाही विचारणारी माणसं आहेत. तुझी जादू त्यांच्या लक्षात नको यायला."

"हो तर! प्रत्येक गोष्टीची कारणं तुमच्याकडे अगदी तयार असतात," जीनी रडवेली होऊन म्हणाली.
-------

"हे काय करुन ठेवल आहेस जीनी?" त्याने तावातावाने विचारले.
"मला वाटलं की फर्निचरची जागा बदलावी, घराला कसा वेगळेपणा येतो." जीनीने हसून उत्तर दिले.
"तू जादूची कांडी फिरवून कामं करतेस ते ठिक आहे पण मला विचारल्या शिवाय नको ते उद्योग करायला कोणी सांगितलय तुला. जेवढ मी सांगतो तेवढच करत जा यापुढे," त्याने जरा रागानेच म्हंटल.
"मी आज कांडी नव्हती फिरवली आका. स्वत:हून घराची रचना बदलली. मला वाटलं तुम्हाला आवडेल." जीनीने पडक्या स्वरांत आपली बाजू मांडली.
"हे बघ तुला काय वाटत ते तुझ्याकडेच ठेव. परत असले उद्योग केलेस तर तुझ्यासकट बाटली समुद्रात भिरकावून देईन."
--------

आज जीनीचा मूड काही औरच होता. तिने आज काही म्हणून ऐकून घ्यायच नाही असं ठरवल होतं. खरतर आज बऱ्याच दिवसांनी तिला बाहेर पडायची संधी मिळाली होती.
सगळ्या सामानाची तिने उलथापालथ करुन ठेवली.
"आज मी पण बघणार आहे काय होतं ते. कंटाळून गेलेय या रोजच्या गुलामगिरीला," मनाशी पुटपुटत जीनी आपल्या बाटलीत अंतर्धान पावली.
संध्याकाळी घरी आल्यावर घराची अवस्था पाहून तो हबकून गेला. झाला प्रकार लक्षात आला तशी तो बाटली घेऊन सरळ घराबाहेर पडला आणि समुद्रावर गेला. एकदा हळूवारपणे त्याने बाटलीवरुन हात फिरवला आणि सरळ बाटली समुद्रात भिरकावून दिली.
------

ही गोष्ट माझी तुमची आहे. थोडया फेरफाराने त्यात कोणतीही नाती घाला. मित्र - मित्र, मित्र- मैत्रिण, नवरा-बायको, मालक - नोकर अगदी शिक्षक - विद्यार्थीही. यात चुकत कोणीही नसतो. मालक मालकासारखा वागतो आणि गुलाम गुलामा सारखा. गोष्टीतला "आका" कोण आणि "जीनी" कोण हे मात्र ज्याचं त्याने ठरवायचं.

6 comments:

Anonymous said...

प्रत्येक नात्याला "मालक-नोकर" असा पदर असतो असं तुला म्हणायचं आहे का? मी सहमत नाही! पण हे मात्र खरे, की तसा पदर कुठल्याही नात्यात जाणवू लागला तर वेळीच सावध व्हावं, नाहीतर बाटली फोडायची वेळ येते!

Priyabhashini said...

प्रत्येक नात्याला असाच पदर असतो अस मलाही म्हणायचं नाही पण प्रत्येक नात्यात असं घडू शकतं. आयुष्य हे कुठल्याही नियमांच्या चौकटीत बसत नाही. प्रत्येकाचे अनुभव, नाती वेगळी असतात. बाटली फेकून देण्याची वेळ नक्की कोणामुळे येईल हे ही सांगणॆ कठिण असते.

Anand said...

खुपच सुंदर लिहीतेस तू...
सगळ्याच पोस्ट्सवर कमेंट लिहीत बसत नाही मी आता..पण खरंच फारच छान!!
Keep it up!!

Priyabhashini said...

Thanks a lot...I truly appreciate this encouragement.

Anonymous said...

chan lihila aahes

Abhay Patil said...

tumhi pharach sundar lek lihale aahet...ek ek sagle vachto aahe...

marathi blogs